
आज आणखी एक नवे वर्ष सुरू झाले. या वेळी पूर्वीच्या वर्षांच्या आठवणी जाग्या होणारच. आमच्या ऑफीसला १ जानेवातीला सुटी नसायची. पण त्या दिवशी फारसे काम असे होतच नसे. कांही धीट मुले ऑफीस सुरू होण्याच्या आधीच येऊन पोचून सर्वात मोठ्या साहेबाच्या केबिनच्या आसपास घुटमळत रहायची आणि साहेब एकटे असल्याचे पाहून आत घुसून त्यांना शुभेच्छा वगैरे द्यायची. इतरांच्या नजरेतून मस्का मारायची. माझ्यासारखी बुजरी मुले एकमेकांनाच विश करत असत आणि एकादा घोळका साहेबांकडे जायला निघाला तर त्यांत सामील होऊन त्यांच्याबरोबर जात असत. तिथे जाऊन काय बोलायचे? हेच मला समजत नसे. ते जरा जरा कळायला लागेपर्यंत मीच साहेब झालो होतो.
त्या दिवशी ऑफिसातल्या इतर सहका-यांना भेटून एकमेकांचे अभिनंदन करणे चालायचे. मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये आणि सेक्शनच्या पार्ट्या असायच्या. थोडी वरची जागा मिळाल्यावर इतर लोकांच्या पार्ट्यांमध्ये सामील व्हावे लागायचे. कँटीनमधले तेच तेच सामोसे आणि वेफर्स पुन्हा पुन्हा खाणे शक्य नसले तरी थोडे तोंड चाळवावे लागायचे. कांही कल्पक मित्र बाहेरून केक किंवा मिठाया आणायचे, त्यावर मात्र ताव मारायचा. या सगळ्याचे नियोजन करून ठेवले तर ते बरे पडायचे. शिवाय टेलीफोन सारखा घणघणतच असायचा. त्या दिवशी ऑफिसच्या खर्चाने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना फोन करण्याची मुभा असते अशीच सर्वसामान्य समजूत असावी. त्यामुळे सख्ख्या भावापासून आऊच्या काऊपर्यंत सगळ्यांशी मनमुराद नाही तरी अघळपघळ गप्पा व्हायच्या.
ऑफिसमधल्या गुजगोष्टी खाजगी असल्या तरी त्या मुख्यतः ऑफिसमधल्या विषयांवरच असायच्या. गेल्या वर्षी कोणी कोणी कसकसला गाढवपणा केला होता याची उजळणी व्हायची आणि नव्या वर्षात काय करायचे याच्या योजना, विचार आणि अचाट कल्पना या सगळ्यांवर चर्चा व्हायची. त्यातून कांही कण मिळतच असतील आणि त्यांचा फायदाही पुढे होत असेल. कांही कल्पक साहेब लोकांनी त्या दिवशी वरिष्ठ सहका-यांबरोबर मीटिंगच ठेवली आणि त्या दिवशी मारायच्या गप्पा ऑफिशियल करून टाकल्या.
सेवानिवृत्त झाल्यानंतर आलेल्या २००६ च्या नूतन वर्षाच्या आरंभाला मी ऑफिसात तर नव्हतोच, पण भारताबाहेर गेलो होतो. घरात मला सोडून इनमिनतीन माणसे होती आणि घराबाहेर एकाचीही ओळख नव्हती. परदेशातून भारतातल्या आप्तांना फोन लावण्याइतका निर्ढावलो नव्हतो. त्यामुळे शुभेच्या द्यायच्या तरी कोणाला? हा प्रश्नच होता. "हे विश्वचि माझे घर" असे म्हणत नुकताच आंतर्जालावर प्रवेश केला होता. भारतातून निघतांना दहा बारा लोकांनी त्यांचा ईमेलचा पत्ता देऊन ठेवला होता. तेंव्हा एक ग्रीटिंग कार्ड तयार केले आणि सर्वांना पाठवून दिले.
आंतर्जालावरील विश्वाच्या कक्षा कशा रुंद करायच्या या विचारातून या ब्लॉगचा जन्म २००६ च्या नववर्षदिनाच्या शुभमुहूर्तावर केला. त्यानंतर इतर कांही संकेतस्थळे मिळाली आणि आता खरोखरच त्या बीजामधून निदान एक लहानसे रोपटे तरी वाढीला लागले आहे. ईमेलचा पसारासुध्दा अफाट वाढला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून ज्यांना शुभेच्छा देता आल्या आणि येतील त्यांच्या अनेकपटीने अधिक लोकांबरोबर इंटरनेटवरून संपर्क होऊ लागला आहे.
मागील वर्षाच्या अखेरच्या महिन्यात अचानकपणे आलेल्या एका कामामुळे मला या स्थळावर यायला फारसे जमले नव्हते. पण तरीसुध्दा याला भेट देणा-यांची संख्या वाढतच होती हे पाहून खूप चांगले वाटले. आता नव्या वर्षात नव्या जोमाने ही कसर भरून काढायचा प्रयत्न करायची जबाबदारी माझ्यावर पडली आहे.
या नव्या वर्षात सर्व वाचकांना यश, कीर्ती आणि सुखसमृध्दी आणि भरभरून मिळो अशा शुभेच्छा !!!
No comments:
Post a Comment