Sunday, November 27, 2022

अध्यात्माची ओळख

 अध्यात्म आणि मी  या मथळ्याखाली मी फेसबुकवर लिहिलेल्या स्फुट लेखांचे संकलन करून हा लेख तयार केला आहे. 

मी लहान असतांना 'अध्यात्म' आणि 'परमार्थ' हे शब्द कधी कधी घरातल्या मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून कानावर पडत असत. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असावा आणि तो आत्मा, परमात्मा वगैरेशी संबंधित असावा अशी माझी समजूत झाली होती. तीही अगदीच चुकीची नव्हती. माणूस मरतो तेंव्हा त्याचा आत्मा शरीरातून बाहेर निघून जातो आणि तो स्वर्गात किंवा नरकात जातो किंवा दुसऱ्या एकाद्या बाळाच्या किंवा कुठल्याशा इतर प्राण्याच्या पिल्लाच्या शरीरात शिरतो असे ऐकले होते. काही अतृप्त आत्मे मात्र भूतपिशाच्च होऊन इथेच दीर्घकाळ सतत त्रास देत रहातात असेही मी त्या काळात ऐकले होते आणि मनातून त्यांची भीतीही वाटत होती. पण हा आत्मा जीवंत माणसाच्या शरीरात रहात असतांना तिथे काय काम करतो याची मात्र मला तेंव्हाही फारशी  माहिती नव्हती. सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात अशी परिस्थिती होती की कदाचित मला हा प्रश्न कधी पडलाच नसेल आणि पडला असलाच तरी तो मोठ्या लोकांना विचारायचे धाडस मी करू शकलो नसेन.  लहान मुलांनाही आत्मे असतात असे त्या काळातल्या वडीलधारी लोकांना बहुधा वाटतच नसावे. सदान् कदा त्यांच्या अंगावर ओरडून आणि चांगला मार देऊन मुलांना नेहमी धाकातच ठेवले जात असे. त्यांची तोंड वर करून काही बोलायची प्राज्ञा नव्हती, मग प्रश्न कसले विचारणार? त्यामुळे अध्यात्म हे माझ्यासाठी एक प्रकारचे गूढ होते, पण ते समजून घेण्याचीही त्या वेळी मला काडीचीही गरज वाटत नव्हती. गुरुवारी दत्ताची आरती करणे, शनिवारी मारुतीच्या देवळात जाऊन नारळ फोडणे आणि एकादशीला साबूदाण्याची खिचडी खाणे हेसुद्धा अध्यात्मात येत असावे अशीही माझी (गैर)समजूत झाली होती.

कॉलेजमध्ये गेल्यानंतरच्या काळात मी ज्या प्रकारची पुस्तके आणि लेख वाचले, नाटके आणि सिनेमे पाहिले त्यावरून माझी अशी खात्री पटत गेली की कुणीही एकाद्या आत्म्याला जाता येतांना किंवा काही उद्योग करतांना कधीच पाहिलेले नाही, ती एक फक्त कल्पना आहे, वाटल्यास एक संकल्पना आहे. ती समजून घेण्यावाचून त्यावेळी तरी माझे काही अडत नव्हते. त्यामुळे मी अध्यात्म हा विषयच बाजूला ठेवला. माझ्या अभ्यासात आणि नंतर कामात मी इतका गुंतत गेलो की तो विषय पन्नास वर्षे तसा बाजूलाच राहिला. या काळात मी ज्या वातावरणात रहात होतो, तिथे आजूबाजूचे लोक देवदर्शन, पूजा, आरती वगैरे गोष्टी माफक प्रमाणात करत होते आणि मीसुद्धा आपण होऊन त्यात हौसेने सहभागी होत होतो. मी त्यांना कधी विरोध केला नाही. माझाही असलाच तर तेवढ्यापुरता 'अध्यात्मा'शी संबंध टिकून राहिला होता.

. . .

या विश्वातल्या अणुरेणूंनाही (Aoms and Molecules) कुणीही कधीही डोळ्यांनी पाहिलेले नाही किंवा नाककान यासारख्याआपल्या ज्ञानेंद्रियांकडूनही इतर कुठल्याही प्रकारे आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, पण ते प्रत्येक पदार्थात असतातच असे काही शास्त्रज्ञांनी तर्काच्या आधाराने सांगितले, तसेच त्यांचे काही संभाव्य गुणधर्मही सांगितले. ते मान्य केले तर त्या काळातल्या विज्ञानापुढे असलेल्या अनेक प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे मिळत होती म्हणून बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्यांना मान्यता दिली आणि त्यांच्या आधारावर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पुढील काळात अनेक शोध लागत गेले, तसेच तंत्रज्ञानात भर पडत गेली. पुढच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी अणूच्या अंतर्गत रचनेची कल्पनाचित्रे (मॉडेल्स) तयार करून त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म अशा कणांचे कल्पनेतूनच शोध लावले. न्यूट्रॉन नावाचे एरवी निष्क्रिय असलेले कण खवळले तर प्रचंड मोठा स्फोट घडवतात हे त्यांनी नुसते तर्कानेच सांगितले नाही तर प्रत्यक्षात तसे स्फोट घडवून दाखवले. मग निसर्गामधून अशा प्रकाराने मिळणाऱ्या ऊर्जेचा शांतताप्रिय कामात उपयोग करणेही सुरू झाले. अणुशक्तीपासून विजेची निर्मिती करण्याच्या क्षेत्रात मी आयुष्यभर काम केले. त्यामुळे अणुरेणूंना मी कधी पाहिले नसले तरी त्यांच्या अस्तित्वाबद्दल माझ्या मनात कधीच शंका आली नाही.

सेवानिवृत्तीनंतर माझा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी असलेला संबंध कमी होत गेला. याच काळात आंतरजालाचा प्रसार अकल्पनीय वेगाने वाढत गेला आणि आपल्याला हवे ते जगभरातले ज्ञान घरबसल्या प्राप्त करता येणे शक्य झाले. हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेले महर्षी व्यास, वाल्मिकी, शेकडो वर्षांपूर्वीचे आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदासस्वामी यांनी तेंव्हा काय लिहून ठेवले होते यांचे आजच्या काळातल्या विद्वानांनी सोप्या शब्दांमध्ये सांगितलेले सार वाचणे मला आता शक्य झाले.  त्यांनी केलेले निरूपण मला कुठल्याही देवळात किंवा सभागृहात न जाता माझ्या सवडीनुसार घरबसल्या किंवा पडल्यापडल्यासुद्धा ऐकता येणे शक्य झाले.  तेंव्हा माझ्या मनात असा विचार आला की शास्त्रज्ञांनी सांगितले म्हणून मी जसा अणुरेणूंवर विश्वास ठेवला होता आणि त्यामुळे मला विज्ञान समजायला मदत झाली होती, त्याचप्रमाणे या विद्वानांनी सांगितल्याप्रमाणे आत्मा ही संकल्पना मान्य केली तर कदाचित अध्यात्म या बाजूला ठेवलेल्या विषयाशी निदान तोंडओळख तरी होईल. माझ्या पिढीतल्या इतर काही लोकांना त्याची गोडी का वाटते ते समजेल.

. . .

ईमेल, फेसबुक, वॉट्सॅप वगैरेंमुळे आपला संदेश जगभरात कुठेही असलेल्या एका किंवा अनेक व्यक्तींना  क्षणार्धात आणि फुकटात पाठवणे शक्य झाले, एवढेच नव्हे तर त्या संदेशात अक्षरे, चित्रे आणि ध्वनिसुद्धा पाठवता यायला लागले. यामुळे आज अनेक जुनी तसेच नवी माणसे माझ्या संपर्कक्षेत्रात आली आहेत. त्यात माझे जवळचे आणि दूरचे नातेवाईक, शाळेतले, कॉलेजातले, नोकरीतले आणि कॉलनीमधले मित्र असे निरनिराळ्या प्रकारचे आणि भिन्न वयोगटातले लोक आहेत. रोज कमीतकमी दोनअडीचशे तरी संदेश माझ्या सेलफोनवर येऊन पोचत असतात. त्यातले ९०-९५ टक्के केवळ मौजमजा आणि टाइमपाससाठी असले तरी ५-१० टक्के संदेश 'वाचा आणि विचार करा' या प्रकारचेही असतात. यातल्या चारपाच मित्रांनी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या ग्रंथांची पारायणे केली आहेत, दोन तीन जणांनी कुठल्या कुठल्या ज्ञानयज्ञांना हजेरी लावली आहे आणि एकदोघांनी तर चक्क आध्यात्मिक गुरू शोधून त्यांचे शिष्यत्व पत्करले आहे. आपल्या इतर अज्ञानी मित्रांचाही उद्धार व्हावा या पवित्र हेतूने यातले काहीजण अधूनमधून चमचाभर ज्ञानामृत आपल्या संदेशात टाकत असतात. ते प्राशन करून त्यातले काही कण माझ्या मेंदूपर्यंत पोचले असावेत. तेवढ्या आधारावर मी हा लेख लिहीत आहे.   

"तुला तुझ्या स्वतःच्या आत्म्याची जाणीव झाली आहे का?" असे मी एका जवळच्या आध्यात्मिक मित्राला सरळ विचारले होते. त्यावर त्याने उत्तर दिले की आता कुठे त्याची त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. जेंव्हा त्याची पात्रता पुरेशी वाढली आहे असे त्याच्या सद्गुरूंना वाटेल त्या वेळी ते तेवढी कृपा करतील. त्यांच्या सहाय्याशिवाय आपल्या आपणच आपल्या आत्म्याला शोधता येणे शक्य नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर हा अध्यात्माचा ज्ञानमार्ग फार बिकट दिसतो. त्यासाठी आधी ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा असा  एक खरोखर चांगला गुरु मिळायला पाहिजे आणि त्याने तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारायला हवे. ते तर मला या जन्मात जमेल असे वाटत नाही. कारण विज्ञानाच्या मार्गाने जातांना मला जास्तच चिकीत्सक वृत्ती मिळाली आहे.  त्या मानाने भक्तीमार्ग सोपा असावा. आपल्याला स्वप्नात किंवा ध्यान धरलेले असतांना अमक्या तमक्या देवाने किंवा देवीने दर्शन दिले आणि काहीतरी करायला सांगितले असे दृष्टांत किंवा प्रचीतीचे दाखले मी लहानपणापासून अनेक लोकांकडून ऐकले आहेत. ते सांगतांना त्यांना इतके आनंदाचे भरते आलेले असते की त्यावर शंका व्यक्त करून विरजण घालावे असे मला वाटत नाही.  

. . .

बाबा, स्वामी, कीर्तनकार, प्रवचनकार वगैरे लोकांना विज्ञानाचे वावडे असावे असे वाटते. हे लोक विज्ञानामधील प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या सगळ्या सुविधांचा लाभ तर घेत असतात, पण "या विज्ञानाला हे तरी समजले आहे का?" आणि "ते तरी कुठे जमते ?" वगैरे ताशेरे मारून त्याची टिंगल करत असतात आणि बहुतेक सगळे भाबडे श्रोते त्यांना दाद देत असतात. "यांचे विज्ञान जिथे संपते तिथे आमचे अध्यात्म सुरू होते" हे त्यांचे एक आवडते वाक्य आहे. इतर सर्वसामान्य आणि काही चांगले शिकलेसवरलेले लोकसुद्धा हे वाक्य अधूनमधून ऐकवत असतात. यावरून कुणाला असे वाटेल की विज्ञानाला न सोडवता आलेले गहन प्रश्न अध्यात्मामधून चुटकीने सोडवता येत असतील. पण तसे एकादेही उदाहरण माझ्या तरी ऐकिवात किंवा पाहण्यात नाही.

मात्र अध्यात्म हे विज्ञानाच्या पलीकडे आहे हे विधान तसे पाहता बरोबरच आहे, कारण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (Physics, Chemistry, Biology)  यामधून झालेल्या संशोधनातून आत्मा अस्तित्वात असल्याचा कसलाही पुरावा अजूनपर्यंत सापडलेला नाही आणि यातल्या कुठल्याही विषयात  त्याचे गुणधर्म शिकवले जात नाहीत. म्हणजे  आत्मा ही संकल्पना विज्ञानाच्या बाहेर किंवा पलीकडे तर आहेच आणि अध्यात्म हे ज्ञान आत्मा, परमात्मा वगैरेंशी संबद्धित असल्यामुळे ते विज्ञानात येत नाही. मात्र आचार्य प्रशांत या एका आधुनिक बाबाने आपल्या एका व्हीडिओमध्ये असे सांगितले आहे की सगळे विज्ञानच अध्यात्मात समाविष्ट आहे. विज्ञान हा अध्यात्माचा एक सबसेट आहे. या विधानानुसार अध्यात्म हे आपोआपच विज्ञानाहून मोठे ठरते.

. . .  

अधि + आत्म मिळून अध्यात्म हा शब्द तयार होतो. अधिकार, अधिकृत, अधिपति, अधिवेशन, अधिष्ठान वगैरे शब्द पाहिल्यास अधि या उपसर्गाचा नेमका काय अर्थ असेल ते समजत नाही. 'आत्म्याविषयीचे ज्ञान' असा अध्यात्म या शब्दाचा एक सोपा  अर्थ सोयिस्कररीत्या केला जातो. "मी कोण आहे ? कुठून आलो ? कशासाठी आलो ?" अशासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे अध्यात्म असेही समजले जाते. "मी अमुक तमुक, मुंबईहून काही कामासाठी पुण्याला आलो आहे." असली उत्तरे इथे म्हणजे अध्यात्मात चालत नाहीत. ती या देहाला लागू पडतात, पण मी म्हणजे माझा हा नश्वर देह नव्हे. अंतर्मुख होऊन " खरोखर मी कोण आहे?" याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. असे सांगतात. पण हे अंतर्मुख कसे व्हायचे असते तेच मला तरी अजून समजलेले नाही.

"मला आनंद होतो, मला वाईट वाटते, मला आश्चर्य, भीती, काळजी वगैरे वाटते, मला आवडते, मला पटते, मी शहाणा आहे, मी प्रेमळ आहे, वगैरे वगैरे... " असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा यातला मी नेमका कोण असतो? शरीराच्या आत राहणाऱ्या या अदृष्य 'मी'साठी मन, बुद्धी, अहंकार (मीपण)आणि चित्त असे चार शब्द दिले आहेत, त्यांच्या संकल्पनांमधील सीमारेषा अस्पष्ट आहेत. पण मी यातलाही कुणीच नव्हे असे जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्या प्रसिद्ध निर्वाणषटकात सांगतात. ("मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहम्।")  पुढे जाऊन मी तर  चिदानंदरूपी शिव आहे, थोडक्यात  सांगायचे झाल्यास मी परमेश्वरच आहे असे ते या स्तोत्रात म्हणतात. पण सगळे जण असे समजायला लागले तर जगात केवढा गोंधळ होईल? मुख्य म्हणजे मी असे म्हंटले तर लोक ते मान्य करणार आहेत का ? असे नुसते म्हंटल्याने मी परमेश्वर होणार आहे का? पण तसे स्वतःला खरोखर वाटणे म्हणजे निर्वाण, कैवल्य वगैरे असे अध्यात्म सांगते म्हणे.

. . .

मी स्वतः कोणा आध्यात्मिक गुरूला शरण गेलेलो नाही. त्यामुळे गूगलबाबालाच अध्यात्माबद्दल विचारले. तर त्याने अर्ध्या सेकंदात १,२८,००,००० इतके रिझल्ट दाखवले. यावरून असे दिसते की अध्यात्मावर काहीतरी लिहिणारेही लक्षावधी लोक या आंतर्जालावर नेहमी संचार करत असतात. अध्यात्माबद्दलचे ब्लॉग आणि व्हीडिओ सुद्धा विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. मी पहिल्या ४०-५० संदर्भांची फक्त शीर्षके वाचली. त्यावरून असे दिसते की अध्यात्म या शब्दाखाली अनंत गोष्टी येतात. आत्मा आणि परमात्मा तर आहेतच, पण मानवता, नैतिकता, दया, करुणा, अहिंसा, प्रामाणिकपणा, निरपेक्ष कर्म करणे, मनःशांति, रागावर नियंत्रण ठेवणे अशा गोष्टीसुद्धा त्यात येतात. 'जे जे उत्तम उदात्त सुंदर, महन्मधुर ते ते' असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रतेबद्दल जे लिहिले आहे ते अध्यात्माच्या कक्षेतही येते असे दिसते. 

कोणी म्हणतो अध्यात्म आणि धर्म या वेगळ्या गोष्टी आहेत, पण हिंदू, बौद्ध, जैन, शीख आदि भारतीय धर्म किंवा पंथ सोडून इतर कुठल्या धर्मांमध्ये अध्यात्माचा उल्लेख येत नाही आणि या भारतीय धर्मांबद्दल बोलणारे गुरु अध्यात्माच्या गोष्टी करत असतात असे मला वाटते. रिलिजन या शब्दाला धर्म हा प्रतिशब्द वापरला जात असला तरी त्या दोन्हीमध्ये फरक आहेच. तो लक्षात घेतला तर देवाची उपासनापद्धति या अर्थाचा अध्यात्माशी तसा थेट संबंध नाही, पण भाविक लोक मात्र आपल्या भजनपूजनाला अध्यात्म समजतात हे मी लहानपणापासून पहात आलो आहे. काही लोक अध्यात्माचा संबंध योगाशी जोडतात. योग या शब्दाचा अर्थच बहुधा परमेश्वराशी जुळणे असा आहे, पण आपण तो एक फक्त व्यायामाचा प्रकार समजतो. बाह्य गोष्टींपासून मिळणाऱ्या तात्कालिक किंवा खोट्या आनंदाऐवजी चिरकाल टिकणारा खरा आनंद प्राप्त करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे यावर मात्र बहुतेक लोकांचे एकमत दिसते. 

. . .

अध्यात्म या विषयावर जे काही सांगितले किंवा लिहिले जाते त्यात काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात.

१. आत्मा अमर आहे आणि तो एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात जात असतो, पण तो आपल्या आधीच्या आणि या जन्मात केलेल्या कर्मांचे गाठोडे सोबत घेऊन पुढे जातो.

२. माणसाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांची फळे त्याला याच किंवा पुढे येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या जन्मात मिळतातच, किंवा स्वर्गात किंवा नरकात काही काळ राहून ती भोगावी लागतात.

३. माणसाचे बहुतांश जीवन दुःखाने भरलेले आहे. इतर प्राण्यांचे हाल तर विचारायलाच नको.

४. ते दुःख टाळण्यासाठी आणि कायम टिकणारा आनंद मिळवण्यासाठी या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर पडणे हे मनुष्यजन्माचे ध्येय असायला हवे. 

५. आपल्या पापपुण्याची फळे भोगून झाल्यावर ती पाटी कोरी होते तेंव्हा मोक्ष मिळतो. त्या वेळी आत्मा परमात्म्यात विलीन होतो. त्याचे वेगळे अस्तित्व शिल्लक रहात नाही.

क्रमांक ३ वर लिहिलेले निरीक्षण पूर्वीच्या काळात कदाचित पूर्णपणे बरोबर असेल. त्या काळातले लोक फार पापे करत होती का? आणि म्हणून ती सतत दुःखी रहात असतील का ? आजकाल माणसाचे जगणे हे बऱ्याच प्रमाणात सुखावह झाले आहे. "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे", "आनंदीआनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे", "फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा" अशी गाणी कवी लिहितात आणि ती लोकांना आवडतात. आजकाल वयोवृद्ध लोकसुद्धा जास्तीत जास्त आनंदात कसे रहाता येईल असा विचार करायला लागले आहेत. कदाचित त्यामुळे ते आजकाल अध्यात्माच्या वाटेने फारसे जात नाहीत. तान्ही बाळे किंवा मानसिक वाढ खुंटलेली मुले बहुतेक वेळा हसतमुख असतात. त्यांना पाहून असे वाटते की आनंदात राहणे ही मानवाची खरी मूळ अंतःप्रेरणा असावी. दुःखी राहणे ही नाही. इतर मुद्दे पडताळून पाहणे सर्वसामान्य माणसाला अशक्य आहे. आजकाल त्रिकालज्ञानी महापुरुष कुठे भेटत नाहीत. त्यामुळे मागच्या किंवा पुढच्या जन्माबद्दल किंवा मोक्षप्राप्तीबद्दल कोणीच काही ठामपणे सांगू शकत नाही आणि ते सिद्ध करू शकत नाही. एकाद्याला काही लाभ झाला तर ती त्याच्या पूर्वजन्मीची पुण्याई आणि फटका बसला तर ते कुठल्याशा पापाचे फळ असे जुन्या काळातले लोक नेहमी म्हणत असत. नव्या पिढीमधल्या लोकांच्या बोलण्यात अशी वाक्ये येत नाहीत.

. . .

 अध्यात्म हा विषय आत्म्याच्या संबंधात असला तरी त्यावरील चर्चा परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतातच. हिंदू धर्मग्रंथांमधील थिअरीप्रमाणे या विश्वातील अणुरेणू आणि त्यांच्यामध्ये असलेली पोकळीसुद्धा निर्गुण निराकार अशा परमेश्वराने व्यापलेली आहे.  ज्या काळात या विश्वात काहीच नव्हते तेंव्हासुद्धा हा अनादि अनंत असा भगवंत होताच. त्याने ब्रह्म आणि माया किंवा पुरुष आणि प्रकृति अशी दोन रूपे घेतली. प्रकृति किंवा मायेने स्वतःमधूनच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते निर्माण केली आणि त्यांना एकमेकांमध्ये मिसळून सगळे निर्जीव पदार्थ, तसेच सजीवांचे देह तयार केले आणि ते काम ती करतच राहिली आहे. परमेश्वरामधला 'पुरुष' सूक्ष्म अंशाने जीवात्म्याच्या रूपाने त्या देहांमध्ये प्रवेश करून त्यांना सचेतन करतो आणि तो माणूस चालायला, बोलायला, पहायला, ऐकायला, काम करायला लागतो. अखेर त्या जीवात्म्याने देहातून बाहेर पडल्यानंतर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आणि वाढलेले त्याचे शरीर काम करणे थांबवते आणि त्याचे विघटन होऊन ते पंचमहाभूतांमध्ये मिसळून जाते. पण तो जीवात्मा मात्र दुसऱ्या एका शरीरात शिरून त्या शरीराचा ताबा घेतो. असे होत राहते. काही पुण्यवान जीवात्मे यातून बाहेर पडून परमात्म्यात विलीन होतात. त्यांना मोक्ष मिळाला असे समजले जाते. 

इथे या विश्वाची निर्मिति आणि विनाश करणारा परमेश्वरच त्याच्या कणाकणात भरलेलाही आहे आणि त्याला चालवणारे चैतन्यही तोच आहे. म्हणजे निर्माता हा स्वतःच स्वतःची निर्मिति आहे आणि तिचा चालकही आहे. असे गुंतागुंतीचे तत्वज्ञान समजण्यासाठीसुद्धा माणसाला खूप उच्च दर्जाचा बुद्ध्यांक असावा लागतो. तो नसल्यामुळे सर्वसामान्य लोक सगळी परमेश्वराची लीला या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण या विश्वातली रहस्ये समजून घेण्याचा वैज्ञानिक पद्धतीने प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ लोक त्यावर विचार करतात. अध्यात्मामधल्या परमेश्वराबद्दलच्या या विचारात अनेक काल्पनिक गोष्टी गृहीत धरल्या आहेत असे त्यांना वाटते. पण धार्मिक लोक त्या गृहीतकांनाच ज्ञान म्हणतात आणि जे लोक ते मानत नाहीत अशा लोकांना अज्ञानी ठरवतात. इथे अध्यात्म आणि विज्ञान या क्षेत्रांतील भक्तांमधला संघर्ष समोर येतो.

. . .

गुरु, बाबा, कीर्तनकार वगैरे लोक नेहमीच विज्ञानाची टिंगल करत असतात किंवा ते कसे हिणकस आहे असे या ना त्या मार्गाने दाखवत असतात हे समजण्यासारखे आहे. सर्वसामान्य लोकांनी वैज्ञानिक दृष्टीने तर्कशुद्ध विचार केला तर त्यांच्यावर आपली पकड राहणार नाही ही भीती त्यांना वाटत असावी. आजकाल त्यांनी एक नवीन युक्ती वापरायला सुरुवात केली आहे. "नासाने किंवा कुठल्याशा जर्मन शास्त्रज्ञांनी सुद्धा हे मान्य केले आहे" असे म्हणत हे लोक त्यांना वाटेल ते (खोटे) सांगायला लागले आहेत आणि  बाबावाक्यम् प्रमाणम् असे मानणारे त्यांचे अनुयायीही सर्रास तशी विधाने करायला लागले आहेत. कोणी म्हणतात आपल्या डोळ्यांना तर फक्त काही वेव्हलेंग्थचा प्रकाश दिसतो आणि कानांना फक्त काही फ्रिक्वेन्सीजचा ध्वनि ऐकायला येतो.  त्यामुळे विज्ञानाने काढलेली माहिती नगण्य आणि अपूर्ण असते. या विश्वात त्याच्या पलीकडेसुद्धा खूप काही आहे. हे तसे पाहता खरेही आहे.

विज्ञान हे अपूर्णच आहे आणि कितीही प्रगति केली तरी त्यानंतरही ते नेहमी अपूर्णच राहणार आहे यात काही दुमत नाहीच, कारण कालपरवा मिळालेल्या माहितीमधून आज नवे प्रश्न मनात उत्पन्न होतात आणि उद्यापरवातेरवा अनेक दिवस (महिने, वर्षे, शतके वगैरे) त्यांची उत्तरे शोधण्यात जातात, कधी कधी तर ती उत्तरे मिळतच नाहीत, असेच आजवर चालत आले आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. पण आपल्याला न दिसणारे किरण आणि न ऐकू येणारे ध्वनि या विश्वात आहेत हे मात्र विज्ञानामुळेच आपल्याला समजले आहे, कारण ते ग्रहण करण्याची साधने वैज्ञानिक संशोधनांमधूनच तयार केली गेली. त्या बाबतीत विज्ञानाने आता पुष्कळ प्रगति केली आहे. 

"आमच्या ऋषीमुनींना अंतर्ज्ञानानेच सगळे समजत होते" असे अध्यात्मवादी लोक सांगतात. पण त्याचा आज काय उपयोग आहे ? त्या ऋषीमुनींचे टेक्निक कुणी स्वामीने शोधून ते सामर्थ्य जगाच्या उपयोगासाठी जगाला दिले तर त्याचा जगाला फायदा होईल.

. . .

अध्यात्माच्या मार्गाने जाणारे लोक विज्ञाननिष्ठांना 'अज्ञानी' म्हणतात, तर विज्ञानाचे वाटसरू अध्यात्म हे पूर्णपणे काल्पनिक आहे आणि त्यावर विश्वास ठेवणारे लोक अंधश्रद्धाळू किंवा अडाणी आहेत असे समजतात. त्यांचा वाद ऐकला तर ते एकच भाषा बोलत आहेत की नाही याबद्दल मनात शंका येते. त्याचे कारण ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान वगैरे शब्दांचे त्यांना अभिप्रेत असलेले अर्थ वेगवेगळे असतात. कदाचित सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, पण मराठी भाषेतला पहिला शब्दकोष जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कँडी या दोन इंग्रजांनी दीर्घकाळ प्रचंड मेहनत घेऊन तयार केला. श्री.दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी त्यांच्या सहकार्याने मराठी भाषेचे व्याकरण तयार केले आणि नव्या प्रमाणभाषेची सुरुवात झाली. पुढे सगळ्या लेखकांनी आपापली पुस्तके त्या प्रमाणभाषेत लिहिली आहेत.

इंग्रजीमधील  Knowledge, Science, Ignorance आणि Philosophy या शब्दांना ज्ञान, विज्ञान, अज्ञान आणि तत्वज्ञान हे मराठी प्रतिशब्द दिले गेले. बहुतेक मराठी लेखकांनी इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला होता आणि त्यांच्या लेखनावर इंग्रजी पुस्तकांमधील विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे या इंग्रजी भाषेतले मूळ अर्थ या मराठी शब्दांना येऊन चिकटले आणि रूढ झाले. आपणही, निदान मी तरी, ते मराठी शब्द त्या इंग्रजी अर्थांनी वापरत आलो आहे. पण गीता, भागवत यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये हे संस्कृत शब्द वेगळ्या अर्थांनी योजले असावेत असे संदर्भावरून वाटते. कुठल्याही विषयाचे नॉलेज म्हणजे त्याचे ज्ञान असे आपल्याला वाटते, पण मी जन्मभर कष्ट करून कणाकणाने शिकून घेतलेले सायन्स आणि इंजिनियरिंगमधले नॉलेज हे ज्ञान नाहीच, याला आम्ही ज्ञान म्हणत नाही असे एका पंडिताने सांगितले तेंव्हा मला धक्का बसला.

.. .

तो विद्वान म्हणाला की सायन्स आणि इंजिनियरिंगसारखे नॉलेज असलेच तर विद्या किवा विज्ञानाचा भाग असेल, ज्ञान नाहीच. त्याच्या मताप्रमाणे ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान किंवा स्वतःला झालेली आत्म्याची ओळख असा आहे आणि ते  ज्ञान पुस्तके वाचून किंवा शिकून मिळत नाही.  वर्षानुवर्षे किंवा अनेक जन्मांमध्ये समाधी, साधना, चिंतन वगैरे योगाने तपश्चर्या केल्यानंतर ते प्राप्त होते, किंवा ते देण्यासाठी महाज्ञानी गुरूचा अनुग्रह होणे आवश्यक असते. खरे 'ज्ञानी' सत्पुरुष क्वचितच जन्माला येतात आणि बहुतेक वेळा ते पूर्वजन्मांमध्ये संपादन करून ठेवलेले ज्ञान या जन्मात आपल्यासोबत घेऊन येतात अशी भाविकांची श्रद्धा असते. 

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान याबद्दल असे लिहिले आहे.

मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।

जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥

कारण की स्वरूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही ॥७-४॥

तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।

तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥

त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही ॥७-५॥

अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।

तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥

हे अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाचे ठिकाणी खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान म्हणतात, हेही तू समज. ॥७-६॥

. . .

पुस्तके वाचून किंवा शिक्षकाकडून शिकता येते ती विद्या असते, ते ज्ञान नव्हे असा काही तरी ज्ञान या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ असावा असे दिसते. प्राचीन काळात लहान मुलांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवत असत. मोठेपणी काही मुमक्षु लोक सद्गुरूकडे  किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या करून ज्ञान प्राप्ती करत असत असे सांगितले जाते.  विज्ञान या शब्दाचा अर्थ 'प्रपंचू' म्हणजे रोजच्या जीवनात  उपयोगी पडणारे ज्ञान असा असावा. गीतेच्या सातव्या अध्यायाचे नाव ज्ञानविज्ञानयोग असे आहे आणि सुरुवातीलाच "ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः" म्हणजे "मी तुला विज्ञानासह सगळे काही ज्ञान सांगतो" असे श्रीकृष्णाने म्हंटले आहे. पण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरे जे काही आपण विज्ञानातून शिकतो त्यातले काहीही त्या अध्यायात पुढे कुठेच आलेले नाही. पंचमहाभूते आणि मन, बुद्धी व अहंकार यांच्यामधून प्रकृति (निसर्ग) होते एवढा भाग कदाचित विज्ञान असेल, पण पुढे गेल्यावर "ते सर्वही मीच आहे" वगैरे ज्ञान किंवा अध्यात्म दिले आहे.

कणाद, भास्कराचार्य आदि प्राचीन भारतीय वैज्ञानिकांनी सांगितलेले सिद्धांत 'सायन्स'मध्ये येत असले तरी ते परंपरागत गुरुशिष्यपरंपरेमधून किंवा वंशपरंपरेतून आपल्यापर्यंत येऊन पोचले नाहीत. त्यांच्या काळात तरी ते विद्वान त्याला विज्ञान म्हणत होते की नाही कोण जाणे. त्यामुळे मी जे काही थोडे फार विज्ञान शिकलो ते पूर्णपणे पाश्चात्य शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या सायन्समधूनच शिकलो आहे. कदाचित विज्ञान या मूळ संस्कृत शब्दात  इतिहास, भूगोलासारख्या इतरही अनेक विषयांच्या सामान्य ज्ञानाचा समावेश त्या काळात होत असावा. सायन्स हा इंग्रजी शब्दही तसा फार जुना नाही. पूर्वी त्या विषयाला नॅचरल फिलॉसॉफी म्हंटले जात असे. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले अचेतन पदार्थ आणि मन, बुद्धी, अहंकार असलेले सजीव यांचा अभ्यास म्हणजे विज्ञान असा त्या शब्दाचा प्राचीन अर्थ असला तर तो अर्थही सायन्स या शब्दाच्या जवळ येतो. आता आपण माती, पाणी, हवा वगैरेसुद्धा मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे यातून निर्माण झाली आहेत असे म्हणतो एवढेच.

. . .

विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे माणसाचे कष्ट आणि वेळ वाचवणारी साधने, तसेच अनेक नवनवी उपयुक्त अशी उत्पादने उपलब्ध झाली. या सर्वांमुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाले, त्यांचे इतर लोकांवर असलेले परावलंबित्व कमी झाले, त्यामुळे सामाजिक परिस्थिति पार बदलली. काही प्रमाणात कुटुंबव्यवस्थाच विस्कळित होत गेली. यातून काही जुने प्रश्न नाहीसे झाले, तर अनेक नवे प्रश्न उद्भवले आहेत. माणसाचे शारीरिक कष्ट कमी झाले असले तरी त्याचे मानसिक तणाव वाढले आहेत असे काही लोकांना वाटते . ते लोक त्यासाठी  विज्ञानाला सर्वस्वी जबाबदार धरतात आणि अध्यात्म हा त्यावर नामी उपाय आहे असे प्रतिपादनही करतात. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात जिथे हे तणाव आधी सुरू होऊन विकोपाला गेले तिथे काही स्वामी, योगी आचार्य वगैरेंना चांगला प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे. त्यांच्या संस्थांची संस्थाने जगभर उभी राहिली आहेत आणि ती पसरत चालली आहेत.  

या सर्वांचा अध्यात्माशी किती थेट संबंध आहे हे मला माहीत नाही. पण त्यांच्या अनुयायांचे मानसिक तणाव काही प्रमाणात तरी कमी झाले असावेत असे वाटते. भारतातले माझ्या आईवडिलांच्या पिढीपर्यंतले बहुतेक लोक आपल्या प्रपंचाचा आणि काळज्यांचा भार परमेश्वरावर सोडून देत असल्यामुळे ते लोकही त्यांना मानसिक त्रास होईल इतके जास्त टेन्शन घेत नव्हते. "आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार, ठेवोनिया । " अशा वृत्तीने ते रहात होते. पण आमच्या पिढीपासून देवावरचा विश्वास कमी होत गेला आणि काही वेळा आपण  स्वतःही काही करू शकत नाही अशा असहाय्य परिस्थितीला सामोरे जाणे कठीण व्हायला लागले. अशा आजच्या काळातल्या लोकांना वारकरी संप्रदायासारख्या जुन्या परंपरांपेक्षा आधुनिक काळातल्या आध्यात्मिक  गुरूंचे आकर्षण जास्त वाटते. आता त्यांच्या सहाय्याने ते मोठ्या संख्येने अध्यात्माच्या मार्गाकडे वळू पहात आहेत. त्यांना आत्मा, परमात्मा वगैरेंचे ज्ञान आणि मोक्ष वगैरे मिळो ना मिळो, पण त्या निमित्याने ते व्यसनापासून दूर रहात असतील, त्यांच्यातला प्रामाणिकपणा, माणुसकी, परोपकार आणि दानवृत्ती वगैरे गुण  वाढत असतील तर ते त्यांच्यासाठी तसेच समाजासाठीही चांगलेच आहे.

. . .

मी गेले काही दिवस अध्यात्माची थोडी तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी आणि हिंदी या भाषांमधून मला जी माहिती सुलभपणे आंतर्जालावर मिळत गेली तेवढ्यातूनच काही समजून घेण्याचा हा अगदी तोकडा प्रयत्न आहे. त्यातून मला जेवढे समजत गेले ते मी या आधी तेरा भागांमध्ये लिहिले आहे. यावरून मला असे दिसले की अध्यात्म या शब्दाची सर्वसंमत अशी व्याख्या नाही. या जगात कालपरवा जे काही होते ते नाहीसे झाले आणि आज जे काही आहे ते उद्यापरवा इथे असणार नाही. पण अनादि अनंत असा परमात्मा पूर्वीही होता आणि पुढेही असणार आहे हे अंतिम सत्य आहे, तसेच तो परमात्मा सूक्ष्मरूपाने आपल्यात वास करत आहे. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न असा काहीसा अध्यात्माचा अर्थ असावा. प्रत्येकाने तो प्रयत्न करावा अशा उपदेश केला जात असतो.

दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रियांना मिळणारे सुख तात्कालिक असते आणि ते कमी कमी होत जाते हे आपण पहातोच. लाडवाचा पहिला तुकडा खातांना छान लागतो, पण दोन तीन लाडू खाल्यानंतर आणखी खावासाही वाटत नाही. एकादे गाणे कितीही आवडले तरी आपण ते सतत ऐकत रहात नाही. पण परमेश्वराला भेटल्यानंतर आत्म्याला मिळणारा परमानंद, चिदानंद वगैरे दैवी सुख या सर्व भौतिक सुखांच्या मानाने असंख्यपटीने मोठे आणि निरंतर असे असते असे सांगितले जाते. पण ते मिळवण्यासाठी आधी स्वतःच्या इंद्रियांना पूर्णपणे काबूत ठेवलेत तरच तुम्ही एक पाऊल तरी पुढे जाल अशी अध्यात्माची अट आहे.

या उलट "ये जिंदगी ना मिले दोबारा" असे म्हणत करता येईल तितकी मौजमजा करून घ्यावी असा चंगळवादी विचार आजकाल प्रबळ होत चालला आहे आणि मिळू शकेल तेवढे सुख ओरबाडून घेणे चालले आहे. त्यातून पर्यावरणाच्या प्रदूषणासारखे जागतिक प्रश्न उद्भवल्यामुळे विचारवंतांना  भविष्याची काळजी वाटायला लागली आहे. माणसामाणसांतही सामंजस्य न राहिल्यामुळे ते एकमेकांबरोबर सहकार्य करण्याऐवजी  एकमेकांचा विनाश करू पहात आहेत.  त्याने अध्यात्माचा विचार केला किंवा तो ते करू शकला तर ते निश्चितपणे समाजासाठी चांगले होईल.

मानव हासुद्धा एक सोशल अॅनिमल आहे, तो कळप करून राहणारा आहे. यातून निघालेली नैसर्गिक अंतःप्रेरणा (इन्स्टिंक्ट) त्याला पुढेही तारून नेईल, असेही सांगितले जाते, पण  ही अतःप्रेरणा असणे हाच मुळी मानवांना अंतरात्मा असल्याचा पुरावा आहे  आणि निसर्ग हे परमात्म्याचेच रूप आहे असे अध्यात्मवादी सांगतात.

(समाप्त) 






 *****************

1 comment:

Sheetal Bhangre said...

सर, तुमच्या wordpress वरच्या संस्कृत सुभाषितांच्या पोस्ट्स चाळल्या. काही सर्च करताना हाती लागल्या. हे संस्कृताचे मराठी अर्थ नरेंद्र गोळे यांनी दिले आहेत ना? मी एक भाषांतरकार असून प्राचीन भारतावरील एका पुस्तकाचा अनुवाद करत आहे. त्यात जुन्या ग्रंथातली काही कोटेशन्स आहेत. त्याविषयी मला संस्कृत ग्रंथांच्या जाणकार व्यक्तीशी चर्चा करायची आहे. गोळे सरांचा मोबाईल नंबर मिळेल काय? शीतल भांगरे. ९८२२६९४४०३