Tuesday, March 11, 2025

निसर्गाच्या सान्निध्यात

 मी २०२३मध्ये अमेरिकेला जाऊन न्यूजर्सी स्टेटमधील एका लहानशा खेडेगावात चार महिने राहून आलो होतो. तिथे मला चोवीस तास निसर्गाच्या सहवासात रहायचा एक आगळा वेगळा अनुभव आला. त्याचे वर्णन मी मागच्या वर्षी फेसबुकावरील एका लेखमालिकेत केले होते. त्याचे संकलन या ब्लॉगमध्ये करून देत आहे.

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१

आमचे जमखंडीचे घर भरवस्तीत होते आणि तिथली सगळी घरे एकमेकांना खेटून उभी होती. आमच्या घराच्या तीन्ही बाजूंच्या भिंतींपलीकडे आमच्या घराला लागूनच दुसऱ्या लोकांची घरे होती. आमच्या दरवाजासमोर एक लहानशी मोकळी जागा होती, तिला आम्ही अंगण म्हणत असलो तरी त्या जागेत तीन बाजूंनी तीन दरवाजे उघडत असल्यामुळे तिचा उपयोग लोकांच्या जाण्यायेण्यापुरताच होता. आम्ही आमच्या गच्चीवरच पंधरावीस कुंड्या ठेवून त्यात तुळस, ओवा, पुदीना, गवतीचहा, कोरफड यासारखी उपयोगी आणि गुलाब, मोगरा, शेवंती वगैरे फुलझाडे लावली होती. आमच्या हायस्कूलच्या आवारात मात्र  एक खूप मोठा जुना वटवृक्ष आणि कडूनिंब, चिंचा, शमी, कवठ यासारखे आणखी काही  काही मोठमोठे वृक्ष होते आणि एक सुंदर फुलबागही होती.

अणुशक्तीनगर या वसाहतीला एका मोठ्या बगीचाचे रूप होते. त्यामुळे बिल्डिंगमधून खाली उतरल्यावर सगळीकडे हिरवळ आणि भरपूर झाडेझुडुपे दिसत होती. आम्ही मुंबईत असूनसुद्धा बरेचसे निसर्गाच्या कुशीत रहात होतो. पुण्यातल्या आदित्यगार्डन सिटीमध्येही त्या नावाला साजेशी बाग होती. मी हल्ली रहात असलेले ब्ल्यूरिज टाउनशिपसुद्धा हिरवाईच्या बाबतीत अणुशक्तीनगराची आठवण करून देणारे आहे. पण बिल्डिंगमधून लिफ्टने खाली उतरून काही अंतर चालत गेल्यावर मला त्या झाडाझुडुपांचा सहवास मिळतो.


गेल्या वर्षी मी अमेरिकेला जाऊन आलो तेंव्हा मला पहिल्यांदाच अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात रहायचा एक वेगळाच अनुभव मिळाला. न्यूजर्सीमध्ये माझ्या मुलाने एक छोटासा बंगला घेतला आहे. त्याच्या आजूबाजूला चांगली चारपाचपट मोकळी जागा आहे, त्यामुळे तिथे अंगणही आहे आणि परसही आहे. त्या संकुलातल्या सगळ्याच बंगल्यांच्या आवारात भरपूर मोकळ्या जागांमध्ये अनेक मोठमोठी  झाडे  लावून ठेवलेली आहेत. झाडांच्या जंगलात अधूनमधून घरे बांधली असावीत असा भास होतो. ती सगळी मेपल, ओक यासारखी माझ्या ओळखीची नसलेली अमेरिकेतली झाडे आहेत. पण त्या झाडांवर सतत काही पक्ष्यांची ये जा चाललेली असते, त्यातले चिमण्यांच्या आकाराचे दोन पक्षी फारच सुरेख दिसतात. मी तिथे असतांना अगदी घरात बसूनसुद्धा रोज सकाळसंध्याकाळ निरनिराळ्या पक्ष्यांचे काही मंजुळ तर काही कर्कश आवाज माझ्या कानावर पडत असत. त्या वेळी तिथल्या जास्वंदीच्या झाडांना भरभरून फुले आली होतीच, इतर अनेक अनोळखी झाडांनासुद्धा फुलांचा बहर आला होता. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक प्रशस्त पडवी होती. तिथे आणि बागेतही खुर्च्या ठेवल्या होत्या.  मी दिवसातला बराचसा वेळ तिथेच बसून रहात असे.


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -२

आमच्या तिथल्या घराच्या अंगणात म्हणजे समोर पण डाव्या बाजूला सुंदर लॉन आहे आणि कडेकडेला काही फुलझाडे आहेत. दरवाजाच्या समोरच्या एका झाडाला गोलगोल लिंबासारखी फळे येत होती. ती कसली हे आम्हाला समजत नव्हते. तिथल्या चिमण्या, कावळे किंवा ससेसुद्धा त्यांना खात नव्हते. आमच्याकडे आलेल्या एका अमेरिकेतल्या पाहुणीने सांगितले की ते अॅप्रिकॉट आहेत. सुका मेवा या स्वरूपातले जरदाळू आम्हाला माहीत होते, पण ते कसल्या प्रकारच्या झाडाला लागत असतील याची सुतराम कल्पना नव्हती.  गूगलवरून शोध घेतल्यावर त्याचे झाड आणि त्याची पाने आमच्या झाडासारखीच दिसली.  थोडासा धीटपणा करून ते फळ चाखून पाहिले, पण त्याची आंबटतुरट चंव कुणालाही आवडली नाही. त्या फळांना उन्हात ठेऊन सुकवून पाहिले, पण अमेरिकेत कडक ऊन पडत नव्हते. तिथल्या माफक उन्हात ती फळे सुकली नाहीत, सडतच गेली.  त्याचा सुका मेवा करायचे नेमके तंत्र माहीत नसल्यामुळे  या अॅप्रिकॉटच्या झाडाला लागलेल्या फळांना सुकवून त्यांचे खाण्यायोग्य जरदाळू बनवायला काही केल्या जमले नाही. कदाचित अॅप्रिकॉटमध्येही निरनिराळ्या जाती असतील आणि हे झाड वेगळ्या जातीचे असेल.

कमळाचे फूल नेहमी चिखलात उगवते म्हणून त्याचे पंकज असेही एक नाव आहे.  तलावात किंवा निदान पाण्याच्या डबक्यांमध्ये फुललेली कमळे मी भारतात अनेक ठिकाणी पाहिली आहेत. पण आमच्या अमेरिकेतल्या घराच्या परसातल्या एका झाडाच्या शेंड्यावर कमळासारखे दिसणारे फूल आले होते. आधी त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी स्टुलावर चढून त्याला निरखून पाहून घेतले. ते एक वेगळ्याच प्रकारचे झाड होते. नंतरही त्याला आणखी दोन तीन फुले आली.  त्यांच्या पाकळ्या झडून गेल्यावर त्यांची रसरशीत बोंडे त्या झाडाला लटकून रहात होती.








अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -३

आपण नेहमी असे पाहतो की काही झाडांची फुले सकाळी उमलतात आणि संध्याकाळपर्यंत कोमेजून जातात किंवा गळून पडतात, तर काही फुले झाडांवरच राहिली तर दोन चार दिवस टिकतात, पण ती वेचून देवांना वाहिली तर नंतर दिवसभरात त्यांचे निर्माल्य होते. झेंडूसारखी काही फुले जेमतेम आठवडाभर टिकतात, गुलाबाच्या फुलांची फांदी फ्लॉवरपॉटमध्ये पाण्यात बुडवून ठेवली तर ती फुले काही दिवस टवटवीत राहतात.  पण तीही त्या आधीच हळूहळू सुकायला लागतात. 


अमेरिकेत मला एक वेगळे आश्चर्य पहायला मिळाले.  या छायाचित्रात दाखवलेले दोन फुलांचे गुच्छ महिना उलटून गेला तरी तसेच टवटवीत राहिले होते. त्यातला एक माझ्या मित्राने आम्हाला भेट दिला होता आणि दुसरा आम्हीच बाजारातून आणलेला होता. ही फुले आणि पाने प्लॅस्टिकची  आहेत का अशी मला शंका आली म्हणून मी एक पान आणि पाकळी चुरगळून पाहिली आणि ती खरीच निघाली. पण यांच्यावर कसली रासायनिक प्रक्रिया केली होती की जेनेटिक मॉडिफिकेशन करून वनस्पतीची आगळी वेगळी जात तयार केली होती कोण जाणे. महिनाभरात त्यांची पानेसुद्धा मलूल झाली नाहीत की फुलांचा रंग बदलला नाही. महिनाभर आमच्या हॉलची शोभा वाढवून झाल्यावर त्यांनाच कदाचित कंटाळा आला असेल आणि हवाबदल हवासा वाटत असेल म्हणून आम्ही त्यांना हॉलमधून उचलून निसर्गाच्या संगतीत आणून ठेवले. तिथेसुद्धा ती आणखी एकदोन महिने ताजीतवानी राहिली होती.


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -४

आमच्या अमेरिकेतल्या घराच्या अंगणात आणि परसात म्हणजे पुढच्या आणि मागच्या बाजूला असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेत आधीच्या रहिवाशांनी लावलेले सातआठ मोठे वृक्ष आणि अनेक लहान लहान झाडे होतीच. एक दोन ठिकाणी लहान लहान वाफे तयार करून फुलझाडे लावलेली होती आणि रानफुलांची अनेक झाडेही उगवलेली होती. अंगणात सगळीकडे आणि परसात एका बाजूला लॉन होते. तिकडे बंगल्यांच्या आवारात उगवणारे अपरंपार गवत आणि कुपण अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवता येत नाही, त्याला छाटून व्यवस्थित आकारात ठेवणे आवश्यक असते.  सकाळ संध्याकाळ "लॉन मोविंग" नावाने या गवताची हजामत करणे हा इथल्या रहिवाशांचा आवडता छंद आहे. पण तेवढा वेळ, तेवढी चिकाटी आणि तेवढे बळ कुणाच्या अंगात नसल्यामुळे आम्ही याचे कंत्राट एका एजन्सीला दिले होते.  त्यांची चार माणसे एका व्हॅनमध्ये दोन तीन यंत्रे घेऊन येत आणि पंधरा वीस मिनिटात सगळ्या परिसरातले गवत आणि कुपणावरील झुडुपे छाटून साफसूफ करून जात असत.  

मी मुंबईमध्ये काही लोकांना गवतावर अनवाणी पायाने येरझारा करतांना पाहिले होते. त्यामधून योग आणि अॅक्यूप्रेशर या दोन्हीचे फायदे शरीराला मिळतात असे सांगितले जाते. पण पुण्यामुंबईत कुठेही सार्वजनिक जागेत लॉन असले तर त्यावर माणसांना चालायला बंदी असते. न्यूजर्सीच्या जागेत आमच्या मालकीचे हक्काचे लॉन होते. तिथे आम्हाला अडवणारा कोणी नव्हता. त्या गवतात पायाला बोचणारे काटेही नव्हते आणि विंचूसापांची भीती नव्हती.  यामुळे मी रोज सकाळी कोवळे ऊन अंगावर घेत तिथल्या तिथेच वीस पंचवीस मिनिटे अनवाणी पायांनी फेऱ्या मारून घेत होतो.

----

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -५

आमच्या अमेरिकेतल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत  काही मोठे वृक्ष आणि लहान झाडे होती पण उरलेली बरीचशी जागा पडीक होती. आम्ही तिथे काही फुलझाडे, शोभिवंत पानांची झाडे आणि थोडा भाजीपाला वगैरे उगवायचे प्रयत्न करायचे ठरवले. घरात कुणालाच या बागकामाचा फारसा अनुभव नव्हता आणि तेवढ्यासाठी माळी ठेवणे परवडणारे नव्हते. थोडी जागा सपाट करून घेतली आणि त्यावर माती पसरून लहान लहान वाफे तयार केले. बाजारातून काही रोपे आणून त्यात लावली. त्यांना पाइपातून पाणी देण्याची व्यवस्था होतीच. रोज एकेका रोपट्याला आलेले नवे कोंभ, पाने,फुले, फळे वगैरे निसर्गाची किमया पहातांना कौतुक वाटत होते. त्याने आमचा उत्साह थोडा थोडा वाढत गेला. लाकड्याच्या फळ्यांचा एक संच आणला आणि त्यांना एकमेकांशी जोडून, त्यात माती भरली आणि आणखी दोन वाफे तयार केले. त्यात आणखी थोडी रोपे आणून लावली.

तिथल्या सपाट जमीनीवर लाकडाच्या फळ्यांचा एक चौकोन करून ठोकून घेतला आहे. त्यावर टेबल खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे बसून कोवळे ऊन आणि वाऱ्याच्या मंद झुळुका अंगावर घेत गप्पा मारता मारता चहाफराळ करतांना वेगळीच मजा येत होती. पण हे सुख जास्त दिवस मिळाले नाही. काही दिवसानंतर तिथे रोजच पाऊस पडायला लागला. त्यामुळे त्या टेबल खुर्च्यांना उचलून पडवीत आणावे लागले.  

--------

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -६


 मला समजायला लागल्यापासूनच तुळस ही वनस्पती माझ्या चांगल्या ओळखीची होती. आम्ही आमच्या गच्चीवरल्या बागेतल्या कुंड्यांमध्ये अनेक तुळशीची रोपे लावली होती, किंवा तुळशीचे बी जमीनीत पडून ती आपोआप उगवत होती. त्यांना रोज पाणी देऊन आणि लक्ष ठेऊन त्यांना जगवत ठेवणे हे अत्यावश्यक कर्तव्य समजले जात होते. वर्षातून एकदा तर या तुळशीमाईचे बाळकृष्णाबरोबर विधीवत लग्न लावण्याचा विधी केला जात होता. एरवीसुद्धा रोज पूजा करतांना देवांना तुळशीची पाने वाहिली जात होती. घरात कुणाला खोकला झाला किंवा घसा खवखवत असला तर तुळशीची पाने खाऊन त्याला आराम मिळत असे हा औषधी उपयोगही होताच. नंतरच्या आयुष्यातसुद्धा आम्ही नेहमीच घरातल्या एकाद्या कुंडीमध्ये एकादे तरी तुळशीचे रोप लावून ठेवतच आलो आहोत. 

बेसिल नावाचा प्रकार मात्र मी भारतात कधीच पाहिला नव्हता. मी पूर्वी कधीतरी कुठेतरी असे वाचले होते की तुळशीला इंग्रजीमध्ये बेसिल म्हणतात. म्हणजे जसे गायीला काउ किंवा घोड्याला हॉर्स म्हणतात तसेच हे तुळशीचे इंग्रजी नाव असेल अशी माझी समजूत होती. एकदा मी फेसबुकवर तुळस आणि बेसिल या झाडांवर एक पोस्ट वाचली तेंव्हा कुतूहलाने मी त्यांच्यात काय फरक आहे अशी विचारणा केली.  लगेच त्याचे उत्तर मिळाले आणि बॉटनीनुसार या दोन्ही एकाच जातीच्या पण वेगवेगळ्या वनस्पती आहेत एवढी किंचितशी भर माझ्या ज्ञानात पडली. 

मी अमेरिकेत असतांना आम्ही या दोन्ही वनस्पतींची रोपे आणून आमच्या लहानशा वाटिकेत लावली. ती तिथे चांगली रुजली, फोफावली आणि त्यांना मंजिरीही आल्या. तुळशीचा उपयोग औषधी म्हणून आणि धार्मिक कामांसाठी आहे, जेवणामध्ये कुणी तुळशीची भाजी, चटणी किंवा कोशिंबीर वगैरे करत नाहीत. फार तर नैवेद्याच्या शिऱ्यावर तुळशीचे पान ठेवतात. दान देतांना त्या दानावर तुळशीचे पान ठेवले जात असावे. यावरून  "हलवायाच्या घरावर तुळशीपत्र " अशी म्हण प्रचारात आली आहे.

अमेरिकेत बेसिलची पाने चक्क सॅलडमध्ये घालून जेवणात खाल्ली जातात. आम्हीही अधून मधून खात होतो. दोन्हींच्या चवींमध्ये किंचित साम्य वाटते, पण जाणवण्याइतका फरक असतो. तुळशीच्या पानाच्या मानाने बेसिलचे पान बरेच सौम्य असते. तुळशीचे झाडही दिसायला जरा गंभीर प्रवृत्तीचे वाटते तर बेसिल त्या मानाने खूपच तजेलदार दिसते.  

Tulasi : Scientific name: Ocimum tenuiflorum, Family: Lamiaceae

Basil : Scientific name: Ocimum basilicum

------

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -७

आमचा बागकामाचा आधीचा एकत्रित अनुभव बाल्कनीमधल्या कुंड्यांमध्ये लावलेल्या तुळस, गवती चहा, गुलाब, मोगरा, मनी प्लँट वगैरेपर्यंतच मर्यादित होता. या झाडांना पाणी देत राहिले तर ती पुण्यामुंबईच्या हवामानात काही वर्षे टिकून राहतात. पण भाजीपाला एकाच हंगामापुरता असतो असे ऐकले होते. आम्ही कधीच बाल्कनीमध्ये भाजीपाला पिकवला नव्हता. त्यामुळे कुठले झुडुप (किंवा वेल) किती मोठे होईल आणि त्याला किती फळे लागतील याचा कुणालाही काही अंदाज नव्हता. न्यू जर्सीमध्ये थंडीच्या दिवसात भरपूर बर्फ पडतो आणि जमीनीवर साचून राहतो. आम्ही लावत असलेली कुठलीच झाडे त्या वातावरणात तग धरून राहू शकतील अशी अपेक्षा आम्हाला नव्हती. आमची सगळी बागायती फक्त चार पाच महिन्यांपुरती असणार याची जाणीव होती.  तरीही केवळ हौस म्हणून आम्ही हा प्रयोग करून बघत होतो.

आम्ही भोपळा, वांगी, टोमॅटो, भेंडी, सिमला मिरची आणि साधी मिरची यांची दोन दोन रोपे आणून आमच्या परसातल्या बागेत लावली होती. त्यातली बहुतेक सगळीच रोपे तिथे रुजली, बघता बघता त्यांना कोंभ फुटले, फांद्या, पाने, फुले आली आणि भोपळ्याचा अपवाद वगळता फळधारणाही झाली. या झाडांमध्ये रोजच्या रोज होत असलेले बदल पहायचा मला छंदच लागला होता. दोन्ही प्रकारच्या मिरच्यांना भरघोस फळे आली आणि त्यांचा स्वयंपाकात उपयोग झाला.  वांगी किती मोठी होतील हे पहाण्यासाठी आम्ही वाट पहात राहिलो, कारण दोन तीन लहान वांग्यांची भाजी अगदीच कमी झाली असती. मोठ्या फुगलेल्या वांग्यांमधून दोनतीन वेळा भरीत झाले. दोन्ही प्रकारच्या टोमॅटोंनाही  सॅलड किंवा कोशिंबीर करण्यासाठी पुरेशी फळे आली.  भेंडीच्या झाडाला एक दोनच भेंड्या लागत होत्या, तेवढ्याची भाजी कुणाला पुरणारी नव्हती. त्या किती मोठ्या होतात हे पाहण्याच्या नादात जून होऊन गेल्या आणि खाण्याच्या लायकीच्या राहिल्या नाहीत. 



भोपळ्याचा वेल सरसर वाढला आणि कुंपणावर चढून पसरला. त्याला मोठमोठी सुंदर फुलेही येत होती, पण फळधारणा काही झाली नाही. बहुधा एकाच झाडातल्या फुलांमध्ये स्त्रीकेसर आणि पुंकेसर तयार  होत नसावेत. या छंदावर किती खर्च झाला आणि भाजीपाल्याचे किती पैसे वाचले याचा हिशोब ठेवला नव्हताच. जो काही नफा किंवा तोटा झाला असेल तो नगण्यच असणार. पण आपल्या बागेतली ताजी ताजी ऑर्गॅनिक भाजी खायला मिळण्याचे कौतुक आणि समाधान मिळाले,  थोडा अनुभव मिळाला, अंदाज आला.


------


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -८

मी चार वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो होतो तेंव्हा कॅलिफोर्नियातल्या टॉरेन्स गावात रहात होतो. तिथल्या आमच्या घरासमोरच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रस्ता आणि इमारती यांच्यामध्ये चार पाच मीटर रुंद इतकी मोकळी जागा ठेवलेली होती आणि त्यावर दाट गवताचा हिरवागार गालिचा पसरलेला होता, 'त्या सुंदर मखमालीवरती' जागोजागी नाजुक फुलराण्या खेळत होत्या, त्या जागांमध्ये अनेक लोकांनी तऱ्हेतऱ्हेची सुंदर फुलझाडे लावली होती आणि सर्वांनीच त्यांना हिरव्यागार घनदाट झुडुपांचे सुंदर कुंपण घातले होते. मैलोगणती लांब रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट हिरवळ आणि सुंदर फुलांचे ताटवे पसरले होते. 


न्यू जर्सीला उद्यान राज्य (गार्डन स्टेट) असे म्हणतात, पण मी तिथल्या साउथ प्लेन फील्ड नावाच्या अप्रसिद्ध अशा  लहानशा गावात राहिलो होतो. त्या भागात असे प्रशस्त रस्ते नव्हते. खरे तर तिथे सगळीकडे वृक्षांची गर्दी असलेले जंगल होते आणि त्यात मधून मधून घरे डोकावत होती. त्यातही मोठ्या इमारती कमीच होत्या, सगळीकडे टुमदार लहान लहान बंगले दिसत होते. त्या बंगल्यांच्या आवारातसुद्धा प्रत्येकाने लहानसे लॉन आणि खूप फुलझाडे लावली होती. मी तिथे असतांना या सगळ्या फुलझाडांना बहर आला होता. तिथे सहसा कुणी झाडांवरील फुले तोडत नाही. काही फुले आपल्याआप गळून जमीनीवर त्यांचा सडा पाडतात, तर बहुतेक फुले दीर्घ काळ झाडांच्या फांद्यांवर हसत राहतात. इथल्या बहुतेक झाडांना फुलांचे गुच्छ लागतात असे दिसले. अगदी गवतातूनसुद्धा फुलांचे भरघोस पीक आले.


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -९  :  अमेरिकेतल्या म्हाताऱ्या

आमच्या शाळेजवळ काही सावरीची झाडे होती. त्यांना लांबट आकाराच्या लांबट आकाराच्या मोठ्या शेंगा लागायच्या आणि एक दिवस त्या वाळून फुटायला लागल्या की त्यांच्या आतला कापूस भुरुभुरु बाहेर निघायचा आणि वाऱ्यावर तरंगत इकडे तिकडे उडत पसरायचा. त्याला आम्ही म्हातारी म्हणत होतो, हवेतून उडणाऱ्या एकेका म्हातारीला हळूच पकडून त्यांना गोळा करत होतो आणि घरी नेऊन काडेपेटीमध्ये भरून ठेवत होतो. मला ही सगळी मजा अजून आठवते.


 न्यूजर्सीमध्ये रहात असतांना मला आमच्या अंगणातच अधून मधून एकादी म्हातारी उडत जातांना दिसायची, पण आसपास कुठेच सावरीचे झाड दिसत नव्हते. एकदा मला आमच्या बागेतच एक अगदी लहानसे झुडुप दिसले, त्याला शेंगा लागल्या नव्हत्या, पण म्हाताऱ्यांचा झुबका वाटेल अशी गोल आकाराची फुले लागली होती आणि प्रत्येक फुलातून अनेक म्हाताऱ्या एक एक करून हळूच बाहेर सटकत होत्या. निसर्गाचीही किती गंमत आहे ना? भारतात सावरीचे उंच झाड आणि त्यातून एकदम बाहेर पडणाऱ्या हजारो म्हाताऱ्या आणि इथे लहानशा झाडाच्या फुलामधून एकेकटी बाहेर पडणारी म्हातारी! 


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१०

मी  पोथ्या, स्तोत्रे किंवा हिंदी साहित्यामध्ये कदंब हे नाव वाचले होते, पण प्रत्यक्षात हे झाड कसे दिसते हे मी कदाचित कधी पाहिलेही असले तरी मला कुणी त्याचे नाव सांगितले नव्हते. आतापर्यंत मी कधीच कदंबाचे फूल किंवा फळ कुणाकडे  किंवा बाजारातही पाहिलेले नाही.  मी एकदा वॉट्सॅपवर येणाऱ्या ढकलचित्रांमध्ये  कदंबाच्या नावाने चेंडूसारख्या गोल फुलाचे एक चित्र पाहिले आणि लक्षात आले की अमेरिकेत आमच्या घराच्या समोरच  काटेरी लाडवांसारखी खूप गोल गोल फुले किंवा फळे खाली पडलेली दिसत होती. मला वनस्पतीशास्त्राचे काहीच ज्ञान नसल्यामुळे तो कोणता वृक्ष होता कोण जाणे, कदंब तर नसेलच. 


 न्यूजर्सीमध्ये आमच्या घराच्या आसपास असलेली पूर्वीची सगळीच झाडे मला अनोळखी होती. पण मी दिवसभर त्यांच्याच सान्निध्यात रहात आणि फिरत असल्यामुळे त्यांना येणारी पाने, कळ्या, फुले वगैरेंचे निरीक्षण हाच माझा तात्पुरता छंद झाला होता. त्या तीन चार महिन्यांच्या काळात हे बदल होत होत त्या झाडांना लहान लहान फळेसुद्धा लागली. त्यातली काही काटेरी तर काही गोलमटोल होती. अॅप्रिकॉटच्या झाडाला लिंबासारखी पिवळी गोल फळे लागली होती. एका झुडुपाला आलेले लालचुटुक फळांचे घोस तर फारच गोड दिसायचे. माहिती नसतांना  ते चाखून पहाणे धोकादायक असल्यामुळे मी तसे काही केले नाही. फक्त त्यांचे फोटो काढून ठेवले.

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -११

आपल्याकडे वर्षात सहा ऋतूंचे सहा सोहळे असतात. तरी बहुतेक सगळे मोठे वृक्ष वर्षभर हिरवेच दिसतात. त्यांना नवी पाने येणे आणि जुनी पाने गळून पडणे हे कमी जास्त प्रमाणात वर्षभर चाललेलेच असते.  अमेरिकेत चारच ऋतू असतात, स्प्रिंग, समर, फॉल आणि विंटर. तिथल्या स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूत सगळ्या झाडांना भराभर पानेफुले यांचा जोरात बहर येतो तो समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात टिकून राहतो. तिथला उन्हाळा कडक नसून आल्हाददायक असतो. फॉल किंवा ऑटम सीझनमध्ये पानांचा रंग बदलत जातो. हिरवी गार पाने पिवळी तांबूस होत ब्राऊन कलरची होतात, सुकत जातात आणि गळून पडायला लागतात. विंटर सीजनपर्यंत बहुतेक सगळी मोठी झाडे निष्पर्ण झालेली असतात आणि त्यांच्या फांद्यांचे सांगाडे उरलेले असतात. 



मी यापूर्वी दोन वेळा अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा सप्टेंबर म्हणजे फॉल सीजनमध्ये तिथे पोचलो होतो आणि जानेवारीपर्यंत राहिलो होतो. त्या वेळी मोहक फॉल कलर्स पाहिले होते तसेच नंतर उघडी बोडकी झालेली झाडेही पाहिली होती. या वेळी मी जूनमध्ये तिथे गेलो तेंव्हा फुलांना येत असलेला भरपूर बहार पाहिला. पण ऑक्टोबरमध्ये परत येईपर्यंत फॉल सीझन सुरू झाला होता. हिरवीगार रसरशित दिसणारी पाने मलूल व्हायला लागली होती आणि काही झाडांच्या खाली सुकलेल्या पानांचा सडा पडलेला दिसायला लागला होता.      


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१२



"वृक्षवल्ली आम्हा सोयरी" असे संत तुकोबांनी एका अभंगात म्हंटले आहे. निसर्गामध्ये झाडांबरोबर वेलीही आल्याच समजा.  माझ्या न्यूजर्सीच्या वास्तव्यात मी प्रथमच इतक्या वृक्षांच्या सान्निध्यात रहात होतो आणि रोज त्यांना अगदी जवळून न्याहाळत होतो. हे महाभाग कधी एकटे सडेफटिंग नसतात. कुठे त्यांच्या अंगाखांद्यावर वेली लपेटलेल्या असतात, काही बांडगुळे मजेत रहात असतात, तर कुठे किलबिल करणाऱ्या पक्ष्यांनी घरटी बांधलेली असतात. त्यांच्या खबदाडांमध्ये  असंख्य किडे, मुंग्या वगैरे बारीक जीव लपून बसलेले असतात किंवा इकडे तिकडे फिरत असतात. या चित्रातल्या वृक्षाची साल पाहिली तर त्यात किती किचकट डिझाइनची वीण दिसते. त्याच्या बुंध्यावर शेवाळ्यानेच वस्ती केली होती आणि त्यावर आपला हिरवा शालू पांघरला होता.

आमच्या परसात आपोआपच उगवलेली रानटी झुडुपे आणि त्यांच्यातच मिसळलेल्या वेली यांनी काही भागात भरगच्च किंवा घनदाट हिरवाई तयार केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर नाजुकशी रानफुले किती मोहक दिसत होती. आमच्या कुंपणाच्या या टोकापासून त्या टोकावर वेलींनी चढून कबजा केला होता. कुंपणापलीकडे असलेल्या एका वीस पंचवीस फूट उंच झाडाला वेलींनी विळखा घातला होता आणि त्या झाडावर चढत चढत त्याचा शेंडा गाठला होता. ही सगळी निसर्गाची किमया पाहतांना त्याचे कौतुक वाटत होते. 


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१३

माझ्या लहानपणी आमच्या घरी गायीम्हशींचा गोठा किंवा घोड्याचा तबेला नव्हता. गुरंढोरं, गायीची वासरं वगैरेंशी माझा कधीच जवळचा संबंध आला नव्हता. आमच्याकडे फारशी स्थावर जंगम मालमत्ता नसल्यामुळे तिची राखण करण्यासाठी आम्हाला कुत्रे पाळायची गरज नव्हती. त्या काळात घराचे दरवाजे दिवसभर उघडे  रहात असल्यामुळे गल्लीतील मांजरे हळूच आत शिरायची आणि दूध, दही उघडे दिसले तर गट्ट करायची. आम्ही त्यांना शक् शुक् करून पळवून लावत होतो. कुठलेच मांजर कधी प्रेमाने माझ्याजवळ येऊन बसले नाही आणि मीही कधी त्याला जवळ घेऊन कुरवाळले नाही. गावातली काही माकडे उड्या मारत आमच्या गच्चीवर यायची, आम्ही त्यांनाही हाडहूड करून पळवूनच लावत होतो. मी  पुढे आयुष्यभर फ्लॅटमध्ये रहात असतांना त्यात कुठले जनावर पाळणे मला तरी अशक्य वाटत होते. एक तर मला मनातून तशी आवड नव्हती आणि आम्हाला कुठे बाहेर जायचे असले तर त्या प्राण्याचे काय करायचे हा प्रश्न होता. अशा कारणांमुळे आतापर्यंत मी कधी कुठल्या पाळीव प्राण्याला  जवळ घेतलेच नव्हते. 

पण न्यूजर्सीला बंगला घेतल्यानंतर तिथे एक कुत्रा पाळायचा असे मुलांनी ठरवले आणि मायलो नावाचे एक क्यूट पिलू दत्तक घेतले. मला याची बातमी भारतात असतांनाच मिळाली होती. पण अमेरिकेला गेल्यावर तो आपले स्वागत कसे करेल याबद्दल मनात थोडी धाकधुक होती. पण मी न्यूजर्सीला घरात गेल्यावर हा क्यूट मायलो आपणहून येऊन मला बिलगला आणि त्याने पहिल्या भेटीतच माझ्याशी गट्टी केली. तो माझ्यावर अजीबात भुंकला नाही. आमचे हे बाळ खूपच प्रेमळ होते. त्याला बोलता येत नसले तरी तो मनातल्या भावना आपल्या चेहेऱ्यावर आणि डोळ्यातून व्यक्त करत असे. मी सोफ्यावर किंवा परसात खुर्चीवर बसलेलो असतांना तो माझ्याशी लगट करत असे. पण मी त्याला माझ्या अंथरुणात येऊन कुशीत झोपायला मात्र परवानगी दिली नाही कारण माझ्या स्वच्छता आणि हायजिनच्या ताठरलेल्या कल्पना मला तसे करू देत नव्हत्या. तिथे बंगल्याबाहेर खूप मोकळी जागा असल्यामुळे तो स्वैरपणे आतबाहेर करत असे. त्याला कसे ट्रेन केले होते कोण जाणे पण तो नेहमी बाहेर परसात जाऊनच नैसर्गिक विधी करून येत असे.  त्याच्यासाठी खास प्रकारचे अन्न (डॉगफूड) आणून ठेवलेले असे. त्यातही काही व्हरायटीज होत्या आणि त्यात त्याची पसंती नापसंती असायची. 

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१४

न्यूयॉर्क महानगराला लागून असलेले न्यूजर्सी स्टेट म्हणजे पूर्णपणे शहरीकरण झालेला भाग असेल अशी माझी समजूत होती आणि ती काही अंशाने बरोबरच होती. पण इथले शहरीकरण जरा वेगळे आहे. मी ज्या भागात रहात होतो तिथे क्षितिजावर दूर दूरपर्यंत एकही गगनचुंबी उंच इमारत दिसत नव्हती. सगळीकडे सुटी सुटी दोन मजली घरे आणि त्यांच्या चारी बाजूला ताड माड उंच झाडे आणि लहान लहान झुडुपे यांनी नटलेले बगीचे पसरले होते. या राज्यात अमेरिकेतली सर्वात दाट वस्ती आहे. पण त्याबरोबरच तिथे घनदाट जंगलेही आहेत.  न्यूजर्सीच्या ज्या भागात आम्ही राहतो तिथे अजूनही आजूबाजूला चांगले मोठे मोकळे रान आहे आणि त्यात हरणे आणि ससे मुक्तपणे वावरत असतात. कधीकधी ते धीटपणे आमच्या संकुलातही शिरतात आणि हिरव्या गार गवतांच्या गालिचांवर ताव मारत हुंदडत असतात. त्यांना खाणारे वाघसिंह तर इथे नाहीतच, लांडगे, कोल्हे किंवा अस्वलेही असलीच तरी ती फार कमी असावीत. ती कुणाच्या नजरेला पडल्याचे मी ऐकले नाही. इथे मला हरणांचा कळप दिसला नाही, पण एक दोन हरणे न घाबरता आमच्या वस्तीत येतात, थोडे फार चरतात आणि रानात पळून जातात. त्या मानाने ससे जास्त प्रमाणात दिसतात. आमच्या अंगणातल्या झाडांवरून खालीवर पळणाऱ्या खारी तर मला रोजच दिसत होत्या.

सगळ्याच लहान मुलांना ससा या प्राण्याचे खूप आकर्षण असते, तसे मलाही होते. आमच्या गावाजवळच्या रानावनातही कदाचित कधीकाळी ससे, हरिणे यासारखे सुंदर प्राणी रहात असावेत, पूर्वी तिथे वाघसुद्धा होते. माझ्या वडिलांनी एकदा वाघाला पाहिले होते. पण माणसांनी केलेले वृक्षतोडीमुळे माझ्या लहानपणापर्यंत तिथे गावाच्या जवळपास कुठे घनदाट जंगलही शिल्लक राहिले नव्हते आणि हे सगळे वन्य प्राणी  तिथून दूर पळून गेले असतील. मी फक्त दोन तीन वेळा कोल्हेकुई ऐकली होती, पण लबाड कोल्हाही कधीच नजरेला न पडल्यामुळे तोही गोष्टींपुरताच राहिला होता.  कधीतरी आमच्या गावात येणाऱ्या सर्कशींमध्ये वाघसिंह, हत्तीघोडे असायचे, पण मी तिथेही कधी हरिण किंवा ससे पाहिलेले आठवत नाहीत. मला नंतरच्या काळात निरनिराळ्या प्राणीसंग्रहालयांमध्ये सगळे वन्य प्राणी पहायला मिळाले. 

मी एकदा कुणाच्या तरी घरी पाळलेले ससे जवळून पाहिले होते, ते पांढरेशुभ्र आणि गुबगुबित होते. "ससा ससा दिसतो कसा? कापुस पिंजून ठेवला जसा" या बालगीतात शोभून दिसणारे होते.  आमच्याच अंगणात आलेल्या एका सशाच्या जोडीला मी कॅमेरात कैद केले, पण त्यांना बघून मला म्हणावेसे वाटले, "सशा सशा, तू दिसतोस असा कसा ?  राख फासलेला गोसावडा जसा!" 


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१५

मी पूर्वी अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा आमच्या घराच्या मागेच एक मोठा तलाव होता आणि त्या तळ्यात काही काळी 'बदके सुरेख' होती. ती कधी पाण्यावर तरंगायची तर कधी जमीनीवर येऊन क्वाक् क्वाक् करत एका रांगे मध्ये ऐटीत चालायची. ती सगळी बदके चांगली माणसाळलेली होती आणि बिनधास्त जवळ येत असत किंवा कुणाचीही पर्वा न करता आपल्या मार्गाने मार्च करत निघून जात असत. ती कुणाच्या मालकीची होती माहीत नाही, पण त्यांची कॉलनीतल्या सगळ्यांशी मैत्री होती, लहान मुलांशी थोडी जास्तच होती. 

या वेळी न्यूजर्सीमध्ये आमच्या आवारात अशी बदके नव्हती, पण घराच्या अंवती भंवती असलेल्या झाडांवर अनेक पक्ष्यांची वस्ती होती. त्यांची किलबिल तर चाललेली असेच, एखादा पक्षी किंवा त्यांची जोडी झाडावरून उडून समोरच्या गवतावर येऊन किडे वगैरे शोधत असे किंवा लगेच उडून समोरच्या कुंपणावर जाऊन बसत असे. फोटोत दाखवलेला देखणा पक्षी जरा जास्तच धीट होता. तो नेहमी आमच्या ओसरीवरही येऊन बसत असे. न्यूजर्सीमध्ये अजूनही ओव्हरहेड वायरींमधून वीजपुरवठा होतो. आमच्या घरामागच्या अशा तारेवर अनेक पक्षी एका रांगेत बसलेले दिसायचे. 


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१६

मी लहानपणी एका लग्नासाठी मुंबईला आलो होतो तेंव्हा गेटवे ऑफ इंडियापासून हँगिंग गार्डनपर्यंतचा भाग पाहिला होता. त्यातले तारापोरवाला अॅक्वेरियम मला सर्वात जास्त आवडले होते. मी मुंबईला स्थाइक झाल्यानंतर आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही ते मत्स्यालय दाखवत होतो आणि त्यांनाही ते आवडत असे.  चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात घरात एक लहानसा फिश टँक ठेवायची फॅशन आली होती तेंव्हा आम्हीही आमच्या हॉलमध्ये एक लहानसा काचेचा फिशटँक थोडे दिवस ठेवला होता. त्यात एक दोन इंच आकाराचे पिटुकले मासे आणून सोडत होतो आणि त्यांना खास खाद्य आणून पुरवत होतो. त्या लहानशा जागेत होत असलेली माशांची हालचाल पहात होतो. पण तो छंद फार काळ टिकला नाही. 


न्यूजर्सीच्या आमच्या घरातच्या मागील बाजूला असलेल्या ओसरीला लागूनच एक जवळ जवळ वीस फूट लांब आणि चारपाच फूट रुंद असा मोठा टँक होता, त्याची खोली किती होती याचा अंदाज लागत नव्हता कारण पाणी थोडे गढूळ झालेले असल्यामुळे त्या टाकीचा तळ वरून दिसत नव्हता.  त्यात २०-२२ लहानमोठे रंगीबेरंगी मासे होते.  ते सतत त्या पाण्यात पोहत फिरत असायचे. कधी एकटे तर कधी गटागटाने खालून वर येऊन पाण्याच्या पृष्ठभागावर यायचे तर कधीखाली जाऊन लपून बसायचे. पण  माणसे काठावर येऊन त्यांना पहायला लागली की त्यांच्याकडून काही खायला मिळणार आहे एवढे त्यांना समजायचे. ते आमच्याकडे वर पहात आपल्या तोंडाची उघडझाप करायचे आणि आम्ही त्यांचे खास खाद्य पाण्यात टाकले की त्यावर तुटून पडायचे.  या माशांचे सळसळते चैतन्य खरोखर प्रेरणादायी होते. 

पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहेच आणि म्हणून आपण दिवसभर पाणी पीत असतो. आपल्या डोळ्यांनासुद्धा जलाशय नुसते पहायलाही आवडतात. समुद्र किंवा मोठ्या नद्यांच्या किनारी असलेल्या गावांमधले लोक  वेळ मिळाला की किनाऱ्यावर जाऊन मंद वाऱ्याची मजा घेत इकडे तिकडे फिरतात किंवा पाण्याच्या लाटा पहात आणि त्यांचे संगीत ऐकत एकाद्या ठिकाणी बसून राहतात. भोपाळ, हैदराबाद आणि बंगलोर या शहरांमध्ये मोठ्या नद्या नसल्या तरी सुंदर विस्तीर्ण तलाव आहेत. पर्यटक ते पहायला जातात. कोल्हापूरचे रंकाळा, सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव आणि पुण्याच्या खडकवासला धरणाच्या काठावरसुद्धा संध्याकाळी चांगलीच गर्दी असते, कारण लोकांना पाण्याचे असे सान्निध्य आवडते.

सध्या मी न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात राहतो. इकडे त्याची गणना बरो या नावाखाली होते. मला हा खेडे आणि शहर यांच्यामधला प्रकार वाटतो. अशा लहानशा गावाला लागून एक स्प्रिंग लेक पार्क आहे. त्यात एक बऱ्यापैकी मोठे तळे आहे. त्या तळ्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी कडेकडेने रस्ता बांधला आहे. तळ्याच्या एका भागात पाण्यातच सुंदर कारंजी बांधली आहेत बसून आराम करायला एक छान चबूतरा आहे, तिथे बाकडी ठेवली आहेत. आजकाल अमेरिकेतले लोक रस्त्यांवरून चालतांना सहसा दिसत नाहीत, पण मोटारीत बसून या पार्कमध्ये येतात आणि तिथे पायी चालतात. इथे लहान खेडेगावातसुद्धा आपल्याला रस्त्याच्या कडेला हवी तिथे गाडी उभी करून ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही आधी गाडी पार्क करायसाठी जागा शोधली आणि तिथून पार्कमध्ये तळ्याकाठी चालत जाऊन त्याला प्रदक्षिणा घातली. 

---






Wednesday, February 05, 2025

माझा छंद -ब्लॉग लेखन


 मी शाळेत शिकत असतांना मला अवांतर काहीतरी लिहिण्याची हौस होती आणि त्या लिखाणाचे घरी आणि शाळेत थोडे फार कौतुक होत होते. पण कॉलेजातला अवाढव्य अभ्यास आणि नोकरीतले काम यामुळे मी ते विसरून गेलो होतो. पुढे अणुशक्तीनगरच्या वसाहतीत रहात असतांना तिथल्या काही मराठी बंधूभगिनींनी हितगुज नावाचे मंडळ स्थापन केले असे ऐकले. त्यांच्या मासिक बैठकींमध्ये वेचक मराठी कथा, कविता, विनोद, प्रवासवर्णन अशा प्रकारचे साहित्य वाचून दाखवले जात असे. त्यांनी मलाही त्या मंडळात प्रवेश दिला आणि चार ओळी लिहायला आणि त्या वाचून दाखवायला प्रोत्साहन दिले. त्या निमित्याने मी तीस पस्तीस वर्षांनी  पुन्हा एकदा लेखणी हातात घेतली. पण त्या काळात ऑफिसातल्या कामाचा बोजा वाढतच होता. तो सांभाळतानाच नाकी नऊ येत होते. त्यातून कुठल्याच अवांतर कामासाठी वेळ मिळत नव्हता. 

सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर नोकरीमधली बऱ्यापैकी अवजड जबाबदारी व ती पेलण्यासाठी वेळीअवेळी अंगावर पडत असलेल्या कामांचा बोजा या दोन्हीचा भार डोक्यावरून उतरला. आता मिळणार असलेला भरपूर फावला वेळ आंतर्जालावर स्वैरपणे भटकण्यांत सत्कारणी लावण्यासाठी नव्या घरी ब्रॉडबॅंड नेटवर्कचे कनेक्शन घेतले. त्या काळात ती नवीन गोष्ट होती आणि त्यासाठी बराच खर्च करावा लागत होता. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर रोजच्या जीवनात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी काही छंद जोपासावेत असा उपदेश केला जातो. म्हणून मी आपल्याला जमेल आणि परवडेल असा कुठला नवा छंद धरावा याचाही विचार करायला लागलो. त्यातच श्रमपरिहार आणि हवापालट वगैरेसाठी थोडे दिवस मुलाकडे इंग्लंडला जाऊन रहायची टूम निघाली आणि आम्ही अलगदपणे लीड्सला जाऊन पोचलो. तिथल्या थंडगार वातावरणात थोडेसे रुळल्यावर एक फारसा वापरात नसलेला मुलाकडचा "मांडीवरचा" संगणक (लॅपटॉप) आपल्या ताब्यात घेतला आणि त्याला टेबलावर ठेऊन गोंजारत असतांना त्याच्या सहाय्याने आंतर्जालाशी संपर्क साधला. मी लीड्समध्ये घरी बसल्या बसल्याच आंतर्जालावर स्वैर भ्रमण करतांना अगदी योगायोगाने ब्लॉग या संकल्पनेशी माझी पहिली ओळख  झाली.

 ब्लॉग या संकल्पनेशी ओळख  झाल्यानंतर दोन तीन दिवसातच मी एकावरून दुसरा, त्यावरून तिसरा अशा टणाटणा उड्या मारीत मिळतील ते दहा पंधरा ब्लॉग्ज पाहिले आणि ही कल्पना मला अतिशय आवडली, इतकेच नव्हे तर त्यातून माझ्या  मनात चाललेल्या एका द्वंद्वावर उत्तर सापडले. मी हितगुजच्या निमित्याने मराठीत पेनने कागदांवर दहा वीस पाने लिहिली होती आणि  मराठीत काही लिखाण करावे अशी मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात वर्षानुवर्षे दडून बसलेली सुप्त इच्छा जागी होत होती. रिटायरमेंटनंतर इंग्रजीत काही न लिहिता आता आपल्या मनात येईल ते मराठीतच लिहावे असेही वाटत होते. पण ते वाचणार कोण? कुणी वाचणारेच नसतील तर कशाला लिहायचे? अशा प्रश्नांनी उत्साहावर विरजण पडायचे. एक तर माझे गिचमिड हस्ताक्षर आणि केलेल्या खाडाखोडी कुणाला दाखवायला संकोच वाटायचा आणि आजकालच्या जमान्यात मी ते कागद दाखवायला कुणाकडे घेऊन जावे हा ही एक प्रश्नच होता. मी यावर हे जे काही लिहिले आहे ते तू वाचून बघ असे कुणालाही जाऊन सांगणे मला तरी माझ्या जन्मजात भिडस्तपणामुळे अशक्य होते.

 संगणक आल्यावर कागदावर पेनने लिहायची गरज संपली होती. की बोर्डवरची बटने दाबून अत्यंत सुबक अक्षरात लिहिणे आणि खाडाखोड न करता त्यात सुधारणा करणे शक्य झाले होते. त्यामुळे मला इच्छा होईल आणि सुचेल तेंव्हा ते लिहून संगणकावर साठवून ठेवता येत होते. ब्लॉगच्या आयडियाने हे लिखाण आंतर्जालावर टाकायची सोय सापडली होती.  जसे इतर लोकांचे ब्लॉग कधी ना कधी कुणी ना कुणीतरी वाचत असतील तसे कुणीतरी माझे लिखाणही वाचेल अशी आशा वाटत होती. लवकरच येऊ घातलेल्या नववर्षाची सुरुवात आपण आपला स्वतःचा ब्लॉग सुरू करूनच करायची असा दृढनिश्चय मी करून टाकला. केला तर खरा, पण तो पूर्ण कसा करायचा यासंबंधी त्या वेळी मला कांहीच ज्ञान नव्हते.

त्या दोन तीन दिवसात मी आंतर्जालावर एकंदरीत जेमतेम दहा पंधरा ब्लॉग्ज उडत उडत वाचले होते, ते सगळे इंग्रजीमध्ये होते. त्याशिवाय इतर जे अनेक ब्ल़ॉग दिसले होते ते चिनी, जपानी, कोरियन अशा अज्ञात लिपींमध्ये होते किंवा फ्रेंच, जर्मन, रशियन अशा भाषांमधले होते. पण ते पाहून आपल्याला मराठीतसुद्धा ब्लॉग लिहिता येईल अशी आयडियाची कल्पना माझ्या डोक्यात आली. त्या लेखकांनी त्यांच्या रचनांना आंतर्जालावर कसे चढवले (अपलोड केले) असेल याचाच मी विचार करत होतो. त्या माहितीसाठी आंतर्जालावर भटकतांना तिथेच "तुम्हीही आपला ब्लॉग निर्माण करू शकता.", "ते अगदी सोपे आहे.", "फक्त आमच्या आज्ञावलीनुसार पावले टाकीत चला", "कधी सुरुवात करीत आहात?" अशा प्रकारच्या गळेपडू जाहिराती पाहिल्यामुळे बराच धीर आला. त्या वेळी माझे बोट धरून वाट मला दाखवणारा कुणीच तिथे नव्हता. मग मी स्वतःच त्या जाहिरातींचा पाठपुरावा करत ब्लॉगस्पॉटला गाठले आणि ब्लॉग कसा लिहायचा असतो ते वाचून समजून घेतले. त्या काळात अजून ई पेमेंट सुरू झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी डॉलर मागितले असते तर ते कसे पाठवायचे हा सुद्धा एक प्रश्नच होता. पण  ते लोक हे काम अगदी फुकट करणार होते हे वाचून हायसे वाटले.

मी तर आपला ब्लॉग मराठीमध्येच लिहायचा असे ठरवले होते. मराठीमधील कोणताही ब्लॉग तोपर्यंत माझ्या वाचनात आलेला नसल्यामुळे त्यात नवलाईचाही थोडा भाग होता. पण तिथे माझ्याकडे असलेल्या संगणकावर मराठीमध्ये कसे लिहायचे हा दुसरा प्रश्न समोर आला. माझा ओळखीचा बहुभाषिक संगणक मुंबईलाच राहिला होता आणि इंग्लंडमधल्या या साहेबी मांडीवरल्याला मराठीचा गंधही नव्हता. आंतर्जालावरच शोधाशोध केल्यावर युनिकोडची माहिती सापडली आणि पदोपदी अनेक चुका करीत व त्या दुरुस्त करीत, धडपडत कां होईना, पण मी आपल्या संगणकावर देवनागरी लिपीची प्रतिष्ठापना करून मराठी लिहिण्यासाठी सोय एकदाची केली. तोपर्यंत २००६चे नववर्ष उजाडलेले होते.

ब्लॉगस्पॉटवर माझ्या ब्लॉगची नोंदणी करायला घेतल्यावर सुरुवातीला मी आपले नाव टाइप करायला लागलो Anand Gh इतके टाइप केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना  ब्लॉगचे नांव आणि माझे नांव अशी दोन नांवे द्यायची होती. त्या क्षणी मला आनंदघन हा शब्द सुचला आणि Anandghan असे नांव मी या ब्लॉगला देऊन टाकले. अशा रीतीने १ जानेवारी २००६ला माझ्या या बाळाचा आंतरजालावर जन्म झाला. त्यावेळी मी इंग्लंडमधल्या लीड्स या गावी होतो आणि तिथल्या एका लॅपटॉपवर त्याचा जन्म आणि नामकरण झाले.

आपण एकादी नवी गोष्ट करायची असे ठरवतो आणि थोडी धडपड केल्यानंतर ती गोष्ट साध्य होते त्या क्षणी गंगेत घोडं न्हाल्याचा आनंद मिळतो, पण तो फार वेळ टिकत नाही. मी सुरू केलेला तो ब्लॉग जेंव्हा कुणीतरी वाचेल आणि मला ते समजेल तेंव्हा मला थोडे समाधान वाटेल म्हणून मलाच त्याचीही व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते. तो ब्लॉग आंतर्जालावर अमूक जागेवर उपलब्ध आहे हेच आधी लोकांना समजायला पाहिजे. त्यासाठी माझ्या ई-मेलच्या पत्त्यांच्या यादीत जेवढी म्हणून मराठी आडनांवे दिसली त्या सर्वांना संदेश पाठवून मी आपल्या ब्लॉगचा पत्ता कळवला. पण चार पांच दिवल लोटले तरी कोणाच्या प्रतिसादाचा पत्ताच नव्हता! मग चार पाच जिवलग मित्रांना आठवण करून देऊन मी किती आतुरतेने त्यांच्या उत्तराची वाट पहात आहे तेही कळवले. अपेक्षेप्रमाणे त्यांची उत्तरे तर आली, पण त्यांतील कांही लोकांच्या संगणकांना ते स्थळ सापडतच नव्हते आणि काही लोकांना त्यावरील देवनागरी लिपीतील मजकूर न दिसतां त्या जागी चौकोनी ठोकळ्यांच्या रांगा दिसल्या होत्या. थोडक्यात मी लिहिलेले एक अक्षरसुद्धा माझ्या ओळखीच्या कोणालाही वाचताही आले नव्हते. मग ते त्यावर कसला अभिप्राय देणार?

त्या कालखंडात या लोकांच्या घरात ज्या प्रकारचे इंटरनेट, कॉंप्यूटर, त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स व ब्राउजर उपलब्ध होते त्यांच्या मर्यादा याला कारणीभूत होत्या हे लगेच माझ्या लक्षांत आले, पण त्या लोकांना त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्राचा उपयोग करूनच वाचता येईल असेच कांहीतरी त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवणे आवश्यक होते, कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा उपलब्ध तंत्रज्ञान जास्त महत्वाचे असते हे मी अनुभवावरून शिकलो होतो. मी त्या दृष्टीने विचार केला आणि माझ्या ब्लॉगवरील लेखांच्या परिच्छेदांचे पेंटमधल्या इमेजेसमध्ये रूपांतर करून ते चित्ररूपाने ब्लॉगवर चढवले. आणखी कांही प्रयोग केल्यावर प्रत्येक चित्राचा आकार तसेच त्यावर लिहिण्याच्या अक्षरांचा आकार निश्चित केला. 

मी इंग्लंडमधल्या लीड्समुक्कामी तिथल्या एका जुन्या लॅपटॉपचा उपयोग करून हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. पण त्या लॅपटॉपची बॅटरी कधीच संपून गेली होती आणि मी त्या संगणकाला एलिमिनेटर चार्जर लावून मेन्सवर चालवत होतो. त्याचा अंतर्गत पंखाही काम करत नव्हता, त्यामुळे तो अर्धा तास काम केल्यावर संतप्त व्हायचा. मग त्याला अर्धा तास झोपवून ठेवावे लागायचे. तिथल्या थंडगार हवेत तो शांत मात्र होत असे. असे करण्यात माझा सगळा दिवस जात असे. पण आठवडाभरातच तो लॅपटॉप दमून कायमचा झोपी गेला. 

भारतात जसे किरकोळ दुरुस्त्या करणारे कुशल कारागीर मिळतात तसे तिकडे इंग्लंडमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे जिथून तो संगणक पूर्वी आणला होता त्या मोठ्या दुकानांत त्याला नेले. त्याच्या गॅरंटी वॉरंटीचा काळ कधीच संपून गेलेला असल्याने तेथील दुकानदारावर त्याची कसली जबाबदारी नव्हती. आता तो दुरुस्त करायचा असेल तर आधी साठ पौंड देऊन तज्ञाकरवी त्याची तपासणी करायची व त्यात जर तो दुरुस्त करण्याजोगा निघाला तर त्याचे एस्टिमेट मिळेल व तेवढा खर्च करावा लागेल, तरीसुद्धा तो आणखी किती काळ काम करेल याची खात्री देता येणार नाही वगैरे तेथील काउंटरवरल्या माणसाने सांगून त्यापेक्षा आम्ही आता नवीन मॉडेलचा लॅपटॉप घ्यावा असा आग्रह  केला. आम्ही तो जुना लॅपटॉप इतके दिवस कसा ठेऊन घेतला होता याचेच त्याला आश्चर्य वाटले होते.  तोपर्यंत आमची भारतात परतण्याची तारीख ठरलेली असल्यामुळे मी तो नाद सोडून दिला व थोड्या दिवसासाठी अंतर्जालावरूनच सुटी घेतली. 

आजकाल आपल्या मोबाइलमध्ये सुद्धा शेकडो जीबी डेटा असतो.  काही एमबीचे वॉट्सॅप मेसेजेस सारखे येत असतात आणि ते काही सेकंदांमध्ये उघडतात. या वातावरणात वाढलेल्या लोकांचा कदाचित विश्वासही बसणार नाही, पण २००६मध्ये फार वेगळी परिस्थिति होती. तेंव्हा मी लिहिलेल्या टेक्स्ट फाइल्स बाइटमध्ये असायच्या आणि इंटरनेटचा स्पीड सेकंदाला काही बाइट इतका कमी असायचा. त्यामुळे त्या लहानशा फाइलना अपलोड किंवा डाउनलोड करायलासुद्धा वेळ लागत असे. तेंव्हा व्हीडिओ तर नव्हताच, इमेज फाइल उघडायला किंवा चढवायला इतका वेळ लागायचा की www म्हणजे World wide wait असे म्हंटले जायचे. RAM आणि Floppy disk यांच्या क्षमता केबीमध्ये असायच्या. त्यामुळे एक पानभर इतका मजकूर लिहिला तरी त्याच्या तीन चार इमेज फाइली करून त्यांना ब्लॉगवर अपलोड करायला काही तास लागत असत. शिवाय त्या अपलोड किंवा डाउनलोड करण्यासाठी खर्च येत असे. कदाचित म्हणूनही माझे ब्लॉग उघडून वाचायला कुणी उत्सुक नसावेत.

त्या वेळी मी त्या काळातल्या मराठी ब्लॉगविश्वाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. तसेही ते अजून बाल्यावस्थेतच होते. त्यांची संख्या शंभराच्याही आतच होती. अमेरिकानिवासी नंदनसारख्या अनेक लोकांनी मराठी भाषेत सुंदर ब्लॉग्ज लिहायला सुरू केले होते हे सुद्धा मला त्या वेळी माहीत नव्हते. माझ्या ओळखीच्या लोकांनी माझा ब्लॉग वाचून त्यावर आपले अभिप्राय द्यावेत अशा मी त्यांच्याकडून बाळगलेल्या अपेक्षा तांत्रिक कारणामुळे पूर्ण होतांना दिसत नव्हत्या. पण अमेरिकेत राहणारे नंदन होदावडेकर आणि आणखी काही अनोळखी अनामिक मित्रांनी मला शुभेच्छा संदेश पाठवून माझे मराठी ब्लॉगच्या विश्वांत स्वागत केले.  माझ्या डोक्यांत ही कल्पना जरी स्वतंत्रपणे आली असली तरी, त्याच्या बरेच आधीच दुसऱ्या अनेक लोकांनी मराठी ब्लॉग सुरू करून त्यांत मोलाची भर घातलेली होती. इतकेच नव्हे तर त्या विषयाला वाहिलेले मराठी ब्लॉगविश्व नावाचे संकेतस्थळ सुरू करून तेथून नवख्या लोकांना मार्गदर्शन केले जात होते. मी अगदी पहिला वहिला नसलो तरी निदान पहिल्या शंभरात आपण आहेत याचेच मला मोठे कौतुक वाटले होते. "महाजनो येन गतः स पंथः।" या उक्तीप्रमाणे पुढे गेलेल्या महाभागांच्या वहिवाटेने रुळलेली एक पायवाट मला सापडली होती. ती धरून पुढे जाणे आता सोपे झाले होते. 

मी इंग्लंडला जायच्या आधीच मला एका अनोळखी मित्राकडून त्याचा याहू ग्रुप जॉईन करण्यासंबंधी आमंत्रण ई-मेलने आले होते. यापूर्वी मी अशा समूहांबद्दल कांही सुद्धा ऐकलेले नव्हते. तरीही कुतुहल म्हणून त्या समूहात शिरल्यानंतर मला ई-मेलवर रोज दहा पंधरा पत्रे यायला सुरुवात झाली. त्यातली सातआठ पत्रे मुलींच्या नांवाने लिहिलेली असायची. त्यातल्याच एका पत्रमैत्रिणीने याहू ३६० वर इंग्रजीमधून ब्लॉग सुरू केला आणि त्यावरील आपल्या मित्रपरिवारात सामील होण्यासाठी मला आमंत्रण दिले. ते स्वीकारण्यासाठी मला स्वतःला याहू ३६० चा सदस्य बनणे आवश्यक होते व ते सोपेही होते. अशा तऱ्हेने एके दिवशी ध्यानी मनी नसतांना माझा याहू ३६० वर प्रवेश झाला. याहू ३६० या संकेतस्थळावर ब्लॉग लिहिण्यासाठी जास्त सोयी दिलेल्या होत्या. त्यामुळे तिथे ब्लॉग सुरू करतांना मला ते काम सोपे वाटले. शिवाय आपली आवडती चित्रे दाखवण्यासाठी तिथे वेगळी मोकळी जागा दिलेली होती. याचा विचार करता जमेल तितक्या नियमितपणे आधी या नव्या ब्लॉगवर टेक्स्टमध्ये लिखाण करायचे आणि अधून मधून त्यातल्या मजकुराची इमेजेस तयार करून ती ब्लॉगस्पॉटवर चढवायची असे मी ठरवले. अशा प्रकारे नव्या मित्रांसाठी एक आधुनिक ढंगाचा आकर्षक दिसणारा असा हा याहू ब्लॉग आणि उपलब्ध तंत्रज्ञानातील कमतरतेमुळे तो न पाहू शकणाऱ्या जुन्या मित्रांसाठी दुसरा ब्लॉग अशा माझा दुहेरी प्रवास सुरू झाला. 

मराठी ब्लॉगविश्वावर ज्या ९०-९५ ब्लॉग्जची नावे होती त्यातले निम्मे लोक आरंभशूर होते. त्यांनी एक दोन प्रयत्न करून झाल्यावर तो नाद सोडून दिला होता, २०-२५ लोक महिना दोन महिन्यात एकदा हजेरी लावून जात होते आणि २०-२५ लोक मात्र नियमितपणे लिहित होते. नंदनच्या ब्लॉगवर तो सुप्रसिद्ध मराठी लेखकांच्या निवडक साहित्यकृतींची ओळख करून देत होता. त्याची निवड फार छान होती आणि त्याचे लेखनही मुद्देसूद तसेच रंजक असे. त्यामुळे माझ्या मते तो त्यावेळी सर्वोत्तम ब्लॉग होता. आणखी कुणी आधी एकेक सुंदर चित्र किंवा फोटो दाखवून त्यावर शब्दांकन करत होता, तर कुणी वृत्त किंवा छंदबद्ध किंवा मुक्तछंद कवितांमधून आपले मन मोकळे करत होता. कुणी प्रवासवर्णन किंवा स्वानुभव सांगत होता, तर कुणी विविध विषयांवरील आपले विचार व्यक्त करत होता. पण असे थोडे अपवाद सोडले तर बहुतेक लेखन रोजनिशी किंवा दैनंदिनीतल्या पानांसारखे असे.

ब्लॉग हा शब्द वेबलॉग या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. यातील लॉग या शब्दाचा अर्थच नोंद असा होतो. कांही लोकांनी ब्लॉगला अनुदिनी, वासरी अशी नांवे दिलेली वाचली आहेत. पण त्यांचा दैनंदिनी वा रोजनिशी असा अर्थ घेतला तर दररोज त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाबद्दल त्यांत लिहायला पाहिजे असे ध्वनित होते. मला तसली बंधने नकोत म्हणून मी मराठीत वेगळे नांव न देता ब्लॉग असेच म्हणायचे ठरवले. रोजच्या रोज वेळेची डेडलाईन गाठण्यासाठी कसेतरी कांहीतरी लिहिण्याची घिसाडघाई करण्यापेक्षा एखाद्या विषयावर दोन चार दिवस विचार करून, माहिती मिळवून, योग्य शब्द जुळवून, वाचायला निदान बरे तरी दिसेल असे लिखाण प्रस्तुत करणे मला पसंत होते. सुरुवातीला मी सुध्दा काही प्रासंगिक महत्वाच्या घटनांवरच लिहित असे, त्यानंतर मात्र असे इकडे तिकडे न भरकटतां एक विषय घेऊन त्या दिशेने सुसूत्र असे टिकाऊ लेखन सलगपणे निदान कांही दिवस करावयाचे  ठरवले.


एका वद्य त्रयोदशीच्या पहाटे फिरतांना आकाशात दिसलेल्या नाजुक व रेखीव चंद्रकोरीवरून आपल्या ब्लॉगसाठी तोच विषय घ्यावा असे मला चटकन सुचले. आमच्या मित्रांना गंमत म्हणून दाखवण्यासाठी जमवलेल्या चंद्रविषयक चित्रांचा एक छोटासा संग्रह माझ्याकडे होता. त्यांना शब्दरूप तेवढे द्यायचे होते. ते काम करता करता त्याचा विस्तार होत गेला आणि त्यासाठी नवी माहिती मिळवीत व देत गेलो. 'तोच चन्द्रमा नभात' या मालिकेचा शेवट होईपर्यंत तिचे तेहतीस भाग झाले. चंद्राच्या भ्रमणाविषयी बऱ्यापैकी तपशीलवार शास्त्रीय माहिती, भारतीय तसेच पाश्चिमात्य पौराणिक वाङ्मयात आढळणारे त्याचे उल्लेख व त्याचेसंबंधी ऐकलेल्या दंतकथा, पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत चंद्राच्या अभ्यासावरून कसा निष्पन्न झाला याची सर्वसामान्य लोकांना ठाऊक नसलेली माहिती, चंद्राशी संबंधित सण, उत्सव व व्रतवैकल्ये, चंद्राचा उल्लेख असलेली लोकप्रिय हिंदी व मराठी गाणी अशा अनेक अंगांनी चंद्राकडे पाहून त्याचे दर्शन वाचकांना घडवण्याचा एक प्रयत्न या मालिकेतून केला. 

माझ्या लीड्समधल्या दोन तीन महिन्याच्या मुक्कामात मी त्या शहरातली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे आणि म्यूजियम्स पाहून घेतली होती, तिथल्या लायब्ररीमधून त्या शहराची माहिती असलेली पुस्तके आणून वाचली होती, बरेचसे फोटो घेतले होते आणि पँफ्लेट्स जमवली होती. 'तोच चंद्रमा नभात' मालिका लिहून संपवल्यानंतर   त्या सगळ्या सामुग्रीचा उपयोग करून मी 'लीड्सच्या चिप्स' या नावाने एक नवी मालिका लिहायला घेतली. भारतातून इंग्लंडला जाण्यायेण्याचा विमान प्रवास, तेथील स्थानिक जागांना दिलेल्या भेटी, तेथील स्थानिक इतिहास, तिकडील जनतेबरोबर आलेल्या संपर्कातून कळलेल्या गोष्टी, तेथील सुप्रसिद्ध तशाच कुप्रसिद्ध व्यक्ती आणि वल्ली, तिकडील समाजसुधारक संस्था असे अनेक पैलू या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या मालिकेतील प्रत्येक भाग एक स्वतंत्र लेख वाटावा असे त्याचे स्वरूप ठेवले. ते काम सुरू असतांनाच माझे एक गंभीर आजारपण उद्भवले आणि त्यातून थोडे सावरेपर्यंत माझा संगणक रुसून बसला त्यामुळे तीन महिने खंड पडला.


तोपर्यंत सन २००६चा गणेशोत्सव सुरू झाला. शारीरिक असमर्थतेमुळे मला प्रत्यक्षात इकडे तिकडे जाणे अशक्य झाले होते. त्यामुळे घरी बसूनच वर्तमानपत्रातील बातम्या, दूरचित्रवाणीपरून प्रसारित होणारे कार्यक्रम व अंतर्जालावर येणारे सचित्र वृत्तांत यामधूनच मी गणरायाच्या 'कोटी कोटी रूपांचे' दर्शन घेतले आणि 'कोटी कोटी रूपे तुझी' या मालिकेतून ती सगळी वाचकांना घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन नवरात्रानंतर पुन्हा लीड्सच्या चिप्स लिहायला घेतल्या. ते काम चाललेले असतांना काय झाले कुणास ठाऊक, पण २००७च्या सुरुवातीला अचानक हा ब्लॉग बंद पडला. माझ्या संगणकावरून तो उघडलाच जात नव्हता. हे सगळे काम ब्लॉगस्पॉट विनामूल्य करत असल्यामुळे त्यांच्या मेहेरबानीवरच तो चालत होता. आता कुणाकडे दाद मागावी किंवा कोण मला मदत करू शकेल हेच समजत नव्हते. पण मी माझे सगळे लेखन आधी याहू३६० वर टाकत असल्यामुळे ते शाबूत राहिले होते.

त्या वेळी ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉग किती वाचकांनी पाहिला होता हे समजण्याची व्यवस्था नव्हती. मी काही मित्रांना आणि नातेवाइकांना फोनवर आणि ईमेलवर विचारून पहायचा प्रयत्न केला  होता पण त्यांच्याकडून फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत नव्हता.  याहू ३६० वर मात्र सुरुवातीपासूनच वाचनसंख्या दाखवणारे मीटर लावलेले होते. ते सुद्धा सुरुवातीला अतीशय मंद गतीने पुढे सरकत होते. त्या काळात आपला ब्लॉग फारसे कोणीच वाचतच नाही असे वाटून मन खिन्न व्हायचे. त्या वैषम्याचे प्रतिबिंब माझ्या लिखाणातसुद्धा पडू लागले होते. कधी कधी आपण हा उद्योग नेमका कशासाठी करत आहोत असा प्रश्न स्वतःलाच सतावायचा.  तेंव्हा माझ्या कांही हितचिंतकांनी मात्र मला पत्रे पाठवून खूप प्रोत्साहन दिले. कुणी 'धीर धरी रे धीरापोटी, फळे रसाळ गोमटी' या उक्तीची आठवण करून दिली तर कुणी 'कर्मण्ये वाधिकारस्ते ना फलेषु कदाचन' या श्लोकाची. आता हे कर्म मी स्वतःच स्वतःच्या अंगावर ओढवून घेतले आहे हे कुणाला सांगणार?  

पण या सगळ्या सदुपदेशांचा थोडा चांगला परिणाम होऊन मी हा नसता उद्योग चिकाटीने सुरू ठेवला.  हळू हळू तो लोकांच्या नजरेला पडायला लागला. मी मालिकांच्या रूपात लिहायला घेतले असल्यामुळेही ती पूर्ण करण्यासाठी ती कोण वाचत आहे की नाही इकडे लक्ष न देता लिहिणे चालू ठेवले होते. पहिले दोन तीन महिने जेमतेम शंभर दोनशेच्या घरात घुटमळत असलेल्या वाचनसंख्येने पांचव्या महिन्यापर्यंत हजाराचा आंकडा पार केला तेंव्हा मला धन्य वाटले होते. त्यानंतर दर दीड दोन महिन्यात एक एक हजाराने वाढत गेला आणि २००६ वर्ष संपेपर्यंत दहा हजारांचा पल्ला गाठला. दिवसेदिवस त्या ब्लॉगची वाचनसंख्या वाढत गेली. दुसऱ्या वर्षात हा वेग वाढत राहिला आणि वाचनसंख्येतील सहस्रांचे रौप्यमहोत्सव आणि सुवर्णमहोत्सव साजरे होत २००७ वर्षअखेरपर्यंत साठ हजारांचा पल्ला गाठून एप्रिल २००८ मध्ये पाऊण लक्ष (७५०००) झाला . पण तेंव्हाच  याहूवर नवी नोंद करतांना खूप अडचणी यायला  लागल्या. याहूने लवकरच ती सेवा बंद करायची सूचना दिली होती आणि हळूहळू ती अंमलात यायला लागली होती.

पण काय गंमत आहे? एक दरवाजा बंद होतो तेंव्हा दुसरा उघडतो असे म्हणतात. इथे एकदा आधी बंद झालेला दरवाजा माझ्यासाठी पुन्हा उघडला.२००८ सालीच हे चित्र पुन्हा  बदलले. मध्यंतरीच्या काळात माझ्या संगणकाची हार्डडिस्क बदलून तिचा नवा जन्म झाला होता. सहज प्रयत्न करून पाहता चक्क माझे २००७ साली बंद पडलेले ब्लॉगस्पॉटवरील खाते अचानक उघडले. एवढेच नव्हे तर त्यावर चार शब्द लिहून पाहिले तर ते लगेच त्यावर उमटले देखील! त्यामुळे त्या ब्लॉगचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय मी घेतला. काही काळ मी माझे नवे लेख पुन्हा एकाच वेळी दोन्ही ठिकाणी चढवले, तसेच त्या ब्लॉगवर पूर्वी न दिलेले याहूवरील कांही निवडक जुने लेख इथे देणे सुरू केले. 

याहू३६० वरील माझ्या ब्लॉगची वाचनसंख्या पाऊण लक्ष वर गेली होती तेंव्हापर्यंत म्हणजे पहिल्या सुमारे सव्वादोन वर्षांमध्ये मी चारशे भाग लिहिले होते. पण त्यानंतर ते स्थळ बंद होत असल्याची लक्षणे दिसायला लागली आणि योगायोगाने त्याच सुमाराला ब्लॉगस्पॉट पुन्हा सुरू झाले होते. दरम्यानच्या काळात गूगलने ब्लॉगस्पॉट विकत घेतले होते आणि त्याला ब्लॉगर असे नाव देऊन त्याच्या कामात लक्षणीय बदल केले होते. तिथे ब्लॉग लिहिणे आणि त्यात चित्रे टाकून त्याला सजवणे सुगम झाले होते आणि प्रोसेसिंगचा वेगही वाढला होता. यामुळे मी याहू३६० वर लिहिलेल्या सगळ्याच ब्लॉग्जना पुन्हा ब्लॉगस्पॉटवरही द्यायचे असे ठरवले. ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉग बंद व्हायच्या आधीही मी माझे ब्लॉग या दोन्ही ठिकाणी देत होतोच. पण याहू३६०  ब्लॉगवरील लेखांच्या परिच्छेदांचे पेंटमधल्या इमेजेसमध्ये रूपांतर करून ते चित्ररूपाने ब्लॉगस्पॉटवर चढवत होतो. यात मला खूप जास्त काम करावे लागत होते आणि त्या कामाला जास्त वेळही लागत होता. पण  याहू३६० वर युनिकोडमध्ये देवनागरी लिपीमध्ये प्रसिद्ध होणारे लेख माझ्या भारतातल्या मित्रांना वाचता येत नव्हते म्हणून त्यांच्या सोयीसाठी पहिले वर्षभर मी हे दुप्पट काम काम करत होतो. पहिले सुमारे पाऊणशे भाग झाल्यानंतर ब्लॉगस्पॉटवरचा ब्लॉग बंदच पडल्यामुळे ही झंझट संपली होती

दोन वर्षांमध्ये परिस्थिती खूपच बदलली होती. याहू३६० वरच माझ्या ब्लॉगच्या वाचनांची संख्या पाऊण लाखावर गेली होती. त्यामुळे माझ्या लेखनाला तशाच प्रकारचे वाचक ब्लॉगस्पॉटवरही मिळतील अशी अपेक्षा होती. वाचक मिळावेत यासाठी लेखांचे चित्रांमध्ये रूपांतर करण्याच्या आडवळणी मार्गाची आवश्यकता वाटत नव्हती. त्यामुळे नवीन लेखनाच्या सोबतीने याहू३६० वरील लेखांचे थोडे संपादन करून त्यांना ब्लॉगस्पॉटवर चढवण्याचा सपाटा सुरू केला. २००८ या पहिल्या वर्षातच २५१ भाग चढवले. हा एका वर्षात लिहिलेल्या भागांचा सर्वोच्च आकडा आहे.  याच वेगाने काम करून २००९च्या पहिल्या तीन महिन्यात या ब्लॉगवरील चारशे भागही लिहून पूर्ण केले. तर जुलैपर्यंत ५०० भाग  झाले. तोपर्यंत याहू३६० वरील ब्लॉग मात्र कायमचा बंद पडला होता. मी वेळेवर तिकडचे बहुतेक सगळे ब्लॉग इकडे आणल्यामुळे ते नाहीसे होण्यापासून वाचले होते. मला हे काम करत असतांना विचार करून नवे लेखन न करता आधी लिहिलेल्या लेखांचे फक्त थोडेसे संपादन करायचे होते त्यामुळे ब्लॉगवर लेख चढवण्याचा वेग वाढला होता. त्यानंतर साहजिकपणेच तो मंदावला. 


आम्ही केसरी टूर्सबरोबर तीन आठवड्याची युरोपची सहल करून आलो होतो, तेंव्हा खूप फोटो काढले होते आणि माहिती गोळा केली होती. सन २००९ मध्ये मी त्यावर 'ग्रँड युरोप' या नावाने ३७ भागांची सविस्तर लेखमालिका लिहिली. काही वाचकांना ती इतकी आवडली की "तुमचे लेख वाचत वाचत आम्ही युरोपचा दौरा केला, आम्हाला त्यांची खूप मदत झाली." असे त्यांनी नंतर मला आवर्जून कळवले. आमच्या टूरवरील ग्रुपमध्ये ३० इतर सहप्रवासी होते. भारतात परत आल्यानंतरही आम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवला होता. मी या ३७ लेखांचे प्रिंटआउट काढून आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्यांचे स्पायरल बाइंडिंग करून सचित्र पुस्तिका तयार केल्या. त्याच्या २०-२२ प्रति या सहप्रवाशांनी मागून घेतल्या. यासाठी मला आलेला खर्च भरून निघेल अशा हिशोबाने मी त्याचे मूल्य ठेवले होते, ते त्यांनी आनंदाने दिले.  मी लिहिलेल्या लेखांची पुस्तिका करून ती विकायचा माझा हा पहिला आणि शेवटचा अनुभव होता. त्याच्या आधी आणि नंतरही काही मित्रांनी मी माझे लेखन छापून प्रकाशित  का करत नाही असे विचारले होते किंवा तशी सूचना केली होती, पण त्यासाठी मुद्रक, प्रकाशक वगैरे लोकांचे उंबरे झिजवणे मला कधीच मान्य होण्यासारखे नव्हते किंवा मला तशी इच्छा होत नव्हती आणि गरज वाटली नाही. पण काही लोकांनी मला विचारून माझे काही लेख त्यांच्या मासिकांमध्ये छापून आणले आणि काही मासिकांसाठी मी लेख लिहून दिले आणि आजही देत आहे.अशा प्रकारे माझ्याही चार ओळी छापून आल्या आहेत, येत आहेत आणि काही वाचकांनी त्या वाचल्या असतील.


इ.सन २०१०च्या मध्यापर्यंत माझ्या ब्लॉगच्या शतकांचे षटक (६०० भाग) पूर्ण झाले. या सहाही षटकांमध्ये माझी लेखणी चौखूर उधळली होती. विज्ञान तंत्रज्ञान या माझ्या होमपिचपासून प्रवास वर्णने, व्यक्तीचित्रे, जीवनात आलेले अनुभव, दैनिक बातम्यांवरील भाष्य, मला भावलेली परमेश्वराची अनंत रूपे, आवडलेले करमणुकीचे कार्यक्रम, कवितांचे रसग्रहण, क्वचित एकादी ज्वलंत समस्या वगैरे बहुस्पर्शी लिखाण मी या ठिकाणी केले होते. यातले बहुतेक लेख १-२ भागात लिहिलेले असले तरी एकाद्या विषयावर मालिका लिहिण्याचे कामही मी पहिल्या वर्षापासून करत आलो होतो. या सहा शतकांमध्ये आलेल्या प्रमुख मालिकांचे विषय खाली दिले आहेत. यातल्या कांही मालिका चार पाच भागात लिहिल्या होत्या तर कांही मालिकांचे तीस पस्तीस भागही झाले होते. 

पहिले शतकः- तोच चन्द्रमा नभात (३४), कोटी कोटी रूपे तुझी (११), लीड्सच्या चिप्स (२०)

दुसरे शतकः- थोर भारतीय शास्त्रज्ञ (५), विमानाचे उड्डाण (५), माझीही अपूर्वाई (६)

तिसरे शतकः- विठ्ठला तू वेडा कुंभार (६), गणेशोत्सव आणि पर्यावरण (५), ऑलिंपिक खेळांची कथा (५), आजीचे घड्याळ(१२), आली दिवाळी (५)

चौथे शतकः- शाळेतले शिक्षण (१०), राणीचे शहर लंडन (६), सलिल चौधरी (७),  चन्द्रयान (७) झुकझुकगाडी भारतातली आणि परदेशातली (४), मौंजीबंधन (५)

पांचवे शतकः- सांचीचे स्तूप (४), ग्रँड युरोप (३७), जन्मतारीख (५) 

सहावे शतकः- आयुधे, औजारे आणि यंत्रे (४), अमेरिकेची लघुसहल (२०), पंपपुराण (१५)


इ.सन २००९-१०च्या सुमारालाच मी फेसबुकवर माझे खाते उघडले होते आणि तिथे बहुभाषिक मित्रमंडळी गोळा करत होतो. रोज  त्यांच्याबरोबर दोनचार शब्द संभाषण होऊ लागले. मी अधून मधून मनोगत', 'मिसळपाव' आणि 'उपक्रम' या लोकप्रिय मराठी संकेतस्थळांवर  हजेरी लावत राहिलो होतो. काही दिवसांनी त्यात 'ऐसी अक्षरे' आणि 'मी मराठी' यांचीही भर पडली. एका गुढी पाडव्याच्या दिवशी मी वर्डप्रेस या नव्या संकेतस्थानावर 'शिंपले आणि गारगोट्या' हा वेगळा ब्लॉग सुरू करून दिला. आंतर्जालाच्या सागरकिनाऱ्यावर स्वैर भ्रमण करत असतांना वेचलेले शंखशिंपले, रंगीबेरंगी खडे, गारगोट्या वगैरे तिथे साठवत गेलो.  यात मला आवडलेले लेख, कविता, माहिती, चित्रे, सुभाषिते, विनोदी चुटके अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा संग्रह करायला सुरुवात करून दिली. त्यांची ओळख करून देण्यासाठी मीही त्यावर माझे चार शब्द लिहित होतो. याहू ३६० वरील माझा ब्लॉग शेवटचे आचके देत २००९अखेर कायमचा बंद होऊन गेला होता.  आधी एकदा 'ब्लॉगस्पॉट'बद्दल अशा प्रकारचा अनुभव  येऊन गेला होता. त्यामुळे आणखी एक पर्याय असावा म्हणून मी 'निवडक आनंदघन' या नावाचा एक ब्लॉग 'वर्डप्रेस'वर सुरू करून दिला आणि काही निवडक जुन्या लेखांवर एक संपादनाचा हात फिरवून त्यांना त्या ब्लॉगवर नवा जन्म द्यायला लागलो. 'वर्डप्रेस' या ठिकाणी ब्लॉगवरील लेखांचे वर्गीकरण करण्याची आणि त्यांचे शोध घेण्याची अधिक चांगली सोय असल्यामुळे तिथे माझे जुने लेख शोधणे सोपे जाते हा त्यातला आणखी एक फायदा होता.


या सगळ्या कामांमध्ये माझा बराच वेळ जात असल्यामुळे आनंदघन या माझ्या पहिल्या मूळ ब्लॉगकडे लक्ष द्यायला मला पुरेसा वेळ मिळत नव्हता.  त्यामुळे मी संख्येने कमी पण गुणवत्तेच्या दृष्टीने थोडे जास्त चांगले असे थोडे मोठे लेख लिहिण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यानंतर दर वर्षाला सुमारे नव्वद, शंभर भाग देत मी सव्वा तीन वर्षांनंतर ९०० भागांचा आकडा गाठला. पुढे वैयक्तिक जीवनातल्या अडचणींमुळे तो वेग कमी कमी होत गेला. जानेवारी २००६मध्ये सुरुवात केल्यानंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे २०१५ या वर्षाच्य़ा अखेरीला मी १०००वा भाग लिहिला. या काळात मी कौटुंबिक संमेलन (७), पंपपुराण -द्वितीय खंड (१०),  मोतीबिंदू आणि भिंगाचे भेंडोळे (५), मन (७), संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे (७), अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती (११), शाश्वत ऊर्जा कार्यशाळा(५), वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (५), पावसाची गाणी (७), गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला (६), विठ्ठल किती गावा ?(८), मंगल मंगळ, मंगलयान (७), निवडणुका (६) यासारख्या काही लेख मालिका लिहिल्या. तेथे कर माझे जुळती आणि स्मृती ठेवुनी जाती या लेखमालिकांमध्ये मला आदरणीय वाटलेल्या व्यक्तींविषयी प्रत्येकी १०-१५ भाग लिहिले आणि त्या मालिका पुढेही चालू ठेवल्या.

याहू३६० वर रोजच्या रोज वाचक आणि वाचने यांच्या संख्या दाखवल्या जात असत. ते आकडे पाहून थोडे उत्तेजन मिळत असे. तो ब्लॉग बंद पडेपर्यंत वाचनांची संख्या लाखावर गेली होती. ब्लॉगस्पॉट किंवा ब्लॉगरवर आधी ती सोय नव्हती. त्यामुळे आपले लेखन किती लोकांकडून वाचले जात होते ते समजत नव्हते. पण २०१०च्या सुमाराला त्यांनीही हे आकडे द्यायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षात एक लक्ष वाचनांचा पहिला टप्पा पार करून ही संख्या पाच आकड्यांमध्ये आली. ब्लॉगरने फॉलोअरची योजना कधी सुरू केली हे मला कळलेच नाही, पण या ब्लॉगवर अचानक त्यांची नावे दिसायला लागली. माझ्या ब्लॉगचा मागोवा घेणारे असे नाव मी त्यांना दिले. दोन वर्षांत त्यांच्या संख्येनेही शतक पूर्ण केले.

मे २०१३मध्ये माझ्या आनंदघन या ब्लॉगच्या वाचकांची संख्या सव्वा लाखावर गेली तेंव्हा मी 'झाकली मूठ सव्वा लाखाची' हा लेख लिहिला होता. आपले दौर्बल्य किंवा वीक पॉइंट झाकून ठेवावेत, आपल्या हातातले पत्ते उराला कवटाळून धरावेत म्हणजे ते कोणाला दिसणार नाहीत. असा या म्हणीचा अर्थ आहे, पण मी तर पहिल्या दिवसापासून माझे जवळ जवळ सगळे पत्ते उघडून ते टेबलावर मांडून ठेवत होतो. मला संगणकाची फारशी माहिती नव्हती, आंतर्जालावर भ्रमण करायची संवय नव्हती, मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिण्याचा यत्किंचित अनुभव नव्हता वगैरे माझे हँडिकॅप्स घेऊन मी हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेंव्हाच ते सगळे सांगून टाकले होते. माझ्या या नसत्या उद्योगातून मला कसलाही आर्थिक लाभ मिळण्याची सुतराम संभावना नव्हती, माझ्या अधिकारक्षेत्रात मला मिळून गेला होता त्याहून वेगळा अधिक मानमरातब मिळवण्याची  अपेक्षा नव्हती, "येन केन प्रकारेण प्रसिध्द पुरुषो भवेत्।" हे माझ्या जीवनाचे ब्रीदवाक्य नाही. माझे लेखन वाचून ते वाचणाऱ्यामधल्या कोणाला कणभरही फरक पडू शकेल अशी माझी समजूत नाही. असा सगळा नन्नाचा पाढा वाचल्यावर "मी हा खटाटोप कशासाठी चालवतो आहे?" असा प्रश्न कोणालाही पडेल. का कुणास ठाऊक, पण आपल्याला सुचेल ते जमेल त्या शैलीमध्ये लिहावे आणि ते चार लोकांना वाचायला द्यावे. अशी एक इच्छा काही वर्षांपूर्वी माझ्या मनात जन्माला आली होती आणि त्या लेखनाच्या वाचनसंख्येत होणारी वाढ या टॉनिकवर ती ऊर्मी सुदृढ होत होती. केवळ तिच्या प्रेरणेमुळे रिकामा वेळ मिळाला की माझे हात शिवशिवायला लागायचे आणि बोटे कीबोर्डवर चालायला लागायची.

माझ्या या प्रयत्नांची इतर माध्यमांमध्येही किंचित नोंद होत होती. 'स्टार माझा'ने आयोजित केलेल्या ब्लॉगलेखनाच्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगचा समावेश 'उल्लेखनीय ब्लॉग्ज'मध्ये झाला. माझ्या ब्लॉगची ओळख करून देणारा एक लहानसा लेख 'अनाग्रही सभ्य भूमिका' अशा मथळ्याखाली लोकसत्ता या दैनिकात छापून आला. दोन वर्षे मराठी ब्लॉगर्सची संमेलने दादरला भरली, तिथेही मला हजर राहून निवेदन करण्याची संधी मिळाली. माझ्या ब्लॉगचा मागोवा घेणाऱ्या मित्रांची संख्या हळूहळू वाढतच होती.  हे सगळे प्रेरणादायी होते.

नेमके कोण लोक आपले वाचक आहेत हा प्रश्न मला नेहमीच पडत आला होता आणि त्याचे उत्तर मिळत नव्हते, ते अजूनही मिळालेले नाही. माझ्या ब्लॉगच्या आयडीवर कुठकुठल्या देशांमधून टिचक्या मारल्या गेल्या यांचे आकडे तेवढे मिळत होते. त्यानुसार पहिल्या सव्वा लाखापैकी पंधरा हजार परदेशातले होते, त्याच्यामधले फक्त अमेरिकेतले   सहा हजार तर उरलेले लोक युरोप आणि आशियातल्या निरनिराळ्या देशांमधले होते. ते सगळे मराठी भाषा जाणणारे होते की चुकून आले होते कोण जाणे. त्यांच्याबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा माझी ही सव्वा लाखाची मूठ झाकून ठेवलेलीच बरी होती.

२०१५च्या अखेरीला मी मुंबईला कायमचा रामराम ठोकून पुणेकर झालो होतो. तोपर्यंत म्हणजे पहिल्या दहा वर्षांमध्ये माझ्या आनंदघन या ब्लॉगचे १००० भाग होऊन गेले होते. हा आकडा पुढे आणखी वाढवत ठेवायचा नाही असा निर्णय घेऊन मी तो आकडा कमी करायला सुरुवात केली. काही जुने भाग डिलीट केले, २-३ भागांचे एकत्रीकरण केले असे करून एकूण संख्या तीन आकड्यातच ठेवली.  ती आजवर ९९९च्या आतच ठेवली आहे. इथे आल्यावर निरनिराळ्या कारणांमुळे आनंदघन या ब्लॉगवर लिहिणे कमी होत गेले होते, तरीही महिन्या दोन महिन्यातून ३-४ जुने भाग काढून टाकून नव्या भागांसाठी जागा करत राहिलो आहे.

मी २०१६मध्ये फक्त १९ भाग लिहिले त्यातले १२ भाग स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान या मालिकेचे होते. २०१७ मध्ये  २८ भाग लिहिले त्यातले ९ भाग सिंहगडरोडवर आणि ४ भाग गणेशोत्सवावर होते. त्याशिवाय शिक्षणविवेक मासिका साठी  शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर ४ लेख लिहिले. २०१८ मध्ये तीस लेख लिहिले त्यातले १२ शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर आणि ५ माझ्या संग्रहवृत्तीवर होते. २०१९ मध्ये मी चार महिने अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो. तरीही २७ लेख लिहिले त्यातले १२ शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर आणि ५ अमेरिकेतल्या अनुभवावर होते. २०२० साली कोविडने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे जीवन थंडावले होते. घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायलाही परवानगी नव्हती. त्यामुळे भरपूर रिकामा वेळ होता, पण त्या वेळी काहीही काम करायला उत्साहच वाटत नव्हता. त्या वर्षभरात मी १२च लेख लिहिले त्यातले पाच अमेरिकेतल्या आठवणींवर होते. २०२१मध्येही कोविडचा धुमाकूळ सुरूच होता. त्या वर्षभरात १५ लेख लिहिले. एकदा मंदावलेल्या गाडीला नंतर वेग आलाच नाही.  २०२२मध्ये १२, २०२३मध्ये फक्त ५ आणि २०२४मध्ये १० लेख लिहिले गेले.

या काळात व्हॉट्सॅपचे आगमन झाले होते आणि मी अनेक ग्रुप्सचा मेंबर झालो असल्यामुळे मला रोज शेकडो मेसेजेस येत होते. माझ्या एका मित्राच्या सहकार्याने मी फेसबुकवर 'Learning Sanskrit through Subhashitani सुभाषितांमधून संस्कृत शिकूया' या नावाने एक मालिका सुरू करून दिली. त्यात रोज एक संस्कृत सुभाषित देऊन त्याचा इंग्रजी आणि मराठीत अर्थ देत असतो. हे काम खंड न पडता गेली सहा वर्षे चालले आहे आणि आतापर्यंत २३०० सुभाषिते देऊन झाली आहेत. वर्षभरापूर्वी विज्ञानधारा या मासिकाने मला लेख लिहायची संधी दिली. त्यांच्यासाठी सात आठ विज्ञानविषयक लेख लिहून दिले. 


वॉट्सॅप आणि फेसबुकवर रोज नवीन नवीन माहिती मिळत असल्यामुळे ती गोळा करून शिंपले आणि गारगोट्या या ब्लॉगवरील योग्य त्या भागामध्ये संग्रहित करणे हे माझे मुख्य काम झाले होते. त्यामुळे मी रोज त्याच ब्लॉगला भेट देत होतो. वाचकांनीही त्या ब्लॉगलाच जास्त भेटी देऊन मला प्रोत्साहन दिले. त्यात आनंदघनचे काम मागे पडत गेले. शिंपले आणि गारगोट्या हा माझा ब्लॉग मी मार्च २००९ मध्ये सुरू केला होता आणि पहिल्या वर्षात धडाधड  शंभर लहान लहान चुटके जमवले होते. पुढच्या तीन चार वर्षांमध्ये हळूहळू आणखी शंभर सव्वाशे किरकोळ नग जमवल्यानंतर मी ते काम थांबवले होते. आधी जमवलेल्यातले निम्म्याहून अधिक भाग मी नंतर डिलिट करून टाकले.  सागरकिनाऱ्यावर फिरतांना जमवलेले काही शंखशिंपले आणि रंगीत खडे नंतर आपल्यालाच तितकेसे आवडत नाहीत म्हणून आपण टाकून देतो तसे केले. 

२०१८ मध्ये मी पुन्हा नव्याने या ब्लॉगमध्ये रस घेतला आणि त्यात थोडी अर्थपूर्ण भर घालायला सुरुवात केली. मी त्यानंतर आतापर्यंत आणखी दोनशेच भाग लिहिले असले तरी त्या प्रत्येक भागामध्ये नंतरच्या काळात अनेक लेख आणि चित्रे साठवत गेलो आहे. मराठी कवी आणि कविता यांच्या संग्रहात ६०-६५ कवींच्या रचना गोळा केल्या आहेत आणि त्या सुमारे पन्नास हजार वाचकांनी पाहिल्या आहेत. समर्थ रामदास स्वामी आणि दासबोध यांचेवरील लेखांपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि  आकाशातले ग्रह, तारे वगैरेंच्या माहिती पर्यंत अनेक विषयांमधले लेख यात आहेत. आद्य मराठी नाटककार, आद्य उद्योजक तसेच राजकारण, समाजसेवा, शास्त्रीय संशोधन वगैरे विविध क्षेत्रांमधील नामवंत प्रसिद्ध व्यक्तींची माहिती गोळा केली आहे.  गीतकार ग दि माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके आणि लोकप्रिय लेखक पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दिनिमित्य अनेक उत्तमोत्तम लेख मिळत गेले ते साठवून ठेवले. मी अशा प्रकारे एक प्रकारचा लहानसा खजिना तयार केला आहे आणि त्यात रोज भर पडत आहे.


गेली पाच वर्षे दर वर्षी सुमारे एक लाख वाचक या ब्लॉगला भेट देत आहेत आणि आज त्यांची एकूण संख्या साडेसहा लाखावर गेली आहे. ती माझ्या सर्व ब्लॉग्जमध्ये सर्वात जास्त आहे. आनंदघन या माझ्या पहिल्या ब्लॉगवर मी हल्ली जास्त भर टाकत नसलो तरीही तो ब्लॉग पहायला दर रोज सुमारे शंभर वाचक येतात आणि एकूण वाचकांची संख्या आता सव्वा सहा लाखावर आहे.  निवडक आनंदघन या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आतापर्यंत ६२५ लेख दिले असून या ब्लॉगलाही रोज जवळजवळ ७०-८० वाचकांच्या भेटी होत असल्याने या ब्लॉगच्या वाचनसंख्येनेही आता सव्वाचार लाखांचा आकडा पार केला आहे. आजच्या वॉट्सॅप आणि इन्स्टाग्रामच्या काळात  ब्लॉगसारख्या आता जुन्या झालेल्या प्रकारालाही अजूनही इतके वाचक मिळत आहेत ही माझ्या दृष्टीने अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. माझ्या ब्लॉग्जच्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

आनंदघन      https://anandghan.blogspot.com/

शिंपले आणि गारगोट्या      https://anandghare.wordpress.com/

निवडक आनंदघन     https://anandghare2.wordpress.com/

(समाप्त)

 


Thursday, December 26, 2024

विज्ञानामधले द्वैत अद्वैत

मी फेसबुकवर लिहिलेल्या लेखमालिकेतले सगळे भाग एकत्र करून या पानावर दिले आहेत. त्यातले काही परिच्छेद सुटे सुटे वाटण्याची शक्यता आहे.


जगद्गुरु शं‍कराचार्यांनी अद्वैतवादाचा पुरस्कार करून हिंदू किंवा सनातन धर्माचे पुनरुज्जीवन केले असे सांगितले जाते. हे अद्वैताचे तत्वज्ञान वेदांमधून चालत आले आहे. शंकराचार्यांनी त्याला पुन्हा उजाळा दिला असेही म्हणतात. पण शं‍कराचार्यांच्यानंतर आलेल्या मध्वाचार्यांनी पुन्हा द्वैतवादाचा पुरस्कार केला आणि त्यांचे मतही स्वीकारले गेले. द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही मते गेली कित्येक शतके तग धरून आहेत, पण ती फक्त उच्च दर्जाच्या शास्त्री विद्वानांनाच पूर्णपणे समजलेली असावीत किंवा ते लोकच कदाचित त्यावर तात्विक वाद घालत असतील. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य त्याशिवायच व्यवस्थित चाललेले असते.

द्वैत अद्वैत हे काय आहे याचे मलाही कुतुहल वाटत होते म्हणून मी ते समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करून पाहिला. कुणी सांगितले की आत्मा आणि परमात्मा हे दोन भिन्न आहेत असे म्हणणे हे द्वैत आणि ते दोन्ही वेगळे नसून एकच आहेत  असे सांगणे म्हणजे अद्वैत.  आणखी कुणी सांगितले की ब्रह्म आणि माया यांना वेगवेगळे समजणे हे द्वैत आणि या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असणे हे अद्वैत. या सगळ्याच गोष्टी माझ्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे मी जास्त खोलात जायचा प्रयत्न केला नाही.



मला अध्यात्मातले फारसे काही कळत नाही. मी जन्मभर विज्ञान आणि तंत्रज्ञान यातच घालवला असल्यामुळे त्यातले एक सोपे उदाहरण सुचले. बर्फ आणि पाणी किंवा पाणी आणि वाफ यांना आपण वेगवेगळे समजतो कारण ते वेगवेगळे दिसतात किंबहुना भौतिकशास्त्राप्रमाणे ते तसे असतात. त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. हे झाले द्वैत. पण रसायनशास्त्र सांगते की हे सगळे H2O आहेत, त्यांचे अणु एकच आहेत. हे त्यांचे अद्वैत झाले. हे जरा जास्तच सोपे उदाहरण झाले. विज्ञानातल्या एका मुख्य द्वैत अद्वैतावर गेली तीन शतके वादविवाद चालला आहे.

रोज सकाळी सूर्य उगवतो, सगळीकडे उजेड पडतो आणि आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी दिसायला लागतात. म्हणजे नेमके काय होते? शास्त्रज्ञांनी त्याचा विचार करून असे सांगितले की सूर्यापासून निघालेल्या प्रकाशाचे असंख्य किरण आपल्या पृथ्वीपर्यंत येऊन सगळीकडे पसरतात आणि आपल्या आजूबाजूला असलेले डोंगर, झाडे, घरे, माणसे, पशुपक्षी वगैरेंवर पडत असतात. त्यातले काही किरण शोषले जोऊन नष्ट होतात तर काही किरण त्या पदार्थांना धडकून तिथून पुन्हा चहू बाजूंना पसरत असतात. त्यातले जे किरण त्यांच्यावरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत येतात त्या किरणांमुळे आपल्याला त्या गोष्टी दिसतात. एखादा माणूस किंवा प्राणी कुठून तरी निघून दुसऱ्या ठिकाणी जातो हे सहज समजण्यासारखे असते. तशाच प्रकारे प्रकाशाचे किरण हे अतिसूक्ष्म कण असतात आणि ते इकडून तिकडे जात असतात असे प्रतिपादन प्रख्यात इंग्लिश शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन याने केले. पण हे किरण जिथे जाऊन पडतात तिथे ते साठून का रहात नाहीत? ते क्षणार्धात आपोआप नष्ट कसे होतात? अशा शंका येत होत्या.

त्याच्याच काळातल्या डच फिजिसिस्ट ख्रिश्चन हुजेन्स याने असे सांगितले की  प्रकाश हा तरंगांच्या स्वरूपात इकडून तिकडे जातो. पाण्यावर लहरी उठतात तेंव्हा पाण्याच्या पृष्ठभागावरले कण खरे तर जागच्या जागीच वर खाली होत असतात. पण ते अशा ठराविक क्रमाने होतात की पहाणाऱ्याला असे वाटते की ते तरंग एका दिशेने पुढे पुढे जात आहेत. पण  तरंगांना पुढे जाण्यासाठी एकाद्या माध्यमाची गरज असते. सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी यांच्यामध्ये तर निर्वात पोकळी असते, मग हे प्रकाशकिरण त्यातून इकडे कसे येत असतील? अशा शंका होत्या. त्यावेळी न्यूटनला फार जास्त मान होता, त्यामुळे त्याचे मत अधिक ग्राह्य मानले गेले. 

तरीही प्रकाशाचे किरण हे कण आहेत की तरंग यावर शास्त्रज्ञांचे दोन गट झाले होतेच. दोन्ही गटांमधले शास्त्रज्ञ आपापल्या परीने या शंकांचे निरसन करायचे प्रयत्न करत होते, तसेच प्रयोगांमधून प्रकाशकिरणांचे जे निरनिराळे गुणधर्म किंवा नियम सापडत होते त्यांचे स्पष्टीकरण देत होते. इंटरफरन्स या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस डबल स्लिट एक्सपेरीमेंट आणि पोइसोन स्पॉट एक्सपेरिमेंट हे दोन महत्वाचे प्रयोग केले गेले. त्यांच्या निरीक्षणावरून निघालेले निष्कर्ष मात्र तरंगांच्या बाजूचे होते. ती निरीक्षणे तरंगांवरूनच सिद्ध करता येत होती असे त्यांना वाटले. यामुळे पुढील शंभर वर्षे न्यूटनचा  कण सिद्धांत मागे पडला आणि तरंग सिद्धांतालाच विज्ञानात मान्यता मिळत राहिली.  

पुढे एकोणीसाव्या शतकात प्रकाशलहरींवर तसेच विद्युतचुंबकीय गुणधर्मांवर कसून संशोधन चालले होते. प्रकाशलहरींची वेव्हलेंग्थ आणि फ्रिक्वेन्सी यांची मोजमापे घेतली गेली. सूर्यप्रकाशातल्या सात रंगांमध्ये ते कसे बदलत जातात हे समजले. प्रकाशकिरण म्हणजे विद्युतचुंबकीय लहरी असतात आणि जगात अनेक प्रकारचे अदृष्य किरणही असतात वगैरे सिद्ध करण्यात आले. त्यांचा अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी नावाची एक वेगळी शाखा उदयाला आली आणि त्यात निरनिराळी उपकरणे तयार करण्यात आली. विद्युतचुंबकीय क्षेत्र, विजेचा प्रवाह वगैरेंवर संशोधन होतच होते. यावर संशोधन करत असतांना इ.सन १८९७मध्ये जे.जे.थॉमसन या संशोधकाने इलेक्ट्रॉन या कणाचा शोध लावला. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन हे घटक मिळून अणू तयार होतात असे रूदरफोर्ड या शास्त्रज्ञाने सांगितले.

समजा एका तरणतलावात अनेक लोक पोहत आहेत. एक माणसाने स्प्रिंगबोर्डवरून पाण्यात सूर मारला तर काय होईल? पाण्यात थोडी खळबळ होऊन काही लाटा उठतील आणि पाण्यातल्या इतर लोकांना त्यांचा किंचितसा धक्का बसेल. पण कुणी असे सांगितले की त्याची सगळी ऊर्जा घेऊन पाण्यातला एक माणूस त्याच्या जागेवरून उडेल आणि किनाऱ्यावर येऊन पडेल, तर त्यावर कुणाचा विश्वास बसेल का? आपल्याला हे अशक्य, अतर्क्य आणि असंभवनीय वाटणार. पण विशिष्ट परिस्थितीत असा प्रकार घडणे शक्य आहे आणि निसर्गात असे घडत असते असे सन १९०५मध्ये जेंव्हा आल्बर्ट आइन्स्टाइनने सांगितले तेंव्हाच्या शास्त्रज्ञांनाही ते लगेच पटले नव्हतेच.

 प्रकाशकिरणांवर संशोधन करत असतांना काही शास्त्रज्ञांना असे दिसले की विशिष्ट प्रकाशकिरणांमुळे काही पदार्थांच्या विद्युतचुंबकीय गुणधर्मांमध्ये काही बदल होतात. त्यावर आल्बर्ट आइन्स्टाइनने असा सिद्धांत मांडला की प्रकाशकिरण हे सूक्ष्म कण असतात आणि विशिष्ट ऊर्जा असलेले हे कण इलेक्ट्रॉन या कणांना अणूंमधून बाहेर ढकलतात. त्या पदार्थावर तसे प्रकाशकिरण पडले तर त्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. याला फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट असे नाव दिले गेले. हे निर्विवाद सिद्ध झाल्यानंतर १९२१ सालचा नोबेल पुरस्कार आइन्स्टाइनला दिला गेला. प्रकाश किरण या लहरी आहेत असे समजले तर या इफेक्टचे स्पष्टीकरण देता येत नाही. त्यासाठी ते सूक्ष्म असे कणच असायला हवेत. पुढे प्रकाशाच्या या कणांना फोटॉन असे नाव दिले गेले.  न्यूटनचा झिडकारला गेलेला कणांचा सिद्धांत पुन्हा समोर आला.  

कुठल्याही सूक्ष्मदर्शक यंत्राने कधीही अणू पाहता येत नाहीत, इतके ते सूक्ष्म असतात. फोटॉन आणि इलेक्ट्रॉन तर अणूपेक्षाही सूक्ष्म असतात. मग एक फोटॉन येऊन अणूमधल्या एका इलेक्ट्रॉनला जोरात धक्का मारतो आणि त्याला अणूच्या बाहेर पाठवून देतो हे आइन्स्टाइनला कसे समजले? त्याने प्रयोग करतांना हे होतांना प्रत्यक्ष पाहिले आणि इतर शास्त्रज्ञांना दाखवले असे होण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्याने हे सगळे गणिते मांडून आणि तर्कशुद्ध विचाराच्या जोरावर आपल्या बुद्धीनेच ठरवले आणि सिद्ध करून दाखवले. आधीच्या काही शास्त्रज्ञांनी प्रयोग करतांना असे पाहिले होते की विशिष्ट धातूंच्या तुकड्यावर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा झोत टाकला तर त्यांवर धन विद्युतप्रभार (पॉझिटिव्ह चार्ज) तयार होतो. अणूच्या रचनेवर संशोधन करतांना शास्त्रज्ञांनी असे ठरवले होते की प्रत्येक अणूच्या केंद्रामध्ये धन प्रभार असलेले प्रोटॉन्स असतात आणि ऋण प्रभार असलेले इलेक्ट्रॉन्स त्या केंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असतात. दोन्ही मिळून त्या अणूचा विद्युतप्रभार शून्य होतो. पण काही कारणाने इलेक्ट्रॉन त्याला सोडून गेले आणि प्रोटॉन जागेवर राहिले तर त्या अणूला धन विद्युतप्रभार प्राप्त होतो. प्रकाश किरणांच्या झोतामुळे हे होत असेल तर त्यातले फोटॉन्सच इलेक्ट्रॉन्सना हुसकून लावण्यासाठी जबाबदार असणार असे आइनस्टाइनने नुसते सांगितलेच नाही तर त्याची गणिते मांडून कमीत कमी किती ऊर्जा असलेले प्रोटॉन्स हे काम करतील, त्यांची किती ऊर्जा इलेक्ट्रॉनसला दिली जाईल वगैरेंची सूत्रे तयार केली. आपल्याला फोटॉन आणि इलेक्ट्रॉन तर मोजता येतच नाहीत. कोणत्या प्रकारचे किती तीव्रता असलेले प्रकाशकिरण किती विद्युतप्रभार तयार करतील वगैरें साठी त्याने नियम सांगितले. त्या सगळ्याचा समावेश त्याच्या फोटोइलेक्ट्रिक इफेक्टवरील शोधात होतो.  त्यानंतर या फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा निरनिराळ्या प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी अनेक उपकरणे तयार होत गेली आणि प्रकाशकिरण कणांनी बनले आहेत या कल्पनेवर शिक्कामोर्तब झाले.

त्यानंतर आर्थर होली काँप्टन या शास्त्रज्ञाने प्रयोगामधून असे दाखवून दिले की क्ष किरण इलेक्ट्रॉनवर आदळले तर ते नष्ट होत नाहीत पण आपली फ्रिक्वेंसी कमी करून इतरस्त्र पसरतात. याला काँप्टन इफेक्ट म्हणतात. यामधूनसुद्धा  प्रकाशकिरण सूक्ष्म कणांच्या स्वरूपात असतात असेच दिसते.


पण जर प्रकाशकिरण हे कण असतील तर ते लहरी आहेत असे समजून केलेल्या संशोधनांमधून झालेल्या प्रगतीचे काय होईल? प्रकाश किरणांच्या तरंगांच्या वेव्हलेंग्थ्स आणि फ्रिक्वेन्सी यावर संशोधन करून एक मोठा स्पेक्ट्रम तयार केला गेला होता. त्यात नॅनोमीटरपेक्षाही अतिसूक्ष्म वेव्हलेंग्थ असलेल्या गॅमा रेजपासून क्ष किरण, अल्ट्राव्हायोलेट, दृष्य प्रकाश, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह्ज, आणि कित्येक मीटर वेव्हलेंग्थ असलेल्या रेडिओवेव्ह्ज इतकी मोठी रेंज असते. निसर्गातल्या अशा निरनिराळ्या प्रकारच्या किरणांना ओळखून त्यांची मोजमापे घेण्याची उपकरणे तयार केली होतीच, असे किरण कृत्रिम रीत्या तयार करण्याची साधनेही तयार केली जात होती आणि विविध प्रकारे त्यांचे उपयोग केले जात होते. हैड्रोजन, हेलियम यासारख्या मूलतत्वांमधून ठराविक रंगाचे प्रकाशकिरण निघतात याचा उपयोग करून त्या मूलतत्वांचे अस्तित्व ओळखले जात होते. अशा सगळ्या कारणांमुळे प्रकाश किरण हे तरंगांच्या स्वरूपात असतात यातही कसलीही शंका नव्हती.

मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञाने सांगितले की न्यूटनचे सिद्धांत सृष्टीचे सगळे नियम समजून घेण्यासाठी पुरेसे नाहीत.  त्यांने एक नवा विचार क्वांटम थिअरीमधून मांडला आणि त्याने भौतिकशास्त्राच्या  पुढील काळातल्या प्रगतीला वेगळी दिशा मिळाली. या सिद्धांतामधून असे सिद्ध करता येत होते की फोटॉनसारखे अतिसूक्ष्म कण एकाच वेळी लहरीसुद्धा असू शकतात. त्यांच्या दुहेरी अस्तित्वाला मान्यता मिळाली.

आपण आतापर्यंत प्रकाशकिरणांच्या संबंघातले कण आणि तरंग यांच्यामधले द्वैत अद्वैत पाहिले. मॅक्स प्लँकचा सिद्धात खरे तर ऊर्जेच्या गुणधर्माबाबत आहे. त्याने असे सांगितले की विद्युतचुंबकीय ऊर्जा पुंजक्यामधूनच प्रकट होते. Electromagnetic energy could be emitted only in quantized form, in other words, the energy could only be a multiple of an elementary unit. ऊर्जेचे एक सर्वात लहान प्राथमिक एकक असते आणि त्याच्या पटीमध्येच ऊर्जा प्रगट होते. ज्याप्रमाणे विश्वामधल्या सर्व पदार्थांचे अविभाज्य असे अणू नावाचे सूक्ष्म कण असतात त्याचप्रमाणे ऊर्जेचेसुद्धा सूक्ष्म क्वांटा असतात.  भले त्या लहरी असतील, पण त्याही सूक्ष्म अशा तुकड्यांमधून प्रकट होत असतात.  अर्थातच ज्याप्रमाणे आपल्याला अणू वेगळे काढून मोजता येत नाहीत त्याचप्रमाणे हे क्वांटाही मोजता येत नाहीत.  हे सगळे कल्पना आणि तर्कशुद्ध विचार यामधून निघालेले सिद्धांत आहेत आणि ते इतर सगळ्या शास्त्रज्ञांनी सखोल साधकबाधक चर्चा केल्यानंतर सर्वसंमतीने मान्य केले गेले आहेत.

आल्बर्ट आइन्स्टाइन हा शास्त्रज्ञ मुख्यतः त्याच्या सापेक्षता सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे.  सापेक्षतावादाचा सिद्धांत म्हणजे, जागा आणि वेळ यांच्या संकल्पना निरपेक्ष नाहीत तर सापेक्ष आहेत. या सिद्धान्तांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. त्याने आणखी किचकट गणिते मांडून असे सिद्ध करून दाखवले की उर्जेचे पदार्थात रूपांतर होऊ शकते आणि पदार्थाचे ऊर्जेत रूपांतर होऊ शकते.  त्यासाठी त्याने मांडलेले E=mc^2 हे सूत्र सुप्रसिद्ध आहे. किंबहुना त्याच्या सांगण्यांनुसार पदार्थ आणि ऊर्जा ही एकाच मूलतत्वाची दोन रूपे असतात. असे हे आणखी एक द्वैत अद्वैत.

फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि  काँप्टन इफेक्ट  या दोन्हींमध्ये फोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची टक्कर होते आणि त्या कणांमध्ये किती ऊर्जा असते त्याप्रमाणे त्यामधून वेगवेगळे परिणाम होतात. हे दोन्ही प्रकारचे कण कुणीही पाहू शकत नाही आणि त्यामुळे त्यांची होत असलेली टक्करही कुणीच पाहिलेली नाही. प्रयोगशाळांमध्ये निरनिराळ्या तीव्रतेच्या किरणांचे झोत विशिष्ट धातूंच्या तुकड्यांवर टाकून त्यामधून निघालेल्या लहरींचे अतिशय संवेदनशील (सेन्सिटिव्ह) अशा उपकरणांनी केलेल्या निरीक्षणांचे स्पष्टीकरण या सिद्धांतांनी देता येते.

आतापर्यंत लहरीच्या स्वरूपात समजले जाणारे प्रकाशकिरण जर फोटॉन या कणांच्या रूपात असतील तर पदार्थांचे कण समजले जाणारे इलेक्ट्रॉन्स लहरीच्या स्वरूपात असू शकतील अशी शक्यता फ्रेंच शास्त्रज्ञ लुई  डी ब्रॉग्ली (Louis De Broglie) याने व्यक्त केली. त्यानंतर अणूचे भाग समजले जाणारे सगळेच सूक्ष्म कण हे लहरीच्या स्वरूपात असतात असे समजून त्यांचा अभ्यास केला जाऊ लागला. क्वांटम मेकॅनिक्स या नावाच्या विज्ञानाच्या शाखेत हा अभ्यास केला जातो. श्रोडिंजर या शास्त्रज्ञाने कणांच्या तरंग स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी काही गणिती समीकरणे मांडली. 

म्हणजे जर प्रत्येक अणू हाच काही तरंगामधून तयार होत असेल तर सगळे विश्वच तरंगांचा समूह आहे असे म्हणता येईल का? असा प्रश्न पडला. त्यावर असे सांगितले गेले की हे सूक्ष्म कण एकाच वेळी कण आणि तरंग या दोन्ही अवस्थांमध्ये असू शकतात.

फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांना कण असे म्हणतांना कण या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. कुठल्याही पदार्थाच्या अतीशय लहान तुकड्याला कण म्हणतात. चिमूटभर साखरेतले निरनिराळे कण डोळ्यांना दिसतात आणि बोटाने त्यांना वेगळे करता येतात. पण त्याची पिठीसाखर केली तर तिचे कण मात्र डोळ्यांनाही वेगवेगळे दिसत नाहीत आणि त्यातल्या एका कणाचा वेगळा स्पर्शही बोटाला जाणवत नाही, पण ते असतात. अंधाऱ्या खोलीत एखादा उन्हाचा कवडसा आला तर त्यात तरंगणारे धुळीचे कण दिसतात. ते कण आपल्या आजूबाजूच्या हवेत नेहमी असतातच, पण ते सूक्ष्म कण आपल्याला एरवी दिसत नाहीत. त्यांच्यावर तीव्र प्रकाशाचा झोत पडल्याने ते चमकतात आणि दिसतात.  फुलांपासून निघून सर्वत्र पसरणारे त्याच्या सुवासाचे सूक्ष्म कण डोळ्यांना दिसत नाहीत, पण त्यांच्याकडूनच आपल्या नाकाला फुलांचा सुगंध समजतो.  असे अनेक अदृष्य सूक्ष्म कण या जगात असतात.

हे भौतिक जग अत्यंत सूक्ष्म अशा असंख्य अणूंपासून बनलेले असून ते अणु अविभाज्य व अविनाशी असतात असे प्राचीन काळातल्या कणाद मुनींनी सांगितले होते. जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने सन १८०८ मध्ये प्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला तेंव्हा असेच विधान केले आणि त्या अणूंचे काही गुणधर्म सांगितले. पण हा अणू नेमका किती सूक्ष्म असतो हे जवळजवळ १०० वर्षांनंतर सन १९०९ मध्ये जीन पेरिन या शास्त्रज्ञाने सांगितले.  त्याच्या नियमांवरून असे दिसते की धुळीच्या एका कणामध्ये कित्येक अब्ज अणू सामावलेले असतात, इतका तो सूक्ष्म असतो.  पण अशा अतिसूक्ष्म कणांसाठी वेगळा शब्दच नसल्याने अणूलाही कणच म्हंटले जाते.

निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होऊन त्यातून संयुगांचे रेणू तयार होतात. तेही अदृष्य असे सूक्ष्म कणच असतात. ही क्रिया कशी होते याची कारणे शोधण्यासाठी अणूच्या अंतर्गत रचनेची मॉडेल्स तयार केली गेली. त्यातल्या सर्वात प्रसिद्ध रदरफोर्ड मॉडेलमध्ये असे दाखवले होते की अणूंच्या केंद्रात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स  असतात आणि  इलेक्ट्रॉन्स त्यांच्या सभोवती घिरट्या घालत असतात. अर्थातच त्या अणूचा लहानसा भाग असलेल्या इलेक्ट्रॉनलाही कणच म्हंटले गेले.   


रदरफोर्डच्या मॉडेलप्रमाणे हैड्रोजनच्या एका अणूमध्ये केंद्रभागी एक प्रोटॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतो, तर युरेनियमच्या एका अणूच्या केंद्रात ९२ प्रोटॉन्स आणि १४३ किंवा १४६ न्यूट्रॉन्स  एकमेकांना चिकटून बसलेले असतात आणि ९२ इलेक्ट्रॉन्स सहा निरनिराळ्या कक्षांमध्ये फिरत त्यांना प्रदक्षिणा घालत असतात. बुध, शुक्र, पृथ्वी वगैरे ग्रह एकेकटेच सूर्याभोवती निरनिराळ्या कक्षांमध्ये फिरत असतात पण हे इलेक्ट्रॉन गटागटाने निरनिराळ्या कक्षांमध्ये फिरत असतात. कुठल्या कक्षेतून किती इलेक्ट्रॉन फिरतात हे सुद्धा ठरलेले असते. या सगळ्यांना फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा लागते. हे सगळे सामान्य माणसाच्या आकलनाच्या आवाक्याबाहेर आहे. सगळे अणु जर असे जवळ जवळ पूर्णपणे रिकामेच असतील तर अनेक अणु मिळून त्यामधून कणखर पदार्थ कसे तयार होत असतील हे समजत नाही. असली वर्णने रावणाची दहा तोंडे किंवा सहस्त्रार्जुनाच्या हजार हातांसारखी अविश्वसनीय वाटतात. अणूची अंतर्गत रचना खरोखरच अशी असतेच असे कुठल्याही उपकरणातून दाखवता येणे शक्यच नाही. पण विशिष्ट क्रियांचा अभ्यास करण्यासाठी कल्पनेने अशी मॉडेल्स रचून त्यानुसार संशोधन करून त्या पदार्थाच्या इतर गुणधर्मांविषयी काही निष्कर्ष काढायला मदत होते. या युरेनियम अणूचे विखंडन केले तर त्यातून प्रचंड ऊर्जा कशी प्रकट होते हे सांगता येते. प्रत्यक्षात अशा प्रकारे अणुशक्ती निर्माण होते हे तर आपण पाहतोच. कार्बन, ऑक्सीजन, सोखंड, सोने वगैरे सर्व मूलद्रव्यांच्या निरनिराळ्या गुणधर्मांचा अभ्यास अशा प्रकारच्या मॉडेल्सवरून सुकर झाला आहे. दोन मूलद्रव्यांमध्ये रासायनिक क्रिया कशा होतात याचे स्पष्टीकरण या मॉडेल्समधून देता येते. म्हणून अणूची रचना अशीच असते असे शिकवले जाते.

प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या अणूच्या केंद्रस्थानी असलेल्या कणांमध्ये अणूचे ९९.९ % पेक्षा अधिक वस्तुमान असते. उरलेले ०.१% पेक्षाही कमी वस्तुमान सर्व इलेक्ट्रॉन्सचे मिळून असते. पण प्रोटॉनच्या एक सहस्त्रांशाहूनसुद्धा लहान असलेल्या पिटुकल्या इलेक्ट्रॉनमध्ये प्रोटॉनइतकाच इलेक्ट्रिक चार्ज असतो. हे प्रतापी कण निव्वळ चैतन्यमूर्ती असतात. ते सतत प्रचंड वेगाने निरनिराळ्या कक्षांमधून केंद्रभागाला प्रदक्षिणा घालत असतातच, त्यांचा काही प्रमाणात पूर्ण अणूवर प्रभाव पडतो. सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात त्यावरून त्या अणूची व्हॅलेन्सी ठरते. कुठल्याही अणूचा कुठल्या दुसऱ्या अणूशी किती प्रमाणात संयोग व्हावा हे त्या  व्हॅलन्सीनुसार ठरते. त्या संयुक्त पदार्थाचा अणू तयार होत असतांना दोन मूलद्रव्यांमधले इलेक्ट्रॉन्स एकमेकांशी हितगूज करून त्या पदार्थाचे नवे गुणधर्म ठरवतात, तो आम्ल असावा की अल्कली की निष्पक्ष हे ठरवतात.  या इलेक्ट्रॉन्सना अधिक ऊर्जा मिळाली की ते आपली कक्षा बदलतात. हे करत असतांना त्यातून प्रकाशकिरणांचे उत्सर्जन होते. या इलेक्ट्रॉन्सचे वायरसारख्या कुठल्याही वाहकामधून फिरणे म्हणजे विजेचा प्रवाह असतो. 

पदार्थ या शब्दाची विज्ञानात अशी व्याख्या केली जाते की त्याला वस्तुमान असते आणि तो जागा व्यापतो. Matter is defined as anything that has mass and takes up space. कण हा पदार्थाचाच बारीक भाग असल्यामुळे त्यालाही वस्तुमान असते आणि तो जागा व्यापतो. अणू हा पदार्थाचाच सूक्ष्म भाग असतो आणि इलेक्ट्रॉन हा त्याचा आणखी सूक्ष्म भाग असतो असे समजले तर त्याला कण असे समजता येईल. अणू आणि इलेक्ट्रॉन यांच्या वस्तुमानांचे आकडेही काढले गेले आहेतच.

संथ पाण्यामध्ये एक दगड टाकला की लगेच त्यावर लाटा उठून त्या पुढेपुढे सरकतांना दिसतात, पण लक्ष देऊन पाहिले तर खरे तर पाणी जागच्या जागीच वर खाली होत असते हे समजते. अशा प्रकारच्या हालचालीला तरंग म्हंटले जाते. पाण्यावरचे तरंग उठण्यासाठी आधी तिथे पाणी असावेच लागते. पण प्रकाशकिरण अवकाशाच्या निर्वात पोकळीतूनही दूरवरचा प्रवास करत असले तरी त्यांना तरंग असे नाव दिले गेले. ते अदृष्य अशा विद्युतचुंबकीय क्षेत्रामधले तरंग असतात.  या तरंगांमधून ऊर्जा वहात असते हा त्याचा महत्वाचा गुण असतो.

In physics, mathematics, engineering, and related fields, a wave is a propagating dynamic disturbance (change from equilibrium) of one or more quantities.  In physics, a wave is a disturbance that transfers energy.

आता ऊर्जा म्हणजे काय? ती म्हणजे कार्य करण्याची क्षमता.  Energy is the capacity for doing work. विज्ञानामध्ये कुठल्याही कामाला कार्य समजले जात नाही. बलामधून जितकी ऊर्जा दिली किंवा घेतली जाते ते कार्य अशी त्याची व्याख्या आहे. 

In science, work is the energy transferred to or from an object via the application of force along a displacement. 

उदाहरणार्थ आपण जमीनीवरून पिशवी उचलून हातात घेतली तर तिला स्थितिज ऊर्जा (Potential energy) देतो, ते कार्य झाले. पण हातातली पिशवी सोडली तर ती गुरुत्वाकर्षणाने आपोआप खाली येते.  तिला वेग येतो तेंव्हा तिच्यातल्या स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिक ऊर्जेत (Kinetic Energy) होते.    ऊर्जेचे इतरही प्रकार आहेत, उदाहरणार्थ ऊष्णता या प्रकारच्या ऊर्जेने वस्तूचे तापमान वाढते. सूर्याच्या प्रकाशकिरणांमधूनही ऊर्जा वहात असते. 

एकोणिसाव्या शतकात कण की तरंग असा वाद होता. विसाव्या शतकात त्याऐवजी पदार्थ की ऊर्जा असे नवे द्वैत सुरू झाले.

 सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण आणि गतींचे कायदे हे सर्वाधिक महत्वाचे शोध लावले. प्रकाशकिरण हे कण असतात असेही त्यांनी सांगितले होते, पण ख्रिश्चन हुजेन्स या समकालिन शास्त्रज्ञाने असे सांगितले की  प्रकाश हा तरंगांच्या स्वरूपातच इकडून तिकडे जातो. इंटरफरन्स या प्रकाशाच्या गुणधर्माचा शोध लागल्यानंतर त्या लहरीच असतात हे पक्के झाले. समुद्रसपाटीवर हवेचा दाब जास्त असतो आणि पर्वतशिखरावर तो कमी असतो यावरून गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला आधार मिळाला. पृथ्वी हवेलाही आपल्याकडे खेचून घेत असल्यामुळे असे होते.  हवेच्या दाबांचा जास्त अभ्यास केल्यावर हे समजले की जमीनीपासून शंभरदीडशे किलोमीटर्सच्या पलीकडे वातावरणातली हवा जवळजवळ नसतेच. तिथे निर्वात पोकळी असते. सूर्य आणि चंद्र हे त्याच्या पलीकडे पृथ्वीपासून कितीतरी दूर असतात हेसुद्धा समजले होते. मग त्यांच्यापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या लहरी कुठल्या माध्यमामधून इकडे येत असतात? या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी असा तर्क सांगितला गेला की विश्वात सगळीकडे ईथर नावाचा एक अदृष्य पदार्थ भरलेला असावा आणि त्यातून या प्रकाशलहरी पसरत जातात. मग ईथरचे अस्तित्व शोधायचे प्रयत्न सुरू झाले.

मोटारीमधून वेगाने पुढे जात असतांना उलट दिशेने वारा वहात आहे असे आपल्याला वाटते. मग पृथ्वी स्वतःभोवती फिरत असतांना सगळीकडे उलट दिशेने वारे का वहात नाहीत? पृथ्वीबरोबर हवेलाही मोमेंटम मिळाले असल्यामुळे हवाही पृथ्वीबरोबरच फिरत असावी. मग पृथ्वीजवळचा ईथरचा थरसुद्धा असा फिरत असतो का? जर तसे असेल तर न्यूटनच्या नियमांप्रमाणे जे किरण त्याच्या फिरण्याच्या दिशेने येतात त्यांची गति वाढायला पाहिजे आणि जे त्याच्या विरुद्ध दिशेने येतात त्यांची गति कमी व्हायला पाहिजे, तसेच त्याच्या काटकोनामध्ये येणाऱ्या किरणांची गति या दोन्हींच्या मध्ये असली पाहिजे. इंटरफरन्स या प्रकाशाच्या गुणधर्माचा उपयोग करून किरणांच्या गतींमधला हा सूक्ष्म फरक समजून घेणे शक्य आहे असे शास्त्रज्ञांना वाटले. 

मायकेलसन आणि मोर्ले या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांनी यासाठी केलेला प्रयोग त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी आधी केलेल्या निरीक्षणांवर अविश्वास दाखवला गेला, त्यांच्या उपकरणांमधल्या उणीवा  दाखवल्या गेल्या. सातआठ वर्षे खपून त्यांनी सगळ्या तृटी दूर करून केलेल्या प्रयोगांमध्येही त्यांना किरणांच्या गतींमध्ये कुठलाच फरक दिसला नाही. अफाट खर्च आणि अविश्रांत मेहनत करून केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुद्धा ज्या गोष्टीचा शोध घेतला होता ती सापडलीच नाही. पण या न सापडण्यामुळेच विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली.

मायकेलसन आणि मोर्ले या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगानंतर ईथरच्या अस्तित्वाबद्दल दाट शंका वाटायला लागल्या. वैज्ञानिकांच्या जगातल्या एका अंधश्रद्धेचा हळूहळू लोप होत गेला. आल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाने न्यूटनच्या गतीच्या सिद्धांतावरच प्रश्न उपस्थित केले. त्याने विशेष सापेक्षतावादाचा सिद्धान्त जून ३०, इ.स. १९०५ रोजी मांडला. त्या सिद्धान्तामध्ये त्याने दाखवून दिले की सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेल्या गतीच्या नियमांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींची (यामध्ये प्रकाशकिरणांचादेखील समावेश होतो) वागणूक स्पष्ट करता येत नाही. त्या परिस्थितीचे विश्लेषण, स्पष्टीकरण आणि अनुमान आइन्स्टाइनने सापेक्षतावादाच्या विशेष सिद्धान्तात केले. या सिद्धान्तांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. थोडक्यात (न्यूटनच्या गतीच्या नियमांनुसार) संदर्भाची निरपेक्ष चौकट (Frame of Reference) ही निरीक्षकाकडे न राहता सापेक्षतेच्या सिद्धान्तानुसार प्रकाशाचा निर्वात क्षेत्रातील वेग हाच ती निरपेक्ष चौकट बनला.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर समजा आपण कारमध्ये बसून दर तासाला ८० किलोमीटर वेगाने निघालो आणि समोरून येणारी गाडीही ८० किमीच्या वेगाने येत असेल तर आपल्याला ती १६० किमी वेगाने येत आहे असे वाटते. हे न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणेही बरोबरच आहे आणि असेच घडत असते.  जर सुरुवातीला आपण दोघेही एकमेकांपासून १६० कि.मी. इतक्या अंतरावर असू तर एक तासानंतर एकमेकांना अमोरासमोर येऊन भेटू.  पण जर कोणी प्रकाशकिरणांच्या वेगाने जात असेल आणि समोरून येणाराही तितक्याच वेगाने येत असेल तरीही त्या दोघांनाही समोरून येणारा प्रकाशाच्या इतक्या वेगानेच येतांना दिसेल. प्रकाशाच्या दुप्पट वेगाने नाही. हे समजायला जड आहे, कारण अंतर आणि समय याबद्दल आपल्या मनातल्या कल्पना दृढ असतात. पण  आइनस्टाइनने सांगितले की या गोष्टी सापेक्ष असतात. त्याने काही प्रयोगांमधील निरीक्षणे आणि उच्च गणितातल्या किचकट आकडेमोडीच्या आधाराने तसे सिद्ध करून दाखवले आणि इतर शास्त्रज्ञांना पटवून दिले. त्याचे सिद्धांत आधुनिक काळातल्या भौतिक शास्त्रातले प्रमुख पायाभूत सिद्धांत झाले.

काही लोकांना वाटते तसे आइनस्टाइनने न्यूटनच्या सिद्धांतांना खोटे ठरवलेले नाही. सायकल, मोटार, आगगाडी किंवा अगदी विमानेसुद्धा जितक्या वेगाने जातात त्यांची गणिते आजही  न्यूटनच्या सूत्रांनुसारच केली जातात आणि त्यांची उत्तरे अचूकच येतात. पण प्रकाशाच्या वेगाइतक्या प्रचंड वेगाने धावणाऱ्या सूक्ष्म कणांसाठी आइनस्टाइनने  न्यूटनच्या सूत्रांमध्ये थोडा बदल करून वेगळी समीकरणे मांडली, त्याने न्यूटनच्या नियमांमध्ये भर टाकली. 

 सरळ रेषेत निरंतर वेगवान हालचाली करणाऱ्या वस्तूंसाठी जागा आणि वेळ कसा जोडला जातो हे विशेष सापेक्षतेचा सिद्धांत स्पष्ट करतो. यात जागा आणि वेळ यांच्यातले एका प्रकारचे अद्वैत दाखवले गेले आहे.  तो सिद्धांत फक्त ज्या वस्तू जवळपास प्रकाशाच्या वेगाने हालचाल करतात त्यांच्याशी संबंधित आहे. सरळ शब्दात सांगायचे झाले तर एखादी वस्तू प्रकाशाच्या गतीच्या जवळ येते, त्यावेळी त्याचे वस्तुमान असीम होते आणि तो प्रकाशापेक्षा वेगवान होऊ शकतच नाही. भौतिकशास्त्रामध्ये ही वैश्विक गती मर्यादा बऱ्याच चर्चेचा विषय ठरली आहे. पण विस्तीर्ण अंतर कसे चुटकीसरशी पार करावे याबद्दल  कपोल कल्पित साहित्यात विचार केला जातो. टाइममशीनमध्ये बसून भूतकाळात जाण्यावरही असंख्य गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत आणि काही सिनेमेही निघाले आहेत.

सूर्यप्रकाश आपल्या चांगला ओळखीचा आहे. दुसरी कुठलीही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट नसते. हा प्रकाश लोलकामधून पार होतांना त्यातले सात रंग दिसतात, कधीकधी ते रंग इंद्रधनुष्याच्या रूपाने आकाशात मोठी कमान टाकतात. त्यांच्या आजूबाजूला असलेले अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड नावाचे अदृष्य किरण शास्त्रज्ञांनी शोधून काढले आणि उपयोगात आणले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला कॅथोड रे ट्यूब आणि क्ष किरण (एक्स रे)यांचे शोध लागले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मादाम मेरी क्यूरी यांनी रेडिओअॅक्टिव्हिटीवर संशोधन करून नोबेल प्राइझ मिळवले आणि हे पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ असा मानही मिळवला. रेडिओअॅक्टिव्हिटीमध्ये  अल्फा, बीटा आणि गॅमा या नावांचे तीन प्रकारचे किरण असतात.  

या सगळ्या अदृष्य किरणांमधले क्ष किरण हेसुद्धा सूर्यप्रकाशासारखेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात, पण ते आपली त्वचा आणि मज्जा वगैरेंच्या आरपार जाऊ शकतात आणि आतल्या हाडांची चित्रे दाखवतात. गॅमा रेज तर त्यांच्यापेक्षाही भेदक असतात आणि लोखंडाच्या पार जातात. तरी तेसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात म्हणजे तरंग असतात.

कॅथोड रे म्हणजे मात्र कॅथोडकडून अॅनोडच्या दिशेने होत असलेला इलेक्ट्रॉन्स या कणांचा वर्षाव असतो.  कॅथोड आणि अॅनोड यांच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रिक व्होल्टेजच्या  दाबामुळे हे इलेक्ट्रॉन कॅथोडमधून बाहेर ढकलले जातात आणि अॅनोडच्या दिशेने धाव घेतात. बीटा रे हेसुद्धा अधिक ऊर्जावान असे इलेक्ट्रॉन असतात. ते थेट अणुगर्भामधून बाहेर पडतात आणि सुसाट धावत सुटतात. ते माणसाच्या त्वचेला पार करू शकण्याएवढे भेदक असतात. अल्फा रेमध्ये हीलियम या मूलद्रव्याचे आयॉन असतात, म्हणजे हीलियमच्या अणूच्या केंद्रस्थानी असलेले दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन यांच्या जोड्या असतात. अशा चार कणांनी मिळून तयार झालेला अल्फा हा कण कागदालासुद्धा भेदू शकत नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या अल्फा रेपासून काही हानी होत नाही. पण अल्फा किंवा बीटा रे यांचे स्रोत असलेला एखादा रेडिओअॅक्टिव्ह  पदार्थ श्वासामधून किंवा अन्नपाण्यामधून शरीरात गेला तर तो घातक ठरतो. गॅमा रे तर शरीराच्या आरपार जातातच आणि जात असतांना वाटेत थोडा विध्वंस करून जातात. म्हणून या तीन्ही प्रकारच्या विकिरणांपासून सावध रहाण्याची आवश्यकता असते.

हे थोडे विषयांतर झाले. कॅथोड रे, अल्फारे आणि बीटा रे हे किरण असले तरी ते निर्विवादपणे कण असतात हे त्यांचे द्वैत आणि किरणसुद्धा फोटॉन या कणांमधून तयार होतात हे अद्वैत.

मी सुरुवातीच्या एका भागात लिहिले होते की सर आयझॅक न्यूटन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने असे सांगितले होते की प्रकाशकिरणांचे सूक्ष्म कण असतात.  त्याच्याच काळातल्या डच फिजिसिस्ट ख्रिश्चन हुजेन्स याने असे सांगितले की  प्रकाश हा तरंगांच्या स्वरूपात इकडून तिकडे जातो. तोपर्यंत डाल्टनचा जन्मसुद्धा झाला नव्हता आणि अणू, रेणू, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन हे शब्दही कुणाला माहीत नव्हते. त्या काळात कण की तरंग एवढाच वाद होता. तो दोनशे वर्षे चालला. अखेर किरण हे कणही आहेत आणि तरंगही आहेत अशा द्वैतावर सहमति झाली.

त्या धाग्यावरून पुढे जातांना मी मागील भागात काही इतर प्रकारच्या किरणांची (रेजची) उदाहरणे दिली होती. त्यातले काही रेडिओअॅक्टिव्हिटीशी संबंधित आहेत. ते नीट समजावे  म्हणून या भागात मी त्याबद्दल वेगळे लिहिणार आहे. मादाम मेरी क्यूरी या शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत असे दाखवून दिले की रेडियम सारख्या काही पदार्थांमधून वेगळ्याच प्रकारचे अदृष्य किरण बाहेर पडत असतात. इतर काही शास्त्रज्ञांनासुद्धा हे समजले होते. त्यांनी या दृष्टीने अनेक पदार्थांचा अभ्यास केला. या अदृष्य किरणांचे अस्तित्व ओळखण्यासाठी आणि त्यांचे गुणधर्म तपासण्यासाठी विविध प्रकारची संवेदनशील अशी उपकरणे तयार करून घेतली आणि या किरणांचा अभ्यास केला. त्या अभ्यासामधून त्यांनी या किरणांची अल्फा, बीटा आणि गॅमा अशा तीन प्रकारांमध्ये वर्गवारी केली.  या तीनही प्रकारांमध्ये कमीअधिक तीव्रता असलेले असंख्य प्रकारचे किरण असतात.

जगातील सर्वच मूलद्रव्यांचे आयसोटोप्स असतात. यातले बहुसंख्य आयसोटोप स्थिर असतात, पण काही आयसोटोप्सच्या केंद्रस्थानी (न्यूक्लियसमध्ये) सतत चलबिचल चाललेली असते. त्यामधून जास्तीची ऊर्जा या किरणांद्वारे बाहेर टाकली जात असते. अगदी आपल्या शरीराचे घटक असलेल्या काही मूलद्रव्यांमधूनसद्धा हे किरण सतत बाहेर पडत असतात आणि संवेदनशील उपकरणांनी ते मोजता येतात. तसेच अवकाशामधून येत असलेल्या कॉस्मिक रेजमध्येही सूक्ष्म प्रमाणात रेडिओअॅक्टिव्हिटी असतेच.  यामुळे या शब्दाने घाबरून जायचे कारण नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण काही युनिट्स रेडिएशन घेतच असतो आणि आपल्या शरीराला त्याची सवय झालेली असते. त्याला बॅकग्राउंड डोस म्हणतात. तोसुद्धा दररोज कमीजास्त होत असतो.

अणूबाँबमध्ये किंवा न्यूक्लियर रिअॅक्टर्समध्ये युरेनियमचे विखंडन होऊन काही नवे रेणू तयार होतात. या क्रियेमध्ये अत्यधिक प्रचंड प्रमाणात विकिरण होते, तसेच हे नवे रेणू अस्थिर असतात आणि दीर्घकाळ म्हणजे शेकडो वर्षे रेडिओअॅक्टिव्ह राहतात.  यामधून मिळणारा रेडिएशनचा डोस बॅकग्राउंड डोसच्या शंभर पट इतका झाला तर त्याचे किंचित परिणाम लगेच दिसतात आणि जर तो हजारपट किंवा लाखपट इतका झाला तर गंभीर परिणाम होतात. रिअॅक्टरमधील रेडिओअॅक्टिव्हिटीचा बाहेरील सामान्य जनतेला उपसर्ग होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना मिळणारा बॅकग्राउंड डोस सुरक्षित मर्यादेतच ठेवला जातो.  

इलेक्ट्रॉन हा सूक्ष्म कण प्रत्येक अणूचा भाग असतो आणि तो निरनिराळ्या क्रियांमध्ये अनेक प्रकारे काम करत असतो.  सर्व रासायनिक क्रिया त्याच्यामुळेच घडतात, तोच विजेच्या प्रवाहात तारेमधून वहात असतो, कॅथोड रे बनून सीआरओ स्क्रीनवर उजेड पाडतो आणि तोच बीटा रे झाला तर नुकसानही करतो.

 जगातले सर्व पदार्थ अणुरेणु नावाच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले आहेत हे मान्य झाल्यानंतर या कणांचा थिऑरिटिकल अभ्यास सुरू झाला. त्यांची अंतर्गत रचना कशी असू शकेल आणि त्यांच्या अंतर्भागात काय काय गतिविधी चाललेल्या असतील यावर विचार करणे सुरू झाले. या गोष्टींचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे कुणालाही शक्य नव्हतेच. कल्पनेतून त्यांच्या आकृती काढून त्यांच्यावर चर्चा सुरू झाल्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला याला बहर आला. रदरफोर्ड आणि नील्स बोहर यासारख्या काही शास्त्रज्ञांनी आपापली मॉडेल्स मांडली. अणूच्या पोटात प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन नावाचे अतिसूक्ष्म कण असतात अशी कल्पना करून त्यांना निरनिराळे गुणधर्म दिले गेले. त्यातले इलेक्ट्रॉन्स लहान मोठे गट बनवून अणूच्या केंद्राच्या सभोवती वेगाने घिरट्या घालत असतात. ते निरनिराळ्या कक्षांमधून फिरत असतात. फिरता फिरता स्वतःभोवती गिरक्या घेत असतात, त्यातही लेगस्पिन आणि ऑफस्पिन बॉल जसे वेगवेगळ्या बाजूने वळतात तसे हे इलेक्ट्रॉन्सही दोन दिशांनी स्पिन करत असतात आणि मधूनच अणूच्या बाहेर पळून जातात. वगैरे अचाट कल्पना मांडल्या गेल्या.  या प्रत्येक कल्पनेच्या मागे काही तर्क होते, काही गणिते होती. प्रकाशाचेसुद्धा फोटॉन नावाचे सूक्ष्म कण असतात ही कल्पना पुढे आली. त्यांची इतर कणांशी टक्कर झाल्यानंतर, कुठल्या कणाचे पुढे काय होईल, कोण कुठे जाईल वगैरेंचे तर्क व्हायला लागले.

आल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षता सिद्धांत मांडला. त्याने असे दाखवून दिले की कोणीही प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास इतक्या वेगाने धावत असेल तर त्याच्यासाठी अंतराचा (स्पेसचा) संकोच होतो, काळाची गती मंदावते आणि त्याचे वस्तुमान असंख्यपटीने वाढते. या सगळ्या गोष्टी आपल्या जगातल्या नेहमीच्या वस्तूंसाठी अतर्क्य किंवा अजब वाटतात, पण इलेक्ट्रॉन आणि फोटॉनसारख्या सूक्ष्म कणांसाठी त्या तशा घडत असाव्यात असे सांगितले गेले आणि ते तर्क मान्य केले गेले. 

मॅक्स प्लँक या शास्त्रज्ञाने असे दाखवून दिले की  भिन्न अणू आणि रेणू एका वेळी केवळ वेगवेगळ्या ठराविक प्रमाणातच ऊर्जा उत्सर्जित करू शकतात किंवा शोषून घेऊ शकतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात उत्सर्जित किंवा शोषली जाऊ शकणारी सर्वात कमी ऊर्जा क्वांटम म्हणून ओळखली जाते. सोपे उदाहरण द्यायचे झाल्यास प्रेशर कुकरमधल्या वाफेचा दाब एका मर्यादेपर्यंत वाढला की शिटी वाजते, थोडी वाफ बाहेर पडते आणि थांबते, तो दाब पुन्हा वाढला की ती पुन्हा वाजते, पुन्हा थोडी वाफ बाहेर पडते असे होत राहते. अणूमधल्या अंतर्गत हालचालींमधील ऊर्जा वाढत असतांना एकेका क्षणी ठराविक क्वांटम इतकीच ऊर्जा  किरणाच्या रूपात बाहेर फेकली जात असते. हा क्षण अतीशय सूक्ष्म म्हणजे एका सेकंदाच्या अब्जांश भागाच्या अब्जांश भागापेक्षाही लहान असू शकतो.

अणूंमधल्या कणांच्या हालचाली आणि त्यांचेमधून बाहेर टाकली जात असलेली ऊर्जा यांची काही सूत्रे सांगितली गेली आणि गणिते मांडली गेली, पण त्यामधूनही पूर्णपणे सुसंगत उत्तरे येत नव्हती. हिसेनबर्ग नावाच्या शास्त्रज्ञाने अनिश्चिततेचाच एक सिद्धांत (अनसर्टन्टी प्रिन्सिपल) मांडला. त्याने असे सांगितले की वेगाने धावणाऱ्या कणाचे स्थान किंवा वेग यातले एकच निश्चितपणे सांगता येईल आणि दुसरे अनिश्चित असेल.  आपली मोटार किती किलोमीटर चालली आहे आणि ती किती वेगात धावत आहे हे दोन्ही दाखवणारी उपकरणे आपल्या मोटारीत असतात, पण या कणांबाबात तसे नसते. जिथे अंतरे आकुंचन पावतात आणि काळ मंदगतीने चालतो तिथे नेमका वेग कसा ठरवणार ? अशा सगळ्या अजब वाटणाऱ्या गोष्टींचा कसून अभ्यास करण्यासाठी क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स, क्वांटम केमिस्ट्री यासारखी विज्ञानाची नवनवी दालने उघडली गेली. यातली गणिते साधी सोपी नसतात, त्यातली गुंतागुंतीची पार्शल डिफरन्शिएट इक्वेशन्स सोडवणे फक्त त्यातल्या तज्ञांनाच शक्य असते. त्यांनी काढलेले अजब वाटणारे निष्कर्ष कधीकधी तुलनेने सोप्या भाषेत सांगितले जातात.

"जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हणतात. त्याचा शब्दशः अर्थ न घेता असे समजले जाते की कवींना अचाट कल्पनाशक्ती असते, इतरांना जाणवत नाहीत अशा संवेदना कविमनाला स्पर्श करतात, वगैरे. याचप्रमाणे असेही म्हणता येईल की इतरांना न दिसणाऱ्या काही गोष्टी शास्त्रज्ञांच्या  दिव्यदृष्टीला दिसतात. उदाहरणार्थ सपाट आणि अचला वाटणारी पृथ्वी प्रत्यक्षात चेंडूसारखी गोलाकार आहे, ती स्वतःभोवती गिरक्या घेत सूर्याभोवती फिरते यासारख्या गोष्टी पृथ्वीवर राहणाऱ्या इतर लोकांना दिसत नाहीत, पण शास्त्रज्ञांना त्या प्रत्यक्षात न दिसूनसुद्धा त्यांच्या बुद्धीला समजल्या आणि त्यांनी त्या बाकीच्या लोकांना समजावून सांगितल्या. त्याचप्रमाणे रिलेटिव्हिटी थिअरी किंवा क्वांटम मेकॅनिक्स यांचे आकलन अजूनही सामान्य लोकांना होत नसले तरी शास्त्रज्ञांनी  त्यामधून पुढे खूप संशोधन केले आणि ते अजून करत आहेत.   

 "विसंगतीमधून विनोद निर्माण होतो" असेही म्हंटले जाते. सामान्य लोक त्या विनोदावर क्षणभर हसून मोकळे होतात. पण शास्त्रज्ञ लोक त्यांना दिसलेल्या विसंगतीच्या मुळाशी जाऊन तिचे कारण शोधण्याचा कसून प्रयत्न करतात. यातून त्यांना आणखी माहिती मिळते आणि विज्ञान पुढे जाते. कुठल्याही पदार्थातले सगळे अणू एकसारखेच असतात असे आधी समजले गेले होते, पण काही पदार्थांच्या  गुणधर्मांमध्ये दिसलेल्या किंचित विसंगतीवरून शोध घेतल्यावर नवे पदार्थ सापडत गेले. उदाहरणार्थ हैड्रोजनमध्येच ड्युटोरियम आणि ट्रिशियम नावाचे त्याचे आणखी दोन आयसोटोप मिसळलेले असतात. त्यांनी हे आयसोटोप वेगळे करून दाखवले आणि त्यांचे महत्वाचे उपयोगही करायला सुरुवात केली. 

रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांचे सगळे अणू एकसारखे असले तरी एका वेळी त्यातल्या थोड्या थोड्या अणूंचे विघटन होऊन त्यांच्यामधून अल्फा, बीटा, गॅमासारखे किरण बाहेर पडत असतात. अशा प्रकारे केंव्हा कुठल्या अणूंचे विघटन होईल हे माहीत नसते, पण ते अमूक इतक्या दराने होत राहू शकेल याचा अंदाज  अभ्यासामधून काढला जातो.  अशा प्रकारे अनिश्चिततेच्या जोडीने संभाव्यता (Probability) हा आणखी एक शब्द आधुनिक विज्ञानात आला.

तसेच हैड्रोजनच्या दोन अणूंचे संलयन (Fusion) होऊन त्यातून हीलियमचा अणू जन्माला येतो आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते या क्रियेमुळे सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांमधून प्रकाशकिरण बाहेर पडून विश्वभर पसरतात हे इथल्या शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासामधून समजले. अशा प्रकारे प्रचंड ऊर्जा निर्माण करण्याच्या क्रियेचे प्रात्यक्षिकही त्यांनी हैड्रोजन बाँबमधून दाखवले. पण सूर्यामध्ये असलेले हैड्रोजनचे असंख्य अणू एकदम स्फोट करत नाहीत, सतत त्यातले थोडे थोडे अणू या क्रियेत भाग घेत असतात तरीही त्यामधून इतकी प्रचंड ऊर्जा तयार होते. हे काम कोट्यवधि वर्षांपासून होत आले आहे आणि पुढील कोट्यवधि वर्षे चालत राहणार आहे. पण सूर्यासारखे इतर काही तारे मात्र काही अब्ज वर्षांनंतर विझून गेले किंवा त्यांचे रूपांतर दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारच्या ताऱ्यांमध्ये झाले वगैरे सुरस कथा हे शास्त्रज्ञ सांगतात. या काल्पनिक कथा नसून तसे अभ्यासामधून सिद्ध झालेले आहे हे सांगायला ते विसरत नाहीत. गेल्या शंभर वर्षात झालेली विज्ञानामधील काही विषयांमधली प्रगती अशा प्रकारची आहे.

गेल्या शंभर सव्वाशे वर्षांमध्ये विज्ञानामधले मूलभूत संशोधन आपल्या अनुभवविश्वाच्या पार पलीकडल्या क्षेत्रांमध्ये होत आले आहे.  प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स या तीन मूलभूत सूक्ष्म कणांना मान्य केल्यानंतर त्यांचे विविध गुणधर्म तपासून पहाण्यासाठी त्यांनी आणखी अधिकाधिक खोलात जाऊन पुढील संशोधन आणि विचारचक्र सुरू ठेवले. न्यूट्रिनोज, अँटिन्यूट्रिनोज, मेसॉन्स, पियॉन्स, म्युऑन्स, केऑन्स, हेड्रॉन्स, क्वार्क्स, अँटिक्वार्क्स, बोसॉन्स, फर्मिऑन्स वगैरे नावांचे आणि त्यांचे उपप्रकार असलेले कित्येक  अतिसूक्ष्म कण यामधून पुढे येत गेले. यातले बरेचसे कण अत्यंत अल्पजीवी असतात. काही कारणाने ते निर्माण होतात आणि आणि लगेच दुसऱ्या एकाद्या कणात विलीन होऊन जातात, पण त्यापूर्वी आपला ठसा उमटवून जातात. त्या परिणामावरूनच ते येऊन गेल्याची माहिती कळते. काही कण खूप शक्तिशालीही असतात. ते आपल्या नकळत आपल्या शरीरातून आरपार जात असतात, पण आपल्याला ते समजतसुद्धा नाही.  हे सगळे विज्ञानच आपल्यासाठी अगम्य आहे.

पण उपयोजित विज्ञानामधल्या संशोधनामुळे मात्र जगभरातल्या लोकांचे जीवन पार बदलून टाकले आहे. प्रकाशकिरण आणि इलेक्ट्रॉन्स यांच्या परस्परसंबंधावर संशोधन करतांना प्रकाशाचे रूपांतर वि‍जेमध्ये आणि विजेचे रूपांतर प्रकाशामध्ये करता यायला लागले आणि त्यामधून अनंत अजब गोष्टी करता येणे शक्य झाले.  क्वांटम मेकॅनिक्ससारख्या अगम्य विषयामधल्या संशोधनातूनच लेजर, सेमिकंडक्टर्स, एमआरआय यासारख्या गोष्टी आल्या, इलेक्ट्रॉनिक्समधून पुढे मायक्रोचिप्स आल्या. त्यांनी युक्त असलेला घरातला संगणक किंवा खिशातला मोबाइल फोन अशा गोष्टींची मी पूर्वी कल्पनासुद्धा केली नव्हती, पण आज त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. यांच्या मागचे विज्ञानही अगम्यच असले तरी त्यांचा उपयोग तर खरा आहे. 

कण आणि तरंग किंवा पदार्थ आणि ऊर्जा यांच्यात द्वैत असो वा अद्वैत असो, त्या चर्चेमधून झालेल्या प्रगतीचा किती फायदा आपल्याला होत आहे हे महत्वाचे आहे. 

(समाप्त)