प्राचीन काळात आकाश आणि अवकाश असा फरक नव्हता, किंबहुना आकाशाच्या पलीकडे असलेले अवकाश, अंतरिक्ष किंवा अंतराळ असे त्या शब्दांचे अर्थच नव्हते. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे वगैरे सगळे गोल आकाशातच भ्रमण करतात असे समजले जात होते. पुराणातल्या अनेक कथांमध्ये आकाशमार्गाचा उल्लेख आहे. पुराणातल्या विश्वामध्ये जमीनीवर मानवांची वस्ती होती, तर पाताळात दानवांचे आणि आकाशातल्या स्वर्गलोकामध्ये इंद्रदेवाचे राज्य होते. पण पृथ्वीवरील काही सम्राट आणि बरेचसे राक्षसांचे राजे थेट इंद्रावर स्वारी करून स्वर्गाचे राज्य जिंकून घेत असत. त्यांचे सगळे सैन्यच आकाशमार्गाने उडून वर जात असे. रावणाचा मुलगा मेघनाद याने इंद्राला जिंकून अनेक देवांना पकडून खाली आणले होते आणि त्यांना रावणाच्या घरात गडी म्हणून घरकामाला ठेवले होते. म्हणून त्याचे नाव इंद्रजित असे पडले होते. स्वतः रावणसुद्धा महादेवाच्या तपश्चर्येसाठी आकाशमार्गाने कैलासाकडे जात असे. वनातल्या सीतेचे हरण करण्यासाठी तो साधूचा वेष धरून आकाशमार्गे आला आणि तिला उचलून घेऊन आकाशामधूनच लंकेला परत गेला. हनुमानाने जन्माला आल्याआल्याच उगवत्या सूर्याच्या लालचुटुक बिंबाला गोड फळ समजून ते खाण्यासाठी लगेच आकाशात उड्डाण केले होते. त्यानंतरही त्याने सीतेला शोधत लंकेला आणि द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी औषध आणण्यासाठी हिमालयाकडे उड्डाण केले होते. देव आणि दानवच नाही तर नारदमुनीसारखे काही ऋषीमुनीही अंतर्धान पावत आणि अदृष्यपणे क्षणार्धात दुसऱ्या ठिकाणी किंवा थेट दुसऱ्या लोकात जाऊन पोचत असत.
घरात आईने आणि देवळात कीर्तनकारांनी रंगवून सांगितलेल्या या अद्भुत कथा लहान वयात खऱ्याच वाटत असत. माझे सारे लहानपण अशा सुरस कथा ऐकण्यातच गेले. आमच्या लहान गावाच्या आसपास कुठेही विमानतळ नव्हता. क्वचित कधी तरी एकादे विमान दूर आकाशातून जातांना दिसायचे. तेंव्हा मला आकाशातल्या त्या विमानांचेही फार कौतुक वाटत नव्हते आणि युरी गागारिनने अंतरिक्षात जाऊन परत येण्यात फार मोठा पराक्रम केला असेल असेही त्या काळात मला वाटले नव्हते. पण मोठेपणी या विषयाचा अभ्यास केल्यानंतर मला सत्यपरिस्थितीची कल्पना आली. हवेपेक्षा जड असलेले विमान कसे उडू शकते हे समजले, हवेच्या थरांना पार करून अवकाशात जाणाऱ्या अग्निबाणांची रचना समजली आणि अवकाशात उडवलेले उपग्रह पृथ्वीभोवती का फिरत राहतात हे कळले आणि ही सगळी कामे किती अवघड असतात हे ही समजले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत अतिदुर्गम अशा ठिकाणी जाण्याचे महाकठीण आव्हान स्वीकारणे हासुद्धा एक मानवी पराक्रम समजला जातो. हिमालयाची उत्तुंग शिखरे, प्रशांत महासागराचा तळ किंवा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव अशा दुर्गम आणि निर्जन ठिकाणी जाऊन कुणालाही तिथे काय मिळण्यासारखे असते? उलट त्या प्रयत्नात स्वतःचा प्राण गमावण्याचा धोका मात्र असतो. तरीही काही साहसी लोक आपल्या जिवावर उदार होऊन आणि तन मन धन अर्पण करून अशा मोहिमेचा ध्यास धरतात आणि अपार कष्ट सहन करून ते ध्येय गाठतात.
विमानाचा शोध लागला त्या काळात आकाशात उडून येणे हेच एक मोठे धाडसाचे काम वाटत होते, पण कालांतराने ते सुरक्षित आणि सर्वसामान्य झाले. तोपर्यंत मानवाने आकाशाच्या पलीकडे असलेल्या अंतराळात भरारी मारण्याचा विचार सुरू केला. यू एस ए (अमेरिका) आणि यू एस एस आर (रशिया) यांच्यात होत असलेल्या चढाओढीत सुरुवातीला रशियाने आणि त्याच्या पाठोपाठ अमेरिकेने अवकाशात काही उपग्रह सोडले. हे उपग्रह आणि पृथ्वीवरील नियंत्रणकक्ष यांच्यात चांगला खात्रीलायक संपर्क स्थापन झाल्यानंतर मानवाला अंतराळात पाठवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अंतराळात गेलेल्या यानाला पृथ्वीवर परत आणता येणे आवश्यक होते म्हणून आधी काही रिकामी यानेच अवकाशापर्यंत उडवून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न होत राहिले.
हे काम यशस्वीरीत्या करता येते याची खात्री पटल्यानंतर १२ एप्रिल १९६१ रोजी युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर अवकाशात जाऊन सुखरूप परत आला आणि तो लगेच त्या काळातला एक महानायक झाला. त्याच्या पाठोपाठ ५मे १९६१ला अमेरिकेचा अॅलन शेपर्ड अंतराळात जाऊन आला.(आकृति अंतराळमानव - १ ) युरी गागारिन फक्त एक पृथ्वीप्रदक्षिणा करून परत आला होता, तर शेपर्ड एकही प्रदक्षिणा पूर्ण न करता फक्त अवकाशात पोचून परत आला होता. रशियाचा व्होस्टोक आणि अमेरिकेचा मर्क्युरी या प्रोग्रॅम्सच्या अंतर्गत दोन दोन उड्डाणे झाल्यानंतर २० फेब्रूवारी १९६२ला अमेरिकेच्या जॉन ग्लेन याने मर्क्युरी प्रोग्रॅमखालीच फ्रेंडशिप ७ या यानात बसून उड्डाण केले. त्याने आपल्या यानाचे स्वतः नियंत्रण करून पृथ्वीभोवती भराभर तीन वेळा फेऱ्या मारल्या आणि तो काही तासात परत आला. १६ जून १९६३ला रशियाने व्होस्टोक प्रोग्रॅमखालीच व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा या महिलेला अंतराळात पाठवले आणि तीही अंतराळात जाऊन आलेली पहिली महिला म्हणून जगप्रसिद्ध झाली. १८ मार्च १९६५ला रशियाच्याच अॅलेक्सी लेओनोव्ह याने पहिल्यांदाच आपल्या यानाच्या बाहेर निघून विशाल अंतराळात काही मिनिटे 'स्पेसवॉक' करून म्हणजे तरंगून दाखवले. या अंतराळवीरांना अमेरिकेत अॅस्ट्रोनॉट तर रशियात कॉस्मोनॉट असे म्हंटले जाते. त्यांना अवकाशात नेऊन आणणाऱ्या वाहनांना स्पेसक्राफ्ट किंवा स्पेस व्हेइकल (अंतराळयान) असे म्हंटले जाते. ही वाहने सुद्धा काही काळ पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असली तरी त्यांना उपग्रह न म्हणता अंतराळयान असे म्हंटले जाते.
या दोन्ही देशांनी त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक मोहिमा काढल्या. सुरुवातीला त्यांचे अंतराळवीर अवकाशात जाऊन सुखरूपपणे परत येत होते या उपलब्धीचेच मोठे अपरूप आणि कौतुक होते. हळू हळू त्यांनी पृथ्वीचे आणि अवकाशाचे निरीक्षण व संशोधन करून इतर माहिती गोळा करायला सुरुवात केली, पण ते काम करणारे अनेक मानवरहित उपग्रह आधीपासून कार्यरत होतेच. माणसांनी अवकाशात जाऊन त्यापेक्षा वेगळे काहीतरी जास्त काम करायला हवे. अमेरिका आणि रशिया हे दोघेही चंद्राची जास्त माहिती मिळवण्याचा कसून प्रयत्न करत होते. रशियाने ल्यूना कार्यक्रमामध्ये काही मानवरहित याने चंद्रावर पाठवली, तर अमेरिकेने आधी मानवरहित वाहने पाठवून मोहिमेची चाचणी करून घेतली आणि १९६९मध्ये अपोलो११ कार्यक्रमाअंतर्गत नील आर्मस्ट्रांग, बझ एल्ड्रिन आणि मायकेल कोलिन्स या तीघांना चंद्रविजयाच्या मोहिमेवर पाठवले. (आकृति अंतराळमानव -२) त्यातील कोलिन्स हा कोलंबिया नावाच्या कमांड मॉड्यूलमध्ये बसून चंद्राभोवती फिरत राहिला आणि आर्मस्ट्रांग व एल्ड्रिन ही अंतराळवीरांची जोडी ईगल नावाच्या ल्यूनर मॉड्यूलमधून चंद्रावर जाऊन उतरली. त्यांनी तिथे जाऊन अमेरिकेचा झेंडा रोवला, अनेक फोटो काढले आणि चंद्रावरील दगड माती गोळा केली. त्यानंतर ते ईगलमध्ये बसून चंद्रावरून उडून कोलंबिया यानामध्ये गेले आणि कोलिन्ससह सुखरूपपणे पृथ्वीवर परत आले. हा एक ऐतिहासिक असा खूप मोठा विक्रम होता.
रशियाने मानवाला चंद्रावर पाठवायचा नाद न धरता अवकाशातच काही काळ मुक्काम करून रहायच्या प्रयत्नांवर जास्त लक्ष दिले आणि १९७१मध्ये साल्यूत १ नावाचे पहिले स्पेस स्टेशन अवकाशात पाठवले. अमेरिकेचे अपोलो मिशन १९७२पर्यंत चालत राहिले आणि त्यातून चोवीस अॅस्ट्रोनॉट्स अवकाशात जाऊन आले. त्यातले काही चंद्रावर उतरले, तिथे राहून त्यांनी गाडी चालवली, चंद्रावरच्या निरनिराळ्या भागांची आणखी माहिती मिळवली आणि तिथले दगडधोंडे गोळा करून पृथ्वीवर आणले. रशिया आणि अमेरिका यांच्यासह भारतादि अनेक देशांनी मंगळ, शुक्र, गुरु आदि इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी दूरवर अनेक मानवरहित याने पाठवली, काही याने सूर्याजवळ तर काही सूर्यमालिकेच्याही बाहेर पाठवली गेली. ती मात्र कधीच पृथ्वीवर परत आली नाहीत.
अवकाशात एक प्रयोगशाळा ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले गेले होतेच. अमेरिकेने पुन्हा पुन्हा वापरता येतील अशी स्पेस शटल नावाची प्रचंड वाहने तयार केली. (आकृति अंतराळमानव ३) या वाहनांमधून कृत्रिम उपग्रह, उपकरणे, इतर सामान आणि अंतराळवीर यांना अवकाशात घेऊन जाणे, त्यांना तिथल्या स्पेस स्टेशनवर नेऊन ठेवणे किंवा तिकडून पृथ्वीवर परत आणणे शक्य झाले. यातला स्पेस शटल ऑर्बायटर किंवा स्पेसप्लेन हा विमानासारखा दिसतो. त्यालाही पृथ्वीवरून उडवतांना एका मोठ्या रॉकेटला जोडून उडवले जाते. अवकाशामधून परत येतांना त्याला ग्लायडरसारखे हवेवर तरंगत तरंगत जमीनीवर उतरवता येते. हे ऑर्बायटर नव्या रॉकेट्सच्या सहाय्याने पुन्हा पुन्हा अवकाशात उडवता येते. एंटरप्राइज, कोलंबिया, चॅलेंजर, डिस्कव्हरी, अॅटलांटिस आणि एंडेव्हर या नावांचे ऑर्बाइटर्स तयार करून वापरले गेले. कोलंबिया या स्पेस शटलने १९८१मध्ये पहिले य़शस्वी उड्डाण केले. १९८३मध्ये अमेरिकेने स्पेस शटल मधून यंत्रसामुग्री आणि उपकरणे अवकाशात नेऊन स्पेसलॅब प्रस्थापित केली, तसेच १९९० मध्ये हबल टेलिस्कोप ही महाकाय दुर्बिण अवकाशात नेऊन ठेवली. सन २०११पर्यंत निरनिराळ्या स्पेस शटल्सनी १३५ उड्डाणे केली आणि त्यातून अनेक अंतराळवीरांनी अवकाशात ये जा केली.
रशियाने १९७१ मध्ये सोल्युत १, त्यानंतर सोल्यूतचे काही अवतार आणि १९८७ साली मीर नावाची स्पेस स्टेशने तयार केली आणि बुरान नावाचे शटलही तयार केले. त्यांचे सोयूझ हे यान अंतराळवीर आणि उपकरणांना स्पेस स्टेशनवर घेऊन जाण्यासाठी वापरले जात असे. सन २०००मध्ये या दोन्ही देशांनी जपान, कॅनडा आणि युरोपमधील काही देशांशी सहयोग करून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन नावाची कायम स्वरूपाची प्रयोगशाळा स्थापन केली ती आजतागायत सुरू आहे. ही सगळी स्पेस स्टेशने लो अर्थ ऑर्बिटमध्ये पृथ्वीभोवती वेगाने फिरत राहणारे कृत्रिम उपग्रह आहेत. नेहमी काही अंतराळवीर पृथ्वीवरून तिथे जाऊन काही दिवस किंवा महिने राहतात आणि परत येतात. त्यांच्या तिथून निघण्यापूर्वीच अंतराळवीरांची नवी तुकडी तिथे जाऊन पोचते. यातले बहुतेकजण कुठल्या ना कुठल्या विषयातले तज्ञ असे शास्त्रज्ञ असतात आणि अंतराळातल्या प्रयोगशाळांमध्ये राहून नवनवे प्रयोग करतात. जे पृथ्वीवर राहून करता येणार नाही अशा प्रकारचे हे संशोधन असते. त्यांनी कोणते प्रयोग करायचे हे ठरवून त्यासाठी आवश्यक अशी सामुग्री आणि उपकरणे त्यांच्याबरोबर स्पेस शटलमधून स्पेस स्टेशनावर पाठवली जातात.
अमेरिका आणि रशिया या देशांनी निरनिराळ्या कार्यक्रमांमधून इतर काही मित्र देशांच्या अंतराळवीरांनाही अवकाशात जाण्याची संधी दिली. १९८४ साली भारताचा राकेश शर्मा रशियाच्या सोयुझ मोहिमेतून अवकाशात फिरून आला. आतापर्यंत ४७ देशांचे सुमारे सातशे अंतराळवीर अवकाशात गेले आहेत, त्यातले काही दुर्दैवी अपवाद वगळता बाकीचे सगळे सुखरूप परत आले आहेत. अमेरिकेने सर्वात जास्त म्हणजे सुमारे साडेतीनशे अंतराळवीरांना अवकाशात पाठवले आहे, त्यात मूळ भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या दोन महिला आहेत. रशिया आणि अमेरिकेनंतर २००३मध्ये चीन या तिसऱ्या देशाने स्वतःच्या यानामधून अंतराळवीरांना अवकाशात पाठवून परत आणले. २०२०पासून अमेरिकेतल्या स्पेसेक्स या खाजगी कंपनीने अनेक लोकांना अवकाशात पाठवून त्यांना स्पेस स्टेशनवर पोचवले. भारताच्या इसरोनेही मानवांना अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान नावाची योजना आखली आहे आणि त्यासाठी काही अंतराळवीरांची निवड केली आहे. पुढील दोन तीन वर्षांमध्ये ही योजना कार्यान्वित होईल असा अंदाज आहे.
पृथ्वी आणि अंतराळ यात खूप फरक असतो. मुख्य म्हणजे अंतराळामध्ये वातावरण नसल्यामुळे तिथे आजूबाजूच्या हवेचा दाब किंवा तापमान नसते. अंतराळात सकाळ, संध्याकाळ आणि रात्र नसते, तिथे सतत तेजस्वी सूर्य तळपत असतो. एखादा उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असतांना जेवढा वेळ तो पृथ्वीच्या सावलीत जातो तेवढा वेळ सोडला तर बाकीच्या वेळात त्याच्या सूर्याकडे असलेल्या भागावर प्रखर ऊन पडत असते. काही सूर्यकिरणांचे त्याच्यावरून परावर्तन होते तर काही किरण शोषले जातात. त्यांच्यामुळे त्या भागाचे तापमान वाढत जाते, पण उपग्रहाच्या सर्वच भागांमधून सतत अवकाशात ऊष्णतेचे उत्सर्जन चालले असल्यामुळे तो वेगाने अतीशय थंड होत असतो. यामुळे काही भागात काही वेळ खूप जास्त (शंभर अंशाहून जास्त) तापमान आणि इतर ठिकाणी शून्याच्याही खूप खाली(उणे अडीचशे अंशाच्याही खाली) तापमान अशी विषम परिस्थिती येत असते. उपग्रहाचे, यानाचे आणि स्पेससूटचे भाग बनवण्यासाठी जे धातू किंवा अधातू निवडले जातात त्यांचे गुणधर्म खूप जास्त किंवा खूप कमी तापमानातही स्थिर राहतील हे पाहिले जाते आणि त्यांचे प्रयोगशाळांमध्ये कसून परिक्षण केले जाते. काही उपकरणांना आणि नाजुक भागांना संरक्षक कवच लावले जाते, त्यांचे तापमान मर्यादेत राखण्यासाठी खास प्रकारची थर्मल कंट्रोल सिस्टम असते. उपग्रहामधील बहुतेक सगळी उपकरणे विजेवर चालणारी असतात. त्यांना विजेचा प्रवाह पुरवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बॅटऱ्या ठेवलेल्या असतात आणि त्या बॅटऱ्यांना चार्ज करण्यासाठी मोठमोठी सोलर पॅनेल्स बसवलेली असतात. त्यामुळे उपग्रहांचे उपयुक्त आयुष्य वाढते, पण त्या उपकरणांमध्ये बिघाड झाला तर ती उपकरणे काम करत नाहीत. तरीही ते उपग्रह आपल्या कक्षांमध्ये फिरतच राहतात. त्यांना पृथ्वीवर परत आणले जात नाही. मात्र अवकाशात काम करतांना त्या उपग्रहावर आणि त्यातल्या उपकरणांवर काय परिणाम होत असतो याचाच अभ्यास करण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या संशोधनकार्यासाठी काही उपग्रहांमध्येच त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची व्यवस्था केली जाते, त्यांना वगळता इतर उपग्रहांना पृथ्वीवर परत आणण्याचे कुठलेही साधन नसते.
मानवाला अवकाशात पाठवल्यावर मात्र तो सुखरूपपणे परत येईल याची विश्वसनीय व्यवस्था केली जातेच. त्यासाठी इथून जातांनाच परत येण्यासाठी लागणारी जास्तीची यंत्रसामुग्री त्यांच्या अंतराळयानांमध्ये ठेवावी लागते. उपग्रहांमधल्या निर्जीव यंत्रांना चालत राहण्यासाठी विजेखेरीज आणखी कशाची गरज नसते, पण माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी आणि हवा यांची अत्यंत आवश्यकता असते. त्याला या गोष्टी अंतराळात मिळणे शक्य नसल्यामुळे पृथ्वीवरून उड्डाण करतांनाच त्या बरोबर घेऊन जाव्या लागतात. जमीनीवर आपण रोज स्वयंपाक करून ताजे अन्न खाऊ शकतो, तसे करणे अंतराळात शक्य नसते. त्या अंतराळवीरांसाठी पौष्टिक, रुचकर, सहज पचण्यासारखे आणि टिकाऊ असे विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ मुद्दाम तयार करवून घेऊन त्यांना सोबत नेण्यासाठी दिले जातात. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक माणूस रोज २ ते ३ लिटर पाणी पितो आणि स्वैपाक, आंघोळ, हातपाय आणि तोंड धुणे, कपडे धुणे आणि भांडी घासणे वगैरेंवर कित्येक लिटर पाणी खर्च करतो. अंतराळवीरांना इतके पाणी घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे ते तिकडे गेल्यावर असली कामे करतच नाहीत.
स्पेस स्टेशनसारख्या ठिकाणी जिथे अंतराळवीर दीर्घ काळ मुक्काम करून राहतात तिथे पाण्याचा पुनर्वापर करण्याची चोख व्यवस्था केलेली असते. माणसाने प्यायलेले बहुतेक सगळे पाणी श्वासोच्छ्वास, घाम आणि मूत्र यातून शरीराबाहेर पडत असते, तसेच इतर कारणांसाठी पाण्याचा थोडा उपयोग करावा लागतो, यातला थेंबनथेंब गोळा करून आणि शुद्ध करून पुन्हा वापरासाठी उपलब्ध केला जातो. यासाठी तिथे विशेष प्रकारची यंत्रसामुग्री ठेवावी लागते. स्पेस सेंटरसारख्या ठिकाणी साधारणपणे पृथ्वीवर असलेल्या वातावरणासारखीच हवा पुरवलेली असते, पण श्वासोच्छवासामधून निघालेला कार्बन डायॉक्साइड वायू बाजूला काढून प्राणवायूचा पुरवठा करत राहण्याची योजना केलेली असते. जे अंतराळवीर फक्त वर जाऊन परत येतात किंवा स्पेसवॉक करतांना अवकाशात जातात त्यांच्या स्पेससूटमध्येच प्राणवायू आणि नायट्रोजन वायू यांचे विशिष्ट प्रमाणातले मिश्रण पुरवले जाण्याची व्यवस्था असते.
अंतराळवीरांची अन्नपाणी व हवा यांची गरज भागवणे एवढेच पुरेसे नसते. पृथ्वीवर आपल्या शरीराला इथल्या वातावरणाचा दाब आणि तापमान यांची सवय असते. अंतराळातल्या निर्वात पोकळीत आणि अतिशीत तापमानात मानवी शरीर तग धरू शकणार नाही. शरीराला सोसेल इतकाच शरीराच्या बाहेर असलेल्या हवेचा दाब आणि तापमान राहील याची विशेष काळजी स्पेस स्टेशन आणि स्पेससूटमध्ये घेतली जाते. रक्ताभिसरण आणि अन्नपचन यासकट आपल्या शरीराच्या सगळ्या व्यवहारांवर पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत असतो . इथेही आपण नेहमी जमीनीवर उभे किंवा आडवे असतो, शीर्षासन करून फार वेळ राहू शकत नाही. अंतराळात जमीनच नसल्यामुळे काय उभे आणि काय आडवे? तिथे अंतराळवीर उभे, आडवे, तिरके, उफराटे अशा कुठल्याही पोजमध्ये तरंगत राहतात. तिथे तोल जाऊन खाली पडण्याची भीतीच नसते, पण त्यामुळे शरीराचा तोल सांभाळण्याच्या शरीराच्या नैसर्गिक क्रियेवर परिणाम होतो. अंतराळात असतांना शरीराचे वजन पायावर तोलले जात नसल्यामुळे पायांचे स्नायू कमजोर होत जातात. त्यांची शक्ती शाबूत ठेवण्यासाठी त्यांना विशेष व्यायाम करत रहावे लागते. तिथे गुरुत्वाकर्षणाच्या अभावी रक्ताभिसरण आणि अन्नपचन वगैरेंमध्ये बाधा आल्यामुळे उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रासही होतात. सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी यांना पृथ्वीवर परत आणल्यानंतर यानामधून बाहेर काढतांना स्ट्रेचरवर घेतले होते हे आपण व्हीडिओमध्ये पाहिले होते. अंतराळवीरांना खाली आल्यानंतर काही दिवस विशेष ट्रीटमेंट देऊन आणि व्यायाम करवून घेऊन पुन्हा आपल्या पायांवर उभे केले जाते.
स्पेससूट या विशिष्ट प्रकारच्या पोशाखावरून अंतराळवीर लगेच ओळखला जातो. घातक ठिकाणी काम करणाऱ्या काही कामगारांना खास प्रकारचा ओव्हरऑल ड्रेस घावावा लागतो तो बाहेरच्या हवेमधील दूषित पदार्थ शरीरात जाऊ नयेत यासाठी असतो, पण अंतराळवीरांच्या शरीरामधील हवा किंवा पाणी बाहेरच्या निर्वात पोकळीत उडून जाऊ नये यासाठी त्यांना हा खास स्पेससूट घालावा लागतो. अंतराळामधील निर्वात पोकळी, तिथले प्रखर सूर्यकिरण आणि त्यामुळे होणारे विषम तापमान, अल्ट्राव्हायोलेटसारखे घातक किरण, मधूनच वेगाने उडत असलेल्या सूक्ष्म आकाराच्या उल्कांचे कण या सर्वांपासून बचाव करणे, श्वसनासाठी प्राणवायू पुरवणे, हातापायांच्या हालचाली करता येणे आणि मायक्रोफोन व स्पीकरमधून संपर्क साधता येणे हे मुख्य उद्देश लक्षात घेऊन या स्पेससूटची रचना केली जाते. त्यांचेही अनेक प्रकार असतात. (आकृति अंतराळवीर -४) फक्त यानामधून अंतराळापर्यंत जाऊन परत येण्यासाठी सुटसुटित सूट असतो, तर स्पेसवॉक करणे, अंतराळयानाच्या बाहेर जाऊन काही काम करणे किंवा चंद्रावर उतरणे यासाठी खूप जाडजूड सूट असतात. त्यात अनेक पदर (लेयर्स) असतात. सर्वात आतला मऊ कपडा शरीराला घट्ट बसतो तर सर्वात बाहेरचा कणखर कपडा सगळे धक्के सहन करणारा अभेद्य असा असतो. अंतराळवीराच्या शरीराला बाहेरच्या बाजूने हवेचा दाब मिळावा म्हणून त्याच्या श्वसनासाठी लागणारा प्राणवायूही त्याच्या पोशाखातच भरून ठेवलेला असतो, त्यामुळे तो टम्म फुगलेला दिसतो. अंतराळवीर या स्पेससूटमध्ये नखशिखांत झाकलेला असतो. त्याला समोरचे पहाता यावे यासाठी विशिष्ट प्रकारची अभेद्य अशी काच त्या पोशाखाच्या हेलमेटमध्ये बसवलेली असते.
अंतराळवीरांना आधी सुमारे दोन वर्षे प्रशिक्षण दिले जाते. अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या अभावी होणारे त्रास सहन करता यावेत यासाठी अंतराळवीरांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना निरनिराळ्या यंत्रांमध्ये उभे, आडवे, वाकडे, तिकडे कसेही ठेवून वेगाने गरागरा फिरवून किंवा खाली वर करून गुरुत्वाकर्षणहीन अवस्थेचा सराव केला जातो. माणसाला एका संकुचित जागेत एकट्याने खूप वेळ राहणेही अवघड असते. यासाठी त्यांना स्पेससूटमध्ये तास न तास बसणे, उठणे, चालणे वगैरे क्रिया करून त्याची सवय करून घेतली जाते. त्यांना त्यांच्या यानाची समग्र माहिती दिली जाते. त्या यानाच्या प्रतिकृतीमध्ये बसवून तिथली सगळी उपकरणे कशी वापरायची याची सिम्युलेटरवरून प्रॅक्टिस करून घेतली जाते. या प्रवासात कोणत्या अनपेक्षित गोष्टी किंवा अपघात घडू शकतात हे सिम्युलेटरवर दाखवून त्या वेळी काय करायचे हे प्रात्यक्षिकांसह शिकवले जाते. त्यासाठी आवश्यक तेवढे विज्ञान आणि तंत्रज्ञान यातले विषयही थिअरॉटिकल शिक्षणात शिकवले जातात. त्यांच्याकडून रोजच सैनिकांसारखे भरपूर व्यायाम करून घेतले जातात. प्रत्येक उमेदवाराची शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक क्षमता यांची कसून तपासणी केली जात असते. जे उमेदवार या सगळ्या दिव्यांमधून तावून सुलाखून निघतील त्यांचीच प्रत्यक्ष उड्डाणासाठी निवड केली जाते.
अवकाशातून परत येणारे यान नेमक्या जागी आणून उतरवता येईल अशी व्यवस्था स्पेस शटलसाठी केलेली असते. पण इतर सगळ्या यानांना तसे करता येत नाही. अवकाशात गेलेले अंतराळयान उपग्रहासारखे सतत पृथ्वीभोवती वेगाने फिरत असते. त्यावर अनेक छोटी छोटी रॉकेट इंजिने असतात. ती इंजिने सुरू केल्यावर त्यातून निघालेल्या वायूंच्या झोतांच्या प्रतिक्रियेने यानाचा वेग कमी केला जातो आणि ते पृथ्वीभोवती फिरत फिरतच वेगाने खाली येत राहते. ते पृथ्वीपासून काही अंतरावर येताच अवाढव्य आकाराची पॅराशूट्स उघडतात आणि हवेतून तरंगत समुद्रात कुठेतरी त्या यानाला उतरवतात. ते यान अंदाजे कुठे उतरेल हे त्याची गणिते करून ठरवलेले असते आणि अवकाशातून खाली यायला निघाल्यापासून त्याचे सतत बारकाईने निरीक्षणही चाललेले असते. त्या संभाव्य जागेच्या आसपास विशेष प्रकारची जहाजे समुद्रात फिरत ठेवलेली असतात. त्या जहाजांमधले लोक अंतराळवीरांच्या कॅपसूल्सना मुख्य जहाजाकडे ओढून नेतात आणि तिथे त्या कॅपसूलचा दरवाजा उघडून प्रवाशांना जहाजावर घेऊन जातात. सुनीता विलियम्स आणि बॅरी विलमोर हे अंतराळवीर काही तांत्रिक कारणांमुळे स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. त्यांच्यासह चार अंतराळवीरांना स्पेसेक्सच्या ड्रॅगॉन कॅपसूलमधून पृथ्वीवर आणले गेले.(आकृति अंतराळमानव -५) या सगळ्या प्रक्रियेचे उदाहरण टेलिव्हिजनवर सगळ्या जगाने पाहिले होते.
एव्हरेस्ट शिखर किंवा दक्षिण ध्रुवावर जाण्याची अनावर ऊर्मी एखाद्या साहसी व्यक्तीच्या मनात निर्माण होते तेंव्हा ती व्यक्तीच त्यासाठी कोणकोणती साधने लागतील आणि किती खर्च येईल याची चौकशी करून सगळी जमवाजमवी करते आणि ते कार्य साध्य झाल्यावर त्याचे सगळे श्रेय तिलाच दिले जाते. अवकाशात जाणाऱ्यांची गोष्ट वेगळी असे. नासा, इस्रो किंवा तत्सम संस्था स्पेस प्रोग्रॅम आणि त्यासाठी लागणारे यान आणि रॉकेट्स ठरवून ती तयार करून घेतात. त्या मोहिमेवर पाठवण्यासाठी अनेक उमेदवारांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अवस्थांच्या परिक्षा घेऊन त्यातून निवड करतात. त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या लोकांमधून अखेर अंतराळवीरांची निवड करून त्यांना अंतराळात पाठवले जाते. युरी गागारिन किंवा नील आर्मस्ट्राँग अशांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यांना पाठवणाऱ्या यंत्रणांमध्ये काम करणारे अनामिक तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ हेच त्यांच्या यशाचे खरे धनी असतात.
आपणही एकदा अवकाशात जाऊन यावे अशी कुणाच्याही मनात कितीही तीव्र इच्छा असली तरी ती पूर्ण करता येण्याची कसलीही सोय पूर्वी नव्हती, पण या शतकात काही कंपन्यांनी अंतरिक्षाचे पर्यटन सुरू केले. (आकृति अंतराळमानव -६) अमेरिकन इंजिनियर आणि बिझिनेसमॅन डेनिस टिटो हा पहिला प्रवासी २००१ मध्ये सोयूझच्या यानातून अवकाशात जाऊन आला, तर अनौशेह अन्सारी नावाची इराणी अमेरिकन ही पहिली महिला प्रवासीसुद्धा सोयूझमधूनच २००६ मध्ये अवकाशात जाऊन आली. तिच्या आधी टिटोसह तीन पुरुष प्रवासी अवकाशात फिरून आले होते. या सगळ्या लोकांनी काही कोटी डॉलर्स खर्च करून ही यात्रा केली होती. नंतरच्या काळात अधिक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. स्पेसेक्सने तर स्वतःची याने आणि रॉकेट्स तयार करून हौशी प्रवाशांची वाहतूक सुरू केलीच, ते नासाच्या अंतराळवीरांची ने आण ही त्यांच्या यानातून करायला लागले. स्पेस स्टेशनवर अडकून पडलेले सुनीता विलियम्स आणि बॅरी विलमोर हे अंतराळवीर स्पेसेक्सच्या यानामधूनच परत आले. स्पेस स्टेशनपर्यंत जाऊन तिथून परत येण्यासाठी अजूनही कोट्यवधि डॉलर्स लागतातच, पण काही कंपन्यांनी फक्त पंधरा मिनिटात कार्मान लाइनच्या पलीकडे अवकाशात जाऊन परत येण्याच्या लहान सहली काढल्या आहेत, त्या काही लाख डॉलर्समध्ये करता येतील. त्यातून जाणाऱ्या यात्रेकरूंना कदाचित काळेभोर अवकाश, त्यात एका बाजूला विलक्षण तेजस्वी सूर्य, तर इतर भागात असंख्य चांदण्याही चमकतांना दिसतील, तसेच सुंदर निळी वसुंधरा दुरून पहायला मिळेल. या सगळ्यांची तब्येत धडधाकट असणे आवश्यक असतेच, त्यांनाही आधी विशेष प्रकारचे थोडे ट्रेनिंगही घ्यावे लागतेच. अंतराळयान आणि अग्निबाण यांच्यावरील खर्च अवाढव्य असल्यामुळे अवकाशात जाणे हे अजूनही सामान्य माणसाच्या आटोक्यात नाहीच आणि नजीकच्या भविष्यात तशी शक्यता दिसत नाही.
या वर्षी २५ जून २०२५ रोजी अॅक्सियम मिशन ४ या मोहिमेतून भारताचा दुसरा अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला याने स्पेसेक्सच्या फाल्कन ९ या रॉकेटच्या सहाय्याने उडवलेल्या क्र्यू ड्रॅगन ग्रेस स्पेसक्राफ्ट या अंतराळयानामधून उड्डाण केले आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांसह तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाऊन पोचला. तो भारताच्या इस्रोतर्फे अॅक्झियम ४ या आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभागी झाला होता आणि त्याने दोन आठवडे आय एस एस मध्ये राहून अनेक प्रयोग केले. त्यानंतर हे अंतराळवीर त्याच यानात बसून पृथ्वीकडे परत आले आणि दि.१५ जुलै रोजी अमेरिकेच्या सॅन डिअॅगोजवळ प्रशांत महासागरात उतरले. हे अभियान अॅक्सियम, नासा आणि स्पेसेक्स या संस्थांनी संयुक्तपणे केले होते. यात अमेरिकेची पेगी व्हिटसन ही दीर्घ अनुभव असलेली अॅस्ट्रोनॉट या मिशनची कमांडर होती, भारताच्या इस्रोचा शुभांशु शुक्ला हा पायलट होता आणि पोलंड व हंगेरी या देशातले सहप्रवासी अंतराळवीर होते. यापूर्वी भारत, पोलंड आणि हंगेरी या देशांचे एक एक अंतराळवीर पन्नास वर्षांपूर्वी रशियाच्या सोयुझ यानांमधून अंतराळात जाऊन आले होते, त्यानंतर अंतराळात जाणारे हे त्या देशांमधील दुसऱ्या क्रमांकाचे अंतराळवीर होते. शुभांशु शुक्ला याचे उड्डाण हे इस्रोसाठी त्यांच्या गगनयान प्रकल्पाचा महत्वाचा भाग होता आणि त्याच्या अनुभवाचा उपयोग त्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या प्रशिक्षणात तसेच त्या मोहिमेच्या आखणीत होणार आहे. आणखी पाचदहा वर्षात भारताचे अनेक अंतराळवीर अवकाशात गेलेले दिसतील.
--------------------







No comments:
Post a Comment