Saturday, July 26, 2025

वातावरण, आकाश आणि अवकाश

 वातावरण, आकाश आणि अवकाश

आपल्या आजूबाजूला सगळीकडे हवा असते, पण ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही कारण ती पूर्णपणे पारदर्शक असते. तिच्यातून प्रकाशकिरण सहजपणे आरपार जातात. त्यामुळे आजूबाजूच्या जमीनीवरील झाडे, इमारती, माणसे, इतर प्राणी, हवेत उडत असलेले पक्षी वगैरे सगळ्या गोष्टींपासून निघालेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांपर्यंत येऊन पोचतात आणि त्या आपल्याला दिसतात. अगदी दूर क्षितिजावर असलेले डोंगर तर दिसतातच, पण आकाशातले सूर्य, चंद्र आणि ग्रह तारे सुद्धा इथून दिसतात. हवा जशी प्रकाशकिरणांना विरोध करत नाही, तसेच ध्वनिलहरींनाही करत नाही, उलट ती स्वतःच त्यांना वाहून नेते. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या माणसांचे बोलणे किंवा चिमण्याची चिवचिव ऐकू येते. पण या लहरी जसजशा दूर जातात तसतशा त्या क्षीण होत जातात आणि काही अंतराच्या पलीकडे त्या ऐकू येत नाहीत याचा अर्थ त्यांच्या वहनाला हवेचा विरोध असतो. आपण जेंव्हा जमीनीवरून चालत असतो तेंव्हा आपल्या चालण्यालाही ही वाटेतली हवा फारसा विरोध करत नाही, किंबहुना तिने केलेल्या अत्यंत सौम्य विरोधाची आपल्याला इतकी सवय झाली असते की आपल्याला तो जाणवत नाही. आपल्या डोळ्यांना हवा दिसत नाही  तसेच तिला रंग, वास किंवा चवसुद्धा नसते. त्यामुळे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या आपल्या बाह्य ज्ञानेंद्रियांना तिच्या अस्तित्वाचे ज्ञान होत नाही. पण  जेंव्हा वारा सुटतो म्हणजे इकडची हवा तिकडे जायला लागते तेंव्हा तो वारा दिसत नसला तरी आपल्या शरीराला त्याचे अस्तित्व चांगले जाणवते. सोसाट्याचा वारा तर इकडच्या वस्तू उचलून तिकडे नेऊन टाकतो आणि त्याच्या घोंघावण्याचा आवाजही आपल्या कानांना ऐकू येतो. अशा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने चालण्यासाठी पायांना जास्त जोरही लावावा लागतो.

आपण वरच्या दिशेने पाहिले तर न दिसणारी हवाच हवा आणि त्याच्याशी सलग असे एक निळे आकाश दिसते. कुठेतरी पारदर्शक हवा संपते आणि तिच्या पलीकडे निळे आकाश सुरू होते असे आपल्याला वाटत नाही कारण मुळातच तसे काही नसतेच. सूर्याच्या प्रकाशाचे किरण हवेमधून पृथ्वीवर येत असतांना ते हवेत पसरतही असतात. ते होत असतांना त्यांचे किंचित पृथक्करण होऊन इतर रंगांचे काही किरण इकडे तिकडे जातात त्यामुळे अथांग आकाशाचा रंग निळा दिसतो. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला याच आकाशात कुठे लाल तर कुठे केशरी रंगांच्या छटा दिसतात. पण त्याचा अर्थ तिकडची हवा किंवा आकाश सरड्यासारखे रंग बदलते असा होत नाही. ती पारदर्शक हवाच असते, पण तिच्यामधून येणारे सूर्याचे किरण रंगाचा खेळ खेळत असतात.

आपल्या जीवनासाठी श्वासोछ्वास अत्यावश्यक असतो. प्रत्येक श्वासात आपण आजूबाजूची थोडी हवा आपल्या फुफ्फुसात म्हणजेच शरीरात घेतो आणि उछ्वास करतांना ती पुन्हा बाहेर सोडतो. पण उंच पर्वतशिखरावर गेल्यास आपल्याला श्वास घेतांना त्रास होतो, कारण तिथली हवा थोडी विरळ असते, त्यामुळे तिचा दाब कमी असतो आणि प्रत्येक श्वासागणिक जेवढी हवा शरीराला मिळायला पाहिजे तेवढी ती मिळत नाही. ती मिळावी यासाठी माणूस जोरजोरात श्वास घेतो आणि त्याला धाप लागते, दम लागतो, कधी कधी चक्करही येते. पूर्वीच्या काळात वाहतुकीची साधने नसल्यामुळे सामान्य लोक अशा दुर्गम पर्वतशिखरांवर जातच नव्हते आणि कोणी धाडशी धडधाकट लोक गेलेच तर ते हळूहळू डोंगर चढून वर जाईपर्यंत हळू हळू विरळ होत गेलेल्या हवेची त्यांच्या शरीराला सवय होत जात असेल. त्याची माहिती इतर लोकांपर्यंत पोचत नसेल.

आपल्या आजूबाजूच्या हवेला एक दाब असतो हे पूर्वीच्या लोकांना माहीतही नव्हते. ही अदृष्य हवा वजनाने इतकी हलकी असते की वजनाच्या काट्यावर उभे राहून आपण दीर्घ श्वास घेतला आणि पूर्णपणे बाहेर सोडला तरी तो काटा तसूभरही जागचा हलत नाही. पण हवेलाही अत्यंत कमी असले तरी निश्चितपणे थोडे वजन असतेच. तरीही या  हवेचे एक प्रचंड ओझे आपण सतत आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर वहात असतो आणि आपल्या अंगावर सतत सर्व बाजूंनी त्याचा मोठा दाब पडत असतो हे मात्र आपल्या  शरीराला सहसा जाणवत नाही. विमानात किंवा काही कारखान्यांमध्ये तिथल्या हवेचा दाब किंचित कमी किंवा जास्त ठेवलेला असला तर ते मात्र लगेच जाणवते.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी इव्हँजेलिस्ता तोरिचेली या इटालियन शास्त्रज्ञाने हवेच्या दाबाचा शोध लावला. हवेच्या दाबाच्या अस्तित्वाबद्दल तॉरिचेलीची खात्री पटली होती. आपण सगळेजण हवेने भरलेल्या एका विशाल महासागराच्या तळाशी रहात आहोत असे त्याने एका पत्रात लिहून ठेवले होते. समुद्राच्या तळाशी गेल्यावर जसा पाण्याचा प्रचंड दाब शरीरावर पडतो तसाच हवेचा दाब आपल्यावर सतत पडत असतो असे त्याने सांगितले होते. त्या काळातल्या इतर शास्त्रज्ञांना ती अफलातून कल्पना पटायची नाही. म्हणून हा शोध लोकांना पटवून देण्यासाठी त्याने हवेचा दाब मोजण्याचे वायुभारमापक (बॅरोमीटर) हे उपकरण तयार केले. 

त्यानंतर शास्त्रज्ञांनी हे उपकरण निरनिराळ्या ठिकाणी नेऊन तिथला हवेचा दाब मोजला. त्यात असे दिसले की समुद्रसपाटीवर तो सर्वात जास्त म्हणजे सुमारे 14.7PSI इतका असतो. यालाच १ बार असेही म्हणतात. समुद्रसपाटीवर प्रत्येक एक वर्ग सेंटिमीटर इतक्या लहानशा क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या कांही किलोमीटर उंच अशा हवेच्या स्तंभाचे सरासरी वजन सुमारे एक किलोग्रॅम (1.01 Kg/sq.cm) इतके असते. सुमारे ७६ सेंटीमीटर पारा किंवा १० मीटर पाणी यांना तोलून धरण्यासाठी १०१ किलोपास्कल 101 kN/m2 (kPa) म्हणजेच 10.1 N/cm2 इतका  हवेचा दाब लागतो असे गणितातून सिध्द होते. समुद्रसपाटीपासून उंचावर जातांना हवेचा दाब हळू हळू थोडा थोडा कमी होत जातो. तो आल्प्स पर्वताच्या माथ्यावर सुमारे निम्मा आणि हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावर तर तो फक्त एक तृतियांश बार इतकाच असतो.  हवा ऊष्ण झाली की प्रसरण पावते आणि थंड झाली की आकुंचन पावते यामुळे पृथ्वीवर सगळीकडेच हवेचा दाब थोडा कमीजास्त होतच असतो आणि त्यामुळेच वारे वाहतात. ठिकठिकाणी दर रोज होत असलेले हवामानातले बदल पाहून त्याची नोंद ठेवणे आणि त्यावरून हवामानाचा अंदाज वर्तवणे यासाठी जगभरातल्या सगळ्या सरकारांनी वेगळे हवामानखाते ठेवले आहे. 

जमीनीपाशी तर सगळीकडे हवा असतेच, या हवेत उंच उडणारे पक्षी आणि त्यांच्यापेक्षाही उंचावरील आभाळात वाऱ्याबरोबर पुढे पुढे सरकणारे ढग दिसतात. त्यातले काही ढग कमी उंचीवर असतात तर काही ढग खूप उंचावरून जात असतात. हे पक्षी, ढग आणि विमाने हवेमधूनच उडत असतात. आकाशात अमूक उंचीपर्यंत हवा पसरलेली आहे आणि तिच्यापुढे ती अजीबात नाही अशी स्पष्ट सीमारेषा नसते. जसजसे जमीनीपासून दूर जाऊ तसतशी ती अतीशय हळू हळू विरळ होत जाते.  ती आकाशात कुठपर्यंत पसरली आहे हे नजरेला दिसत नाहीच. मग जमीनीवरली हवा ढगांच्या पलीकडल्या अथांग आकाशात पार सूर्यचंद्र, ग्रहतारे यांच्यापर्यंत पसरलेली असते का? कदाचित नसेल असा विचार प्राचीन काळातल्या विचारवंतांच्या मनातसुध्दा आला असणार. कदाचित म्हणूनच या विश्वाची रचना ज्या पंचमहाभूतांमधून झाली आहे असे मानले जात होते त्यात पृथ्वी, आप (पाणी), तेज यांच्यासोबत वायू (हवा) आणि आकाश अशी दोन वेगळी तत्वे त्यांनी सांगितली होती.

आपल्याला न दिसणारी सगळी हवा इथून तिथून एकच असावी असे  वाटेल पण तीनशे वर्षांपूर्वीच्या शास्त्रज्ञांनी तिचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यांना असे दिसले की त्यात अनेक वायूंचे मिश्रण असते. मग एकाने त्यातला प्राणवायु (ऑक्सीजन), दुसऱ्याने नायट्रोजन, तिसऱ्याने कार्बन डायॉक्साइड वगैरे वायूंना ओळखले तसेच त्यांना बाजूला काढून त्यांचे गुणधर्म तपासून पाहिले.  त्यावरून असे समजले की हवेमध्ये फक्त २१% असलेला प्राणवायूच आपल्या शरीराला हवा असतो. त्यानंतर गिर्यारोहण करणारे आपल्यासोबत ऑक्सीजनचे सिलिंडर घेऊन जायला लागले.   

समुद्रसपाटीपासून उंच गेल्यावर हवेचा दाब कमी होतो हे उपकरणांमधून समजल्यावर ती विरळ होत जात असावी हे ओघानेच आले. मग ती विरळ होता होता कुठे तरी संपून जाणार हे नक्की. हे शोध लागेपर्यंत पृथ्वीपासून चंद्र व सूर्य यांची अंतरे किती आहेत हे शास्त्रज्ञांना समजले होते. त्यांच्या मानाने पृथ्वीभोवती असलेला हवेचा थर अगदीच क्षुल्लक असतो. या हवेने पृथ्वीला सर्व बाजूंनी वेढलेले आहे, म्हणजेच आवरण घातले आहे या अर्थाने वातावरण हा शब्द योजला गेला. हे वातावरण तरी खालपासून वरपर्यंत सगळे एकच आहे का याचे संशोधन सुरू झाले. आधी फक्त लहान पर्वतांवर जाऊन तिथली हवा पाहता येत होती, मग ऑक्सीजन सिलिंडर घेऊन अधिक उंच शिखरांपर्यंत चढून जाणे शक्य झाले.  गरम करून हलकी झालेली हवा किंवा हैड्रोजनसारखा हलका वायू फुग्यांमध्ये भरून ते वेदर बलून्स आकाशात उंच उडवण्याचे प्रयोग झाले.  त्या फुग्याला जोडलेल्या पाळण्यात बसून शास्त्रज्ञ हवेत उंचावर जाऊन निरीक्षण करत किंवा तिथली हवा बाटलीत भरून खाली घेऊन येत आणि प्रयोगशाळेत  त्याची तपासणी करत असत. हवेचे तापमान आणि दाब यासारखे गुणधर्म मोजणारी आधुनिक  उपकरणे आली आणि ती माहिती जमीनीवरील केंद्रांकडे पाठवण्याची सोय झाल्यानंतर ती उपकरणे रॉकेटच्या सहाय्याने अधिकाधिक वर पाठवली जायला लागली. त्यांच्या सहाय्याने वातावरणातील उच्च पातळीवर असलेल्या हवेचे संशोधन केले जाऊ लागले.

या संशोधनामधून आता असे सिद्ध झाले आहे की आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि त्याला सलग असलेले आकाश अथांग पसरलेले आहे असे वाटत असले तरी या हवेमध्ये एकावर एक असे निरनिराळे थर असतात. त्यांना विभागणारी सीमा नसते, ते एकमेकात बेमालूम मिसळलेले असतात. तिथली हवा एका थरामधून दुसऱ्या थरात सहजपणे ये जा करत असते, तरीही स्थूलमानाने असे स्थर सगळीकडे असतात.  शास्त्रज्ञांनी त्यांचा कसून अभ्यास केला आणि असे सांगितले की  पृथ्वीपासून फक्त काही अंतरापर्यंतच हवा असते आणि या वातावरणातही निरनिराळे थर असतात, तपांबर (Troposphere), स्थितांबर (Stratosphere ), मध्यांबर ( Mesosphere), दलांबर(Ionosphere),  ऊष्मांबर  (Thermosphere), बाह्यांबर(Exosphere) वगैरे (आकृति पहा). सर्वात खाली म्हणजे जमीनीला लागून असलेल्या टोपोस्फीअरची जाडी समुद्रसपाटीपासून ७ ते १६ किलोमीटर इतकी असते. एव्हरेस्ट शिखरासह हिमालयपर्वतसुद्धा याच थराखाली येतो. स्ट्रॅटोस्फीअरच्या वरच्या भागात ओझोनचा थर असतो तो सूर्यकिरणांमधील अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांना शोषून घेतो, त्यामुळे आपले संरक्षण होते. 

हिमालयाचे सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट, हे समुद्रसपाटीपासून ८,८४८ मीटर उंच आहे. त्यावरही विस्तारणारा पृथ्वीला सगळ्यात लगटून असलेला हवेचा थर म्हणजे तपांबर. सृष्टीच्या साहचर्याने तापणारे (तप) आकाश (अंबर) म्हणजे तपांबर. ह्या थराची उंची, पृथ्वीच्या धृवीय प्रदेशांवर ७ किलोमीटर पासून, तर विषुववृत्तीय प्रदेशांवर १६ किलोमीटरपर्यंत बदलती असते. ह्या थरात जसजसे उंचावर चढत जावे तसतसे तापमान कमी होत जाते. तापमान कमी होण्याचा सरासरी दर, सुमारे ६.५ अंश सेल्शस/किलोमीटर उंची, इतका असतो. ह्या थरातच वातावरणाचे ७५% वजन एकवटलेले असते. ह्या थरातच वातावरणातले ९९% पाणी आणि धूळ नांदत असतात. आपण सामान्यपणे ज्याला वातावरण म्हणतो, त्याची व्याप्ती ह्या थरातच सीमित असते. हवामानातील बहुतांशी बदल ह्या थरातच घडून येत असतात.

तपांबराच्या वरचा थर म्हणजे स्थितांबर. स्थितांबराच्या सर्वोच्च थरात ओझोन वायू असतो. सूर्याची उच्चऊर्जा अतिनील किरणे (High Enerfy Ultraviolet Rays) शोषून, तो प्राणवायूच्या अपसामान्य आणि सामान्य अशा दोन प्रकारांत विघटित होतो. म्हणून इथे तापमान घटत असते. त्याखालच्या थरांत, प्राणवायूचे हेच दोन्ही प्रकार मग अतिनील किरणे शोषून पुन्हा संघटित होतात. ओझोन निर्माण होतो. ह्या प्रयत्नात ऊर्जाविमोचन होऊन थराचे तापमान वाढते राहते. निसर्गतः आढळून येणारा बहुतांशी ओझोन इथेच निर्माण होत असतो. विविध तापमानांचे थर परस्परांत न मिसळून जाता ह्या भागांत स्थिरपद नांदत असल्यामुळेच ह्या थरास स्थितांबर म्हणतात. ह्या भागात हवेची घनता अत्यंत विरळ असते म्हणून, विमान-उड्डाणांना निम्नतम अवरोध होत असतो. म्हणून विमाने ह्याच थरातून उडवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असते. त्यामुळेच ती जास्तीत जास्त काळ ह्याच थरात राहतील असे उड्डाणांचे नियोजन केले जात असते.

तपांबराच्या सर्वात वरच्या भागात तापमान घटत असते, आणि स्थितांबराच्या खालच्या भागांत ओझोन निर्मितीपायी ते वाढते असते. सीमेवरील दरम्यानच्या थरात तापमानाचा घटता कल बदलून वाढता होत जातो. ह्या सीमावर्ती थरास तपस्तब्धी (Topopause) म्हणतात. कारण इथले तापमान कमी अधिक प्रमाणात स्थिरपद राहत असते.

स्थितांबराच्या वरच्या भागात ओझोनचे प्रमाण घटत जाते आणि मध्यांबरात तर ते नगण्यच होते. स्थितांबर आणि मध्यांबराच्या सीमावर्ती भागात हे घडून येते, त्या भागास स्थितस्तब्धी म्हणतात. बहुतांशी अतिनील किरणे स्थितस्तब्धीपाशीच अडतात. ती ओलांडून पृथ्वीकडे येत नाहीत.  मध्यांबराच्या वरचा भाग मध्यस्तब्धी म्हणून ओळखला जातो. मध्यांबर संपून उष्मांबर सुरू होण्यादरम्यानचा हा सीमावर्ती भाग असतो.

उष्मांबरात अवकाशातून येऊन पोहोचणारी अतिनील किरणे एवढी शक्तीशाली असतात, की त्या भागात अत्यंत विरलत्वाने आढळून येणार्‍या अणुरेणूंना ती अतिप्रचंड (हजारो अंश केल्व्हिन) तापमानाप्रत घेऊन जातात. मात्र इथे हवा एवढी विरळ असते की, सामान्य तापमापक तिथे ठेवल्यास त्यातून प्रारणांद्वारे होणारा ऊर्जार्‍हास इतका जास्त असतो की, त्या अणुरेणूंकडून तापमापकास वहनाद्वारे मिळणारी ऊर्जा नगण्य ठरून, तापमापक प्रत्यक्षात शून्य अंश सेल्शसखालील तापमान दर्शवतो.

मध्यांबर आणि उष्मांबर मिळूनच्या संयुक्त थरास दलांबर असेही एक नाव आहे. अणूचे मूलकीकरण (Ionisation) होते तेव्हा धन आणि ऋण दले (तुकडे) निर्माण होतात. अतिनील किरणांमुळे सर्वत्र होणार्‍या मूलकीकरणाचे पर्यवसान तेथील वातावरण धन आणि ऋण दलांनी भरून जाण्यात होते. म्हणून ह्या भागास दलांबर असेही म्हटले जाते.

उष्मांबर आणि दलांबर संपते त्याच्या वरच्या भागात पृथ्वीलगतचे सर्व पदार्थ (वायू) संपुष्टात येत जातात. ह्या संधीप्रदेशास उष्मास्तब्धी म्हणतात. अणुरेणूच न उरल्याने मग दलेही नाहीशी होतात. शिल्लक राहते ते निव्वळ अवकाश. अवकाशाची निर्वात पोकळी. ह्या भागाला बाह्य अवकाश किंवा बाह्यांबर असेही म्हटले जाते.

पृथ्वीपासून सुमारे १६० किलोमीटर उंचीनंतरच्या अधिक उंचीवर, वायूरूप पदार्थांचे अस्तित्वच एवढे विरळ होत जाते की, आवाजाचे वहन करू शकणार्‍या ध्वनीलहरी निर्माणच होऊ शकत नाहीत. अवकाश निःशब्द होत जाते. बाह्यांबर तर त्यामुळे, प्रायः नादविहीनच असते.

बाह्य अवकाशातून सरासरीने वर्षाला ४० टन उल्का पृथ्वीवर येऊन पडत असतात. जर वातावरणच अस्तित्वात नसते तर, दरसाल त्यांच्यापायी चिरडून मरणार्‍यांची संख्याही आपल्याला मोजावी लागली असती. मात्र वायुमंडलातील कमालीच्या उच्च तापमानातून त्यांना प्रवास करावा लागत असल्याने आणि पृथ्वीशी अधिकाधिक सलगी साधत असता वातावरणाशी होत जाणार्‍या वाढत्या घर्षणाने त्यांची वाफ होऊन जाते. अर्थातच वायुमंडल हे आपले सुरक्षा कवचच आहे. अतिनील किरणांपासूनचे, उल्कांपासूनचे, आणि विश्वकिरणांपासूनचेही. कारण विश्वकिरणांतील प्रचंड ऊर्जा वायुमंडलात शोषली जाऊन अवनीतलावर पोहोचता पोहोचता ती सुसह्य होऊन जात असतात.  असे आहे अवनीतलावरील सुरस वायुमंडल! आपले अद्भूत सुरक्षा कवच.

थोडक्यात सांगायचे झाल्यास आपली घरे, गावे, शहरे, शेते, डोंगर, नद्या, समुद्र वगैरे आपल्या ओळखीच्या या पृथ्वीवरच्या सगळ्या जागा या वातावरणाच्या तपांबर (Troposphere) या सर्वात खालच्या थरातच असतात. पृथ्वीचे वातावरण सुमारे पाचशे किलोमीटरपर्यंत पसरलेले असले, त्यात हा थर फक्त दहाबारा किलोमीटर इतकाच असला आणि त्याची घनताही कमी कमी होत गेलेली असली तरी पृथ्वीवरली बहुतेक सगळी हवा यातच असते. हॅलिकॉप्टर आणि पंख्यावर उडणारी (प्रोपेलर) विमाने या खालच्या थरातच उडू शकतात. अधिक वेगवान अशी आधुनिक जेट विमानेसुद्धा या थराच्या सीमेवरूनच उडतात. त्याच्यावर असलेले अत्यंत विरळ थर अप्रत्यक्षपणे आपले संरक्षण करत असले तरी आपल्या आयुष्यात कधीही त्यांचा थेट संबंध येत नाही.

कार्मन नावाच्या शास्त्रज्ञाने गणिताच्या आधारे असे दाखवले होते की कुठलेही शक्तिशाली विमान पृथ्वीपासून जास्तीत जास्त सुमारे शंभर किलोमीटरपर्यंतच म्हणजे तिसऱ्या थरापर्यंत उंच उडू शकेल , म्हणजे ते कितीही जास्त वेगाने गेले तरी या मर्यादेच्या पलीकडे असलेली अत्यंत विरळ हवा त्याचे वजन उचलून धरू शकणार नाही. 'कार्मन लाइन' या नावाने एक काल्पनिक सीमारेषा ठरवली गेली. अमर्याद अशा गोष्टींसाठी "स्काय ईज द लिमिट" असे म्हंटले जात होते, पण आता अशा प्रकारे स्काय म्हणजे आकाशाचीसुद्धा एक सीमारेषा ठरवली गेली. या रेषेच्या पलीकडे आकाश संपून अवकाश सुरु होते असे ढोबळपणे समजले जाते. पण ही काल्पनिक  मर्यादा मुख्यतः आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांसाठी आहे आणि तेही सर्व देशांनी मान्य केलेले नाहीत. प्रत्यक्षात आकाशात अशी सीमारेषा नसते, पण कुठलेही विमान इतक्या उंचीवर जात नाही आणि कुठलाही उपग्रह (सॅटेलाइट) या रेषेच्या आत फिरत नाही. 

वातावरणाच्या या सगळ्या थरांच्या पलीकडे अथांग अशी निर्वात पोकळी असते. (Outer space) ती अवकाश, अंतराळ, अंतरिक्ष या नावांनी ओळखली जाते. चंद्र, सूर्य, ग्रह, तारे वगैरे सगळे या अवकाशात असतात. कृत्रिम उपग्रहांनासुद्धा या अवकाशातच उडवले जाते.  या अवकाशात हवा नसल्यामुळे तिथून वर निळे आकाश दिसत नाही.  ती निर्वात पोकळी पूर्णपणे काळी कुट्ट असते आणि त्यातच कुठे अत्यंत प्रखर असा सूर्य आणि इतर भागांमध्ये जास्तच तेजस्वी चंद्र आणि चांदण्या सतत दिसतात. दिवस रात्र आणि पूर्वपश्चिम या सारख्या दिशा फक्त पृथ्वीच्या संदर्भात असतात. दूर अवकाशात गेल्यावर तिथे दिवसरात्र आणि सकाळसंध्याकाळ तर नसतातच, तिथी, वार, आठवडा, महिना, वर्ष यातले काहीही नसते, पूर्वपश्चिम उत्तरदक्षिण असा दिशाही नसतात. आपण तशा जीवनाची कल्पनाही करू शकत नाही.  

सर्वसामान्य माणसासाठी वातावरण आणि आकाश यातही काही अंतर नसते कारण ढग हवेत तरंगत असले तरी आभाळातच असतात आणि "घार हिंडते आकाशी", "आकाशी झेप घे रे पाखरा" वगैरे सगळी उड्डाणे हवेतच होत असतात. आपल्याला आकाश आणि अवकाश यातला फरकही समजू शकत नाही. अवकाशात दूर असलेले सूर्य, चंद्र आणि तारका आपल्याला आकाशातच दिसतात. 


No comments: