Wednesday, September 25, 2024

वॉशिंग्टन डी सी ची सहल

 मी २००८ मध्ये दिलेल्या माझ्या अमेरिकेच्या पहिल्या भेटीत मी वॉशिंग्टन डीसी या तिथल्या राजधानीला जाऊन आलो होतो. पण आता न्यूजर्सीमध्ये रहात असलेला माझा मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांनी अजून हे प्रेक्षणीय स्थळ पाहिले नव्हते.  एका रविवारी हवामान चांगले होते हे पाहून आम्ही एकदम वॉशिंग्टन डीसीला धावती भेट द्यायचे ठरवले. कारने जायचे असल्यास चार तासांचा रस्ता होता हे पाहिले आणि सकाळी उठून तयार होऊन बाहेर पडलो. रस्त्यावर नेहमीसारखाच बऱ्यापैकी ट्रॅफिक होता, तसेच ठिकठिकाणी टोलनाकेही होते. वाटेत एका फूडमॉलवर थांबून थोडे खाऊन पिऊन घेतले आणि दुपारी बारा वाजायच्या सुमाराला वॉशिंग्टन डीसीच्या आसमंतात जाऊन पोचलो. तिथला उंच मनोरा दुरूनच दिसायला लागला.


मागच्या वेळेला मी एका टूरिस्ट कंपनीबरोबर गेलो होतो, त्यामुळे तिथे गेल्यावर कुठकुठल्या जागा कुठल्या क्रमाने पहायच्या ते सगळे आमच्या गाइडनेच ठरवलेले होते. आमच्यासारखे पर्यटक फक्त बसमधून उतरायचे, ते ठिकाण बघायचे आणि पुन्हा बसमध्ये चढायचे एवढेच करत होते. मी त्या वेळचा सगळा सविस्तर वृत्तांत ब्लॉगवर लिहून ठेवला होता पण आमचे या वेळचे येणे इतके अचानक ठरले होते की ते लेख शोधून काढून वाचायलाही फुरसत मिळाली नाही. शिवाय पंधरा वर्षांमध्ये कितीतरी गोष्टी बदलल्या असण्याची शक्यताही होतीच. म्हणून मी या वेळी सगळे काही नव्याने पहायचे असेच ठरवले.

मला एवढे आठवत होते की तिथे मधोमध वॉशिंग्टन मेमोरियलचा उंचच उंच स्तंभ आहे आणि त्याच्या चार दिशांना दूर अंतरावर  कॅपिटाल बिल्डिंग, लिंकन मेमोरियल, जेफरसन मेमोरियल आणि व्हाइट हाउस या चार मुख्य प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय इमारती आहेत.  त्या चारी इमारतींना बाहेरच्या बाजूने जोडणारा रिंग रोड तेंव्हा तरी नव्हता. त्या भागात काही विस्तीर्ण तलाव होते आणि पोटॅमिक नावाची एक नदीही होती. आम्ही त्यांना वळसे घालत वेग वेगळ्या रस्त्यांनी जाऊन या चार इमारती पाहिल्या  होत्या. मध्यंतरीच्या काळात त्यात आणखी काही बदलही झाले असतील. नवे फ्लायओव्हर्स किंवा अंडरपास बांधले गेले असतील. त्यामुळे मी पूर्वीच्या अनुभवावरून काही मार्गदर्शन करणे योग्य नव्हतेच. पण आता सोबत जीपीएस असल्यामुळे आम्हाला रस्ते लक्षात ठेवायची काही आवश्यकताही नव्हती.

 आम्ही लिंकन मेमोरियलपासून सुरुवात करायचे ठरवले आणि जीपीएसला तशी आज्ञा केली. जीपीसने आज्ञाधारकपणे आम्हाला लिंकन स्मारकापर्यंत आणले. पण तिथे आसपास कुठेही मोटार उभी करायला जागाच दिसत नव्हती, अधिकृत असा पार्किंग लॉटही दिसत नव्हता.  तिथले मुख्य रस्ते सोडून लहान लहान रस्त्यांवरून फिरून पाहिले तर जिकडे तिकडे गाड्याच गाड्या पार्क करून ठेवलेल्या होत्या. पंधरा वीस मिनिटे उलटसुलट दिशांनी फिरल्यावर एक लहानशी मोकळी जागा दिसली. दुसऱ्या कुणी ती पटकवायच्या आधी आम्ही आमची मोटार तिथे उभी केली आणि बाहेर पडलो. 


तिथून लिंकन मेमोरियलची भव्य इमारत दिसतच होती. त्या दिशेने चालत चालत तिथपर्यंत गेलो आणि पंचवीस तीस पायऱ्या चढून वर गेलो. ग्रीक डोरिक टेंपलच्या धर्तीवर बांधलेल्या या इमारतीला ३६ खांब आहेत आणि त्यांच्या आधाराने सपाट आकाराचे छप्पर आहे. वेगवेगळ्या अमेरिकन संस्थानांची नांवे यातील प्रत्येक खांबावर खोदलेली आहेत आणि उरलेली नांवे वेगळ्याने एका फलकावर दिली आहेत. समोरची बाजू पूर्णपणे मोकळीच आहे. ही संपूर्ण इमारत पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांपासून बांधलेली आहे.


पायऱ्या चढून इमारतीत गेल्यानंतर समोर अब्राहम लिंकन यांचा भव्य पुतळा आहे. तसा तो अगदी दूरवरून दिसतच असतो. जवळ जाता जाता त्याची भव्यता आणि लिंकनच्या मुद्रेवरील भाव स्पष्ट होत जातात. "ज्या लोकांसाठी अब्राहम लिंकन यांनी आपल्या राष्ट्राची अखंडता टिकवून ठेवली त्यांच्या हृदयात आणि या मंदिरात त्यांची आठवण सतत तेवत राहील." असे शब्द या पुतळ्याच्या वरच्या बाजूला ठळक अक्षरात कोरून ठेवले आहेत. दोन हात बाजूच्या हँडरेस्टवर टेकवून ऐटीत खुर्चीवर विराजमान असलेली लिंकन यांची सुटाबुटातली प्रतिमा विलक्षण लक्षवेधक आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पहाता त्यांची गणना कांही देखण्या लोकांमध्ये होणार नाही. पण त्या पुतळ्याचा आकार, रेखीवपणा, समोरील वॉशिंग्टन स्मारक आणि कॅपिटांलच्या दिशेला वळवलेली करडी नजर वगैरे सारे पाहण्यासारखे आहे. लिंकन यांनी केलेल्या कांही महत्वाच्या भाषणांमधले उतारे दोन्ही बाजूंच्या भिंतींवर कोरून ठेवले आहेत.  तिथे आलेले पर्यटक अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर आपापले फोटो काढून घेण्यात मग्न होते. थोडे लोक त्यांच्या भाषणांमधले उतारे तिथेच उभे राहून वाचत होते किंवा घरी जाऊन सावकाशपणे वाचण्यासाठी त्यांचेही फोटो काढून घेत होते. ती जागा प्रशस्त असली तरी तिथे खूप गर्दी होत असल्यामुळे जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते.

लिंकन स्मारकाच्या पायऱ्या उतरत असतांनाच समोर लांबच लांब चौकोनी रिफ्लेक्शन पाँड, त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळीचे रुंद पट्टे, पलीकडे भव्य वॉशिंग्टन स्मारकाचा गगनचुंबी खांब दिसत होताच तसेच त्याच्याही पलीकडच्या बाजूला असलेली वस्तुसंग्रहालये आणि सर्वात मागे  कॅपिटॉल हिलची इमारत वगैरे  दिसत होतेच. त्या वेळेपर्यंत दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती. आमच्या कारपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला काही खाद्यपदार्थांच्या मोठमोठ्या गाड्या उभ्या होत्या आणि तिथे आलेले पर्यटक त्यांच्या समोर रांगा लावून उभे होते. त्या गाड्यांमधून बर्गर, पिझ्झा, पाश्ता, नूडल्स अशासारखे पदार्थ मिळत होते. आम्ही चांगला पोटभर नाश्ता घेतलेला असल्यामुळे कुणालाही जास्त भूक लागली नव्हती, शिवाय वाटेत चघळण्यासाठी आम्ही काही खुसखुशित पदार्थही आणलेले होते. त्यामुळे तिथले पदार्थ घेऊन न खाता आम्ही सरळ मोटारीकडे गेलो आणि आणलेले एक दोन पदार्थ तोंडात टाकून चघळत पुढच्या मार्गाला लागलो. 


तिथून दुसऱ्या कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाकडे जातांना वाटेत वॉशिंग्टन मेमोरियल लागणार होतेच, ते पहात पहात व्हाइट हाउसकडे जायचे असे आम्ही ठरवले. वॉशिंग्टन मॉन्युमेंट ही एक प्राचीन काळातल्या युरोपीय पध्दतीतील ओबेलिस्क प्रकारची इमारत आहे. हा एक प्रकारचा चौकोनी खांब असतो आणि तो वरच्या बाजूने निमूळता होत जातो. हे मॉन्यूमेंट संगमरवर, ग्रॅनाइट आणि सँडस्टोन या जातींच्या दगडांमधून उभारले आहे. तो जगातील सर्वात मोठ्या आकाराचा प्रचंड ओबेलिस्क आहे, तसेच ते जगातील सर्वात उंच दगडी बांधकाम आहे.

पॅरिसचा आयफेल टॉवर उभा होण्यापूर्वीची कांही वर्षे वॉशिंग्टन मेमोरियल ही जगातील सर्वात उंच इमारत होती. सुमारे ५५५ फूट उंचीचा हा मनोरा एकाद्या पन्नास मजली इमारतीइतका उंच आहे. आजकाल यापेक्षाही उंच अशा कित्येक इमारती अमेरिकेतच नव्हे तर मलेशिया, दुबई यासारख्या देशातल्या शहरांमध्येही पहायला मिळतात, पण त्या सिमेंटकाँक्रीटच्या असतात. वॉशिंग्टन मेमोरियल बाहेरून खांबासारखे वाटत असले तरी ते आंतून पोकळ असून त्यात साडेआठशे पायऱ्यांचा जिना आहे, तसेच लिफ्टची सोयसुध्दा आहे. पण ११-७ च्या घटनेनंतर आंत जायला मनाई करण्यात आली आहे असे काहीसे आम्हाला पूर्वीच्या भेटीत सांगितले गेले होते. या वेळीही आम्हाला तिथे कुणी आत जाणारे, बाहेर पडणारे किंवा त्यासाठी रांगेत उभे असलेले लोक दिसले नाहीत. मॉन्यूमेंटच्या सभोवती प्रशस्त हिरवळ आहे आणि त्यात फुलांचे सुंदर ताटवे लावलेले दिसत होते. तिथे अनेक लोक बसले होते किंवा रमतगमत फिरत होते. त्या स्मारकाच्या जवळच्या रस्त्यावरून जात असतांना आम्ही आपल्या गाडीत बसूनच या स्मारकाचे दुरून दर्शन घेतले. जवळ जवळ दीडशे वर्षांपूर्वी आतासारखी यांत्रिक साधने उपलब्ध नसतांना त्या काळातल्या कामगारांनी जिवाचा धोका पत्करून एवढी उंच इमारत कशी बांधली असेल याचे आश्चर्यही वाटते आणि त्यांची खरोखरच कमाल वाटते.

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी मी कुतुबमिनारमधल्या गोल जिन्याच्या पायऱ्या चढत आणि देव आनंद व नूतनची आठवण काढत वरपर्यंत गेलो होतो आणि एकदा टोरोंटोच्या उत्तुंग सीएन टॉवरमध्ये लिफ्टने वर गेलो होतो. पण पिसाच्या मनोऱ्यातही आम्हाला आतल्या जिन्याने वर चढून जायची संधी मिळाली नाही तशीच वॉशिंग्टन मेमोरियलमध्येही मिळाली नाही.  एखाद्या पर्वताच्या शिखरावर किंवा उंच इमारतीवर चढून दूरवर क्षितिजापर्यंत पसरलेला भाग पहाण्यात एक प्रकारचे थ्रिल असते. पूर्वीच्या काळातल्या लोकांना ती संधी क्वचितच मिळत असल्यामुळे त्याचे मोठे अप्रूप असणार.  पण जगातल्या सर्वात उंच पर्वतशिखरांच्याही वरून उडत जात असणाऱ्या विमानांमध्ये बसायची संधी मला कित्येक वेळा मिळाली आहे, शिवाय माझे अर्धे आयुष्य एकोणीसाव्या मजल्यावरच्या घरात गेले आहे आणि सध्याही मी सव्वीसाव्या मजल्यावर रहात आहे. त्यामुळे रोजच असे विहंगम दृष्य पहायची मला सवय झाली आहे.


अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले व्हाइटहाउस एकदा आत जाऊन पहावे असे कुणालाही वाटेल. पण सुरक्षेच्या कारणामुळे पूर्वीच्या भेटीतही आम्हाला त्या इमारतीच्या गेटपर्यंतसुद्धा नेले नव्हते. मधले दोन तीन रस्ते सोडून लांबवर असलेल्या एका रस्त्यावर उभे राहून आम्हाला दुरूनच ती इमारत पहावी लागली होती. आजूबाजूला असलेल्या उंच झाडांमागे तिचा बराचसा भाग झाकलेलाच होता आणि जेवढा दिसत होता तो फारसा आकर्षक वाटला नाही. अर्थात व्हाइटहाउस ही अमेरिकेतली एक सर्वात जुनीपुराणी इमारत आहे आणि बांधायच्या वेळीच ती एकादे चर्च किंवा स्मारक म्हणून बांधलेली नसून माणसांच्या वास्तव्याचा विचार करून बांधली आहे. त्यात सौंदर्याचा जास्त विचार केला नसेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे आजच्या जगातला सर्वाधिक प्रभावशाली राजकारणी पुरुष त्या वास्तूत निवास करतो  आणि खुद्द राष्ट्रपतीचे कार्यालयसुद्धा याच इमारतीच्या परिसरात आहे. या कारणांमुळे तिला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे एवढेच. व्हाइट हाउसपासून दुरूनच जाणाऱ्या ज्या रस्त्यांवरून वाहतुकीला परवानगी होती अशा रस्त्यांवरून हळू हळू जात आम्ही गाडीतच बसूनच त्या वास्तूचे दर्शन घेतले, एका ठिकाणी थांबून आमच्या आठवणींसाठी फोटोही खेचले.


तिथून आम्ही मॉल भागात आलो. कॅपिटॉल बिल्डिंगसमोरील वॉशिंग्टन मेमोरियलच्या दिशेने पसरलेल्या प्रशस्त जागेला नॅशनल मॉल असे नाव दिले आहे. विविध प्रकारची अनेक वस्तुसंग्रहालये आणि इतर महत्वाच्या वास्तू या मॉलवरील हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या केलेल्या आहेत. या मॉलच्याच वॉशिंग्टन स्मारकाच्या पलीकडल्या बाजूला एक लांबलचक रिफ्लेक्टिंग पाँड आहे आणि त्याच्या पलीकडे लिंकन मेमोरियल आहे. अमेरिकेच्या केंद्रीय सरकारचा कारभार कॅपिटॉल बिल्डिंग या इमारतीतून चालवला जातो.  अर्थातच तिथेसुद्धा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते. फक्त तिथे काम करणारे कर्मचारी आणि ज्यांना ऑफिशियल कामासाठी तिथे जाण्याचा परवाना मिळाला आहे असे लोकच तिथे जाऊ शकतात. आमच्याकडे त्या बिल्डिंगच्या जवळपास कोठेही जाण्याचा परवाना नव्हता. गाडीतच बसून जेथपर्यंत जाणे शक्य होते तेथवर जाऊन आम्ही दुरूनच त्या सुंदर इमारतीचे दर्शन घेतले आणि तिच्या आजूबाजूचा रम्य परिसर पाहून घेतला. ही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुंदर आणि भव्य इमारत आहेच, तिचे शिखर वॉशिंग्टन मेमोरियल इतकेच उंच आहे. या दोन इमारतींसारखी तिसरी कोणतीही उंच इमारत या भागात बांधली गेली नाही. या इमारतींचे महत्व राखण्यासाठी तिथे यांच्यापेक्षा भव्य अशी नवी उंच इमारत बांधायला परवानगी मिळत नसेल.

आतापर्यंत पोटातली भूक जागृत व्हायला लागलेली असल्यामुळे नॅशनल मॉलवरच्या एखाद्या चांगल्या क्षुधाशांतिगृहात जाऊन जेवण करावे असे आम्हाला वाटत होते. तिथे तर रस्त्यावरून फिरणाऱ्या असंख्य लोकांची गर्दी होती, त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होत असणार अशी आमची खात्री होती. पण तिथेही कुठेच आमची मोटार उभी करायला जागाच सापडत नव्हती. तिथल्या गजबजलेल्या रस्त्यांवरून इकडून तिकडून चकरा मारत फिरत असतांना आम्ही व्हार्फ भागात आलो. त्या भागाला व्हार्फ म्हणतात हे ही आम्हाला माहीत नव्हते.  माझ्या पूर्वीच्या प्रवासात आम्हाला ही जागा दाखवली नव्हती.  तिथे कुठेतरी एका भूमीगत पार्किंग लॉटचा बोर्ड दिसला आणि आम्हाला हायसे वाटले. मी मोटारीतून उतरून रस्त्याच्या कडेला फुटपाथवर उभा राहिलो आणि मुलगा कार पार्क करायला आत घेऊन गेला. तो पाच मिनिटात बाहेर येईल अशी आम्हा दोघांचीही अपेक्षा होती. सून आणि नाती तिकडचा भाग पाहून एखादे चांगले हॉटेल शोधायला गर्दीतून पुढे चालल्या गेल्या आणि दिसेनाशा झाल्या. 

दहा मिनिटे होऊन गेली, पंधरा मिनिटे झाली, वीस मिनिटेही होऊन गेली तरी मुलगा बाहेर येतच नव्हता. मी आपला एकटाच रस्त्याच्या कडेला सावलीत उभा राहून किंवा एक दोन मिनिटे रस्त्याच्या कडेला एकाद्या बाकड्यावर टेकून इकडे तिकडे बघत वेळ घालवत होतो. त्या वेळेला माझ्याकडे पासपोर्टही नव्हता, खिशात एक डॉलरही नव्हता की क्रेडिट कार्डही नव्हते कारण सतत ग्रुपमध्येच रहायचे असल्यामुळे मला यातल्या कशाची गरज पडेल असे घरातून निघतांना वाटलेच नव्हते. माझा मोबाइल फोन खिशात होता, पण  मी इंटरनॅशनल रोमिंग घेतले नसल्यामुळे त्याचा तिथे काही उपयोग नव्हता. घरी असतांना मी वायफाय वरून जगभर वॉट्सॅप कॉल करू शकत होतो, पण इथे ती सोयही नव्हती. त्यामुळे मला अनोळखी लोकांच्या गर्दीत पण एकटा आणि असुरक्षित वाटायला लागले. मनातून थोडी चुळबुळ होत असली तरी कुणीतरी येऊन मला तिथून घेऊन जाणारच याचीही मनोमन खात्री होतीच. पण मी अधीर होऊन त्या लोकांना शोधण्यासाठी आपली जागा सोडली असती तर मात्र मी तिथल्या गर्दीमध्ये कदाचित हरवून गेलो असतो. म्हणून मी त्या एका जागेवरच थांबून राहिलो. तिथे मी असा का उगाचच एका ठिकाणी थांबलो आहे असे कदाचित पहाणाऱ्या कुणाला वाटलेही असते, पण बहुधा तिथल्या कुणाचेच माझ्याकडे लक्ष नसावे, मला काहीही विचारायला कुणीही जवळ आला नाही. अखेर माझी नात तिथे परत आली आणि मला आपल्यासोबत घेऊन गेली. 

त्या रस्त्याच्या कोपऱ्यावरच असलेल्या ऑयस्टर बार नावाच्या हॉटेलात त्यांना कसेबसे एक टेबल मिळाले होते. तिथेही लोकांची तुडुंब गर्दी होतीच, पण हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला जास्तीच्या टेबलखुर्च्या मांडून त्यांनी सोय केली होती. ऑयस्टर म्हणजे शिंपल्यातला प्राणी किंवा किडा जे काही असते तो जीव. त्यांचेही अनेक प्रकार असतात आणि त्यातल्या एका प्रकारच्या शिंपल्यात मोती तयार होतात. या ऑयस्टर्सना कच्चेच किंवा उकडून, भाजून किंवा तळून तयार करण्यात येणारे पदार्थ हे या हॉटेलचे वैशिष्ट्य होते आणि अशा पंधरावीस पदार्थांची यादी मेनूत दिलेली होती. मला तर ती वाचून त्यातले शब्दही समजत नव्हते. असले काही तरी चमत्कारिक पदार्थ खायच्या विचारानेच मला मळमळायला लागते. पण त्या हॉटेलात चिकन, फिश, प्रॉन्स, फ्राइड राइस  यासारखे ओळखीच्या नावांचे काही पदार्थ मिळत होते ते आम्ही मागवले. आपल्याकडच्या उडुपी हॉटेलांच्यासारखी तत्पर सर्व्हिस तिकडे सहसा नसते. बरेचसे लोक आधी एकादे पेय मागवून ते सावकाशपणे घोट घोट घेत बसलेले असतात. आम्ही सरळ जेवण मागवले असले तरी तिथले नोकर चेंगटपणा करतच होते.  एखादी वेट्रेस हातात ट्रे घेऊन आतून बाहेर आली की आम्हाला वाटायचे ती आपलेच जेवण घेऊन आली आहे, पण ती आम्हाला हुलकावणी देऊन दुसऱ्याच टेबलाकडे जायची.

अखेर एकदाचे आम्ही मागवलेले खाद्यपदार्थ टेबलावर आले आणि आम्ही ते खायला सुरुवात केली तेंव्हा कुठे माझा मुलगा धापा टाकत तिथे येऊन पोचला. त्याला यायला इतका वेळ का लागला याचे त्याने सांगितलेले कारण थक्क करणारे होते.  ज्या ठिकाणी पार्किंग उपलब्ध आहे असे सांगणारा मोठा बोर्ड होता आणि मी उभा राहिलो होतो त्याच्या बाजूलाच एक  डेस्क होता आणि एक लहान बोर्ड होता. त्यानुसार तिथे वॅले पार्किंगची व्यवस्था केलेली होती, पण त्यासाठी साठ सत्तर डॉलर भरायचे होते. आम्हाला जेमतेम अर्धा पाऊण तास थांबून थोडेसे खाऊन पिऊन लगेच पुढे जायचे होते. तेवढ्या वेळासाठी उगाच इतके पैसे कशाला खर्च करायचे आणि आपली गाडी अनोळखी माणसाच्या ताब्यात द्यायची का? अशा विचाराने मुलाने तिकडे दुर्लक्ष करून गाडी स्वतःच चालवत आत नेली. पण आत शिरल्यावर तिथून पुढे जाणारे एक मोठे भुयार होते आणि मैलभर अंतरावर त्या बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला गाड्या पार्क करायची जागा होती. तिथे आपली गाडी लावून तो दुसऱ्या बाजूने बाहेर पडला होता आणि हॉटेल शोधत शोधत आमच्यापर्यंत येऊन पोचला होता. 

जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्रच बाहेर पडलो आणि चालत चालत कार पार्किंगच्या दिशेने निघालो. तो रस्ता वॉशिंग्टन डीसीच्या फेरी व्हार्फचा  मुख्य रस्ता होता. हे शहर पोटोमॅक या अमेरिकेतल्या एका मोठ्या नदीच्या काठी वसवले गेले आहे. तिथून काही मैल पुढे वहात गेल्यावर ही नदी अॅटलांटिक महासागराचा भाग असलेल्या एका आखाताला जाऊन मिळते. या ठिकाणीच त्या नदीचे पात्र चांगले रुंद आहे आणि पुढे ते अधिकाधिक रुंद होत जाते. मासेमारी करण्यासाठी किंवा जलविहार करण्यासाठी इथून जाणाऱ्या येणाऱ्या लहानमोठ्या नौकांसाठी या बंदराचा उपयोग केला जातो. आम्हाला रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला नदीच्या काठाशी उभ्या केलेल्या शेकडो नौका दिसत होत्या आणि बहुधा तितक्याच किंवा जास्तच नावा पाण्यावर सफर करायला गेलेल्या असाव्यात. काही मोठ्या नावा जरा खोल पाण्यात नांगर टाकून उभ्या केलेल्या होत्या.  त्या नावांवर खाणेपिणे, नाचगाणे या सगळ्यांची व्यवस्था करून धमाल पार्ट्या केल्या जातात. आम्ही युरोपदर्शनाला गेलो होतो तेंव्हा वीस दिवसात असे तीन क्रूज अनुभवले होते. त्या भागात आणि त्या नौकांवरसुद्धा सगळीकडे खूप दिवे लावलेले होते आणि रात्री तिथे नक्कीच दिव्यांचा झगमगाट आणि वाद्यांचा गलबलाट होत असणार.

काही लोकांच्या मनात वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन यासारख्या इतिहासकाळातल्या महान लोकांच्याबद्दल खूप आदरभाव असतो, त्यांची स्मारके पहायची उत्सुकता असते, तर काही लोकांना निरनिराळी म्यूजियम्स पहायचा शौक असतो. जगभरातले असे उत्सुक आणि उत्साही लोक वॉशिंग्टन डीसीला येत असतात. पण या गोष्टी एकदा पाहिल्या की ती उत्सुकता कमी होते. त्यापेक्षाही जास्त लोकांना मौजमजा करायची आवड असते आणि ती कितीही वेळा करता येते. अमेरिका ही तर चंगळवादी राहणीमानाची जननी आहे. तिथे मौजमजा करण्यासाठी सगळ्या गावांमध्ये रेस्तराँ, पब्स, क्लब्स, पार्क्स,  रिसॉर्ट्स वगैरे तर असतातच, अनेक ठिकाणी खास प्रकारचे अॅम्यूजमेंट पार्क असतात. अमेरिकेतले लोक जरा मोकळा वेळ मिळाला की कुठे जाऊन कशी मौजमस्ती करायची याचा विचार करत असतात. 

माझ्या पहिल्या अमेरिकावारीत आम्ही ख्रिसमसला फ्लॉरिडामधील समुद्रकिनाऱ्यावरील सेंट ऑगस्टीन नावाच्या गावी गेलो होतो. तिथेही थोडी मौजमस्ती धमाल होती, पण ती एकाद्या खेड्यातल्या जत्रेसारखी होती. तिथे छोट्या छोट्या किरकोळ वस्तू विकणाऱ्या लहान लहान दुकानांची, खाद्यपेयांच्या ढाब्यांची आणि त्यामधून पायी चालत फिरणाऱ्या सर्वसामान्य लोकांची गर्दी होती. माझ्या दुसऱ्या अमेरिकाप्रवासात मी कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजेलिस शहराजवळ असलेल्या सँटा मोनिकाचा समुद्रकिनारा पाहिला होता. तिथेही  जगभरातून जिवाची अमेरिका करायला आलेल्या टूरिस्टांची प्रचंड गर्दी नेहमीच असते. तिथे चांगला लांबलचक आणि सुंदर असा बीच तर आहेच, शिवाय बीचवरच एक मोठा अॅम्यूजमेंट पार्क आहे. तिथे अनेक प्रकारच्या राइड्स आहेत, अनेक प्रकारच्या मनपसंत खाद्यंतीसाठी भरपूर ठिकाणे आहेत. तळलेले चविष्ट खेकडे आणि मासे यांचे पदार्थ ही तिथली स्पेशॅलिटी आहे. शिवाय गाणी गाणारे, वाद्ये वाजवणारे, जादूचे किंवा सर्कससारखे खेळ दाखवणारे, तिथल्या तिथे रेखाचित्र काढून देणारे वगैरे कलाकारही रस्त्याच्या कडेला आपल्या करामती दाखवत असतात. त्यामुळे एक जत्रा भरल्यासारखे मनमौजी वातावरण असते. तशीच किंवा त्याहूनही जास्त गजबज मी सॅनफ्रान्सिस्कोच्या फेरी व्हार्फवर पाहिली होती.  

त्यांच्या तुलनेत लास व्हेगास म्हणजे तर एक मोठा जागतिक कुंभमेळा होता. तिथे सगळ्या खंडांमधले निरनिराळ्या वंशाचे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक निरनिराळ्या चित्रविचित्र पोषाखांमध्ये दिसत होते. त्यात कोणी लालबुंद गोरे, कोणी काळे कुळकुळित, कोणी पीतवर्णीय, कोणी ताडमाड उंच तर कोणी अतीशय बुटके, कोणी गलेलठ्ठ, कोणी काटकुळे, कोणी म्हातारे, कोणी तरुण, कुणाबरोबर लहान लहान मुले अशा सगळ्यांचा त्यात समावेश होता, पण सगळ्यांच्या अंगातून बेदरकार वृत्ती, पुरेपूर उत्साह आणि उत्सुकता ओसंडून वाहतांना दिसत होती. आम्हीसुद्धा कधी दुकाने आणि कधी माणसे यांच्याकडे पहात पहात आणि त्यांच्यावर कॉमेंट्स करत पुढे पुढे जात होतो. काही रस्त्यांवर म्हणजे फुटपाथवर ऐसपैस मोकळी जागा होती. तिथे गाणी म्हणणारे, वाद्ये वाजवणारे, नाच करणारे, जादूचा खेळ करणारे, हसवणारे विदूषक असे नाना प्रकारे मनोरंजन करणारे कलाकार आपापले खेळ दाखवत होते. 

या सगळ्या अनुभवांची आठवण येईल असे वातावरण  वॉशिंग्टन डीसीच्या फेरी व्हार्फ भागात दिसत होते. तरीही आम्ही दुपारच्या वेळी तिथे फिरत होतो त्या वेळी जरा सुस्त वातावरण होते. संध्याकाळी तिथे तुफान गर्दी होईल आणि रात्री दंगा मस्ती धमाल होईल अशी लक्षणे दिसत होती. आपल्या रोजच्या जीवनातल्या रामरगाड्यापासून दूर जाऊन चार घटका निव्वळ मौजमस्ती करण्यासाठी काही लोक आपापल्या कोंदट घरट्याबाहेर पडून  स्वच्छंद, धुंद हवेत तरंगत असतात, पण आम्हाला रात्रीपर्यंत आपल्या घरी परत जायलाच हवे होते. त्यामुळे आता नॅशनल मॉलवरील एकादे म्यूझियम पाहून परत फिरायचे असे आम्ही ठरवले. वॉशिंग्टनमधल्या रस्त्यांवरून फिरत असतांना मला अचानक एका रस्त्याच्या कडेला चक्क स्वातंत्र्यदेवतेचे दर्शन घडले. पूर्वी मी न्यूयॉर्कच्या लिबर्टी स्टॅच्यूच्या परिसरात एक दिवस घालवला होता.  या वेळी तिच्या या प्रतिकृतीसोबत मिनिटभर उभा राहून पटकन एक फोटो काढून घेतला.


माझ्या मागच्या भेटीत मी तिथले एरोस्पेस म्यूझियम पाहिले होते. राइट बंधूंनी उडवलेल्या पहिल्या विमानापासून ते सुपरसॉनिक जेटपर्यंत निरनिराळ्या प्रकारची विमाने आणि निरनिराळी रॉकेट्स, सॅटेलाइट्स वगैरेंची संपूर्ण सचित्र माहिती आणि त्यांची पूर्णाकृति मॉडेल्स यांचेसह एक अत्यंत आकर्षक असे प्रदर्शन या ठिकाणी होते.  मी आतापर्यंत भारतात आणि परदेशांमध्ये जितकी वस्तुसंग्रहालये किंवा प्रदर्शने पाहिली आहेत, त्यात मला हे प्रदर्शन सर्वात जास्त आवडले होते.  पंधरा वर्षांनंतर ते पुन्हा पहायलाही माझी हरकत नव्हती आणि दुसरे एकादे प्रदर्शन पहायलाही मला आवडलेच असते. त्या ठिकाणी याशिवाय नॅचरल हिस्टरी, आफ्रिका, आशिया आणि अमेरिकन (रेड) इंडियन लोकांच्या कलाकृती यासारखी काही म्यूझियम्स आहेत. आम्ही हातातल्या मोबाइलवर त्यांची माहिती वाचत आणि त्या इमारतींना बाहेरून पहात हळूहळू जात होतो, पण कुठल्याही इमारतीच्या आवारात किंवा बाहेरच्या रस्त्यावर मोटार उभी करता येण्याची कणभरही शक्यता नव्हती. मागच्या वेळेस आमची टूरिस्ट बस आम्हाला एका ठिकाणी सोडून दूर निघून जायची आणि ठराविक वेळेनंतर पुन्हा त्याच ठिकाणी येऊन आम्हाला दुसऱ्या स्पॉटकडे घेऊन जायची. या वेळची परिस्थिती वेगळी होती. आमची मोटरगाडी कुठे उभी करून ठेवायची हीच सगळ्यात मोठी अडचण होती. म्यूझियम्सच्या माहितीमध्ये असेही समजले की त्यातली काही म्यूझियम्स साडे चार वाजताच बंद होणार होती. त्यामुळे आम्ही दूर कुठेतरी गाडी पार्क करून तिथे परत येण्यासाठी वेळही नव्हता आणि ते करण्यासाठी  तिथे कशा प्रकारचे पब्लिक ट्रान्स्पोर्ट उपलब्ध असतील हेही माहीत नव्हते.

निराश होऊन  इकडेतिकडे पहात  फिरत असतांना अमेरिकन आर्ट सेंटरजवळ उजव्या दिशेला वळून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक रिकामी जागा दिसली.  ते म्यूझियम संध्याकाळी साडेसातपर्यंत उघडे राहणार होते.  मग तेच पहायचे ठरवले, गाडी तिथे उभी केली आणि काठी टेकत टेकत दहा पंधरा मिनिटे चालत त्या सेंटरमध्ये गेलो. त्या तीन मजली बिल्डिंगच्या प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूंना अनेक हॉल्समध्ये अनेक सुरेख कलाकृती मांडून ठेवल्या होत्या. एकाद्या कलाप्रेमी रसिकाला किंवा कलांच्या विद्यार्थ्याला त्या सगळ्या नीट निरखून पहायला पूर्ण दिवस लागला असता, पण आमच्या ग्रुपमधल्या कुणालाही ते पाहण्यात दीडदोन तासाहून जास्त इंटरेस्ट आणि पेशन्स असेल असे मला वाटत नव्हते. दिवसभर फिरण्यामध्ये बरीच शक्ती खर्च झाली असल्यामुळे माझ्या अंगात तोपर्यंत तेवढेही त्राण उरले नव्हते. आत गेल्यावर मला एक वेटिंग रूमसारखी खोली दिसली, तिथे काही बेंच आणि खुर्च्या ठेवल्या होत्या. मी त्यातल्या एका जागी बसून घेतले आणि बाकीच्या लोकांनी ते प्रदर्शन बघून यावे असा प्रस्ताव मांडला.

दोन मिनिटांमध्येच माझा मुलगा त्या म्यूझियममधलीच एक व्हीलचेअर घेऊन आला आणि मला त्यात बसवून सगळ्यांनी आळीपाळीने ढकलत सर्व मजल्यांवरील बहुतेक सगळ्या खोल्यांमध्ये फिरवून आणले.  या अमेरिकन आर्ट सेंटरमधल्या सगळ्या कलाकृती अमेरिकन कलाकारांच्याच होत्या आणि मला तर त्यातल्या कुणाचीही नावेही माहीत नव्हती. पोर्ट्रेट्स सेक्शनमध्ये अमेरिकेतले पुढारी, शास्त्रज्ञ, नटनट्या, खेळाडू वगैरेंच्या सुरेख तसबिरी होत्या. मला त्यांच्यातले फक्त एडिसन आणि टेसला यांच्यासारखे थोडेच महान लोक माहीत होते. 

प्रत्येक चित्राबरोबर त्या व्यक्तीची माहितीही दिली होती, त्यांनी कुठकुठल्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केली होती ते लिहिले होते. अमेरिकेतल्या रहिवाशांना त्याच्याबद्दल आदरभाव वाटत असेल, पण मला अमेरिकेचा इतिहास किंवा तिथली संस्कृति यात फार रस असण्याचे कारणच नव्हते कारण मी तिथला 'दो दिनका मेहमान' होतो. मी यापूर्वी लॉसएंजेलिसमधले गेट्टी सेंटर म्यूझियम पाहिले होते. तिथे मुख्यतः युरोपमधल्या जुन्या काळातल्या प्रसिद्ध कलाकारांच्या दुर्मिळ कलाकृती पाहिल्या होत्या. त्यांच्या मानाने मला या अमेरिकन आर्टिस्टांच्या कलाकृती तितक्या आकर्षक वाटल्या नाहीत.  तरीही त्या पहात आणि त्यांचे कौतुक करत दीडदोन तास कसे गेले ते समजलेही नाही. तिथून बाहेर पडल्यानंतर मात्र आम्ही सरळ घरचा रस्ता धरला. तोपर्यंत सूर्यास्तही होऊन गेला. त्यामुळे रस्त्यातही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांखेरीज आणखी काही पाहण्यासारखे नव्हतेच.  


No comments: