आज गणेशचतुर्थी आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा मी या गणेशोत्सवाच्या काळात श्रीगणेशाला वंदन करून त्याच्या कोटी कोटी रूपांमधल्या मला समजलेल्या काही रूपांविषयी दोन शब्द लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.नऊ वर्षांपूर्वी मी पुराणातल्या गणपतींबद्दल एक लेख लिहिला होता तो खाली दिला आहे. त्यानंतरच्या काळात मला श्रीगणपतीअथर्वशीर्ष आणि गणेशपुराण याविषयी बरीच माहिती माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांच्याकडून मिळाली. त्याच्या आधारे हा लेख लिहायचे ठरवले आहे. त्यात रोज थोडी भर घालणार आहे.
दर वर्षी गणेशचतुर्थीला आपण हत्तीचे तोंड (गजानन) आणि विशाल पोट (लंबोदर) असलेल्या गणपतीची स्थापना करून त्याचा उत्सव करतो. गणपतीचे हे रूपच जास्त प्रचलित आहे आणि जगभरातल्या असंख्य मंदिरांमध्ये त्याच्या मूर्ती दिसतात. तो शंकरपार्वतींचा धाकटा मुलगा अशी त्याची एक मर्यादित ओळख आहे. पण अथर्वशीर्षाच्या सुरुवातीलाच असे म्हंटले आहे की तूच (या विश्वाचा) एकमेव कर्ता, धर्ता आणि हर्ता आहेस. म्हणजे गणपतीच या जगातले सर्व काही निर्माण करतो, चालवतो आणि नष्ट करतो. पुढील भागात “सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।” असे म्हणून ही गोष्ट अधिक स्पष्ट केली आहे. या वाक्यांचा अर्थ सारे जग तुझ्यातूनच जन्म घेते, तुझ्यामुळेच उभे राहते (चालते) आणि अखेर तुझ्यातच विलीन होते असा होतो. पुढे जाऊन तर त्याला तूच ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नि, वायू, सूर्य, चंद्र आहेस असेही म्हंटले आहे. जगामधील सर्व गोष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण होतात आणि त्यांच्यात विलीन होतात हे आपण पाहतोच. पण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे स्वतः गणपतीच आहे असे “त्वं भूमिरापोऽनलोऽनिलोनभः ।” या वाक्यात म्हंटले आहे. म्हणजे निर्माण करणाराही तूच आहेस आणि तू जे निर्माण केले आहेस तेसुद्धा तूच आहेस. विश्वामध्ये चैतन्याच्या जेवढ्या खुणा आपल्याला दिसतात त्या सर्वांमध्ये गणेश आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या जागी तर तो आहेच, त्याच्याही पलीकडील अज्ञात अशा प्रदेशातसुध्दा तो आहे असे “त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । या ओळींमध्ये म्हंटले आहे. तो सत्व, रज, तमोगुणांच्या पार आहे, तसेच भूत भविष्य वर्तनमानकाळांच्या पलीकडे अनादी अनंत असा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर त्याची व्याप्ती आपल्या कल्पनाशक्तीच्या खूप पलीकडेपर्यंत पसरलेली आहे. परमेश्वराबद्दल असलेल्या सगळ्या कल्पना म्हणजे गणपतीच आहे. गणेशपुराणात तर असे स्पष्टच सांगितले आहे की गणेशाने अनेक अवतार घेतले, शिवपुत्र, पार्वतीनंदन, गजानन, लंबोदर असा आपल्या ओळखीतला गणपती हा त्यातला एक अवतार आहे.
या विश्वातल्या चराचरामधील अणुरेणूमध्ये परमेश्वर भरून राहिला आहे अशी एक सर्वमान्य व्याख्या आजकाल रूढ होत आहे. पण अशा अनादि अनंत आणि निर्गुण निराकार रूपाची पूजा करता येत नाही म्हणून तेवढ्यासाठी निरनिराळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मोहक अशा रूपांच्या मूर्ती केल्या जातात असेही सांगितले जाते. पण पुराणांमधल्या गोष्टींमध्ये त्या त्या देवांचेच महत्व सांगितले जाते. वैष्णव लोक ज्याला सर्वोच्च धार्मिक ग्रंथ मानतात त्या भागवत पुराणानुसार श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णू हाच अनादि असा देव आहे. जेंव्हा काहीही नव्हते तेंव्हाही तो होता आणि त्याच्या इच्छेने त्याने आधी ब्रह्मदेव आणि माया निर्माण केली. त्या मायेमधून पृथ्वी, आप (जल), तेज, वायू आणि आकाश (पोकळी) ही पंचमहाभूते तयार झाली तयार झाली आणि या कच्च्या मालामधून ब्रह्मदेवाने हे सगळे ब्रह्मांड निर्माण केले अशी या विश्वाची उत्पत्ती सांगितली जाते. त्यात गणेशाचा उल्लेख येत नाही. पण गणेशपुराणात या सगळ्या विश्वाची निर्मिती श्रीगणेशानेच केली आहे आणि ब्रह्मा, विष्णू, शिव ही गणेशाची रूपे आहेत असे सांगितले आहे. आपल्या डोळ्यांना दिसते, कानांनी ऐकायला येते, किंबहुना पाच ज्ञानेंद्रियांमधून जेवढे समजते ते सगळे बह्म आहे आणि त्याच्या पलीकडे असलेले जे ज्ञानी लोकांच्या बुद्धीला किंवा मनाला समजते ते आत्मा, परमात्मा वगैरे परब्रह्म असे सांगितले जाते. पण या गोष्टी सामान्य लोकांना समजत नाहीत, फक्त ऋषिमुनी आणि 'ज्ञानी' संत महात्म्यांना त्यांची ओळख पटते असे म्हणतात.
गणेशपुराणाची कथा अशी आहे की व्यासमहर्षींनी अठरा पुराणे आणि महाभारत लिहिल्यानंतरही त्यांचे मन अस्वस्थ होते. आता काय करावे हे विचारण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की हे सगळे मी केले असे समजण्यामुळे तुला अहंकार आला आहे. गणेशाला शरण जाऊन त्याने हे सगळे तुझ्याकडून करवून घेतले असे मान्य कर म्हणजे तुला शांति मिळेल. व्यासांचे मन शांत झाल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना गणेशपुराण सांगितले. त्यात अनेक कथा आहेत.
पहिल्या कथेत असे सांगितले आहे की मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य ब्रह्मदेवाला त्याचे काम करू देत नव्हते आणि मारायला आले म्हणून तो मदतीसाठी भगवान विष्णूकडे गेला, पण हे दैत्य त्या दोघांनाही आवरत नव्हते. मग त्यांनी श्रीगणेशाची प्रार्थना केली. त्यावर प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना एक युक्ती सांगितली. श्रीविष्णूने त्या दैत्यांची खूप स्तुति करून त्यांना खूष केले आणि मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तुम्हाला हवे ते वरदान मागा असे सांगितले. त्या उन्मत्त राक्षसांनी सांगितले की तू काय आम्हाला वर देणार आहेस, आम्हीच तुला वर देऊ, तुला काय पाहिजे ते माग. त्यावर विष्णूने हळूच असा वर मागितला की तुमचा मृत्यू माझ्या हातून होऊ दे. त्या मूर्ख दैत्यांनी तो देऊन टाकला आणि ते विष्णूच्या सुदर्शन चक्राने मारले गेले. भगवान विष्णूने या प्रसंगी सिद्धटेक येथे गणपतीचे मंदिर बांधले असे म्हणतात. दुसऱ्या एका पुराणात असे सांगितले आहे की त्या वेळी आदिशक्तीने विष्णूला मदत केली .
जसे ध्रुव आणि प्रल्हाद हे विष्णूचे परमभक्त होते तसाच बल्लाळ नावाचा एक मुलगा गणेशाचा परमभक्त होता. तो रोज आपल्या मित्रांना घेऊन गावाबाहेर रानात जात असे आणि एका झाडाखाली दगडधोंडे गोळा करून त्यातून गणपतीची पूजा करत असे. त्यांना घरी परतायला उशीर होत असल्यामुळे त्या मित्रांच्या वडिलांनी बल्लाळाच्या बाबांकडे म्हणजे कल्याणाकडे तक्रार केली. कल्याण रागारागात रानात आला, त्याने सगळे दगडधोंडे विस्कटून टाकले, मुलाला झाडाला बांधून चांगला चोप दिला. बल्लाळाने आपल्या बापाला शाप दिला त्यामुळे तो आंधळा, लुळापांगळा होऊन गेला. सगळी मुले घाबरून पळून गेली आणि बल्लाळ रानात एकटाच राहिला होता. त्याने गणपतीचा आर्त मनाने धावा केला. मग गणपती एका ब्राह्मणाच्या रूपाने तिथे आला आणि त्यांना बल्लाळाला सोडवले. त्याने नंतर त्या ठिकाणी बांधलेल्या देवळातल्या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात.
गृत्समद नावाच्या ऋषीला आलेल्या शिंकेमधून एक बालक जन्माला आले. त्या ऋषीने त्या बालकाला गणपतीची आराधना करायला शिकवले. मग त्याने अरण्यात जाऊन खूप वर्षे तपश्चर्या केल्यावर त्याला गणेश प्रसन्न झाला आणि त्याने अनेक वरदान केले. त्याचे मरणे जवळजवळ अशक्यप्राय झाले. त्यामधून तो जवळजवळ अमर झाला. त्याला गणेशाने तीन सुंदर शहरे दिली होती ती सारखी आभाळात फिरत असत. त्यांचा अधिपति म्हणून त्याचे नाव त्रिपुरासुर असे पडले. फारच शक्तीशाली झाल्यामुळे त्याला खूप माज आला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ असे त्रैलोक्य जिंकून घेतले. सगळे देव स्वर्ग सोडून पळून भगवान शंकराकडे कैलासावर गेले आणि यातून सोडवण्याची विनंति करायला लागले, पण तो स्वतच भयभीत होऊन अरण्यात लपून आणि गणेशाचे चिंतन करत बसला. त्यामुळे पार्वती आपल्या माहेरी हिमालयाकडे गेली. मग हिमालयाने तिला विनायकाचे व्रत आणि शोडशोपचार पूजाविधि सांगितला. त्याप्रमाणे तिने भक्तीभावपूर्ण व्रताचे आचरण केल्यानंतर विनायक तिला प्रसन्न झाला आणि त्याने शंकराला सहाय्य करायचे आश्वासन दिले. गणेश या गणिताच्या तज्ञाने शंकराला एक असा मुहूर्त काढून दिला ज्या वेळी त्रिपुरासुराच्या तीन्ही नगरी एका सरळ रेषेत येतील. नेमक्या त्या वेळी शंकराने आपल्या महान शिवधनुष्याला एक दिव्य बाण लावला आणि तो सोडून एका बाणात तीन्ही नगरे जाळून भस्म करून टाकली. त्याबरोबर त्रिपुरासुराचाही अंत झाला. गणपतीने केलेल्या या मदतीसाठी शंकराने रांजणगाव इथे महागणपतीचे देऊळ बांधले.
कृतयुगामध्ये देवांतक आणि नरांतक नावाचे भाऊभाऊ असलेले दोन भयानक राक्षस जन्माला आले. त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून त्याच्याकडून असे वरदान मागून घेतले की त्यांना कुठल्याही शस्त्राने मृत्यू येणार नाही. त्यामुळे ते खूपच बलिष्ठ झाले आणि त्यांनी तीन्ही लोक जिंकून घेतले. त्यांना मारण्यासाठी गणेशाने कश्यप ऋषी आणि त्याची पत्नी अदिति यांचा मुलगा महोत्कट या नावाने अवतार घेतला. सिंह या वाहनावर बसून तो त्या दैत्यांवर चालून गेला. महाप्रचंड आकाराचे रूप घेतले आणि नरांतकाला अंगठ्याखाली चिरडून मारून टाकले. देवांतकाबरोबर झालेल्या झटापटीत देवांतकाने गजाननाचा एक दात तोडला. तेव्हा त्या दातानेच प्रहार करून त्याने देवांतकाला छिन्नभिन्न करून मारून टाकले. त्यानंतर गजाननाला एकदंत हे नाव मिळाले.
त्रेतायुगामध्ये राजा चक्रपाणीच्या राणीला सूर्याच्या कृपेने त्याच्यासारखा तेजस्वी मुलगा झाला, त्याचे लहानपणी त्याला समुद्राने सांभाळले म्हणून त्याचे नाव सिंधू असे पडले. सूर्याने त्याच्या पोटात एक अमृताची कुपी लपवून ठेवली होती. त्यामुळे त्याला कुणीही मारले तरी तो लगेच जीवंत होत होता. त्यानेही तीन्ही लोक जिंकून घेतले आणि आपला राक्षसीपणा सुरू केला. तेंव्हा गणेशाने गजानन अवतार घेतला आणि मोर या वाहनावर बसून सिंधू राक्षसावर हल्ला केला. हातातल्या परशूने आधी त्याच्या पोटातली अमृताची कुपी फोडून टाकली आणि नंतर त्याला ठार मारले. पुण्याजवळ मोरगाव येथे मयूरेश्वर या नावाने त्याचे मंदिर आहे.
द्वापार युगात ब्रह्मदेवाने दिलेल्या जांभईमधून सिंधूर नावाचा लालभडक रंगाचा मुलगा निर्माण झाला, पण तो राक्षसी वृत्तीचा निघाला. तो ज्याला मिठी मारेल त्याला करकचून आवळून मारून टाकेल असे वरदान त्याला मिळाले होते, त्याचा उपयोग करून तोही सर्वांना त्रास द्यायला लागला. इकडे वरेण्य नावाचा राजा आणि त्याची राणी पुष्पावती यांनी गणेशाची आराधना करून त्याला आपला पुत्र होऊ दे असा वर मागितला होता. शंकर आणि पार्वती यांना झालेला वक्रतुंड, गजानन आणि लंबोदर असा विचित्र वाटणारा मुलगा खुद्द विनायकाच्याच सांगण्यावरून त्यांनी नंदीकडून त्या राणीच्या जवळ नेऊन सोडला. तीही त्याला पाहून घाबरली आणि असले 'अपशकुनी' बाळ नको म्हणून तिने त्याला रानात नेऊन सोडले. मग पराशर मुनींनी त्याचा सांभाळ करून त्याला वाढवले. उंदीर होण्याचा शाप मिळालेला एक गंधर्व त्या ऋषीच्या आश्रमात येऊन लुडबुड करत होता. गजाननाचे त्याला वठणीवर आणून आपले वाहन बनवले आणि त्यावर आरूढ होऊन तो सिंधुरासुरावर चालून गेला. त्याने आपला आकार इतका विराट वाढवला की सिंधुरासुर त्याला मिठीच मारू शकत नव्हता. मग गजाननानेच त्याला चिरडून टाकले.
अशा प्रकारच्या अनेक सुरस कथा गणेशपुराणात आहेत. त्या सगळ्या रूपककथा असून त्यात काही गहन अर्थ असावा, पण तो सामान्य लोकांना उलगडणे कठीण आहे.
पुराणातला गणपती
ॐ गणानाम् त्वाम् गणपतीम् हवामहे कवीम् कवीनाम् उपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजो ब्राह्मणाः ब्रह्मणस्पदआनश्रृण्वन्नीतीभीःसीदसादनम्। साधारणपणे असा एक मंत्र गणपतीच्या आरतीनंतर (मंत्रपुष्पात) म्हणतात. ऋग्वेदामधील या मंत्रात गणपतीची आराधना केली आहे. गणपतीअथर्वशीर्ष हे एक उपनिषद मानले जाते. अनेक पुराणांमध्ये गणपतीसंबंधीची आख्याने आहेत तसेच त्याची स्तोत्रे आहेत. मत्स्य, वायु, भागवत, विष्णू, गरुड, ब्रह्म, नारद, वामन, कुर्म, पद्म, स्कंद, मार्कंडय, शिव, अग्नी, वराह, ब्रम्हांड. ब्रह्मावैवस्वत आणि भविष्य ही अठरा मुख्य पुराणे मानली जातात. त्यामधील मत्स्यपुराण, स्कन्दपुराण, शिवपुराण, वराहपुराण, वामनपुराण, पद्मपुराण या प्रमुख पुराणग्रंथांमध्ये तसेच बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, ब्रह्मांड पुराण, देवीपुराण या गौण पुराणांत आणि महाभारतात गणेशाचे उल्लेख आहेत, शिवाय एक स्वतंत्र गणेश पुराणसुध्दा आहे.
शिवपुराण, स्कंदपुराण, बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, पद्मपुराण, लिंगपुराण, वराहपुराण, देवीपुराण, मत्स्यपुराण आणि वामनपुराण या पुराणांमध्ये गणेशजन्माची निरनिराळी आख्याने आहेत. त्यातील बहुतेक कथांमध्ये साधारणपणे एकच गोष्ट आहे. त्यानुसार पार्वतीने शंकराच्या अनुपस्थितीत गणपतीची निर्मिती केली, शंकराला ते ठाऊक नव्हते. तो परत आल्यावर गणपतीने त्याला अडवले. त्यामुळे क्रोधित होऊन शंकराने त्या (उध्दट वाटणाऱ्या) मुलाचे शिर उडवले, ते पाहून पार्वतीने हाहाःकार केला. त्यानंतर शंकराने त्याच्या शरीराला हत्तीचे मुख जोडून जीवंत केले आणि त्याला आपल्या गणांचा प्रमुख बनवले. प्रत्येक पुराणांमधील साधारणपणे अशा अर्थाच्या कथात त्यातील तपशीलात थोडा थोडा फरक फरक आहे. काही पुराणांमध्ये मात्र निराळ्याच गोष्टी आहेत. एकामध्ये गणपतीला जन्मतः मस्तक नव्हते म्हणून त्याला हत्तीचे तोंड लावून दिले अशी कथा आहे, आणखी एकात शंकर आणि पार्वती या दोघांच्या संयोगातून गणपतीचा जन्म झाला आणि एका कथेत तर एकट्या शंकरानेच गणपतीची उत्पत्ती केली असे आहे. ब्रह्मवैवर्त पुराण आणि शिवपुराणात गणपतीच्यासंबंधीच्या इतर काही कथा आहेत. यातली कोणतीच पुराणे मी वाचलेली नाहीत आणि संस्कृतमध्ये असल्यामुळे मला ती वाचून समजणारही नाहीत. वरील माहिती मी विकीपीडियावरून घेतली आहे.
महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली तेंव्हा त्यांच्या लेखनिकाचे काम गणपतीने केले असे मी लहानपणीच ऐकले होते. महर्षी व्यासांनी एक एक ओळ किंवा श्लोक सांगायचा आणि गणपतीने ते तत्परतेने लिहून घ्यायचे असे त्यांचे आपसात ठरले. पण हे प्रचंड खंडकाव्य रचता रचता सांगतांना व्यासांनी मध्येच कुठेही थांबायचे नाही अशी अट गणेशाने घातली होती. व्यासमहर्षी थांबले आणि गणेशांनी लेखणी खाली ठेवली की आपले काम तिथेच थांबवून ते लगेच अंतर्धान होणार होते. पण हजारो श्लोक रचून ते सांगतांना व्यासमहर्षींनी कोठेही पळभर विश्रांती घेतली नाही किेवा ते अडखळले नाहीत आणि गणपती ते श्लोक लिहीत राहिले. अशा रीतीने संपूर्ण महाभारताचे एकटाकी लेखन झाले. अशी आख्यायिका आहे. (पण महाभारत हा ग्रंथ निरनिराळ्या काळात होऊन गेलेल्या आणि व्यास हे टोपणनाव धारण केलेल्या अनेक विद्वानांच्या लेखनातून निर्माण झाला असावा असे काही इतिहाससंशोधकांचे सांगणे आहे. शिवाय त्या काळात कुठल्या कागदावर किंवा भूर्जपत्रांवर हे लेखन कसल्या शाईने लिहिले जात होते आणि त्यांचा अखंड पुरवठा कुठून होत होता? अशासारखे प्रश्न पुराणांच्या बाबतीत विचारायचे नसतात.)
नारदमुनींनी रचलेले संकट नाशन गणेश स्तोत्र नारद पुराणात आहे. श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र, योगशांतिप्रद स्तोत्र, सिद्धिविनायक स्तोत्र, परब्रह्म रूप कर स्तोत्र आणि श्रीगणेश गीतासार स्तोत्र ही स्तोत्रे मुद्गल पुराणात आहेत. ढुंढि स्वरूप वर्णन नावाचे स्तोत्र गणेश पुराणात आहे. ही स्तोत्रेसुध्दा माझ्या आप्तांकडून मला मिळाली. संकटनाशन स्तोत्र आणि द्वादशनामस्तोत्रांमध्ये गणेशाची बारा नावे देऊन ती नावे रोज वाचली किंवा ऐकली तर सर्व विघ्ने दूर होतील आणि मनातल्या इच्छांची पूर्ती होईल असे आश्वासन दिले आहे. या दोन श्लोकात दिलेल्या प्रत्येकी बारा नावांमधील साम्यस्थळे आणि त्यांच्यामधील फरकांबद्दल मी आधी एका लेखात लिहिले आहे. योगशांतिप्रद स्तोत्रात आधी इतर देवांनी गणेशाचे वर्णन आणि स्तुती केली आहे आणि अखेरच्या श्लोकात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन हे स्तोत्र वाचणाऱ्या सर्वांना वरदान दिले आहे, श्री सिद्धिविनायक स्तोत्रात विघ्नविनाशक विनायकाची प्रार्थना केली आहे. परब्रह्म रूप गणेशस्तोत्रातील श्लोकांच्या पहिल्या तीन चरणांमध्ये गणेशाच्या विराट विश्वरूपाचे वर्णन करून चौथ्या ओळीत परब्रह्म रूपं गणेशं भजेम असे म्हंटले आहे. हे वाचतांना जगद्गुरू शंकराचार्यांच्या चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ची आठवण येते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती हे सर्वांना माहीत आहे. गणेशगीतासार स्तोत्रात प्रत्यक्ष शंकर भगवानांनी गणेशाकडे उपदेश मागितला आणि गणपतीने त्यांना गीतेचा सारांश सांगितला अशा संवादात्मक पध्दतीने हे स्तोत्र लिहिलेले आहे. मूळ गीतेप्रमाणेच यातदेखील बरेच ब्रह्मज्ञान आहे. गणेशपुराणामधील ढुंढिरूपवर्णन स्तोत्रात गण, गज, ऋध्दी, सिध्दी वगैरे शब्दांचे आध्यात्मिक अर्थ देऊन गणपतीचे एक आध्यात्मिक दर्शन घडवले आहे.
पुराणामध्ये अशा त-हेने गणपती या देवतेचे विविध अंगांनी दर्शन घडवले आहे. त्यात सुरस कथा आहेत, गजाननाचे रूप आणि त्याने केलेला साजश्रुंगार, ल्यायलेले दागदागिने वगैरेंची रसभरीत वर्णने आहेत आणि अगम्य असे अध्यात्मही आहे.
No comments:
Post a Comment