Wednesday, March 24, 2021

शरीर, मन, आत्मा ... आणि आरोग्य

 मानवी शरीरामधील सगळ्या इंद्रियांची रचना आणि त्यांचे कार्य यांचा खूप सखोल अभ्यास आधुनिक वैद्यकशास्त्रात केला गेला आहे आणि त्यात रोज नवनवी भर पडतच आहे. त्याच्या आधाराने निरनिराळ्या आजारांचे निदान आणि त्यावरील उपचार यामध्येही खूप प्रगति झाली आहे आणि होत आहे. पण त्याने माणूस पूर्ण निरोगी झाला का किंवा त्याचे सगळे विकार नेहमी पूर्ण बरे होतात का? तर तसे अजून तरी झालेले नाहीच, पण तशी शक्यताही दृष्टीपथात नाही.   

कारण माणूस या जगात शरीराने वावरत असतो आणि ओळखला जात असतो, पण तो म्हणजे फक्त त्याचे शरीर असे नाही. शरीराचे बाह्य रूप डोळ्यांना दिसते आणि आता तर सूक्ष्मदर्शकयंत्र, क्ष किरण, अल्ट्रासाउंड आदींच्या सहाय्याने आतली काही इंद्रिये आणि त्यांच्या रचनाही पाहता येतात. या दृष्य शरीराचेच अध्ययन करता येते आणि ते केले जात आहे. पण जीवंत माणसाच्या शरीराबरोबरच त्याचे मन, बुद्धी, अहंकार, चित्त वगैरे अदृष्य गोष्टीही त्याचाच भाग असतात आणि त्या सर्वांच्या आत किंवा पलीकडे त्याचा आत्मा, जीव, प्राण असे काहीतरी असते ते आपल्या डोळ्यांना दिसू  शकत नाही.  त्यातल्या मनाचे काम साधारणपणे कसे चालते यावर मानसशास्त्रात अभ्यास केला जातो आणि मनोविकारतज्ज्ञ त्यावर काही उपचारही करतात, पण  ते लोक त्या माणसाच्या बाह्य वागण्यावरूनच हे काम करू शकतात. दुसऱ्या माणसाच्या मनात नेमके काय चालले आहे हे शब्दांमध्ये समजून घेऊन रेकॉर्ड करून ठेवण्याची सोय अजून तरी उपलब्ध झालेली नाही.  

मनामधील भावना, विचार वगैरेंचा शरीरावरसुद्धा परिणाम होतो हे तर आपल्याला काही प्रमाणात दिसतेच. भीतीमुळे शरीराचा थरकाप होतो, अंगाला घाम फुटतो, चिंतेमुळे किंवा अँक्सायटीमुळे झोप लागत नाही हे आपल्याला जाणवते, त्यामुळे रक्तदाब वाढतो, आम्लपित्त वाढते वगैरे गोष्टी डॉक्टरलोकही सांगतात. मनाला अचानक मोठा धक्का बसल्यास शरीरावर अनवस्था ओढवू शकते. जास्त खोलात गेल्यास अमक्या कारणाने तमक्या ग्रंथींमधून होणारा स्राव वाढतो वगैरे सांगितले जाते. अर्थातच याचाही अभ्यास केला गेला आहे. पण असे नेमके का होते, कुणाला होते, कधी होते हे मात्र ठामपणे सांगता येत नाही. कदाचित ते तसे ठराविकपणे होत नसेलही. 

वैद्यकशास्त्रातील औषधांवरील संशोधनांमध्ये प्लसीबो इफेक्टचाही अभ्यास केला जातो. यात काही लोकांना खरीखुरी औषधे देतात आणि काही लोकांना न सांगता तशाच दिसणाऱ्या पण बिनाऔषधी गोळ्या देतात. यात असे दिसून आले आहे की त्यातलेही कित्येक रुग्ण आपण औषध घेतले आहे या समजुतीनेच बरे होतात. खरे पाहता माणसांच्या शरीरातच त्याला झालेल्या व्याधीतून त्याला मुक्त करण्याची काही यंत्रणा असते आणि मुख्यतः तीच त्याला बरे करत असते. बाह्य उपचार त्या यंत्रणेला फक्त मदत करत असतात. म्हणूनच रोग्याला धीर देऊन त्याचे मनोबल वाढवणे या गोष्टीलाही खूप महत्व दिले जाते.     

जगाच्या पाठीवर जिथे जिथे मानवांची वस्ती आहे तिथल्या सगळीकडच्या लोकांनी स्थानिक वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचे औषधी उपयोग शोधून काढलेले आहेत. हे बहुतेक वेळा अनुभवावरून काढलेले ठोकताळेही असतील, पण त्यावर लोकांचा विश्वास असतो आणि सर्वसामान्य रोगी त्यातून बरे होतात. तुळशीची किंवा पुदिन्याची पाने, कुठल्या झाडांची फळे, त्यांच्या बिया, कुठली कंदमुळे, काही झाडांच्या साली यापासून ते सांबराचे शिंग आणि गोमूत्रापर्यंत अशी अनेक उदाहरणे आपल्या परिचयाची आहेत. धणे, जिरे, मिरे, दालचिनी, ओवा, बडीशोप, लसूण, आले यासारख्या रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये असलेले औषधी गुण आपल्या आरोग्याला मदत करतातच. भारतातले आयुर्वेद हे पुरातन शास्त्र बरेच विकसित झाले होते आणि त्याचा उपयोग करून उपचार करणारे निष्णात वैद्य आजही काही ठिकाणी आहेत. ते लोक निरनिराळी चूर्णे, आसवे, भस्मे, लेप वगैरेंच्या सहाय्याने उपचार करतात. या शास्त्रामध्ये आहारातील पथ्यपाण्यावर अधिक जोर दिला जातो. त्याचप्रमाणे आचारविचार यांचाही विचार केला जातो असे सांगतात.

आजच्या मेडिकल सायन्समध्ये  research techniques यांना फार महत्व आहे. यातून पारंपारिक पद्धतीला चालना मिळू शकते वा नवे दालनही उघडू शकते. आपल्याकडे याचा फार प्रचार झाला आहे हे मात्र दिसत नाही. मध्यंतरी एका “पृथ्वी” conference मध्ये केरळच्या रिसर्च लॅब चा पेपर होता. त्यात आयुर्वेदातील औषधामधील गुणकारक radicle वा molecule चा अभ्यास होता. ह्याचे फार महत्व आहे. कुठलेही पूर्ण झाड गुणकारी नसते तर त्यातील मऊळ, खोड, पाने, फुले, फळे यासारख्या भागांमध्ये काही अल्कोलिड्स असतात. त्याचे प्रमाण कमी ज्यास्त होत असते, ऋतु प्रमाणे, झाडाच्या वयाप्रमाणे त्यात बदल होत असतो. सामान्य लोकांना जरी याची जाणीव नसली तरी अनुभवी वैद्यांना ते ठाऊक असते आणि काही प्रमाणात त्याची सूत्रबद्धता झाली आहे. शास्त्रीय संशोधनामधून ती अधिक व्हायला हवी.

माझ्या एका मित्राने सांगितले की "मी एका ट्रेक मध्ये तिबेटीयन मेडिकल कॉलेज मध्ये दोन दिवस काढले. कॉलेज गुरुकुल पद्धतीने चालू होते व आठ विद्यार्थी होते. १०००० फूट उंचीवर एका मठामध्ये चाले. आठ वर्षाचा अभ्यास क्रम होता. विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगी होती व एक ब्रिटिश डॉक्टर चार महीने अभ्यासाला आला होता. मी पण त्यांच्या बरोबर औषधी वनस्पति गोळा करायला जंगलात गेलो. तेव्हाच जरी वनस्पति औषधी  उपलब्ध असली तरी ती या ऋतुत गोळा करायची नाही हे नियम समजले. पारंपारिक प्रणालीने बरीच मजल मारली आहे हे निश्चित. पण ह्या पुढील मार्गक्रम आधुनिक पद्धतीने झाला पाहिजे."

भारताप्रमाणे चीनमध्येही एक अतीप्राचीन संस्कृती आहे आणि त्यांची एक औषधप्रणाली आहे, तसेच अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर यासारख्या पर्यायी उपचारपद्धति आहेत. मी एक उदाहरण वाचले. तू यूयू या नावाच्या महिलेने प्राचीन चीनी औषधांचा अभ्यास करून मलेरिया वरील औषध तयार केले. तो व्हिएतनाम मधील अमेरिकन युद्धाचा काल होता. व्हिएतनाम ला चीनचा पाठिंबा होता. तेथील जंगलातला मलेरिया Chloroquine ला जुमानत नसे. अनेक सैनिक त्याची शिकार होत. वारंवार येणारा ताप यावर शेकड्याने प्रचलित चीनी औषधे होती. यूयूने त्यांचा अभ्यास केला. त्यातून एक radicle शोधला जो मलेरिया वरील औषधाचे काम करत होता. त्याचे वृद्धी करण (concentration) करण्याची पद्धत बसविली. ह्या पूर्वी केलेल्या कामा साठी तिला काही वर्षा पूर्वी नोबेल पदक मिळाले.     

अनेक संतमहंतांनी अमक्यातमक्या रोग्याला फक्त दर्शन, आशीर्वाद, अंगारा किंवा तीर्थप्रसाद देऊन संपूर्ण रोगमुक्त केले अशा कथा त्यांच्या चरित्रांमध्ये हमखास असतात. त्या माणसाच्या पापांच्या राशी जळून गेल्यामुळे त्याची असाध्य असा व्याधींमधून मुक्ती झाली असे त्या कथांचे तात्पर्य सांगितले जाते. कदाचित यात त्या माणसाला नकळत मिळालेल्या मानसिक उपचाराचा भाग असू शकेल. आजकाल 'ऑरा' हा एक शब्द ऐकायला मिळतो. सगळ्या सर्वसामान्य माणसांना एक एनर्जीबॉडी असते म्हणे. अद्वितीय लोकांच्या सभोवती एक प्रकारचे अदृष्य असे प्रखर आणि सकारात्मक तेजोवलय असते आणि त्यामधून पसरणाऱ्या ऊर्जेमुळे आजूबाजूच्या लोकांच्या ऊर्जाशरीरातले विकार किंवा असमतोल नष्ट होतात असे काहीसे स्पष्टीकरण देऊन यासाठी संतमहंतांच्या सान्निध्यात जाणे कसे आवश्यक आहे हे सांगितले जाते.  आमच्या लहानपणी माझी आई, आत्या वगैरे जुन्या पिढीमधली मंडळी घरातले कुणी आजारी पडले तर काही नवस बोलत असत आणि त्या देवतेच्या प्रभावामुळे त्या मुलाला आराम पडला अशी त्यांची श्रद्धाही असायची.  

"आधुनिक विज्ञान जिथे संपते तिथे आपल्या प्राचीन काळातल्या ऋषीमुनींचे ज्ञान सुरू होते."  हे वाक्य मी अनेक भल्यामाणसांच्या तोंडून ऐकले आहे. यात त्यांचा पूर्वजांवरील गाढ विश्वास असेल, त्यांचा भाबडेपणाही असेल, किंवा विज्ञानाविषयीचे अज्ञानही असेल, पण त्यांना मनापासून तसे खरेच वाटते हे मी पाहिले आहे. शरीर, मन, आत्मा वगैरेंचा एकमेकांशी कशा प्रकारचा संबंध असतो आणि याला किती प्रकारचे पदर किंवा कोष आहेत वगैरे या प्राचीन ग्रंथांमध्ये विस्ताराने लिहिलेले आहे असे सांगितले जाते. मी स्वतः हे समजून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही कारण ते मला कितपत समजेल किंवा पटेल याचीच मला शंका आहे. पण ते न शिकताच त्यात काही तथ्यच नाही असेही मी म्हणू शकत नाही. पतंजलिमुनींनी सांगितलेल्या अष्टांग योगामधील यम, नियम वगैरे पाळून दीर्घायुषी झालेल्या आणि वृद्धावस्थेतही ठणठणीत तब्येत राखून असलेल्या लोकांची उदाहरणे मी पाहिली आहेत.

हे तसे पाहता कुणाला कदाचित अशास्त्रीय वाटत असले तरी त्यावर मोकळ्या मनाने संशोधन केले जाणे आवश्यक आहे असे मत अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका विदुषीने अलीकडे वेबिनारवर दिलेल्या एका व्याख्यानात सांगितले. ती स्वतः एक कुशल डॉक्टर आहे आणि तिने या विषयातले अनेक उच्चशिक्षणाचे अभ्यासक्रम अमेरिकेत राहून पूर्ण केले आहेत. त्याचप्रमाणे तिने जगभरातल्या निरनिराळ्या संस्कृतींमधले तत्वज्ञान आणि उपचारपद्धती यांचाही तौलनिक अभ्यास केला आहे. चर्चशी जोडलेल्या हॉस्पिटल्समधले धर्मगुरू तिथल्या रुग्णांचे समुपदेशन (काउन्सलिंग) करतात, पूर्व आशियामध्ये काही बौद्ध धर्मगुरूही ते करतात अशी माहिती तिच्याकडे आहे. त्या समुपदेशाचा त्या रुग्णांच्या रोगमुक्त होण्यात किती वाटा आहे हे पहायला पाहिजे असे मत तिने व्यक्त केले. 

शरीर, मन, आत्मा, प्राण, जीव वगैरे गोष्टी नक्कीच एकमेकांशी जुळलेल्या किंवा एकमेकांमध्ये मिसळलेल्या असाव्यात. हा गुंता सोडवणे कठीण आहे. पाश्चात्य औषधोपचार पद्धतीचा मोठ्या प्रमाणात विकास आणि प्रसार झाला आहे आणि त्याचा मानवाला फायदाच झाला आहे हेही खरे आहे, पण भारतीय, चिनी, तिबेटी, युनानी, होमिओपाथी अशा प्रकारच्या आणखी काही पद्धतींमध्ये यावर वेगळ्या प्रकारे विचार केला गेला आहे. या सर्वांचाही शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि ते कसलाही पूर्वग्रह न बाळगता केले गेले पाहिजेत असे मला वाटते. आता हे शिवधनुष्य कोण आणि कधी उचलणार ? 

. . . . .. 

या लेखातील काही विचार मी श्री.रवींद्र आपटे आणि डॉ.सुनंदाताई आपटे यांच्याकडू घेतले आहेत. त्यांचे मनःपूर्वक आभार.

No comments: