शेतकरी लोक जमीनीच्या मशागतीवर घाम गाळून खूप काबाडकष्ट करतात. ते शेते नांगरतात, त्या नांगरलेल्या शेतात बीबियाणे पेरतात, ती पाखरांनी खाऊ नयेत म्हणून त्यांच्यार माती पसरवतात, उगवलेल्या रोपांना वेळोवेळी खत पाणी देतात, त्यात उगवलेले अगांतुक तण उपटून काढून टाकतात, उभ्या राहिलेल्या पिकांची राखण करतात, त्या पिकात दाणे भरून ते तयार झाले की कापणी, मळणी वगैरे करून ते धान्य घरी आणतात तेंव्हा त्यांनी केलेल्या अपार कष्टांचे फळ त्यांच्या हातात पडते. त्याचा त्यांना परम आनंद होतो आणि तो उत्साहाने साजरा करण्यासाठी ते मोठा जल्लोष करतात. हे जवळपास जगभर चालत असते. निरनिराळ्या देशांमधले हवामान वेगवेगळे असल्यामुळे सगळ्यांचे सुगीचे हंगाम आणि त्या निमित्याने साजरे होत असलेले सण एकाच वेळी येत नाहीत. भारतातसुद्धा त्यात विविधता आहे. दक्षिण भारतात पोंगल, ओणम, वायव्य भारतात बैसाखी तर ईशान्य भारतात बिहूसारखे सण सामूहिक रीत्या साजरे केले जातात. महाराष्ट्रातल्या दसरा किंवा संक्रांतीला नवी पिके हाती येण्यात असतात.
शेतकऱ्यांनी कितीही मेहनत घेतली असली तरी ती फलद्रुप होण्यासाठी पावसाने वेळेवर आणि हवे तेवढेच पडणे अत्यंत गरजेचे असते. अवर्षण पडले तर पिके उगवणारच नाहीत, कमी पाऊस झाला तर त्यांची वाढ समाधानकारक होत नाही आणि अतीवृष्टी झाली तर हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झालेले पहावे लागते. यामुळे देवाची किंवा दैवाची साथ मिळणेही आवश्यक असते याची जाणीव शेतकऱ्यांना असते. म्हणूनच अशा सणांमध्ये निरनिराळ्या देवतांच्या आराधनेचाही भाग असतोच.
मदर इंडिया या सिनेमातल्या "दुखभरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे, रंग जीवन में नया लायो रे" या गाण्यात शेतकऱ्यांच्या जीवनातली मेहनत आणि त्यांचा उल्हास या सगळ्या गोष्टी अचूक टिपल्या आहेत. हार्वेस्ट फेस्टिव्हल किंवा सुगीचा सण म्हंटल्यावर माझ्या डोळ्यासमोर हेच गाणे उभे राहते. आपला भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे जवळ जवळ संपूर्ण गावाचे जीवनच सर्वस्वी शेतांमधल्या पीकपाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे सगळी ग्रामीण जनता या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होत असते. मुंबईपुण्यासारख्या शहरांचे मात्र आता खेड्यांशी जवळचे संबंध राहिले नसल्याने तिथले उत्सव आजकाल शेतीशी तितकेसे जोडलेले नसतात.
पश्चिमेकडील देशांमध्ये आता सगळी यांत्रिक शेती झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रमाणच अल्प झाले आहे. जे थोडे आहेत तेही विखुरले गेले असल्यामुळे ते एकत्र येऊन कसले सामूहिक सण साजरे करणार? पण एका काळी अमेरिकेतले ग्रामीण लोक त्यांच्या सुगीच्या दिवसांत 'थँक्सगिव्हिंग डे' साजरा करत असत. ‘देवाने आपल्याला जे विपुल धान्य दिले, आपण दुष्काळावर मात केली, त्याबद्दल सर्वानी देवाचे आभार मानू’ या भावनेने हा सण दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला होता. आता ही भावना शिल्लक राहिली नसली तरी या निमित्याने सगळ्यांनी चार दिवस धमालमस्ती करायची हे मात्र आम जनतेच्या मनात चांगले रुजले आहे. खरे तर प्रत्येक माणसाच्या मनात आनंद दाखवायची एक प्रकारची ऊर्मी असते आणि तिला व्यक्त करण्याची वाट मिळायला कुठले तरी निमित्य लागते किंवा पुरते. मग तो धार्मिक उत्सव असो, सामाजिक उत्सव असो किंवा एकादा लग्नसमारंभ असो. याच सुमाराला अमेरिकेच्या काही भागात हॅलोविनचा सण साजरा होत असतो. काही लोक त्या सुमाराला हार्वेस्ट फेस्टिव्हल साजरा करतात.
मी सध्या कॅलिफोर्नियामधल्या टॉरेन्स नावाच्या ज्या गावी आलो आहे तिथल्या एका शाळेच्या पटांगणात तीन दिवसांचा हार्वेस्ट फेस्टिव्हल आयोजित केला होता. त्याची जाहिरात आधीपासून झाली होती. फेस्टिव्हल म्हणजे ते या वेळी नक्की काय करणार आहेत याचे मलाही कुतूहल होते. तो फेस्टिव्हल सुरू होण्याच्या आदले दिवशी मी पाहिले की अचानक त्या ठिकाणी अनेक मोठमोठे ट्रेलर ट्रक येऊन उभे राहिले आणि त्यांनी पहाता पाहता तिथे जायंट व्हीलसारखी काही भली मोठी यंत्रे आणून उभी केली. यापूर्वी मी अशी यंत्रे एस्सेल वर्ल्डसारख्या अॅम्यूजमेंट पार्कमध्ये पाहिली होती, पण जत्रेतले पाळणे, झोपाळे वगैरे उभारावेत तितक्या सहजपणे त्यांनी ती सगळी अवजड यंत्रे त्या शाळेच्या आवारात उभी केली. बाजूला अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खेळण्याची दुकाने वगैरे थाटली गेली. ठरल्याप्रमाणे तो उरूस सुरू झाला आणि तीन दिवस चालला. त्यात सामील होणाऱ्यांमध्ये मुलांची तर गर्दी होतीच, त्यांच्या जोडीला पालक मंडळीही मोठ्या संख्येने आलेली दिसत होती. सगळ्या राईड्स व्यवस्थित चालत होत्या आणि त्यांची मजा घेण्यासाठी लोक रांगा लावत होते. एकंदरीत या जत्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. एक स्टेज उभे करून त्यावर थोडे नाचगाण्यांचे कार्यक्रम, काही लिलाव, लॉटरीच्या सोडती वगैरे करून त्यात अधिक रंगत आणली होती.
फेस्टिव्हल संपल्यावर दुसरे दिवशी पाहिले तर तिथे काही घडून गेल्याचा मागमूसही शिल्लक नव्हता. तिथून सगळी यंत्रे तर हलवली होतीच, पण त्यांना आधी उभी करण्यासाठी कुठेही जमीन खोदलेली नव्हती. त्या शाळेच्या सिमेंट काँक्रीटने मढवलेल्या पार्किंग लॉटमध्ये ती फक्त उभी केली होती आणि त्यांच्या खडखडाटाने तिथल्या जमीनीला काही धक्का बसला नव्हता हे पाहून मला थोडे आश्चर्य आणि त्यांच्या इंजिनियरिंगचे कौतुक वाटले. त्या पार्किंग लॉटचे डिझाईनच एकाद्या हॅलीपॅड किंवा रॉकेट लाँचिंग पॅडसारखे मजबूत केलेले असावे. फूड स्टॉल्स आणि काही लहान खेळांचे तंबू लॉनमध्ये उभे केले होते. त्यासाठी काही खुंट्या ठोकाव्या लागल्या असतीलही, पण ती सगळी जागा साफसूफ करून खड्डे बुजवून त्यावर नवे गवत लावून ते पहिल्यासारखे केलेले दिसत होते.
No comments:
Post a Comment