दीडशे वर्षांपूर्वी कोकणातल्या देवरुख या गावात एक सज्जन सद्गृहस्थ रहात होते, त्यांचे नाव होते बाळकृष्ण केशव जोशी. त्यांना एकंदर अकरा अपत्ये झाली त्यात गोदा आणि कृष्णा नावाच्या दोन मुली होत्या. ही दोन्ही महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या दोन मुख्य नद्यांची नावे आहेत. या नद्या सह्याद्री पर्वतातल्या लहानशा झऱ्यांमधून उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात तेंव्हा त्यांचा प्रचंड विस्तार झालेला असतो. त्याचप्रमाणे कोकणातल्या लहानशा गावातल्या सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या दोन मुलींनी पुढे जाऊन आपल्या कर्तृत्वाने मोठी कीर्ती मिळवली. या मुलींचे आईवडील जुन्या परंपरांच्या वातावरणात वाढलेले होते आणि साधी राहणी, करारीपणा, काटकपणा, दीर्घायुष्य इत्यादी त्यांचे गुण आनुवंशिकतेने त्या मुलींनाही प्राप्त झाले होते. त्या दोघींना आयुष्यात मिळालेल्या संधींचा उपयोग करून घेऊन त्यांनी बरेच भरीव काम करून दाखवले.
गोदा फक्त आठ वर्षाची असतांना म्हणजे लग्न म्हणजे काय हेच माहीत नसण्याच्या वयात त्या काळातल्या रुढीनुसार तिचे लग्न झाले आणि त्यानंतर तीनच महिन्यात वैधव्य म्हणजे काय याची काहीच कल्पनाही नसतांना ती विधवा झाली. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात दुर्दैवी विधवांची परिस्थिती फारच वाईट असायची. त्यांचे मुंडन करून त्यांना विद्रूप केले जायचे, त्यांनी कपाळाला कुंकू लावायचे नाही आणि हातात बांगड्या भरायच्या नाहीतच, अंगावर कुठलाही अलंकार घालायचा नाही, चांगले कपडे घालणे तर दूरच, सदासर्वदा एकच एक बिना काठापदराचे जाडेभरडे आणि लालभडक लुगडे नेसायचे, गादीवर झोपायचे नाही, गोडधोड किंवा मसालेदार रुचकर पदार्थ खायचे नाहीत वगैरे वगैरे अनेक प्रकारांनी त्यांचे जिणे दुष्कर केले जायचे. मात्र त्यांनी घरातली सगळी कामे मात्र न कुरकुरता केली पाहिजेतच असा दंडक असायचा. त्या बाईने किंवा मुलीने मागच्या जन्मात काही फार मोठे पाप केले असणार म्हणून तिला या जन्मी वैधव्य प्राप्त झाले असे म्हणून तिच्या नवऱ्याच्या मृत्यूसाठी सुद्धा तिलाच जबाबदार धरले जात असे आणि या जन्मात हालअपेष्टांच्या यातना सहन करूनच तिच्या पापाची निष्कृती होणार आहे असे तिला सांगितले जात असे.
अजाण गोदाला या त्रासामधून निदान काही काळासाठी दूर ठेवावे म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला माहेरीच ठेऊन घेतले होते, पण ती अकरा वर्षांची झाली तेंव्हा तिच्या सासूने खूप आग्रह केला आणि तिला चांगल्या प्रकारे सांभाळायचे आश्वासन दिले तेंव्हा त्यांनी तिला सासरी पाठवले. यामुळे गरीब आईवडिलांच्या घरातले एक खाणारे तोंड तरी कमी होईल म्हणून गोदाही सासरी जायला तयार झाली. तिची सासू खरोखरच खूप प्रेमळ होती. तिने गोदाचा कसलाही छळ केला नाही, तिचे केसही राहू दिले, पण त्या काळातल्या समाजाला हे मान्य नव्हते. एकाद्या विधवेने सामान्य स्त्रीसारखे जगावे हेच त्यांना खपत नव्हते. त्यामुळे त्यांनी गोदाला एक प्रकारे वाळीत टाकले. आपल्या मुलीसुनांवर तिची सावली पडली तरी तिच्यामुळे त्या बिघडतील अशी भीती घातली जात होती. तिला कसल्याही प्रकारच्या समारंभात किंवा पूजेमध्येही घेतले जात नव्हते की तिच्याशी कुणी नीटपणे बोलायला तयार होत नव्हते. गोदाने दहा वर्षे हे दडपण सहन केले, पण तिला आधार देणाऱ्या तिच्या सासूची तब्येतही ढासळायला लागली तेंव्हा एकवीसाव्या वर्षी गोदाही नाइलाजाने केशवपन करून घ्यायला तयार झाली. तरीही लहान गावातल्या विधवेचे जिणे हे कठीण होतेच.
गोदा एकदा माहेरी आलेली असतांना तिच्या मुंबईत स्थाईक झालेल्या भावाने तिला आपल्याबरोबर मुंबईला चलायला सांगितले आणि ती सासरी परत न जाता परस्पर मुंबईला गेली. तिच्या भावाच्या शेजारीच धोंडो केशव कर्वे आपल्या पत्नीसह रहात होते. तिथे त्यांचा चांगला परिचय झाला. कर्व्यांच्या पत्नीला गोदा स्वयंपाकातही मदत करायला लागली. खेड्याच्या मानाने शहरात कमी त्रास होत असला तरी तिथल्या लोकांची कुजबूज चाललेली असायचीच. अशिक्षित गोदाला शालेय शिक्षण मिळावे म्हणून तिच्या भावाने तिला शारदासदन या संस्थेत घातले. पंडिता रमाबाईंनी चालवलेल्या त्या संस्थेतच तिची रहाण्याचीही सोय करून दिली आणि आपल्या मुलीला सांभाळण्याचे काम तिला दिले. पुढे शारदासदन संस्थेनेच आपला मुक्काम पुण्याला हलवला आणि गोदा पुण्याला गेली.
दरम्यानच्या काळात कर्वे यांना पुण्याला फर्ग्यूसन कॉलेजमध्ये नोकरी मिळाली म्हणून तेही पुण्याला गेले. तिथे त्यांच्या पहिल्या पत्नीचे अकाली निधन झाले. कधी दुसरे लग्न केले तर ते कोणा बालविधवेशीच करायचे असे त्यांनी ठरवले होते. समाजाचा कडवा विरोध न जुमानता त्यांच्याशी गोदाचा पुनर्विवाह झाला आणि तिचे नाव आनंदीबाई ठेवले गेले. 'बाया' या टोपणनावानेही त्या ओळखल्या जात असत. त्या काळामध्ये विधवेने थोडीशी मौजमजा करणेसुद्धा पाप समजले जात होते, बायाने चक्क दुसरे लग्न करणे हे तर अक्षम्य पाप होते. हे नवे दांपत्य कर्व्यांच्या कोकणातल्या मुरुड इथल्या घरी गेले तेंव्हा तर त्यांना घराचा उंबरठासुद्धा ओलांडू दिला गेला नाही. पुण्यातल्या त्यांच्या घराच्या शेजारपाजारचे लोकही त्यांच्याशी कुठलेही सहकार्य करत नव्हतेच, उलट ते त्यांचा अनेक प्रकारांनी छळच करत होते. कर्व्यांच्या समाजकार्यासाठी पुण्यातल्या एका सज्जनांनी त्यांना शहरापासून दूर हिंगण्याला जागा दिली तेंव्हा ते जोडपे तिथे झोपडी बांधून रहायला गेले.
धोंडो केशव कर्वे यांनी तर आपले सर्व जीवनच समाजकार्याला वाहून घेतले होते. त्यांचे महान कार्य पाहून त्यांना पुढे जाऊन महर्षी ही उपाधी मिळाली. त्यांना हिंदू समाजातल्या निराधार विधवांची दयनीय परिस्थिती बघवत नव्हती. अशा पीडित महिलांना आश्रय देण्यासाठी त्यांनी हिंगण्याला एक आश्रम सुरू केला. स्त्रियांना सक्षम करण्यासाठी त्यांना शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे हे ओळखून कर्व्यांनी फक्त मुली आणि महिला यांच्यासाठी वेगळ्या शिक्षणसंस्था सुरू केल्या. त्यांचा व्याप वाढत वाढत गेला आणि त्यातून एसएनडीटी हे खास महिलांचे वेगळे विद्यापीठ उभे राहिले. महर्षी कर्वे यांच्या महान सामाजिक कार्याविषयी मी शाळेत असतांनापासून वाचत आणि ऐकत आलो होतो, पण त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल मला विशेष माहिती नव्हती. महान लोकांनाही एक कुटुंब असते याचा मी कधी विचारच केला नव्हता.
चाळीस वर्षांपूर्वी मी 'हिमालयाची सावली' हे त्यांच्या जीवनावर आधारलेले नाटक पाहिले तेंव्हा मला त्याची थोडी कल्पना आली. आपल्या महान नवऱ्याच्या कामावर खूप श्रद्धा ठेवणारी, पण वेळीप्रसंगी त्यालाही दोन चार सडेतोड शब्द सुनावण्याचे धैर्य दाखवणारी, अपरिमित कष्ट करून आपले कुटुंब समर्थपणे सांभाळणारी अशी एक तेजस्वी स्त्री अशी तिची प्रतिमा या नाटकात दाखवली आहे. महर्षी कर्वे या हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तीची सावली म्हणजे आनंदीबाईसुद्धा तशीच थोर होती. कर्व्यांना प्राध्यापक म्हणून जेवढा पगार मिळत असे त्यांतून कुटुंबासाठी अगदी न्यूनतम अत्यावश्यक तेवढाच खर्च करून उरलेले पै न पै ते आपल्या समाजकार्याला देत असतच. त्याचप्रमाणे दिवसभरातला सगळा वेळही ते त्याच कामात मग्न असत. घरात देण्यासाठी त्यांच्याकडे ना वेळ होता ना पैसा होता. आनंदीबाईंनी हे सतीचे अवघड वाण सुखाने पत्करले आणि अपार काबाडकष्ट करून ते चांगले सांभाळले. त्यासाठी त्यांनी सुईण होण्याचे प्रशिक्षण घेतले आणि ते काम करून जास्तीचे चार पैसे मिळवले. तसेच काही मुलांना घरात आश्रय देऊन त्यांच्या खाण्यापिण्यासाठी स्वयंपाक केला त्यातून थोडीफार कमाई केली. अशा प्रकारे त्यांनी स्वतः नाना प्रकारचे कष्ट करून कसेबसे आपल्या मुलांच्या तोंडात सुखाचे दोन घास भरवण्याचे सर्व प्रयत्न केले.
लग्नाच्या वेळी कर्व्यांची कृश मूर्ती आणि त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहून पंडिता रमाबाईंना गोदाच्या भविष्याची काळजी वाटली. तिला पुन्हा एकदा आधाराची गरज पडली तर निदान किमान आर्थिक आधार मिळावा म्हणून त्यांनी कर्व्यांना विमा उतरायला लावला होता. पुढे ते शंभरावर वर्षे जगले, पण जेंव्हा विम्याची मुदत संपली तेंव्हा त्याची एक चांगली घसघशीत रक्कम त्यांच्या हातात आली होती. तिचा उपयोग आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणावर करावा असे आनंदीबाईंना वाटत होते, पण कर्व्यांनी मात्र तसे करू दिले नाही. "मला काही झाले असते तर तुला आधार मिळावा म्हणून मी विमा काढला होता, पण तुझी काळजी घ्यायला मी तर अजून जीवंत आहे." असे म्हणत त्यांनी ते सगळे पैसे आपल्या शिक्षण संस्थेला दिले. आनंदीबाईंनीसुद्धा संस्थेसाठी वर्गणी जमा करण्यासाठी धडपड केली. त्या काही काळ त्यांच्या मुलाकडे आफ्रिकेत रहायला गेल्या असतांना तिथल्या लोकांकडूनसुद्धा मदत घेऊन त्यांनी संस्थेसाठी फंड गोळा केला.
आनंदीबाईंना समाजकार्यातही जास्त प्रमाणात प्रत्यक्ष सहभाग घ्यायची इच्छा होती, पण कर्व्यांनी असे पाहिले की महिलांना शिक्षण देण्याला असलेला समाजाचा विरोध हळूहळू कमी होत होता, पण विधवांच्या विवाहाला मात्र सर्वांचा जास्तच प्रखर विरोध होता. त्याची खूप झळ त्यांना स्वतःला लागत होतीच. गावातले लोक पुनर्विवाह केलेल्या आनंदीबाईंशी फटकूनच वागत होते. आनंदीबाईंचा स्वभावही थोडा फटकळ वाटण्याइतका निर्भीड होता. त्या काळात आनंदीबाईंनी शाळेच्या कामात जास्त सहभाग घेतला तर कदाचित 'विधवाविवाहाचा प्रचार' असा त्याचा वेगळा अर्थ घेतला जाईल आणि शाळेत येणाऱ्या मुलींच्या संख्येवर तसेच समाजाकडून संस्थेला मिळणाऱ्या सहाय्यावर त्याचा परिणाम होईल. असा विचार करून त्यांनी आपले सर्व लक्ष स्त्रीशिक्षणावर केंद्रित केले आणि विधवाविवाह हा विषय फक्त घरापुरता मर्यादित ठेवला. शिवाय कर्वे स्वतः घरात उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी आनंदीबाईंनी घराकडे जास्त लक्ष पुरवणेही आवश्यक होतेच.
कर्वे यांना शिक्षणसंस्थेच्या कामात मदत करायला दुसरी एक विधवा महिला पुढे आली ती म्हणजे पार्वतीबाई आठवले. गोदाची लहान बहीण असलेल्या कृष्णाचे लग्न त्या काळातल्या रीतीनुसार वेळेवर होऊ शकले नाही त्यामुळे ती अकरा वर्षांची घोडनवरी झाली होती. तेंव्हा एका आश्रित आणि जरा अपंगत्व असलेल्या मुलाबरोबर तिचे लग्न लावून दिले गेले आणि ती 'कृष्णा जोशी'ची 'पार्वतीबाई आठवले' झाली. तिने दहा वर्षे संसारही केला, पण त्यानंतर तिचा नवरा वारला आणि ती विधवा झाली. तिच्या सासरची कोणी माणसेच नसल्यामुळे ती आपल्या मुलाला घेऊन माहेरी देवरुखला परत आली. गोदासारख्या बालविधवेचे लग्नसुद्धा त्या काळातल्या लोकांना अजीबात मान्य नसले तरी ते एक वेळ निदान क्षम्य तरी मानले गेले, पण मूल असलेल्या विधवेचे लग्न होणे सर्वथा अशक्य होते. त्यासाठी कुणी इच्छुक नवराही मिळाला नसताच. त्यामुळे त्या वेळी कुणीही तसा विचारही मनात आणू शकला नाही.
मोठ्या बहिणीला मदत करण्यासाठी किंवा तिची मदत घेण्यासाठी पार्वतीबाई पुण्याला कर्वे कुटुंबाकडे रहायला आल्या. तिथे आल्यानंतर वयाच्या २६व्या वर्षी त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली, पण त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाला पंख मिळाले आणि त्यांनी समाजकार्यात गरुडभरारी घेतली. त्यांनी कर्व्यांच्या स्त्रीशिक्षण संस्थेचे काम करायला आणि ते वाढवायला धडाडीने सुरुवात केली. त्यासाठी सतत वीस वर्षे पुण्यातच नव्हे तर अख्ख्या देशभरात ठिकठिकाणचे दौरे काढून अनेक सभांमध्ये भाषणे व व्याख्याने दिली आणि त्या महान सामाजिक काऱ्याबद्दल जनजागृती निर्माण केली, त्यासाठी निधी जमवून दिला. केवळ निष्कांचन स्थितीत त्या स्वावलंबनाच्या बळावर तीन वर्षे अमेरिकेत जाऊन तिथल्या निरनिराळ्या शहरांमध्ये राहिल्या आणि त्यांनी तिथूनही आपल्या संस्थेसाठी अनेकांची मदत मिळवली. या गोष्टीवरून त्यांचा धाडसी स्वभाव व कोणत्याही संकटांना न डगमगता तोंड देण्याची तयारी हे गुण दिसून येतात. कोकणातल्या लहान गावात जन्माला आलेली आणि साधे मराठी भाषेचेसुद्धा प्राथमिक शिक्षण धडपणे न मिळालेली एक अडाणी बाई धडाडीने इंग्रजीत बोलून परदेशांमध्ये जाऊन कार्य करते अशी गोष्टही शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडली असेल यावर विश्वासही बसत नाही, पण तसे घडले होते ते तिच्यातला आत्मविश्वास, करारी वृत्ती आणि कर्तबगारी यामुळे!
पार्वतीबाईंच्या वागण्यात त्यांनी हाती घेतलेल्या कामाबद्दल तीव्र कळकळ दिसून येत असे व त्यासाठी त्या जिवापाड मेहनत घेत असत त्यामुळे त्यांना मदत करण्याची तयारी जुन्या विचारांच्या लोकांनीही दाखवली. कोणतीही गोष्ट आपल्या मनाला पटली म्हणजे लोकनिंदेला न जुमानता ती गोष्ट व्यवहारात आणण्यासाठी बराच आत्मविश्वास अंगात असावा लागतो आणि त्याला शीलाची व दृढनिश्चयाची जोड मिळाली तर तो परिणामकारक होऊ शकतो हे पार्वतीबाईंच्या उदाहरणावरून प्रत्ययाला येण्यासारखे आहे. जुन्यातील चांगले कायम ठेऊन नव्यातील गुणांची जोड त्यांना देणे हे अतिकठीण काम ज्यांनी साध्य केले अशा व्यक्तींत पार्वतीबाईंची गणना केली पाहिजे. त्यांना जुन्या परंपरेचा जसा अभिमान होता तशी त्यांना त्यांचेमधील दोषांची जाणीवही होती आणि ते नजरेस आणून देण्याचे काम त्या आपल्या व्याख्यानांमधून करीत असत. नव्याजुन्याच्या गोड मिलाफामुळे त्यांचे वजन दोन्ही पंथांच्या लोकांवर पडले आणि वर्गणी जमवण्याचे कठीण काम त्यांच्याकडून चांगल्या रीतीने झाले. त्या जेथे जात तेथे दुसऱ्यांचे मन आपल्याकडे ओढून घेत आणि ज्या स्त्रियांची सुधारणा करायची आहे त्यांच्यात मिळून मिसळून वागून आपुलकी उत्पन्न करीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पार्वतीबाईंच्या आत्मचरित्राला लिहिलेल्या प्रस्तावनेत वरील अर्थाचे मुद्दे लिहिले आहेत.
दीडशे वर्षांपूर्वीच्या काळातल्या विधवांची परिस्थिती दारुण होती. धर्मविस्तारासाठी भारतात आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांच्यासाठी धर्मांतराचा एक पर्याय ठेवला, पण धर्मांतर म्हणजे आपले कुटुंब, नातेवाईक आणि समाज या सर्वांचा त्याग करून परक्यांच्या समूहात जाण्यासारखे होते. पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेल्या शारदा सदनसारख्या संस्थांमध्ये शिक्षणासोबत ख्रिस्ती धर्माची शिकवणही दिली जात होती. त्यासाठी त्यांना इंग्लंडअमेरिकेतून आर्थिक सहाय्य मिळत असले तरी आपल्या लेकीसुनांना त्या संस्थांमध्ये पाठवायला महाराष्ट्रातले पालक धजत नसत. आनंदीबाईंनी मात्र काही वर्षे त्या संस्थेत राहूनही धर्मांतर केले नाही, पण तरीही ख्रिश्चनांच्यातल्या रिवाजाप्रमाणे पुनर्विवाह केला. त्यामुळे सनातनी विचाराच्या लोकांनी त्यांना धर्मभ्रष्टच ठरवले. आनंदीबाईंनी आपल्या वागण्यातून विधवांपुढे आणखी एक पर्याय ठेवला होताच, शिवाय डॉ.आनंदीबाई जोशी व डॉ.रखमाबाई राऊत यांच्याप्रमाणे रुग्णांची सेवा करण्याचा मार्गही दाखवला होता. पार्वतीबाईंनी स्वतः शिक्षण घेऊन, मुलींना शिकवून आणि शिक्षणसंस्था चालवून दुसरा एक मोठा आणि चांगला पर्याय दाखवून दिला. स्त्रीशिक्षणाचा प्रसार करण्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणेच पार्वतीबाईंचाही मोठा वाटा आहे. आनंदीबाई कर्वे आणि पार्वतीबाई आठवले या दोघींनीही आत्मचरित्रे लिहिली आणि त्यात आपले बरेवाईटअनुभव सांगितले त्याचप्रमाणे आपले विचारही मांडले. त्यांच्या या आत्मचरित्रांमधून अनेक महिलांना प्रेरणा मिळाली असेल, त्यांचे मार्गदर्शन झाले असेल. त्यानंतर पुढल्या पिढ्यांमधल्या लक्षावधी महिलांनी रुग्णांची सेवा आणि मुलांचे शिक्षण यांच्याकडे वळून कालावधीने ही दोन्ही क्षेत्रे काबीज केली. त्यातही अनेक विधवांनी या मार्गाने स्वतःचा उद्धार करून घेऊन आपले आयुष्य मार्गी लावले. त्यातल्या काहींना मी जवळून पाहिले आहे.
मी सात आठ वर्षांपूर्वी कर्वेनगरमधल्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षणसंस्थेला भेट दिली होती तेंव्हा त्या परिसरातले स्मारकस्थळ पाहिले होते. तिथे महर्षी कर्व्यांच्या समाधीच्या शेजारीच आनंदीबाई आणि पार्वतीबाई यांचीसुद्धा स्मारके दिसली. तेंव्हापासून माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला होता, पण मला त्यांची फारशी माहिती नव्हती. ती मिळवून मी आज आपला आदरभाव या लेखात व्यक्त करू शकलो. त्या दोघींच्या स्मृतीला माझा सादर साष्टांग प्रणाम.