Sunday, September 29, 2019

देवीची गाणी

आजपासून देवीचे नवरात्र सुरू होत आहे. या वर्षी मी या दिवसात अमेरिकेत आलो आहे. त्यामुळे मुंबईपुण्यामधील शारदीय नवरात्रातली गंमत मला अनुभवायला मिळणार नाही. आता बसल्याबसल्या आंतरजालावरून मिळणारी देवीची गीते संकलित करून या भागात देण्याचा विचार आहे. आज संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या एका जोगव्यापासून सुरवात करीत आहे. पुढे यात आणखी गाणी जोडत जाईन.
या जोगव्यामध्ये सगळे आध्यात्म भरले आहे.  संत एकनाथांनी यात जोगवा मागतांना साधे गहू, तांदूळ ज्वारी वगैरे धान्य मागितलेले नाही. उलट मीच आता काय काय करेन याची मोठी यादी दिली आहे. यात राग, लोभ. दंभ यासारखे आपले दुर्गुण सोडून देऊन बोध, भक्ती, सद्भाव वगैरे अंगी बाणवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देवी भवानीने असा आशीर्वाद द्यावा याचा जोगवा मागितला आहे.


🙏🏻 जोगवा🙏🏻

अनादी निर्गुण प्रगटली भवानी|
मोह महिषासुर मर्दना लागोनी|
त्रिविध तापांची करावया झाडणी|
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं!!१!!

*आईचा जोगवा जोगवा मागेन*
द्वैत सारुनी माळ मी घालीन|
हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
भेद रहित वारीसी जाईन!!२!!

नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा |
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा|
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा |
दंभ सासऱ्या सांडिन कुपात्रा!!३!!

पूर्ण बोधाची घेईन परडी|
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी|
मनोविकार करीन कुर्वंडी|
अमृत रसाची भरीन दुरडी!!४!!

आतां साजणी झाले मी निःसंग|
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग|
काम क्रोध हे झोडियेले मांग|
केला मोकळा मारग सुरंग!!५!!

ऐसा जोगवा मागुनी ठेविला|
जाउनि नवस महाद्वारी फेडिला|
एकपणे जनार्दनीं देखियेला|
जन्ममरणाचा फेरा चुकविला!!६!!
https://www.youtube.com/watch?v=9ueexWz4DBE

-------------
आज घटस्थापनेप्रीत्यर्थ आई अंबाबाईच्या चरणी लक्ष प्रणाम . एक गोंधळ देत आहे.

आई उदे ग अंबे उदे, उदे
आई उदे ग अंबाबाई !
उदे उदे ग अंबाबाई । गुणगान लेकरू गायी ।।
आई उदे ग अंबाबाई ।।
तुळजापूरची तुकाई आई ..... गोंधळा ये।
कोल्हापूरची लक्षुमी आई ..... गोंधळा ये।
मातापूरची रेणुका आई ..... गोंधळा ये।
आंबेजोगाई जोगेश्वरी ..... गोंधळा ये।
गुणगान लेकरू गायी।
आई उदे ग अंबाबाई ।।
आईची मूर्ति स्वयंभुवरि शोभली, सिंव्हावरी साजरी।
सिंव्हावरी साजरी, हिऱ्यांचा किरिट घातला शिरी।
चंडमुंड महिशासूर आईनं धरून रगडला पायी।
आई उदे ग अंबे उदे, उदे।
गुणगान लेकरू गायी ।आई उदे ग अंबाबाई ।।
आला नवरात्राचा महिना, आळवावा आईचा महिमा।
आळवावा आईचा महिमा, त्याला काय सांगावी उपमा ?
अहो येळ साधुनी खेळ मांडिला आशिर्वाद दे आई।
आई उदे ग अंबाबाई।
गुणगान लेकरू गायी।
आई उदे ग अंबाबाई ।।
शिवछत्रपतींची शिवाई..... गोंधळा ये।
शाहुराजश्रींची अंबाई..... गोंधळा ये।
विदर्भनिवासिनी चंडी आई..... गोंधळा ये।
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई..... गोंधळा ये।
गुणगान लेकरू गायी।आई उदे ग अंबाबाई ।।
https://www.youtube.com/watch?v=-wL1vwccckA

--------------------------


आली आई भवानी स्वप्नात
श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ती, जशी वीज चमके गगनात
जशी वीज चमके गगनात, आली आई भवानी स्वप्नात
आली आई भवानी स्वप्नात

सरळ भांग नीज भुजंग वेणी, काजळ ल्याली नयनात
रत्नजडीत हार कासे पितांबर
कंचुकी हिरवी अंगात
आली आई भवानी स्वप्नात

केशर कस्तुरी मिश्रीत तांबुल लाल रंगला वदनात
कंकण कनकाची खणखणती
वाजती पैंजण पायात
आली आई भवानी स्वप्नात

विष्णुदास म्हणे, कशी निरंतर हि आवडे
दे आवडी मज भजनात
आली आई भवानी सपनात
श्रीवरदा सुप्रसन मूर्ती, जशी वीज चमके गगनात
जशी वीज चमके गगनात, आली आई भवानी स्वप्नात
आली आई भवानी स्वप्नात

गीतकार - संत विष्णुदास महाराज
गायिका - उषा मंगेशकर. संगीत - यशवंत देव
https://www.youtube.com/watch?v=TOjtai-Fk7Y

------------------------------------

माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली ।
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय ॥१॥

हाकेसरशी घाई घाई वेगे धावतची पायी ।
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥

खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने ॥३॥

गीतकार - संत विष्णुदास महाराज
गायिका - उषा मंगेशकर. संगीत - यशवंत देव
https://www.youtube.com/watch?v=0wbWJCsaVcc

--------------------------

मायभवानी, तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई

तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई

तू अमला अविनाशी किर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई

तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही

गीत - सुधीर मोघे, संगीत - मीना खडीकर
स्वर - लता मंगेशकर, चित्रपट - शाब्बास सूनबाई
https://www.youtube.com/watch?v=ScM3e9p0DJc

----------------------------

आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई

उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई

साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी देते
तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारीते
उग्रचंडी रूपा आड झरा वात्सल्याचा गाई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई

क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर- त्याचे नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी राहिले मंदिर- उभे राहिले मंदिर
नाना देवके भोवती देवी मधोमध राही

आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई

तुळजापूरीची भवानी जणू मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तीने पचविले पोटी
स्वत: तरली भक्तांना सई तारुनिया नेई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई

गीत - सुधीर मोघे, संगीत सुधीर फडके
स्वर - आशा भोसले, चित्रपट - थोरली जाऊ
https://www.youtube.com/watch?v=mp9C2NjouBs
------------------------

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला

आज आम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये

अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं

गायक - अजय गोगावले,   संगीत - अजय अतुल
चित्रपट - सावरखेड एक गांव

https://www.youtube.com/watch?v=jFs9X458mpI

--------------------------------------------

मी शरण तुला जय अंबे माँ
अंबे माँ, जगदंबे माँ
चरणी तुझ्या सुखशांती मिळे
पाप वासना दूर पळे
तू दुर्गा तू काली माँ
तू लक्ष्मी, संतोषी माँ
महिषासुर मर्दिनी देवी पार्वती माँ
तुझ्या कृपेचे नवलाई
वाल्याचा वाल्मिकी होई
शक्तीदेवी तू महान
दूर करी अमुचे अज्ञान
मायभवानी भक्तांना तू दे वरदान
त्यागामधुनी पुण्य मिळे
सत्कर्मांची गोड फळे
एकवीरा, तू सत्यवती
तूच शारदा, सरस्वती
आदिमाते दे आम्हाला शुद्धमती

गायिका - आशा भोसले, चित्रपट - देवता
https://www.youtube.com/watch?v=TxBtdSBf7EQ

-------------------------

जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी

वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली
उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी

गीत - शांता शेळके, संगीत - श्रीधर फडके
गायिका - आशा भोसले

https://www.youtube.com/watch?v=VD6XwYmNNG4

------------------------



Monday, September 16, 2019

वीज शास्त्रज्ञ ऑर्स्टेड, अँपियर आणि ओह्म



व्होल्टाच्या पाइलला वीजनिर्मितीमध्ये मिळालेल्या यशानंतर एकाद्या लहान मुलाला एक नवे खेळणे मिळावे तसे त्या काळातल्या शास्त्रज्ञांना संशोधन करण्यासाठी एक नवे अद्भुत साधन उपलब्ध झाले. युरोपमधील इतर संशोधकांनीसुद्धा आपले लक्ष तिकडे वळवले आणि निरनिराळी रसायने आणि धातू यांचेवर प्रयोग करून रासायनिक क्रियांमधून वीज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांना त्यात यश मिळाल्यानंतर त्यातून तयार होणाऱ्या विजेचे गुणधर्म आणि तिचा संभाव्य उपयोग यांचा कसून अभ्यास सुरू केला. त्यामधून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन्ही शाखांमधील संशोधनाला चालना मिळाली. सर हम्फ्री डेव्ही याने या विजेच्या सहाय्याने रसायनांचे पृथःकरण करून काही मूलद्रव्ये प्रथमच त्यांच्या शुद्ध स्वरूपात तयार केली ही रसायनशास्त्रातली मोठी झेप होती, त्याचप्रमाणे विजेच्या प्रवाहामधून ऊष्णता आणि प्रकाश निर्माण होऊ शकतात हे भौतिकशास्त्रातले महत्वाचे टप्पेही त्याने प्रयोगातून दाखवून दिले. ऑर्स्टेड, अँपियर आणि ओह्म या शास्त्रज्ञांनी मुख्यतः विजेच्या गुणधर्मांवर संशोधन करून त्या शास्त्रातील मूलभूत नियमांचे शोध लावले.

हॅन्स ख्रिश्चन ऑर्स्टेड या डॅनिश शास्त्रज्ञाचा जन्म सन १७७७ मध्ये एका लहान गावात झाला. हुषार हॅन्स शिक्षणासाठी कोपनहेगनला गेला आणि त्याने डॉक्टरेटपर्यत शिक्षण घेतले. व्होल्टाच्या संशोधनाने त्याला विजेच्या अभ्यासाकडे आकर्षित केले. तीन वर्षांची शिष्यवृत्ती घेऊन तो युरोपमध्ये गेला आणि त्याने फ्रान्स, जर्मनी आदि निरनिराळ्या देशांमध्ये फिरून तिथल्या प्रयोगशाळांमध्ये काम केले. विज्ञानातले पुष्कळ बहुमोल ज्ञान आणि अनुभव यांचे संपादन करून तो मायदेशी परत गेला.

डेन्मार्कमध्ये परतल्यानंतर त्याला कोपनहेगन विद्यापीठात प्राध्यापकाची जागा मिळाली. तिथे त्याने आपले विजेवरील संशोधन सुरू ठेवले. पाइल किंवा बॅटरीला जोडलेल्या सर्किटमध्ये विजेचा प्रवाह सुरू किंवा बंद केला जात असतांना त्याच वेळी टेबलावर ठेवलेल्या होकायंत्राची सुई आपोआप हलत असतांना त्याला दिसली. या दोन संपूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या आणि कुठेही एकमेकींशी न जोडलेल्या गोष्टींमध्ये काही तरी अदृष्य असा परस्पर संबंध असणार असे चाणाक्ष ओर्स्टेडच्या लक्षात आले. त्याने या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून अनेक प्रयोग केले आणि तारेमधून जाणाऱ्या विजेच्या प्रवाहामुळे तिच्या आजूबाजूला एक चुंबकीय क्षेत्र तयार होते असे सन १८२० मध्ये सिद्ध केले.

आकाशामधील वीज आणि जमीनीवरील स्थिर विद्युत एकच आहेत हे बेंजामिन फ्रँकलिन याने त्यापूर्वीच दाखवले होते. ओर्स्टेडच्या संशोधनामुळे पृथ्वीमधील चुंबकत्वाचा विजेशी संबंध असल्याचे सिद्ध झाले. अशा प्रकारे आकाशाशी धरणीमातेचे आणखी एक नाते जुळले गेले.

ओर्स्टेडचा समकालीन फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे मारी अँपियर याचा जन्म सन १७७५ मध्ये एका सधन फ्रेंच कुटुंबात झाला आणि त्याचे पालनपोषण आणि शिक्षण व्यवस्थित चालले होते, पण फ्रेंच राज्यक्रांतीच्या धामधुमीत त्याच्या वडिलांचा बळी गेला. तशा परिस्थितीतून मार्ग काढत आंद्रेने शिक्षण घेतले. तो पॅरिसला स्थाइक झाला आणि त्याने तिथल्या विद्यापीठात अध्यापन व संशोधन केले. त्याने ओर्स्टेडच्या सिद्धांतावर अधिक संशोधन करून त्याला सैद्धांतिक आधार दिला. एकाच वेळी दोन समांतर ठेवलेल्या तारांमधून विजेचा प्रवाह सोडला तर त्या एकमेकांना आकर्षित करतात किंवा दूर सारतात आणि हे त्या विजेच्या प्रवाहाच्या दिशेवर अवलंबून असते असे त्याने सप्रयोग दाखवून दिले. अँपियरने त्याच्या संशोधनामधील निरीक्षणांचे विश्लेषण करून त्यातून 'अँपियरचा नियम' नावाचा सिद्धांत मांडला. "वीज वाहून नेणाऱ्या दोन तारांमधील चुंबकीय आकर्षण किंवा अपकर्षण त्या तारांची लांबी आणि विजेचा प्रवाह यांच्या समप्रमाणात असते." वीज आणि चुंबकत्व या दोन तत्वांना जोडणारे बरेच शास्त्रीय तत्वज्ञानही अँपियरने आपल्या पुस्तकात विशद केले. त्यांना जोडणाऱ्या शास्त्राला अँपियरने Electrodynamic Phenomena असे नाव दिले होते. पुढे जाऊन त्या शास्त्राचे नाव विद्युतचुंबकत्व (Electromagnetism) असे रूढ झाले.

जॉर्ज ओह्म या जर्मन शास्त्रज्ञाचा जन्म सन १७८९ मध्ये झाला. त्याच्या वडिलांनीच त्याला गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन पुढील शिक्षणासाठी स्विट्झर्लँडला पाठवले. ते घेऊन झाल्यानंतर त्याने जर्मनीला परत जाऊन अध्यापन आणि संशोधनात रस घेतला आणि अनेक शोधनिबंध प्रकाशित केले. एकाच बॅटरीला जोडलेल्या निरनिराळ्या धातूंच्या आणि निरनिराळ्या जाडीच्या तारा किंवा पट्ट्यांमधून जाणारा विजेचा प्रवाह समान नसतो याचा खोलवर अभ्यास करून त्याने असे पाहिले की निरनिराळे धातू निरनिराळ्या प्रमाणात विजेच्या प्रवाहाला विरोध करतात आणि तार किंवा पट्टीमधून होणारा विरोध तिची जाडी आणि लांबी यावर अवलंबून असतो. सर्किटमध्ये विजेचा प्रवाह किती होईल हे या सर्वांवरून ठरते. सन १८२७ मध्ये त्याने आपला सुप्रसिद्ध 'ओह्मचा नियम' सांगितला. त्या नियमाप्रमाणे विद्युतचुंबकीय बल (व्होल्टेज) हे विजेचा प्रवाह (करंट) आणि त्याला होणारा विरोध (रेझिस्टन्स) या दोघांच्या गुणाकाराच्या एवढे असते. (V = I X R). सर्किटवर असलेले विद्युतचुंबकीय बल वाढवले तर विजेचा प्रवाह त्या प्रमाणात वाढतो आणि प्रवाहाला होणारा विरोध वाढला तर तो प्रवाह कमी होतो. अनेक सेल एकमेकांना जोडून विद्युतचुंबकीय बल वाढवता येते, तसेच वेगवेगळ्या धातूंच्या निरनिराळ्या आकारांच्या तारा किंवा पट्ट्या वापरून विरोध कमीजास्त करता येतो आणि त्यानुसार प्रवाह वाढतो किंवा कमी होतो.

विजेवरील संशोधन करणाऱ्या या शास्त्रज्ञांच्या काळात व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यापैकी कुठलीच गोष्ट प्रत्यक्ष मोजण्याचे मीटर उपलब्ध नव्हते. त्यांनी हे नियम तर्क आणि विश्लेषणाच्या आधाराने मांडले होते आणि अॅमीटर, व्होल्टमीटर, ओह्ममीटर वगैरे उपकरणे त्यांच्या या नियमांच्या आधारावर नंतरच्या काळात तयार होत गेली हे पाहिल्यास त्या नियमांचे महत्व लक्षात येईल.

ज्या काळात नियमित किंवा अखंड वीजपुरवठा करणारे जनरेटर अजून तयार झाले नव्हते त्या काळात व्होल्टाज पाईलमधून मिळणाऱ्या अपुऱ्या विजेच्या आधाराने या तीन शास्त्रज्ञांनी या विषयामधील पायाभूत संशोधन केले. त्यांची आठवण ठेऊन ऑर्स्टेड याचे नाव चुंबकीय प्रेरणाच्या (Magnetic Induction), अँपियरचे नाव विद्युतप्रवाहाच्या (Electric Current) आणि ओह्मचे नाव विद्युतविरोधाच्या (Electrical Resistance) एककाला दिले आहे. या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला विजेवरील संशोधनाला गति मिळाली.

Monday, September 02, 2019

मंगलमूर्ती मोरया २०१९


मी हा भाग गणेशचतुर्थीच्या दिवशी सुरू करून दिला . पुढे त्यात जमेल तशी थोडी थोडी भर घालत जाऊन  हे काम गणेशोत्सव होत असेपर्यंत टप्प्याटप्याने  पूर्ण केले.

आज गणेशचतुर्थी आहे. जगभरात जिथे जिथे मराठी माणसे राहतात त्या सगळ्या ठिकाणी या वर्षीचा गणेशोत्सवही ते सगळे लोक मोठ्या उत्साहाने आणि मनःपूर्वक भक्तीसह साजरा करत असल्याच्या बातम्या येत आहेत. मी हा ब्लॉग सुरू केला त्या वर्षी श्रीगजाननाच्या प्रेरणेने त्याची कोटी कोटी रूपे थोडक्यात दाखवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला होता. त्यानंतरही बहुतेक दर वर्षी या उत्सवाच्या काळात श्रीगणपती देवता किंवा त्याची उपासना, उत्सव वगैरेंबद्दल माझ्या मतीने चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. तसा करण्याची मनिषा या वर्षीसुद्धा आहे. ती पूर्ण करण्याची शक्ती त्या कर्ताकरविता, सुखकर्तादुखहर्ता गणरायाने मला प्रदान करावी अशी नम्र विनंति करून मी हा भाग सुरू करीत आहे.

मी हॉस्टेलमध्ये घालवलेला काळ वगळला तर मला कळायला लागल्यापासून मी नियमितपणे हा उत्सव घरीच साजरा केला आहे. या वर्षीसुध्दा माझ्या मुलाकडे म्हणजे आपल्या घरीच पण सातासमुद्रापलीकडे अमेरिकेतल्या लॉसएंजेलिस शहराजवळच्या टॉरेन्स या गावी आलो आहे. आम्ही इथे ३१ ऑगस्टला घरी येऊन पोचलो तेंव्हा तो दिवस जवळजवळ संपत आला होता तसेच अंगात फारसे त्राणही उरले नव्हते. त्यानंतरचा कालचा दिवसही प्रवासाचा शीण घालवणे आणि जेटलॅगमधून बाहेर निघणे अशा कामांमध्ये गेला आणि आजचा गणेशचतुर्थीचा दिवस उजाडलासुध्दा.

आमच्या वाड्यातल्या सोप्याच्या मधोमध एक मोठा 'गणपतीचा' कोनाडा होता. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आम्ही त्या कोनाड्यातच गणपतीची प्रतिष्ठापना करत होतो. त्याच्या अंवतीभंवती पुठ्ठा आणि रंगीबेरंगी कागदाची कमान, मखर, आरास वगैरे करायचे काम संपूर्णपणे घरातल्या मुलांचे असायचे. माझे मोठे भाऊ शिक्षणासाठी परगावी गेल्यावर ती जबाबदारी माझ्यावर आली आणि मी अत्यंत उत्साहाने मनापासून त्यातला आनंद घेतला. लग्न करून संसार थाटल्यानंतर आम्ही घरी गणेशोत्सव साजरा करायला लागलो. आधी एका कोनाड्यातच मूर्ती ठेवून आरास करत होतो, काही काळानंतर हॉलमध्ये टेबलावर मांडायला सुरुवात केली. त्या काळात लाकडाच्या पट्ट्या आणि पुठ्ठा यापासून मखर तयार करत होतो, थर्मेकोल नावाचा अद्भुत पदार्थ उपलब्ध होऊ लागल्यानंतर त्यातून अनेक प्रकारचे मनमोहक देखावे करू लागलो. वयपरत्वे शरीराची दुखणी सुरू झाली, अंगातले बळ आणि मनाची उभारीही कमी झाली आणि मुख्य म्हणजे वाशीला आमच्या घराच्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये अत्यंत सुंदर अशी तयार मखरे मिळत असल्यामुळे काही वर्षे ती आणली.  पुढे थर्मोकोलच्या विरोधात जोराची मोहीम सुरू झाल्यामुळे उगाच आमच्याकडून पर्यावरणाला काही धोका व्हायला नको म्हणून ते कटाप केले.

या वर्षी तर मी आणि माझा मुलगा दोघेही अगदी आयत्या वेळी अमेरिकेत जाऊन पोचलो होतो. सजावट करायला घरात काही कच्चा मालही नव्हता आणि त्याला आकार देण्यासाठी आवश्यक असलेली साधनेही नव्हती. इंटरनेटवर अनेक प्रकारच्या सजावटी पाहिल्या आणि आपल्याला झटपट काय काय करणे शक्य आहे याचा अंदाज घेतला. पुण्यामुंबईच्या बाजारपेठा शोभेच्या व सजावटीच्या वस्तूंनी दुथडी वहात असल्या तरी इथल्या अमेरिकनांना त्याचा गंधही नव्हता. त्यातल्या त्यात काही वस्तू आणून त्या एका टेबलावर मांडल्या आणि आमच्या बाप्पाची अशी सजावट केली.
आमच्या लहानपणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आमचे गावाकडचे बापटगुरूजी (भटजी) येत असत आणि सर्व मंत्रोच्चारांसह ती साग्रसंगीतपणे केली जात असे. त्या काळात घरोघरी तशीच पध्दत होती. माझ्या पिढीतल्या कुणालाच मी तसे काही करतांना पाहिले नाही आणि मीसुध्दा त्यातल्या पारंपरिक कर्मकांडाला फाटा दिला. या वर्षी आम्ही पुण्याहून येतांनाच गणपतीची एक सुबक मूर्ती घेऊन आलो होतो. तिला तबकात ठेवून घराच्या दारापलीकडे नेली आणि "गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया"च्या (दबक्या आवाजात केलेल्या) गजरात घरी आणली. उंबऱ्यातच तिचे औक्षण करून स्वागत केले आणि घरात सजवून ठेवलेल्या टेबलावरील आसनावर स्थानापन्न केली. हळदकुंकू, फुले, दुर्वा वाहून पूजा केली. मोदक, पेढे, फळे वगैरेंचा नैवेद्य दाखवला आणि आरती केली. माझ्या पुण्यात रहात असलेल्या मुलानेसुध्दा हेच सगळे विधि त्याच्या फ्लॅटमध्ये आधीच केले होते आणि त्याचे फोटो पाठवले होते. अमेरिका भारताच्या ११-१२ तास मागे असल्यामुळे आमचा सकाळच्या पूजेचा कार्यक्रम होईपर्यंत तिकडे संध्याकाळची आरतीही झाली होती.

माझी दोन्ही मुले १०-१२ वर्षे परदेशांमध्ये राहिलेली असली तरी त्यांनी तिथेसुध्दा गणेशोत्सव साजरा केला आहे. मी लहानपणी जे शिकलो त्यातला कर्मकांडाचा कर्मठ भाग सोडला तरी पूजा आरती वगैरे जेवढे आम्ही आमच्या घरी करत होतो ते सगळे या मुलांनी पाहिले होते आणि तंतोतंत उचलले होते. आता त्यांची मुले ते विधि पहात आणि शिकत होती. या बाबतीत माझ्या पत्नीने मला मनापासून, किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त उत्साहाने साथ दिली होती. त्यासाठी आवश्यक असलेली सगळी जमवाजमव आणि तयारी तर तीच करून देत होती. तिच्या तालमीत तिने आमच्या सुनांनाही तयार केले होते आणि त्यासुध्दा मनापासून उत्साहाने सगळी कामे करत होत्या. पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेऊन पोचवण्याची जी जबाबदारी आमच्या पिढीवर होती ती आम्ही काही अंशी तरी पार पाडली याचे मला समाधान आहे.

असल्या रूढी आणि परंपरा जपण्याला काही अर्थ आहे का? हा जरा वादाचा विषय आहे. त्या करण्यामधून खरोखर काही साध्य होते का? असा प्रश्न विचारला जातो.  पण ज्या गोष्टीपासून दुसऱ्यांना उपद्रव होत नाही आणि स्वतःला आनंद किंवा समाधान मिळत असेल तर त्या गोष्टी करायला काय हरकत आहे? असा विचार मी करत आलो आहे.  प्रत्यक्ष काही फलप्राप्ती होवो किंवा न होवो, पण यातून एक आयडेंटिटी तर नक्की तयार होते.  आणि ती गोष्ट बहुतेक लोकांना आवडते असे दिसते.

माझ्या लहानपणी आमच्या हायस्कूलमध्येसुध्दा दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जात असे. गणपती हे जमखंडी संस्थानाच्या अधिपतींचे कुलदैवत असल्यामुळे संस्थानिकांच्या कारकीर्दीत तो जास्तच थाटामाटाने होत असेल. मी १९५७मध्ये या शाळेत दाखल झालो तेंव्हा संस्थाने विलीन होऊन दहा वर्षे झाली होती आणि ती शाळा शिक्षणखात्याच्या आधीन होती, पण आमचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक जुन्या काळातलेच असल्यामुळे त्यांनी उत्सवाची परंपरा टिकवून ठेवली होती. मात्र आमचा हा उत्सव फक्त एकाच दिवसाचा असायचा. शाळेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी मूर्तीची स्थापना, पूजा, आरती वगैरे होत असे आणि लगेच संध्याकाळी शाळेच्या आवारातल्या विहिरीतच तिचे विसर्जनही केले जात असे.

घरातला आणि शाळेतला कार्यक्रम होऊन गेल्यानंतर उरलेला दिवस आम्ही गावभर फिरून इतर गणपतींचे दर्शन घेण्यात घालवत होतो. आमचे नातेवाईक, शेजारी, मित्र आणि मित्रांचे नातेवाईक, शेजारी वगैरेंच्या घरी जाऊन त्यांनी आणलेल्या मूर्ती आणि केलेली आरास पाहून घेत होतो. लहान गावात सगळेच सगळ्यांना ओळखत असल्यामुळे कुणाच्या घरी जायला संकोचही वाटत नसे. सगळ्यांचीच दारे दिवसभर उघडीच असायची आणि गणेशचतुर्थी किंवा दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी तर रांगोळी घालून स्वागतासाठी सज्ज केलेली असत. आम्हा तीन चार मित्रांचे टोळके एकेका घरात जायचे, गणपतीचे दर्शन घेऊन नमस्कार करायचे, हातावर पडलेला प्रसाद तोंडात घालायचा आणि पुढे जायचे अशी धावती भेट असे.

मुंबईच्या आमच्या घरात गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये जो कोणी ओळखीचा भेटेल त्याला आम्ही दर्शनासाठी यायचे आमंत्रण देत होतो. या चारपाच दिवसात अनेक नातेवाईक, शेजारी आणि मित्र येऊन भेटून जातही असत. या वेळी कुणाला आधीपासून ठरवून येण्याची गरज नसायची. जेंव्हा ज्याला वेळ मिळेल तेंव्हा त्याने यावे, वाटल्यास दोन घटका बसून गप्पा माराव्यात आणि वेळ नसल्यास पाच दहा मिनिटे थांबून परत जावे. त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी आम्हीही लाडू, चिवडा, मोदक वगैरे पदार्थ तयार ठेवत असू आणि येणाऱ्या सर्वांच्या हातात प्रसादाची प्लेट देत असू.


इथे अमेरिकेत फारशा ओळखीच झालेल्या नसल्यामुळे या गोष्टींची उणीव जाणवली. आमच्या ओळखीत किंवा वसाहतीतच दुसरा गणपती पहायला मिळाला नाही. काल इथल्या स्थानिक हनुमानाच्या मंदिरात गेलो होतो तिथे त्यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केलेले दिसले. त्यासाठी एक सुंदर आणि भव्य अशी गणपतीची मूर्ती आणली होतीच, इतरही अनेक भाविकांनी आपापल्या घरातल्या मूर्ती तिथे आणून ठेवल्या होत्या. आज या सर्वांचे यॉटमधून पॅसिफिक महासागरात दूरवर जाऊन विसर्जन करण्याचा कार्यक्रम ठरला होता. आम्ही मात्र घरातच एका बादलीत पाणी भरून त्यात आमच्या घरातल्या गणेशमूर्तीचे आधीच विसर्जन केले होते. 

आम्ही अणुशक्तीनगरमध्ये रहात असतांना तिथल्या कम्युनिटी सेंटरमध्ये कॉलनीचा सार्वजनिक गणेशोत्सव जंगी प्रमाणावर साजरा होत असे आणि त्यात शेकडो लोकांचा सहभाग असायचा. भव्य मूर्ती आणि सुंदर आरास तर असायचीच, नाटक, गायन, वादन वगैरे विविध गुणदर्शनाचे चांगले कार्यक्रम असायचे. त्यात कॉलनीमधल्या होतकरू कलाकारांना संधी मिळत असे, शिवाय बाहेरच्या चांगल्या व्यावसायिक कलाकारांना सुध्दा बोलावले जात असे. झंकार ऑर्केस्ट्रा, मेलडी मेकर्स, मेंदीच्या पानावर, भावसरगम यासारखे एकाहून एक चांगले कार्यक्रम यात ठेवले जात असत. ती जागा आमच्या घरापासून दीडदोन किलोमीटर लांब असली तरी आम्ही चांगल्या कार्यक्रमांना आवर्जून जात असू. वाशीला रहायला गेल्यावर तिथे बाजूच्या सेक्टरमध्ये मोठा सार्वजनिक उत्सव असायचा त्यातही करमणुकीचे कार्यक्रम होत असत. पुण्याला तर माझ्या मुलांच्या घरालगतच त्यांच्या सोसायटींच्या गणेशोत्सवाचे कार्यक्रम होत असत.

पूर्वीच्या काळातली मुले आणि मुली सुरेल गायन किंवा तबला, पेटी, बासुरी, व्हायोलिन अशासारख्या एकाद्या वाद्याचे वादन शिकत असत आणि एकत्र मिळून छानसा संगीतमय कार्यक्रम करत असत. पुढे कीबोर्ड आणि अॅक्टोपॅड यासारखी गोंगाट करणारी वाद्ये आली आणि केराओके आल्यावर तर वादकांची गरजच संपली. त्याचबरोबर ऑडिओपेक्षा व्हीडिओ टेक्नॉलॉजी कैकपटीने पुढे गेल्यामुळे संगीतातला मधुर सुरेलपणा लयाला गेला आणि गोंगाटाचे राज्य सुरू झाले. अलीकडच्या काळातले करमणुकीचे कार्यक्रम म्हणजे पोटात गोळा उठेल एवढ्या मोठ्या ढणढणाटाच्या तालावर स्टेप्सच्या नावाने वेडेवाकडे अंगविक्षेप करत घामाघूम होईपर्यंत उड्या मारत राहणे झाले आहे. तरीदेखील मागच्या वर्षीपर्यंत मी हे बदलत जाणारे कार्यक्रम पहात आलो होतो.

या वर्षी मात्र अमेरिकेतल्या ज्या टॉरेन्स गावात मी रहात आहे तिथे तर यातल्या कशाचाच मागमूसही नाही. इथल्या काही शहरांमधली महाराष्ट्र मंडळे अॅक्टिव्ह आहेत आणि ते गणेशोत्सवाच्या काळात चांगले कार्यक्रम अरेंज करतात असे मी ऐकले होते, पण ती शहरे कुठे आहेत आणि तिथे कसे जायचे याची मी चौकशीही केली नाही. आपण ज्या गावाला जाऊ शकतच नाही त्या गावाचा रस्ता तरी कशाला विचारायचा?

तर अशा प्रकारे या वर्षीचा माझा गणेशोत्सव अगदी वेगळ्या वातावरणात साजरा झाला. म्हणजे पूजाअर्चा, अथर्वशीर्षाची आवर्तने, तळलेल्या आणि उकडीच्या मोदकांचा प्रसाद यासारखे घरातले सगळे कार्यक्रम आम्ही यापूर्वी जसे करत आलो आहोत त्याच पध्दतीने इथे सातासमुद्रापलीकडेही केलेच, पण मुंबईपुण्याच्या वातावरणातला जल्लोष आणि ढोलताशांचे आवाज मात्र खूप मिस केले.