Monday, March 25, 2019

सूर्याचा आकाशातला प्रवासआपल्या प्राचीन समजुतींप्रमाणे सूर्यनारायण रोज सात घोड्यांच्या रथात बसून क्षितिजावर प्रगट होतो आणि दिवसभर आकाशाचा फेरफटका मारून पुन्हा क्षितिजापलीकडे जाऊन अदृष्य होतो, पण तो आपला रथ कोणत्या राजमार्गावरून नेत असेल? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दररोज सकाळी पूर्व दिशेला सूर्य उगवतो, तो आकाशात सरळ वर वर चढत दुपारी डोक्यावर येतो आणि त्यानंतर पलीकडच्या दिशेने खाली उतरत जातो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो असे साधारणपणे समजले जाते, आपण लहानपणापासून तसेच शिकत आलो आहोत आणि दक्षिण भारतात किंवा महाराष्ट्रात ते ढोबळ मानाने बरोबर वाटते. दिवसाच्या उन्हात आपण प्रकाशमान तळपत्या सूर्याकडे पाहू शकत नाही, शिवाय कुठल्या वेळी या अथांग आकाशातल्या नेमक्या कोणत्या जागी तो आहे हे समजायला तिथे कसल्याच खुणा नसतात. मग तो रोज आकाशामधून नेमका कोणत्या वाटेवरून प्रवास करतो हे आपल्याला कसे समजणार ? सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब दिसते त्या ठिकाणी क्षितिजावर असलेल्या इमारती, झाडे, डोंगरमाथा अशा खुणांवरून ती विवक्षित जागा आपल्याला ओळखता येते आणि लक्षात ठेवता येते. आपल्या माथ्यावर असलेला आकाशातला कळसाचा बिंदू म्हणजे झेनिथ आपल्याला अंदाजाने समजतो. त्या ठिकाणी सूर्य आला तर जमीनीवरील वस्तूची सावली जमीनीवर पडत नाही. खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे लोक भूमितीच्या सहाय्याने संपूर्ण आकाशाची अक्षांश आणि रेखांशात विभागणी करतात आणि त्यांच्या आधाराने सूर्य, चंद्र, ग्रह, तारे वगैरे गोल नेमक्या कोणत्या मार्गाने भ्रमण करत असतात याच्या तपशीलवार नोंदी ठेवतात. भारतामधून पाहतांना ढोबळमानाने पाहता हे सगळे ग्रह आणि तारे आपल्याला डोक्यावरून जातांना दिसतात तसे युरोपअमेरिकेच्या उत्तर भागात दिसत नाहीत. एकदा मी इंग्लंडमध्ये डिसेंबरमध्ये गेलेलो असतांना तिथे पाहिले की सूर्य खूप उशीराने जवळजवळ आग्नेयेला उगवत होता आणि जेमतेम पाचसहा तासाचा दिवस संपताच खूप लवकर ईशान्येकडे मावळून जात होता. तेवढ्या वेळात म्हणजे दिवसभरात तो केंव्हाच आकाशात फारसा उंचावर चढतच नव्हता. तो दिवसभर आकाशाच्या दक्षिणेकडील भागात खालच्या खालीच वक्राकार मार्गाने तिरकस सरकत होता. 


लक्ष देऊन पाहिल्यास असे दिसते की सूर्याचे बरोबर पूर्वेला उगवणे, माध्यान्हीला झेनिथला डोक्यावर येणे आणि पश्चिमेला मावळणे अशी गोष्ट फक्त विषुववृत्तावरील ठिकाणीच आणि तीही वर्षामधून फक्त दोनदाच घडते. इतर ठिकाणी कोणत्याही दिवशी अगदी तसेच कधीच घडत नसते. मार्च आणि सप्टेंबर महिन्यांच्या २१ तारखेला जगातल्या सर्वच ठिकाणी पूर्वेला सूर्य उगवतो, पण माध्यान्हीला म्हणजे स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी १२ वाजता तो माथ्यावर मात्र फक्त विषुववृत्तावरच येतो, इतर जागी येत नाही. इतर जागी माध्यान्ह होते तेंव्हा तो  झेनिथच्या जवळपास येतो, पण जरासा उत्तरेला किंवा दक्षिणेला दिसतो आणि त्यानुसार दक्षिण किंवा उत्तरेला सावली पडते. दक्षिण गोलार्धात तो उत्तरेला दिसतो तर दक्षिण गोलार्धात तो उत्तरेकडे दिसतो.  २१ मार्चनंतर तो रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकत जातो आणि विषुववृत्तापासून उत्तरेकडे असलेल्या ठिकाणी दुपारी १२ वाजता माथ्यावर येऊ लागतो. आपण जसजसे विषुववृत्तासून उत्तरेकडे जाऊ तसतसे सूर्याच्या माथ्यावर येण्याची तारीख पुढे पुढे जाते. पुण्यासारख्या ठिकाणी २१मार्चला माध्यान्हीला तो दक्षिणेकडे कललेला दिसतो, पण त्यानंतर रोज उत्तरेकडे सरकत १३ मेच्या सुमाराला दुपारी तो बरोबर माथ्यावर येतो. त्या दिवशी दुपारी माध्यान्हीला आपली सावली कुठेच दिसत नाही. ती आपल्या पायावरच पडते. पण त्या दिवशीचा सूर्योदय मात्र ईशान्येच्या दिशेने कललेल्या वेगळ्याच जागी झालेला असतो. कर्कवृत्तावर म्हणजे सांचीच्या जवळपास २१ जूनला सूर्य बरोबर माथ्यावर येतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या पलीकडील प्रदेशात तर सूर्य कधीही माथ्यावर येतच नाही. २१ जूननंतर दक्षिणायन सुरू होते. त्यानंतर सूर्याच्या उगवण्या, मावळण्या आणि दुपारी माथ्यावर येण्याच्या जागा दररोज दक्षिणेकडे सरकत जातात. ३१ जुलैच्या सुमाराला दुपारी तो पुन्हा पुण्याला बरोबर माथ्यावर येतो, पण तेंव्हा पावसाळी ढगाळ वातावरणामुळे कदाचित तो दिसणार नाही. पुढे २१ सप्टेंबरला तो पुन्हा विषुववृत्तावर माथ्यावर येतो.

फक्त मार्च आणि सप्टेंबर महिन्यांच्या २१ तारखेलाच सूर्य क्षितिजावर जिथून उगवतो ती जागा जगातल्या सर्वच ठिकाणी क्षितिजावर बरोबर पूर्व दिशेला असते. दरवर्षी २१ डिसेंबरला ती जागा पूर्वेपासून आग्नेय दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर असते. त्यानंतर सुरू झालेल्या उत्तरायणात ती रोज किंचित उत्तरेकडे म्हणजे डावीकडे सरकत २१ मार्चला बरोबर पूर्वेला असते आणि तशीच डावीकडे सरकत जात ती २१ जूनला पूर्वेपासून ईशान्येच्या दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर असते. २१ जूननंतर जूननंतर दक्षिणायन सुरू होते. त्यानंतर सूर्योदयाची जागा रोज किंचित उजवीकडे म्हणजेच दक्षिणेकडे सरकत २१ सप्टेंबरला बरोबर पूर्व दिशेला आणि २१ डिसेंबरला पुन्हा पूर्वेपासून आग्नेय दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर येते.  याप्रमाणे सूर्योदयाचे स्थान सुमारे ४६ अंशांच्या सेक्टरमध्ये आलटून पालटून मागेपुढे होत असते.

सूर्य आपल्या रोज बदलत जाणाऱ्या स्थानी उगवल्यानंतर आकाशात सरळ वर वर चढत दुपारी डोक्यावर येतो हा सुद्धा एक भ्रम आहे. फक्त विषुववृत्तावरच तो उभ्या रेषेत आकाशात वर चढत जातो. उत्तर गोलार्धात कुठेही पाहिल्याास आकाशातला सूर्याचा मार्ग दक्षिणेकडे कललेला वक्र दिसतो आणि दक्षिण गोलार्धात तो उत्तरेकडे कललेला दिसतो. उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात हे कलणे सुमारे ९० अंशापर्यंत वाढलेले असते त्यामुळे सूर्य क्षितिजालगतच फिरत राहिलेला दिसतो. वर्षामधील निरनिराळ्या तारखांना पुण्याच्या आकाशात सूर्य कसा तिरप्या रेषेत वर चढत जातो हे वरील आकृतीमध्ये दाखवले आहे.  तसेच दिल्ली, लंडन, केप टाउन, मेलबोर्न, विषुववृत्त, उत्तर ध्रुव या ठिकाणी होत असलेल्या सूर्याच्या भ्रमणाचा मार्ग तिरक्या रेखांमधून दाखवला आहे. उत्तर युरोपात सूर्याच्या रोजच्या आकाशामधील प्रवासाचा मार्ग कसा निरनिराळ्या वक्ररेषांमध्ये असतो हे एका आकृतीमध्ये दाखवले आहे. तिकडे डिसेंबर जानेवारीमध्ये होत असलेल्या फक्त पाचसहा तासांच्या दिवसात तो एक लहानशा कमानीसारख्या आकृतीमध्ये फिरतो तर जूनजुलैमधील अठरा एकोणीस तासांच्या दीर्ध दिवसात एका उंच कमानीमधून जात असला तरी तेंव्हादेखील तो झेनिथच्या दक्षिणेकडेच असतो, माथ्यावर कधी येत नाहीच. 

सूर्याचे हे दररोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना आपल्याला दिसणे हाच मुळी खरे तर एक भास असतो. तो आपल्या जागेवरच स्थिर असतो, पण पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेत असल्यामुळे आपण क्षणाक्षणाला वेगवेगळ्या कोणांमधून त्याला पहात असतो. पण आपल्याला पृथ्वी फिरतांना दिसत नाही, सूर्य, चंद्र आणि चांदण्याच आकाशमार्गे फिरतांना दिसतात. कदाचित यालाच संत ज्ञानेश्वरांनी "सूर्याचे न चालता चालणे" म्हंटले असेल. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रेषेभोवती पृथ्वी फिरत असते आणि ही पृथ्वीचा आंस २३ अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभरातून दर रोज निरनिराळे भाग सूर्यासमोर येत राहतात आणि त्या त्या ठिकाणी सूर्य माथ्यावर आलेला दिसतो.   

थोडक्यात सांगायचे झाल्यास २१ मार्च (वसंत संपात) आणि २३ सप्टेंबर (शरद संपात) या दोनच दिवशी जगभरात सगळीकडे सूर्य पूर्व दिशेला उगवलेला दिसतो आणि त्या दोनच दिवशी विषुववृत्तावर तो माध्यान्हीला डोक्यावर येतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या पलीकडील प्रदेशात तो कधीच माथ्यावर येत नाही. इतर प्रदेशत म्हणजे ऊष्ण हवामानाच्या प्रदेशातल्या सर्व ठिकाणी तो वर्षामधील दोन दिवस दुपारी माथ्यावर येतो. विषुववृत्त सोडल्यास इतर सर्व ठिकाणी त्याचा आकाशातला मार्ग वक्र असतो.

यशिवाय सू्र्य दरवर्षातून एकदा सर्व राशींमधून फिरून येतांनाही दिसतो. सूर्याच्या या 'न चालता चालण्याचा' अंतर्भाव या लेखात केलेला नाही. अशा इतर माहितीसाठी हा लेख वाचावा. "सूर्याचे न चालता चालणे" https://anandghan.blogspot.com/2008/05/blog-post_11.html 
No comments: