Saturday, March 30, 2019

फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ लुई गे ल्युसॅक



युरोपातल्या मध्ययुगापर्यंतच्या काळात फक्त तत्वज्ञान (Philosophy) म्हणजे ज्ञान असे समजले जात होते आणि पुरातन काळातल्या विद्वानांनी जेवढे काही लिहून ठेवले होते त्याचाच अभ्यास पिढ्यान् पिढ्या होत होता. कुणालाही सहज न पटणारा असा क्रांतीकारक नवा विचार मांडायला तिकडेसुद्धा  समाजाचीच परवानगी नव्हती. ज्ञानाचा संबंध धर्माशी जोडून काहीही वेगळे मत मांडणे हे धर्माला आव्हान दिल्यासारखे समजले जाई आणि त्या माणसाला वाळीत टाकले जाई. भारतातसुद्धा 'बाबावाक्यम् प्रमाणम्' असेच शतकानुशतके समजले जात असे, किंबहुना अजूनही तसे समजले जाते. पण कोपरनिकस, गॅलीलिओ, न्यूटन वगैरें शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून त्यांना अनेक नव्या गोष्टी समजल्या किंवा अधिकाधिक नवी माहिती उजेडात येत गेली आणि त्यांनी ती धीटपणे प्रसिद्ध केली. यामधून तयार झालेले नवे ज्ञानसुद्धा निसर्गाचे तत्वज्ञान (Natural Philosophy) या नावाने ओळखले जायला लागले. त्याला विज्ञान (Science) हे नाव मिळाले नव्हते आणि त्याच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरे शाखा तर नव्हत्याच. त्या काळातले संशोधक अनेक प्रकारचे विविध प्रयोग करून नवी शास्त्रीय माहिती मिळवण्याचा आणि तिला सिद्धांतांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असत. त्या संशोधकांच्या विषयांमध्ये सजीव प्राणी तसेच निर्जीव पदार्थ अशा सगळ्यांचा समावेश होत असे.

जमीन, पाणी, हवा या महाभूतांपैकी जमीन किंवा घनरूप पदार्थ आणि पाणी किंवा द्रवरूप पदार्थ आपल्याला हाताळता येत असल्यामुळे त्यांच्यावर प्रयोग करून त्या पदार्थांचा अभ्यास करणे तुलनेने सोपे असते. ते काम प्राचीन काळापासून चालत आले होते. अशा प्रयोगांमधूनच अनेक प्रकारचे धातू आणि औषधे, रसायने वगैरे वस्तू तयार केल्या जात होत्या. पण अदृष्य आणि विरळ अशा हवेवर काम करणे त्या मानाने खूप कठीण होते. हवेला बंद झाकणाच्या बरणीमध्ये किंवा फुग्यांमध्ये कोंडून ठेऊनच तिच्यावर संशोधन करणे भाग होते. या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन सतराव्या शतकातल्या अनेक शास्त्रज्ञांनी हवा आणि इतर वायूंवर संशोधन करायला सुरुवात केली. त्यांच्या अस्तित्वापासून ते विशिष्ट गुणधर्मांपर्यंत शास्त्रीय माहिती जमा होत गेली. टॉरिसेली, पास्कल, बॉइल, चार्ल्स आदि शास्त्रज्ञांनी महत्वाचे शोध लावून या संशोधनामध्ये मौलिक कामगिरी केली. जोसेफ लुई गे ल्युसॅक या फ्रेंच शास्त्रज्ञाने यात महत्वाची भर घातली.

जोसेफ लुई गे ल्युसॅक याचा जन्म एका सधन फ्रेंच परिवारात इसवी सन १७७८ मध्ये झाला. पण तो लहान असतांनाच झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर काही काळ त्याच्या पित्याला तुरुंगात टाकले गेले होते. चर्चमधल्या धर्मगुरूंनी त्याला शिक्षण दिले. त्याने भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा अभ्यास करून त्या विषयांचे अध्यापन केले तसेच संशोधनाला वाहून घेतले.

गे ल्युसॅक याने हवेवर प्रयोग करतांना पाहिले की हवेला बंद पात्रामध्ये तापवत असतांना तापमानासोबतच हवेचा दाबही सारखा वाढत जातो. तापमान जितके वाढेल त्या प्रमाणात तिचा दाब वाढतो तसेच हवा थंड होतांना तिचे तापमान जितके कमी होईल त्या प्रमाणात तो दाब कमी होतो. त्याने यावर विचार केला. जॅक चार्ल्सने लावलेल्या शोधाला तोपर्यंत प्रसिद्धी मिळालेली नसली तरी गे ल्युसॅकला त्याची माहिती समजली होती. त्या नियमानुसार "वायूचे घनफळ (व्हॉल्यूम) त्याच्या तापमानाच्या सम प्रमाणात असते." म्हणजेच बंद पात्रामध्ये असलेल्या हवेला तापवले तर त्याचे घनफळ वाढायला पाहिजे, पण त्यासाठी पात्रामध्ये जास्तीची जागा नसल्यामुळे त्या हवेला पात्रात उपलब्ध असलेल्या जागेतच कोंडले जाते. समजा पात्रातल्या हवेचे घनफळ तापवल्यामुळे वाढून दुप्पट झाले तरीही त्या वाढलेल्या घनफळाला निम्मे होऊन त्या पात्रातच मावावे लागते. बॉइलच्या नियमानुसार घनफळ आणि दाब व्यस्त प्रमाणात असतात. त्यामुळे घनफळ अर्धे झाले तर त्याचा दाब दुप्पट होतो. यावरून गे ल्युसॅकच्या निरीक्षणाला समाधानकारक शास्त्रीय स्पष्टीकरणही मिळाले. त्याने ही सगळी माहिती प्रसिद्ध करून स्वतःबरोबरच चार्ल्सच्या संशोधनालाही प्रसिद्धी दिली आणि आपल्या स्वतःच्या शोधाला चार्ल्सच्या नियमाचा आधार असल्याचे दाखवून दिले. "घनफळ स्थिर असेल तर वायूचा दाब त्याच्या तापमानाच्या सम प्रमाणात असतो" हा गे ल्यूसॅकचा नियम 'दाबाचा नियम' ('Pressure Law') या नावानेही ओळखला जातो. बॉइल आणि चार्ल्स यांनी केलेल्या प्रयोगांमधून त्यांना जी माहिती समजली त्यांच्या आधारावर त्यांनी निसर्गाचे दोन प्रयोगसिद्ध नियम सांगितले होते. पण त्या नियमांनुसार दाब आणि घनफळात बदल का होतात याची शास्त्रीय कारणे तेंव्हा कुणालाच माहीत नव्हती. गे ल्यूसॅकचा नियम मात्र या दोन नियमांच्या आधाराने सैद्धांतिकदृष्ट्या (theoretically) आणि शिवाय प्रयोगानेही (experimentally) सिद्ध होत होता.
वर दिलेल्या संशोधनांवरून वायूंचे तीन मुख्य नियम समजले. या तीन्ही नियमांना मिळून वायूंचे नियम (Gas Laws) असे म्हणतात.
१. बॉइलचा नियम ...... P X V = k ... दाब  X घनफळ = स्थिरांक .... जेंव्हा तापमान स्थिर असते.
२. चार्ल्सचा नियम ...... V = k X T ... घनफळ = स्थिरांक X तापमान .... जेंव्हा दाब स्थिर असतो.
३. गे ल्यूसॅकचा नियम .. P = k X T ... दाब = स्थिरांक X तापमान .... जेंव्हा घनफळ स्थिर असते.
घनरूप पदार्थांची लांबी, रुंदी, जाडी, व्यास, परीघ वगैरे मोजून गणिताने त्यांचे घनफळ काढता येते, द्रवरूप पदार्थांचे घनफळ मापाने मोजता येते, पण वायुरूप पदार्थांचे घनफळ स्थिर नसते. ते त्यांचा दाब आणि तापमान यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळे ते केंव्हाही अमूक इतक्या तापमानाला आणि इतक्या दाबावर इतके लिटर किंवा घनफूट असेच सांगावे लागते. सिलिंडरमध्ये भरलेल्या वायूंच्या घनफळांची मोजणी, हिशोब वगैरे करण्यासाठी प्रमाणभूत तापमान आणि दाब (standard temperature and pressure) किंवा (STP) ठरवतात आणि Liters / Cubic feet at STP असे सांगतात. 
जोसेफ लुई गे ल्युसॅकने दुसरा एक अत्यंत महत्वाचा शोध लावला. त्याने असे दाखवून दिले की हैड्रोजन आणि ऑक्सीजन या दोन वायूंचा २ : १ या ठराविक प्रमाणातच संयोग होऊन त्यामधून पाण्याची वाफ तयार होते. नायट्रोजन आणि हैड्रोजन यांचा १:३ या प्रमाणातच संयोग होऊन अमोनिया हा वायू तयार होतो. अशा प्रकारे दोन वायूंचा संयोग होतांना त्यांच्या आकारमानांचे प्रमाण नेहमीच १,२,३ अशा पूर्ण अंकांमध्ये सोपे प्रमाण असते. सगळेच वायू कितीही प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळतात पण त्यांच्यामधील रासायनिक क्रियांमुळे होणारे संयोग फक्त ठराविक प्रमाणातच होतात. समजा हवेने भरलेल्या एकाद्या पात्रात थोडासा हैड्रोजन वायू सोडला तर तो लगेच हवेत सगळीकडे पसरेल आणि त्यात ठिणगी टाकली तर त्या पात्रात जितका हैड्रोजन वायू असेल तो सगळा जळून जाईल पण त्याच्या निम्मा इतकाच ऑक्सीजन खर्च होईल आणि उरलेला ऑक्सीजन वायू हवेत तसाच शिल्लक राहील. गे ल्यूसॅकच्या या नियमामुळे रासायनिक क्रियांची समीकरणे मांडण्याला मदत झाली.

त्याशिवाय गे ल्युसॅकने इतर अनेक प्रकारचे संशोधन केले. त्याने वातावरणाच्या अभ्यासासाठी ऊष्ण हवेचे बलून तयार करून ते सात हजार मीटर इतक्या उंचीपर्यंत आकाशात उडवले आणि त्याला जोडलेल्या पाळण्यात बसून तो स्वतः हवेत उडून आला. आपल्या या उड्डाणात त्याने निरनिराळ्या उंचीवरील वातावरणामधल्या हवेचे नमूने बाटल्यांमध्ये गोळा केले आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले. पर्वतशिखरांवर किंवा हवेत उंच उडल्यावर हवेचा दाब कमी होत असतो, तरीही हवेमधील नायट्रोजन, ऑक्सीजन आदि घटकांचे प्रमाण मात्र सगळीकडे सारखेच असते हे त्याने या प्रयोगांमधून दाखवून दिले. त्याने बोरॉन आणि आयोडिन या मूलद्रव्यांचा शोधही लावला, प्रयोगशाळांमधल्या उपकरणांमध्ये काही महत्वाच्या सुधारणा केल्या. अशा प्रकारे जोसेफ लुई गे ल्युसॅकने विज्ञानाच्या, विशषतः रसायनशास्त्राच्या प्रगतीला मोठा हातभार लावला.
---------------------------
फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ लुई गे ल्युसॅक (Shikshan Vivek) http://shikshanvivek.com//Encyc/2019/3/23/French-Scientist-Joseph-Louis-Gay-Lussac.aspx


Monday, March 25, 2019

सूर्याचा आकाशातला प्रवास



आपल्या प्राचीन समजुतींप्रमाणे सूर्यनारायण रोज सात घोड्यांच्या रथात बसून क्षितिजावर प्रगट होतो आणि दिवसभर आकाशाचा फेरफटका मारून पुन्हा क्षितिजापलीकडे जाऊन अदृष्य होतो, पण तो आपला रथ कोणत्या राजमार्गावरून नेत असेल? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दररोज सकाळी पूर्व दिशेला सूर्य उगवतो, तो आकाशात सरळ वर वर चढत दुपारी डोक्यावर येतो आणि त्यानंतर पलीकडच्या दिशेने खाली उतरत जातो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो असे साधारणपणे समजले जाते, आपण लहानपणापासून तसेच शिकत आलो आहोत आणि दक्षिण भारतात किंवा महाराष्ट्रात ते ढोबळ मानाने बरोबर वाटते. दिवसाच्या उन्हात आपण प्रकाशमान तळपत्या सूर्याकडे पाहू शकत नाही, शिवाय कुठल्या वेळी या अथांग आकाशातल्या नेमक्या कोणत्या जागी तो आहे हे समजायला तिथे कसल्याच खुणा नसतात. मग तो रोज आकाशामधून नेमका कोणत्या वाटेवरून प्रवास करतो हे आपल्याला कसे समजणार ? सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब दिसते त्या ठिकाणी क्षितिजावर असलेल्या इमारती, झाडे, डोंगरमाथा अशा खुणांवरून ती विवक्षित जागा आपल्याला ओळखता येते आणि लक्षात ठेवता येते. आपल्या माथ्यावर असलेला आकाशातला कळसाचा बिंदू म्हणजे झेनिथ आपल्याला अंदाजाने समजतो. त्या ठिकाणी सूर्य आला तर जमीनीवरील वस्तूची सावली जमीनीवर पडत नाही. खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे लोक भूमितीच्या सहाय्याने संपूर्ण आकाशाची अक्षांश आणि रेखांशात विभागणी करतात आणि त्यांच्या आधाराने सूर्य, चंद्र, ग्रह, तारे वगैरे गोल नेमक्या कोणत्या मार्गाने भ्रमण करत असतात याच्या तपशीलवार नोंदी ठेवतात. भारतामधून पाहतांना ढोबळमानाने पाहता हे सगळे ग्रह आणि तारे आपल्याला डोक्यावरून जातांना दिसतात तसे युरोपअमेरिकेच्या उत्तर भागात दिसत नाहीत. एकदा मी इंग्लंडमध्ये डिसेंबरमध्ये गेलेलो असतांना तिथे पाहिले की सूर्य खूप उशीराने जवळजवळ आग्नेयेला उगवत होता आणि जेमतेम पाचसहा तासाचा दिवस संपताच खूप लवकर ईशान्येकडे मावळून जात होता. तेवढ्या वेळात म्हणजे दिवसभरात तो केंव्हाच आकाशात फारसा उंचावर चढतच नव्हता. तो दिवसभर आकाशाच्या दक्षिणेकडील भागात खालच्या खालीच वक्राकार मार्गाने तिरकस सरकत होता. 


लक्ष देऊन पाहिल्यास असे दिसते की सूर्याचे बरोबर पूर्वेला उगवणे, माध्यान्हीला झेनिथला डोक्यावर येणे आणि पश्चिमेला मावळणे अशी गोष्ट फक्त विषुववृत्तावरील ठिकाणीच आणि तीही वर्षामधून फक्त दोनदाच घडते. इतर ठिकाणी कोणत्याही दिवशी अगदी तसेच कधीच घडत नसते. मार्च आणि सप्टेंबर महिन्यांच्या २१ तारखेला जगातल्या सर्वच ठिकाणी पूर्वेला सूर्य उगवतो, पण माध्यान्हीला म्हणजे स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी १२ वाजता तो माथ्यावर मात्र फक्त विषुववृत्तावरच येतो, इतर जागी येत नाही. इतर जागी माध्यान्ह होते तेंव्हा तो  झेनिथच्या जवळपास येतो, पण जरासा उत्तरेला किंवा दक्षिणेला दिसतो आणि त्यानुसार दक्षिण किंवा उत्तरेला सावली पडते. दक्षिण गोलार्धात तो उत्तरेला दिसतो तर दक्षिण गोलार्धात तो उत्तरेकडे दिसतो.  २१ मार्चनंतर तो रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकत जातो आणि विषुववृत्तापासून उत्तरेकडे असलेल्या ठिकाणी दुपारी १२ वाजता माथ्यावर येऊ लागतो. आपण जसजसे विषुववृत्तासून उत्तरेकडे जाऊ तसतसे सूर्याच्या माथ्यावर येण्याची तारीख पुढे पुढे जाते. पुण्यासारख्या ठिकाणी २१मार्चला माध्यान्हीला तो दक्षिणेकडे कललेला दिसतो, पण त्यानंतर रोज उत्तरेकडे सरकत १३ मेच्या सुमाराला दुपारी तो बरोबर माथ्यावर येतो. त्या दिवशी दुपारी माध्यान्हीला आपली सावली कुठेच दिसत नाही. ती आपल्या पायावरच पडते. पण त्या दिवशीचा सूर्योदय मात्र ईशान्येच्या दिशेने कललेल्या वेगळ्याच जागी झालेला असतो. कर्कवृत्तावर म्हणजे सांचीच्या जवळपास २१ जूनला सूर्य बरोबर माथ्यावर येतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या पलीकडील प्रदेशात तर सूर्य कधीही माथ्यावर येतच नाही. २१ जूननंतर दक्षिणायन सुरू होते. त्यानंतर सूर्याच्या उगवण्या, मावळण्या आणि दुपारी माथ्यावर येण्याच्या जागा दररोज दक्षिणेकडे सरकत जातात. ३१ जुलैच्या सुमाराला दुपारी तो पुन्हा पुण्याला बरोबर माथ्यावर येतो, पण तेंव्हा पावसाळी ढगाळ वातावरणामुळे कदाचित तो दिसणार नाही. पुढे २१ सप्टेंबरला तो पुन्हा विषुववृत्तावर माथ्यावर येतो.

फक्त मार्च आणि सप्टेंबर महिन्यांच्या २१ तारखेलाच सूर्य क्षितिजावर जिथून उगवतो ती जागा जगातल्या सर्वच ठिकाणी क्षितिजावर बरोबर पूर्व दिशेला असते. दरवर्षी २१ डिसेंबरला ती जागा पूर्वेपासून आग्नेय दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर असते. त्यानंतर सुरू झालेल्या उत्तरायणात ती रोज किंचित उत्तरेकडे म्हणजे डावीकडे सरकत २१ मार्चला बरोबर पूर्वेला असते आणि तशीच डावीकडे सरकत जात ती २१ जूनला पूर्वेपासून ईशान्येच्या दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर असते. २१ जूननंतर जूननंतर दक्षिणायन सुरू होते. त्यानंतर सूर्योदयाची जागा रोज किंचित उजवीकडे म्हणजेच दक्षिणेकडे सरकत २१ सप्टेंबरला बरोबर पूर्व दिशेला आणि २१ डिसेंबरला पुन्हा पूर्वेपासून आग्नेय दिशेच्या बाजूला सुमारे २३ अंशावर येते.  याप्रमाणे सूर्योदयाचे स्थान सुमारे ४६ अंशांच्या सेक्टरमध्ये आलटून पालटून मागेपुढे होत असते.

सूर्य आपल्या रोज बदलत जाणाऱ्या स्थानी उगवल्यानंतर आकाशात सरळ वर वर चढत दुपारी डोक्यावर येतो हा सुद्धा एक भ्रम आहे. फक्त विषुववृत्तावरच तो उभ्या रेषेत आकाशात वर चढत जातो. उत्तर गोलार्धात कुठेही पाहिल्याास आकाशातला सूर्याचा मार्ग दक्षिणेकडे कललेला वक्र दिसतो आणि दक्षिण गोलार्धात तो उत्तरेकडे कललेला दिसतो. उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात हे कलणे सुमारे ९० अंशापर्यंत वाढलेले असते त्यामुळे सूर्य क्षितिजालगतच फिरत राहिलेला दिसतो. वर्षामधील निरनिराळ्या तारखांना पुण्याच्या आकाशात सूर्य कसा तिरप्या रेषेत वर चढत जातो हे वरील आकृतीमध्ये दाखवले आहे.  तसेच दिल्ली, लंडन, केप टाउन, मेलबोर्न, विषुववृत्त, उत्तर ध्रुव या ठिकाणी होत असलेल्या सूर्याच्या भ्रमणाचा मार्ग तिरक्या रेखांमधून दाखवला आहे. उत्तर युरोपात सूर्याच्या रोजच्या आकाशामधील प्रवासाचा मार्ग कसा निरनिराळ्या वक्ररेषांमध्ये असतो हे एका आकृतीमध्ये दाखवले आहे. तिकडे डिसेंबर जानेवारीमध्ये होत असलेल्या फक्त पाचसहा तासांच्या दिवसात तो एक लहानशा कमानीसारख्या आकृतीमध्ये फिरतो तर जूनजुलैमधील अठरा एकोणीस तासांच्या दीर्ध दिवसात एका उंच कमानीमधून जात असला तरी तेंव्हादेखील तो झेनिथच्या दक्षिणेकडेच असतो, माथ्यावर कधी येत नाहीच. 

सूर्याचे हे दररोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना आपल्याला दिसणे हाच मुळी खरे तर एक भास असतो. तो आपल्या जागेवरच स्थिर असतो, पण पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेत असल्यामुळे आपण क्षणाक्षणाला वेगवेगळ्या कोणांमधून त्याला पहात असतो. पण आपल्याला पृथ्वी फिरतांना दिसत नाही, सूर्य, चंद्र आणि चांदण्याच आकाशमार्गे फिरतांना दिसतात. कदाचित यालाच संत ज्ञानेश्वरांनी "सूर्याचे न चालता चालणे" म्हंटले असेल. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रेषेभोवती पृथ्वी फिरत असते आणि ही पृथ्वीचा आंस २३ अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभरातून दर रोज निरनिराळे भाग सूर्यासमोर येत राहतात आणि त्या त्या ठिकाणी सूर्य माथ्यावर आलेला दिसतो.   

थोडक्यात सांगायचे झाल्यास २१ मार्च (वसंत संपात) आणि २३ सप्टेंबर (शरद संपात) या दोनच दिवशी जगभरात सगळीकडे सूर्य पूर्व दिशेला उगवलेला दिसतो आणि त्या दोनच दिवशी विषुववृत्तावर तो माध्यान्हीला डोक्यावर येतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या पलीकडील प्रदेशात तो कधीच माथ्यावर येत नाही. इतर प्रदेशत म्हणजे ऊष्ण हवामानाच्या प्रदेशातल्या सर्व ठिकाणी तो वर्षामधील दोन दिवस दुपारी माथ्यावर येतो. विषुववृत्त सोडल्यास इतर सर्व ठिकाणी त्याचा आकाशातला मार्ग वक्र असतो.

यशिवाय सू्र्य दरवर्षातून एकदा सर्व राशींमधून फिरून येतांनाही दिसतो. सूर्याच्या या 'न चालता चालण्याचा' अंतर्भाव या लेखात केलेला नाही. अशा इतर माहितीसाठी हा लेख वाचावा. "सूर्याचे न चालता चालणे" https://anandghan.blogspot.com/2008/05/blog-post_11.html 




Friday, March 15, 2019

उत्क्रांति, उन्नति आणि अधोगति

परमेश्वर, खुदा किंवा गॉड यानेच या विश्वातली सर्व जीवसृष्टी निर्माण केली आहे, अर्थातच त्याने प्रत्येक जीवाचे सारे गुणधर्म पूर्ण विचारांती काही उद्देशाने ठरवले आहेत आणि हे सगळे मर्त्य मानवाच्या तुच्छ आकलनशक्तीच्या पलीकडे असते अशी शिकवण हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन या प्रमुख धर्मांमध्ये दिली जाते. माणसाने फक्त त्या ईश्वरी चमत्काराकडे अचंभ्याने पहावे आणि त्या जगन्नियंत्याचे आभार मानावेत अशी अपेक्षा असते आणि बहुतेक माणसे शतकानुशतके तेच करत आली आहेत.

पण दोनशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या डार्विन या शास्त्रज्ञाने यापेक्षा वेगळा विचार केला. त्याला लहानपणापासूनच निसर्गाचे निरीक्षण करण्याची प्रचंड आवड होती. त्याने आयुष्यभर जगभरातले पशुपक्षी, कीटक, वनस्पती वगैरेंचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तो एका जहाजाबरोबर तब्बल पाच वर्षे फिरून पृथ्वीप्रदक्षिणा करून आला. ते करतांना तो निरनिराळ्या खंडांमधल्या तसेच लहानमोठ्या बेटांवरल्या घनदाट अरण्यांमध्ये जाऊन राहिला आणि त्याने तिथले पशुपक्षी, कीटक आणि रानटी माणसे यांचे अगदी बारकाईने निरीक्षण केले. इतकेच नव्हे तर मिळतील तेवढी जुनीपुराणी हाडे, सांगाडे, कवट्या वगैरे अवशेष तो गोळा करत गेला आणि त्यांच्या सहाय्याने त्याने शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वी कुठे कशा प्रकारचे प्राणी किंवा माणसे असतील याचासुद्धा विचार केला. डार्विनने स्वतः तर संशोधन केलेच, त्याने इतर शास्त्रज्ञांची पुस्तके वाचून आणि त्यांच्याशी चर्चा करूनही या विषयामधले ज्ञान मिळवले आणि त्यावर चिंतन व मनन करून स्वतः काही पुस्तके लिहिली. त्यामधून त्याने क्रांतिकारक असे काही नवे सिद्धांत जगापुढे मांडले. 

डार्विन याने दीडशे वर्षापूर्वी मांडलेल्या मुख्य सिद्धांतानुसार जगामधील जीवांची उत्क्रांति (इव्हॉल्यूशन) होत होत त्यामधून नवनवे जीव निर्माण होत गेले आणि अशाच प्रकारे अखेरीस एप या माकडाच्या प्रजातीमधून मानवाची उत्पत्ती झाली. पुढे ही माणसे सर्व दिशांनी जगभर पसरत गेली तेंव्हा त्यांच्यात बदल होत होत निग्रो, पिग्मी, मंगोल, आर्य, द्रविड वगैरे निरनिराळे मानववंश तयार होत गेले. पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम झाल्यापासून अब्जावधि वर्षे ही उत्क्रांति सुरूच आहे आणि ती अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे. ही उत्क्रांति कशा प्रकारे होत जाते याचाही एक ढोबळ विचार डार्विनने मांडला होता. त्याने असे सांगितले की प्रत्येक जीव आपल्यासारख्याच अनेक जीवांचे पुनरुत्पादन करत असतो, पण ते करतांना ते नवे जीव अगदी हुबेहूब त्याच्यासारखे न होता त्यात सूक्ष्म फरक होतात. यातले जे नवे जीव आजूबाजूच्या वातावरणाशी जास्त चांगले जमवून घेतात ते अधिक काळ टिकून राहण्याची जास्त शक्यता असते. जे जमवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात. डार्विनने या नियमाला 'सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट' असे नाव दिले होते.

हे सिद्धांत मांडून डार्विनने प्रत्यक्ष परमेश्वरालाच जीवसृष्टीच्या निर्मितीच्या कामापासून बाजूला केले होते, ही गोष्ट त्या काळातल्या इंग्लंडमधल्या विद्वानांना मान्य होणे शक्यच नव्हते. यामुळे "मी जे काही सांगत आहे ते सगळेसुद्धा त्या महान परमेश्वराच्या मर्जीनेच होत असते" असे सांगून त्याने आपली तात्पुरती सुटका करून घेतली. त्या काळापर्यंत युरोपातली धर्मसत्ता थोडी शिथिल झाली होती त्यामुळे डार्विनचा छळ झाला नाही. शिवाय विज्ञानयुग सुरू झालेले होते आणि अनेक शास्त्रज्ञ स्वतंत्रपणे तर्कशुद्ध विचार करून ते धीटपणे मांडायला लागले होते. त्यातल्याही काही लोकांनी डार्विनला कडाडून विरोध केला, काही लोकांनी त्याला पाठिंबा देणारे आणखी पुरावे सादर केले आणि काहींनी त्याच्या सिद्धांतामध्ये सुधारणा सुचवल्या. काही काळातच डार्विनच्या विचारांना एकंदरीतपणे मान्यता मिळाली आणि ते विचार अजूनही ढोबळ मानाने स्वीकारले जातात. एवढेच नव्हे तर जीवशास्त्राशिवाय समाजशास्त्र, राजकारण किंवा अगदी मोटारी, विमाने किंवा काँप्यूटर्स यांच्याबद्दल बोलतांनासुद्धा उत्क्रांति किंवा इव्हॉल्यूशन या शब्दांचा उपयोग केला जातो इतके हे शब्द आता नेहमीच्या भाषेत रुळले आहेत. सुरुवातीच्या काळात अरण्यात हिंडत राहणाऱ्या आदिमानवाने घरे बांधून वस्ती केली, शेती आणि पशुपालन सुरू केले, असंख्य नवे नवे शोध लावून तो आपले जीवन अधिकाधिक सोयिस्कर करत गेला आणि आजही करत आहे.

भारतात मात्र डार्विनच्या सिद्धांताबद्दल मिश्र भावना आहेत. काही लोक श्रीविष्णूच्या दशावतारातसुद्धा उत्क्रांतीची चिन्हे शोधतात, पण तो एक अपवाद झाला. हिंदू पुराणांप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रथम काही सर्वज्ञ ऋषी निर्माण केले आणि त्यांनी तिथून पुढे मानवांची प्रजा वाढवत नेली. त्यामुळे पंडित लोक स्वतःला साक्षात ब्रह्मदेवाचे वंशज समजतात. माकडाच्या उत्क्रांतीमधून माणूस जन्माला आला या डार्विनच्या सिद्धांताची आपल्याकडे नेहमी थट्टाच होत असते. एकाद्याच्या माकडचेष्टा पाहून "डार्विनच्या सिद्धांताचा पुरावा पहा" असे म्हणतील किंवा "तुझे पूर्वज माकडे असतील, माझे तर क्षत्रिय होते." असे मिशीला पीळ देऊन सांगतील.

"जुने ते सोने" असे म्हणत पूर्वीचा काळ आणि त्या काळातली परिस्थिती आणि माणसे किती चांगली होती अशा गोष्टी सांगण्यात रमणारे कित्येक लोक मला नेहमी भेटत असतात. रानावनात अन्न शोधत भटकत राहणाऱ्या आदिमानवापासून ते आजच्या युगातल्या आधुनिक राहणीमानापर्यंत मानवाने निश्चितच प्रचंड प्रगति केली आहे हेच त्यांना मान्य नसते. हिंदू धर्मशास्त्रात तर असे सांगितले आहे असे सांगितले जाते की सुरुवातीला सत्ययुगामध्ये सगळे आदर्श, प्रगत आणि आलबेल होते आणि ही परिस्थिती दर युगामध्ये बिघडत जाऊन आता घोर कलीयुग आले आहे आणि पुढे प्रलय होणार हे ठरलेले आहे. या क्रमात आदिमानवाचा उल्लेखही नाही. हा धार्मिक विचार उत्क्रांतीच्या कल्पनेच्याच अगदी विरुद्ध आहे आणि तो तावातावाने मांडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

त्यांच्या मते डार्विनचा सिद्धांत बरोबर असेल तर माणसाचीसुद्धा उत्क्रांति होत असायला हवी होती. आपल्या आयुष्यात थोडी प्रगति दिसत असली तरी ही सगळी फक्त भौतिक प्रगति आहे. आदिमानवांमध्येसुद्धा टोळीयुद्धे होत असत आणि आजचे लोक तरी तेच करत नाहीत का? मग त्यांच्या वागण्यात कसली डोंबलाची उत्क्रांति झाली आहे? असे प्रश्न विचारले जातात. "पुढच्या पिढीतल्या लोकांना काही ताळतंत्र उरला नाही, ते कसेही वाहवत चालले आहेत. त्यांचे काही खरे नाही." अशी कुरकुर मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे. अशा काही शहाण्यांच्या मते तर माणसाची सतत अधोगतीच होत चालली आहे. त्यामुळे तो तर विनाशाच्या दिशेने चालला आहे. मग त्याच्या उत्क्रांतीचा प्रश्नच कुठे येतो?

मला असे वाटते की हा वाद घालणाऱ्या लोकांकडून उत्क्रांति या संकल्पनेकडून वेगळ्याच अपेक्षा केल्या जातात. त्या शब्दाचा थेट संबंध उत्कर्ष किंवा उन्नती यांच्याशी जोडला जातो. जे काही इव्हॉल्व्ह होईल ते उत्तमोत्तमच व्हायला हवे असे या लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात डार्विननेही तसे सांगितले नव्हते. "सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात." असा त्याचा सिद्धांत आहे. दीडशे वर्षांपूर्वी त्याने सांगितलेला हा सिद्धांत अगही परिपूर्ण आहे असेही सगळे लोक मानत नाहीत. पण डार्विनला जाणवलेल्या Survival of the fittest या निसर्गाच्या तत्वानुसार टिकून राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून सर्वच जीवांची उत्क्रांती होत असते असेसुद्धा आपल्याला दिसते. उदाहरणार्थ रोगजंतूंमध्ये झालेली लक्षणीय उत्क्रांती आपल्या एका आयुष्यात आपल्याला दिसली आहे. अॅटीबायॉटिक्सना दाद न देणारे नवे बॅक्टीरिया रोज तयार होत आहेत. माणसाचे जीवनमान मोठे असल्यामुळे त्याची उत्क्रांति लक्षावधी वर्षे हळूहळू सुरू आहे. पण तिचा उद्देशसुद्धा आदर्श असा महामानव तयार करण्याच्या दृष्टीने नव्हे तर मानववंश टिकून राहण्याच्या दिशेनेच असणार. त्यासाठी संघर्ष अटळच असेल तर तो करणे आवश्यकच आहे आणि त्यात यशस्वी होण्याच्या दिशेनेच उत्क्रांति होत राहणार.

दोन माणसांमधील किंवा टोळ्यांमधील भांडणांची कारणे पहायला गेल्यास दोन प्रमुख कारणे दिसतात, आहे त्याहून अधिक काही मिळवण्याची हाव आणि आहे ते निसटून जाण्याची भीती. ही कारणे शिल्लक असेपर्यंत माणसामाणसांमधली भांडणे, मारामाऱ्या, युद्धे वगैरे अनेक प्रकारचे संघर्ष होतच राहणार. याशिवाय ईगो किंवा अहंभाव आहेच. या सगळ्या सहजप्रवृत्ती (इंन्स्टिंक्टिव्ह) आहेत. त्या प्राणिमात्रांच्या स्वसंरक्षणाचा भाग आहेत. त्या नाहीशा झाल्या तर कदाचित त्याचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे कुणाची आध्यात्मिक आणि आधिदैविक वगैरे प्रकारची उत्क्रांती झालीच तर ज्या माणसाला कसलाही संघर्ष करावाच लागत नाही अशा एकाद्या संपन्न आणि तत्वज्ञानी माणसाची होऊ शकेल, संपूर्ण मानवजातीची होऊ शकत नाही. बौद्धिक दृष्ट्या उत्क्रांत होऊन सगळे लोक सत्ययुगातल्यासारखे साधुसंत बनतील अशी अपेक्षा करता येत नाही. सत्ययुगामध्ये अशी परिस्थिती होती असे क्षणभर खरे मानले तरी त्या काळातसुद्धा दुष्ट असुर लोक होतेच आणि त्यांना कपटाने फसवून स्वतःसाठी अमृत मिळवणारे देव तरी किती सात्विक म्हणायचे? असल्या बिनबुडाच्या तर्काने उत्क्रांतीची कल्पना मोडीत निघत नाही.

यावर तुम्हाला काय वाटते?