Tuesday, December 11, 2018

आयुष्यातला तिसरा टप्पा आणि तिसरा कप्पा

बालपण, तारुण्य आणि वार्धक्य हे माणसाच्या आयुष्यातले तीन मुख्य टप्पे असतात हे सांगण्याची गरज नाही. "कैवल्याच्या चांदण्याला", "दयाघना का तुटले", "एक धागा सुखाचा" यासारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांमधून या टप्प्यांची वैशिष्ट्ये  दाखवली गेली आहेत. तिसऱ्या टप्प्यावर पोचलेल्या माझ्या वयोगटातल्या लोकांनी आता काय काय करू नये आणि काय काय करावे किंवा वेळ वाया न घालवता लगेच करून घ्यावे याबद्दल निरनिराळ्या शब्दांमध्ये निरनिराळ्या भाषातले ज्ञानामृत पाजणाऱ्या किती तरी सूचना वॉट्सॅपवरील महापंडित रोज पाठवत असतात. त्यात आता मी आणखी काय भर घालणार?

श्री. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला. त्यात त्यानी असे लिहिले आहे की आपल्या आयुष्यात दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात, कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा.  कामाच्या कप्प्यातून पैसा, यश, प्रसिद्धी आणि समाधान मिळते आणि कुटुंबाच्या कप्प्यातून प्रेम, स्थैर्य, आधार आणि आनंद मिळतो. पण त्याशिवाय एक तिसरा कप्पाही असायला हवा, आपला स्वतःचा, स्वतःसाठीचा कप्पा.

आपला आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी, व्यवसाय असे काहीतरी करावे लागते, ते पहिल्या कप्प्यात येते. ते करतांना कष्ट करावे लागतात, कधी अपमान कधी निराशा पदरात पडते, कधी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. पण कमाईच्या रूपात या सगळ्याची भरपाई मिळते असे समजून माणसे ते सगळे सोसतात. कुटुंबाच्या कप्प्यातसुद्धा अपेक्षाभंग, गैरसमजुती, चिंता वगैरे नकारात्मक गोष्टी कधी कधी तरी आपल्या वाट्याला येतातच. त्यातून विरंगुळा मिळण्यासाठी तिसरा कप्पा ठेवावा. तो फक्त स्वतःपुरता ठेवला तर त्यात जाऊन आपल्या मनासारखे, आपल्याला आवडेल ते आपण आपल्या सोईनुसार करावे आणि त्यातून फक्त आनंदच घेत रहावा अशी ही कल्पना आहे. 

शिरगावकरांनी बहुधा मध्यमवर्गातल्या मध्यमवयीन माणसांसाठी ही कल्पना मांडली असावी. गरीब लोकांचा कामाचा कप्पा कधी संपतच नाही आणि त्यांना तिसरा कप्पा उघडून त्यात रमायची फारशी संधी मिळत नाही. जन्मजात धनाढ्य लोकांना काम करणे ऐच्छिक असते आणि ते आपले सगळे आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार मौजमजा करत जगू शकतात.

हे कप्पे आणि टप्पे यांचा एकत्र विचार केला तर असे दिसते की जन्माला आलेले मूल हा तिसरा कप्पा घेऊनच येते. तान्हे बाळ फक्त स्वतःच्या मनासारखेच वागत असते. पण ते इतके दुर्बल असते की हंसणे, रडणे, ओरडणे आणि थोडीशी हालचाल एवढेच करू शकते. त्याच्या कुटुंबाचा म्हणजे त्याचा दुसरा कप्पाच त्याचे पूर्ण संगोपन करत असतो. ते थोडे मोठे होऊन त्याचे शिक्षण सुरू झाले की अभ्यास आणि शिस्त यांच्यामुळे त्याला कधी कधी मनाविरुद्ध वागणे भाग पडत जाते आणि त्याच्या स्वतःच्या अशा तिसऱ्या कप्प्यामधून त्याला हळूहळू बाहेर काढणे सुरू होते. पुढे मोठा झाल्यावर त्याला पहिला कप्पा सांभाळायचा आहे एवढ्यासाठीच हे करावे लागत असल्यामुळे तो भाग पहिल्या कप्प्यासारखाच समजायला हरकत नाही. म्हणजे दुसरा कप्पा हा बालपणातला मुख्य कप्पा असतो, तिसरा हळू हळू लहान लहान होत आणि पहिला वाढत जातो. कदाचित यामुळे काही मुलांच्या मनात कामाच्या कप्प्याबद्दल अढी पडत असावी.

तरुणपणी कामधंदा आणि कुटुंब म्हणजेच पहिला आणि दुसरा हे मुख्य कप्पे असतात आणि तिसरा स्वतःचा कप्पा ऐच्छिक असतो, काही लोक स्वतःच्या आवडी, छंद वगैरेंना जन्मभर जाणीवपूर्वक जोपासतात, यामुळे कदाचित त्यांना काम आणि कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देता येत नाही किंवा निदान तशा टीकेला तोंड द्यावे लागते. काही लोक स्वतःच्या कप्प्याकडे पूर्ण दुर्लक्षही करतात. पण उतारवयाबरोबर शरीरातली शक्ती कमी व्हायला लागते आणि कष्ट सोसेनासे होतात, मुले आपापल्या मार्गाला लागल्यानंतर ती स्वतंत्र होत जातात. पहिला कप्पा आकुंचन पावत जातो तसाच दुसराही. यामुळे उतारवयाची चाहूल लागल्यावर तिसऱ्या कप्प्याची अधिकाधिक गरज निर्माण होते आणि काळाबरोबर ती वाढतच जाते.

माझ्या बाबतीत असे झाले की माझा जो तिसरा कप्पा लहानपणी तयार झाला होता त्यात कोणतेही विशिष्ट छंद किंवा आवडीनिवडी नव्हत्या, पण कुतूहल आणि हौस यांना जागा होती. कोणीही कुठलेही काम करत असतांना दिसला की मी ते लक्ष देऊन पहात असे, ते काम माझे नसले तरी ते शिकून घ्यायचा आणि जमले तर स्वतः करून पहायचा प्रयत्न करत असे. लश्करच्या एक दोन भाकऱ्या भाजायची ही वृत्ती माझ्याबरोबर राहिली. पहिल्या कप्प्यात मला नेमून दिलेले काम मी मन लावून करत असल्यामुळे मला कधी त्याचा त्रास वाटला नाही. पण ते करून झाल्यावर मी स्वतःच्या समाधानासाठी आणखी काही तरी करून त्यातून जास्तीचा आनंद मिळवत असे. सुदैवाने माझे कौटुंबिक जीवनही सुरळीत चालले होते. त्यामुळे माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात तिथला वैताग घालवण्यासाठी म्हणून मुद्दाम आणखी काही करायची खरे तर मला गरज पडत नव्हती, पण हा तिसरा कप्पा मी उघडून ठेवला होता आणि त्यात अधून मधून जात येत होतो.

आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्याची चाहूल लागली तेंव्हा मला त्या कप्प्याचा चांगला उपयोग झाला. नोकरी करणाऱ्या लोकांना सेवानिवृत्तीचे मोठे संकट वाटते तसे मला वाटले नाही. कुठलेही वेगळे काम समजून घेऊन ते शिकण्याची हौस असल्यामुळे प्राप्त परिस्थितीत जे सहज जमण्यासारखे होते ते करत गेलो. त्यात मजा आली तर ते केले, नाही तर सोडून दिले. माझा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून नव्हता, त्यामुळे तो माझा पहिला कप्पा नसून तिसरा होता. स्वान्तसुखाय चालवलेली  माझी ही ब्लॉगगिरी हाही त्यातलाच एक भाग आहे.
-----------------------------------------------------------------------------------------

No comments: