Saturday, March 17, 2018

गेट टुगेदर्स आणि लग्न समारंभांचे आकर्षण


मागच्या महिन्यात माझ्या जवळच्या नात्यातल्या एका मुलीचे लग्न झाले. पुण्यातल्या त्या कार्यालयाचा प्रशस्त हॉल माणसांनी गच्च भरला होता. त्यातली निदान शंभरावर तरी माणसे माझ्या नात्यातली आणि ओळखीची होती. त्यातली बरीचशी माणसे पुणेवासी होती पण हिंजवडी, निगडी, घोरपडी अशासारख्या ठिकाणी राहणाऱ्या पुण्यातल्या लोकांचीसुध्दा वर्षानुवर्षे गाठ भेट होत नाही. या मंगलकार्याच्या निमित्याने मात्र त्यांनी आवर्जून येऊन हजेरी लावली होती. बाहेरगांवी राहणारे अनेक जण कार, बस, ट्रेन, विमान अशा विभिन्न वाहनांमधून पुण्याला आले होते.

तिथे जमलेल्या लोकांमध्ये कडेवरच्या बाळांपासून ते काठी टेकत चालणाऱ्या पणजोबांपर्यंत सगळ्या वयाची माणसे होती, तसेच चाळीतल्या खोलीपासून ते बंगल्यात राहणाऱ्यापर्यंत सर्व स्तरामधलीही होती. पण त्या ठिकाणी त्यांच्या वागण्याबोलण्यात तसा कसलाच भेदभाव दिसत नव्हता. सगळेचजण अत्यंत आपुलकीने एकमेकांना भेटत होते, एकमेकांची चौकशी करत होते, हंसत खिदळत होते. "ती सध्या काय करते (किंवा तो काय करतो, ते काय करतात)? तिथे येऊ न शकलेले त्यांचे आईवडील, बहीणभाऊ, मुलेबाळे वगैरे सध्या काय करतात? ते कुठे राहतात आणि कसे आहेत?" हे आपसातल्या चर्चांमधले मुख्य विषय होतेच, त्यांच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची उजळणी होत होती. आता वयस्क झालेले लोक त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणी कसे मजेदार वागत होते हे त्यांचा आब राखून पण रंगवून आणि नकला करून पुढच्या पिढीमधल्या मुलांपुढे सांगणे चालले होते आणि त्याला सगळ्यांचीच दिलखुलास दाद मिळत होती. एकंदरीतच "मस्तीभरा माहौल" होता. तिथे आलेले सगळे आप्त मराठीमधूनच बोलत होते, बोलण्याच्या ओघात संवयीमुळे एकादा उद्गार, वाक्प्रचार किंवा वाक्य हिंदी किंवा इंग्रजीमधून आला तर त्याची लज्जत वाढत होती.

त्यानंतर दहा बारा दिवसांनीच माझ्या ऑफीसमधल्या सुमारे शंभर सेवानिवृत्त सहकाऱ्यांचा नवी मुंबईमध्ये मेळावा भरला होता. तिथे जमलेले बरेचसे लोक स्थानिक असले तरी अनेक जण मुंबईच्या इतर भागामधून आले होते तर माझ्यासारखे थोडे लोक बाहेरगावाहूनही आले होते. इथला लहानातला लहान मित्र सुध्दा साठीमध्ये पोचलेला होता तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला आलेली होती.  सर्वांची मुले आपापल्या आयुष्यात स्थिरावलेली होती आणि सगळ्यांनाच रिटायर झाल्यानंतर मिळत असलेली पेनशन त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी होती. इथे आलेले बहुतेक सगळेच जण साधारणपणे एकाच स्तरावरले होते, त्यात ना कोणी गरीब चाळकरी होता ना कोणी गडगंज श्रीमंत बंगलेवाला होता. नोकरीत असतांना बॉस असलेले अधिकारी आणि तेंव्हाचे त्यांचे कनिष्ठ सहकारी आता एकाच पातळीवर आले होते आणि गळ्यात गळा घालून वावरत होते.

ऑफिसमधल्या समस्या किंवा तक्रारी घरात आणायच्या नाहीत आणि घरातल्या अडचणींवर ऑफिसातल्या कोणाशी चर्चा करायची नाही ही शिस्त आम्ही नोकरी करतांना पाळली होती आणि निवृत्त झाल्यानंतर त्यात बदल केला नव्हता. आता ऑफिसला जाणेच शिल्लक नसल्यामुळे बोलायला तिथले विषयही नव्हते. "तू सध्या काय करतोस?" किंवा "तुम्ही सध्या काय करता?" असे विचारण्यात फारसा अर्थ नव्हता. त्यावर "बस जी रहे हैं।" किंवा "मजेमें जी रहे हैं।" अशाच उत्तराची अपेक्षा होती. त्यामुळे एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करणे, न आलेल्या मित्रांची विचारपूस करणे, त्यातला कोण कुठे आणि कधी भेटला होता वगैरे सांगणे आणि सद्यःपरिस्थितीवर आपली मोघम मते मांडणे, काही ढोबळ अंदाज करणे वगैरे चाललेले होते. शिवाय जुन्या मजेदार आठवणी काढून त्यावर हंसणे खिदळणे होतेच.  तिथे चाललेले बहुतेक संभाषण इंग्रजी आणि हिंदीमध्ये होत होते, पण मधूनच एकाद्या मराठी माणसाला दुसरा मराठी माणूस, पंजाब्याला पंजाबी, बंगाल्याला बंगाली, कन्नडिगाला कन्नडिग वगैरे भेटले तर ते नकळत आपापल्या भाषेंमध्ये बोलायला लागत. भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांचे ध्वनि त्या ठिकाणी कानावर पडत होते. 

अशा प्रकारे हे दोन मेळावे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी त्या दोन मेळाव्यांमध्ये काही गोष्टी समान होत्या. दोन्हीकडे एकंदरीत "मस्तीभरा माहौल" होता. प्रत्येकाच्या मनात दांडगा उत्साह होता आणि तो त्यांच्या हंसतमुख चेहेऱ्यावर आणि वागण्याबोलण्यात दिसून येत होता. सगळेचजण एका विशिष्ट प्रकारच्या चैतन्याने भारलेले दिसत होते. हा उत्साह, ही ऊर्जा, हे आकर्षण नेमके कशामुळे येत असेल? "झाडावरले सफरचंद खाली का पडले?" या प्रश्नाने जसे न्यूटनला पछाडले होते तसेच मलाही या प्रश्नाचे गूढ पडले होते.

लग्नसमारंभाला म्हणून जमलेल्या मंडळीमधल्या कितीशा लोकांना तिथे चाललेल्या धार्मिक विधींमध्ये रस होता? त्या विधींमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि जे त्यांना सहाय्य करत होते असे मोजके लोक सोडले तर इतर लोकांमधले फारच थोडेजण तिकडे काय चालले आहे हे पहात होते. त्यातल्या महिलांच्या वेशभूषा, केशभूषा, कपडे, दागिने वगैरेंवर इतर महिलांचे बारीक लक्ष असेलही, पण पुरुषमंडळींना त्यातसुध्दा काडीचा इंटरेस्ट नव्हता. "आपल्या हातातल्या अक्षता डोक्यावर पडल्यानेच तो विवाह संपन्न होणार आणि त्या वधुवरांचे आयुष्य सुखसमृध्दीपूर्ण होणार." असे विचार आजकाल कोणाच्याच मनात येत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य लोक आपापल्या जागीच बसून समोरच्या लोकांवर अक्षता उधळतात. "मिष्टान्नम् इतरेजनाः" असे सुभाषित असले आणि पुण्यातल्या कार्यालयांमधली जेवणे चविष्ट असली तरी फक्त भोजनावर ताव मारण्यासाठी इतक्या लोकांनी एवढ्या दूर यावे इतके काही त्याचे अप्रूप नसते.  सेवानिवृत्तांच्या मेळाव्यातल्या खाण्यापिण्याला तर काहीच महत्व नसते कारण वयोमानानुसार अनेक प्रकारची पथ्ये पाळतांना अन्नाचा आस्वाद घेण्याची त्यांची क्षमताच मंद झालेली असते. त्या मेळाव्यात झालेले काव्यवाचन, गायन, जादूचे प्रयोग यासारखे मनोरंजनाचे प्रयोग यथातथाच होते. तिथे गेल्याने जुन्या ओळखी पक्क्या होतील, दोनचार नव्या ओळखी होतील आणि त्यामधून आपला व्यवसाय किंवा नांवलौकिक वाढेल अशी शक्यता कमीच असते आणि त्या भेटींमधून काही नवे ज्ञान मिळेल, व्यवहारचातुर्य वाढेल, शहाणपणात भर पडेल अशीही शक्यता नसते. तरीसुध्दा इतके लोक आपापला वेळ, पैसे आणि श्रम खर्च करून या मेळाव्यांना गर्दी का करतात ?

सफरचंदाचा विचार करता करता न्यूटनला जसा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला तसाच मलाही एक अजब शोध लागला. आपले रक्ताचे नातेवाईक असोत, सहकारी, मित्र किंवा शेजारी असोत, किंवा आता ईमेल, फेसबुक आणि वॉट्सअॅपवर भेटणारे फ्रेंड्स असोत, त्यांची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होत जाते. त्या प्रतिमेला त्या व्यक्तीबद्दल विलक्षण आकर्षण वाटत असते. आपण या दोघांची भेट घडवून आणण्यासाठी धडपड करतो. एकाच ठिकाणी अशा अनेक भेटी घडायची शक्यता असली तर ते आकर्षण तितक्या पटीने वाढत जाते. बहुधा वयोमानानुसार या आकर्षणाची शक्ती जास्तच वाढत जात असावी. प्रत्यक्ष भेट होतांना आपण त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर पाहतो तेंव्हा कसल्या तरी विलक्षण लहरी आपल्या मनात उठतात, त्या व्यक्तीने आपल्याला ओळखून प्रतिसाद दिला याचा अर्थ त्याच्याही मनात तशा लहरी उठलेल्या असतात आणि रेझोनन्स झाल्याप्रमाणे दोघांच्याही मनातल्या लहरी जास्तच उफाळून येतात. त्यामधून दोघांच्या मनात ऊर्जेचा एक झरा वहायला लागतो. अशा वेळी फक्त जवळ असणे, हातात हात घेणे, खांद्यावर किंवा पाठीवर हात ठेवणे, निदानपक्षी हात हलवून इशारा देणे, दोन शब्द बोलणे आणि ऐकणे इतकेच पुरेसे असते. त्या वेळी आपले आणखी काही बोलणे झालेच तरी त्यातले शब्द महत्वाचे नसतात आणि लगेच विस्मरणात चालले जातात.  या दोन्ही मेळाव्यांमध्ये मी कुणाला काय काय सांगितले आणि कुणी कुणी मला काय काय सांगितले यातले एक वाक्यसुध्दा आज मला आठवत नाही, कारण त्याला मुळी काही महत्व नव्हतेच. मला कुणी किंवा मी कुणाला दुखावले असले तर ते लक्षात राहिले असते, पण अशा प्रसंगी कुणी तसे करत नाही. I am OK, you are OK. असेच संवाद होतात. पण ते झाले याचाच केवढा तरी आनंद मिळतो.

आपल्या ओळखीची माणसे भेटण्यामध्ये होणारा आनंद, त्यांची खुशाली पाहून होणारे समाधान याला मोल नसते. त्यासाठी होणारा खर्च आणि पडणारे कष्ट आपण आनंदाने सहन करतो. म्हणूनच मी अशा सगळ्या मेळाव्यांना हजर रहाण्याचा आवर्जून प्रयत्न करतो.

2 comments:

Nilesh Gurav said...

i think we meet people to gauge one another

Anand Ghare said...

आपापल्या परीने एकमेकांचे मूल्यमापन करणे हा माणसाचा स्वभाव आहे. तान्ही बाळेसुध्दा ते करत असतात आणि अनोळखी माणसाला पाहताच त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव बदलतांना दिसतात. पण अनेक लोकांना एकत्र भेटण्यामागे तोच एक उद्देश असतो असे म्हणता येणार नाही. एकाद्या माणसाकडून आपल्याला काही लाभ (किंवा हानी) होण्याची शक्यता आहे का हा विचार कळत न कळत आपल्या मनात येत असेलही, पण या लेखात मी ज्या मेळाव्यांचे वर्णन केले आहे त्यात तशी विशेष शक्यता नव्हतीच हे मी आधीच स्पष्ट केले आहे आणि ती नसतांनासुध्दा लोक एकत्र का जमतात याचे विश्लेषण केले आहे.