Friday, February 16, 2018

विज्ञान म्हणजे काय ?

'विज्ञान' हा हजारो वर्षे जुना संस्कृत शब्द आहे. 'विशिष्ट ज्ञान' असा त्याचा व्यापक अर्थ आहे. पण अलीकडच्या काळात 'विज्ञान' या शब्दाचा उपयोग इंग्रजीमधील 'सायन्स' या शब्दाच्या अर्थाने प्रचलित झाला आहे. कुठल्याही विषयाच्या पध्दतशीर ज्ञानाला 'शास्त्र' असे म्हणतात, पण धर्म, न्याय, नीती वगैरेंमध्ये पारंगत असलेल्या माणसांना शास्त्री म्हणून ओळखले जाते आणि 'सायंटिस्ट' या शब्दाला प्रतिशब्द म्हणून 'शास्त्रज्ञ' हा शब्द योजला जातो 'विज्ञान', 'शास्त्रज्ञ' आणि 'तंत्रज्ञान' हे शब्द मी अनुक्रमे 'सायन्स', 'सायंटिस्ट' आणि 'टेक्नॉलॉजी' या अर्थाने या लेखामध्ये लिहिले आहेत.

विश्वामधील निर्जीव पदार्थ आणि सजीव प्राणिमात्र यांचा पध्दतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान (किंवा सायन्स) हा या शब्दाचा सोपा अर्थ आहे. तसा अभ्यास करूनच मानवाने त्यांचेमधील गुणधर्म आणि त्यात होत असलेल्या बदलांचे नियम समजून घेतले आणि त्यांचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. हा अभ्यास आदिमानवाच्या काळापासून चालत आला आहे. प्राचीन भारतामध्ये एक अत्यंत विकसित आणि समृध्द अशी संस्कृती नांदत होती. असंख्य विद्वानांनी आणि शास्त्रज्ञांनी तिच्या प्रगतीला हातभार लावला होता. पण त्यांनी आपल्या नावांच्या नोंदी करून ठेवलेल्या नव्हत्या. कसलेही श्रेय स्वतःकडे घेण्याची कोणाची प्रवृत्तीच नव्हती. यामुळे त्या सर्व अनामिक शास्त्रज्ञांची ओळख आता उपलब्ध नाही.  इजिप्त, इराक, चीन, दक्षिण अमेरिका आदि भागांमध्येसुध्दा प्रगत संस्कृतींचे अवशेष मिळतात. त्यावरून तिकडल्या भागात झालेल्या विज्ञानामधील प्रगतीचा सुध्दा अंदाज घेता येतो.

कणाद ऋषींनी त्यांच्या वैशेषिक सूत्रामधून 'वैशेषिक' नावाचे तत्वज्ञान दिले होते. आगीच्या ज्वालांनी नेहमी वरच्या बाजूला जाणे आणि पावसाच्या पाण्याचे वरून खाली पडणे, पाण्याचे जमीनीवरून वहात जाणे अशा उदाहरणांवरून ते कशामुळे होत असेल असा विचार त्यात केला होता. निसर्गातील घटनांमध्ये कांही कार्यकारणभाव असतो असा विचार त्यात मांडला होता. विश्वामधील सर्व द्रव्ये अविभाज्य अशा सूक्ष्म कणांच्या संयोगामधून तयार झाली आहेत असे प्रतिपादन त्यांनी या चिंतनामधून केले होते, पण पुढे त्यांचा संबंध तत्वज्ञानाशी जोडला होता.  "मी जे शिकलो आणि प्रयोग करून सिध्द केले तेच मी या ग्रंथात लिहिले आहे. माझ्या शिष्यांनीसुध्दा स्वतःच्या अनुभवावरूनच त्यावर विश्वास ठेवावा." असे कांहीसे यशोधर नावाच्या विद्वानाने लिहिलेल्या ग्रंथात सांगितले होते. ही फक्त दोन उदाहरणे झाली. यातले विचार आधुनिक विज्ञानाच्या  जवळचे आहेत. "ईश्वराची करणी आणि नारळात पाणी" अशा प्रकारच्या श्रध्देच्या पलीकडे जाऊन या शास्त्रज्ञांनी निसर्गनियमांचा बारकाईने अभ्यास केला होता.

आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य आदि विद्वानांनी कांही प्रत्यक्ष निरीक्षणे केली, त्यावर तर्कसंगत विचार केला आणि गणित व खगोलशास्त्रामधले अनेक सिध्दांत मांडले. त्यांच्या ग्रंथांमध्येसुध्दा विज्ञानाबरोबर तत्वज्ञानाचा समावेश आहे. त्यामधले कोणते ज्ञान ते गुरूकडून शिकले, कोणते त्या काळातल्या इतर विद्वानांनी सांगितले होते आणि त्यांनी स्वतः त्यात कशाच्या आधारावर कोणती भर घातली या सर्वांचे खुलासेवार तपशील आज मिळत नाहीत, त्यामुळे ब्रह्मगुप्ताने किंवा वराहमिहिराने स्वतःच अमूक अमूक शोध लावले असे आज कदाचित ठामपणे सांगता येणार नाही. पण रूढ विचारांपेक्षा वेगळा विचार करणे आणि तो आपल्या रचनांमध्ये मांडणे याचे भारतामधील विद्वानांना स्वातंत्र्य होते हे त्यातून सिध्द होते. हे वातावरण विज्ञानाच्या प्रगतीला पोषक होते, पण या प्राचीन विद्वानांच्या वैज्ञानिक विचारांचा प्रसार मधल्या काळात कुठे तरी थांबला, त्यांनी दिलेल्या विज्ञानात नवी भर पडली नाही आणि त्यांचे मौलिक विचारही इथल्या जनमानसात आणि पारंपरिक शिक्षणपध्दतीत रुजले नाहीत. त्यांचे विज्ञान तत्वज्ञानात गुरफटलेले राहिले आणि झाकले गेले.  कित्येक शतकानंतर अलीकडच्या काळात ते थोडे थोडे करून उजेडात येत आहे.

 युरोपमधील अॅरिस्टॉटल, टॉलेमी आदि जुन्या ग्रीक विचारवंतांनी मांडलेले विज्ञानविषयक विचारसुध्दा त्यांच्या तत्वज्ञानातले भाग होते. निसर्गाच्या नियमांचा अभ्यास हा 'नॅचरल फिलॉसॉफी' या नावाने ओळखला जात होता. कोपरनिकस, गॅलीलिओ, पास्कल आदि मध्ययुगामधील शास्त्रज्ञांनी त्याच नावाने आजच्या सायन्स या विषयाचा अभ्यास केला होता. पण त्यांनी धीटपणे कांही नवे विचार मांडले. त्या काळातल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांच्या क्रांतिकारक विचारांना विरोध केल्यामुळे कांही शास्त्रज्ञांना छळही सोसावा लागला. त्यानंतर हे चित्र हळूहळू बदलत गेले. प्रत्यक्ष प्रमाणावर म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त होणा-या ज्ञानावर जास्त विश्वास ठेवायला हवा, ती नवी माहिती रूढ समजुतींशी विसंगत असली तर त्या समजुती तपासून पहायला हव्यात, गतकाळातल्या विद्वानांनी जे सांगितले होते तेवढेच बरोबर असा अट्टाहास असू नये असे विचार पाश्चात्य समाजामधल्या विचारवंतांनी मांडायला सुरुवात केली. सर फ्रान्सिस बेकर या इंग्रज माणसाने कुठलाही महत्वाचा शोध लावला नसला तरी त्याने वैज्ञानिक पध्दतीचा पुरस्कार करून विज्ञानयुगाचा पाया घालण्यात जो मोलाचा वाटा उचलला त्यामुळे विज्ञानाच्या इतिहासात त्याचे नाव आदराने घेतले जाते.

 दोन तीन शतकांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये विज्ञानाला तत्वज्ञानापासून वेगळे करण्यात आले. निसर्गनियमांचा अभ्यास अशी सायन्स या नावानिशी त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.  या जगात दोन प्रकारचे नियम असतात, मानवनिर्मित आणि निसर्ग निर्मित. मानवनिर्मित नियम किंवा कायदे कालानुसार बदलतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. निसर्गाचे नियम सर्वांना लागू होतात. हे निसर्गनियम आणि नैसर्गिक पदार्थांचे गुणधर्म चिरकाल टिकणारे असतात.

विज्ञानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ निसर्गाचे नियम आणि पदार्थांचे गुणधर्म फक्त समजून घेऊ शकतात, ते स्वतः नवे नियम तर करू शकत नाहीतच, त्यात कणभरसुध्दा बदल करू शकत नाहीत.  हे वैज्ञानिक निसर्गाचा अभ्यास करून त्यांना जे सत्य दिसेल, जाणवेल, जे आकलन होईल ते पध्दतशीरपणे मांडतात. विज्ञानामधील शोध, सिध्दांत, नियम वगैरे प्रयोगामधून सिध्द करता येण्यासारखे असतात. विज्ञानामध्ये तर्कशुद्ध विचाराला महत्व असते. कुठल्या तत्वाचा कोणी शोध लावला यापेक्षा तो कसा सिद्ध केला गेला हे महत्वाचे असते. सिध्दांतामागे असलेले विचार  किंवा प्रयोगामधून केलेली निरीक्षणे यांचा सखोल अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढले जातात.  त्यांचे काम सिध्दांत, निरीक्षण, परीक्षण, विश्लेषण आणि त्यामधून निघणारे निष्कर्ष अशा क्रमवार पध्दतीने सुसंगतपणे मांडले जाते. इतर तज्ज्ञ त्यावर साधक बाधक विचार आणि चर्चा करतात, त्यांच्या मनातल्या शंका मांडतात, त्यांचे निरसन झाल्यानंतरच ते मान्य केले जाते. अशा प्रकारची वैज्ञानिक पध्दत आज जगभर रूढ झाली आहे.

 प्रयोग करतांना किंवा एरवीसुध्दा अनेक वेळा अनपेक्षित किंवा धक्कादायक अनुभव येतात, त्यामागे असलेली शास्त्रीय कारणे आपल्याला माहीत नसली तरी ती असतात. ती शोधून काढण्यामधूनच विज्ञानात प्रगति होत जाते.

विज्ञानाच्या विकासाबरोबरच तंत्रज्ञानात सुधारणा होत गेल्या. प्रयोग करण्यासाठी नवनवी साधने आणि उपकरणे तयार होत गेली. उदाहरणार्थ दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यंत्रांमुळे मानवी दृष्टीने पहाण्याची क्षमता अनेकपटीने वाढली. अंतर, आकार, वजन, वेळ आदि गोष्टी मोजण्याची साधने खूप पूर्वीपासून उपयोगात आणली गेली होती आणि त्या गणनांचा उपयोग करण्यासाठी गणितशास्त्राचा विकास झाला होता. विज्ञानामध्ये नेमकेपणाला महत्व असल्यामुळे सर्व मोजमापे अचूक असावी लागतात. जसजसे नवे शोध लागत गेले त्याबरोबरच नवनवी उपकरणे तयार केली गेली आणि त्या उपकरणांचा दर्जा सुधारत गेला. उदाहरणार्थ विजेचा शोध लागल्यावर तिचा दाब (व्होल्टेज), प्रवाह (करंट), प्रतिरोध (रेझिस्टन्स) वगैरे मोजण्याची गरज पडली आणि त्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स तयार झाली. अधिक क्षमता असलेल्या चांगल्या उपकरणांच्या सहाय्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेगही झपाट्याने वाढत गेला.

काळाबरोबर विज्ञानाची एक परिभाषा तयार झाली आहे आणि त्यातील प्रत्येक संज्ञेची स्पष्ट व्याख्या केली जाते. उदाहरणार्थ फोर्स, प्रेशर, स्ट्रेस हे इंग्रजी शब्द वाङमयामध्ये कदाचित एकसारखे वाटत असले तरी विज्ञानाच्या परिभाषेत त्यांना विशिष्ट अर्थ आहेत, तिथे एका शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरता येत नाही. सूत्रे आणि समीकरणे मांडण्यासाठी या संज्ञांना काही चिन्हे दिली आहेत, त्यांच्या गणनेसाठी एकके (युनिट्स) ठरवली गेली आहेत आणि त्यांचे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मानकीकरण (स्टँडर्डायझेशन) झाले आहे. अशा प्रकारे आजचे विज्ञान खूप पध्दतशीर आणि नियमबध्द झाले आहे.

प्रयोग करतांना किंवा एरवीसुध्दा अनेक वेळा विसंगत, अनपेक्षित किंवा धक्कादायक अनुभव येतात, त्यामागे असलेली शास्त्रीय कारणे आपल्याला त्या वेळी माहीत नसतात. ती चिकाटीने शोधून काढण्यामधूनच विज्ञानात प्रगति होत जाते. अंतर्ज्ञान, साक्षात्कार, दृष्टांत, चमत्कार यासारख्या संकल्पनांचा विज्ञानाच्या मुख्य प्रवाहामध्ये समावेश होत नाही. ज्ञानेंद्रियांच्या मदतीशिवाय मिळणा-या अगम्य आणि अतींद्रिय ज्ञानाचा अभ्यास 'एक्स्ट्रा सेन्सरी पर्सेप्शन' (ईएसपी) या नावाखाली केला जातो. विज्ञानाच्या निकषांमध्ये बसणारे आणि सर्वमान्य होतील असे नवे शोध त्या अभ्यासातून लागले तर त्यांचा समावेश विज्ञानात केला जाईल.

प्राचीन काळापासून ते आज प्रचलित असलेल्या विज्ञानाचे स्वरूप अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.

--------------------------------------------------------------------------------------

2 comments:

Anonymous said...

माझ्या माहितीप्रमाणे विज्ञान म्हणजे अनुभवावर आधारलेले (अनुभवाधिष्ठित) ज्ञान. ज्ञान हे तर्काधिष्ठित असते.

Anand Ghare said...

आपले नांव खाली दिले असते तर बरे झाले असते.
विज्ञान आणि ज्ञान या संस्कृत शब्दांचे मुळात जे काही अर्थ असतील आणि निरनिराळ्या विद्वानांनी आपापल्या परीने त्यात आणखी किती गुंता करून ठेवलेला असेल, त्यात मला रस नाही. सायन्स या शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून ज्या विज्ञानाचा उल्लेख केला जातो ते मी या लेखात विस्ताराने लिहिले आहे.