Wednesday, December 27, 2017

वर्ष २०१७ला निरोप (उत्तरार्ध)

संपायला आलेल्या इसवी सन २०१७ मध्ये माझ्याकडून काय काय घडले यातला कांही भाग मी यालेखाच्या पूर्वार्धात दिला होता. आणखी कांही आठवणी या भागात. ...

बाय बाय २०१७ (भाग ६) ....... दंतकथा

वयोमानानुसार माझे दांत एक एक करून मला सोडून जात होते आणि त्यांच्या जागी पार्शल डेंचर, ब्रिज वगैरे लावून माझे काम चालले होते. २०१७च्या सुरुवातीलाच शेवटचा पूलही कोसळला आणि माझ्या वरच्या दांतांची पंक्ति एकदंत झाली. आता कांहीही चावून खाणेच अशक्य होऊन गेले. दंतवैद्याकडे गेल्यावर त्याने सांगितले की आता वरच्या बाजूला संपूर्ण कवळी बसवणे हाच एक उपाय आहे. पण तिथे नवी पलटण आणून बसवण्यासाठी उरलेल्या एकांड्या खंबीर शिलेदाराला मात्र मलाच जबरदस्तीने रजा द्यावी लागली. पडलेल्या पुलांच्या आणि तुटलेल्या दांतांच्या खाली त्यांची मुळे हिरड्यांमध्ये रुतलेली होती. त्यांना खोदून बाहेर काढणे म्हणजे एक शस्त्रक्रियाच होती. ती केल्यानंतर हिरड्यांना झालेल्या जखमा भरून निघण्यासाठी आणि आलेली सूज उतरण्यासाठी दोन महिने थांबावे लागले. दांत काढल्यामुळे रिकाम्या जागेत आतल्या बाजूला गेलेला वरचा ओठ फारच विचित्र दिसत होता. त्याला  झाकण्यासाठी तिथे काही दिवस मर्दोंकी खेती (इति राजेश खन्ना) केली. यामुळे ते छायाचित्रही या दंतकथेचाच भाग आहे.
-----------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ७)

माझ्या लहानपणी आमच्या घरात आणि गांवातसुध्दा खूप धार्मिक वातावरण होते. आईवडील किंवा आणखी कोणा मोठ्यांचे बोट धरून मी नेहमीच कुठल्या ना कुठल्या देवळात जात होतो. कांही देवळांमध्ये शंभर माणसेसुध्दा दाटीवाटीने बसू शकतील असे प्रशस्त सभामंटप होते. तिथे निरनिराळे उत्सव साजरे होत असत. टाळमृदुंगांच्या तालावर एका सुरात गायिलेली भजने ऐकायला मजा येत असे, तसेच काही ह.भ.प.कीर्तनकारबुवा पुराणातल्या सुरस आणि अद्भुत कथा त्यांच्या रसाळ वाणीमधून छान रंगवून सांगत असत. अशा कार्यक्रमांना लहान मुलेसुध्दा उत्साहाने येऊन बसत. गांवापासून जवळच असलेल्या कल्हळ्ळीच्या व्यंकटेशाच्या जागृत देवस्थानावर गांवातल्या लोकांची अपार श्रध्दा होती. तिथे आणि आणखीही कांही ठिकाणी दरवर्षी उत्सवाबरोबर जत्रा भरायच्या.  त्यांची तर आम्ही मुले वर्षभर आतुरतेने वाट पहात असू. देवळात जाऊन देवदर्शन घेणे हा त्या काळात आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता.

माझे वडील दरवर्षी नेमाने पंढरपूरची वारी करायचे. त्याशिवाय कोल्हापूर, तुळजापूर, नरसोबाची वाडी वगैरे दक्षिण महाराष्ट्रातल्या देवस्थांनांचे उल्लेख मोठ्या लोकांच्या बोलण्यात नेहमी यायचे. या सर्वांबद्दल माझ्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले होते. पुढे संधी मिळेल तेंव्हा मी सुध्दा त्या देवस्थानांचे दर्शन घेतले. घरातली मोठी माणसे काशीस जावे नित्य वदावे असे म्हणायची पण त्या काळात ते फारच कठीण होते. मला मात्र पुढील आयुष्यात काशी आणि रामेश्वर या दोन्हींचे दर्शन घडले. पर्यटन आणि ऑफीसचे काम या निमित्याने मी देशभर खूप भटकंती केली. त्यात मी ज्या ज्या भागात गेलो तिथली प्रेक्षणीय स्थळे पाहिली तसेच तिथल्या प्रसिध्द देवस्थानांचे दर्शनही घेतले. अशा प्रकारे मी बराच पुण्यसंचय केला असला तरी निखळ भक्तिभावाने मुद्दाम ठरवून अशी कुठली तीर्थयात्रा केली नाही. मला तशी आंतरिक ओढही कधी लागली नाही. नोकरीच्या काळात माझे घराच्या आजूबाजूच्या देवळांमध्ये जाणेसुध्दा कमीच झाले होते.

२०१७ मध्ये मी इथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात यायला लागलो. ती सगळी मंडळी जात्याच आणि संस्काराने भाविक प्रवृत्तीची आहेत. पूजापाठ, उपासतापास करणारी आहेत. महाशिवरात्र, एकादशी, नवरात्र यासारख्या विशेष दिवशी या वर्षी मीही त्यांच्याबरोबर इथल्या निरनिराळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. कॉलनीमधल्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक आरतीच्या वेळी हजर राहून आरत्या म्हंटल्या. गणपतिअथर्वशीर्षाची पारायणे केली. लहानपणी पाठ झालेल्या आरत्या, मंत्र आणि स्तोत्रे अजूनही आठवतात याचे माझे मलाच थोडेसे कौतुक वाटले.
------------------------------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ८)

आमच्या शाळेच्या आवारात घसरगुंडी, झोपाळे, सीसॉ, उभ्या आडव्या शिड्या वगैरे साधने होती आणि लहानपणी आम्ही त्यावर मनसोक्त खेळत होतो. मी मुंबईला आलो त्या काळात चर्चगेट स्टेशनच्या जवळ आझाद मैदानात दरवर्षी कसले ना कसले प्रदर्शन लागत असे आणि त्याचाच एक भाग म्हणून जायंट व्हील, मेरी गो राऊंड वगैरे मुलांना खेळण्याची साधने ठेवलेली असत आणि तिकडेच अधिक गर्दी होत असे. त्यासाठी माफक शुल्क असे आणि मुलांबरोबर मोठी माणसेही त्यात बसायची हौस भागवून घेत असत. पुढे अशी प्रदर्शने शहराच्या इतर अनेक भागांमध्ये भरायला लागली.

झी टीव्हीचे श्री.सुभाषचंद्र यांनी एस्सेलवर्ल्ड तयार केले आणि "एस्सेलवर्ल्ड में रहूँगा मै, घर नही जाऊँगा मै।" या त्याच्या जाहिरातीने देशभरातल्या मुलांवर जादू केली. एस्सेलवर्ल्डला भेट देणे हा जिवाची मुंबई करण्याचा महत्वाचा भाग होऊन बसला. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना घेऊन आम्हीही एस्सेलवर्ल्डला गेलो आणि तिथली अजस्त्र यंत्रे पाहून थक्क झालो. असले जंगी रोलरकोस्टर आणि झुलते पाळणे मी यापूर्वी फक्त सिनेमातच पाहिले होते आणि ते फॉरेनमध्ये असतात असे ऐकले होते. एस्सेलवर्ल्डची प्रवेश फीच चांगली घसघशीत असली तरी एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाल्यामुळे पैसे वसूल झाले. पुढे तीन चार दिवस दुखत असलेल्या अंगाने वाढलेल्या वयाची आठवण मात्र करून दिली. 

आमच्या युरोपदर्शनाच्या पर्यटनात एक संपूर्ण दिवस पॅरिसच्या जवळ डिस्नेलँडसाठी होता. आमच्या पाठीचे मणके आणि गरगरणारा मेंदू यांचा विचार करून आम्ही जास्त भयानक राइड्स टाळल्या, पण तरीसुध्दा तिथल्या अद्भुत जगात स्वतःला विसरायला लावणा-या अनेक गोष्टी होत्या. त्यालाही दहा वर्षे होऊन गेली. २०१७ मध्ये माझ्या दोन्ही मुलांनी मिळून सहकुटुंब इमॅजिकाला भेट द्यायचे ठरवले. पुण्याहून निघाल्यानंतर अडीच तीन तास प्रवास करून खोपोलीजवळ असलेल्या त्या अजब मौजउद्यानापर्यंत (अॅम्यूजमेंट पार्क) पोचल्यावर तिथे पाहतो तो गेटच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. आणखी तासभर उन्हात उभे राहून तपश्चर्या केल्यावर आत प्रवेश मिळाला. पण आत मात्र जिकडेतिकडे आनंदीआनंदच पसरला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पार्कमध्ये अनेक गंमती होत्या आणि त्या सगळ्या व्यवस्थितपणे चालत होत्या. रात्री केलेली रोषणाई तर डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.  आम्ही केलेल्या तपश्चर्येचे सार्थक झाले.
--------------------------------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ९)


जगप्रसिध्द ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आयुका (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना झाली असल्याचे मला पहिल्यापासून माहीत होते, पण एनसीआरए (National Centre for Radio Astrophysics) हे नांव मी दोन वर्षांपूर्वीच ऐकले. या दोन्ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवाराच्या मागच्या बाजूला खडकी औंध रस्त्यावर आहेत. भारतातील अनेक विश्वविद्यालयातील विद्यार्थी आणि संशोधक आयुकामध्ये खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञानाचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करत आहेत.  एनसीआरए ही संस्था मुख्यतः नारायणगांवजवळील खोदाड येथे स्थापन केलेल्या विशालकाय दुर्बिणीचे (Giant Metrewave Radio Telescope) काम पाहते.
ही अशा प्रकारची जगातील सर्वात मोठी दुर्बिण आहे आणि जगभरातले संशोधक इथे येऊन प्रयोग आणि निरीक्षणे करतात. या खास प्रकारच्या दुर्बिणीमध्ये परंपरागत दुर्बिणीसारख्या लांब नळकांड्या आणि कांचेची भिंगे नाहीत. ४५ मीटर एवढा प्रचंड व्यास असलेल्या ३० अगडबंब अँटेना मिळून ही दुर्बिण होते. या अँटेनासुध्दा १०-१२ वर्गकिलोमीटर्स एवढ्या विस्तृत भागात एकमेकीपासून दूर उभ्या करून ठेवलेल्या आहेत. यातली प्रत्येक अँटेना एका गोल आकाराच्या इमारतीच्या माथ्यावर मोठ्या यंत्रांना जोडून उभारल्या आहेत. आकाशातील विशिष्ट ग्रह किंवा तारे यांचे निरीक्षण करण्यासाठी यातली प्रत्येक अँटेना त्यावर फोकस करून त्याच्यावर नजर खिळवून ठेवावी लागते. यासाठी तिला जोडलेल्या यंत्रांमधून ती अत्यंत मंद गतीने सतत फिरवत रहावे लागते.
हे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र पहायची मला खूप उत्सुकता होती, पण त्यासाठी आधी सरकारी परवानग्या घ्याव्या लागतात आणि वाहनाची व्यवस्था करायला हवी. हे कसे साध्य करावे याचा मला प्रश्न पडला होता. पण ११-१२ सप्टेंबरला मला अचानक एका मित्राचा फोन आला आणि मी एनसीआरएमधल्या इंजिनिअरांना एकादे व्याख्यान देऊ शकेन का असे त्याने विचारले. मी गंमतीत उत्तर दिले, "मी तर नेहमीच तयारीत असतो, पण माझे भाषण ऐकणाराच कुणी मिळत नाही." मला ही अनपेक्षित संधी मिळत असल्याने अर्थातच मी लगेच माझा होकार दिला.

१७ सप्टेंबर २०१७ ला खोदाडला जीएमआरटीमध्ये या वर्षीचा इंजिनियरदिन साजरा केला गेला. त्यात मुख्य पाहुणे आणि व्याख्याता म्हणून मला पाचारण करण्यात आले आणि अर्थातच जाण्यायेण्याची सोय आणि पाहुण्याला साजेशी बडदास्त ठेवली गेली. निवृत्त होऊन १२ वर्षे झाल्यानंतर मला अशा संधी क्वचितच मिळतात, ती या वर्षी मिळाली,  अनेक तरुण इंजिनियरांना भेटायला मिळाले आणि मुख्य म्हणजे जीएमआरटीमधली जगातली सर्वात मोठी रेडिओदुर्बिण विनासायास अगदी जवळून आणि आतून बाहेरून पहायला मिळाली.

-------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग १०)

मला समजायला लागल्यापासून आजपर्यंत माझा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ कशात जात असेल तर तो वाचन आणि लेखन यात जातो, आधी अभ्यास, मग ऑफिसमधले काम आणि सेवानिवृत्तीनंतर अवांतर, म्हणजे बोलाच्याच चुलीवर बोलाचाच तवा ठेऊन त्यावर लश्करच्या भाकरी भाजणे!
"तू हा उपद्व्याप कशाला करतोस?" असे मला कांही लोक विचारतात.
मी त्यांना सांगतो, "कारण मला इतर कांही गोष्टी करायला आवडतात, पण त्या जमत नाहीत आणि कांही गोष्टी जमतात, पण त्यात माझे मन रमत नाही. वाचन आणि लेखन मला खूप आवडते आणि थोडे फार जमते, म्हणजे कांही लोक मला तसे सांगतात."
त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर अवांतर वाचन आणि लेखन यात आपला बराचसा फावला वेळ घालवायला लागलो. आनंदघन या नावाची अनुदिनी (ब्लॉग) सुरू करून दिली, आणखी कांही खाती उघडली आणि त्यावर चार चार शब्द टाकत राहिलो. सात आठ वर्षांनंतर त्या कामाचा वेग मंद होत गेला होता. याला इतर कांही तांत्रिक, शारीरिक, मानसिक वगैरे कारणे होती, तसेच ईमेल्स, फेसबुक, वॉट्सअॅप वगैरेंच्या आगमनामुळेही ब्लॉगिंगवर परिणाम झाला होता.
या वर्षी म्हणजे २०१७मध्ये ईमेल्स, फेसबुक, वॉट्सअॅप वगैरेंचा व्याप तर वाढतच होता, पण फेसबुक आणि वॉट्सअॅप यावरील पोस्ट्स क्षणभंगुर असतात आणि आता ईमेलग्रुप्स कालबाह्य होऊ लागले आहेत. हे पाहता मी पुन्हा ब्लॉगिंगकडे जरासे जास्त लक्ष देऊ लागलो. या ठिकाणी लिहिलेले लेख बराच काळ तिथेच राहतात आणि वाचकांना कालांतरानेसुध्दा ते पाहता येतात. माझे लिहिणे कमी झाल्यानंतरसुध्दा वाचकांच्या टिचक्यांची संख्या वाढतच गेली यावरून असे दिसते. त्यांच्या सोयीसाठी मी अनुक्रणिका तयार करून त्यांच्या लिंक्स मुख्य पानावर टाकायचे काम केले.
त्याशिवाय या वर्षी मला शिक्षणविवेक या नियतकालिकाच्या वेबव्हर्जनवर लिहायची संधी मिळाली आणि मी शास्त्रीय शोध व संशोधक यांच्यावर एक लेखमालिका सुरू केली. या वर्षी मराठी विश्वकोशासाठी लेख लिहायची संधीसुध्दा मला मिळाली आणि मी तयार करून पाठवलेले पहिले दोन लेख (त्यांच्या परिभाषेत नोंदी) आता तज्ज्ञांकडे परिक्षणासाठी दिले गेले आहेत. अशा प्रकारे २०१७ मध्ये मी लेखनाच्या बाबतीत एक दोन लहानशी पावले पुढे टाकली.


1 comment:

Nilesh Gurav said...

keep writing