Sunday, August 04, 2013

माझ्या शाळेतल्या मित्रांनो

अंत्या पेठे, सु-या देवधर, पम्या जोशी, अरव्या पोटे, राजा फाटक, लक्ष्या सोमण, अन्या रास्ते, गोटखिंडी .... माझ्या जमखंडीतल्या शाळेतल्या मित्रांनो, आता तुम्ही कुठे आहात? तुम्ही म्हणाल, "पन्नास वर्षं झोपला होतास का रे?" तुमचं म्हणणंही अगदी बरोबर आहे. माझा अपराध मला मान्य आहे. त्यासाठी दोन्ही कान पकडून उठाबशा काढायला मी तयार आहे. पण शाळा सोडल्यानंतर मी ज्या परिस्थितीतून गेलो ती तुम्हीही थोडी अनुभवली असेलच. त्या काळात आतासारखे फोन नव्हते, ई मेल नव्हती त्यामुळे एकमेकांना कसा संपर्क करायचा हा प्रॉब्लेम होता खरा, पण ते एक निमित्य होते. त्याहून मोठे कारण म्हणजे मला माझेच प्रॉब्लेम सोडवता सोडवता नाकी नऊ येत होते. घर आणि शाळा या दोन्ही लहानशा पण सुरक्षित डबक्यांमधून एकदम बाहेरच्या जगाच्या  अफाट सागरात एकट्याने गटांगळ्या खात होतो.  त्यात मी अगदी बुडून गेलो होतो. आपले नाक कसेबेसे पाण्याबाहेर ठेवायची धडपड करत होतो. त्यात पुन्हा आधी सायन्स कॉलेज, मग इंजिनियरिंग कॉलेज, त्यानंतर नोकरी अशा तीनदा जागा बदलल्या प्रत्येक नव्या जागी नव्या वातावरणात मला हात देऊन मदत करायला नव्या मित्रांची गरज पडत होती आणि ते मिळत होते. त्यातून नवी विश्वे तयार होत गेली आणि आधीच्या जगाशी संबंधच राहिले नाहीत. ते कसे जोडायचे हेही समजत नव्हतं आणि ते जोडायला वेळही मिळत नव्हता. शाळा सोडल्यानंतर सगळे जण दाही दिशांना पांगलेले. कुणाकुणाला आणि कुठे शोधणार?

मध्यंतरी एक दोन लग्नसमारंभांमध्ये सुश्र्या आपटे भेटला होता, त्याच्याकडून कळले की वाश्या आपल्याला सोडून गेला. काही वर्षांनी समजले की सुश्र्यापण राहिला नाही. अगदी योगायोगाने पांबिं परांजपेशी दूरचा नातेसंबंध जुळला होता, त्याच्या घरीही जाऊन आलो, पण तोसुध्दा जास्त काळ राहिला नाही. हणमू मंगळवेढेकर मात्र माझ्याच खात्यात पण निराळ्या जागी नोकरीला लागला होता. हे मला उशीरानेच समजले, पण त्याची अधूनमधून भेट होत होती. आता आम्ही दोघेही रिटायर होऊन निरनिराळ्या ठिकाणी राहतो. त्यामुळे पुन्हा कसला संपर्क राहिला नाही. आता नव्या जागी नवे मित्र जोडणे जवळजवळ अशक्यच दिसते. तसे मला आता खूप नवे मित्र मिळाले आहेत, पण ते सगळे इंटरनेटच्या आभासी दुनियेत आहेत. स्क्रीनवर दिसतात आणि एक दोन ओळी लिहून बोलतात.

आज म्हणे मैत्रीदिवस आहे. अशा वेळी तुमची खूप खूप आठवण येते. एका काळी आपण रोज शाळेत तर भेटत होतोच, पण संध्याकाळी खेळायला जाणं, नंतर कट्ट्यावर बसून तासन् तास खिदळत राहणं, एकमेकांच्या खोड्या काढणं, फिरक्या घेणं, एकमेकांना चिडवणं, कधीकधी तर रडवणं, कडाडून भांडणं, कट्टी करणं, पुन्हा गळ्यात गळे घालणं. हे सगळं त्यानंतर कधीच मला करायला मिळालं नाही. कुणीतरी हळूच मागून आपल्या पाठीत धपाटा मारावा, आपण कळवळून "&# $@* #, माजलास का ?" असे त्याला डाफरावे यातली मजा औरच असते. हे फक्त आपले बालमित्रच म्हणजे तुम्हीच करू शकता. आता तसे करणारे कोणीच आसपास नाहीत याची मनाला चुटपुट लागते आहे. खरंच तुम्ही मला पुन्हा कुठे भेटाल का?

No comments: