Sunday, June 23, 2013

तार (टेलिग्रॅम)

तार (टेलिग्रॅम) (पूर्वार्ध)

दिवाळीच्या फटाक्यांमध्ये फुलबाजांना एक महत्वाचे स्थान असते. लोखंडाच्या एका जराशा कडक तारेला सगळ्या बाजूने शोभेची दारू चिकटवून फुलबाज्या तयार करतात. एकादा मोठा माणूस किंवा मुलगा आधी फुलबाजी पेटवतो आणि लहानग्याच्या हातात देतो. ते मूल बिचकत बिचकत त्या तारेचे टोक आपल्या चिमुकल्या चिमटीत पकडते हे दृष्य आपण दर दिवाळीला पाहतो. कुठल्याही प्रकारच्या तारेचा पहिला स्पर्श आणि 'तार' या शब्दाशी माझी ओळख सर्वात आधी अशीच झाली असावी. लहानपणी इतर काही तारासुध्दा माझ्या पहाण्यात आल्या होत्या. त्या काळात नायलॉनच्या दोऱ्या नसायच्या, कपडे वाळत घालण्यासाठी छताला दांड्या (आडव्या काठ्या) टांगून ठेवलेल्या असत आणि कपडे उन्हात वाळवण्यासाठी गच्चीवर तात्पुरत्या तारा बांधत. वीज वाहून नेण्यासाठी अंडरग्राउंड केबल्स नव्हत्या. रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर विजेचे खांब उभारलेले असायचे आणि एका खांबावरून दुसऱ्या खांबावर अशा विजेच्या तारा नेलेल्या असत. आमच्या घराजवळच्या खांबावरून दोन तारा आमच्या घरात आणल्या होत्या आणि घरातल्या वायरिंगच्या जाळ्याला त्या जोडल्या होत्या. इलेक्ट्रिशियन (त्या काळात त्याला वायरमन म्हणत) सोडून अन्य कोणीही त्या तारांना स्पर्श करण्याचे धाडस करत नसे आणि कोणी हा वेडेपणा केलाच तर त्याला त्याची केवढी मोठी किंमत द्यावी लागली याच्या गोष्टी घोळून घोळून सांगितल्या जात असत. रस्त्यावर खेळ दाखवणारे डोंबारी लोक दोन बाजूला दोन तिगाडी ('ए फ्रेम्स') उभ्या करून त्याला एक तार बांधायचे आणि त्या तारेवर तोल सांभाळून कौशल्यपूर्ण कसरत करून दाखवायचे. त्यावरूनच 'तारेवरची कसरत' हा वाक्प्रचार निघाला. भजनाच्या आणि गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये वीणा, तंबोरा, सतार, व्हायलिन अशा प्रकारची तंतूवाद्ये हमखास दिसत असत आणि त्यांच्या तारांना छेडून पहाण्याची अनावर उत्सुकता वाटत असे, पण तशी संधीही मिळत नसे आणि धीरही होत नसे. अशा प्रकारे 'तार' ही वस्तू अनेक रूपाने भेटत असली तरी 'तार' या शब्दाचा एक महत्वाचा अर्थ मला बराच काळ कळला नव्हता. 

मी सात आठ वर्षाचा असतांना एकदा सकाळी एक पोस्टमन आमच्या घरी आला. आमचा नेहमीचा पोस्टमन थोडा वयस्क होता आणि तो दुपार टळून गेल्यानंतर हळू हळू चालत डुलत येत असे. पण सकाळी उजाडताच आलेला हा तरुण पोस्टमन वेगळा होता आणि सायकलवर बसून घाईघाईत आला होता. त्याला पाहून मी त्याच्याकडून पत्रे घेण्यासाठी दारात गेलो तेंव्हा त्याने मला घरातल्या कोणा मोठ्या माणसाला बोलावून आणायला सांगितले. अत्यंत गंभीर मुद्रेने काही सांगून त्याने आपल्या हातातला लिफाफा दिला. शाळेत जाऊन इंग्रजी शिकलेल्या घरातल्या कोणी तरी त्यातला मजकूर वाचून त्याचा अर्थ सांगितला आणि घरात एकच हलकल्लोळ माजला. आमच्या घरातली रडारड ऐकून शेजारी धावत आले, त्यांनी जाऊन गावात रहात असलेल्या आमच्या इतर नातेवाईकांना ही बातमी सांगितली आणि ते सुध्दा धावत आले. मला कोणी काही सांगत नव्हते आणि तो भयाण गोंधळ पाहता काही विचारायचा धीर होत नव्हता. "आपले महादेवराव गेले अशी 'तार' आली आहे." असे कानावर आले. त्यातल्या 'गेले' याचा अर्थ थोडासा समजला, पण त्याचे कोणते गंभीर परिणाम होणार आहेत हे समजण्याचे माझे वय नव्हते. ही कसली 'तार' आणि कुठे आली आहे, हे मात्र काही लक्षात येत नव्हते. पोस्टमनने तर एक पाकिट दिले होते आणि त्यात चतकोर कागद होता. याचा कुठल्या तारेशी कसला संबंध होता?

माझ्या मोठ्या भावाने त्याच्या माहितीनुसार याचा थोडा उलगडा केला. नेहमीची पत्रे आधी कोणीतरी हाताने लिहितो, त्याच्या गावातल्या पोस्टात टाकतो, तिथून रेल्वे, बस वगैरेमधून प्रवास करून ती आपल्या गावातल्या पोस्टात येतात आणि मग आपला पोस्टमन ती आपल्याला आणून देतो. यात काही दिवस जातात. पण तार म्हणजे टेलिग्रॅममधला मजकूर मात्र एका गावामधून दूरवरच्या दुसऱ्या गावातसुध्दा एका विशिष्ट यंत्रांमधून क्षणभरात येतो आणि इथला पोस्टमन तो एका वेगळ्या कागदावर लिहून आपल्याला आणून देतो. त्यामुळे आपल्याला तो अर्जंट निरोप लगेच समजतो. यामुळे आत्ता तासाभरापूर्वी बाहेरगावाहून केलेली ही तार आपल्याला लगेच मिळाली.  त्या गावापासून आपल्या गावापर्यंत एक प्रकारची तार जोडलेली असते, तिच्यातून हा निरोप आपल्याकडे आला म्हणून त्याला 'तार' असे म्हणतात.

त्यानंतर मी जेंव्हा जेंव्हा पोस्ट कार्डे, पाकिटे, तिकीटे वगैरे आणण्यासाठी पोस्ट ऑफीसात जात असे तेंव्हा इतर खिडक्यांकडे लक्ष देऊन पहात होतो. तार पाठवण्यासाठी एक वेगळी खिडकी होती. तिथे कधी गर्दी असायची नाही. एकादा माणूस तिथे आला तर तो एक फॉर्म मागून घेऊन आणि तो भरून देत असे आणि त्यात काय किंवा किती लिहिले आहे हे वाचून त्याप्रमाणे तिथला क्लार्क तार पाठवण्याचा चार्ज मागत असे. खिडकीच्या आतल्या बाजूला एक यंत्र होते. अधून मधून कधीतरी त्यातून कड कट्ट कडकट्ट असे आवाज येत असत आणि एक माणूस लक्ष देऊन तो आवाज ऐकून काही तरी लिहून घेत असे. हळूहळू या सगळ्या निरीक्षणांचा अर्थ समजत गेला. मोर्स नावाच्या शास्त्रज्ञाने डॉट् आणि डॅश या दोनच चिन्हांचा उपयोग करून एक सांकेतिक लिपी तयार केली. विशिष्ट वेळा आणि विशिष्ट क्रमाने ही चिन्हे लिहिली की त्यातून ए, बी, सी डी यासारखे एक एक  अक्षर तयार होते आणि त्या अक्षरांमधून शब्द तयार करता येतात. डॉट् आणि डॅश या दोन चिन्हांच्या ऐवजी कड आणि कट्ट अशा दोन आवाजांमधून तशीच अक्षरे तयार करता येतात. पूर्वीच्या काळातल्या तारायंत्रांमध्ये एक विजेचा लोहचुंबक आणि वर खाली होणारा लहानसा हातोडा असे. त्या लोहचुंबकाला गुंडाळलेल्या तारेमधून विजेचा प्रवाह नेला आणि तो बंद केला तर तो हातोडा वर खाली होऊन खाली ठेवलेल्या पट्टीवर आदळून ध्वनि निर्माण करत असे. विजेचा प्रवाह सुरू किंवा बंद करण्यासाठी एक बटन असे. ते कमी किंवा जास्त वेळ दाबून दोन निरनिराळे ध्वनि उत्पन्न केले जात. निरोपात जी अक्षरे असतील त्याप्रमाणे हे ध्वनि तयार करून एका बाजूच्या यंत्रामधून पाठवले की दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या यंत्रामध्ये तसेच आवाज निघत आणि त्या ठिकाणी बसलेला ऑपरेटर ते आवाज ऐकून त्यांचे रूपांतर अक्षरांमध्ये करत असे. हा निरोप कोणाला द्यायचा आहे त्या माणसाचे नाव, गाव आणि पत्ता वगैरेसुध्दा अशाच प्रकारे सांकेतिक खुणांमधून पाठवले जाई. ते पाहून त्या गावातला पोस्टमन ते पत्र (तार) त्या माणसाच्या घरी नेऊन देत असे. या कामासाठी एक वेगळा पोस्टमन ठेवलेला असे. तो ही तार त्वरेने पोचती करत असे.

अशा प्रकारचा पहिला प्रयोग अमेरिकेत यशस्वी करून दाखवला गेल्यानंतर दहा वर्षांच्या कालावधीतच ब्रिटिशांनी हे तंत्रज्ञान भारतामध्ये आणले आणि कोलकाता, मुंबई, पेशावर, चेन्नै यासारख्या दूरवर असलेल्या शहरांना जोडणारे तारांचे जाळे पसरवले. भारतासारख्या विशाल देशाच्या कानाकोपऱ्यामधील ठिकाणांबरोबर संपर्क ठेवण्यासाठी तारायंत्रांचा खूप उपयोग होऊ शकेल हे त्यांनी ओळखले असणार. म्हणजे तार किंवा टेलिग्रॅम आता दीडशे वर्षांहून जुने झाले आहे. ज्या काळात ही सेवा सुरू झाली होती तेंव्हा विजेचे उत्पादन आणि वितरण सुरू झालेले नव्हते. टेलिग्रॅम पाठवण्यासाठी आवश्यक असणारी वीजसुध्दा त्या यंत्रामध्येच तयार करायची व्यवस्था होती. त्यासाठी हाताने एक चक्र फिरवून वीजनिर्मिती करण्यासाठी एका डायनॅमोचा समावेश त्यात होता. अशा प्रकारची स्वयंपूर्ण यंत्रे माझ्या लहानपणी मीसुध्दा पाहिली आहेत. अनेक लहान रेल्वेस्टेशनांमध्ये विजेचे दिवे नसले तरी तारायंत्रे असत आणि हँडल मारून ती सुरू केली जात.
 . . . . . . . . .  . . . . . . . . . .

तार (टेलिग्रॅम) (उत्तरार्ध)

वीजवाहक तारेप्रमाणेच पोस्टाने आलेली तारसुध्दा नेहमी जबरदस्त शॉक देते असा माझ्या आधीच्या पिढीमधील लोकांचा अनुभव होता. त्यामुळे 'तार' या शब्दाची एक प्रकारची दहशत असायची. पुलंच्या शब्दात सांगायचे झाल्यास त्या काळातल्या 'उघड्या दारवाजांच्या संस्कृतीत' तार घेऊन येणारा पोस्टमन जर एकादे वेळी गल्लीत शिरला तर त्या आळीतल्या सर्व लोकांना तो येतांना दिसत असे आणि त्याला पाहून सर्वांचे कान टवकारले जात. यमदूताचा अवतार वाटणारा तो माणूस ज्या घरात शिरे तिथे राहणाऱ्या लोकांची घाबरगुंडी उडत असे. मागील भागात जिचा उल्लेख झाला ती दुःखद वार्ता घेऊन आमच्या घरात आलेली तार पुन्हा एकदा त्या शब्दाबद्दलच मनात धडकी भरवून गेली. घरात कोणाचा टेलिग्रॅम येणे हा अगदी नेहमीचा अनुभव नसला तरी त्या घटनेच्या आधीसुध्दा इतर काही महत्वाचे संदेश असणाऱ्या तारा कदाचित आमच्या घरात आल्याही असतील, पण त्यातल्या मजकुराने घर ढवळून गेले नसेल, त्यामुळे त्याची बातमी आणि भीती लहान मुलांपर्यंत पोचली नसेल.

आजच्या मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या जमान्यात वाढलेल्या मुलांना कदाचित कल्पनाही करता येणार नाही पण पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात लहान गावांमध्ये साधे टेलिफोन्स (लँडलाइन फोन) देखील पोचलेले नव्हते. कुठलाही संदेश कोणालाही शक्य तितक्या लवकर पाठवण्यासाठी तार हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता, तोसुध्दा ज्या गावात पोस्ट ऑफीस असेल अशा मोठ्या गावांमध्येच. लहान खेड्यात राहणाऱ्या लोकांना तर तार करण्यासाठीसुध्दा जवळच्या मोठ्या गावात येऊन उत्तर मिळे पर्यंत तिथे रहावे लागत असे. तारेमधला सारा मजकूर खुल्लमखुल्ला असायचा. पाठवणाऱ्या पोस्टामधील कर्मचाऱ्याला तो मजकून वाचल्याशिवाय पाठवणे शक्य नव्हते आणि मोर्स कोडमधून त्याचे इंग्रजी लिपीत रूपांतर करण्याचे काम पोस्टामधला कर्मचारीच करू शकत असल्यामुळे त्यालाही तो समजत असे. अशा प्रकारे या यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व लोकांना तारेमधला मजकूर समजत असल्यामुळे त्यात गुप्तता राखणे जवळ जवळ अशक्य होते. यातूनही मार्ग काढायचा असला तर "लठ्ठ माणूस आला, म्हातारा झोपला, पक्षी उडाला" अशासारखे सांकेतिक निरोप पाठवणारे पाठवत असतील आणि त्यावरून कोणते काम यशस्वीरीत्या झाले किंवा रखडले वगैरेचा बोध पलीकडच्या माणसाला होत असेल. पण असला निरोप फारच विचित्र असला तर त्याची आणि तो पाठवणाऱ्यांची जास्तच चर्चा होण्याची शक्यतासुध्दा असते.

मी नववी दहावीला येईपर्यंत परिस्थिती बरीच बदलली होती. तारेमधून पाठवल्या जाणाऱ्या संदेशांमध्ये विविधता आली होती. मलाही पोस्टामधून तार पाठवणे अवगत झाले होते. पत्ता आणि मजकूर यामधील शब्दांच्या संख्येप्रमाणे त्याचा चार्ज लागत असे. पैसे वाचवण्याच्या उद्देशाने संक्षिप्तपणे तार पाठवण्याची एक भाषा तयार झाली होती. पोस्टातले लोकसुध्दा त्यांना दिलेल्या मजकुरात (कदाचित त्यांचे काम वाचवण्यासाठी) काटछाट करून देत असत. A, An, The  यासारखे शब्द गाळून टाकले जात आणि is, was वगैरेंनाही फाटा दिला जात असे. संदर्भाप्रमाणे तारेमधला मजकूर वर्तमानकाळातला किंवा अगदी ताज्या भूतकाळातला आहे असे वाचक समजून घेत असे. आजकाल चॅटिंगसाठी तयार झालेली शॉर्टकटमधली भाषा वाचतांना मला पूर्वीच्या काळातली तारेची भाषा आठवते. मी पाठवलेल्या किंवा त्या काळात वाचलेल्या बहुतेच तारांमध्ये "ताबडतोब निघा", "अमक्या दिवशी येतो" किंवा "सुखरूप पोचलो" हाच मजकूर असायचा. "मुलगा झाला, मुलगी झाली, लग्नाची तारीख ठरली, अमूक तारखेला बारसे अथवा लग्न"  अशा आनंददायी बातम्यासुध्दा कधी कधी तारेमधून मिळत किंवा दिल्या जात. अशा तारा घेऊन येणारा पोस्टमन पेढे मागितल्याशिवाय रहात नसे.

नोकरदार मुलांना तडकाफडकी रजा मिळण्यासाठी तार हा पुरावा ग्राह्य मानला जात असे. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास "अमूक तमूक सीरियस, स्टार्ट इमिजिएटली" अशा तारांच्या संख्येत खूप वाढ होत असे. महत्वाची परीक्षा द्यायला निघालेल्या मुलाला हार्दिक शुभेच्छा, परीक्षेमधले यश, लग्न, अपत्यप्राप्ती यासारख्या चांगल्या बातमीबद्दल अभिनंदन वगैरे संदेश तारेने पाठवून देण्याची प्रथा सुरू झाली. पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटने अशा पंधरा वीस संदेशांची एक यादीच तयार करून त्यांना क्रमांक देऊन ठेवले होते. त्यातला क्र.४ किंवा १७ असा एक संदेश निवडून तो नंबर लिहून दिला तर त्याचा फक्त एकच शब्द मानला जाऊन तारेचा खर्च कमी होत असे आणि एका शब्दाच्या खर्चात आठ दहा शब्दांचा संदेश पाठवल्याचे समाधान तो पाठवणाऱ्याला मिळत असे. शिवाय अशा तारा छानशा रंगीत पाकिटांमधून पोचवल्या जात असत. तार घेऊन येणाऱ्या पोस्टमनबद्दल असलेले लोकांचे मत बदलण्यासाठी हा प्रयत्न केला गेला असेल.

दूरध्वनि किंवा टेलीफोनच्या प्रसाराबरोबर टेलिग्राफला उतरती कळा लागली असे जगभरात सर्वत्र झाले. तार हा एकतर्फी संदेश आहे. त्याचे उत्तर यायला वेळ लागतो. आणखी माहिती हवी असेल, शंका विचारायच्या असतील तर त्यांचे निरसन व्हायला आणखी वेळ लागतो. टेलिफोनवर दोन माणसे संभाषण करू शकतात, त्यांनी एकमेकांना सांगितलेले एकमेकांना समजले आहे की नाही हे त्यात समजते. एकमेकांशी विचार विनिमय करून ते काही ठरवू शकतात, योजना आखू शकतात, त्यांना एकमेकांचा आवाज ऐकायला मिळतो अशे अनेक फायदे असल्यामुळे दूरध्वनि हा तारेच्या मानाने असंख्यपटीने चांगला पर्याय आहे. त्याच्यापुढे तारेचा टिकाव लागणारच नाही. तार या माध्यमात फक्त एकच विशेष असा होता की त्यामधून एक लेखी पुरावा तयार होतो आणि कायदेशीर बाबींसाठी त्याचा उपयोग होतो. यामुळे टेलिफोनवरून बोलणे झाल्यानंतर टेलिग्रॅम, टेलेक्स वगैरेंमधून कन्फर्मेशन पाठवणे सुरू झाले होते.

मी लहान असतांना लहान गावांमध्ये टेलीफोन सेवा नव्हतीच. मोठ्या शहरांमध्ये ती अनेक वर्षांपूर्वीपासून चालत आलेली असली तरी फक्त ऑफिसे आणि उच्चभ्रू समाजापर्यंतच पोचली होती. एका शहरामधून दुसऱ्या शहरातल्या कोणाला टेलिफोन करायचा असल्यास ट्रंककॉल लावावा लागत असे आणि तो अत्यंत वेळखाऊ प्रकार असल्यामुळे अत्यावश्यक कामासाठी गत्यंतर नसेल तरच त्याचा उपयोग केला जात असे. कालांतराने एसटीडी आणि आयएसडी या सेवा सुरू झाल्यानंतर टेलिफोनमधला हा अडसर दूर झाला आणि जगभरात कोणाशीही संभाषण करणे सुकर झाले. त्याच काळात टेलिग्राफचा विकास होऊन टेलिप्रिंटर, टेलेक्स वगैरे त्याची नवी रूपे आली. या प्रकारांमध्ये कडकट्ट करणारी यंत्रे जाऊन त्यांच्या जागी टाइपरायटर्सनी घेतली. एका गावातल्या यंत्रामध्ये टाइप केलेला मजकूर दुसऱ्या गावामधल्या मशीनवर आपोआप उमटू लागला. इंग्रजी भाषेमधील अक्षरांचे मोर्स कोडमध्ये आणि त्याचे पुन्हा इंग्रजीमध्ये रूपांतर करण्याचे काम यंत्रांमध्ये होऊ लागले आणि त्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ माणसांची आवश्यकता नाहीशी झाली. त्यामुळे टेलिफोनचा प्रसार झाल्यानंतरसुध्दा दोन तीन दशकेपर्यंत त्याच्यासोबतीला निरनिराळ्या प्रकारे टेलिग्रॅमचा उपयोगसुध्दा होत राहिला. टेलेक्सची यंत्रे ऑफिसांमध्येच बसवली जाऊ लागली. त्यांच्यायोगे चालणारे संदेशवहन थेट होत असल्यामुळे त्यासाठी पी अँड टी च्या मध्यस्थीची गरज राहिली नाही. पण घरगुती संदेशवहनासाठी ती परवडणे शक्य नसल्यामुळे तारेची आवश्यकता शिल्लक राहिली.

काँप्यूटर आणि इंटरनेटच्या प्रसारानंतर मात्र संदेशवहनात क्रांतीकारक बदल झाले. टेलिग्रॅम आणि टेलेक्समधून फक्त अक्षरे किंवा आकडे पाठवता येत होते, पण टेलिफॅक्समध्ये चित्र पाठवणे शक्य झाले. त्यामुळे ऑफिसेसमध्ये ते जास्त सोपे आणि प्रभावी तंत्र पॉप्युलर झाले. या तीन्ही माध्यमांसाठी विशिष्ट यंत्रसामुग्रीची गरज होती. पण इंटरनेटवरील ई मेलमधून टेक्स्ट, चित्रे आणि ध्वनिसुध्दा पाठवणे शक्य झाले. शिवाय त्यासाठी साधा पीसी पुरेसा असल्यामुळे कोणीही घरबसल्यासुध्दा ईमेल पाठवू शकू लागला. सेलफोनच्या तंत्रामध्ये झालेल्या क्रांतीनंतर संदेशवहन ही सामान्य माणसाच्या आवाक्यातली गोष्ट झाली. फोनवर बोलणे तसेच टेक्स्ट आणि इमेजेस पाठवणे हे सगळे काम खिशात मावेल एवढ्या लहानशा यंत्राद्वारे होऊ लागल्यानंतर अशी यंत्रे सर्वसामान्य माणसाकडे असु लागली. वॉट्सअॅपमुळे तर ते फारच सोपे आणि जलद होऊ लागले. त्यामुळे कोणीही कोणाशीही थेट संपर्क साधू लागला आणि कोणालाही संदेश पाठवण्यासाठी पोस्टात जाऊन तार करण्याची गरजच उरली नाही.

माझ्या लहानपणी आमच्या गावात तरी 'तार' हा त्वरित संदेश पाठवण्याचा एकमेव मार्ग होता, खेड्यांमध्ये तोसुध्दा नव्हता. चाळीस वर्षांपूर्वी मी मुंबईला आलो तेंव्हा इतर मार्ग उपलब्ध होऊ घातलेले असले तरी टेलिग्राफला खूप महत्व होते. मुंबईच्या फोर्ट विभागात सेंट्रल टेलिग्राफ ऑफीस नावाची मोठी इमारत होती (अजूनही असेल) आणि ती सदोदित गजबजलेली असायची. पण काळाच्या ओघात तारेचे महत्व कमी होत होत आता शून्याच्या जवळपास आले असल्याकारणाने ही सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी एकादी महत्वाची सेवा कधीकाळी अस्तित्वात होती हेसुध्दा पुढच्या पिढ्यांना कदाचित समजणार नाही.



No comments: