Wednesday, June 29, 2011

तेथे कर माझे जुळती - ८ - श्री.यशवंत देव (उत्तरार्ध)



वाद्यसंगीत किंवा शास्त्रीय संगीतातला तराणा यांना भाषा नसते. ख्यालगायनामध्ये असलेली तीन चार ओळींची बंदिश तासभर घोळवूनसुद्धा अनेक वेळा तिच्यातले सगळे शब्द कळत नाहीत. सुगम संगीतात संगीताबरोबर त्यातील काव्याला महत्व असते. पण शास्त्रीय संगीताच्या मैफलीतले गवय्ये काही वेळा असे गातात की त्या गाण्यातल्या मनाला स्पर्श करणा-या भावनांपेक्षा त्यांचा मालकंस किंवा मारवाच मनाला जास्त भिडतो. श्री.यशवंत देव यांच्या गाण्यामध्ये मात्र नेहमीच शब्दांना पहिला मान मिळतो. 'शब्दप्रधान गायकी' या विषयावर त्यांनी पुस्तकही लिहिले आहे आणि या विषयावर ते प्रात्यक्षिकांसह जाहीर व्याख्याने देत असत. कोणत्याही गाण्यातले शब्द महत्वाचे असतातच, पण फक्त योग्य शब्दरचना करून भागत नाही. त्याच्या उच्चारातील फरकामुळे गाण्यातच नव्हे तर बोलण्यातसुद्धा किती फरक पडतो हे ते अत्यंत मनोरंजक उदाहरणे देऊन दाखवत. त्यातले एक माझ्या अजून लक्षात राहिले आहे. एका वाक्यातले शब्द असे आहेत
हा रामा काल सकाळी का आला नाही?
वेगवेगळ्या शब्दांवर जोर देण्याने त्याचा अर्थ कसा बदलतो पहाः
हा रामा काल सकाळी का आला नाही? ... आलेला रामा वेगळा होता
हा रामा काल सकाळी का आला नाही? ..... गोविंदा कशाला आला?
हा रामा काल सकाळी का आला नाही? ... आज उगवतो आहे किंवा परवाच येऊन गेला
हा रामा काल सकाळी का आला नाही? ...... सायंकाळी किंवा रात्री आला
हा रामा काल सकाळी का आला नाही? .... न येण्याचे कारण काय?

संगीतातले एक मजेदार उदाहरण पहाः तीन वेगवेगळ्या गवयांना चार शब्द दिले होते. रोको मत जाने दो. त्यांनी ते असे गाऊन दाखवले
रोओओओको रोओओओओको रोको, मत जाने दो ....... अरे त्याला थांबवा
रोको मअतअ, रोको मअअअतअ, रोको मअतअ, जाने दो ... त्याला जाऊ द्या ना
रोओओओओकोओओ, मअअअतअ, जाआआनेएए, दोओओ ... काही ही करा

त्यांनी केलेल्या अनेक स्वररचनांमागे त्यानी केलेला विचार व्याख्यानात मांडून त्यातील चालीत किंवा उच्चारात बदल केल्यास त्या गाण्याचा अर्थ किंवा त्यामधील भावांच्या छटा कशा बदलतात हे सविस्तर सांगतांना ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. एकाद्या गीताच्या जन्मापासून ते रेकॉर्ड होऊन श्रोत्यांपर्यंत पोचेपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो याचे मनोरंजक किस्से सांगायचे. हा कार्यक्रम मी टीव्हीवरही पाहिला आणि प्रत्यक्ष समोर बसूनही त्याची मजा घेतली. मला अतीशय आवडलेल्या कार्यक्रमांत तो येतो.

यशवंत देवांनी सुंदर कविता किंवा गीते तर लिहिली आहेतच, अत्यंत मजेदार विडंबने केली आहेत. पत्नीची मुजोरी या नावाने त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याबद्दल बोलतांना त्यांनी एकदा सांगितले की ते जेंव्हा गायनाच्या कार्यक्रमांना जात असत तेंव्हा श्रोतेगण त्यांना ज्या फर्माइशी करत त्यातली काही गाणी त्यांची नसायची. त्या गाण्यांचे शब्द, सुरुवातीचे आणि अंत-यांमधले वाद्यसंगीताचे तुकडे, त्यातल्या आलाप, ताना, लकेरी यासारख्या सुरेख खास जागा वगैरे सर्व तपशीलासकट ती गाणी तयार असायची नाहीत आणि ते नसेल तर त्यात मजा येणार नाही. शिवाय त्यांची स्वतःची इतकी सुरेल गाणी असतांना त्यांनी इतरांची गाणी काय म्हणून तयार करून ठेवायची ? पण श्रोत्यांना एकदम नाही म्हणून नाराज करण्यापेक्षा त्यांच्या पदरात काही तरी तत्सम टाकावे म्हणून त्यांनी तत्कालीन लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर स्वतः गाणी लिहिली आणि ती गायला सुरुवात केली. 'आम्ही जातो आमुच्या गावा' या चित्रपटातले 'देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा।' हे गाणे एके काळी तुफान लोकप्रिय होते. त्याच्या चालीवर देवांनी गाणे रचले, 'पत्नीची मुजोरी, घडे नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा।' म्हणजे तिजोरीच्या दाराऐवजी स्वर्गाचे दार उघड! गंमत म्हणजे हे गाणे चालले असतांना त्यांच्या सौभाग्यवती करुणाताई बाजूलाच किंवा समोर बसलेल्या असायच्या आणि खिलाडूपणे त्याचा आनंद घ्यायच्या.

आम्ही त्यांच्या निरनिराळ्या कार्यक्रमांना अनेक वेळा उपस्थिती लावली. शक्य तोवर तो चुकवला नाही. 'असे गीत जन्मा येते', 'शब्दप्रधान गायकी' अशासारख्या कार्यक्रमांमध्ये ते जे सोदाहरण गंमतशीर निवेदन करत असत आणि त्यातले सूक्ष्म बारकावे हसत खेळत श्रोत्यांना समजावून सांगत असत त्यामुळे सुगम संगीताकडे पाहण्याची (किंवा ते ऐकण्याची आणि समजून घेण्याची) माझी क्षमता बरीच बदलली. मला पूर्वी माहीत नसलेल्या बारीक सारीक गोष्टींकडे मी लक्षपूर्वक पाहू लागलो. त्यांच्या आस्वादातून मला मिळणारा आनंद अनेकपटीने वाढला. बहुतेक वेळी यशवंत देवांचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही स्टेजवर जाऊन त्यांना भेटून येत असू. अशी असंख्य माणसे त्यांना रोज भेटत असतील. पण ते जुनी ओळख असल्याप्रमाणे आपुलकी दाखवून नेहमी हसतमुखाने आमचा प्रणाम स्वीकारत असत आणि एकाद्या वाक्यातून ती ओळख पटवून देत असत. त्यामुळे आम्हाला धन्य वाटत असे.

त्यांना वयाची सत्तरी ओलांडली तेंव्हा एका मोठ्या सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पण त्यांचा दांडगा उत्साह आणि चपळपणा तरुणांना लाजवण्यासारखा होता. त्या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातले सारे दिग्गज उपस्थित होते. मंगेश पाडगावकर, अरुण दाते, व.पु.काळे, पुरुषोत्तम दारव्हेकर ही नावे मला आठवतात, कदाचित अजूनही काही मोठे लोक असतील. यशवंत देवांना अभीष्टचिंतन करतांना त्या सर्वांनी एकमुखाने म्हंटले, 'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचे।' यावेळी बोलतांना दारव्हेकर मास्तरांनी एक जुना किस्सा ऐकवला. त्या काळात ते आणि यशवंत देव नागपूरला आकाशवाणीवर काम करत होते. एकदा संगीतकार जोग यांनी यशवंत देवांना अंतर्देशीय पत्रातून नव्या गाण्यासाठी स्वरलिपीतून काही ओळी लिहून पाठवल्या आणि त्यावर योग्य असे गाणे लिहायला सांगितले. त्या 'दुरुन' पोस्टाने आलेल्या चालीवर देवांनी गीत लिहून सादर केले, 'स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी।'

यशवंत देवांच्या अशा खूप आठवणी स्मृतीच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत. हा लेख लिहिण्याच्या निमित्यांने त्यांना उजाळा मिळाला.

Sunday, June 26, 2011

तेथे कर माझे जुळती - ८ - श्री.यशवंत देव (पूर्वार्ध)




प्रत्येक लोकप्रिय गाण्यामागे गीतकार, संगीतकार आणि गायक वगैरे अनेक मंडळी असतात हे आता सर्वांना माहीत असते, पण माझ्या लहानपणी आमच्या लहानशा गावात यांची विशेष चर्चा होत नसे. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर किंवा गायक सुधीर फडके यांनी अमके तमके गाणे गायिले आहे इतपत त्या गाण्यासंबंधीची थोडीशी माहिती केंव्हा केंव्हा मिळायची, काही गाणी शाळेच्या पाठ्यपुस्तकात कविता म्हणून समोर येत असत, त्यांच्या कवींची नावे पाठ करावी लागत, पण गाण्यांना फक्त चाली लावण्याचे सत्कार्य करणारा कोणी वेगळा महान संगीतकार असतो हे मात्र त्या काळात कोणाकडून ऐकले नव्हते. या गोष्टीला काही महत्व असते हेच मुळात मला ठाऊक नव्हते. अशा त्या अज्ञानी बाळपणाच्या काळापासून मी महान कवी, गायक आणि संगीतकार श्री.यशवंत देव यांची कित्येक गाणी आवडीने ऐकत आलो होतो, फक्त ते मला माहीत नव्हते. त्यातली काही गाणी पुन्हापुन्हा गुणगुणून मला तोंडपाठही झाली होती. कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर गायक, गीतकार आणि संगीतकार काय काय वेगळे करतात ते जरा समजायला लागले. माझे काही मित्र या तीन्ही क्षेत्रातल्या विशिष्ट मोठ्या व्यक्तींचे चाहते असल्यामुळे त्यातला कोण श्रेष्ठ यावर नेहमी त्यांच्यात वाद चालत आणि त्यातून माझ्यासारख्या अज्ञानी मुलांना तत्वबोध मिळत असे.

गीतामधील भाव श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी संगीतकाराला काव्याची सखोल जाण असावी लागते आणि आपल्या काव्याचे गाणे होण्यासाठी त्यात नादमधुर आणि तालबद्ध शब्दरचना करण्यासाठी कवीला संगीताचे थोडे ज्ञान असणे चांगले असते. गायकाला तर गीतकाराच्या काव्यरचनेतले भाव संगीतकाराने केलेल्या स्वररचनेतून श्रोत्यापर्यंत पोचवायचे असल्यामुळे साहित्य आणि संगीत यांची चांगली जाण असावी लागते. पण कोणत्याही विषयाची उत्तम समज असणे एवढे नवनिर्मितीसाठी पुरेसे नसते. त्यासाठी मुळात प्रतिभा आणि त्यावर घेतलेले परिश्रम, व्यासंग, अभ्यास वगैरेंची साथ असावी लागते. काव्यरचना, संगीतरचना आणि गायन या गोष्टी एकमेकींना पूरक आणि काहीशा परस्परावलंबी असल्या तरी त्या तीन्ही क्षेत्रांमध्ये मोठा नावलौकिक मिळवणा-यांची संख्या फार कमी आहे आणि अशा लोकांमध्ये श्री.यशवंत देव अग्रगण्य असावेत.

ते आकाशवाणीवर काम करत असल्यामुळे त्यांचे नाव रेडिओवर नेहमी कानावर पडत होतेच, दूरदर्शन आल्यानंतर त्यांची सात्विक, सोज्ज्वळ आणि प्रसन्न मूर्ती स्क्रीनवर दिसायला लागली. त्यांचे भावस्पर्शी पण मुद्देसूद बोलणे, आपले विचार समजावून सांगण्याची हातोटी, प्रामाणिकपणाच्या जोडीला बराचसा मिश्किलपणा वगैरेंमुळे त्यांना पहात आणि ऐकत रहावे असे वाटत असे. गायन, चर्चा, मुलाखत अशा कोणत्याही मिषाने ते कार्यक्रमात येणार असले तर मी तो कार्यक्रम आवर्जून पहात असे. तंत्रज्ञान हे माझे कार्यक्षेत्र सर्वस्वी वेगळे असल्यामुळे कामाच्या निमित्याने त्यांची भेट घडण्याची मुळीच शक्यता नव्हती, पण माझ्या मनात त्याची तीव्र इच्छा मात्र होत होती. "इच्छा असेल तर मार्ग सापडतो" असे म्हणतात. या बाबतीत तो आपण होऊन माझ्यासमोर आला.

सुमारे वीस एक वर्षांपूर्वी योजना प्रतिष्ठानतर्फे श्री.यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुगम संगीताची कार्यशाळा झाली होती. त्यात अलकाला म्हणजे माझ्या पत्नीला प्रवेश मिळाला. या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून 'बोल संतांचे' नावाचा एक छान जाहीर कार्यक्रम सादर केला गेला. कर्नाटक संघाच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाची रंगीत तालीम दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये ठेवली होती. ती पहाण्यासाठी कोणाला आमंत्रण नव्हतेच, पण त्यात भाग घेणा-यांना घरी परत जाण्यासाठी सोबत करायच्या निमित्याने माझ्यासारखे मोजके आगांतुक उपटसुंभ पाहुणे आले होते. रंगीत तालीम सुरू होताच सर्व गायक, गायिका, वादक वगैरे मंडळी स्टेजवर गेली आणि संयोजक मंडळी त्याच्या आसपास राहिली. कार्यक्रम पाहण्यासाठी श्री.यशवंत देव समोरच्या खुर्चीवर विराजमान झाले. कदाचित वयाने मी इतर सर्वात मोठा असल्याने मला त्यांच्या शेजारी जागा दिली गेली. ओळख, नमस्कार वगैरे औपचारिक भाग झाल्यानंतर काय बोलावे, कुठून सुरुवात करावी याचा मला प्रश्न पडला होता, तेवढ्यात कार्यक्रमच सुरू झाला.

त्यांनी बसवलेल्या सांगीतिक कार्यक्रमावर कोणत्याही प्रकारचा शेरा मारण्याची माझी पात्रता नव्हतीच, प्राज्ञाही नव्हती. शिवाय मला खरोखर तो इतका चांगला वाटत होता की त्यात कोणती उणीव दिसतच नव्हती. 'छान', 'मस्त', 'वा! वा!' वगैरे उद्गार काढण्यापलीकडे काही करणे मला शक्यच नव्हते. देव सर मात्र प्रत्येक स्वर कान टवकारून ऐकत होते आणि प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक पहात होते. त्यातल्या सूक्ष्म बारकाव्यांबद्दल नेमक्या सूचना देत होते. वीस बावीस नवशिके गायक आणि पाच सात नवखे वादक यांच्या व्यक्तीमत्वातले किंवा कौशल्यातले सारे कंगोरे एवढ्या कमी अवधीमध्ये घासून पूर्णपणे काढून टाकणे शक्य नव्हतेच, पण काही वेळा देव सरांना ते टोचत होते. या अत्यंत 'रॉ' अशा प्रकारच्या 'मटीरियल'पासून अप्रतिम सांगीतिक शिल्पकृती बनवण्याचे कार्य त्यांनी साकार केले होतेच, त्याला जास्तीत जास्त पॉलिश करण्याचा प्रयत्न चाललेला दिसत होता. त्यात ते जराही कसूर करत नव्हते. लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते यांच्यासारख्या कसलेल्या गायकांकडून गाणी म्हणवून घेणारे देव या नवख्या, होतकरू आणि हौशी गायकांसाठी एवढी मेहनत घेत असलेले पाहून मला काय वाटले ते शब्दात सांगता येणार नाही.

'बोल संतांचे' या कार्यक्रमात अनेक संतांचे अभंग आणि पदे यांना नव्या चाली लावून ती गाणी सादर केली होती. समोर बसलेल्या एक किंवा दोन मुख्य गायक गायिकेने त्यातल्या सर्व ओळी गायच्या आणि बाकीच्या सर्वांनी त्यातील ध्रुपद आणि काही ओळी कोरसमध्ये गायच्या असे ठरवले होते. जास्तीत जास्त नव्या कलाकारांना व्यासपीठावर गाण्याची संधी मिळावी या हेतूने बहुतेक प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळे लीड आर्टिस्ट निवडले होते. त्या काळात चांगल्या प्रतीचे कॉर्डलेस माईक मिळत नसावेत. त्यामुळे बोजड स्टँडसकट सात आठ माइक आणले होते आणि त्यातले काही पुढच्या बाजूला आणि काही मागच्या बाजूला पसरून ठेवले होते. एक गाणे संपल्यानंतर पुढच्या गाण्यासाठी एकादा गायक मागून पुढे यायचा आणि आधीचा गायक मागे जाऊन बसायचा. दोन गाण्यामधील वेळात निवेदकाचे बोलणे चालत असतांना हा बदल केला जात होता. हे सुलभ रीतीने व्हावे यासाठी प्रत्येकाच्या जागा ठरवून दिल्या होत्या. एक गायक जागा बदलत असतांना माइकच्या वायरशी किंचित अडखळला ही गोष्ट देवांच्या नजरेने टिपली आणि हे का झाले याची त्यांनी चौकशी केली. रिहर्सलला थोडा गोंधळ झाला तरी मुख्य कार्यक्रमात तो होणार नाही असे भोंगळ उत्तर त्यांना मान्य नव्हते. कोणते माइक नेमके कोठे ठेवले जातील आणि त्यांच्या वायरी कशा जोडल्या जातील हे सर्व जातीने पाहून कोणतीही वायर कोणाच्याही पायात येणार नाही याची जबाबदारी एकाने घेतल्यावर त्यांचे समाधान झाले. कर्नाटक संघातला मुख्य कार्यक्रम नुसता निर्विघ्नपणे पार पडला नाही तर तो अप्रतिम झाला हे सांगायची गरजच नाही. प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा कडकडाट करून श्रोत्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. यातली सर्व कलाकार मंडळी ही हौशी आणि शिकाऊ आहेत असे मुळी वाटतच नव्हते. इतके ते सफाईदार झाले. श्री.यशवंत देवांचे कुशल मार्गदर्शन आणि योजनाताईंचे योजनाबद्ध संयोजन यांनी ही किमया घडवून आणली होती.

. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Friday, June 24, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ६


प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टर


शेगडीवर ठेवलेल्या उघड्या पातेल्यातले चहाचे आधण सुमारे १०० अंश सेल्शियस तपमानाला उकळू लागते, पण प्रेशर कूकरच्या हवाबंद पात्रातील वाफ कोंडलेली असल्यामुळे तिचा दाब वाढत जातो. जेंव्हा तो वातावरणातल्या हवेच्या दाबाच्या दुप्पट होतो तेंव्हा कूकरमधील उकळणा-या पाण्याचे तपमान सुमारे १२० अंशापर्यंत वर जाते. दाब वाढल्यामुळे पाण्याच्या उत्कलनबिंदूमध्ये वाढ होते. पाण्याच्या या गुणधर्माचा उपयोग प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टरमध्ये करून घेतला जातो

या रिअॅक्टरच्या पात्राचा (रिअॅक्टर व्हेसलचा) आकारसुद्धा एका प्रचंड उभ्या कॅपसूलसारखाच असतो आणि यातही समृद्ध (एन्रिच्ड) युरेनियम हेच इंधन वापरले जाते. प्राथमिक शीतलक (प्रायमरी कूलंट) सुद्धा साधे पाणीच (लाइट वॉटर) असते, मात्र यातील पाण्याचा दाब सुमारे १५० बार म्हणजे हवेच्या दाबाच्या सुमारे दीडशेपट एवढा असतो. युरेनियमच्या भंजनातून (फिशन मधून) निघणा-या ऊर्जेने या पाण्याचे तपमान सुमारे सव्वातीनशे अंशावर जाते. तरीही ते पाणी उकळून त्याची वाफ न होता ते पाणी द्रवरूपातच राहते. उच्च दाबाचे अतीशय तप्त असे हे पाणी स्टीम जनरेटरकडे पाठवले जाते.

स्टीम जनरेटर हा शेल अँड ट्यूब प्रकारचा हीट एक्स्चेंजर असतो. या प्रकारात एक शेल किंवा बाह्य पात्र असते आणि त्यात ट्यूब्ज म्हणजे अनेक नलिकांचे मोठमोठे जुडगे बसवलेले असतात. एक द्रव या शेलमधून तर वेगळाच द्रव नलिकांमधून वहात असतो. यातला एक द्रव ऊष्ण आणि दुसरा थंड असतो. हे दोन्ही द्रव निरनिराळ्या द्वारांतून हीट एक्स्चेंजरमध्ये प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या मार्गाने वहात असतात. ते कुठेही एकमेकात मिसळत नाहीत, पण त्यांच्या सान्निध्यामुळे ऊष्ण द्रवामधून त्यातली ऊष्णता थंड द्रवाकडे वहाते. त्यामुळे ऊष्ण द्रवाचे तपमान कमी होते आणि थंड द्रवाचे वाढते. हीट एक्स्चेंजरमधून बाहेर पडतांना त्या दोन्ही द्रवांचे तपमान एकमेकांच्या जवळ येते.

स्टीम जनरेटरच्या शेलचा आकार बहुतेक ठिकाणी मशरूमसारखा असतो आणि त्यात यू या अक्षराप्रमाणे वाकवलेल्या शेकडो नलिकांचे गठ्ठे (ट्यूब बंडल्स) बसवलेले असतात. या नलिका एकमेकींना चिकटणार नाहीत आणि प्रत्येक नळीच्या सर्व बाजूंना पाण्याला मुक्तपणे वाहण्यासाठी मोकळी जागा राहील याची काळजी घेतलेली असते. रिअॅक्टरमधून बाहेर निघालेले प्रायमरी कूलंटचे तप्त पाणी स्टीम जनरेटरच्या नलिकांमधून वहाते. त्या नलिकांच्या बाहेरच्या बाजूला शेलमधून सेकंडरी पाणी वहात असते. ते तापून त्याची वाफ होते आणि शेलच्या वरच्या फुगीर भागातल्या ड्रममध्ये गोळा होते. त्यापुढील भाग म्हणजे टर्बाइन, कंडेन्सर वगैरे सारे काही बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरसारखेच असते.

स्टीम जनरेटरच्या ट्यूब्जमधून एका बाजूने आत शिरलेले प्रायमरी कूलंटचे ऊष्ण पाणी दुस-या बाजूने बाहेर पडते तेंव्हा त्याचे तपमान कमी झाले असले तरी ते उकळत असलेल्या सेकंडरी कूलंटच्या मानाने जास्तच असणे आवश्यक असते कारण तसे असले तरच त्या पाण्यातील ऊष्णतेचा वाफ तयार करण्याच्या कामात उपयोग होऊ शकतो. वाफेचे तपमान जितके जास्त असेल तेवढी जास्त वीजनिर्मिती होत असल्याकारणाने ते सुमारे अडीचशे अंशांच्यावर ठेवण्यात येते. याचा अर्थ थंड होऊन परतणारे प्रायमरी पाणी २६०-२७० अंश इतके गरम असते. या तपमानाला ते द्रवरूप राहण्यासाठी त्याचा दाब भरपूर असणे आवश्यक असते. स्टीम जनरेटरच्या अरुंद नलिकांमधून वहात असतांना पाण्याचा दाब कमी होऊन वातावरणाच्या सुमारे शंभरपट एवढा झालेला असतो. (प्रत्येक रिअॅक्टर आणि स्टीम जनरेटरचा आकार, क्षमता आणि अंतर्गत रचना यांच्यानुसार हे आकडे वेगळे असतात. साधारण अंदाज यावा म्हणून वरील आकडे दिले आहेत.) हे पाणी पंपाद्वारे पुन्हा रिअॅक्टरकडे पाठवले जाते आणि तिथली ऊष्णता घेऊन स्टीम जनरेटरकडे. अशा प्रकारे त्याचे अभिसरण चालत राहते.

यातील पंपाचा उपयोग पाण्याचा दाब वाढवण्यासाठी होत असला तरी त्या दाबाचे नियंत्रण करण्यासाठी प्रेशरायजर नावाचे वेगळे उपकरण बसवतात. कॅपसूलच्याच आकाराच्या या पात्रातला खालचा भाग पाण्याने भरलेला असतो आणि वरील भागात वाफ असते. पाण्याचे तपमान वाढले तर ते प्रसरण पावून त्याचा दाबही वाढतो. या वेळी प्रेशरायजरच्या माथ्यावर बसवलेला थंड पाण्याचा स्प्रे सुरू होतो. त्यामुळे थोड्या वाफेचे रूपांतर पाण्यात होऊन तिने व्यापलेली जागा रिकामी होते आणि तिचा दाब कमी होतो. पाण्याचे तपमान कमी होऊन ते आकुंचन पावले तर प्रेशरायजरमधला इलेक्ट्रिक हीटर सुरू होतो आणि पाण्याचे रूपांतर वाफेत करून तिचा दाब वाढवतो.

प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टरमधले प्रायमरी कूलंटचे पाणी फक्त रिअॅक्टर, स्टीम जनरेटर आणि पंप एवढ्यांमध्येच फिरत राहते. ही सारी उपकरणे रिअॅक्टर बिल्डिंगच्या कंटेनमेंटच्या आत ठेवलेली असल्यामुळे सारा किरणोत्सार फक्त तेवढ्या जागेत बंदिस्त राहतो. टर्बाईन, जनरेटर, कंडेन्सर वगैरे इतर सारे भाग त्यापासून मुक्त राहतात. त्यांच्या देखभालीसाठी आणि गरज पडल्यास दुरुस्तीसाठी त्या भागांमध्ये केंव्हाही जाता येते. पीडब्ल्यूआरचा हा सर्वात महत्वाचा फायदा असतो. जगातील ४४२ पैकी २६९ म्हणजे निम्म्याहून जास्त रिअॅक्टर्स या प्रकारचे आहेत आणि जगातील ३७५ पैकी २४८ गीगावॉट म्हणजे दोन तृतीयांश विजेचे उत्पादन त्यातून होत असते.

या रिअॅक्टरच्या प्रायमरी कूलंट सर्किटमधील कोणतेही पात्र, पंप, पाइप किंवा इतर कोणत्याही उपकरणामधून पाण्याची गळती झाली तर भरपाई प्रेशराइजरमधून आपोआप होते आणि त्यातील पाण्याची पातळी खाली जाऊन धोक्याची पूर्वसूचना मिळते. इमर्जन्सी कोअर कूलिंग सिस्टममध्ये अशा अॅक्सिडेंटच्या वेळी उपयोगात आणण्यासाठी अनेक राखीव उपाययोजना करून ठेवलेल्या असतात आणि त्यांचा उपयोग करून रिअॅक्टरला पुरेसे पाणी पुरवले जाते. रिअॅक्टरच्या तुलनेत स्टीम जनरेटर अधिक उंचावर ठेवलेले असतात. विजेचा पुरवठा पुरता ठप्प झाल्यामुळे प्रायमरी पंप बंद पडले तरीही रिअॅक्टरमधील पाणी तापून हलके होते आणि आपोआप वरच्या बाजूला असलेल्या स्टीमजनरेटरकडे जाते आणि तिथे थंड झाल्यामुळे वजनाने जड झालेले पाणी गुरुत्वाकर्षणाने खालच्या बाजूला रिअॅक्टरमध्ये परतते. अशा प्रकारे रिअॅक्टर थंड होत राहतो. याला नैसर्गिक पुनराभिसरण (नॅचरल रिसर्क्युलेशन) म्हणतात. ते घडवून आणण्यासाठी स्टीम जनरेटरला केला जाणारा थंड सेकंडरी पाण्याचा पुरवठा रेडिओअॅक्टिव्ह क्षेत्राच्या बाहेरून होत असल्यामुळे त्यावर नियंत्रण करणे किंवा त्याची पर्यायी व्यवस्था करणे तुलनेने सोपे असते. यामुळे प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टरमधील संभाव्य गंभीर अॅक्सिडेंट हाताळणारी यंत्रणा बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरपेक्षा जास्त भरोशाची असते असे म्हणता येईल. थ्री माइल आयलंड येथे झालेल्या घटनेमुळे तिचा अनुभव आलेला आहे. त्या रिअॅक्टरमध्येही कोअर मेल्टडाउनपर्यंत बिघाड झाला होता, पण किरणोत्सार मात्र आटोक्यात राहिला.

Monday, June 20, 2011

बाप रे बाप

काल म्हणे बापाचा दिवस होता, म्हणजे फादर्स डे. अलीकडे रोजच कसले ना कसले डे येत असल्याने ते आल्याचे कळतही नाही. योगायोगाने मी काल माझ्या मुलाकडे रहायला गेलो होतो, पण या बापदिवसाचा मलाही पत्ता नव्हता आणि आमच्या चिरंजीवांनाही. सकाळचे वर्तमानपत्र दुपारी निवांतपणे चाळत असतांना कोणा बड्या बापांच्या मुलांनी मुक्तपणे उधळलेली मुक्ताफळे वाचली आणि कालचा दिवस आपला असल्याचे समजले, पण या दिवशी कोणी आणि नेमके काय करायचे असते ते काही कोणी सांगितले नाही आणि कोणीही काही वेगळे केलेही नाही.

यावरून एका सिनेमातला संवाद आठवला. त्या काळात मकरंद अनासपुरे इतका पुढे आला नव्हता. तो त्याच्या खास औरंगाबादी स्टाइलमध्ये म्हणतो, "अरे तुमचे आई आणि बाप जीवंत असतांनाच त्यांचे कसले दिवस घालताय् ? आमचा तर प्रत्येक दिवस फादर्स डे मदर्स डे असल्यासारखे आम्ही नेहमीच त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागतो."
.
.
.
एक लहानगा मुलगा रस्त्याने जात असतांना त्याच्या बापाला म्हणाला, "बाबा माझा हात घट्ट पकडून ठेवा हं, नाही तर मी गर्दीत कुठेतरी हरवेन."
बाबा म्हणाला, "अरे तुला एवढी काळजी वाटत असेल तर मग तूच माझं बोट नीट पकडून ठेव ना."
त्यावर मुलगा म्हणाला, "नको, उगीच माझं लक्ष कुठे तरी गेलं तर मी कदाचित तुमचं बोट सोडून देईन. पण मला माहीत आहे की काहीही झाले तरी तुम्ही मात्र माझा हात सोडणार नाही,"
.
.
.
दुस-या एका लहान मुलाला त्याच्या बापाने उंच स्टुलावर उभे केले आणि खाली उडी मारायला सांगितले. मुलगा घाबरत होता. त्याला धीर यावा म्हणून बापाने सांगितले, "अरे, मार उडी. मी आहे ना तुला पकडायला."
मुलाने उडी मारली. त्याला धरण्याचा प्रयत्नही न करता तो बाप मागे सरकला. मुलगा तोंडघशी पडला. त्याचा गुडघा आणि ढोपर खरचटले. त्याने उठून काही बोलायच्या आतच बापाने त्याला विचारले, "पोरा, यातून तू काय शिकलास ?"
मुलगा उद्गारला, "बापाच्या बोलण्यावरसुध्दा विश्वास ठेवायचा नसतो."
बाप म्हणाला,"बरोबर. हे लक्षात ठेवलेस तर तू धंदा चांगला चालवशील."

Saturday, June 18, 2011

सत्यसाईबाबा आणि ओसामा!

जुनी झालेली वर्तमानपत्रे रद्दीवाल्याला देण्यापूर्वी त्यांच्या मुखपृष्ठावरील ठळक मथळ्यावरून एकदा ओझरती नजर फिरवायची मला सवय आहे. त्यामुळे नजिकच्या गतकालात महत्वाचे असे काय काय घडले याची थोडक्यात उजळणी होते. मागच्या महिन्यात हे करत असतांना मला जाणवले की 'भगवान श्री सत्यसाईबाबा' आणि 'दहशतवाद्यांचा मुकुटमणी ओसामा बिन लादेन' यांच्या मृत्यूविषयक बातम्यांनी त्यातला काही काळ सारी वर्तमानपत्रे ओसंडून वाहात होती. एकमेकाशी कसलाच संबंध नसलेल्या पण एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांनी वृत्तप्रसारणाच्या माध्यमांना व्यापून टाकले होते. या दोन्ही घटनांमध्ये खूप फरक होता आणि काही साम्यस्थळेसुद्धा दिसत होती.

सत्यसाईबाबांना रुग्णालयात ठेवले गेल्यापासून त्यांच्या प्रकृतीसंबंधीचे ताजे वृत्तांत (न्यूज बुलेटिन्स) तासा तासाला टीव्हीवर आणि रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये ठळकपणे येत होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी पुट्टपार्थीला लक्षावधी भक्त जमा झाले होते. त्यांची गर्दी अनावर झाल्यामुळे पोलिसांना १४४ कलमाखाली संचारबंदी लावावी लागली होती. त्यांना दीर्घायुष्य चिंतण्यासाठी गावोगावी यज्ञयाग जपतप अनुष्ठाने वगैरे होत होती. सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले होते. त्यांच्यासंबंधातली कोणतीही बातमी लगेच उचलून तिचे प्रसारण करण्यासाठी माध्यमांच्या सर्व शक्ती एकवटल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीने कोणाला आश्चर्याचा धक्का बसण्याचे कारण नव्हते. ओसामा बिन लादेन याचा अमेरिकन जवानांनी खातमा केल्याचे त्रोटक वृत्त प्रत्यक्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी ते उचलले आणि जगभर पसरवले. अचानक आलेली ही बातमी मात्र खूप धक्कादायक होती असे म्हणता येईल. त्यानंतरसुद्धा अमेरिकेचे प्रवक्ते सांगतील तेच प्रसिद्ध होत होते. चौकस बातमीदारांच्या (इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिस्ट्स) प्रयत्नामधून त्यावर फारसा वेगळा प्रकाश पडलाच नाही.

सत्यसाईबाबांचे नाव मी सर्वात पहिल्यांदा ऐकले तेंव्हाच ते चमत्कारी बाबा म्हणून सर्वश्रुत झाले होते. त्यांच्या भक्तांची आणि चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. मोठमोठे नेते, अभिनेते, खेळाडू, अधिकारी वगैरे प्रसिद्ध व्यक्तींची गणना त्यात होऊ लागली. त्यांच्या दर्शनासाठी धडपडणार्‍या लोकांची संख्या वाढत गेली. बाबा नेहमी झगझमगीत प्रकाशाच्या झोतामध्ये राहिले. त्यांच्या अंत्ययात्रेला जेवढ्या अतिविशिष्ट व्यक्ती उपस्थित राहिल्या होत्या तेवढ्या क्वचितच कोणासाठी एकत्र येत असतील. त्यांच्या अंत्यविधीचे थेट प्रक्षेपण अनेक वाहिन्यांवरून होत होते. ते अगणित भाविकांनी पाहिले असणार. ओसामाचे नाव मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा तो भूमीगत झालेला होता. त्याचे नाव मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये आले होते. काही राज्यकर्त्यांचा त्याला प्रच्छन्न पाठिंबा आणि संरक्षण असल्याचे बोलले जात असले तरी तो अज्ञातवासातच राहून त्याच्या प्रक्षोभक भाषणांच्या सीडींमधून जगासमोर येत होता. त्याला मारणारे सोडून इतर कोणी त्याच्या अखेरच्या क्षणी त्याच्यापाशी नव्हते. त्याचा दफनविधी गुपचुप पार पाडला गेला. सत्यसाईबाबा आणि ओसामा यांच्यापैकी एक नेहमी डोळ्यांसमोर तर दुसरा नजरेआड राहात होता.

सत्यसाईबाबांविषयी नितांत श्रद्धा बाळगणार्‍यांची संख्या प्रचंड होती. ही अंधश्रद्धा आहे, त्यांचे चमत्कार म्हणजे हातचलाखी आहे हे सप्रमाण दाखवण्याच्या अंनिससारख्यांच्या प्रयत्नांचा त्यावर काही प्रभाव पडू शकला नाही. त्यांची गोम जाणणार्‍या विज्ञाननिष्ठ लोकांना त्यांच्याबद्दल अविश्वास नक्कीच वाटायचा, कदाचित तिटकारा वाटत असेल, इतर अनेकांना असूया वाटत असेल, माझ्यासारख्या अनेकांना आश्चर्य वाटायचे, पण कोणीही त्यांचा द्वेष करत असेल असे मला वाटत नाही. त्यांचे भक्त नसलेल्या लोकांनीसुद्धा त्यांनी चालवलेल्या शिक्षणसंस्था, इस्पितळे वगैरेंचा लाभ घेतलेला असणार. त्याबद्दल ते लोक त्यांच्या संस्थांचे उपकृत झाले असतील. ओसामाबद्दल मात्र घृणा, संताप, भीती, दहशत अशा नकारात्मक भावना मनात बाळगणार्‍यांची संख्या त्याच्याविषयी आदर वाटणार्‍यांच्या कित्येकपटीने मोठी असेल. काही जणांना कदाचित यातले काहीच फारशा तीव्रतेने वाटत नसले तरीही बातम्या वाचणार्‍या किंवा पाहणार्‍या एकूण एक लोकांच्या मनात या दोघांच्याहीबद्दल खूप कुतूहल तरी असणार यात शंका नाही. यामुळेच या दोघांच्याही निधनाची बातमी पहिल्या पानावर आठ कलमी शीर्षकासह छापून आली होती. प्रत्येक वाचक किंवा प्रेक्षक या बातमीकडे आकर्षित होणारच याची वर्तमानपत्रांना खात्री होती. प्रत्यक्षात ते दोघे जगासमोर वावरत असोत किंवा पडद्याआडून कारवाया करत असोत, या ना त्या कारणाने बातम्यांच्या विश्वामध्ये त्यांचा उल्लेख वर्षानुवर्षे सारखा होत असे. हे त्यांच्यामधले साम्य होते.

त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीमध्ये त्यांनी आपापल्या कामात घेतलेला धार्मिकतेचा आधार हा अतिशय महत्त्वाचा घटक होता. होता. "सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे" असे समर्थ रामदासांनी लिहिले आहे, तर "धर्म ही अफूची गोळी आहे" असे प्रतिपादन माओझेदुंग याने केले आहे. सत्यसाईबाबा आणि ओसामा यांच्याकडे पाहतांना या दोन्ही उक्तींची आठवण येते. जगातील प्रत्येक घटना इन्शाल्ला म्हणजे ईश्वरेच्छेनुसारच घडत असते असे सांगत असतांना आपण करत असलेले विघातक काम देखील 'तो'च आपल्याकडून करवून घेत आहे. ते करणार्‍याचे रक्षण 'तो'च करेल, त्याची आणि त्याच्या कुटुंबाची काळजी 'तो'च घेईल, 'त्या'चे काम करत असतांना एकाद्याला मरण आले तरी त्याउपरांत त्याला शाश्वत अशा स्वर्गात नक्की जागा मिळणार याची खात्री बाळगा, 'त्या'ला विरोध करणार्‍यांचा नायनाट होईल, त्यांची गय केली जाणार नाही अशा प्रकारची शिकवण देत असतांना दहशतवादाला सुद्धा 'परमेश्वराचे अधिष्ठान' असल्याचा भास ओसामा करून देत असे. सत्यसाईबाबा तर स्वतःच 'भगवान' असल्याचे सांगितले जात होते. चमत्कृतींच्या द्वारे ते भाविकांना पटवून दिल्यानंतर दुसर्‍या कोणा भगवंताच्या अधिष्ठानाची त्यांना आवश्यकताच नव्हती. परमेश्वराच्या फक्त नावाच्या बळावर या दोघांनी आपापल्या चळवळींचे सामर्थ्य कल्पनातीत पातळीपर्यंत वाढवले होते.

अफूसारख्या मादक पदार्थाचे सेवन केल्याने माणसाची विचारशक्ती क्षीण होते, त्याचे भान हरपते, त्याचे व्यसन जडते वगैरे परिणाम होतात. प्रामुख्याने वैज्ञानिकांच्या वसाहतीत होत असलेल्या एका साईभजनाला जाण्याची संधी एकदा मला मिळाली होती. इतर विषयांवर एरवी तर्कसंगत विचार मांडणार्‍या काही बुद्धीमान लोकांना साईचरणी लीन होऊन त्याच्या भजनांमध्ये उन्मन अवस्थेत गेलेले पाहिल्यावर मला माओचे वचन आठवले. थोर संतविभूतींप्रमाणे सत्यसाईबाबांनी महान चिरंतन असे विचार मांडले असे मी कधी ऐकले नाही. तरीही एवढी मोठमोठी मंडळी त्यांच्या भजनी का लागावी याचे गूढ काही माझ्याने उलगडत नाही. कदाचित माओच्या सांगण्यात तथ्य असावे. ओसामाच्या अनुयायांना याचा एवढा मोठा डोस दिला जातो की मानवता, सौजन्य, सारासार विचार यासारखे संस्कृतीतून येणारे त्यांच्यातले गुण तर नाहीसे होतातच, स्वसंरक्षणासारखे नैसर्गिक विचारही ते गमावून बसतात आणि जिवाची पर्वा न करता काहीही करायला तयार होतात. आत्मघातकी हल्ला करण्यामागचे यावेगळे स्पष्टीकरण मला सापडत नाही.

कमालीचे संघटनाकौशल्य हे आणखी एक साम्य या दोन व्यक्तींमध्ये होते. त्यांनी शून्यातून उभी केलेली साम्राज्ये किती मोठी होती आणि त्यांची मुळे कुठपर्यंत रुजली किंवा पसरली आहेत याचा अंदाजच येत नाही. हे काम एकटा दुकटा करू शकत नाही. आपल्या संघटनांचा विस्तार एवढा वाढवणे आणि तरीही त्यांचे सगळे नियंत्रण आपल्या मुठीत ठेवणे यासाठी असामान्य क्षमता लागते. अतिशय हुषार, कष्टाळू, कल्पक आणि एकनिष्ठ असे सहकारी निवडून गोळा करणे, त्यांना आयुष्यभर जवळ बाळगणे. त्यांच्या सहाय्याने दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या वगैरे अनेक स्तरांवरील फळ्या उभारून त्यांचे घट्ट जाळे विणणे, जगभरात अनेक ठिकाणी विधायक कामे किंवा विघातक कृत्ये घडवून आणण्यासाठी तपशीलवार पूर्वनियोजन करणे, त्याची अंमलबजावणी करायचे काम निवडक लोकांवर सोपवणे वगैरे वगैरे अनेक कामे हे लोक कसे करत असतील याचा विचार मनाला थक्क करतो. कदाचित त्यांच्या नावाने भलतेच कोणी हे सगळे करत असतील अशा अफवा अधून मधून उठत असत. ओसामाच्या बाबतीत हे जरा जास्तच होत असे. कदाचित इतर काही लोकांनी केलेली कार्ये किंवा उठाठेवी यांच्या नावावर परस्पर खपवल्या जात असल्याची शक्यता असते. पारदर्शकता कमी असली तर त्यातून संशयाला जागा निर्माण होते. पण या दोन सुपरमॅन्सबद्दल जेवढी हवा निर्माण केली गेली ती पाहता ते जर खरेच असेल तर त्यांचे कौशल्य कल्पनातीत वाटते.

सत्यसाईबाबा आणि ओसामा या दोन दिवंगत व्यक्तींबद्दल अनेक दिवस पानेच्या पाने भरून मजकूर छापून येत होता. मला जाणवलेल्या त्यातल्या काही ठळक मुद्द्यांचा थोडक्यात परामर्ष घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

Tuesday, June 07, 2011

व्रतबंध

Sunday, June 05, 2011
व्रतबंध (पूर्वार्ध)

सिलिब्रेटीज हॉटेलच्या प्रेसिडेन्सी बँके हॉलमध्ये बरीच गर्दी जमली होती. लालचुटुक रंगाची मऊमऊ कुशन्स बसवलेल्या शोभिवंत खुर्च्या हॉलभर मांडून ठेवलेल्या होत्या. त्यातल्या बहुतेक खुर्च्यांवर कोणी ना कोणी विराजमान झालेले होते. त्यात पुरुषांची संख्या तशी कमीच होती. गुढग्याच्याही खालपर्यंत पोचणारी पठाणी शेरवानी परिधान केलेले तीन चार जण सोडल्यास इतरांनी चांगल्यापैकी शर्टपँट घातल्या होत्या. महिलावर्गाची संख्या मोठी होती आणि त्यांच्या वेषभूषेमध्ये अगणित प्रकार होते. उत्तरेतील बनारसीपासून दक्षिणेतल्या कांचीपुरमपर्यंत आणि पश्चिमेतल्या पटोलापासून पूर्वेतल्या आसाम रॉसिल्कपर्यंत सर्व त-हेच्या रेशमी साड्या, शालू, पैठणी वगैरे होत्याच, त्याशिवाय विविध प्रकारच्या भारतीय तसेच परकीय फॅशन्सच्या असंख्य ड्रेसेसचे नमूने पहायला मिळत होते. बहुतेकजणी अंगावर ठेवणीतले निवडक आणि आकर्षक दागिने ल्यायल्या होत्या. सर्वांनी चोपडलेल्या सेंट्सच्या सुवासांच्या मिश्रणातून वातावरणात आगळाच गंध दरवळत होता. सौम्य वाद्यसंगीताच्या मधुर लकेरी हॉलमध्ये घुमत होत्या, त्यातच लोकांच्या बोलण्याचे आवाज मिसळत होते. आपल्या आवाजाचे डेसिबल वाढणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येकजण हळूहळू फुसफुसत असले तरी सर्वांचा मिळून कलकलाट नसला तरी गलबला होत होता. एका लहानशा गावात आयुष्य घालवून साठपासष्ठ वर्षांपूर्वी निवर्तलेल्या रघुनाथशास्त्र्यांचा आत्मा त्या हॉलच्या आसपास घुटमळत होता.

पणतवंडाच्या मुंजीचा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून त्याला पृथ्वीतलावर पाठवले गेले होते. तो आत्मा त्या जागेच्या शोधात हिंडत होता. एकाद्या घराच्या अंगणात बांबू रोवून आणि त्यावर जाजमाचे छत टाकून मांडव घातला असेल, त्याच्या दारापाशी केळीचे खुंट उभे करून ठेवले असतील, आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांच्या माळांचे तोरण बांधले असेल, दारापाशी ताशेवाजंत्री वाजत असतील, आत मंत्रघोष चालला असेल, मांडवात यज्ञकुंडाचा धूर भरलेला असेल आणि मागच्या बाजूला पेटलेल्या चुलखंडांचा. उन्हाने रापलेल्या अंगाचे दर्शन घडवणारे उघडबंब ढेरपोटे आचारी त्यावर अगडबंब हंडे आणि पातेली चढवून त्यात अन्न रांधण्यात मग्न असतील, डोक्यावर शेंडी आणि कमरेला लंगोटी किंवा रेशमी चड्डी धारण केलेले अष्टवर्ग बटू धावपळ करत असतील, मोठी माणसे, विशेषतः त्यांच्या आया त्यांच्यावर ओरडून त्यांना शांतपणे बसायला सांगत असतील, वगैरै वगैरे जे दृष्य रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला अपेक्षित होते ते गावात कुठेच सापडले नाही. प्रेसिडेन्सी हॉलमध्ये मास्टर क्षितिज याची थ्रेड सेरेमनी आहे असे लिहिलेला बोर्ड सिलिब्रेटीज हॉटेलच्या रिसेप्शनपाशी लावला होता, पण इंग्रजी वाचता येत नसल्यामुळे रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला त्याचा बोध झाला नाही.

रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला एक गोष्ट ठाऊक नव्हती. ती म्हणजे जेंव्हा त्यांची मुंज लागली होती त्या वेळी त्यांचे खापरपणजोबा बाळंभटाचा आत्मा असाच गोंधळून गेला होता. वैयक्तिक स्वरूपाच्या या धार्मिक विधीसाठी इतकी माणसे का जमली आहेत याचे त्याला नवल वाटले होते. बारा वर्षांसाठी घरापासून दूर जाणार असलेल्या रघूला बालरूपात पाहून घेण्यासाठी हे लोक जमले आहेत म्हंटले तर त्याच्य़ा वियोगाच्या कल्पनेने गंभीर न होता ते इतक्या आनंदात कसे असू शकतात हे त्याला समजत नव्हते. अंगावर उंची नवे कपडे आणि दागिने, डोक्यावर पागोटे वगैरे घालून घोड्यावर बसलेल्या रघुनाथाची बँडबाजाच्या कर्णकर्कश आवाजात मिरवणुक निघाली. तिला भिक्षावळ असे म्हणतात हे ऐकून त्या आत्म्याला झीटच यायची बाकी राहिली असेल.
-------------------------------------------------------------


Tuesday, June 07, 2011
व्रतबंध (उत्तरार्ध)

आतासारख्या दिवसातून ठराविक तास चालणा-या शाळा प्राचीन काळात अस्तित्वात नव्हत्या. शेती, व्यापार, हस्तकौशल्य वगैरे जीवनोपयोगी बाबींचे शिक्षण घरातच मिळत असे. वेदशास्त्रादिकांचे अध्ययन करण्यासाठी चांगल्या गुरूची नितांत आवश्यकता असायची. छापील पाठ्यपुस्तके आणि वह्या वगैरे नसल्यामुळे बहुतेक सारे शिक्षण मौखिक असायचे. गुरूला मुखोद्गत असलेल्या ऋचा, सूक्ते, श्लोक वगैरे शिष्यांकडून तोंडपाठ करून घेणे हा या शिक्षणाचा महत्वाचा भाग असे. त्यातल्या कानामात्रा, -हस्वदीर्घ, अनुस्वार वगैरे प्रत्येक बारकावे अचूक असणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी शिष्याने एकाग्रचित्त व्हायला पाहिजे. त्याचे मन विचलित होऊ नये, त्याला इतर कशाचा मोह पडू नये म्हणून त्याला कठोर ब्रह्मचर्यव्रत पाळावे लागत असे. त्याने जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत, मऊ शय्येवर झोपायचे नाही अशा प्रकारची बंधने त्याच्यावर घातली जात. त्या काळातले गुरू म्हणजे ऋषीमुनी नगराबाहेर अरण्यात आश्रम बांधून रहात असत. ज्ञानार्जन करण्यासाठी शिष्यांनाही त्यांच्या आश्रमातच रहावे लागे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा भार गुरूवर पडू नये म्हणून शिष्यांनी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरूला अर्पण करावी अशी व्यवस्था केली जात असे. अशी समजूत आहे.

भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी गरीब परिस्थिती असणा-या शिष्यांना या बंधनामध्ये कदाचित फारसे बिकट वाटणार नाही. पण प्राचीन भारतात अन्नधान्य, फळफळावळ, दूधदुभते वगेरेंची रेलचेल होती असेही सांगतात. अशा सुबत्तेत वाढणा-या लाडावलेल्या मुलाने एकदम सर्व मौजमजा आणि आवडीनिवडींचा त्याग करून विरक्त आणि निरीच्छ बनणे हे मला तरी अनैसर्गिक वाटते आणि असल्या नियमांचे किती पालन होत असेल याची शंका वाटते. ज्ञानाची मनापासून अतीव ओढ असलेल्या आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करण्याची आणि काहीही सहन करण्याची मनाची तयारी असलेल्या एकाद्या असामान्य मुलालाच ते शक्य होत असेल. कदाचित त्या काळात अशा असामान्य मुलांचाच व्रतबंध करून त्यांना गुरूगृही पाठवत असावेत. असे असेल तर व्रतबंधाच्या संस्कारात अशक्यप्राय अशी बंधने सरसकट सगळ्या मुलांवर घालायची रूढी कशी पडली?

जगातील बहुतेक सारे धर्म परमेश्वराला मानतात. तो सर्वसाक्षी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान देव आणि सामान्य माणूस यांच्या दरम्यान सर्व धर्मांमध्ये काही मध्यस्थ असतात. परमेश्वराची उपासना करण्याव्यतिरिक्त आचरण, आहार वगैरे जीवनातील इतर अनेक अंगांसाठी धर्माच्या नावाखाली असंख्य नियम सांगितले जातात. ते नियम प्रत्यक्ष ईश्वरानेच तयार केले असून ऋषी, मुनी, प्रेषित यांच्या मार्फत ते जगाला सांगितले गेले असल्यामुळे त्यांचे पालन अनिवार्य आहे असेही सांगितले जाते. हे नियम आणि त्यांचा अर्थ सामान्य माणसांना सांगायचे काम हे मध्यस्थ करतात. ही मंडळी धार्मिक वृत्तीची आणि सदाचरण करणारी, देवाच्या जवळची असावी अशी अपेक्षा असते. पुरोहित, शास्त्री, पाद्री, मुल्ला, मौलवी, ग्रंथी, मुनी, भिक्खू वगैरेंच्या रूपात हा वर्ग सर्वत्र दिसतो. या वर्गाला समाजात मानाचे स्थान असते. प्राचीन काळातले भारतातले ऋषीमुनी अरण्यात वनवास करून रहात होते, पण नंतरच्या काळातले धर्मगुरू नगरवासी झाले. त्यांच्या शिष्यांना घर सोडून गुरूगृही जाऊन रहाण्याची आवश्यकता राहिली नाही. या धर्मगुरूंना समाजात आणि राजदरबारी मानसन्मान मिळत होताच, त्याशिवाय द्रव्यप्राप्ती होऊ लागली. आपल्या मुलांनाही असेच सन्माननीय आणि समृद्ध जीवन मिळावे असे सर्वांना वाटणे साहजीक होते.

धर्मगुरूंचे काम सांभाळण्यासाठी विशेष शिक्षण घेऊन दीक्षा घेतली जाते. या शिक्षणाची सुरुवात करण्याची मुंज ही पहिली पायरी असते. ती पार केल्याशिवाय शिक्षणाची सुरुवातच करायची नाही असा परंपरागत निर्बंध होता. आपल्या मुलाला जेवढे जमेल तेवढे तो शिकेल, आपण त्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असा विचार करून आज प्रत्येक पालक त्याच्या मुलाला शाळाकॉलेजांमध्ये पाठवतो. असाच विचार करून सर्व मुलांचा व्रतबंध करण्याची प्रथा पडली असावी. त्यातले व्रत आणि बंध मागे पडत गेले आणि निव्वळ उपचार शिल्लक राहिला. मेकॉले साहेबाने शालेय शिक्षणपद्धत आणल्यानंतर मुंज आणि शिक्षण यातला संबंध संपला. मुंज केल्यानंतर घेण्याचे शिक्षण फक्त संध्या आणि मंत्र यांच्यापुरते सीमित राहिले. आता ते सुध्दा राहिलेले नाही. एकत्र कुटुंबातल्या घरातल्या आजोबा पणजोबांच्या आग्रहामुळे त्यांच्या समाधानासाठी एक कार्यक्रम केला जाऊ लागला आणि त्याला समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले. या निमित्याने आप्तेष्टांनी एकत्र जमणे, खाण्यापिण्याची हौस भागवून घेणे, भेटवस्तू देणे, नवे कपडेलत्ते आणि दागिने करणे वगैरे होऊ लागले.

पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या काळात थाटात मुंज करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते. गिरगावात एका ठिकाणी सार्वजनिक मुंजी लागत असत आणि प्रत्येक बटूमागे त्याच्या जवळच्या आप्तांसाठी पाच की दहा कूपने मिळत, तेवढेच लोक त्याला उपस्थित रहात असत. काही लोक तीर्थक्षेत्राला जाऊन तिथे मुलाची मुंज लावून येत असत. घरातल्या लग्नकार्याच्या सोबत लहान मुलांच्या मुंजी लावल्या जात. असे काही समारंभ मी पाहिले आहेत. माझ्या परिचयातल्या एका मुलाची मुंज या कशातच झाली नव्हती आणि त्याला त्याचा काही विषादही वाटत नव्हता. पण आधी मुंज झाल्याखेरीज त्याचे लग्न मी लावणार नाही असा भटजीने हट्ट धरला आणि त्याची मुंज, सोडमुंज आणि विवाह हे सगळे विधी एकापाठोपाठ उरकून घेतले.

काळ आणखी पुढे गेल्यानंतर म्हणजे आतापर्यंत मुंज हा प्रकार इतिहासजमा होईल असे मला त्यावेळी वाटत होते. त्यातल्या व्रत आणि बंध या शब्दांना खरोखर काही अर्थ उरलेला नाही. पण मध्यम वर्गीयांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारल्यामुळे समारंभ करण्याचा उत्साह मात्र कमी होण्याऐवजी जास्तच वाढलेला दिसतो. परवा मी एका मुंजीला गेलो होतो. आपल्या आजोबासोबत तिथे आलेल्या एका ७-८ वर्षाच्या मुलीने आजोबांना विचारले, "आपण इथे कशाला आलो आहोत?"
"आपल्या विकीच्या मुंजीला"
"मुंज म्हणजे काय? ती कशाला करतात?"
"ती शिक्षणाची सुरुवात आहे. आता त्याने गुरूकडे शिकायला जायचे आहे."
"तो तर आधीच थर्ड स्टँडर्डला आहे. आता कसली सुरुवात? त्याला हॉस्टेलमध्ये पाठवणार आहेत का? पण त्यासाठी चकोट कशाला करायला पाहिजे? मुलं त्याला हसणार नाहीत का? माझी मैत्रिण रुची पण हॉस्टेलात राहते, तिची पण मुंज केली होती का? .........."
नातीचे प्रश्न संपत नव्हते आणि आजोबांना काही केल्या उत्तरे सापडत नव्हती. अखेर मी तिची समजूत घातली, "अगं विकीच्या आईबाबांना एक मोठी पार्टी द्यायची होती, सगळ्या रिलेटिव्ह्जना आणि फ्रेड्सना बोलवायचे होते, आपले नवे ड्रेसेस, ज्युवेलरी त्यांना दाखवायची होती, त्यांच्या नव्या फॅशन्स पहायच्या होत्या. तू नाही का किती मस्त ड्रेस घातला आहेस? हे सगळं एन्जॉय करायसाठी आपण इथे आलो आहोत. "

Thursday, June 02, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ५


बॉइलिंग वॉटर रिअॅक्टर (बी.डब्ल्यू.आर)


सगळ्या प्रकारच्या व्यावसायिक न्यूक्लियर पॉवर स्टेशन्समध्ये पाण्याची वाफ करून ती टर्बाईनला पुरवली जाते, पण 'बी.डब्ल्यू.आर' या प्रकारात रिअॅक्टर व्हेसलमध्येच पाण्यापासून वाफ तयार होते. इतर प्रकारांच्या रिअॅक्टर्समध्ये त्यासाठी वेगळी उपकरणे असतात. बी.डब्ल्यू.आर.मध्ये 'एन्रिच्ड युरेनियम' हे फ्यूएल असते. 'मॉडरेटर' आणि 'कूलंट' या दोन्ही कामासाठी 'डिमिनराइज्ड लाइट वॉटर' (शुध्द केलेले साधे पाणी) वापरले जाते. रिअॅक्टरमधील प्रायमरी कूलंटच मॉडरेशनचे काम करतो. वरील क्र. १ या चित्रात बॉइलिंग वॉटर रिअॅक्टर असलेल्या पॉवर स्टेशनची रचना ढोबळ मानाने दाखवली आहे. रिअॅक्टर, टर्बाईन, कंडेन्सर आणि पंप यामधून पुनःपुनः फिरत राहणारे पाणी व वाफ यांचे अभिसरण अखंड चालत राहते.

रिअॅक्टरमध्ये अणूंच्या भंजनातून निर्माण झालेली जितकी ऊष्णता वाफेला मिळते त्यातल्या निम्म्याहून कमी ऊर्जेचे रूपांतर जनरेटरमध्ये विजेत होते आणि बाकीची ऊर्जा वाफेसोबत टर्बाईनच्या बाहेर येते. त्या वाफेला थंड करण्यासाठी कंडेन्सरमधील नळ्यांमध्ये थंड पाणी खेळत ठेवलेले असते. वाफेमध्ये असलेली ऊष्णता त्या पाण्याकडे जाऊन ते थोडे तापते आणि वाफेला थंड केले गेल्यामुळे तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते. ते होत असतांना कंडेन्सरमधील नळ्यांमध्ये वहात असलेल्या पाण्यातून तिच्यातली ऊर्जा वीजकेंद्रातून बाहेर जाते आणि बाहेरील वातावरणात विलीन होते. रिअॅक्टरमध्ये निर्माण झालेल्या अणूऊर्जेमधील फक्त तीस चाळीस टक्के ऊर्जेचे विजेत रूपांतर होऊन साठ सत्तर टक्के स्थानिक पर्यावरणात मिसळते. पण याला इलाज नसतो. सुमारे दोन तृतीयांश ऊर्जेला वीजकेंद्राबाहेर टाकून देणारे असले कंडेन्सर कशाला हवे असा विचार मनात येईल, पण ते नसले तर टर्बाईनमधून बाहेर निघणारी वाफ तिच्याकडे असलेल्या ऊर्जेसकट थेट वातावरणात जाईल. त्यामुळे तिच्याकडे असलेली ऊर्जाही वाया जाईल आणि त्याबरोबर अत्यंत शुध्द असे मौल्यवान पाणीही नष्ट होईल.

शिवाय टर्बाईनमधील वाफ थेट वातावरणात सोडली तर ती तितक्याच दाबाने बाहेर पडेल पण कंडेन्सरमध्ये तिचे पाण्यात रूपांतर होतांना तिने व्यापलेली जागा रिकामी झाल्यामुळे अंशतः निर्वात पोकळी (पार्शल व्हॅक्यूम) निर्माण होते. वातावरणाएवढ्या दाबापासून ते अंशतः निर्वात पोकळीपर्यंतचा वाफेचा जास्तीचा प्रवास टर्बाईनमधून होत असल्यामुळे त्या वाफेतल्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होतो. या कारणांमुळे वीजनिर्मितीच्या प्रक्रियेत 'कंडेन्सर' हा सुध्दा एक महत्वाचा घटक ठरतो. औष्णिक विद्युत केंद्रातही (थर्मल पॉवर स्टेशनमध्ये) असेच घडते. रेल्वे इंजिन सोडले तर इतर बहुतेक ठिकाणी वाफेचा उपयोग झाल्यानंतर कंडेन्सरमधून त्यातले पाणी परत मिळवले जाते.

बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरच्या मुख्य पात्राची (रिअॅक्टर व्हेसलची) अंतर्गत रचना चित्र क्र. २ मध्ये दाखवली आहे. या पात्राचा आकार एका ऊभ्या कॅपसूलसारखा असतो. त्याचा मुख्य भाग दंडगोलाकार (सिलिंड्रिकल) असतो आणि त्याच्या दोन्ही टोकांना घुमटाचा आकार दिलेला असतो. या मुख्य पात्राच्या आत एक दंडगोलाकार उपपात्र ठेवलेले असते, याला 'कोअर श्राऊड' असे म्हणतात. जेवढ्या भागात इंधन ठेवलेले असते आणि त्यातून ऊष्णता निर्माण होते त्याला 'कोअर' असे म्हणतात. कोअरचे आवरण म्हणजे 'कोअर श्राऊड' झाले. फ्यूएल आणि कंट्रोल रॉड्स यांना विवक्षित जागी व्यवस्थित रीत्या बसवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार त्यांना आतबाहेर करण्यासाठी सोयिस्कर अशी रचना या श्राऊडमध्ये केली जाते. पंपामधून येणारे पाणी कोअरच्या वरच्या भागात रिअॅक्टरमध्ये येते आणि कोअरच्या बाहेरील अंगाने वहात खालच्या भागात आल्यानंतर ते दिशा बदलून कोअरमधील फ्यूएलरॉड्सला स्पर्श करत वर चढते. तापलेल्या फ्यूएल रॉड्समुळे त्यात वाफेचे बुडबुडे तयार होतात आणि मागून येत असलेल्या पाण्याच्या रेट्याने ते वेगाने वर चढत जातात. ते एकत्र येऊन तयार झालेली वाफ रिअॅक्टर व्हेसलच्या वरच्या भागात जमा होत जाते. 'स्टीम सेपरेटर' नावाच्या उपकरणात त्या वाफेसोबत आलेले पाण्याचे कण वेगळे काढले जातात आणि बाष्पीभवनासाठी खालच्या भागात साभार परत पाठवले जातात. सेपरेट झालेली वाफ 'स्टीम ड्रायर' नावाच्या उपकरणात जाते. या भागात पाण्याच्या उरल्यासुरल्या थेंबांचे वाफेत रूपांतर होते आणि सुकी झालेली वाफ (ड्राय स्टीम) टर्बाईनकडे पाठवली जाते. टर्बाईनमध्ये वेगाने गेलेल्या वाफेच्या झोतात पाण्याचे थेंब असल्यास त्यांच्यामुळे टर्बाईनच्या पात्यांची झीज (इरोजन) होते. ते टाळण्यासाठी यासारख्या काही उपाययोजना केल्या जातात.

रिअॅक्टरमधून वाहणा-या पाण्याच्या या मुख्य प्रवाहाशिवाय एक उपप्रवाह वहात असतो. रिअॅक्टर व्हेसलच्या खालच्या भागातून सतत थोडे पाणी बाहेर काढून ते सूक्ष्म छिद्रे असलेल्या चाळणीतून गाळले जाते (फिल्टरिंग) आणि त्याचे शुध्दीकरण (प्यूरिफिकेशन) करून झाल्यावर ते पाणी पुन्हा मुख्य प्रवाहात आणून सोडले जाते. यामुळे या अत्यंत महत्वाच्या पाण्यात कचरा साठत नाही. काही ठिकाणी या पाण्यातील ऊष्णतेपासून कमी दाबाची वाफ तयार करतात आणि वीजनिर्मितीसाठी तिचा उपयोग करून घेतात. रिअॅक्टर व्हेसलचा वरचा भाग स्टीम सेपरेटर आणि स्टीम ड्रायर यांनी व्यापलेला असल्यामुळे कंट्रेल रॉड्सना वरखाली करणारी यंत्रणा खालच्या बाजूने बसवलेली असते. या यंत्रांना चालवण्यासाठी वीज लागते तसेच त्यांची देखभाल व दुरुस्ती करावी लागते. या कारणांमुळे ही यंत्रे वेगळ्या खोलीत असतात आणि त्यांना ऊभ्या दांड्यांच्या द्वारे कंट्रोल रॉड्सबरोबर जोडले जाते.

अॅटॉमिक रिअॅक्टरला 'शट डाऊन' करून त्यामध्ये चालत असलेली भंजनाची क्रिया बंद केली तरीसुध्दा त्यानंतर त्यातून ऊष्णता बाहेर पडतच राहते. युरेनियममधून अणूऊर्जा बाहेर पडणे थांबले असले तरी त्याच्या फिशन प्रॉडक्ट्समधून निघणा-या किरणांमधून ती ऊर्जा बाहेर निघत राहते. निखारे विझल्यानंतरसुध्दा बराच वेळ राख धगधगत राहते, तसाच पण खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रकार आहे. ही क्रिया हळूहळू आपोआप कमी कमी होत असते, पण तिला प्रतिबंध करण्याचा कोणताही उपाय अस्तित्वात नाही. ही नको असलेली ऊष्णता वाहून नेण्याची व्यवस्था करणे एवढेच करणे शक्य तसेच आवश्यक असते आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात. रिअॅक्टरमधून जाणारे मुख्य आणि उपप्रवाह या दोन्हींच्या मार्गात निरनिराळे 'हीट एक्स्चेंजर्स' बसवलेले असतात. रिअॅक्टरमध्ये तप्त होऊन बाहेर निघालेले पाणी यात जाऊन थंड होऊन रिअॅक्टरमध्ये परत येते.

रिअॅक्टरमधून वाहणा-या पाण्याला 'प्रायमरी कूलंट' असे म्हणतात. त्याच्या मार्गावरील उपकरणे किंवा पाईपलाईन यात कोठेही बिघाड झाला आणि त्या पाण्याची गळती झाली तर रिअॅक्टरला पुरेसे पाणी मिळणार नाही. याला 'लॉस ऑफ कूलंट अॅक्सिडेंट' (लोका) असे म्हणतात. त्यामुळे रिअॅक्टरमधले तपमान वाढून ते धोकादायक ठरू शकते. यामुळे अशा परिस्थितीत प्रायमरी कूलंट सर्किटमध्ये जास्त पाणी टाकण्याचे अनेक उपाय केलेले असतात. तसेच रिअॅक्टरच्या बाहेर किरणोत्सर्ग होऊ नये यासाठी रिअॅक्टरच्या सर्व बाजूंनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त करून ठेवलेला असतो. रिअॅक्टर व्हेसलच्या सर्व बाजूने एक एअरटाइट 'कंटेनमेंट' असते. ते पाइपलाइन्सच्या सहाय्याने एका 'व्हेपर सप्रेशन पूल'ला जोडलेले असते. रिअॅक्टरमधून वाफ बाहेर निघाल्यास ती आधी या कंटेनमेंटच्या 'ड्रायवेल' या भागात येते आणि पाइपांमधून पूलमधील पाण्यात सोडली गेल्याने ती त्या पाण्यात शोषली जाते. त्या वाफेसोबत आलेली ड्रायवेलमधली हवा 'वेटवेल'मध्ये जाते. सप्रेशन पूलमधील पाण्याला थंड करण्याची वेगळी व्यवस्था असते, गरज पडल्यास त्यात भर घालण्याची सोय केलेली असते, तसेच त्यातले पाणी पंपाने उपसून ते तडक रिअॅक्टरमध्ये नेऊन सोडण्याची व्यवस्थासुध्दा असते. जगातील शंभरातल्या नव्याण्णऊ रिअॅक्टरमध्ये यातल्या कशाचीच प्रत्यक्ष गरज पडलेली नाही. पण ती तरतूद करणे अत्यंत आवश्यक असते आणि प्रसंग पडला तर त्यांचा उपयोग करून संभाव्य अनर्थ टाळता येतो.

या तरतुदी अंमलात आणण्यासाठी काही पंप चालणे, व्हॉल्व्हची उघडझाप होणे गरजेचे असते. ते काम करण्यासाठी विजेचे अनेक पर्याय दिलेले असतात. पॉवर स्टेशनमध्ये तयार होणारी वीज, बाहेरच्या ग्रिडमधून येणारी वीज, इमर्जन्सी डिझेल जनरेटर, बॅटरी बॅक अप अशा निरनिराळ्या स्त्रोतांकडून ती येत असल्याने सहसा तिचा तुटवडा पडत नाही आणि त्याच वेळी नेमका लोका अपघात होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. फुकुशिमा येथील दाइ इची या एका स्टेशनमध्ये सुनामीमुळे आधी विजेचे सगळेच स्त्रोत एका झटक्यात निकामी झाले आणि त्यामुळे लोकासारखी परिस्थिती उद्भवली. टँकमध्ये साठवलेले पाणी आणि बॅटरी बँक या तरतुदी काही काळ कामाला येतात आणि नव्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी सवड मिळते. एरवी तेवढ्या अवधीमध्ये ती करता आली असती, पण विक्रमी भूकंप आणि सुनामी यांनी केलेल्या पडझडीने जपानच्या त्या भागातले सारे जनजीवनच उध्वस्त झाल्यामुळे केलेले शर्थीचे प्रयत्न तोटके पडले. फुकुशिमा याच ठिकाणी असलेल्या दुस-या पॉवर स्टेशनमध्ये मात्र या आणीबाणीच्या व्यवस्था कामाला आल्या आणि त्या स्टेशनमध्ये मोठा अपघात झाला नाही.

रिअॅक्टरमध्ये प्रायमरी कूलंट या कामासाठी वापरले जात असलेले पाणी गाळून घेतले असले तरी त्या गाळण्याच्या (फिल्टरच्या) सूक्ष्म छिद्रातून आरपार जाऊ शकणारे अतिसूक्ष्म कण शिल्लक राहतात. तसेच आयन एक्स्चेंजरमध्ये शुध्द केलेल्या पाण्यातही अत्यल्प प्रमाणात विरघळलेले क्षार शिल्लक असतातच. पीपीएम (पार्ट्स पर मिलियन किंवा दशलक्षात अमूक एवढे भाग)इतक्या कमी प्रमाणात ही अशुध्द द्रव्ये त्यात शिल्लक राहतात. एरवी त्यांचा काही उपसर्ग नसतो. पण हे पाणी रिअॅक्टरमधून जात असतांना तेथील न्यूट्रॉन्सच्या साम्राज्यात काही न्यूट्रॉन्स या अशुध्द द्रव्यांमध्ये शोषले जातात, तसेच पाण्यामधील हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांवरसुध्दा न्यूट्रॉन्स परिणाम करतात. यामुळे हे पाणी रेडिओअॅक्टिव्ह बनते. याच पाण्याची वाफ टर्बाईन, कंडेन्सर वगैरेमध्ये जात असल्यामुळे हा सारा भाग माणसांनी प्रवेश करण्यायोग्य रहात नाही. रिअॅक्टर सुरू असतांना निरीक्षण किंवा देखरेख या कामासाठीसुध्दा कोणीही या भागात जाऊ शकत नाही. ही कामे करण्यासाठी रिअॅक्टर शट डाऊन करून रेडिओअॅक्टिव्हिटी कमी होण्याची वाट पहात काही काळ थांबावे लागते. बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमध्ये ही एक उणीव असते.

जगभरात बी.डब्ल्यू.आर. या प्रकारचे ९२ रिअॅक्टर्स असून त्यांची एकंदर क्षमता ८४००० मेगावॉट्स एवढी आहे. हा प्रकार दुस-या क्रमांकावर आहे आणि बरीच वर्षे राहणार आहे. भारतामध्ये तारापूर येथे उभारलेला सर्वात पहिला अणूविद्युत प्रकल्प या प्रकारचा होता. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारच्या रिअॅक्टरची उभारणी केली गेली नाही.