Monday, June 20, 2011

बाप रे बाप

काल म्हणे बापाचा दिवस होता, म्हणजे फादर्स डे. अलीकडे रोजच कसले ना कसले डे येत असल्याने ते आल्याचे कळतही नाही. योगायोगाने मी काल माझ्या मुलाकडे रहायला गेलो होतो, पण या बापदिवसाचा मलाही पत्ता नव्हता आणि आमच्या चिरंजीवांनाही. सकाळचे वर्तमानपत्र दुपारी निवांतपणे चाळत असतांना कोणा बड्या बापांच्या मुलांनी मुक्तपणे उधळलेली मुक्ताफळे वाचली आणि कालचा दिवस आपला असल्याचे समजले, पण या दिवशी कोणी आणि नेमके काय करायचे असते ते काही कोणी सांगितले नाही आणि कोणीही काही वेगळे केलेही नाही.

यावरून एका सिनेमातला संवाद आठवला. त्या काळात मकरंद अनासपुरे इतका पुढे आला नव्हता. तो त्याच्या खास औरंगाबादी स्टाइलमध्ये म्हणतो, "अरे तुमचे आई आणि बाप जीवंत असतांनाच त्यांचे कसले दिवस घालताय् ? आमचा तर प्रत्येक दिवस फादर्स डे मदर्स डे असल्यासारखे आम्ही नेहमीच त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागतो."
.
.
.
एक लहानगा मुलगा रस्त्याने जात असतांना त्याच्या बापाला म्हणाला, "बाबा माझा हात घट्ट पकडून ठेवा हं, नाही तर मी गर्दीत कुठेतरी हरवेन."
बाबा म्हणाला, "अरे तुला एवढी काळजी वाटत असेल तर मग तूच माझं बोट नीट पकडून ठेव ना."
त्यावर मुलगा म्हणाला, "नको, उगीच माझं लक्ष कुठे तरी गेलं तर मी कदाचित तुमचं बोट सोडून देईन. पण मला माहीत आहे की काहीही झाले तरी तुम्ही मात्र माझा हात सोडणार नाही,"
.
.
.
दुस-या एका लहान मुलाला त्याच्या बापाने उंच स्टुलावर उभे केले आणि खाली उडी मारायला सांगितले. मुलगा घाबरत होता. त्याला धीर यावा म्हणून बापाने सांगितले, "अरे, मार उडी. मी आहे ना तुला पकडायला."
मुलाने उडी मारली. त्याला धरण्याचा प्रयत्नही न करता तो बाप मागे सरकला. मुलगा तोंडघशी पडला. त्याचा गुडघा आणि ढोपर खरचटले. त्याने उठून काही बोलायच्या आतच बापाने त्याला विचारले, "पोरा, यातून तू काय शिकलास ?"
मुलगा उद्गारला, "बापाच्या बोलण्यावरसुध्दा विश्वास ठेवायचा नसतो."
बाप म्हणाला,"बरोबर. हे लक्षात ठेवलेस तर तू धंदा चांगला चालवशील."

2 comments:

Kaivalya said...

उत्तमच लिहिता की सर तुम्ही! तुमचा कुठल्याश्या पेपर मधला लेख वाचण्यात आला. लेखक कोण ते पाहावं म्हटलं तर तुमच्या ब्लॉगचा पत्ता! मग तुमचा ब्लॉग ही पहिला आणि फोलोअर झालो. संवाद घडत राहतीलच. अपेक्षा आहे, उत्तम काहीतरी फलद्रूप होईल. भेटू पुन्हा!

Anand Ghare said...

'तुमचा कुठल्याश्या पेपर मधला लेख वाचण्यात आला'
हे वाचून आनंद झाला (तो छापून आला म्हणून) आणि नवल वाटले की ते मलाच कसे समजले नाही.
आपल्या उत्साहवर्धक अभिप्रायासाठी आभारी आहे. असेच माझे लिखाण वाचत रहा आणि माझा उत्साह वाढवत रहा अशी विनंती.