Friday, June 25, 2010

मराठी सुभाषिते

शालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात सुभाषितानि नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा. एका ओळीत एकादे तत्व किंवा सत्य मांडलेले आणि दुस-या ओळीत त्याचे उदाहरण अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. कांही सुभाषितांचे चार चरणही असतात. या सुभाषितांमध्ये अत्यंत सोप्या भाषेत आणि चपखल उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन पण मनोरंजक पध्दतीने केलेले असल्यामुळे ती लक्षातही राहतात. सुभाषित म्हंटले की ते संस्कृतमध्येच असले पाहिजे असा अलिखित नियम आहे.

माझ्या आईला मराठी ही एकमेव भाषा येत होती, त्या काळातील नियमांप्रमाणे संस्कृत शिकणे तिला शक्य झाले नाही. पण मराठी भाषेतील असंख्य सुवचने तिच्या जिभेवर होती आणि ती त्यांचा उपयोग बोलण्यामध्ये करत असे. त्यातली कांही वचने ही सुभाषितांसारखीच होती. त्यांतली थोडी पुढे अंशतःच वाचनात आली. ती जशी आठवतात तशी खाली दिली आहेत.

बालपणी बाळांची कोमलतरुतुल्य बुध्दी वाकेल । घेईल ज्या गुणांना ते गुण विकसून तीही फाकेल ।।

केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार । शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ।।

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे । ............. परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ।।

...... कठिण समय येता कोण कामास येतो।।
( वाचकांना पूर्ण श्लोक माहीत असल्यास कृपया ते द्यावेत.) *** खाली पहा
रामदासस्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक ही जवळ जवळ सुभाषितेच आहेत. त्यातला भक्तीमार्गाचा उपदेश कदाचित सर्वांना पटणार नाही, पण त्याशिवाय रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा खूप सूचना या मनाच्या श्लोकांमध्ये दिल्या आहेत. मात्र त्या सोदाहरण नसल्यामुळे नुसताच कोरडा उपदेश वाटतात.

नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥

संत नामदेव, तुकाराम, चोखा मेळा आदींचे अनेक अभंग ही सुभाषितेच आहेत. उदाहरणादाखल हा अभंग पहा.

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचारवा ।।
ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार ।।
महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती ।।
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥

कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया सोंगा ।।

व्यंकटेशस्तोत्रामधील कांही ओव्या निव्वळ सुभाषिते वाटतात.
समर्थागृहीचे श्वान, त्यास सर्वही देती मान।।

बहिणाबाईंच्या ओव्या तर नक्कीच अगदी सुभाषितांसारख्या आहेत. (मूळ अहिराणी बोलीभाषेतल्या ओव्या जराशा शुध्द मराठी भाषेत दिल्या आहेत.)
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर ।
आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर ।।

मन वढाय वढाय, जसं पिकामध्ये ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर ।।

अशी अनेक उदाहरणे देता येतील. अलीकडल्या कवींच्या कांही रचनासुध्दा सुभाषितांसारख्या वाटतात.
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ।
जरतारी हे वस्त्र माणसा तुझीया आयुष्याचे।।

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गांठ ।।
वियोगार्थ मालन होते, नियम या जगाचा । पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।

देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस घेणा-याचे हात घ्यावे ।।

संस्कृत भाषेतील कांही सुभाषिते प्रसिध्द साहित्याचा भाग आहेत तर कांही सुटे सुटे श्लोक आहेत. त्यांचे रचयिते कोण होते हे आज आपल्याला, निदान मला तरी ठाऊक नाही. मला असे वाटते की मुद्रणयंत्राचा शोध लागल्यानंतर आणि प्रकाशनाची सोय उपलब्ध झाल्यानंतरच्या काळातल्या पंडितांनी त्या श्लोकांचे संकलन केले असावे. मराठी भाषेतील सुभाषितांचे असे एकत्र संकलन कदाचित झाले नसावे किंवा कोणी केले असले तरी त्याला प्रसिध्दी मिळाली नसावी.
---------------------------------------------------------------------
या अपूर्ण श्लोकांचे बाकीचे भाग मला उपक्रमावरून मिळाले. ते असे आहेत.
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली , जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो।।

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे,
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे,
सशाचेही लाभे, विपिन फिरता शृंगही जरी,
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ।।
------------------

दि.०३-०४-२०१९
या स्थळांवर आणखी काही सुभाषिते पहावीत. हे संकलन आता तिथे करीत आहे.

मराठी सुभाषिते आणि घोषवाक्ये
https://anandghare.wordpress.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87/

मराठी सुभाषिते 
https://anandghare.wordpress.com/2011/04/06/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87/


9 comments:

नरेंद्र गोळे said...

संस्कृत-मराठीतील बहुतेक सुभाषितांचा उगम राजा भर्तृहरीच्या "शतक-त्रयी" या शृंगारशतक, वैराग्यशतक आणि नीतिशतक या तीनशे श्लोकांमधे दडलेला असतो.

आपण दिलेले "प्रयत्ने वाळूचे कण" हे सुभाषितही भर्तृहरीच्या मूळ संस्कृतातील:

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीड्यन्पिबेच्च ।
मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः ॥
कदाचिदपि पर्यटन्शशविषाणमासादयेन्नतु ।
प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥

या सुभाषिताच्या, वामन पंडित यांनी मराठीत केलेल्या भाषांतरातून आलेले आहे.

राजा भर्तृहरी खरोखरीच अनुभवसंपन्न, अभिव्यक्तीकुशल आणि प्रभावी आर्जवी भाषा वापरणारा थोर पंडित होता.

Jeevanlal said...

तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो?

Jeevanlal said...

तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो?

Anand Ghare said...

श्री जीवनलाल यास सनविवि
पूर्ण श्लोक दिल्याबद्दल धन्यवाद

Unknown said...

तेथील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जळविहार विशेष केला, पोटीच एक पद लंबविला दुजा तो, पक्षी तनू लपवी भूप तया पहातो,



नृपतीस कटी बंधू तोचता होय चनचू
कल कल कल हंसे फार केला सुटाया
फडफड फड निज पक्षी.......

बस्स एवढंच आठवलं सर

Unknown said...

सुंदर

कैलास रसाळ said...

कठीण समय येता कोण कामास येतो |
अंतकाळी तुला कोण सोडू पहातो ||

Anonymous said...

ह्यात ही ओळ शेवटी आहे.मला वाटते लोकमान्यांनी ही ओळ सुरुवातीला घेऊन एक श्लोक सदर केला होता

Anand Ghare said...

अनामिकांनी कृपया कुठल्या श्लोकातली कुठली शेवटची ओळ ते लिहावे आणि कॉमेंटमध्ये आपले नाव लिहावे अशी विनंति.