Friday, June 25, 2010

मराठी सुभाषिते

शालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात सुभाषितानि नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा. एका ओळीत एकादे तत्व किंवा सत्य मांडलेले आणि दुस-या ओळीत त्याचे उदाहरण अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. कांही सुभाषितांचे चार चरणही असतात. या सुभाषितांमध्ये अत्यंत सोप्या भाषेत आणि चपखल उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन पण मनोरंजक पध्दतीने केलेले असल्यामुळे ती लक्षातही राहतात. सुभाषित म्हंटले की ते संस्कृतमध्येच असले पाहिजे असा अलिखित नियम आहे.

माझ्या आईला मराठी ही एकमेव भाषा येत होती, त्या काळातील नियमांप्रमाणे संस्कृत शिकणे तिला शक्य झाले नाही. पण मराठी भाषेतील असंख्य सुवचने तिच्या जिभेवर होती आणि ती त्यांचा उपयोग बोलण्यामध्ये करत असे. त्यातली कांही वचने ही सुभाषितांसारखीच होती. त्यांतली थोडी पुढे अंशतःच वाचनात आली. ती जशी आठवतात तशी खाली दिली आहेत.

बालपणी बाळांची कोमलतरुतुल्य बुध्दी वाकेल । घेईल ज्या गुणांना ते गुण विकसून तीही फाकेल ।।

केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार । शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ।।

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे । ............. परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ।।

...... कठिण समय येता कोण कामास येतो।।
( वाचकांना पूर्ण श्लोक माहीत असल्यास कृपया ते द्यावेत.) *** खाली पहा
रामदासस्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक ही जवळ जवळ सुभाषितेच आहेत. त्यातला भक्तीमार्गाचा उपदेश कदाचित सर्वांना पटणार नाही, पण त्याशिवाय रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा खूप सूचना या मनाच्या श्लोकांमध्ये दिल्या आहेत. मात्र त्या सोदाहरण नसल्यामुळे नुसताच कोरडा उपदेश वाटतात.

नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥

संत नामदेव, तुकाराम, चोखा मेळा आदींचे अनेक अभंग ही सुभाषितेच आहेत. उदाहरणादाखल हा अभंग पहा.

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचारवा ।।
ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार ।।
महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती ।।
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥

कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया सोंगा ।।

व्यंकटेशस्तोत्रामधील कांही ओव्या निव्वळ सुभाषिते वाटतात.
समर्थागृहीचे श्वान, त्यास सर्वही देती मान।।

बहिणाबाईंच्या ओव्या तर नक्कीच अगदी सुभाषितांसारख्या आहेत. (मूळ अहिराणी बोलीभाषेतल्या ओव्या जराशा शुध्द मराठी भाषेत दिल्या आहेत.)
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर ।
आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर ।।

मन वढाय वढाय, जसं पिकामध्ये ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर ।।

अशी अनेक उदाहरणे देता येतील. अलीकडल्या कवींच्या कांही रचनासुध्दा सुभाषितांसारख्या वाटतात.
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ।
जरतारी हे वस्त्र माणसा तुझीया आयुष्याचे।।

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गांठ ।।
वियोगार्थ मालन होते, नियम या जगाचा । पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।

देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस घेणा-याचे हात घ्यावे ।।

संस्कृत भाषेतील कांही सुभाषिते प्रसिध्द साहित्याचा भाग आहेत तर कांही सुटे सुटे श्लोक आहेत. त्यांचे रचयिते कोण होते हे आज आपल्याला, निदान मला तरी ठाऊक नाही. मला असे वाटते की मुद्रणयंत्राचा शोध लागल्यानंतर आणि प्रकाशनाची सोय उपलब्ध झाल्यानंतरच्या काळातल्या पंडितांनी त्या श्लोकांचे संकलन केले असावे. मराठी भाषेतील सुभाषितांचे असे एकत्र संकलन कदाचित झाले नसावे किंवा कोणी केले असले तरी त्याला प्रसिध्दी मिळाली नसावी.
---------------------------------------------------------------------
या अपूर्ण श्लोकांचे बाकीचे भाग मला उपक्रमावरून मिळाले. ते असे आहेत.
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली , जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो।।

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे,
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे,
सशाचेही लाभे, विपिन फिरता शृंगही जरी,
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ।।
------------------

दि.०३-०४-२०१९
या स्थळांवर आणखी काही सुभाषिते पहावीत. हे संकलन आता तिथे करीत आहे.

मराठी सुभाषिते आणि घोषवाक्ये
https://anandghare.wordpress.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87/

मराठी सुभाषिते 
https://anandghare.wordpress.com/2011/04/06/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87/


Friday, June 18, 2010

१ विषय, २ लेख, ३ संकेतस्थळे आणि ४-५ दिवस - एक प्रयोग

शाळेत असतांना मला अचानक कधीतरी लेखन करायची उबळ यायची. त्या वेळेला एकादा कोरा कागद हाताला लागला आणि कोणतेही विघ्न आले नाही तर तो पेन्सिलीने अथवा शाईने काळानिळा होत असे. ही लेखनाची ऊर्मी थोड्या वेळानंतर ओसरायची. पण आपल्याकडे इतरांचे किती लक्ष आहे हे पाहणे हा स्वभावातला स्थायी भाव होता. त्याचाच एक भाग म्हणून आपले लिखाण किती लोकांनी वाचले याबद्दल उत्सुकता वाटायची. पण भिडस्तपणा हाही मनातला दुसरा एक स्थायी भाव असल्यामुळे मी आपणहून त्याबद्दल कोणाला विचारत नसे.

दुसरे बालपण सुरू झाल्यानंतर पहिल्या बाल्यावस्थेतल्या कांही गुणांनीही डोके वर काढणे सुरू केले. पण दरम्यानच्या काळात परिस्थिती खूपच बदलली आहे. आंतर्जालाच्या मुक्तांगणात आता कोणीही केंव्हाही जावे, तिथे काय काय आहे ते पहावे, त्यातले आपल्याला जे आवडेल ते वाचावे आणि लिहावेसे वाटले तर लिहून जालावर टाकावे. आपल्याला नेमके काय पाहिजे आहे ते शोधून काढण्यासाठी अनेक शोधयंत्रे उपलब्ध असल्यामुळे ते कामही सुलभ झाले आहे. कांहीतरी लिहावे असे मनात आले तर ते लगेच टंकता येते. त्याची सुबोध प्रत काढणे, ती जपून ठेवणे, कोणाला देऊन ती वाचायची त्याला विनंती करणे वगैरे कामे करण्याची गरज उरली नाही. त्यामुळे माझे लेखन आणि त्यांचे वाचन या दोन्हींमध्ये पहिल्या बालपणाच्या तुलनेत आता अनेकपटीने वाढ झाली आहे.

प्रयोगशीलता आणि सर्वेक्षणाची आवड हेसुध्दा माझ्यातले स्थायी भाव असल्यामुळे ते मला स्वस्थपणे बसू देत नाहीत. निरनिराळे विषय मला सतत खुणावत असतात. आपल्या वाचकवर्गाचेच सर्वेक्षण करावे असे वाटल्यामुळे मागल्या आठवड्यात मी एक प्रयोग करून पाहिला. एका जुन्याच विषयावर एक नवा लेख लिहिला आणि त्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग करून ते या ब्लॉगवर टाकले. तसेच त्यावर आधारलेले दोन वेगवेगळे लेख दोन वेगवेगळ्या संकेतस्थळांवर चढवले. एकच लेख अनेक ठिकाणी देणे कितपत योग्य आहे यावर मागे एकदा बरीच चर्चा झाली होती आणि दोन्ही बाजूंनी त्यात उपस्थित केलेले मुद्दे मला थोडे थोडे पटले होते. त्यामुळे विरोधकांचा मान राखून मी एकच लेख दोन संकेतस्थळांकडे पाठवला नाही. पण मला त्यात फारसे अयोग्य वाटत नसल्यामुळे ते दोन्ही लेख किंचित वेगळ्या स्वरूपाने माझ्या या ब्लॉगवर टाकले. अखंडपणे धोधो वहात असणा-या नवनवीन लेखनाच्या प्रवाहांमुळे आंतर्जालावरील लेखनाचे आयुष्य फार मर्यादित असते. पहिल्या ४-५ दिवसात त्याचे जे कांही वाचन व्हायचे असते ते होऊन जाते. यामुळे या सर्वेक्षणासाठी तेवढा कालावधी पुरेसा आहे.

कथा, संवाद, निबंध असल्या चौकटी आंखून त्यात बसेल तसे लिहिणे मला आवडत नाही. त्यामुळे मी माझ्या लेखनाला 'लिखाण' असे सर्वसमावेशक नांव देतो. माझा हा लेखसुध्दा अशाच प्रकारचा होता. पण मनोगत या संकेतस्थळाने आधी लेखनप्रकार ठरवला पाहिजे अशी सक्ती केली आणि तिथून फुटून निघालेल्या मनोगतींनी चालवलेल्या उपक्रम आणि मिसळपाव या संस्थळांनी ही परंपरा मात्र पुढे चालूच ठेवली. त्यातल्या उपक्रमावर ललितलेखन लिहिलेले चालत नाही. त्यामुळे 'नशीब की योगायोग' हा पहिला भाग विश्लेषणात्मक पध्दतीने लिहिला आणि मनातल्याच दोन व्यक्ती एकमेकींशी बोलत आहेत अशी कल्पना करून तो संवादाच्या रूपाने सादर केला. मिसळपावाला कसलेच वावडे नसल्यामुळे योगायोगावर आधारलेली एक काल्पनिक घटना लिहून त्यातून योगायोगांच्या निरनिराळ्या छटा दाखवण्याचा प्रयत्न केला.

उपक्रम या संस्थळावर सदस्यांची उपस्थिती नेहमीच कमी दिसते. त्यानुसार वाचनसंख्यासुध्दा मर्यादित असते. सुरुवातीच्या काळात मी शंभर हा ब्रेकईव्हन पॉइंट ठेवला होता. तेवढी वाचने झाली तर आपले श्रम वाया गेले नाहीत असे समजून पुढला लेख टाकायला हरकत नाही असे मी ठरवत असे. दोनशे झाली तर मनाला समाधान वाटत असे आणि हा आंकडा तीनशेच्या पुढे गेला की त्याचा आनंद होत असे. याहून पुढचा पल्ला मारण्याचे प्रसंग फारसे आले नाहीत. या वेळी मात्र तीनचार दिवसांमध्येच तीनशे वाचने झाली आणि त्यांचा आंकडा पुढे वाढतच गेला. 'छान', 'सुंदर', 'हेच', 'तेच' वगैरे प्रोत्साहन देणारे दोन चार प्रतिसाद सगळ्याच लेखांना मिळत असतात. आता त्यांची संवय झाली असल्यामुळे ते पाहून मी लगेच हरखून जात नाही. निदान दोन तीन ओळींचे दोन तीन प्रतिसाद आले तर त्यांची दखल घेऊन मी त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. या वेळी मात्र या लेखाचे नशीब असेल, किंवा योगायोग असेल किंवा माझा हा लेख कदाचित खराच चांगला झाला असेल ते मला सांगता येणार नाही, पण माझे स्वतःचे धरून तब्बल तीस प्रतिसाद आले आहेत. मला यापूर्वी कधी हा अनुभव आला नव्हता.

नशीब, योगायोग आणि त्याच्याशी निगडित असलेले भविष्यकथन या विषयावर मिसळपावावर यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली आहे आणि त्याचे पर्यावसान गुद्दागुद्दीपर्यंत जाऊन पोचले आहे. आतांपर्यंत मी मात्र मैदानाच्या कडेला असलेल्या झाडावर बसून मजा पहात होतो. अनुभवी आणि हायक्लास मंडळी पॉपकॉर्नची पोती सोबत नेत असत आणि त्यातला एकादा दाणा नेम धरून हळूच फेकत असत. मी आपला खा-या शेंगदाण्यांची पुडी घेऊन जात असे आणि ते एकट्यानेच चघळत बसे. या वेळी मी स्वतःच रिंगण आंखून रिंगसाईड व्ह्यू पहाण्याच्या विचारात होतो. पण कोणी मल्ल तिकडे फिरकलेच नाहीत. "ससा. कासव, पोपट वगैरे शब्दांची स्त्रीलिंगी रूपे कोणीतरी मला सांगावीत" असे जाहीर आवाहन स्व.पु.ल.देशपांडे यांनी आपल्या एका लेखात केल्याचे मी चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी वाचले होते. त्या काळात त्याला प्रतिसाद देण्याची कोणती सोय होती हे मला ठाऊक नाही. पण हा प्रश्न अजून अनुत्तरित राहिला असेल तर त्यात 'मल्ल' या शब्दाची भर घालावी. 'मल्लीण' म्हंटले तर ते त्यांना रुचेल कां आणि 'मल्लिका' म्हंटलेले साराभाई किंवा शेरावत मॅडम्सना चालेल कां कुणास ठाऊक. ते जाऊ दे. मला असे म्हणायचे आहे की या वेळी या विषयावर मुळीच झोंबाझोंबी झाली नाही. 'विनोद', 'मौजमजा', 'विरंगुळा' यासारखे लेबल मी मुद्दाम लावलेले नव्हते. तरीसुध्दा वाचनसंख्या चारशेच्या वर गेली ही समाधानाची बाब आहे. मिसळपावचा वाचकवर्ग तुलनेने नेहमीच मोठा असतो असे असले तरी ही तसे वाटून घ्यायला हरकत नसावी. या लेखाला मात्र मोजून तीन प्रतिसाद आले. पहिल्या वाचकाने फक्त वाचले एवढेच लिहिले, दुस-याला ते आवडले आणि तिस-याचा संदर्भच मला लागला नाही. कदाचित या लेखाची भट्टी नीट जमली नसावी.

या ब्लॉगवर दोन्ही भागांची मिळून सातशेहून अधिक वाचने झाली. त्यातल्या कांही लोकांनी कदाचित पूर्वीचे भाग वाचण्यासाठी टिचकी मारली असेल. एकंदरीत पाहता ज्या वेगाने इथल्या वाचनसंख्येचा आंकडा वाढत आला आहे त्यापेक्षा हा वेग थोडा जास्तच आहे. प्रतिसादांची संख्यासुध्दा तशीच आहे. हे निश्चितपणे उत्साहवर्धक आहे.

या छोट्याशा सर्वेक्षणाचा असा अनुभव आला. एवढ्यावरून लगेच कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई मी करणार नाही. पण थोडा अंदाज तर आला.

Sunday, June 13, 2010

नशीब आणि योगायोग (उत्तरार्ध)

"बोटात लाल खड्याची अंगठी घातल्यानंतर सुजाताचं लग्न ठरलं ही ज्योतिषविद्येची प्रचीती नाही तर काय फक्त योगायोग आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे कां?" त्या गृहस्थांनी मला विचारले.
मी सांगितले, "तसे म्हणता येईल, पण मी म्हणणार नाही."
"तुमचा नशीबावर विश्वास नाही आणि हा योगायोगही नाही, मग आहे तरी काय?"
"योगायोग म्हणजे 'कोइन्सिडन्स' या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. त्या अर्थाने हा एक योगायोग ठरतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. त्यातल्या आपल्याला महत्वाच्या वाटणा-या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला 'योगायोग' असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सुजाताचे लग्न त्या अंगठीच्या प्रभावामुळे जमले असे तुम्हाला वाटते, या दोन घटनांमध्ये कार्यकारण संबंध आहे असे वाटत असल्यामुळे तुमच्या दृष्टीने तो योगायोग नव्हता. मला तसे वाटत नसल्यामुळे कदाचित त्याला योगायोग म्हणता येईल. पण सुजातामध्ये कसलीच उणीव नाही आणि गाडगीळांची परिस्थितीही चांगली आहे. तिच्या बोटात अंगठी असो वा नसो तिचं लग्न आज ना उद्या ठरणारच होतं. गाडगीळांच्या घरातल्या सगळ्याच लोकांच्या बोटात निरनिराळ्या रंगाच्या खड्यांच्या अंगठ्या नेहमीच दिसतात. म्हणजे यातही अनपेक्षित असे कांही घडलेले नाही. यामुळे मला त्यात योगायोग दिसत नाही. ज्या गोष्टींसाठी नवससायास वगैरे करतात ती गोष्ट घडण्याची अपेक्षा असतेच, खात्री नसते. मनासारखे झाले की प्रचीती आली असे म्हणायचे आणि नाही झाले तर श्रध्दा कमी पडली, पूर्वसंचित आडवं आलं वगैरे स्पष्टीकरणे तयारच असतात. त्यामुळे यात अचानक घडणा-या योगायोगाचं प्रमाण कमी असतं. "
"आयुष्यातल्या ज्या गोष्टी भाग्यानुसार घडत असतात, त्यांना तुम्हीच योगायोग म्हणता ना!"
"रोजच्या जीवनात अपेक्षित असलेल्या घटना बहुतेक वेळा ठरल्यानुसार घडत असतात. त्यांना योगायोग म्हणायची गरज नाही. पण कधीकधी जीवनाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळते. एकाद्याचे नशीब अचानक फळफळलं किंवा दैवाने घात केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसटला, निश्चित वाटणा-या विनाशातून एकादा भाग्यवंत थोडक्यात बचावला किंवा दुस-या कोणावर अचानक आकाशातून कु-हाड कोसळली वगैरे जे आपण म्हणतो तशा गोष्टींबद्दल बोलतांना कदाचित योगायोगाने तसे घडले असेल असे मी म्हणेन. सगळेच योगायोग परिणामकारक असतातच असे नाही. अनेक वेळा योगायोगाने घडणा-या घटनांचा आपल्या जीवनावर कांहीच प्रभाव पडत नाही. दूरदेशी राहणारा एकादा जुना मित्र ध्यानी मनी नसतांना आपल्याला प्रवासात कुठे तरी भेटतो. अशा योगायोगातून चार घटका मजेत जातात आणि पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळतो एवढेच होते. असले योगायोग आपण कांही काळाने विसरूनही जातो. एकादी प्रसिध्द व्यक्ती अकस्मात भेटली तर ती आठवण आपण जपून ठेवतो पण त्यातून आपल्या जीवनात कांही बदल येत नाही. अशा एकाद्या आकस्मिक भेटीतून उत्कर्षाच्या नव्या संधी मिळाल्या किंवा फसगत झाली, जीवनाची दिशाच बदलली असे झाले तर तो टर्निंग पॉइंट ठरतो आणि कायम लक्षात राहतो."
"अशा गांठीभेटींचे योग आपोआप येत नाहीत. परमेश्वराने ते जुळवून आणले तरच ते येतात."
"हे ज्याने त्याने ठरवायचे आहे."

योगायोगाबद्दल बोलायचे झाले तर कधीकधी ज्याला आपण योगायोग समजतो त्याची योजना कोणीतरी ठरवून केलेली असते पण आपल्याला ती गोष्ट माहीत नसते. याचे उदाहरण पाहिजे असेल तर कोणतीही टीव्ही सीरीयल पहावी. कधीकधी आपल्या अज्ञानामुळे आपण तशी समजूत करून घेतो आणि नंतर जास्त माहिती मिळाल्यावर ती बदलते असेही होते. याचे एक उदाहरण देतो.

बंगलोरचा बसवण्णा, चेन्नैचा चेंगप्पा आणि जयपूरचा जयसिंग हे तीन गृहस्थ १ जूनच्या सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांनी अंधेरीला एकाच ठिकाणी धांवतपळत जाऊन पोचले ......... योगायोग असेल.
ते तीघेही त्या ऑफीसात नोकरीला आहेत. ........... मग ते एकत्र येणारच, त्यात योगायोग नाही.
ते तीघेही वेगवेगळ्या भागात राहतात तरीही ते नेमके एका वेळी कसे पोंचले? ..... योगायोगाने?
त्या दिवशी त्यांच्या ऑफीसच्या तिजोरीमध्ये बरीच रोकड होती ..... कदाचित योगायोगाने?
तो पगाराचा दिवस होता. ..... मग असणारच .... योगायोग नाही
सकाळी १० वाजून १० मिनिटांनी तिथे सशस्त्र दरोडेखोरांचे एक लहानसे टोळके आले. ...... ते ठरवूनच आले असणार .... योगायोग नाही.
पण नेमके त्याच जागी कां आले? .... योगायोगाने?
आल्या आल्या त्यांनी बंदुकीतून एक गोळी झाडली ..... दहशत बसवण्यासाठी असेल ... योगायोग नाही
तिने थेट चेंगप्पाचा वेध घेतला ..... योगायोग ?
ते आपसात तामिळ भाषेत बोलले ... कुठेती पाणी मुरतेय्.
कांही क्षणातच तिथे पोलीस येऊन पोचले ..... प्रचंड योगायोग .... त्यांना कसे समजले ???
ते पोलीस या दरोडेखोरांच्या मागावर होते ....... ???
ते दरोडेखोर तर बसवण्णाचा माग घेत तेथे पोचले होते. ........ कां?
त्याच्या ऑफीसात १ तारखेला बराच माल असतो असे त्याने बंगलोरला असतांना कोणाला तरी फुशारकी मारून सांगितले होते आणि त्याच्या संरक्षणासाठी कांही खास बंदोबस्त नसतो हेसुध्दा तो अनवधानाने बोलून गेला होता. ती माहिती तिकडच्या एका गँगला कळली होती .... योगायोग
आणि त्या पैशांवर डल्ला मारण्याचा बेत करून त्यांचे टोळके अंधेरीला आले होते. .... योगायोग नाही.
त्यांच्यातल्या एकाला कदाचित चेंगप्पाचा चेहेरा ओळखीचा वाटला ..... योगायोग
कदाचित त्या चोराला आपण ओळखले जाऊ अशी शंका आली म्हणून त्याने आधी त्यालाच गोळी घातली ...... योगायोग संपला
ते दरोडेखोर बसवण्णाला शोधत मुंबईत अंधेरीला आले असल्याची माहिती त्याच्या बंगलोरच्या मित्राला कुठून तरी समजली होती .... योगायोग
आणि त्याने सकाळीच फोन करून बसवण्णाला सावध केले. ..... योगायोग नाही
बसवण्णा जाम घाबरला, त्याने चेंगप्पा आणि जयसिंगला बोलावून घेतले. त्यांनी धीर दिल्यावर त्यांच्यासोबतीने तो ऑफीसात आला. ...... योगायोग संपला
जयसिंगचा एक मित्र अंधेरीला पोलिस इन्स्पेक्टर होता ...... योगायोग
जयसिंगने लगेच ही बातमी आपल्या मित्राला सांगितली. अशीच माहिती पोलिसांना त्यांच्या खब-यांकडूनही मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या ऑफीसवर नजर ठेवलेलीच होती. ....... योगायोग संपला.
चोर तिथे आल्यानंतर लगेचच पोलीस तिथे आले आणि त्यांनी चोरांना ताब्यात घेतले. .... योगायोग नव्हता
चेंगप्पाने ही नोकरी सोडायचे ठरवले होते. फक्त पगार घेण्यासाठी तो थांबला होता आणि त्याच दिवशी त्याला गोळी लागली .... योगायोग
त्या धक्क्याने तो खाली कोसळला असला तरी त्याची जखम गंभीर नव्हती. दोन आठवड्यात तो बरा होऊन हिंडू फिरू लागला. त्याच्या औषधोपचाराचा सगळा खर्च त्याच्या ऑफीसने केलाच, शिवाय अट्टल गुन्हेगारांना पकडून दिल्याबद्दल त्या तीघांना बक्षीसही मिळाले. ........ योगायोग म्हणावे की नाही?
आता चेंगप्पाने नोकरी सोडली नाही. मात्र तीघांनीही बदल्या करून घेतल्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे ते एकमेकांपासून दूर गेले.

या सगळ्या गोष्टी त्यांच्या नशीबात लिहिल्या होत्याच असे कांही लोकांना वाटते. चेंगप्पा आणि बसवण्णा यांच्या कुंडलीत अपमृत्यूचा योग होता किंवा त्यांच्या तळहातावरील लाइफलाईनला छेद गेलेले होते म्हणे. ते दोघे मिळून नुकतेच तिरुपतीला जाऊन व्यंकटेशाचे दर्शन घेऊन आले होते आणि सकाळी घरातून निघतांना आठवणीने तिथला अंगारा कपाळाला लावून आले होते. त्यानेच त्यांचे रक्षण झाले अशी त्यांना खात्री आहे.
मला हे सगळे योगायोग वाटतात, पण इतके योगायोग कसे जुळून आले असा प्रश्नही पडतो.

Thursday, June 10, 2010

नशीब आणि योगायोग (पूर्वार्ध)

बहुतेक सर्वसामान्य माणसे कांही प्रमाणात दैववादी आणि कांही प्रमाणात प्रयत्नवादी असतात. माझ्या बाबतीत प्रयत्नवादाचे प्रमाण जास्त असल्यामुळे माझे दैववाद्यांबरोबर खटके उडत असतात. अशाच एका चर्चेत एकाने मला विचारले, "तुमचा नशीबावर विश्वासच नाही कां?"
मी सांगितले, "म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर नाही."
"म्हणजे?"
"कधी कधी एकादा हुषार, समजूतदार आणि कष्टाळू माणूस खूप धडपड करतो, पण त्याला मिळावे तेवढे यश मिळत नाही आणि बेताची बुध्दी आणि कुवत असलेला दुसरा आळशी माणूस सगळे कांही मिळवून जातो. एकाद्या गोष्टीसाठी आपण जीवतोड मेहनत करूनही ती प्राप्त होत नाही आणि दुसरी एकादी गोष्ट आपसूक पदरात पडते. कोणाला बंपर लॉटरी लागते तर कोणी विमान अपघातात सापडून दगावतो. हे सगळे नशीबामुळे घडले असेच इतर सगळ्यांच्याबरोबर मीसुध्दा म्हणतो. याचा अर्थ मी सुध्दा नशीबावर विश्वास दाखवतो असा होतो. पण खरे सांगायचे तर माझ्या मते या सर्व घटना परिस्थितीजन्य असतात आणि आपल्याला त्या परिस्थितींचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ढोबळपणे विचार करतां लॉटरीमध्ये नंबर निघणे एवढे कारण बक्षिस मिळण्यासाठी पुरेसे असते आणि कोसळलेल्या विमानात तो प्रवासी बसला होता यापलीकडे त्याच्या मृत्यूसाठी दुसरे कारण असायची गरज नसते, पण आपण इथे थांबत नाही. लॉटरीतले नंबर काढण्याची पध्दत किंवा विमानाची रचना समजून घेणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे आपल्याला अगम्य असलेल्या गोष्टींच्या खोलात जाण्याऐवजी ईश्वरेच्छा, भाग्य, पूर्वसंचित वगैरे कारणे दाखवून आपण तो विषय आपल्यापुरता संपवतो."
"म्हणजे या गोष्टी नसतात कां?"
"ते मला माहीत नाही. पण त्या आहेत असे म्हणण्यात बरेच फायदे नक्की असतात. आपण भांडून मिळवलेली गोष्टसुध्दा नशीबाने मिळाली असे म्हणून विनयशील होता येते आणि आपल्या गाढवपणामुळे हातातून निसटलेली गोष्ट आपल्या नशीबातच नव्हती अशी मखलाशी करून तो लपवता येतो. तसेच दस-याच्या उत्कर्षाचे श्रेय त्याच्या भाग्याला देऊन त्याची मिजास उतरवता येते किंवा त्याच्या लबाडपणाकडे काणाडोळा करता येतो आणि त्याच्या नशीबाला दोष देऊन त्याच्या चुकांवर पांघरूण घालता येते, त्याची मर्जी राखणे किंवा त्याची समजूत घालणे वगैरे जमते. "
"लॉटरी लागण्यात आणि विमान अपघातात तर त्या माणसाचे कर्त़त्व किंवा चूक नसतेच. त्या गोष्टी तर निव्वळ दैवयोगानेच घडतात ना?"
"बहुधा नसाव्यात आणि तसे वेगळे कारण असण्याची कांही आवश्यकता नाही असे मला वाटते. आपले भाग्य जन्माच्या वेळीच सटवाई कपाळावर लिहून ठेवते, दुसरी कोणती देवता ते तळहातावरील रेषांमध्ये पेरून ठेवते, भृगुमहर्षींनी संस्कृत भाषेत, नाडीग्रंथात तामीळमध्ये आणि नोस्ट्रॅडॅमसने कुठल्याशा युरोपियन भाषेत ते आधीच लिहून ठेवले आहे आणि त्यानुसारच सर्व घटना घडत आल्या आहेत आणि पुढे घडणार आहेत वगैरे गोष्टी माझ्या बुध्दीला पटत नाहीत. ज्यांच्या अस्तित्वाबद्दलच मला शंका आहे अशा संकल्पनांचा अभ्यास करण्यात मी आपला वेळ वाया घालवत नाही. उलट जे लोक विधीलिखित अटळ आहे असे सांगतात आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तेच लोक बोटात अंगठ्या आणि गळ्यात ताईत घालून, कपाळाला अंगारा लावून, नवससायास, उपासतापास करून ते भविष्य बदलायचा प्रयत्न करतांना दिसतात याची मला गंमत वाटते. अगदी मुंगीच्या पायाला जेवढी माती चिकटली असेल तेवढासुध्दा विश्वास मी असल्या गोष्टींवर ठेवत नाही. त्यामुळे नशीबावर माझा विश्वास नाही असेसुध्दा मीच सांगतो असेही म्हणता येईल."
"पण तुमच्याशिवाय बाकी सगळ्यांना त्याची प्रचीती येते म्हणून तर ते या गोष्टी करत असतील ना?"
"इतरांचे मी सांगू शकत नाही. कोणत्याही उपायाने कोणाचेही भले होत असेल तर मला त्याचा आनंदच वाटेल. शिवाय या तथाकथित उपायांचे इतर अनेक फायदे मला दिसतात. दुःखाने पिचलेल्या आणि अपयशामुळे निराश झालेल्यांना त्यातून दिलासा आणि धीर मिळतो, हताशपणाच्या अवस्थेत असलेल्यांना आशेचा किरण दिसतो, आपल्या पाठीशी कोणती तरी अद्भुत शक्ती उभी आहे असे वाटल्याने त्याच्या आधारामुळे आत्मविश्वास वाढतो, मनाला खंबीरपणा मिळतो, अंगात उत्साह संचारतो, काम करायला हुरुप येतो, दैववादी माणूससुध्दा आपण कांही प्रयत्न करत आहोत असे समजतो आणि त्याचे समाधान त्याला मिळते. या सगळ्या गोष्टींचा आयुष्यात प्रत्यक्ष लाभ मिळतोच. शिवाय उपास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते, तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन करण्याच्या निमित्याने प्रवास घडतो, वेगवेगळ्या जागा पाहून होतात, चार वेगळी माणसे भेटतात, त्यातून अनुभवविश्व समृध्द होते. खास नैवेद्यासाठी तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ तर अफलातून असतात. तुम्ही मला साजुक तुपातला शिरा, खव्याचा कंदी पेढा किंवा गूळखोबरे असे कांही दिलेत तर मला त्याचा आनंदच वाटेल आणि मी ते आवडीने खाईन. माझ्या कपाळाला अंगारा लावलात तर मी तो पुसून टाकणार नाही याचे कारण मला तुम्हाला दुखवायचे नाही. इतरांचा विचार करूनही आपण कांही गोष्टी करत असतो. कोणा ना कोणाला बरे वाटावे म्हणून मी वर दिलेल्या अनेक गोष्टी केल्या आहेत. पण त्यामुळे माझ्या आधीव्याधी नाहीशा होतील, इडापिडा टळतील आणि माझा भाग्योदय होईल अशी अपेक्षा मी ठेवत नाही. तशा प्रकारचा अनुभव आजपर्यंत कधी मला आलेला नाही."
"तुमच्या मनात श्रध्दाच नसेल तर त्याचे फळ कसे मिळणार? नैवेद्य म्हणून खाल्लात तर त्याचा गुण येईल, खोबरे म्हणून खाल्लेत तर तो येणार नाही, फक्त कोलेस्टेरॉल वाढेल."
"प्रसाद म्हणून एकदम पंचवीस पेढे खाल्ले तर ते पचणार आहेत कां? माझे जाऊ द्या, पण इतरांना आलेली प्रचीती तरी दिसायला हवी ना."
"अहो, हांतच्या कांकणाला आरसा कशाला? आपल्या गाडगीळांच्या सुजाताच्या पत्रिकेतला मंगळ जरा जड होता. मागच्या गुरुपुष्यामृताला तिने बोटात लाल खड्याची अंगठी घातली आणि सहा महिन्यात तिचे लग्न जमले सुध्दा."
"अरे व्वा! ती एका नदीच्या रम्य किनारी उभी होती आणि तिच्या बोटातल्या अंगठीच्या प्रभावाने ओढला जाऊन एक उमदा राजकुमार अबलख घोड्यावर बसून दौडत तिच्यापाशी आला असे तर झाले नाही ना? आता सगळी राज्ये खालसा झाली आहेत आणि नद्यांचे पाणी दूषित झाल्यामुळे त्यांचे किनारे रम्य उरले नाहीत, अबलख घोडे आता रेसकोर्सवरच धांवतात, त्यामुळे अशी परीकथा कांही प्रत्यक्षात आली नसेल. ती एकाद्या मॉलमधल्या मॉडेलला निरखत असतांना एकादा तरुण कारखानदार तिथे आला आणि अंगठीमुळे तिच्यावर मोहित होऊन तिला आपल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसवून घेऊन गेला असेही झाले नाही. पूर्वी ज्या स्थळांकडून तिला नकार आला होता, त्यांना उपरती होऊन आता ते सोयरीक करण्यासाठी गाडगीळांना शरण आले असेही ऐकले नाही. मुलीच्या बोटात लाल खड्याची अंगठी घातल्यानंतरही गाडगीळ तिच्यासाठी वरसंशोधन करत होतेच. मग त्या अंगठीने असा कोणता चमत्कार केला?"
"पण आधी तिचे लग्न जमत नव्हते आणि आता ते जमले याला तुम्ही काय म्हणाल, फक्त योगायोग?"

. . . . . . . . . . . . .(क्रमशः)