Thursday, January 28, 2010

ब्लॉग माझा स्पर्धा (उत्तरार्ध)


प्रमुख पाहुणे श्री. अच्युत गोडबोले यांच्याबद्दल काय काय सांगावे? आजच्या युगातला एक चमत्कार वाटावा इतके अनेकविध पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वाला आहेत. केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेऊन सुरुवात केल्यानंतर पुढे व्यावसायिक सांधे बदलत ते आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संगणकतज्ज्ञ झाले. आज आघाडीवर असलेल्या अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळून त्यांनी आपल्या कारकीर्दीत त्या कंपन्यांना चांगले नांवारूपाला आणले. संगणक आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावरील तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होते. त्यासाठी अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेले आहे. त्यांनी तंत्रज्ञानावर अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली आहेतच. त्या पुस्तकांना आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान जगतात महत्व प्राप्त झाले आहे. इतर अनेक भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली आहेत. मराठी भाषेत त्यांनी लिहिलेली संगणकयुग, बोर्डरूम, नादवेध, किमयागार, झपूर्झा आणि अर्थात ही पुस्तके सुध्दा अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. ती अनुक्रमे संगणक, व्यवस्थापन, संगीत, विज्ञान, वाङ्मय आणि अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांवर आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना पं. कुमार गंधर्व पुरस्कार स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते मिळाला आहे. इतक्या वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यात इतकी उंची गाठलेली दुसरी कोणती व्यक्ती माझ्या पहाण्यातच काय, ऐकण्यातही नाही. या अष्टपैलुत्वासाठीच त्यांना इंद्रधनु पुरस्कार मिळाला आहे. याखेरीज एक सामाजिक जाणीव बाळगणारी आणि समाजकार्यासाठी तळमळीने काम करणारी व्यक्ती असा त्यांचा नांवलौकिक आहे. ऑटिस्टिक मुलांसाठी त्यांनी आशियाना ही संस्था चालवली आहेच, रानावनात राहणा-या आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीदेखील त्यांनी कार्य केले आहे.

असे खास पाहुणे आम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी येणार असल्याचे समजल्यामुळेच आम्हाला आनंद झाला होता. त्यातून ते निवांतपणे आमच्याबरोबर बसून गप्पागोष्टी करणार आहेत हे ऐकून तर त्याला पारावार उरला नाही. कांही मोठी माणसे बडी प्रस्थे झालेली असतात. मोठेपणाबरोबरच आढ्यता आणि आत्मप्रौढी हे गुण येऊन त्यांना चिकटतात. इतरांना तुच्छ लेखणे, त्यांनी सतत आपल्यापुढे लांगूलचालन करत रहावे असे वाटणे यासारख्या संवयी त्यांना लागल्या तर मग त्यांच्याशी संवाद साधणे कठीण होऊन जाते. पूर्वी असे कांही अनुभव आलेले असल्यामुळे अच्युत गोडबोले कसे त्वागतील आणि आपण यांच्याशी काय बोलायचे असे प्रश्न मनात येत होते आणि थोडे बिचकत बिचकतच आम्ही त्यांच्या सभोवती गोळा झालो होतो. इतरांचे मला नक्की सांगता येत नसले तरी बहुधा तसेच झाले असावे असे मला वाटले. पण गोडबोले यांना त्याचीही अपेक्षा असावी आणि संवय झाली असणार. त्यांनीच पुढाकार घेतला आणि अत्यंत कुशलतेने सुरुवात करून संवादाचे आभाळ मोकळे करून दिले. या स्पर्धेबद्दल थोडक्यात सांगून झाल्यानंतर क्रमाक्रमाने आमची माहिती विचारून घेतांनाच नर्म विनोद करीत त्यात ते आपला रंग भरत गेले.

कुठून तरी संवादाची गाडी पुण्यावर आली. पुणेरी पाट्यांना तर आता महाजालावर अढळ स्थान मिळाले आहे. पुण्यातल्या रस्त्यावर भेटलेल्या लोकांचे दोन मजेदार किस्से गोडबोल्यांनी सांगितले. एका नवख्या माणसाने आपल्या हाताने समोर तर्जनी दाखवत "शनिवारवाड्याकडे हे असेच समोर जायचे आहे ना?" असे विचारताच पुणेकर उद्गारला, "असंच कांही नाही. तुम्ही हात खाली करून गेलात तरीसुध्दा चालेल." दुसरा एक पुणेकर कर्वे रोडवर रस्त्याच्या मधोमध सायकल चालवत चालला होता. मागून येत असलेल्या ऑटोरिक्शावाल्याने अनेक वेळा भोंपू वाजवूनही तो बाजूला व्हायला तयार होईना. अखेर त्याने मोठ्याने हांक मारली, "अहो कर्वे" सायकलवाला थांबून म्हणाला, "माझे आडनांव कर्वे नाही." त्यावर रिक्शावाला उद्गारला, "तुम्ही हा रस्ता आपल्या बापाच्या मालकीचा असल्यासारखे चालला आहात म्हणून मला तसे वाटले." हा किस्सा निदान पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातला असला पाहिजे. आजच्या कर्वे रोडवरून मिलिटरीचा रणगाडा जात असला तरी कदाचित त्याच्या दोन्ही बाजूंनी दोन रिक्शा पुढे जाऊ शकतील. त्यानंतर इतर लोकांनाही उत्साह आला आणि भारतात सरदारजीच्या किंवा इंग्लंडमध्ये आयरिश लोकांच्या नांवाने सांगितले जाणारे कांही विनोद त्यांनी पुणेकरांच्या नांवांवर खपवले. पुण्याहून आलेल्या दोन्ही पाहुण्यांनी ते खिलाडूपणाने स्वीकारले, पण मुंबईला राहणा-या एका मूळच्या अस्सल पुणेकर सदस्याला मात्र ते नापसंत पडलेले जाणवले.

एकूण तेरा जणांना प्रमाणपत्रे मिळायची होती, त्यातल्या राजकुमार जैन आणि विजयसिंह होलाम या दोघांचे प्रतिनिधी आले होते आणि मेधा सकपाळच्याकडून सुरुवातीला कोणी नव्हते, पण नंतर त्यांचे प्रतिनिधित्व करणारे आले. उरलेले दहाजण मात्र जातीने उपस्थित राहिले होते. हरिप्रसाद भालेराव तर बंगलोरहून आलेले होते. योगायोगाने त्यांचे दुसरे एक काम निघाले होते किंवा त्यांनी ते जुळवून आणले असेल. स्टार माझा तर्फे तर टीएडीए मिळणार नव्हताच. प्रत्येकाने आपापली सोय करायची होती आणि सर्वांनी ती केली होती. ब्लॉग लिहिणा-या लोकांमधले अनेक जण परदेशात रहात असावेत अशी माझी धारणा होती आणि देशांतर्गत सदस्यापैकी पुण्यामुंबईपलीकडे राहणारे कोणी येतील की नाही याबद्दल शंका वाटत होती. त्यामुळे उपस्थितीचा हा आंकडा माझ्या कल्पनेपेक्षा जरासा मोठाच होता.

आलेल्या बारा जणांत मी स्वतः आणि श्री.प्रमोद देव हे दोघे सेवानिवृत्त (किंवा रिकामटेकडे) काका होतो. एकादा अपवाद वगळता बाकीचे सारे जण माहिती तंत्रज्ञानाशी निगडित होते. एका सदस्याचा सिनेक्षेत्रातल्या तांत्रिक बाजू सांभाळण्याचा व्यवसाय होता. माझ्यासकट बहुतेक लोकांनी इतरांचे ब्लॉग फारसे वाचले नसावेत. त्यांवर टीका करण्याची ही वेळ नव्हतीच, पण प्रशंसा करण्याइतपतसुध्दा माहिती कोणाकडे नसावी. त्यामुळे ब्लॉगवरचे लेखन या विषयावर चर्चेची गाडी आली तरी तिथे ती थांबत नव्हती. "ब्लॉग हे एक उद्याचे सशक्त माध्यम आहे. त्याचा चांगला उपयोग करून घेता यायला हवा." वगैरे सूतोवाच करून झाले पण त्यावरून पुढे ती आपल्या देशांतले अज्ञान, गरीबी, महागाई, संपादकांची कात्री, लेखन स्वातंत्र्य, कायद्यातल्या तरतुदी वगैरेकडे भरकटत जात असे. आपल्या स्वांतसुखासाठी मनातल्या विचारांना अभिव्यक्ती देणे यापलीकडचा विचार फारसा कोणी करतांना दिसला नाही.

याला अपवाद होतेच. पुणेकर मंडळींनी पुढाकार घेऊन ब्लॉगलेखकांचे एक संमेलन भरवले होते आणि पुढील वाटचालीसाठी विचारमंथन केले होते असे पुण्याच्या सदस्याने सांगितले. एवढेच नव्हे तर ब्लॉग्जच्या रूपाने साहित्याचे एक दालन उघडले गेले असून मराठी साहित्य संमेलनाने त्याची दखल घ्यावी असा प्रस्ताव त्याच्या अध्यक्षांकडे पाठवला असल्याचेही त्याने सांगितले. आपल्या एका मित्राने आपली ओळख लेखक म्हणून करून दिल्याचा किस्सा एका सदस्याने सांगितला.

अशा गप्पा चाललेल्या असतांनाच प्रसन्न प्रगट झाला आणि शूटिंगची सर्व व्यवस्था झाली असल्याची शुभवार्ता त्याने दिली. त्याबरोबरच आता आधी अल्पोपाहार घेणार की सर्व काम संपल्यावर म्हणजे दोन तासांनंतर तो घ्यायचा अशी विचारणा त्याने केली. तोंपर्यंत दुपारचा दीड वाजून गेला असल्यामुळे माझ्या पोटातल्या ब्रंचचे सुध्दा पचन झाले होते. इतरांचा नाश्तासुध्दा पचलेला असणार. पण भिडेपोटी ते सांगायला कोणी तयार नसावेत किंवा "आधी लगीन शूटिंगचे" असा विचार ते करत असतील. मी मात्र आपल्याला भूक लागली असल्याचे प्रांजलपणे जाहीर करून "आधीच कांही खाद्यंती झाली तर ते बरे होईल" अशी इच्छा व्यक्त केली आणि कोणीही त्याला विरोध दर्शवला नसल्यामुळे ती सूचना एकमताने मान्य झाली. त्याबरोबरच अच्युत गोडबोले यांच्याशी वार्तालापाची दुसरी फेरी सुरू झाली आणि अल्पोपाहार येऊन व तो खाऊन होईपर्यंत ती बराच वेळ चालली. त्यातला एक क्षणसुध्दा कंटाळवाणा गेला नाही.

त्यानंतर आम्ही खाली स्टूडिओच्या बाजूलाच असलेल्या कंट्रोल रूममध्ये गेलो. त्या ठिकाणी असंख्य मॉनिटर ठेवलेले होते आणि त्यावर वेगवेगळ्या कॅमे-यांमधून केले जात असलेले चित्रण आणि संग्रहातून घेतलेली दृष्ये वगैरे दिसत होती. त्यांचे मिश्रण करून प्रक्षेपण करण्यासाठी चित्रफीत करण्याचे काम चालले होते. क्रमाक्रमाने आमच्यातील एकेकाचे शूटिंग व्हायचे होते. त्यापूर्वी आमच्या तोंडाची साग्रसंगीत रंगरंगोटी झाली नाही, तरी पण ब्रशच्या स्पर्शाने थोडीशी साफसफाई झाली. माझा पहिलाच क्रमांक लागल्यामुळे मी सर्वात आधी स्टूडिओत गेलो. यापूर्वी मी दूरदर्शन, ईटीव्ही आणि सहारा या स्टूडिओंमधल्या चित्रणात भाग घेतला असल्यामुळे मला त्या बाबतीत नाविन्य नव्हते. त्या ठिकाणी झगमगणारे आणि उघडझाप करणारे असंख्य रंगीबेरंगी दिवे आणि छताला लटकवलेल्या रुळांवरून उभ्या आडव्या धावणा-या कॅमे-यांच्या ट्रॉल्या पाहून सुरुवातीला चक्रावून गेलो असलो तरी नंतर ते दृष्य ओळखीचे झाले होते. त्यांच्या मानाने पाहता स्टार माझाचा स्टूडिओ पिटुकला दिसला. सी एन एन च्या अॅटलांटा इथल्या केंद्राला भेट देणा-या पर्यटकांना दाखवण्यासाठी एक लहानसा डमी स्टूडिओ ठेवला आहे, तसा हा स्टूडिओ वाटला.

सुरुवातीला मंचावर येऊन निवेदक अश्विन बापट यांनी या कार्यक्रमाची पूर्वपीठिका सांगितली तसेच प्रमुख अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर अच्युत गोडबोले यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. नंतर आम्हा सर्वांना एकेकाला बोलावून प्रमाणपत्र आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आली. त्यानिमित्य आम्ही दोन वाक्ये बोलायची की दोन मिनिटे या बाबतीत थोडा घोळ झाल्यामुळे तीन चार वाक्यांत आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली. एक नवा अनुभव आणि कांही नव्या ओळखी यांची प्राप्ती झाली.

7 comments:

देवदत्त said...

काका, मस्त वृत्तांत लिहिलाय.
मी ही स्वत:च्या अनुभवाप्रमाणे लिहिलाय. पण एवढा विस्तृत नाही. :)

Naniwadekar said...

> श्री अच्युत गोडबोले ... इतक्या वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यात इतकी उंची गाठलेली दुसरी कोणती व्यक्ती माझ्या पहाण्यातच काय, ऐकण्यातही नाही.
>---

मी सारखा एका व्यक्तीचं नाव आठवून पाहतोय. खगोलशास्त्राचा अभ्यास, गणितात पांडित्य, एका कॉलेजची स्थापना, तिथे कायदा शिकवला, केसरी-मराठा सुरु करून त्यात अव्वल लेखन, गीतेवर ग्रंथ ... आणि हे सगळं मंडालेला सहा वर्षं तुरुंगात वाया घालवून. बहुतेक अच्युत गोडबोले नाव असावं. पण कदाचित ते नाव नसेलही. कारण ही व्यक्ती म्हणजे आयुष्यात कधी ईमेल पाठवली नसेल, खिशात मोबाईल बाळगला नसेल. छे, छे, असलं काही गोडबोल्यांबद्‌दल शक्यच नाही.

अज़ून एक व्यक्ती आठवतेय. विनोदी लेखनात आघाडीचे स्थान, उत्तम संगीतकार, वक्ता, संवादिनीवादनात भल्याभल्यांची साथ, सुश्राव्य गायक, लेखक, चिंतक. दातृत्व, काव्यवाचन, सिनेमा निर्मिती, अनेक विषयांत गती. नाव आठवायला कबूल नाही. पण 'अच्युत गोडबोले' नसावं. अनेक विषयांत गती असेल, पण ती सखोल कुठे होती?

अज़ून एक. खासदार, न्युक्लिअर फिज़िक्स चे प्राध्यापक, देशाचे अर्थमंत्री, राज्यघटना वगैरे विषयांचा अभ्यास, उत्तम वक्ते. "तुम्ही हा रस्ता आपल्या बापाच्या मालकीचा असल्यासारखे चालला आहात म्हणून मला तसे वाटले" वगैरे भंपक गोड-बोले किस्से आपण सांगणं योग्य नाही, असल्या मागासलेल्या मानसिकतेचे. शिवाय या खासदारांचा अभ्यास गोडबोल्यांसारखा सखोल वगैरे कुठे होता?

ब्रिटनची प्रतापी पंतप्रधानकी केली, बोअर युद्‌धात सैनिक म्हणून भाग, चित्रकार, हौशी गावंडी, वर नोबेल पारितोषिक मिळवणारे लेखक. पण ते 'स्टार माझा' तर्फे ब्लॉग्जचा अभ्यास कुठे करत?

गोडबोल्यांविषयी वाचून आम्ही धन्य झालो.

- नानिवडेकर

Anand Ghare said...

नानिवडेकरसाहेब, माझ्या टोळ्यात झणझणीत अंजन घातलेत त्याबद्दल आभार.
'माझ्या पहाण्यात किंवा ऐकण्यात' असे मी लिहिले आहे यावरून ती व्यक्ती माझ्या समकालीन असावी असा अर्थ मला अभिप्रेत आहे. कदाचित ते पुरेशा स्पष्टपणे व्यक्त झाले नाही. हे मला मान्य आहे.
इतिहासातल्या व्यक्तींशी आजच्या कितीही मोठ्या माणसाचीसुध्दा तुलना करणे माझ्या मते योग्य नाही. कोणालाही प्रतिअमूक प्रतितमूक असे संबोधणे मला पटत नाही. प्रत्येकाचे मोठेपण वेगळे असते.
लोकमान्य टिळक, पु.ल.देशपांडे आणि मधू दंडवते ही माझी दैवते आहेत. चर्चिलसाहेब विरोधी गोटात असले तरी त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. एवढे स्पष्टीकरण पुरेसे असावे.

आजच्या जगातलीसुध्दा सगळी मोठी माणसे मला ठाऊक आहेत असे मला वाटत नाही. आपल्या माहितीत आज वावरणारी एकादी अष्टपैलू व्यक्ती असेल तर तिची किंवा त्याची माहिती कृपया द्यावी

Naniwadekar said...

> इतिहासातल्या व्यक्तींशी आजच्या कितीही मोठ्या माणसाचीसुध्दा तुलना करणे माझ्या मते योग्य नाही.
>----

घारे काका : सध्या एकूणच समाज़ात विसविशीतपणा फार बोकाळला आहे. तुम्ही आधीची टीका मोकळ्या मनानी वाचलीत म्हणून अज़ून एक टीका करतो. इतिहासातले थोर लोकही तुमच्याआमच्यासारखेच होते. ज़े राम सीता कधी झालेही नसतील त्यांच्याशी मी कोणाची अवास्तव तुलना करणार नाही. पण एखाद्‌या किराणा घराण्याच्या गायकाची अब्दुल करीम साहेबांशी तुलना करता येत नसेल तर मी त्याला मोठा गायक मानणार नाही. गुरुपेक्षा शिष्य पुढे गेल्याची उदाहरणं अनेक आहेत. ती आज़च्या 'सारेच दीप कसे मंदावले आता' काळात दिसत नाहीत, पण म्हणून तुलना करु नये असा होत नाही.

मला अच्युत गोडबोले यांच्याविषयी काहीही माहीत नाही. पण मी ज्यांच्या मताचा आदर करतो अशा कोणाकडून मी गोडबोल्यांची स्तुती ऐकलेली नाही. (माझ्या स्वभावामुळे मला एकदम कोणाचा आदर वाटतच नाही, हा भाग वेगळा.) चार वेगवेगळ्या विषयांवर दहा पुस्तके लिहिली असणे या आधारावर मी कोणाला मोठा मानत नाही. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आपण हॉट-मेलच्या सबीर भाटियाचं उदाहरण घेऊ. त्याचे नंतरचे सगळे प्रकल्प कोसळले. त्याला ओळखणारा माझा एक मित्र भाटियाला पागल समज़तो. दोन वाक्य लिहिता-वाचता न येणारे मूर्ख लोक चाटूगिरी, कपटीपणा किंवा नशीब यांच्या आधारावर मुख्यमंत्री, पंतप्रधान वगैरे बनलेले आपण पाहतो. तेव्हा समाज़कारणात नाव होणे हा कर्तबगारीचा निकष आहेच, असं नाही. फालतू पुस्तकांचा खप होतो, फालतू कलाकारांच्या कलेचा फालतू लोक उदोउदो करतात. व्यासवाल्मिकींच्या काळातही हे घडत असणारच.

अर्थशास्त्राबद्‌दल बोलायचं तर मला त्यातलं काही कळत नाही, पण लिंडन जॉन्सनचं एक वाक्य मला आठवतं. 'Talking about economics is like pissing down one's leg. It seems hot to the doer but to nobody else.' १५ वर्षांपूर्वी अर्थशास्त्रातल्या २-३ नोबेल विजेत्यांनी एक गुंतवणूक कंपनी काढले. लोकांनी पैसा गुंतवला. त्यांनी घेतलेले शेअर्स धडाधड आपटले. त्यावर गॉडफ़्री स्मिथ म्हणाले की अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातलं समज़तं हे मानणारे लोकच मूर्ख आहेत. असे शांतपणे जगरहाट बघत आपले निर्णय आपण घेणारे स्मिथसाहेबांसारखे लोक मला आवडतात.

अच्युत गोडबोले यांच्यात काही प्रमाणात काही क्षेत्रांत क्षमता असेलही. किंवा नसेलही, आणि त्यांचं (तथाकथित) यश हा नशीबाचा भाग असेल. त्यांची स्तुती करताना मोकाट न सुटता तारतम्य बाळगावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. 'आता आपण एकमेकांना जोक्स सांगू' वगैरे बावळट विसविशीत प्रकार मला रुचत नाहीत, म्हणूनही गोडबोल्यांचे निर्बुद्‌ध विनोद वाचून माझं मन त्यांच्याविषयी जास्तच कलुषित झालं असण्याचीही शक्यता आहे.

- डी एन

Anand Ghare said...

"पण एखाद्‌या किराणा घराण्याच्या गायकाची अब्दुल करीम साहेबांशी तुलना करता येत नसेल तर मी त्याला मोठा गायक मानणार नाही." असे आपण लिहिले आहे. अब्दुलकरीमखाँचे गायन मला कधीच प्रत्यक्षात ऐकायलाच मिळाले नाही. पण मला ज्यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली आणि ते आवडले त्या सर्वांनाच मी मोठे म्हंटले आहे. त्यांचा अनुक्रम लावण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही. माझी तेवढी पात्रता नाही.

श्री.अच्युत गोडबोले यांनी अधिकारवाणीने लिहिलेले विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख मी वाचले आहेत. गूगलसर्चवर वाचून कदाचित मी किंवा तुम्हीसुध्दा तसे लिहू शकू असे म्हणता येईल, पण आपण ते करू शकलो नाही हे महत्वाचे आहे.
या वर्षी पद्मपुरस्कार मिळालेल्या लोकांबद्दल आजच्या वृत्तपत्रात आलेली मते आपण वाचली असतील. त्यामुळे फक्त योग्य व्यक्तीचाच गौरव होतो असे नाही, सगळ्या योग्य व्यक्तींचा होतो असेही नाही किंवा ज्यांचा होतो ते सारे अयोग्यच असतात असेही नाही. एकाद्या व्यक्तीबद्दल आदर वाटणे हे अनेक बाबींवरून ठरते.
स्वस्तातले विनोद (चीप जोक्स) आपल्याला आवडत नसतील. ते सांगणे हा कांही मोठेपणाचा भाग नाही. पण सर्वसामान्य माणसांना ते आवडतात आणि त्यांच्याशी पटकन जवळीक निर्माण करण्याचा तो एक मार्ग आहे असे मला वाटते.
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभारी आहे. मी लिहिलेल्या चार ओळी कोणीतरी वाचाव्यात आणि त्याबद्दल त्याला कांही तरी वाटावे ही माझ्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.

नीरजा पटवर्धन said...

कोल्ह्याला द्राक्षे आंबट की काय?

नीरजा पटवर्धन said...

काका, मला गोडबोल्यांच्या कॊमेंटसबद्दल काही प्रॊब्लेम नव्हता हो. मी एकुणात खूप वेळा जे ऐकायला मिळतं त्यातून काढलेला निष्कर्ष ऐकवला होता. तोही टवाळक्या म्हणूनच. बाकी काही नाही.. :)