Sunday, June 29, 2008

देवाचे खाते

जन्माला आलेले मूल नुसतेच डोळे मिचकावत असते. त्याच्या पांच ज्ञानेंद्रियामधून मिळणाऱ्या संदेशांचे कितपत आकलन त्याला होते ते कळायला मार्ग नाही. हळू हळू त्याची नजर स्थिर होते. चेहरा व आवाज ओळखून ते प्रतिसाद देऊ लागते. शब्दाशब्दाने भाषा शिकते. बोलायला लागल्यावर अनेक प्रश्न विचारून
भंडावून सोडते. त्याच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे पालकांच्याकडे नसतात किंवा कांही कारणाने त्यांना ती द्यायची नसतात. यातूनच "देवाचे खाते" उघडले जाते. जे जे आपल्याला माहीत नाही किंवा सांगता येणे शक्य नाही ते सगळे त्याच्या खात्यात मांडले जाते. त्या क्षणी तरी हा सर्वात सोपा मार्ग वाटतो. जसजसे त्या मुलाचे ज्ञान वाढत जाईल तसतशा कांही गोष्टी देवाच्या खात्यातून त्याच्या खात्यात जमा होतात. पण देवाचे खाते त्यामुळे कमी होते कां? मोठेपणीसुध्दा जगातल्या सगळ्याच विषयातल्या सगळ्याच गोष्टी समजणे किंवा समजावून सांगणे कोणालाच शक्य नसते. अनेक वेळा अनपेक्षितपणे घडलेल्या घटनांचे तर्कशुध्द विश्लेषण करता येत नाही. देवाची मर्जी म्हणून त्या सोडून द्याव्या लागतात. त्यामुळे ठाऊक झालेल्या पण न समजलेल्या गोष्टी देवाच्या खात्यात जमा होत जातात.

'कां', 'कुणी','कधी', 'कुठे', 'कसे', 'कशामुळे' 'कशासाठी', वगैरे प्रश्नरूपी दरवाजे ज्ञानाच्या प्रत्येक दालनाला असल्यामुळे कोठलाही एक दरवाजा उघडताच त्या दालनातील विहंगम दृष्य दिसते, तेथील गोष्टींचा आस्वाद घेता येतो पण त्याचबरोबर अनेक बंद दरवाजे समोर दिसतात. वेगवेगळे लोक त्यातून त्यांना आकर्षक वाटतील असे दरवाजे उघडून पलीकडील दृष्य पाहतात व जगाला दाखवतात अशा प्रकारे ज्ञानाचा सतत विस्तार व प्रसार होत जातो. या परिस्थितीत कोणालाही सगळे कांही समजले आहे ही स्थिती कधीही येणे अशक्य आहे. जेवढ्या गोष्टी देवाच्या खात्यातून माणसाच्या खात्यात वर्ग होतील त्याच्या अनेक पट गोष्टी देवाच्या खात्यात (निदान 'गॉड नोज' या सदराखाली) वाढत जातील.

उदाहरणादाखल पहा. फक्त दहाबारा वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात संगणक आला, त्यावर काम करतांना आजही अनपेक्षित गोष्टी रोज घडत असतात. जेंव्हा आपणच केलेली चूक लक्षात येते तेंव्हा आपण "ऊप्स" म्हणतो, ती नाही आली तर "गॉड नोज". यापायी दिवसातून किती तरी वेळा तसे म्हणावे लागते. दहाबारा वर्षापूर्वी माझ्या देवाच्या खात्यात हे पान नव्हते. म्हणजे देवाचे खाते दिवसेदिवस वाढतच चालले आहे.

पुलंच्या एका लेखात त्यांनी लिहिले आहे की कोणीतरी कोणाला विचारले,
"हे गाणे कोण गाते आहे?"
"लता मंगेशकर."
"ती घराच्या आंत बसली आहे कां?"
"नाही. तिचा आवाज रेडिओतून येतो आहे."
"ती झुरळासारखी रेडिओच्या आत शिरून बसली आहे कां?"
"नाही. गाण्याच्या रेडिओ लहरी रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपित केल्या जात आहेत"
"म्हणजे ती आता तिथे बसली आहे कां?"
"नाही. तिचे हे गाणे पूर्वीच रेकॉर्ड केले होते"
"म्हणजे कोणी व कधी?", "बरं मग पुढे काय?", "ते आतां कसे ऐकू येते आहे?" टेप, डिस्क, प्लेअर, ट्रान्स्मिटर, रिसीव्हर, फिल्टर, स्पीकर, अँप्लिफिकेशन, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन इ.इ. माहिती त्यातून पुढे येते, पण प्रश्न कधी संपतच नाहीत.
शेवटी पु.ल. म्हणतात "तू असाच बोलत रहा. कांही मिनिटांनी तुलाच समजेल की तुला सर्व कांही समजलेले नाही."
माणसाच्या ज्ञानाचे खाते संपून गेले की पुढे सगळे 'देवाचे खाते'.

No comments: