Sunday, May 10, 2020

कॅलिफोर्नियातले टॉरेन्स -१



मी २००८मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा पूर्वेकडच्या जॉर्जिया राज्यातल्या अॅटलांटा महानगराजवळ असलेल्या अल्फारेटा इथे राहिलो होतो. तीनचारशे वर्षांचा इतिहास असलेले आणि अमेरिकेच्या दृष्टीने पाहता हे एक जुने शहर होते आणि दीडदोनशे वर्षांपूर्वीच्या काही जुन्या काळातल्या वास्तू त्या शहराच्या जुन्या भागात अजूनही दिसत होत्या. पण मी रहात होतो तो भाग मात्र संपूर्णपणे नवा होता. आमच्या वसाहतीमध्ये (कम्युनिटीत) प्रत्येकी वीस पंचवीस फ्लॅट असलेल्या वीस पंचवीस इमारती एका मोकळ्या प्रशस्त जागेत अंतराअंतराने बांधल्या होत्या. आमच्या घराच्या आजूबाजूला खूप झाडे होती, त्यावर पक्षी किलबिलत असायचे, खारोट्या धावत असायच्या आणि ही मंडळी आमच्या अंगणातही निर्धास्तपणे येत असत. आमच्या कम्युनिटीमध्ये मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले एरियाज होत्या, मोठ्या लोकांसाठी टेनिस कोर्टे होती, स्विमिंग पूल होता आणि चक्क एक लहानसे नैसर्गिक तळे होते. त्यात कमळे उमलत असत आणि काळ्या रंगाच्या बदकांचा थवा विहार करत असे. अधूनमधून ही बदके रस्त्यातून एका रांगेत ऐटीत मार्च करत तेंव्हा पहायला मजा वाटत असे. संध्याकाळच्या वेळी खूप लोक घराबाहेर पडून तिथल्या मोकळ्या हवेची मजा घेत फिरतांना दिसत आणि भेटत असत. मात्र आमच्या वसाहतीच्या सर्व बाजूंनी उंच भिंत बांधून तिला बंदिस्त केले होते आणि घरातून निघाल्यानंतर मुख्य गेटमधून बाहेर पडून दोनतीनशे मीटर चालत गेल्यानंतर तिथे दुसरी मनुष्य वस्ती होती.

गेल्या वर्षी मी दुसऱ्यांदा अमेरिकेला गेलो तेंव्हा अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील कॅलिफोर्निया राज्यातल्या लॉसएंजेलिस या महानगराजवळ असलेल्या टॉरेन्स या शहरात राहिलो होतो. इथली परिस्थिती एकदमच वेगळी होती. तिथल्या अँझा अॅव्हेन्यू नावाच्या एका मोठ्या हमरस्त्यावर आमची कम्युनिटी होती. यातल्या दहापंधरा बिल्डिंग्ज एकमेकींना खेटून उभ्या होत्या. त्यामुळे घराच्या कुठल्याही खिडकीमधून मोकळे आकाश दिसत नव्हते किंवा मोकळा वारा खेळत नव्हता. झाडांच्या नावाने गुलाबासारख्या फुलझाडांच्या रांगा घरांना खेटून लावल्या होत्या. तिथे कुठलेही पक्षी किंवा प्राणी यांचे दर्शन दुर्मिळ होते. माणसेसुद्धा घरातून बाहेर पडली की थेट त्यांच्या गॅरेजमध्ये जाऊन आपल्या गाडीत बसायची. आवारामध्ये फिरायला मोकळी जागाच नव्हती. त्यामुळे मुद्दाम कुणाच्या घरी गेल्याशिवाय सहज येताजाता दुसरे कोणी भेटायचा प्रश्नच नव्हता.  अमेरिकेत असतात त्याप्रमाणे आतून मात्र ही घरेही चांगली ऐसपैस होती, खोल्या मोठ्या आकारांच्या होत्या आणि सामान ठेवण्यासाठी अॅटिक्स दिलेले होते. सोयींच्या दृष्टीने ते घर ठीक असले तरी प्रथमदर्शनी मला तिथे जरासे कोंदटल्यासारखेच वाटले.

त्यामुळे प्रवासाचा शीण उतरल्यावर दुसरे दिवशी सकाळीच मी घराबाहेर पडलो. आमच्या घरालगत असलेला अँझा अॅव्हेन्यू हा चांगला पंचवीस तीस मीटर रुंद असलेला आठ पदरी रस्ता होता आणि त्यावरून शेकडो मोटारी सुसाट धावत होत्या. आपल्या इकडे कुठल्याही शहराच्या अंतर्भागात इतकी वाहतूक पाहण्याची सवय नसल्यामुळे आधी तर मला धडकीच भरली. पण रस्त्याच्या कडेने सुरक्षित जागा ठेऊन बांधलेले पदपथ असल्यामुळे त्यावरून चालत पुढे गेलो.  तो सगळा रहिवासी भाग होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आमच्या इमारतीसारखेच दोन दोन मजली इमारतींचे मोठमोठे चौकोनी ठोकळे बांधलेले होते. पुढच्या चौकात एका बाजूला पेट्रोल पंप होता, त्याला तिकडे गॅसस्टेशन म्हणतात आणि पलीकडे काही दुकाने आणि खाद्यंतीच्या जागा होत्या. बहुतेक सर्वच जागी रस्ता आणि इमारती यांच्यामध्ये चांगली चार पाच मीटर रुंद इतकी मोकळी जागा ठेवलेली होती आणि त्यावर दाट गवताचा हिरवागार गालिचा पसरला होता, 'त्या सुंदर मखमालीवरती' नाजुक फुलराण्या खेळत होत्या, त्या जागांमध्ये अनेक लोकांनी तऱ्हेतऱ्हेची सुंदर फुलझाडे लावली होती आणि सर्वांनीच त्यांना हिरव्यागार घनदाट झुडुपांचे सुंदर कुंपण घातले होते. या सर्वांचीच उत्कृष्ट निगा राखलेली होती.  मी पहिल्यांदा म्हैसूरचे वृंदावन गार्डन पाहिले होते तेंव्हा आश्चर्यचकित झालो होतो. इथे तर मैलोगणती लांब रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट हिरवळ आणि सुंदर फुलांचे ताटवे पसरले होते. मुख्य रस्ता सोडून आत जाणाऱ्या लहानसहान रस्त्यांवरसुद्धा अशीच शोभा होती. घरांच्या समोर असलेल्या मोकळ्या जमीनीचे सुशोभीकरण ही तिथल्या प्रत्येकाची जबाबदारी असते आणि त्यावर नगरपालिका लक्ष ठेऊन असते असे समजले.


टॉरेन्सचा हा भाग अत्यंत सुव्यवस्थित नियोजन करून वसवलेला आहे. शहराच्या त्या भागात अँझा अॅव्हेन्यू आणि हॉथॉर्न बुलेवार्ड नावाचे दोन उत्तरदक्षिण हमरस्ते आहेत आणि त्यांना काटकोनात छेद देऊन पूर्वपश्चिमेच्या दिशांना जाणारे अनेक लहान मोठे रस्ते आहेत. त्यांना अमूक तमूक स्ट्रीट, अॅव्हेन्यू, बुलेवार्ड वगैरे नावे आहेत. हे सगळे चौक एकमेकांपासून सुमारे तीनशे यार्ड अंतरावर आहेत आणि प्रत्येक चौकात ट्रॅफिक सिग्नल्स आहेत. इथे सिग्नलच्या लाल हिरव्या केशरी दिव्यांची उघडझाप व्यवस्थितपणे होते आणि नियमांचे पालन अत्यंत काटेकोरपणे केले जाते. शाळा सुरू किंवा बंद होण्याच्या वेळा सोडून एरवी पायी चालणारे आणि रस्ता क्रॉस करणारे फारच कमी लोक असतात. त्यामुळे प्रत्येक चौकात पादचाऱ्यांना रस्ता पार करण्यासाठी वेगळी बटने असतात आणि ती दाबून समोरच्या दिव्यावर पांढरी बाहुली दिसल्यावर झपाझपा चालत तो रस्ता पार करायचा असतो. तोपर्यंत दोन्ही बाजूंची वाहने वाट पहात उभी राहतात. सुरुवातीला मला याची फार भीती वाटत होती, पण हळूहळू सवय झाली. आमच्या घराजवळच्या चौकात सकाळी साडेआठला शाळा सुरू होण्याच्या सुमाराला ट्रॅफिक गार्ड महिला पोलीस उभ्या असत आणि मुलांना रस्ता क्रॉस करायला मदत करत. 


अँझा अॅव्हेन्यूच्या पलीकडच्या बाजूला प्राथमिक(प्रायमरी), माध्यमिक (मिडल् स्कूल) आणि उच्च माध्यमिक (हायस्कूल) शाळा आहेत. प्रत्येक शाळेच्या आवारात खूप मोठी मोकळी मैदाने आहेत, इतकेच नव्हे तर एक प्रचंड आकाराचे वाहनतळही (पार्किंग लॉट) आहे. या शाळा आणि हमरस्ता यांच्या मधल्या भागात अनेक टुमदार बंगले आहेत. मला असे वाटते की टॉरेन्समधले निम्मे लोक आमच्यासारख्या फ्लॅट्समध्ये आणि निम्मे लोक अशा बंगल्यांमध्ये रहात असावेत. माझ्या वास्तव्यात मला तरी माणसे रहात असलेल्या गगनचुंबी इमारती दिसल्या नाहीत. ज्या काही थोड्या उंच इमारती दिसल्या त्या व्यावसायिक कामाच्या होत्या. इथल्या बंगलेवाल्यांनी तर जास्तच सुंदर बगीचे आपापल्या अंगणांमध्ये फुलवले आहेतच शिवाय निरनिराळे पुतळे उभे करून अधिक शोभा आणली आहे.  शाळांची मैदाने पार केल्यावर त्यांना लागूनच व्हिक्टर पार्क नावाचे पब्लिक पार्क आहे. यात मात्र मुळीसुद्धा बागबगीचा नाही. फक्त एक विशाल लॉन आहे आणि चालत फिरणाऱ्या किंवा धावणाऱ्या लोकांसाठी एक लंबवर्तुळाकार जॉगिंग ट्रॅक बनवून ठेवला आहे. एका कोपऱ्यात लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंड्या, झोपाळे वगैरे आहेत.


मी रोज सकाळी नाश्ता करून घराबाहेर पडत असे आणि  शाळा सुरू व्हायच्या वेळेला धावत पळत किंवा रमतगमत येणाऱ्या चिमुकल्यांना पहात पहात त्यांच्या शाळांना वळसा घालून पुढे जाऊन व्हिक्टर पार्कमध्ये फिरून परत येत असे. संध्याकाळी फिरायला बाहेर पडल्यावर वेगळ्या रस्त्यांनी भटकून येत असे. या रस्त्यांवर हमरस्त्यांइतकी रहदारी नसायचीच, पण फूटपाथवरही कोणी नसायचे. आमच्या घराजवळच्या स्ट्रीटवर दोन्ही बाजूंनी बरीचशी अवाढव्य आकाराची गोडाउन्स होती आणि दुसऱ्या टोकाला दोन्ही बाजूला दोन कंपन्यांच्या मोटारीच मोटारी मांडून ठेवल्या होत्या. त्यामुळे या रस्त्यांवर कोण चालत येणार ?  फक्त काही पोक्त बाया किंवा बाप्ये आपापल्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी आलेले दिसायचे.

. . . . . . . .  (क्रमशः)