Tuesday, October 24, 2017

हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा

आधी हॅप्पी दसरा, मग हॅप्पी बर्थडे, हॅप्पी दिवाळी वगैरे मेसेजेसचा एका पाठोपाठ एक नुसता वर्षाव गेले तीन आठवडे होत होता. त्यात चिंब भिजून गेल्यामुळे मलासुध्दा थोडं हॅपी हॅपी वाटायला लागलेलं असतांना मला एक संस्कृतीसंरक्षक गृहस्थ भेटले.
"कसे आहात?" त्यांनी विचारलं, ती एक औपचारिक चौकशी असेल असं मला वाटलं.
मी अजून हॅपी मूडमध्येच होतो. हंसत हंसत म्हणून गेलो, "मजेत!"
ते एकदम स्तब्ध होऊन माझ्याकडे पहात राहिले. बहुधा त्यांना या उत्तराची अपेक्षा नसावी. हे जग, आपला देश, आपले शहर यात रोज उठून केवढ्या भयानक घटना घडत आहेत, आपला समाज अधःपाताच्या खोल रसातळाच्या दिशेने चालला आहे, आपली कुटुंबसंस्था कोलमडून पडायला लागली आहे, आपली शरीरे व्याधींनी आणि मने चिंतांनी पोखरून निघत आहेत, या माणसाच्या वाट्याला काय कमी पीडा आल्या आहेत? अशाही परिस्थितीत हा माणूस मजेत कसा असू शकतो? आणि तरीही तोंड वर करून तसं सांगायलाही याला काहीच वाटत नाही! असे प्रश्न मला त्यांच्या चेहे-यावर दिसायला लागल्यामुळे मी थोडासा वरमलो आणि चांचरत म्हणालो, "म्हणजे देवाच्या दयेने माझं तसं ठीक चाललं आहे, आला दिवस पुढे ढकलतो आहे."
"मग मघाशी काय म्हणालात?" ते मघाचे उत्तर विसरायला तयार नव्हते. माझ्या हातातला मोबाईल दाखवत मी बोललो, "अहो बघा ना, यात सगळं हॅपी हॅपी भरलंय्, म्हणून .... "
"हे एक खूळ किती बोकाळलंय् बघा! अहो ख्रिश्चन लोक मेरी ख्रिसमस म्हणतात, मुसलमान लोक ईद मुबारक म्हणतात, त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे आणि आपले लोक? ते अजूनही इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर पडलेले नाहीत, हॅप्पी दिवाळी म्हणायला यांना लाजा कशा वाटत नाहीत?" त्यांच्या सात्विक संतापाचा पारा चढायला लागला होता.
"अहो मला हे संदेश पाठवणारे सगळे लोक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेले आहेत. त्यांनी कधीच इंग्रजांची गुलामी पाहिलेलीही नाही."
"बघा तरीसुध्दा ते हॅपी हॅपीची पोपटपंची करताहेत! आता यांना काय म्हणावं?"
"अहो, आपण तिळगुळ घ्या गोड बोला असं संक्रांतीला म्हणतो, सोन्यासारखं रहा असं दस-याला म्हणतो तसंच एकदा मी एकाला सांगितलं, बाबारे, दिवाळी आली, आता दिवे लाव, उजेड पाड, देव तुझं भलं करो. तर तो माझ्यावरच चिडला की हो. मी त्याला मराठीत काय सांगायला पाहिजे होतं?"
"कां, शुभ दीपावली म्हणता नाही येत?"
"दिवाळी तर शुभ असतेच ना? त्यात मी माझं म्हणून काय सांगितलं?"
"मग दिवाळीच्या शुभेच्छा म्हणावं."
"आताशी मी तेच करतोय्. मराठीभाषिकांना शुभेच्छा, हिंदीभाषिकांना शुभकामनाएँ लिहितो, पण त्यात मजा, आनंद वगैरे भावना येत नाहीत. शुभेच्छा हा शब्द कुणी शोधून काढला कोण जाणे, तो कृत्रिम आणि कोरडा वाटतो. मी तामीळतेलुगू आणि मल्याळीबंगाली मित्रांचं काय करू? मला त्यांच्या भाषा येत नाहीत आणि त्यांना माझी. नेहमी आम्ही इंग्रजीमधूनच  एकमेकांशी बोलतो. ती आता आमची संपर्कभाषा आहे. यात कुणाच्या गुलामीचा संबंध कुठे येतो?"
त्यांना लगेच काही उत्तर सुचले नाही, तेवढ्यात मीच त्यांना विचारलं,
"तुम्ही तर सगळी पोथ्यापुराणं वाचली असतील, त्यात शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द कुठे येतात का? म्हणजे रावणाने कुंभकर्णाला किंवा सुभद्रेनं द्रौपदीला कुठल्याशा सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या असले उल्लेख आहेत का?"
"अहो, त्या काळात तशी रीत नव्हती."
"तेंव्हाच कशाला? साठपासष्ट वर्षांपूर्वी माझ्या लहानपणीसुध्दा सणासुदीच्या दिवशी लहान मुलांनी घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडायचं आणि त्यांनी मोठा हो, शहाणा हो असे आशीर्वाद द्यायचे अशी पध्दत होती. मी तरी तेंव्हा शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द ऐकलेसुध्दा नव्हते. ते संस्कृतमधले असल्यासारखे वाटतात, पण प्राचीन काळातल्या मूळच्या संस्कृत भाषेत ते उपयोगात होते का ?"
"मी म्हंटलं ना की ही आपली संस्कृती नाहीच, हे इंग्रजांचं आंधळं अनुकरण आहे."
"कदाचित असेलही, पण त्यात काय वाईट आहे? वैदिक काळातले लोक जसे रहात होते तसे आपण आज राहतो का? इंग्रज लोकसुध्दा रोमन साम्राज्याच्या किंवा आठव्या हेन्रीच्या काळात रहायचे तसे आता रहात नाहीत. काळाबरोबर सगळ्याच लोकांची राहणी, त्यातल्या चालीरीती हळूहळू बदलत असतात. त्यातले जे आपल्याला बरे वाटते ते आपण कळत नकळत उचलतो. त्याचा उगाच अंधानुकरण वगैरे मोठा बाऊ कशाला करायचा?"
"पण हॅप्पी दिवाळी असं म्हणायचं नाही म्हणजे नाही. आपली संस्कृतीच सगळ्या जगात श्रेष्ठ आहे. आपण तीच पाळायची." हरिदासाची कथा मूळपदावर यायला लागली.
"आणि आज थोडी मजा करून घे, आनंदी रहा असं कुणालाही सांगणे ही गोष्ट त्यात बसत नाही. असंच ना?"
हा माणूस वाया गेला आहे, याला काही सांगण्यात अर्थ नाही असा विचार त्यांनी बहुधा केला असावा. मलाही आपला मूड घालवायचा नव्हता. मी मनातल्या मनात त्यांनाही हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पण माझ्या मनातलं चक्र फिरतच राहिलं. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. पूर्वीच्या काळातसुध्दा अनेक उत्सव असायचेच आणि कुठलाही उत्सव कधी एकट्याने साजरा होतच नसतो, त्यात कसलीच मजा नसते. लहानपणी आम्ही शुभेच्छा हा शब्द उच्चारत नसलो तरी गांवातल्या नातेवाइकांना आणि मित्रांना भेटून त्यांच्यासह सणवार साजरे करत होतो. या एकत्र येण्यात, सहवासातच उत्सवाचा खरा आनंद असायचा. पुढे शहरात रहायला लागल्यावर दूर दूर रहात असलेल्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रांना प्रत्यक्ष जाऊन भेटणे शक्य होत नव्हते, पण टेलीफोनचा प्रसार झाल्यावर सणासुदीला त्यांच्याशी टेलीफोनवर बोलून एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे सुरू झाले. मधल्या काळात रंगीबेरंगी आकर्षक अशी ग्रीटिंग कार्डे बाजारात आली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. आपल्या मनातल्या भावना मोजक्या शब्दात व्यक्त करायचे एक आयते आणि सोपे साधन मिळाले. एकमेकांना शुभेच्छा देण्याची प्रथा या काळात प्रचलित होत गेली.

प्रत्यक्ष भेटण्याला आणि टेलीफोनवरल्या संभाषणालाही स्थळकाळाच्या मर्यादा होत्याच. इंटरनेटच्या आगमनानंतर त्या मर्यादा अमर्याद विस्तारल्या गेल्या. ईमेल, फेसबुक, वॉट्सअॅप यासारख्या माध्यमांमुळे शेकडो मित्र आणि आप्त जोडले गेले. त्या सर्वांना शब्द आणि चित्रांमधून एकाच वेळी संदेश पाठवणे शक्य झाले. ही माध्यमे मुख्यतः इंग्रजी भाषेत चालत असल्यामुळे त्या भाषेचा प्रभाव पडणारच आणि या संदेशांमध्ये ती भाषा प्रामुख्याने निदान सध्या तरी दिसणारच. आपण तरी तिला परकी मानून तिचा तिरस्कार का करायचा? त्या संदेशांमधल्या भावना आणि उद्देश समजून घेऊन उत्सव साजरा करावा हे जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते?


Sunday, October 22, 2017

दिवाळी - संस्कृती - संस्कार

माझे एक आदरणीय आप्त श्री. मधुसूदन थत्ते यांनी "जपणे संस्कृती संस्कार" या मथळ्याखाली दिवाळीच्या चार दिवसांसंबंधी चार लेख लिहिले होते. त्यांची अनुमती घेऊन मी ते लेख माझ्या ब्लॉगवर या भागात देत आहे. यातल्या आठवणी श्री.थत्ते यांनी शब्दांकित केल्या असल्या तरी त्यातल्या कांही आठवणी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पद्मजाताई यांच्या आयुष्यातल्या आहेत. मध्यप्रदेशांतल्या एका लहान गावी स्थाइक झालेल्या एका सधन जमीनदार कुटुंबात त्यांचे बालपण गेले असले तरी त्यांच्यावर झालेले संस्कार आणि कोकणातल्या गरीब कुटुंबातल्या श्यामच्या आईने त्याला दिलेले संस्कार यात खूप साम्य आहे. मुंबईसारख्या महानगरात वाढलेल्या आणि बाहेरचे विशाल जग पाहून आलेल्या मधुसूदन यांनी त्यांना मिळालेल्या सुसंस्कारांचे महत्व त्यांच्या अनेक लेखांमधून वेळोवेळी दाखवले आहे. हे पारंपरिक मराठी किंबहुना भारतीय संस्कार त्यांनी या चार लेखांमध्ये नेमकेपणे टिपले आहेत आणि मनोरंजक शैलीमध्ये सादर केले आहेत. मी ते चार लेख जसेच्या तसे खाली दिले आहेत.     
----------------------------------------------------------------

#जपणे_संस्कृती_संस्कार ...१
नर्कचतुर्दशी.
आईची आज्ञा: सूर्योदयाच्या आधी आज सगळ्यांच्या आंघोळी उरकायच्यात बरं...!!!
"कां, आई..?"
आमच्या लहानपणी नाही हो कुणी असे "कां" विचारले...
आईच्या बालपणी घरात दहा वीस माणसे पण सूर्योदयाच्या आधी सगळ्यांच्या आंघोळी उरकायच्या हे तर शास्त्रवचन..!!!
ऋतू आले गेले बरीच दशके मागे गेली..
आज घरात आहेत फक्त वृद्ध आई-बाबा...पण शास्त्रवचन कुठे जाईल..?
आज आईची आज्ञा जरा वेगळी ...
"अहो, सुर्र्कन आंघोळीला शिरू नका...आज तुम्हाला ओवाळायचं
आहे...!!!"
मग रांगोळीचं छोटं स्वस्तिक...त्यावर ईशान्यभिमुख पाट... पाटापुढे तेलाचे चार थेंब...
मग बाबाना हलके अंगाला तेल लावणे..
"किती पातळ झाले हे केस...कसे दाट होते नाही का ?" ह्या गप्पा...
नंतर ओवाळणे...बाबांना नमस्कार...
आणि.......... "तेवढं उटणं लावायचं विसरू नका ...मोती साबण ठेवलाय नवी वडी..."
मित्रांनो ती माई जपत आली हे सारे संस्कार इवलीशी कन्या असतानापासून...
किती वर्षे झाली आज...? पंच्याहत्तर...!!!
मधुसूदन थत्ते
१८-१०-२०१७...
-----------------------------------------------------------------------------

#जपणे_संस्कृती_संस्कार ...२
समृद्ध खेड्यातला प्रशस्त दुमजली जुना वाडा गत-पिढ्यांच्या संस्कार-पुण्याईने अजूनही एक मानाचे स्थान आहे..
छोटी उषा आईला विचारत होती..
आई, आता अंधार पडतोय पण ह्या वर कठड्यावर किती सुरेख पणत्या मांडल्या आहेत..
आई त्या प्रत्येक पणती खाली मघाशी म्हादूला मी शेणाचे लहान गोळे ठेवताना पहिले..का ग ते ठेवलेत..?
"उषा, कठड्यावर पणत्या आहेत..चुकून खाली पडू नये म्हणून आपण तसे ठेवतो...
"आणि आज लक्ष्मीपूजन ना दिवाळीचा दुसरा दिवस...आज लक्ष्मी घरा येणार...तिचे स्वागत नको का करायला..?
म्हणून तर सनई चौघडा वाजतोय..."
पण आई उंबरठ्यापासून थेट देवघरापर्यंत तू ती कुंकवाची सुंदर नाजूक पावले का काढलीस...?
"ती ना...? लक्ष्मीची पावले आहेत...देवी येते..अन त्याच पावलांनी देवघरात जाते...
"बाबांनी घरच्या लक्ष्मीचे प्रतीक असे काही दागिने, सोन्याच्या जुन्या मोहोरा, आणि येणा-या वर्षासाठी जमा-खर्चाची वही असे सारे पुजलेले आहे...
"लक्ष्मी त्यावर नजर देईल...प्रसन्नतेने 'तथास्तु' म्हणेल ..त्या जामदारखान्याची दारे आज सताड उघडी आहेत पाहिलेस का..? लक्ष्मी तिथेही नजर देईल अन आल्या पावली त्या कुंकुम पावलांवरून वाड्याला आशीर्वाद देऊन माघारी जाईल...पण जाताना इकडे पाठ करून जाणार नाही..."
आई...खरं का ग हे सगळं..? मला दिसेल लक्ष्मी...?
कोजागिरीला आली होती की नाही..? पण नुसती "कोण कोण जागे आहे.." असे विचारून गेली..तेव्हा तरी मला दिसली नाही...!!!
आई काय बोलणार...? म्हणाली..."बाळा,, ह्या घराची लक्ष्मी तूच नाही का...?..."
मित्रांनो लक्ष्मी पूजनाचे हे सत्तर वर्षांपूर्वीचे दृश्य उषाने पाहिले...ऊषाच्या मनात ते कायम आहे...
तेव्हा कॉम्पुटर नव्हते ..iCloud नव्हते..साधे आपले आकाश होते.. आकाशाने मात्र पाहिले होते,
आज उषा आईच काय..आजी पण झाली आहे....आणि दर दिवाळीला असेच लक्ष्मी पूजन करत असते...
घरे बदलली...परिसर बदलले...परिवार बदलले...
पण....
आकाश तर तेच आहे..!!!!!!!!!
मधुसूदन थत्ते
१९-१०-२०१७

----------------------------------------------------------------------------------------

#जपणे_संस्कृती_संस्कार ...३
चिमुकल्या उषाला आजी कौतुकाने म्हणाली.."एका मुलीला आज बाबा ओवाळणीत काय बरं देणार..?"
सुंदर रांगोळी काढ, बसायला ईशान्येकडे होईल असा पाट ठेव..आई तुझ्या हाती सज्ज असे ताम्हन देईल अन मग बाबांना ओवाळायचे...!!!
पण आजी मीच का? दादा का नाही ओवाळणार बाबांना आज पाडव्याला...?
"अगं, कन्या हे परक्याचे धन. ओवाळणे म्हणजे दीर्घायुष्य चिंतन... स्त्रीचे रक्षण आधी पिता मग पती करत असतो.. त्यांना दीर्घायुष्य लाभावे हे स्त्रीच्या मनात येणं स्वाभाविक नाही का..?
हो, आजी, तू देव्याकवच रोज म्हणतेस त्यात देवीचं पहिलं रूप कन्येचं म्हटलं आहे.."प्रथमं शैलपुत्री च..." पार्वती हिमालयाची कन्या नाही का...?
उषा दूर कुठेतरी नजर लावून कल्पना करत होती पार्वती हिमालयाला कशी बुवा ओवाळत असावी...!!!
आजी पुढे म्हणाली..
"वर्षभरातले मानाचे साडेतीन मुहूर्त...
"एक वर्षप्रतिपदा, दुसरा अक्षय्य तृतीया, तिसरा दसरा आणि उरलेला अर्धा आज..दिवाळीतला पाडवा...तो अर्धा आणि वर्षाची शुभ सुरुवात वर्षप्रतिपदाने होते म्हणून तो पूर्ण एक मुहूर्त.
"आणि आपले गोधन आजच्या पाडव्याला गोठ्यातून मोकळे करतांना रेवणीत (दिंडी दरवाजा)
गवताची गंजी पेटवायची...त्यावरून गोधन उड्या मारीत जाईल..मग वर्षभर त्यांना त्या अग्निस्पर्शाने कसलाही आजार होणार नाही ही आपली समजूत.
प्रथा...एक एक भावनांच्या रेशमी धाग्यांनी कल्पना करून पडलेल्या प्रथा..
आज इतक्या दशकांनंतर ह्या प्रथा स्वतःच आजी असलेली उषा मुलं-नातवंडांना मोठ्या प्रेमाने सांगत होती..
आजच्या चिमुकल्यांना हे प्रत्यक्ष कसे दिसावे..काळ खूप खूप बदलला आहे..
तरी पण आजच्या चिमुकल्यात एखादी अशी "उषा" असणार आहे जी दूर कुठेतरी नजर लावून कल्पना करेल पार्वती हिमालयाला कशी बुवा ओवाळत असावी...!!!
पाडव्याचे शुभचिंतन मित्रांनो
मधुसूदन थत्ते
पद्मजा थत्ते
२०-१०-२०१७

-------------------------------------------------------------------------------------

#जपणे_संस्कृती_संस्कार ... ४
"१९५० चा सुमार ...कानी गोड स्वर आले...
"जमुनाके तीर..."
आज बाबांनी अब्दुल करीम खानसाहेबांनी भैरवी लावली होती...
छोट्या उषाने आज दादासाठी पाट मांडला, आजीने सुंदर रांगोळी काढली..आज दादाचे अभ्यंग स्नान..मग फराळ..
"आज भांडायचं नाही दादाशी"
आजी आमचं कधी भांडण झालेलं पाहिलं आहेस का..?
"नाही गं बाबी..मी उगीच म्हटले..आज भाऊबीज ना...?
संध्याकाळ कशी पटकन आली...हर्षभरे ओवाळणीचा कार्यक्रम झाला...
इतक्यात दाराशी कोणी डोकावले..आजी पुढे झाली..
"अरे तुम हो निर्मल ..?"
निर्मल कुशवाह हा एका गरीब कातक-याचा एकुलता एक मुलगा...उषाएवढाच... आत्ता कसा काय बरं आला..?
दादीमाँ, उषादीदी मेरी भी आरती उतारेगी आज..?
पोरगं काहीतरी एका फडक्यात बांधलेलं मुठीत लपवत होतं...
"आओ बेटा. जरूर आरती उतारेगी..."
उषाने प्रेमभराने त्याला पाटावर बसवले..औक्षण केले..
मग निर्मलने ताम्हनात ते फडकं मोकळं केलं.. म्हणाला..."ये चियें (चिंचोके) . दीदी को प्यारे लगते है ना..? मैने खुद जमा करके रक्खे थे..!!"
ती भाऊबीज एकदम जणू लखलखली..उषा खूप आनंदली...अन..आजीच्या पापण्या ओलावल्या ..!!!
खूप खूप वर्षे मागे गेली ह्या दिव्य भाऊबीजेच्या प्रसंगानंतर ..
पण बाबांनी त्या सकाळी लावलेली भैरवी आजही सुचवते ...भाऊबीज...दिवाळी सणाची भैरवी ....संपली दिवाळी..
आजची उषा नातीला हे आठवून आठवून सांगत होती...
आजी, निर्मल आज कुठे असेल...? ...बालसुलभ पृच्छा...!!!
आजीच्या मनात हाच प्रश्न डोकावला...नक्की आज तो कुणी मोठा जमीनदार झाला असावा...!!!
आजी तिला लहानपणी आवडणारे गाणे गुगुणत होती...
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती...
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया...!!!
मधुसूदन थत्ते
२१-१०-२०१०
-----------------------------------------------------------------------------------

Friday, October 20, 2017

दिन दिन दिवाळी

मी सुध्दा अगदी लहान असतांना म्हणजे शाळेत जायच्याही आधी एक बडबडगीत ऐकले आणि गुणगुणले होते आणि ते अजून माझ्या लक्षात आहे. यातला कोण लक्षुमन, कसली खोब-याची वाटी आणि कुठल्या वाघाच्या पाठीत कुणी काठी घालायची असले प्रश्न तेंव्हा माझ्या मनात आले नव्हते आणि नंतर मलाही कोणी विचारले नाहीत. दर वर्षी दिवाळीच्या दिवसात या गाण्याची पारायणे होत असत आणि त्या वेळी घरी आलेल्या पाहुण्यांमध्ये जी कोणी लहान मुले असतील त्यांना हे गाणे शिकवून त्यांच्याकडून बोबड्या बोलात हावभावासह म्हणून घेतले जात असे.

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी ।
गाई-म्हशी कुनाच्या, लक्षुमनाच्या ।
लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा ।
दे माय खोबऱ्याची वाटी ।
वाघाच्या पाठीत घालीन काठी ।।

या बडबडगीताला जोडून दिवाळीमधल्या इतर दिवसांचे छान वर्णन करणारे एक गाणे मला या ध्वनिफीतेमध्ये मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=bR3dneyjJ-4
----------------------

माझ्या जन्माच्याही आधी म्हणजे १९४० च्या काळातल्या शेजारी या खूप गाजलेल्या आणि सामाजिक प्रबोधन करणा-या चित्रपटातले अत्यंत जुने पण तरीही आजतागायत ऐकू येणारे असे दीपोत्सवावरचे अजरामर गाणे आहे, लखलख चंदेरी. शेजारी राहणा-या दोन मित्रांमध्ये निर्माण झालेला दुरावा संपून शेवट गोड झाल्यानंतर सगळे गांवकरी एकमुखाने हे गीत गात आणि त्या तालावर नाचत दिवाळीचा आनंदोत्सव कसा साजरा करतात याचे चित्रण या गाण्यात सुरेख केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=qNAdSpieRCg
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया।
झळाळती कोटी ज्योती या, हा, हा।।

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून ।
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण ।
नाचती चंद्र तारे,  वाजती पैंजण ।
छुनछुन झुमझुम, हा, हा ।।

झोत रुपेरी, भूमिवरी गगनात ।
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत ।
कणकण उजळीत, हासत हसवीत ।
करी शिणगार, हा, हा ।।

आनंदून रंगून, विसरून देहभान ।
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया ।
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून ।
एक होऊ या, हा, हा ।।

----------------------------------------

माझ्या लहानपणी १९५५ साली आलेल्या भाऊबीज या सिनेमातले सोनियाच्या ताटी हे गाणे माझ्या एकाद्या बहिणीच्या तोंडी ऐकल्याशिवाय माझी भाऊबीज कधी साजरी होत नव्हती. आशाताईंनी गायिलेले हे गोड गाणेसुध्दा साठ वर्षांनंतर अजून टिकून राहिले आहे.  भावाबहिणीमधल्या नात्याचा सगळा गोडवा या गाण्यात उतरला आहे.
https://www.youtube.com/watch?v=p_C1k78XuBs
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ।
ओवाळिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

माया माहेराची पृथ्वीमोलाची ।
साक्ष याला बाई, चंद्रसूर्याची ।
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला ।
पाठीशी राहु दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

चांदीचे ताट, चंदनाचा पाट ।
सुगंधी गंध दरवळे, रांगोळीचा थाट ।
भात केशराचा, घास अमृताचा ।
जेवू घालिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

नवलाख दिवे हे निळ्या आभाळी ।
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी ।
नक्षत्रांची सर, येई भूमिवर ।
पसरी पदर भेट घ्याया ।
चंद्र वसुधेला, सखा रे भेटला ।
पाठीशी राहु दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

पंचप्राणांच्या वाती, उजळल्या ज्योती
ओवाळिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया

-----------------------------------------
अष्टविनायक या चित्रपटातली सगळीच गाणी तुफान लोकप्रिय झाली आणि लोकांच्या ओठावर बसली. त्यातले एक गाणे खास दिवाळी या सणावर होते. तसे पाहता अमावास्येच्या आगे मागे असलेल्या दिवाळीत कसले मंद आणि धुंद चांदणे आले आहे ? उलट दिव्यांच्या रांगा लावून गडद अंधाराचा नाश करणे हा दीपावलीचा उद्देश असतो. पण ज्यांच्या मनातच प्रेमाचे चांदणे फुलले आहे, नयनांमध्ये दीप उजळले आहेत त्यांना त्याचे काय ? दिवाळीचा परम आनंद आणि उत्साह या गाण्यात छान टिपला आहे.
https://www.youtube.com/watch?v=oPIMAnIdq2s

आली माझ्या घरी ही दिवाळी ।
सप्तरंगात न्हाऊन आली ।।

मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे ।
जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे ।
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे ।
कोर चंद्राची खुलते भाळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।

पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले ।
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले ।
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी ।
सूर उधळीत आली भूपाळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।

नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली ।
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली ।।
संग होता हरी जाहले बावरी ।
मी अभिसारीका ही निराळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।
------------------------------


Tuesday, October 03, 2017

शून्याचा शोध





शून्याचा शोध नक्की कुणी लावला असेल यावर कांही गंभीर चर्चा आणि अनेक विनोदी चुटके, व्यंगचित्रे वगैरे पहाण्यात येतात. शोध लावणे हा मराठी शब्दच मुळी बुचकळ्यात टाकणारा आहे. एकादी गोष्ट आधी हरवली असली तर ती कुणीतरी शोधून काढली किंवा कुणाला तरी ती सापडली असे म्हणण्यात काही अर्थ आहे. हे शून्य अमक्यातमक्याने शोधून काढले असे म्हणायला  ते कधी तरी हरवले होते का ?

श्रेष्ठ भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेला शून्याचा शोध ही जगाला दिलेली एक अद्भुत भेट आहे हे जगातल्या विद्वानांनी मान्य केले आहे. सर्वाधिक लोक त्याचे श्रेय आर्यभट यांना देतात, तर बरेचसे लोक ते ब्रह्मगुप्त यांना देतात. कांही लोकांच्या मते आर्यभटांच्या आधी होऊन गेलेले विद्वान पिंगला यांनी किंवा त्यांच्याही पूर्वी कोणा अज्ञात विद्वानांनी तर काहींच्या मते नंतरच्या काळातल्या भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला. म्हणजे ते पुन्हा पुन्हा हरवत होते की काय ?

आर्यभट, ब्रह्मगुप्त वगैरे शास्त्रज्ञांच्या काळांच्या खूप पूर्वी लिहिल्या गेलेल्या प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये निरनिराळ्या संख्यांचे उल्लेख कसे येतात अशी शंका आपल्या मनात येते. रावणाला दहा तोंडे होती तर कौरवांची संख्या शंभर होती. विष्णुसहस्रनाम प्रसिध्द आहे. कार्तवीर्यार्जुनाला हजार हात होते तर सगराला साठ हजार पुत्र होते. गणेशाचे वर्णन "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ" असे केले आहे आणि श्रीरामाची स्तुति "चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्" अशी करून "सहस्रनामतत्तुल्ल्यम्" अशी रामनामाची महती सांगितली आहे. महाभारत युध्दामध्ये अठरा अक्षौहिणी सैन्याने भाग घेतला होता, त्यातल्या प्रत्येक अक्षौहिणीमध्ये किती हत्ती, घोडे, पायदळ वगैरे होते याचे मोठमोठे आंकडे सांगितले जातात. चार युगांमधल्या वर्षांची संख्या कित्येक लक्षांमध्ये दिली जाते. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे म्हणतात. पौराणिक कथा आणि स्तोत्रे यांमध्ये मोठमोठ्या संख्यांचे उल्लेख असलेली अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांची रचना झाली तेंव्हा अजून शून्याचा शोध लागलेला नसेल ?

शिवाय 'शून्य' या शब्दाचा अर्थ काय? कुठल्याही वस्तूचे नसणे म्हणजे तिची संख्या शून्य इतकी असणे असा अर्थ आपण लावतो. पैशाचे पाकीट रिकामे झाले, धान्याचा डबा रिकामाच असला किंवा झाला तर त्यातली उणीव, पोकळी, रिकामेपणा वगैरे गोष्टी कुणालाही आपोआप जाणवतात. आपण बेअक्कल माणसाला अक्कलशून्य म्हणतो. कुठेच लक्ष नसलेला माणूस शून्यात पहात असतो. नसणे या अर्थाच्या शून्याच्या  या सर्वसामान्य रूपाचा मुद्दाम शोध लावायची काय गरज आहे? ते आपल्याला आपोआप जाणवते. मग प्राचीन भारतीयांनी कुठल्या शून्याचा शोध लावला असे सांगतात?

या शून्याचा संबंध गणिताशी येतो. एक, दोन, दहा, वीस आदि संख्यांचा उगम वस्तू किंवा माणसे, प्राणी वगैरेंची मोजमापे करण्यासाठी झाला. यातले एकापासून दहापर्यंतचे आकडे हातांच्या बोटांवर मोजता येत होते. त्याहून जास्त वस्तू मोजायच्या झाल्यास दहा दहांचे गट करून ते गट मोजायचे आणि उरलेल्या वस्तू वेगळ्या मोजायच्या असे करून ती संख्या काढता येत होती. उदाहरणार्थ तीन वेळा दहा अधिक एक सुटा म्हणजे एकतीस. अशा प्रकारे दहा वेळा दहा म्हणजे शंभर, दहा वेळा शंभर म्हणजे हजार अशा प्रकारे संख्यांची नांवे ठेवली गेली. रोजच्या जीवनात याहून मोठ्या संख्या मोजण्याची गरजच पडत नव्हती. अस्तित्वात नसलेल्या वस्तू कशा मोजणार ? त्यासाठी शून्य नावाच्या संख्येचीही गरज नव्हती. व्यवहारात आवश्यकता नसली तरी विद्वान लोकांनी कल्पनेमधून कोटी, अब्ज, परार्ध यासारख्या अनेक मोठमोठ्या संख्यांची रचना केली होती. पूर्वीच्या काळात या संख्या अक्षरांमधूनच व्यक्त केले जात असाव्यात.

एक, दोन, तीन अशा शब्दांऐवजी १, २, ३ अशी चिन्हे (अंक) लिहिली तर संख्या लिहिणे सोयीचे होईल अशी नामी कल्पना भारतीयांना सुचली तशीच इतर देशांमधल्या लोकांनाही निरनिराळ्या काळांमध्ये सुचली. उदाहरणार्थ रोमन लोकांनी एक, पाच, दहा यांचेसाठी I, V, X अशी अक्षरेच चिन्हांप्रमाणे योजिली आणि त्यांचा उपयोग करून ते संख्या लिहू लागले, जसे आठसाठी VIII, चौदासाठी XIV वगैरे. यात शून्याला स्थान नव्हते. जितकी मोठी संख्या असेल तितकी जास्त चिन्हे वापरायची आणि ती लक्षात ठेवण्याची गरज होती. ती संख्या वाचणे सोपे नव्हते.

भारतीय शास्त्रज्ञांना एक अफलातून कल्पना सुचली. त्यांनी १ हूनही लहान असा शून्य नावाचा कोणतेही मूल्य नसलेला अंक ० या वेगळ्या चिन्हासह तयार केला. १ ते ९ पर्यंत आंकडे (चिन्हे) लिहून झाल्यावर दहाव्या आकड्यासाठी वेगळे चिन्ह न वापरता १ या आकड्याच्या समोर ० मांडून त्यांनी १० हा अंक तयार केला. १० च्या पुढील अंक लिहिण्यासाठी १ च्या पुढे १, २, ३ वगैरे लिहून ११,१२,१३ वगैरे अंक तयार केले. ९१, ९२, ९३ करीत ९९ च्या नंतर १ च्या पुढे दोन शून्ये मांडून १०० (शंभर) हा अंक तयार केला. अशा प्रकारे कितीही मोठी संख्या फक्त दहा चिन्हांमधून लिहिता येणे शक्य झाले. असे अंक लिहिणे सर्वात आधी कुणी सुरू केले याची स्पष्ट नोंद मिळत नाही. प्राचीन काळातली जी कांही भूर्जपत्रे, ताम्रपत्रे, शिलालेख वगैरे आज उपलब्ध आहेत ते सगळे अक्षरांमध्ये लिहिलेले आहेत हे पाहता अंकांबद्दलचे फारसे स्पष्ट पुरावे दिसत नाहीत.

महाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांची एकंदर संख्या "वयम् पंचाधिकम् शतम्" असे युधिष्ठिर सांगतात. यात १,०,० या तीन अंकांना मिळून शतम् हा एक शब्द येतो. आजही १०५ असे लिहिलेले असले तरी आपण ते एकशे पाच असे वाचतो. एक आणि पांच यांचा उच्चार करतो, पण दशमस्थानावरल्या शून्याचा उल्लेख करत नाही. यामुळेच अक्षरांमध्ये लिहिलेल्या किंवा पाठांतरामधून शिकवल्या गेलेल्या साहित्यामधून त्या आंकड्यातल्या शून्याचे अस्तित्व लक्षात येत नाही. संस्कृत भाषेमधले आपल्याला माहीत असलेले सर्व साहित्य श्लोक, ऋचा किंवा मंत्रांच्या स्वरूपात असल्यामुळे ते अक्षरांमध्ये आहे. त्यात संख्यांचे आंकडे किंवा त्यातली शून्ये दिसत नाहीत. कदाचित त्या काळात फक्त आंकडेमोड करण्यासाठी अंकांचा उपयोग करत असतील आणि आलेली उत्तरे किंवा निष्कर्ष अक्षरांमध्ये लिहून ठेवत असतील. ती आपल्याला या विद्वानांच्या ग्रंथांमध्ये मिळतात.

आर्यभटांनी लिहिलेल्या ग्रंथात "स्थानम् स्थानम् दशगुणे स्यात" असे विधान आहे. त्यामध्ये दशमानपध्दतीमधील स्थानमूल्याची (प्लेसव्हॅल्यूची) व्याख्या दिसते. अशा पध्दतीने लिहिलेल्या १०, १००, १००० आदि संख्यांमध्ये शून्याचा उपयोग होणे स्वाभाविक आहे म्हणून शून्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. ब्रम्हगुप्ताने लिहिलेल्या ग्रंथात शून्य या आंकड्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरेंचे नियमच सांगितले आहेत. यामुळे त्यांनाही हे श्रेय दिले जाते.

कुठलीही गोष्ट मोजण्याची सुरुवात एकापासून होते, एक हा त्यातला सर्वात लहान आंकडा असतो, त्याहून लहान फक्त अपूर्णांक असतात. पण शून्य हा अंक निर्माण झाल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यानंतर शून्यापेक्षाही लहान म्हणजे -१, -२ अशा ऋण अंकांची कल्पना मांडली गेली आणि अंकगणिताचा अधिक विकास होत गेला. समीकरणे, सूत्रे वगैरे लिहिणे व सोडवणे सोपे झाले. पुढे यातून बीजगणित आणि कॅल्क्युलस या शाखांचा जन्म झाला. शून्याचा शोध किती महत्वाचा होता याची कल्पना यावरून येईल.

'शून्याचा शोध' लावला याचा अर्थ आंकड्यांच्या जगात शून्याला स्थान दिले गेले. हे अंकगणितामधले शून्य सर्वात आधी भारतीयांनी उपयोगात आणले खरे, पण ते नेमके कुणी आणि कोणत्या कालखंडात सुरू केले हे अद्याप गूढच आहे आणि ते तसेच राहणार आहे. त्याबद्दल भक्कम पुराव्यासह विश्वासार्ह अशी माहिती कदाचित मिळणारही नाही. आर्यभटांच्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा शून्याचे संकेत मिळाले आणि ब्रह्मगुप्तांनी शून्याच्या उपयोगासंबंधीचे नियम सांगितले म्हणून शून्याचा शोध लावण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.