Wednesday, April 20, 2016

ज्ञानी, शहाणे आणि पढतमूर्ख


उपलब्ध असलेल्या अमाप विदांमधून (Dataमधून) आपल्याला हवी ती उपयुक्त किंवा मनोरंजक माहिती (Information) वेचून घेतली जाते, ती समजून घेऊन आत्मसात करण्यामधून त्या बाबतीतले ज्ञान (Knowledge) प्राप्त होते आणि त्या ज्ञानासोबत माणसाचा शहाणपणा (Wisdom) वाढत जातो असे ढोबळपणे सांगितले जाते हे मी मागील लेखामध्ये उदाहरणासह दाखवले होते. तसेच इंस्टिंक्ट (Instinct) किंवा उपजत बुद्धीचा यात किती मोठा वाटा असतो हेसुद्धा दाखवले होते. या लेखात यावर आणखी थोडा विचार करू.

डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पांच ज्ञानेंद्रियांमधून आपल्याला ज्ञान मिळत जाते. पण म्हणजे नेमके काय होते ? बाहेरच्या जगामधून (समोरून) आलेले विविध रंगांचे प्रकाशकिरण डोळ्याच्या भिंगांमधून आत शिरतात आणि मागील बाजूला असलेल्या लहानशा पडद्यावर केंद्रीभूत (Focus)होऊन त्यामधून एक सलग अशी आकृती तयार होते. त्या पडद्याच्या कुठल्या सूक्ष्म बिंदूवर कोणत्या रंगाचे किती तीव्रता असलेले किरण येऊन पोचले यांच्या संवेदना असंख्य अतीसूक्ष्म अशा मज्जातंतूंमधून मेंदूकडे पोचवल्या जात असतात आणि तिथून त्या स्मरणामध्ये साठवून ठेवल्या जात असतात. हे सगळे एक दशांश सेकंदामध्ये घडते. आपला मेंदू कोणत्याही क्षणी मिळालेल्या संवेदना  पूर्वीच्या संवेदनांशी पडताळून पाहतो आणि त्या चित्राचा अर्थ लावतो.  घरातल्या वस्तू असोत, दूरवरची दृष्ये असोत किंवा निरनिराळी माणसे या सगळ्यांना आपण अशा प्रकारे पाहून ओळखतो. यात डोळ्यांपेक्षा मेंदूचा म्हणजे बुद्धी आणि स्मरणशक्ती यांचा जास्त सहभाग असतो. याच प्रमाणे कानावर येऊन आदळलेल्या ध्वनिलहरींमुळे कानातल्या पडद्यावर जी निरनिराळी कंपने उठतात ती मज्जातंतूंमधून मेंदूला पोचवली जातात आणि स्मरणात साठवली जातात. कोणताही नवा आवाज कानावर पडताच पूर्वी ऐकलेल्या ध्वनींच्या आणि ज्ञानाच्या सहाय्याने आपण तो नाद ओळखतो. याच प्रकारे नाकाने गंध आणि जिव्हेने रुची समजते, ती लक्षात राहते आणि तशीच संवेदना पुन्हा मिळाली की आपण तिला ओळखतो. त्वचा ही तर फारच अजब असते. तिला झालेल्या स्पर्शामधून एकादी वस्तू थंड आहे की गरम, मऊ आहे की कठीण, गुळगुळीत आहे की खडबडीत, कोरडी आहे की ओली किंवा तेलकट अशा अनेक प्रकारच्या नाना संवेदनांमधून आपल्याला स्पर्शांची माहिती मिळत असते. या सगळ्या माहितीमधून आपले ज्ञान वाढत असते. जन्माला आलेल्या बाळाच्या आठवणींची पाटी कोरी असते. हळूहळू जसजसे  त्याचे ज्ञान वाढत जाते त्याप्रमाणे ते मूल जवळच्या माणसांचे चेहरे, आवाज आणि स्पर्श ओळखायला लागते. या पंचेंद्रियांना इंग्लिश भाषेत 'सेन्स ऑर्गन्स' (Sense Organs) असे म्हणतात हे मला अधिक समर्पक वाटते. कारण ही इंद्रिये फक्त संवेदना (डेटा किंवा माहिती) मेंदूला पुरवतात, बुद्धीमुळे त्याचे रूपांतर ज्ञानात होत असते.

पंचेंद्रियांमधून मिळणारी माहिती किंवा तिच्यामधून होत असलेले ज्ञान सगळ्याच सजीवांकडे असते. काही पशूंची घ्राणेंद्रिये , कान किंवा दृष्टी माणसापेक्षाही जास्त संवेदनाशील असतात. तरीही सर्व प्राणीमात्रांमध्ये माणूसच जास्त हुशार किंवा शहाणा कां असतो ?   त्याची कुशाग्र बुद्धी हे मुख्य कारण आहेच.  तिचा उपयोग करून त्याने भाषा निर्माण केल्या.   ज्ञानेंद्रियांमधून मिळत असलेली माहिती क्षणिक असते. या क्षणाला जे दृष्य डोळ्यांना दिसले, जे नाद कानाला ऐकू आले त्यांचे संदेश तिथेच संपतात. पुढच्या क्षणाला वेगळे किरण डोळ्यामध्ये शिरतात, वेगळ्या ध्वनिलहरी कानावर पडतात. गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. पण आपल्या आठवणीत साठवले गेले असलेले श्राव्य किंवा दृष्य अनुभव आपण नंतर केंव्हाही  भाषेच्या माध्यमामधून व्यक्त करून दुस-या अनेक व्यक्तीपर्यंत पोचवू शकतो.  याशिवाय  आपले  विचार, भावना, कल्पना, योजना, सिद्धांत वगैरे अनेक अदृष्य अशा गोष्टी आपण शब्दांमधून व्यक्त करून लोकांना सांगू शकतो. या संवादांमधून ज्ञानसंपादनाचे अनेक मार्ग तयार होतात आणि त्याच्या कक्षा विस्तारतात. या भाषा लिपीबद्ध असल्यामुळे आपले ज्ञान, विचार, भावना, कल्पना वगैरे आपल्याला जे पाहिजे ते लिखित स्वरूपात साठवून  इतरांपर्यंत पोचवणे जास्तच सुलभपणे शक्य होते. काळाबरोबर ही क्रिया इतकी जास्त वाढली की पुस्तकी शिक्षणामधून संपादन केलेले तेवढेच 'ज्ञान' असे समजले जायला लागले. पोथ्यांमधून शास्त्रे आणि पुराणे वाचून शास्त्रीपंडित झालेला तेवढा 'ज्ञानी' आणि बाकी सगळे अज्ञानी किंवा अडाणी अशी समजूत होऊन बसली. इंग्रजांच्या राजवटीत सुरू झालेल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर  विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या आणि त्या उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रे दिली जाऊ लागली. यामुळे तर 'पुस्तकी विद्या म्हणजेच ज्ञान' ही समजूत जास्तच दृढ होत गेली.  ज्या व्यक्तीकडे जास्त पदव्या असतील तो जास्त ज्ञानी समजला जाऊ लागला.

शाळाकॉलेजांमधून केलेल्या ज्ञानसंपादनाचे अनेक उपयोग आणि फायदे आहेत यात काही शंकाच नाही, पण केल्याने देशाटन, पंडित मैत्री वगैरे इतर मार्गही आहेत, त्याचप्रमाणे एकलव्याप्रमाणे निव्वळ स्वतःच्या प्रयत्नामधून चिकाटीने शिक्षण मिळवणारेही अनेक लोक आहेत. पण ज्ञानाबरोबर शहाणपणासुद्धा आपोआप येतोच का ? यावर विचार करावा लागेल. आपल्याकडे असलेल्या कुठल्या ज्ञानाचा कोणत्या हेतूने, कशा प्रकारे, किती आणि कसा उपयोग करून घेणे हे ज्याच्या त्याच्या शहाणपणावर अवलंबून असते, तसेच माणसाचा स्वभाव, संस्कार वगैरेंवरही ते ठरते.  एकाद्याकडे जेवढे जास्त आणि सखोल ज्ञान असेल तेवढ्या प्रमाणात  त्याचा उपयोग करण्याची संधी  त्याच्याकडे असते, पण प्रत्यक्षात तसे घडेलच असे सांगता येत नाही. याला अनेक कारणे असतात. पहिले कारण म्हणजे कुणाकडेही सगळ्याच विषयांचे सगळे ज्ञान असत नाही. एकाद्याला सर्वज्ञ असे नुसते म्हणतात, पण तो माणूसही  अनेक बाबतीत अज्ञानी असू शकतो. किंबहुना तो विशिष्ट ज्ञानसंपादनामध्ये इतका गढून गेलेला असतो की त्याचे इतर बाबींकडे पुरेसे लक्ष नसल्यामुळे त्याचे अनुभवविश्व तोकडे पडते. विद्वान प्राध्यापकांचा विसरभोळेपणा हा प्रख्यात गुण आहे. शहाणपणा हा उपजत तर असतोच, शिवाय अनेक प्रकारच्या अनुभवामधून धडे घेण्यातून तो वाढतो, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या माहितीची एकमेकांशी सांगड घालण्यातून तो दिसून येतो. यामुळे ज्ञानी आणि शहाणे असे वेगळे वर्ग झालेले दिसतात. ज्ञानी किंवा विद्वान लोकांचा सर्वांकडून आदर केला जातो, पण शहाणे, हुषार किंवा चतुर लोक अधिक यशस्वी झालेले दिसतात. विद्वानांना सल्लागार म्हणून ठेवले जात असेल पण शहाण्या लोकांकडे योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते.  काही अद्वितीय लोकांकडे दोन्ही गुण असतात. ते शिखरापर्यंत जाऊन पोचतात.

शहाणा, हुषार, चतुर वगैरे शब्द साधारमपणे समानार्थी असले तरी त्याच्या अर्थांच्या किंचित निराळ्या छटा असतात.  पण खूप शिक्षण घेतलेले किंवा ज्ञानी लोक अनेक वेळा व्यवहारचतुर नसतात. ते सहजपणे गंडवले जाऊ शकतात असे दिसते.    ज्ञानी (knowledgeable) आणि शहाणा (wise) या शब्दांमध्ये बरेच वेळा गल्लत केली जाते. यामुळेच  'अती शहाणा त्याचा बैल रिकामा.' अशी म्हण पडली आहे. इथे बहुधा 'अती शहाणा' या शब्दाचा 'अती चिकित्सक' असा अर्थ अभिप्रेत असावा.  समर्थांनी तर पढतमूर्खांची लक्षणेच सांगितली आहेत. जे लोक शिकले सवरेले असल्यामुळे शहाणे झाले असावेत अशी अपेक्षा असते पण तरीसुध्दा मूर्खासारखे वागतात त्यांना रामदासांनी पढतमूर्ख म्हंटले आहे. यातले बहुतेक लोक हट्टीपणा,  अविचार, अदूरदर्शिता, राग, लोभ, मोह, मद, मत्सर अशा कारणांमुळे चुका करत असतात. काही लोकांची दशा "लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण अशी असते." काही लोकांच्या बोलण्यात आणि कृतीत मेळ नसतो.  काही लोक ऐकावे जनांचे हे विसरून जातात आणि फक्त मनाचेच करत राहतात, काही लोक काळाचे भान ठेवत नाहीत. समर्थांनी अशा सगळ्या दुर्गुणांचे नेमके वर्णन सुमारे चाळीस ओव्यांमध्ये केले आहे. त्या वाचून पाहिल्या तर असे वाटते की बहुतेक सगळेच पढत लोक थोड्या प्रमाणात मूर्ख असतात. लोकांनी त्यांची लक्षणे लक्षात ठेऊन ती टाळावीत आणि आपली वागणूक सुधारावी हा या दासबोधामागचा उद्देश आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास ज्ञानोपासना करावी, काही क्षेत्रांमध्ये प्राविण्य संपादन करावे, पण ते करत असतांना आपला तोल सांभाळावा, जगरहाटी शिकून घ्यावी, आपली गणना पढतमूर्खांमध्ये होणार नाही याचीही काळजी घ्यावी.