Friday, October 09, 2015

शस्त्रक्रियेनंतर

या लेखाचे दोन भाग एकत्र केले दि. ०९-०४-२०२१
- - - - - - - - - - -

दि. ३ एप्रिलला गुड फ्रायडेच्या दिवशी झालेल्या एका अपघातात माझ्या दोन्ही हातांची हाडे मोडली होती. दि. ७ एप्रिल रोजी वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेच्या पूर्वतयारीचा सविस्तर वृत्तांत मी या ब्लॉगवर पूर्वीच दोन भागांमध्ये दिला होता. आता पुढील अनुभवांच्या आठवणी या भागात देत आहे.

मी ऑपरेशन थिएटरच्या शेजारच्या दालनात पोचलो असतांनाच मला एक इंजेक्शन दिले गेले आणि एकापासून आकडे मोजायला सांगितले. मला असे वाटते की दहाचा आकडा मोजायच्या आधीच मला गुंगी आली आणि माझी शुद्ध हरपली. पुढील काही तासपर्यंत मी बेशुद्धावस्थेतच होतो. या दरम्यान मला ऑपरेशन टेबलावर ठेवून माझ्या डाव्या हाताचे मनगट आणि उजव्या हाताचा खांदा यांचेवर वीत वीतभर लांब छेद करण्यात आले. आतल्या मोडलेल्या हाडांना एकेका पट्टीच्या आधारे सांधण्यात आले. या हाडांना ड्रिलने भोके पाडली आणि न गंजणा-या विशिष्ट मिश्रधातूच्या या पट्ट्यामधून तशाच धातूचे स्क्रू पिळून त्यांच्या सहाय्याने त्या पट्ट्यांना हाडांशी घट्ट जोडून ठेवले गेले. त्यानंतर कातडीला स्टेपल करून ती जखम बंद केली गेली आणि त्यावर बँडेजेस बांधली गेली. मी पूर्णपणे बेशुद्ध असल्याने मला यातले काहीच समजले नाही. त्यामुळे नंतर कधीही त्यातले काही आठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही माहिती मलाही नंतर समजत गेली.

मी शुद्धीवर येत असतांना माझ्या आजूबाजूला काही माणसे वावरत असल्याची हलकीशी चाहूल मला लागल्याने मी डोळे किलकिले करून पाहिले तर माझ्या डोळ्यांसमोर एक पांढरी शुभ्र भिंत आहे असे त्यावेळी मला वाटले. बहुधा आपल्याला एकाद्या कॉरीडॉरमध्ये आणून ठेवले असावे, पण असे भिंतीकडे तोंड करून का बसवले आहे असा प्रश्नही माझ्या मनाला पडला. त्याआधीच मला एक उलटी झाली होती आणि माझ्या पोटातला थोडा द्रव बाहेर पडून तो माझ्या कपड्यांवर सांडला होता. मी सकाळी प्यालेल्या फ्रूट ज्यूसचा वास त्यांना येत होता. हेही माझ्या लक्षात आले. मला मिळालेल्या चुकीच्या सल्ल्यानुसार मी केलेले फलरसप्राशन मला थोडेसे भोंवले होते.

काही वेळाने माझ्या अगदी जवळ पावलांचा आवाज आला तेंव्हा मी डोळे उघडून पाहिले तर माझे आप्त परितोष माझ्याजवळ आले होते. "काका, कसं वाटतंय् ?" त्यांनी विचारले.  खरे तर अॅनेस्थेशियाचा असर कमी होत असतांना माझ्या सर्वांगाला प्रचंड वेदना होत होत्या, माझे दोन्ही हात खूपच ठणकत होते आणि नॉश्यामुळे पोटातून नुसते ढवळून निघत होते, पण मी मानेनेच मला ठीक वाटत असल्याची खूण केली. "तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय् ना? तुम्हाला मी दिसतोय् ना?"  परितोषने विचारले. "हो, पण तुम्ही असे आडवे कां दिसत आहात?" मी क्षीण आवाजात विचारले. परितोषना काहीच बोध झाला नाही. ते मला टा टा करीत निघून गेले. दोन मिनिटांनी शिल्पा आली. मला तीसुद्धा आडवीच दिसत होती. मी तिलाही तोच प्रश्न विचारला. "काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल." असे आश्वासन देऊन तीही परत गेली. त्या वेळी माझ्या जवळच्या फक्त दोन माणसांना तिथे येऊन फक्त मला पाहून जाण्यापुरती परवानगी मिळाली होती. त्यामुळे इतर कोणीही माझ्या जवळ येऊ शकले नाही.

माझ्या जिवाला मात्र आता एक नवाच घोर लागला होता. माझ्या दोन्ही हातांचे ऑपरेशन झाले होते हे मला ठाऊक होते, पण माझ्या डोळ्यांना हे काय होऊन बसले आहे ते समजत नव्हते. जादूगर जसे त्यांच्या चेल्याला अलगदपणे हवेत उचलल्यासारखे दाखवतात त्याप्रमाणे मला परितोष आणि शिल्पा हे दोघेही अधांतरी आडवे तरंगत असल्याचा भास झाला होता. पण त्यांना तर तसे करणे शक्यच नव्हते एवढे त्या वेळीही माझ्या बुद्धीला कळायला लागले होते. त्यामुळे मला जे काही दिसले तो नक्कीच दृष्टीभ्रम असणार. यापुढे जर मला सगळे जग असे ९० अंशांनी फिरल्यासारखे दिसणार असेल तर त्यात माझे वावरणेच कठीण होणार होते. मला काही सुचेनासे झाले. मी डोळे मिटून मनातल्या मनात गणपतीअथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली.

त्या स्तोत्राची दोन तीन पारायणे झाल्यानंतर मी हलकेच डोळे उघडले. अजूनही मला माझी मान वळवता येत नव्हतीच. बुबुळांच्या हालचाली करून जरा इकडे तिकडे पाहिले. खालच्या बाजूला पहाताच मी झोपून राहिलो असल्याचा मला एक प्रकारचा साक्षात्कार झाला. मला भूल देण्यापूर्वी मी व्हीलचेअरवर बसलो होतो त्या वेळी पाहिलेली दृष्ये माझ्या मनःपटलावरली ताजी दृष्ये होती आणि आता पहात असलेल्या दृष्यांचा त्याच संदर्भात विचार करून माझी बुद्धी तसा अर्थ काढीत होती. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर असलेल्या आडव्या छताला मी उभी भिंत समजत होतो आणि उभी असलेली माणसे मला आडवी दिसत होती. याचा उलगडा झाल्यानंतर मी पुन्हा पुन्हा सर्व बाजूंनी जेवढे दिसत होते तेवढे पहायचा प्रयत्न करत राहिलो. अॅनेस्थेशियाचा अंमल उतरत असल्यामुळे आता माझे डोकेही जरा जास्त काम करायला लागले आणि माझी नजर आपोआप पूर्ववत झाली. मी समाधानाचा एक सुस्कारा टाकला.

...........................

शस्त्रक्रियेनंतर (उत्तरार्ध)

(या लेखाचा पूर्वार्ध लिहून झाल्यानंतर माझ्यापुढे अनेक वैयक्तिक आणि तांत्रिक अडचणी आल्यामुळे उत्तरार्ध लिहायला उसंतच मिळाली नाही. आता आज त्याला मुहूर्त मिळाला. मध्यंतरीच्या काळात बरेचसे विस्मरणही झाले आहे. यामुळे आता ज्या गोष्टी ठळकपणे आठवतात त्या लिहून काढणार आहे.)

त्या पांढ-या शुभ्र आढ्याकडे पहात मी सुन्नपणे पडून राहिलो होतो, त्यामुळे मला वेळेचे भानच राहिलेले नव्हते. अंगातला ठणका वाढत चालला होता. असा बराच वेळ गेल्यानंतर पुन्हा शिल्पा माझ्याजवळ आली. या वेळी तिच्यासोबत आलेली एक नर्स हातात चहाचा कप घेऊन उभी होती.
शिल्पा म्हणाली, "सकाळपासून तुमच्या पोटात काही नाही, कपभर चहा घ्या म्हणजे थोडी तरतरी वाटेल."
खरे तर मला काहीही खाण्यापिण्याची मुळीसुद्धा इच्छा नव्हती. पोटातले वादळ अजून धिंगाणा घालत होतेच. तरीही शिल्पाच्या आग्रहाखातर मी घोटभर चहाचे एक दोन घोट कसेबसे घशाखाली ढकलले. पण आता पोटातल्या वादळाचे रूपांतर सुनामीमध्ये होऊन माझ्या पोटात जे काही असेल नसेल ते सगळे नाकातोंडामधून वेगाने बाहेर फेकले गेले. माझ्या अंगावरचे कपडे आणि चादर वगैरे पुसून आणि झटकून त्या दोघी परत गेल्या.

मी पलंगावर मुकाटपणे पडून राहिलो होतो. माझे दोन्ही हात बँडेजमध्ये करकचून बांधलेले होते. डाव्या हाताच्या मनगटाच्या जवळच ऑपरेशन केलेले असल्यामुळे बोटांची फक्त टोके बाहेर दिसत होती. उजव्या हाताच्या दंडाजवळ हाडाचे ऑपरेशन केले होते आणि कोप-याला आधीच मोठी जखम झालेली होती, तिचे अनेक टाके घातलेले होते. त्या हाताचे मनगट मात्र मोकळे होते. डाव्या हाताला प्लॅस्टरसकट उभे धरून एका दोरीने स्टँडला बांधून ठेवले होते आणि उजवा हात कोप-यामधून मुडपून स्लीव्हमध्ये घालून गळ्यात अडकवून ठेवला होता. यामुळे दोन्ही हात तर जागच्या जागी खिळलेले होतेच, खांद्यापाशी एक लहानसे भोक पाडून तिथे एक मोठे बँडेज बांधल्यासारखे वाटत होते. माझ्या कॉटच्या बाजूला ठेवलेल्या स्टँडला तीन चार प्लॅस्टिकच्या बाटल्या उलट्या टांगल्या होत्या त्यांचेपासून निघालेल्या रबराच्या पारदर्शक नळ्या माझ्या खांद्याला बांधलेल्या बँडेजशी जोडलेल्या होत्या. मला देण्यात येणारी औषधे तसेच जीवनावश्यक द्रव्ये यांचा पुरवठा त्या नळ्यांमधून माझ्या शरीराला मिळत होता. कॅथेटर लावून आणि डायपर बांधून माझ्या उत्सर्जनाची व्यवस्था केलेली होती. माझ्या पायालासुद्धा अपघातात जखमा झालेल्या होत्याच, आता अंगात त्राणही नव्हते. यामुळे मी उठून बसूही शकत नव्हतोच, फक्त पायांचे तळवे आणि बोटे हलवू शकत होतो आणि हाताची बोटे वळवण्याचा प्रयत्न करून शकत होतो. मी एवढ्या हालचाली मात्र सारख्या करत रहाव्यात असे कोणीतरी मला सांगून गेले.

आणखी बराच वेळ गेला तोपर्यंत पोटातले ढवळणे कमी झाले होते. बहुधा त्या नळ्यांमधून माझ्या शरीरात गेलेल्या औषधांचा परिणाम झाला असावा, पण मला अजूनही काही खावे असे वाटतच नव्हते. आता माझ्यासाठी भोजन आणले गेले. ती एक खिरीसारखी सरभरीत अशी पण बेचव खिचडी होती. अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हणत मी ते अतिसात्विक अन्न खाण्याचा बराच प्रयत्न केला, पण बाउलमधले अर्धेसुद्धा खाऊ शकलो नाही. माझ्यासाठी हे जेवण घेऊन आलेली शिकाऊ नर्स मात्र अन्नाच्या नासाडीवर माझी शाळा घेत होती. कोणतेही अन्नपदार्थ तयार करण्यासाठी शेतात राबणा-या शेतक-यांपासून ते भटारखान्यातल्या आचा-यांपर्यंत किती लोकांनी केवढे परिश्रम घेतलेले असतात, त्यात देशाची आणि विश्वाची किती संसाधने खर्च झालेली असतात, आपण हे सगळे वाया घालवणे योग्य आहे का ? वगैरे वगैरे वगैरे. हेच संवाद या पूर्वी मी कित्येक लोकांना ऐकवले असतील, आज ते ऐकण्याची पाळी माझ्यावर आली होती.

हे सगळे चालले असतांना मी फोर्टिस हॉस्पिटलच्या सर्जिकल आय सी यू मध्ये होतो. सगळ्या बाजूंनी बंदिस्त असलेल्या त्या जागेत दिवस किंवा रात्र हेसुद्धा समजत नव्हते. पण बहुधा दुसरा दिवस उजाडून वर आला असावा हे सकाळचा नाश्ता आल्यानंतर कळले. दुपारच्या सुमाराला आमचे सर्जनसाहेब आले. त्यांनी थोडी पाहणी आणि तपासणी केली आणि माझी प्रगति व्यवस्थितपणे चालली असल्याचा अभिप्राय देऊन मला आता वॉर्डमध्ये हलवायला हरकत नसल्याचा निर्णय दिला. त्यानंतर कोणत्या खोलीत एकादी जागा रिकामी आहे याची शोधाशोध केली गेली. ऑपरेशन व्हायच्या आधी मला ज्या कॉटवर अॅडमिट करून ठेवले होते, तिथे आता एक नवा रुग्ण आला होता. दुस-या एका कॉटवरच्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर तिथले बेडशीट्स वगैरे बदलून मला तिथे हलवण्यात आले. ऑपरेशनसाठी जातांना मी व्हीलचेअरवर बसून गेलो होतो, परत येतांना मात्र स्ट्रेचरवरून आणणे आवश्यक होते.

या वेळी मी पूर्णपणे परस्वाधीन झालो होतो. दिवसभर आणि रात्री माझी सर्व प्रकारची सेवा शुश्रुषा करण्यासाठी दोन अटेंडंट्स ठेवलेले होतेच, शिवाय माझी दोन्ही मुले सारखी ये जा करत होती. पण हॉस्पिटलच्या नियमांप्रमाणे पेशंटच्या सोबत एका वेळी फक्त एकाच अटेंडंटने राहण्याची मुभा होती. यासाठी त्यांनी पास देऊन ठेवले होते आणि कडक सिक्यूरिटी व्यवस्था असल्यामुळे पास असल्याशिवाय कोणाला लिफ्टमध्ये पण जाऊ देत नव्हते. पासधारकाने खाली येऊन लॉबीत आलेल्या व्यक्तीला पास दिला तरच तो वर माझ्या खोलीत येऊ शकत होता. यात दहा पंधरा मिनिटांचा तरी वेळ जात होता.  पण माझ्या दिमतीला चोवीस तास कोणी ना कोणी हजर राहणेही आवश्यक होते आणि वेळोवेळी डॉक्टरांना भेटणे किंवा गरजेचे सामान आणून देणे वगैरेसाठी आणखी एकाद्या माणसाला अधून मधून यावे लागत होते. यासाठी माझ्या मुलाने एक सविस्तर पत्र लिहून डॉक्टरांची तात्पुरती परवानगी घेतली. त्यामुळे बरीच सोय झाली. रात्रीच्या वेळी मला पूर्णपणे अनोळखी अटेंडंटवर सोपवणे माझ्या मुलाला फारसे पटत नव्हते. त्याने स्वतःच रात्रपाळीला माझ्यापाशी थांबायचे ठरवले.

माझ्यावर ऑपरेशन्स केलेल्या जागांमधून एक एक नळी बाहेर काढून लहानशा डब्यांना जोडून ठेवली होती. याला ड्रेन म्हणत. या ड्रेन्समधून किती गाळ बाहेर पडत आहे याची रोज पाहणी केली जात होती. एक दोन दिवसातच त्यातली गळती थांबल्यावर त्या डब्या काढून टाकल्या गेल्या. आणखी एक दोन दिवसांनी कॅथेटर काढून टाकण्यात आले आणि पॉटची व्यवस्था केली गेली.  मला नळ्यांमधून देण्यात येणारी औषधे कमी कमी होत गेली. खांद्यावर जोडलेली सेंटरलाईन काढून उजव्या हाताच्या मनगटापाशी आयव्ही लावले गेले. गरज पडेल तेंव्हापुरताच त्याचा उपयोग होऊ लागला. अशा प्रकारे मला कॉटशी बांधून ठेवलेलले बंध सुटत गेले. माझी अवस्था बुटक्या लोकांनी बांधून टेवलेल्या गलिव्हरसारखी झाली होती, त्यातून मोकळे झाल्यावर केवढा तरी आनंद झाला.

मला हातावर जोर देणे शक्यच नव्हते आणि त्याशिवाय उठून बसताही येत नव्हते. हॉस्पिटलमधल्या कॉटचा मागचा भाग शक्य तितका वर करून आणि माझ्या पाठीला आधार देऊन बसवणे सुरू झाले. त्यानंतर खांद्याच्या खाली धरून उभे करता येऊ लागले.  मुख्य म्हणजे मी आता अटेंडंटच्या आधारे टॉयलेटला जाऊ शकत होतो. रूममध्ये येऊन दोन तीन दिवस झाल्यानंतर रोज एक फिजिओथेरॅपिस्ट येऊन भेटून जायची. आधी तिने एक लहानसे खेळणे हातात दिले आणि त्यातले गोळे फुंकर मारून उडवायची प्रॅक्टिस करवून घेतली. माझा श्वास पुरेसा नीट चालत आहे याची खात्री झाल्यानंतर पुढचे व्यायाम करायचे होते. उभा राहिल्यानंतर हाताला धरून मला माझ्या खोलीच्या खिडकीपाशी नेऊन बाहेरचे जग दाखवले. त्यानंतर कॉरीडॉरमध्ये दोन मिनिटे, पाच मिनिटे, दहा मिनिटे असे चालवत धीम्या गतीने पंधरा मिनिटांपर्यंत मजल नेली. त्यानंतर तेवढ्याच वेळात पण गती वाढवत नेऊन जास्त अंतर चालवून आणले. अशा प्रकारे हळूहळू माझ्या अंगातले त्राण वाढत गेले तसा माझा आत्मविश्वास वाढत गेला.

आमचे सर्जन डॉ.यादव दररोज एक फेरी मारून त्रोटक विचारपूस करतच होते. त्यांचा सहाय्यक जरा अधिक तपासणी करून जात असे. हॉस्पिटलचा मेडिकल विभाग इतर अनेक प्रकारच्या तपासण्या करत होता. दररोज दिवसातून ती चार वेळा ब्लड प्रेशर मोजणे ही एक कसरत असायची. दोन्ही हात बँडेजमध्ये असल्याने आणि एका पायाला जखम झाली असल्यामुळे उरलेल्या जागेत कसेबसे ते उपकरण लावून त्यातला आकडा पाहणे सगळ्या नर्सेसना जमत नसे. त्या अंदाजाने काही तरी लिहून ठेवायच्या. मग डॉक्टरांना शंका आली की पुन्हा ते तपासले जायचे हे रोजचेच होते. माझ्या आठवणीप्रमाणे मला थरमॉमीटर लावण्याची वेळ आलीच नाही, पण तपमानाची नोंद मात्र होत असावी.

प्रत्येक आहारापूर्वी रक्तातल्या शर्करेची तपासणी होत असे, पण एवढ्या मोठ्या नामवंत हॉस्पिटलमधले आमच्या वॉर्डमधले त्याचे उपकरण मात्र कधी कधी बेभरवशाचे निघत असे. माझ्या बोटाला सुई टोचून रक्ताचा थेंब बाहेर निघाल्यानंतर ते उपकरण चालत नसल्याचे सिस्टरच्या लक्षात येत असे. मग दुस-या वॉर्डमधून वेगळे ग्लुकोमीटर आणून टेस्ट करून त्यानुसार इन्सुलिनचे प्रमाण ठरवले जात असे. हे सगळे होईपर्यंत आणलेले खाद्यपदार्थ थंडगार होत असत. याबद्दल एक दोनदा  तक्रार करून झाल्यानंतर मी  त्यांना न जुमानता खाणे सुरू केले.  

दररोज अगदी नियमितपणे एक डायटीशियन येऊन मला भेटून जात असे. पण माझ्या फाइलींमध्ये डॉक्टर लोकांनी काय काय लिहून ठेवले होते कोण जाणे. तिच्याकडे माझ्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्ध असायचे. कसल्याशा प्रकारचा खिचडा हे माझे मुख्य अन्न असायचे. यापूर्वी मला फक्त तांदूळ व मुगाच्या डाळीची खिचडी आणि उपासाची साबूदाण्याची खिचडी एवढेच प्रकार ठाऊक होते. इथे रोज निरनिराळी तृणधान्ये आणि कडधान्ये यांच्या कण्यांच्या मिश्रणांना शिजवून बाउलमध्ये भरून आणले जात असे. आज त्यात ज्वारी आहे की ओट्स की नागली आणि मुगाची डाळ आहे की मसूरीची की उडिदाची याचा सस्पेन्स थोडा चेंज म्हणून बरा वाटायचा. मात्र जेवणाशिवाय इतर वेळी मिळत असलेले निरनिराळ्या फळांचे काप आणि सूप्स मनापासून आवडत. सकाळी नाश्त्यामध्ये आधी नुसतेच ओट्स असत, दोन तीन दिवसांनंतर कधी बिनतेलाचा उत्तप्पा किंवा घावन मिळायला लागला. ब्रेड बटर सँडविच असे काही मिळू शकेल का असे विचारल्यावर त्या विदुषीने सांगितले की व्हीट ब्रेड मिळेल पण त्याला बटर किंवा जॅम लावता येणार नाही आणि सँडविचमध्ये टोमॅटो घालता येणार नाही की बरोबर खायला ऑमलेटही मिळणार नाही. यामुळे मी माझ्या या सगळ्या इच्छा पुढे घरी गेल्यानंतर पूर्ण करण्यासाठी राखून ठेवल्या.  चार पाच दिवस दोन्ही वेळच्या भोजनामध्ये फक्त खिचडा खाऊन झाल्यानंतर माझ्या ताटात एक चपाती अवतरली, त्यानंतर दुसरी, तिसरी यायला लागली. उकडलेल्या भाजीपाल्यांमध्ये थोडे तिखटमीठ पडायला लागले. चांगले रुचकर असे जेवण मिळायला लागेपर्यंत माझी घरी परतण्याची वेळ झाली होती. हॉस्पिटलच्या किचनमधल्या आचा-यांच्या हातालासुद्धा चंव असू शकते एवढे मात्र त्यातून समजले.

माझी पुरेशी प्रगती झाल्यानंतर इंजेक्शन्सची गरज संपून औषधाच्या फक्त गोळ्या आणि सायरप घ्यायचे राहिले, वेळोवेळी बीपी, शुगर वगैरे पहायची आणि रोजच्या रोज डॉक्टरने तपासण्याची गरज राहिली नाही, तेंव्हा मला डिस्चार्ज देण्यात आला. आता मी माझ्या कुटुंबासमवेत राहणार होतो, माझ्यासाठी माझ्या कुटुंबियांना करावी लागणारी दगदग वाचणार होती आणि हॉस्पिटलची बिले भरावी लाणार नव्हती. अजूनही माझे दोन्ही हात बांधलेले असल्यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा दोन तीन आठवडे तरी मी पूर्णपणे परस्वाधीनच राहिलो होतो. यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा दिवसा व रात्रीसाठी सेवकांची सोय करावी लागलीच.  त्यानंतर हळूहळू सुधारणा होत मी हाताच्या हालचाली करायला लागलो, आधी घरातल्या घरात आणि नंतर बिल्डिंगच्या सभोवती फे-या मारायला लागलो. मला साधारणपणे हिंडण्याफिरण्यायोग्य व्हायला आणखी तीन महिने लागले. तरीही दोन्ही हात पूर्णपणे पूर्ववत झाले नाहीतच. होण्यासारखी सुधारणा आता झाली आहे, उरलेली कदाचित हळूहळू होईल असे डॉक्टरांनी सांगितले आणि हे काम पूर्ण झाले असल्याचे जाहीर केले.