Thursday, March 20, 2014

माझे शत्रू - पसारा शब्दाचा जनक (भाग २)

जरा निसर्गाकडे पहा. निसर्गातले डोंगर हे एकादा पिरॅमिड, देवळाचा घुमट किंवा भाताची मूद यासारखे कधी तरी सिमेट्रिकल असतात का? निरनिराळ्या नद्या कधी सरळ रेषेत आणि एकमेकींना समांतर किंवा काटकोन करून वाहतात का? आभाळातले ढग कधी वर्तुळाकार, त्रिकोणी, चौकोनी किंवा पंचकोनी असतात का? रानात उगवलेली झाडे कवायत करत असलेल्या सैनिकांसारखी एकेका रांगेत ठराविक अंतर सोडून उभी असतात का? जमीनीवर पडलेली त्यांची पाने सत्यनारायणाच्या पूजेसाठी मांडतात तशी एकाच बाजूला देठ करून उताणी ठेवलेली असतात का? पाने, फुले, गवत, दगड, गोटे वगैरेंचे त्यांच्या आकारानुसार किंवा रंगांप्रमाणे वेगवेगळे ढीग असतात का? निसर्गामध्ये तसले काही नसते. तिथे सगळे काही अव्यवस्थितपणे मिसळलेले असते. याचाच अर्थ पसारा असणे हा निसर्गाचा नियम आहे आणि तो करणे हा प्राणीमात्रांचा नैसर्गिक गुण आहे, अर्थातच मनुष्यप्राण्याचासुद्धा, हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.

मी कॉलेजशिक्षणासाठी हॉस्टेलवर रहायला गेलो तिथे एकेका खोलीत तीन तीन मुलांची सोय केलेली होती. प्रत्येकासाठी एक लहानशी कॉट आणि टेबलखुर्ची दाटीवाटी करून ठेवली होती, कपाट मात्र नव्हते. सगळ्या मुलांनी पलंगाखाली आपापल्या ट्रंका आणि बॅगा ठेवून त्यात आपापले सामान ठेवायला सुरुवात केली. पण तिथे रोख पैसे सोडल्यास आणखी काही सहसा चोरीला जात नाही हे लवकरच सर्वांच्या लक्षात आले. रोज चार पाच तास लेक्चर्स ऐकण्यात आणि तीनचार तास प्रॅक्टिकल्स करण्यातच दिवसातला सगळा वेळ आणि शक्ती खर्ची पडत होती. नवीन ओळखी करून घेणे, नवे मित्र जोडणे, नवे वातावरण समजून घेऊन त्याच्याशी जमवून घेणे वगैरेंमध्ये उरलेल्या वेळात प्रयत्न करत होतो. सकाळी उठल्यानंतर समायिक स्वच्छतागृहांमध्ये नंबर लावून सकाळची कामे उरकून घेऊन आणि मेसमध्ये जाऊन पोटभर नाश्ता करून वेळेवर कॉलेजला पोचण्यात रोज खूप धावपळ करावी लागत होती. यामुळे त्यानंतर सगळ्या मुलांमधले नैसर्गिक गुण बाहेर आले. मग अंगावरून काढलेले कपडे कॉटवर टाकले जायचे, लॅबकोट किंवा बॉयलरसूट असे काही चढवलेले असले तर ते कॉलेजमधून परत आल्यानंतर आधी काढून तिथेच भिरकावले जायचे, रात्री झोपायच्या आधी कपडे बदलले तर काढलेले कपडे त्यावरच पडायचे. वह्यापुस्तकेसुध्दा काही टेबलावर तर काही पलंगावर मस्तपैकी पसरलेली असायची. ही अवस्था सगळ्याच खोल्यांची होती. एकादा मुलगा कुठून तरी एकादे पिवळे पुस्तक घेऊन आला तर ते मात्र गादीखाली, उशीच्या अभ्र्यात वगैरे लपवून ठेवले जायचे आणि त्याची कुणकुण इतर कोणाला लागताच ते तिथून अदृष्य व्हायचे. 

एका अतीश्रीमंत मुलाचे त्या काळातले फॉरेनरिटर्न्ड आईवडील त्याला भेटण्यासाठी दर रविवारी मुंबईहून मोटारगाडीने येत असत. त्यांनी त्या मुलाच्या खोलीतल्या एका कोप-यात कॅनव्हासचा भला मोठा झोळा अडकवून ठेवला होता. अंगावरून काढलेला कोणताही कपडा, तसेच वापरलेला टॉवेल, नॅपकिन, रुमाल वगैरे सगळे तो लगेच त्या झोळ्यात टाकायचा. आईवडिलांनी त्यांच्याबरोबर आणलेला नोकर त्या मुलाच्या पलंगावरच्या चादरी, पलंगपोस, टेबलक्लॉथ आणि त्या झोळ्यात जमा झालेले सगळे कपडे काढून त्याचा गठ्ठा बांधून बाजूला ठेवायचा. व्यवस्थित धुवून इस्त्री केलेल्या कपड्यांचा त्याने सोबत आणलेला नवा गठ्ठा उघडून त्यातली चादर गादीवर व्यवस्थितपणे अंथरायचा, उशांचे अभ्रे बदलायचा, टेबलक्लॉथ बदलून त्यावरची सगळी वह्यापुस्तके लगोरीसारखी म्हणजे सर्वात मोठे पुस्तक तळाशी, त्याहून किंचित लहान आकाराचे त्यावर अशा रीतीने नीट मांडून ठेवायचा, रुमाल, टॉवेल्स, घरातले कपडे, बाहेर जातांना घालायचे कपडे, पांघरायच्या चादरी वगैरे सगळ्यांचा भरपूर नवा स्टॉक त्या मित्राच्या खोलीतल्या ट्रंकेत व्यवस्थित ठेवायचा आणि बांधून ठेवलेला गठ्ठा घेऊन जायचा. पसारा आणि नीटनेटकेपणा या विषयांवरील व्याख्यान ऐकायची इच्छा नसल्यामुळे त्या मुलाचे रूममेट दर रविवारी सकाळी उठून आपापल्या वस्तू जमतील तेवढ्या आवरून ठेवू लागले. पहिल्या एक दोन आठवड्यानंतर त्या मुलाचे वडील त्याला भेटायला हॉस्टेलवर क्वचितच आले असतील, त्याच्या आईचे येणेही हळूहळू कमी होत गेले, पण नोकर किंवा ड्रायव्हर मात्र न चुकता दर रविवारी येत राहिला आणि त्याचे कर्तव्य बजावत राहिला. पुढे त्याच्या वडिलांची दिल्लीला बदली झाली तेंव्हा त्याचे चाळीस पन्नास किंवा जितके काही कपड्यांचे सेट होते ते एका मोठ्या ट्रंकेत घालून हॉस्टेलवर येऊन पडले. ते धुवून घेण्यासाठी त्याने स्थानिक व्यवस्था केली, पण लवकरच तो आणि त्याचे रूममेट माणसांत आले.  .

काही मुलांची घरे हॉस्टेलपासून दीडदोन तासांच्या अंतरावर होती किंवा पुण्यातच त्यांची एकादी ताई माई रहात असे. यामुळे घरातले कोणीतरी कधीही अवचितपणे त्यांच्या खोलीवर येण्याची दाट शक्यता असायची. ती मुलेसुद्धा रविवारची सगळी सकाळ आपापली खोली आवरण्यात घालवायची. एकदोन मुलांना बहुधा आवरोमॅनिया झाला होता. आपली प्रत्येक वस्तू कुठल्याही क्षणी विशिष्ट जागी, विशिष्ट अवस्थेतच असणे हेच सर्वात जास्त महत्वाचे असते असे ते समजत असत. एकाद्या पुस्तकातली माहिती पहायची असली तर ते लोक आधी त्या पुस्तकाच्या वर असलेली सगळी पुस्तके एक एक करून व्यवस्थितपणे बाजूला काढून ठेवत, हवे असलेले पुस्तक बाजूला ठेऊन इतर सगळी पुस्तके पुन्हा व्यवस्थितपणे रचून ठेवत आणि नंतर ते बाजूला ठेवलेले पुस्तक उघडून पहात. त्यातली माहिती वाचून किंवा पाहून झाली की पुन्हा ते पुस्तक त्याच्या ठरलेल्या जागेवर व्यवस्थितपणे ठेवत. अर्थातच इतर सगळ्या पुस्तकांना दोन वेळा व्यवस्थितपणे हाताळणे त्यात आलेच. हॉस्टेलमधल्या दुस-या एकाद्या मुलाने त्या शिस्तप्रिय मुलाच्या टेबलावरच्या पुस्तकांच्या चंवडीमधले एकादे तळातले पुस्तक पाहण्यासाठी खस्सकन ओढून काढले किंवा ते पाहून झाल्यानंतर टेबलावरच कुठेसे ठेवले तर तो त्याचा अक्षम्य अपराध असायचा. सगळ्यात वर दिसत असलेले पुस्तकसुद्धा पाहून झाल्यानंतर त्याच्या मूळ जागेवर ठेवतांना ते उलटे ठेवले गेले, म्हणजे त्याचे मुखपृष्ठ खालच्या बाजूला किंवा शिवण डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला झाली तर त्या मुलांना ती गोष्ट अस्वस्थ करत असे. त्यांच्या अशा वृत्तीमुळे कोणीही त्यांच्या कुठल्याच वस्तूला हात लावत नसत आणि त्यांचा सगळा वेळ आवरासावरीतच जात असल्यामुळे इतर कुणाशी मैत्री करणे, त्या मित्रांबरोबर गप्पा मारणे, खेळणे, भटकणे वगैरे काही आपल्या जीवनात असते हे त्यांच्या गावी नसायचे.

असे काही अपवाद सोडले तर इतर सगळी मुले मात्र रविवारी सकाळी उन्हे चांगली अंगावर येईपर्यंत आपल्या पलंगावरच्या पसा-यात आरामात लोळत पडायची. मनसोक्त लोळून झाल्यानंतर मग आठवडाभरात साठलेली किरकोळ कामे हातात घ्यायची, एकादा मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा खेळाची मॅच पहायला जायची, उगाचच बाजारात फिरून विंडोशॉपिंग करायची आणि या सगळ्यामधून फालतू वेळ मिळाला तर खोलीची थोडी आवराआवर करायची असा त्या काळातल्या सुटीच्या दिवसाचा दिनक्रम असायचा. त्या काळात पसारा हा शब्द फारसा कानावर पडायचा नाही आणि पडला तरी त्याची मजा वाटायची. त्यामुळे या शब्दाच्या निर्मात्याबद्दल मनात बसलेली आढी तेंव्हा त्रासदायक वाटत नव्हती. किंबहुना मी त्याला विसरून गेलो होतो. बालपणाचा काळ सुखाचा असे म्हणायची पद्धत असली तरी मला मात्र हॉस्टेलमधला काळ सुखाचा असेच तेंव्हा वाटत असे आणि ते फारसे चूक नव्हते.

.  . . . .  . . . . . . . .. .  . . (क्रमशः)

No comments: