Wednesday, December 30, 2015

मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स (उत्तरार्ध)

पूर्वीच्या काळात  काही लोक पेन फ्रेन्ड्शिप किंवा पत्रमैत्री करायचे. ते लोक आपल्या मनातले विचार, सुखदुःखे, कल्पना, आपली तत्वे, आपले बरे वाईट अनुभव वगैरे नाजुक गोष्टी स्वतःच्या जवळच्या लोकांशी बोलून व्यक्त करण्याऐवजी किंवा त्याशिवाय सवडीने कागदावर लिहून काढत आणि दूर देशी असणा-या मित्रांना किंवा मैत्रिणींना पत्राद्वारे पाठवून देत असत. तिकडूनसुद्धा त्या पत्राला असाच उत्साही प्रतिसाद मिळाला तर मग ती मैत्री दृढ होऊन वाढत जात असे. कधी कधी हे पत्रमित्र प्रत्यक्षात भेटलेलेही नसत किंबहुना ते त्यांना शक्यही होत नसावे, पण त्यांच्या संदेशांची देवाणघेवाण मात्र पत्रांद्वारे दीर्घकाळ चालत असे. अशा प्रकारच्या मैत्रीविषयी मी फक्त पुस्तकांमध्येच वाचलेले आहे, मला कधीच त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही किंवा इतर कोणाचा पहायलादेखील मिळाला नाही.

माझे वडील रिटायर व्हायच्या पंधरा वीस वर्षांपूर्वी कधी तरी एका बदलीच्या गावी गेलेले असतांना त्या खेड्यात रहात असलेल्या एका गृहस्थांच्या संपर्कात आले होते असे मी ऐकले होते. माझ्या आठवणीत तरी त्या दोघांची कधीच गांठभेट झाली नव्हती, मी त्या गृहस्थांना कधीच पाहिलेले नाही किंवा ते खेडेही पाहिले नाही. पण माझे वडील रिटायर होऊन गेल्यानंतरसुद्धा काही वर्षे या जुन्या स्नेह्याची पत्रे नियमितपणे येत असत. त्यांचेकडून आलेली पत्रे माझ्या वडिलांना वाचून दाखवायचे काम मात्र माझ्याकडे यायचे. त्यांच्या पोस्टकार्डामध्ये फक्त तिकडची खुषाली कळवलेली असायची आणि इकडची चौकशी केलेली असायची. त्या पत्रलेखनाला फारसे वाङ्मयीन किंवा साहित्यिक मूल्य नसेलही, पण त्यामधून व्यक्त होत असलेली त्या दोघांमधली खूप जवळीक मात्र मलासुद्धा चांगली जाणवत असे. या मित्राबद्दलचे माझे कुतूहल वाढतच गेले आणि अखेरपर्यंत ते एक गूढ राहिले.

माझ्याकडे घरी असलेल्या पत्याच्या वहीतले बहुतेक सगळे पत्ते आमच्या नातेवाईकांचेच असायचे. टेलिफोन नसतांनाच्या काळात त्यांच्याशी पत्रव्यवहार होत असे. त्या वहीतली फारच कमी नांवे माझ्या मित्रांची असायची. तीसुद्धा जर मला कधी काळी त्यांच्या गावी किंवा घरी जायचे असले तर तेंव्हा उपयोगी पडावी म्हणून लिहून ठेवलेली होती. त्यातल्या कुणालाही मी पत्रे लिहून पोस्टाने पाठवली नाहीतच, त्यांच्याकडूनही कधी आली नाहीत. एकंदरीतच मी टपालखात्याला फारसे कष्ट दिले नाहीत.

अलीकडच्या काळात इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर मात्र हे चित्र पार पालटले. माझ्या ईमेल्सवरील काँटॅक्ट्सची संख्या वाढतच गेली आणि त्यात मात्र काही नातेवाईकही असले तरी त्यातली बहुतांश नावे मात्र माझ्या मित्रांचीच असायची. मी काही याहू किंवा गुगल ग्रुप जॉइन केल्यावर तर मला एकदम अनेक मित्र मिळाले. मनोगत, मिसळपाव, उपक्रम, ऐसी अक्षरे यासारख्या संकेतस्थळांवर माझे नाव नोंदवले होते. तिथे काही लिहिल्यास त्यावर लगेच अनेक शेरे किंवा प्रतिक्रिया येत, मी ब्लॉग लिहायला सुरू केल्यावर त्यावरही अनेक प्रतिसाद यायला लागले. या सर्वांमधून मला काही नवे मित्र मिळाले.  फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅप ही तर खास सोशल नेटवर्कची साईट्स आहेत. माझे आधीपासून असलेले बरेचसे मित्र यात येत गेलेच, शिवाय कित्येक अनोळखी मित्रांची अनाहूत आमंत्रणे या नेटवर्क साईट्समधून येत असतात. मीच संपूर्ण खात्री पटल्याखेरीज कोणाला मित्र करून घेत नाही. तरी सुद्धा माझ्या या जालमित्रांची संख्या आता काही शेकड्यांमध्ये गेली आहे. तीन चार दशकांपूर्वी दूरावलेले, म्हणजे अक्षरशः हजारो किलोमीटर दूर अंतरावर गेलेले माझे काही जुने मित्र मला पुन्हा कधी भेटतील अशी मला आशाच वाटत नव्हती, पण या नव्या माध्यमांमधून मला ते पुन्हा एकदा सापडले आणि माझ्या संपर्कात आले, तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

मी प्रत्यक्षात कोणाच मित्राला हाताने पत्र लिहून पाठवले नसले तरी या आभासी जगातल्या मित्रांमध्ये मात्र रोजच भरपूर पत्रव्यवहार होत असतात. एकाच वेळी एका क्लिकमधून एकच संदेश अनेकांना पाठवता येतो, त्याला अवांतर मजकूर, चित्रे किंवा ध्वनि सहजपणे जोडता येतात आणि ते सगळे क्षणार्धात अनेक ठिकाणी जाऊन पोचतात, लगेच त्याची उत्तरे येऊ शकतात आणि आपण ते आणखी कोणाला पाठवू शकतो वगैरे त्याचे अचाट फायदे आहेत. आता तर हे सगळे हाताच्या मुठीत धरता येईल इतक्या लहानशा यंत्रामधून आणि आपण जिथे असू तिथूनच करता येणे शक्य झाले आहे. आपल्या आयुष्यात असे काही आपल्याला अनुभवायला मिळेल अशी मी कल्पनासुद्धा केली नव्हती. अर्थातच यामुळे मित्र या शब्दालाच नवा अर्थ, नवे परिमाण लाभले आहे.

या आभासी जगातल्या मित्रांमध्येसुद्धा विविध प्रकार असतात. त्यातले बरेचजण आधीपासूनच आपले खरे खुरे मित्र असतात पण दूर रहात असतात. त्यांच्याशी केंव्हाही लगेच संपर्क साधणे  आता नव्या माध्यमांमधून सहज शक्य झाले आहे. आपल्याला गरज पडली की ते लगेच धावून येऊ शकतात, तसेच आपणही वेळेवर त्यांच्या मदतीसाठी काही करू शकतो. याविरुद्ध काही जालमित्र  आपल्याला फक्त इंटरनेटवरच भेटतात. त्या वेळी ते लोक खूप जवळिकेने आपले मनोगत व्यक्त करतात, सल्ले देतात, विचार मांडतात, चर्चा करतात, वादही घालतात. दूर राहूनच त्यांच्याशी केलेल्या या संवादामधून आपल्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, आपल्याला उपयुक्त माहिती मिळतेच, वैचारिक समाधान मिळते, आपली बौद्धिक भूक प्रज्ज्वलित होते किंवा भागते, भावनात्मक आनंद मिळतो. विशेषतः निवृत्त आयुष्यात उपलब्ध झालेला माझा बराचसा रिकामा वेळ या मित्रांशी संवाद साधण्यात चांगला जातो किंवा सत्कारणी लागतो.

ब्लॉग्ज किंवा संकेतस्थळांवर भेटणारे काही मित्र तर या आभासी जगतात टोपणनावाने वावरत असतात. त्यांनी पांघरलेल्या बुरख्यामागील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, ती तरुण आहे की वृद्ध, ती कोणत्या सामाजिक किंवा शैक्षणिक स्तरातली आहे यातले काहीच आधी कळत नाही, पण तरीही त्यांच्या लेखनामधून ते मित्रत्वाने वागत असतात. अशा लोकांशी तात्विक चर्चा करणे किंवा वितंडवाद घालणे सोपे असते आणि त्यात मजाही येते, कारण तो अनामिक मित्र दुखावला जाण्याची काळजी करायची गरज नसते.  त्यांचा समावेश मित्रांमध्ये करता येईलच का नाही अशी शंका येते, पण या लोकांचीही संमेलने भरतात, त्याला हजेरी लावली की आपल्याला बुरख्यामागले चेहेरे पहायला मिळतात.  त्यातून काही लोकांशी खरी मैत्री जमते.

मैत्री, दोस्ती, यारी, फ्रेन्ड्शिप यांच्या असंख्य छटा असतात, त्यातल्या काही दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न या भागात केला आहे.  

No comments: