Friday, May 08, 2015

देव तारी ....... मला

भाविक लोक मोठ्या श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत असतात. नास्तिक वाटणारे लोकसुद्धा "अरे देवा (ओ माय गॉड)",  "देव जाणे (गॉड नोज)" असे उद्गार काढत असतात तेंव्हा देवाचे नावच घेत असतात. अचानक एकादे मोठे संकट कोसळते तेंव्हा तर बहुतेक सर्वांनाच 'देव आठवतो' असा वाक्प्रचार आहे. ज्या वेळी साक्षात काळ समोर उभा राहिलेला दिसतो आणि त्यामुळे बोबडी वळलेली असते अशा वेळी तर कोणीही दुसरे काही करूच शकत नाही. पण कदाचित अवेळी आलेला काळ कधी कधी मागच्या मागे अदृष्य होतो आणि तो माणूस भानावर येऊन सुखरूपपणे आपले पुढले आयुष्य घालवू लागतो. असे प्रसंग बहुतेक सर्वांच्या आयुष्यात येऊन जातात आणि केवळ देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे तो सांगतो. त्याला तसे मनापासून वाटते सुद्धा. माझ्या आयुष्यात नुकताच असा एक प्रसंग येऊन गेला.

माझी आई सांगत असे की मी लहान म्हणजे दोन तीन वर्षांचा असतांना एकाएकी माझ्या हातापायांमधली शक्ती क्षीण होऊ लागली आणि चांगला दुडूदुडू पळणारा मी लुळ्यापांगळ्यासारखे निपचित पडून रहायला लागलो. त्या काळातले आमच्या लहान गावातले डॉक्टर आणि त्यांना उपलब्ध असलेली औषधे देऊन काही फरक पडत नव्हता. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात सगळ्याच कुटुंबांमध्ये आठ दहा मुले जन्माला येत असत, त्यातली दोन तीन किंवा काही घरांमध्ये तर चार पाच दगावत असे घरोघरी चालत असे. मीही त्याच मार्गाने जावे अशी ईश्वरेच्छाच असेल तर त्याला कोण काय करू शकणार होते?

पण माझ्या आईने मला उचलले आणि घरगुती औषधांमधल्या तज्ज्ञ माई फडके आजींच्या समोर नेऊन ठेवले. मला पाहून झाल्यावर त्यांनी त्यांच्या एका गड्याला हाक मारली. गावापासून तीन चार कोसावर असलेल्या त्यांच्या शेतावर तो रहात असे. माईंना काही वस्तू आणून देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून घेऊन जाण्यासाठी नेमका त्या दिवशी तो त्यांच्या घरी आला होता. "शेतातल्या अमक्या झाडाखाली तमूक प्रकारचे किडे तू पाहिले आहेस का?" असे त्याला विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली. त्या किड्याच्या अळ्या आणून द्यायला माईंनी त्याला सांगितले.

त्यानंतर दर चार पाच दिवसांनी तो माणूस थोड्या अळ्या आणून माझ्या आईला द्यायचा. संपूर्ण शाकाहारी आणि अहिंसक असलेली माझी आई किळस न करता त्या अळ्यांना चिरडून त्यात पिठी साखर मिसळून त्याच्या चपट्या गोळ्या करायची आणि बत्तासा म्हणून मला भरवायची. या उपायाने मात्र मी उठून बसायला, उभे रहायला, चालायला आणि पळायला लागलो. मी जगावे अशी देवाची इच्छा होती म्हणून आईला, माईंना आणि त्या गड्याला त्या वेळी ही बुद्धी सुचली असे म्हणून याचे सगळे श्रेय माझी आई मात्र देवालाच देत असे. माझी ही कहाणी माझ्यासमक्षच आईने कितीतरी लोकांना सांगितली असल्यामुळे आपल्याला आता कसली भीती नाही कारण प्रत्यक्ष देव आपला रक्षणकर्ता आहे ही भावना माझ्या मनात रुजली. माझ्या हातून काही पुण्यकर्म झाले की नाही कोण जाणे, पण माझ्या आईवडिलांची पुण्याई मला नेहमी तारत राहिली. लहानपणी माझी रोगप्रतिकारात्मक शक्ती थोडी कमीच असल्याने गावात आलेल्या बहुतेक साथींनी मला गाठले. त्यातल्या काही घातक होत्या, तरीही मी त्यामधून सुखरूपपणे बरा झालो. आईवडिलांच्या पुण्याईमुळे माझ्याभोवती देवाचे संरक्षणाचे कवच असण्यावरचा माझा विश्वास जास्तच वाढला.

कॉलेजशिक्षणासाठी घर सोडल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंतच्या चार दशकांमध्ये मात्र मला कोणताही मोठा आजार झाला नाही. त्यानंतर एकदा मेंदूला होत असलेल्या रक्तपुरवठ्यात बाधा आल्यामुळे डोक्याच्या चिंधड्या उडतील असे वाटण्याइतक्या तीव्र वेदना होऊन मला ग्लानी आली होती तर एकदा गॅस्ट्रोएंटरटाईजच्या जबरदस्त दणक्याने क्षणार्धात डोळ्यापुढे निळासार प्रकाश दिसायला लागला होता आणि कानात पूर्णपणे शांतता पसरली होती. या दोन्ही वेळा आपला अवतार संपला असे आत कुठेतरी वाटले होते. पण त्याच्या आतून कोणीतरी उसळून वर आले आणि मी भानावर आलो. त्या वेळी आलेल्या दुखण्यांवर केलेल्या उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन मी कामालाही लागलो. देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे मलाही मनापासून वाटले आणि मीही सांगायला लागलो.

माझ्या आयुष्यात बसने किंवा कारने रस्त्यावरून, रेल्वेगाडीत बसून आणि विमानांमधून मी एवढा प्रवास केला आहे की त्यांची अंतरे जोडल्यास या प्रत्येकातून निदान तीन चार तरी पृथ्वीप्रदक्षिणा झाल्या असत्या. अर्थातच यादरम्यान काही अपघातही झाले. पण ते फार गंभीर स्वरूपाचे नसावेत. थोडे खरचटणे, थोडा मुका मार यापलीकडे मला इजा झाली नाही. अनेक वेळा ड्रायव्हरच्या किंवा पायलटच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि हुषारीमुळे तर काही वेळा निसर्गाने साथ दिल्यामुळे आमचे वाहन अपघात होता होता त्यातून थोडक्यात वाचले. "असे होण्याएवजी तसे झाले असते तर आमची खैर नव्हती, ईश्वरकृपेने आणि नशीबाची दोर बळकट असल्यामुळे आपण वाचलो." असे उद्गार काढले गेलेच. 

महिनाभरापूर्वी झालेल्या मोटार अपघातात आम्ही जिच्यात बसलो होतो त्या टॅक्सीची पार मोडतोड आली होती आणि मला आणि माझ्या पत्नीला जबर इजा झाली होती. रस्त्यावरून जात असलेल्या सात आठ मोटारगाड्या आम्हाला पाहून थांबल्या आणि त्यातून उतरलेली दहापंधरा माणसे गोळा झाली, जवळच उभे असलेले हवालदारही आले. ड्रायव्हरच्या बाजूची दोन्ही दारे मोडून जॅम झाली होती. डाव्या बाजूच्या दरवाजामधून लोकांनी ड्रायव्हरला बाहेर काढले. तो ठीक दिसत होता. माझ्या बाजूला बसलेली अलका असह्य वेदनांनी आकांत करत होती, पण शुद्धीवर होती. तिलाही बाहेर पडता आले. माझ्या डोक्याला खोक पडून त्यातून भळाभळा रक्त वहात होते आणि एक दात पडल्यामधून तोंडातूनही रक्त येत होते. दोन्ही हात पूर्णपणे कामातून गेले असल्यामुळे मला कणभरही हलवता येत नव्हते. डोळ्यावर आलेल्या रक्तामधून एक क्षण सगळे लालभडक दृष्य दिसले की दुस-या क्षणी सगळा काळोख आणि तिस-या क्षणी नुसती पांढरी शुभ्र भगभग अशा प्रकारचा विचित्र खेळ डोळ्यांसमोर चालला होता. मी ड्रायव्हरच्या सीटच्या मागच्या सीटवर अडकून पडलो होतो.

अँब्युलन्सला बोलावून तिथपर्यंत येण्यात अमूल्य वेळ गेला असता. तिथे जमलेल्यातला एक सज्जन गृहस्थ आम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार झाला. पोलिसाने कुठल्या तरी वेगळ्या हॉस्पिटलचे नाव काढताच अलकाने आम्हाला बीएआऱसीच्या हॉस्पिटलमध्येच जायचे आहे असे निक्षून सांगितले. पोलिस केस असल्यामुळे त्यात वेळ जाईल का अशी शंका तिला वाटत होती, पण तसे काही झाले नाही. आमचा टॅक्सीड्रायव्हर त्या सज्जनाला वाट दाखवण्यासाठी त्याच्या शेजारी गाडीत बसला. अलका त्याच्या मागच्या सीटवर बसली. .मी आमच्या टॅक्सीमधल्या माझ्या जागेवरच अडकून बसलेलो होतो. एका माणसाने त्या टॅक्सीत शिरून मला खेचत पलीकडच्या दारापाशी आणले आणि दोघातीघांनी धरून बाहेर काढून उभे केले, त्यांच्या आधाराने मी त्या दुस-या कारपर्यंत चालत आल्यावर त्यांनीच मला आत बसवले आणि अपघात झाल्यावर पाच मिनिटांच्या आत आम्ही तिथून निघालो.

एक दोन मिनिटांनी थोडा भानावर आल्यानंतर मी अलकाला सांगितले, "या क्षणी मी तर काहीही हालचाल करू शकत नाही, तुला शक्य असले तर कोणाला तरी फोन कर." तिने कसाबसा तिच्या पर्समधसा सेलफोन काढून आमच्या भाचीला लावला. आमच्या नशीबाने तो पहिल्या झटक्यात लागला आणि रश्मीने तो लगेच उचललाही. सुटीचा दिवस असला तरी त्या क्षणी ती आणि परितोष दोघेही बीएआरसी क़लनीमधल्या त्यांच्या घरीच होते. "अगं, आम्हा दोघांनाही मोठा अँक्सिडेंट झाला आहे, आम्ही आपल्या हॉस्पिस्टलमध्ये येत आहोत." एवढेच अलका बोलू शकली पण तिच्या आवाजाचा टोन ऐकूनच रश्मी हादरली आणि आमच्या पाठोपाठ ते दोघेही हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी आमच्याक़डे लक्ष दिले. रश्मीशी बोलल्यानंतर अलकाने लगेच पुण्याला उदयला फोन लावून जेमतेम तेवढेच सांगितले. तोही लगेच हिंजेवाडीहून निघाला, त्याने शिल्पाला ताबडतोब वाकड जंक्शनवर यायला सांगितले त्याप्रमाणे तीही तिथे जाऊन पोचली. ती दोघेही अंगावरल्या कपड्यातच पुण्याहून निघून थेट हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी पुढच्या सगळ्या कांमाचा भार उचलला. रश्मी आणि परितोष होतेच, आमचे एक शेजारीगी वाशीहून तिथे आले. त्या सर्वांनी मिळून माझी आणि अलकाची हॉस्पिटलमधली व्यवस्था पाहिली.
 
हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत मला अर्धवट शुद्ध हरपत असल्यासारखे वाटायला लागले होते. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी सतत माझ्याशी बोलत राहून मला जागृतावस्थेत  ठेवले होते आणि सलाईनमधून पोषक द्रव्ये पुरवून अंगातली शक्ती थोडी वाढवली होती. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिझल्ट हातात येईपर्यंत शरीरात कुठे कुठे काय काय झाले असेल याची शाश्वती वाटत नव्हती. सगळ्या तपासण्या होऊन गेल्यानंतर असे निष्कर्ष काढण्यात आले की डोक्याला मोठी खोक पडली असली तरी आतला मेंदू शाबूत होता, छाती व पोट या भागात कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत इजा शालेली नव्हती. पायाला झालेल्या जखमा आणि आलेली सूज फक्त वरवरची होती. उजव्या हाताचा खांदा आणि डाव्या हाताचे मनगट यांच्या जवळची हाडे मोडली असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले होते. जखमांमधून खूप रक्तस्राव झालेला असला तरी रक्ततपासणीमध्ये सगळे घटक प्रमाणात आले होते. पत्नीला माझ्यापेक्षा जास्त ठिकाणी मुका मार लागून सगळ्या अंगाला सूज आली होती, त्यातली एक तर डोळ्याला लागून होती, पण डोळा बचावला होता. दोघांच्याही शरीरातले सर्व महत्वाचे अवयव व्यवस्थित कामे करीत होते. थोडक्यात म्हणजे दोघांच्याही जिवाला धोका नव्हता. ज्याची सर्वांना  धास्ती वाटत होती अशा मोठ्या संकटातून आम्ही देवाच्या कृपेने वाचलो होतो. यापुढे काही काळ आम्हा दोघांनाही असह्य अशा वेदना सहन करत राहणे मात्र भाग होते. तेवढा भोग भोगायचाच होता. पण पुन्हा एकदा देवाने मला तारले होते हे जास्त महत्वाचे होते.

1 comment:

Unknown said...

Devache koti koti aabhar. Dev tumha doghanna udand, swasthpoorna, Sukhi dirghayushya pradaan karo hi mazi namra prarthana......nb joshi