Tuesday, March 17, 2015

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग २)

मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी केबल फॉल्टच्या रूपाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती. आणि त्यामुळे आमच्या घरातली वीज अचानक गेली होती. त्या वेळी अलकाला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले असल्यामुळे माझी चांगलीच तारांबळ उडाली होती वगैरे हकीकत या लेखाच्या पहिल्या भागात दिली आहेच. त्या दिवशी मी हॉस्पिटलला जायला निघालो तेंव्हा आमच्या घराच्या पलीकडच्या इमारतीसमोरच्या फुटपाथवर तीन चार माणसे हातात कुदळ, फावडे, पहार वगैरे घेऊन कुणाची तरी वाट पहात बसली होती. त्या अर्थी आमच्या भूमीगत केबलच्या दुरुस्तीसाठी चक्रे फिरायला सुरुवात झाली होती आणि काही तासांमध्ये ते काम पूर्ण होईल अशी आशा होती. मी जरा खुशीत येऊन पुढे गेलो.

कुठल्याही पतीला पत्नीशी बोलत असतांना हं, हां याच्या पलीकडे जास्त काही उच्चारायची जास्त गरज सहसा पडत नाही किंवा त्याला तशी जास्त संधीही मिळत नाही हे एक वैष्विक सत्य आहे. त्या दिवसभरात हॉस्पिटलमध्ये आलेले अनुभव, घरात करायची साचलेली कामे, बाजारातून आणायचे असलेले सामान यासारख्या अनेक विषयांवर अलका बोलत राहिली आणि मी ते ऐकत राहिलो. घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीचा उल्लेख मी मुद्दामच टाळला. मी हॉस्पिटलमधून घरी परत येत असतांना आमच्या घराजवळच्या रस्त्याच्या कडेला एक खड्डा खणलेला मी चालत्या रिक्शेमधूनच पाहिला. त्या खड्ड्यातून बाहेर काढलेल्या विजेच्या केबलवर जो़डणीसाठी शस्त्रक्रिया सुरू होती. ते लोक नेमके काय करत होते ते पाहण्याची मला उत्सुकता असली तरी सकाळपासून झालेल्या धावपळीनंतर तिथे जाऊन उभे राहण्यासाठी माझ्या अंगात त्राण उरले नव्हते आणि पोटात सडकून भूकही लागली होती. त्यामुळे मी रिक्शा सरळ आमच्या घरापर्यंत नेली, चार घास जेवण पोटात ढकलले आणि बिछान्यावर आडवा झालो. तोपर्यंत वीजही आली. पहाटे तिच्य़ावर आलेली संक्रांत बहुधा रात्री तिच्या निजधामाला परत गेली असे वाटले.

दुसरे दिवशी अलकाला हॉस्पिटलमधून घरी आणले. अजूनही तिला संपूर्ण विश्रांतीची गरज होती. तिच्याकडे लक्ष देऊन मी जमतील तेवढी कामे उरकून घेत होतो. असाच आणखी एक दिवस सुरळितपणे पार पडला. त्या दिवशीच्या रात्री साडेतीनच्या सुमाराला पुन्हा पंख्याचे जोरात घुरघुरणे सुरू झाल्याने मला जाग आली. पंखा बंद करून खिडक्या उघडल्यावर थंड आणि ताजी हवा आत आली. अलकाचे ऑक्सीजनचे मशीन बंद करावे लागले, पण ती गाढ झोपेत होती. दचकून किंवा खडबडून जागी झाली नाही. मीही थोडा वेळ आडवा झालो आणि तिच्याकडे लक्ष ठेवत राहिलो. आजूबाजूच्या इमारतींमध्ये लखलखाट होता पण आमचीच बिल्डिंग अंधारात होती. याचा अर्थ आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेली संक्रांत अजून इथेच मुक्कामाला राहिली होती. दोन दिवसांपूर्वी केलेली केबलदुरुस्ती बहुधा कुचकामी ठरली असावी. सकाळ होईपर्यंत मला त्यावर काहीही करणे शक्य नव्हते. पहाटेची वाट पहात राहिलो.

बिल्डिंगमधले इतर लोक उठण्याच्या आधीच मी भल्या पहाटे उठून एक मोठे पातेलेभर पाणी स्वयंपाकघरातल्या नळावर भरून ठेवले आणि त्या दिवशीच्या सेवयंपाकाची सोय केली. कोप-यात रिकामा पडलेला प्लॅस्टिकचा ड्रम बाथरूममध्ये नेऊन भरून ठेवला. पूर्वी कधीकाळी विजेचे भारनियमन चाललेले असतांना घेऊन ठेवलेल्या या वस्तूंचा पुन्हा एकदा उपयोग करण्याची वेळ आता आली होती. पिण्यासाठी गाळलेले भरपूर पाणी चार पाच बाटल्यांमध्ये आदल्या रात्रीच भरून ठेवलेले होते. नळाला पाणी येत होते तोपर्यंत सकाळची सगळी कामे आणि आंघोळ वगैरे आटोपून घेतली. आता केंव्हाही ते गेले तरी काही वांधा नव्हता.

अलकाचे ऑक्सीजनचे मशीन बंद झाले होते हे सकाळी उठल्यानंतर तिच्या लक्षात आले. पण त्याचा तिला काही त्रास होत नव्हता. ऑक्सीमीटर लावून तिच्या रक्तातले प्राणवायूचे प्रमाण तपासून पाहिले, ते थोडे कमी झाले असले तरी मर्यादेतच होते. ही जमेच्या बाजूची गोष्ट होती. ते आणखी कमी झाल्यानंतर तिला जाणवले असते आणि त्याहून कमी झाल्यावर त्याचा त्रास झाला असता. याचा अर्थ आमच्याकडे बरेच मार्जिन होते. आता मला विजेचे नियोजन करणे शक्य होते आणि बराच वेळ वीज आली नाही तरी तिचा फार मोठा प्रोब्लेम होणार नव्हता. बॅटरीवर चालणारे दुसरे ऑक्सीजनचे मशीन थोडा वेळ चालवून रक्तातले प्राणवायूचे प्रमाण वाढवायचे आणि काही वेळ मशीन बंद करून ठेवायचे असे करून ते जास्त वेळ चालवणे शक्य होते. इन्हर्टरच्या विजेवर मशीनची बॅटरी चार्ज करून घेऊन तिचे आयुष्य वाढवता येत होते.

त्या दिवशी इन्व्हर्टरचा उपयोग फक्त या एकाच कामासाठी करायचा असे मात्र आम्ही ठरवले. आमच्या घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये थोडा फार सूर्यप्रकाश येत असल्यामुळे दिवसा उजेडी विजेचे दिवे लावायची चैन एक दिवस करायची नाही, जानेवारीचा महिना असल्यामुळे एकादा दिवस पंख्याशिवाय राहणे अशक्य नव्हते. टीव्हीचे जास्त अॅडिक्शन बरे नाही असे म्हणताच माझ्या कॉम्प्यूटरच्या व्यसनावर गाडी घसरली. तो दिवस 'नो टीव्ही आणि नो कॉम्प्यूटर डे' असा साजरा करायची घोषणा केली. त्यामुळे मला बराचसा मोकळा वेळही मिळाला.

कपाटांमधले सामान काढून ते आवरायला घेतले. त्यात काही जुने फोटो, पत्रे वगैरे मिळाली. त्यांनी मला भूतकाळाची सफर घडवून आणली. नजरेआड गेलेल्या काही उपयोगाच्या किंवा शोभेच्या वस्तू गवसल्या. त्या नव्याने मिळाल्याचा आनंद झाला. शीतकपाटाचे मुख्य यंत्र (रेफ्रिजरेटरचा कॉम्प्रेसर) थंड पडल्यामुळे त्यातले तपमान वाढायला लागले. त्यातले उरलेसुरले आइसक्रीम वाया जाऊ नये म्हणून खाऊन फस्त केले आणि फळांचे रस (फ्रूट ज्यूस) पिऊन टाकले. ज्यांच्या टिकण्याबद्दल शंका होती अशी काही फळे, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ बाहेर काढले. "आम्ही सारे खवय्ये" आणि "खाना खजाना" या कार्यक्रमांच्या गेल्या दोन तीन आठवड्यातल्या भागात पाहिलेल्या काही रेसिपीजचे प्रयोग त्यांच्यावर करून पाहिले. कुठलाही तिखटमिठाचा पदार्थ चांगला खरपूस भाजला किंवा तळला तर मस्तच लागणार आणि कुठल्याही गोड पदार्थात मुबलक बदाम, काजू, बेदाणे वगैरे घातले तर तो कशाला वाईट लागणार आहे? "शाहंशाही ताश्कंदी टिक्का", आणि "मॅजेस्टिक बव्हेरियन फज्" असली फॅन्सी नावे देऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेतला. थोडक्यात म्हणजे वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीच्या या वेळच्या फेरीमुळे आपण गांगरून न जाता तिला धीराने तोंड देऊन जमेल तेवढी  मजा करायची असे मी या वेळी ठरवले होते. 

  .  . . . . . . . . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . .. (क्रमशः) 

No comments: