Sunday, March 08, 2015

विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग १)

सूर्य आणि विश्वातले सारे तारे नेहमी आपापल्या जागांवरच असतात. पण आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि आपण तिच्यासोबत फिरत असतो यामुळे आपल्याला ते सगळे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतांना दिसतात. पृथ्वीबरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतांना आपण त्याला निरनिराळ्या ठिकाणांहून जरा जवळून पहात असतो. यामुळे आपल्याला तो खूप खूप दूर असलेल्या इतर ता-यांच्या तुलनेत हळू हळू सरकत बारा राशींमधून प्रवास करतांना दिसतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तो धनूराशीमधला प्रवास आटोपून मकर राशीत प्रवेश करतो. पण त्या वेळी सूर्याच्या प्रकाशात आपल्याला आकाशातली धनू रासही दिसत नसते आणि मकर रासही. या दोन राशींमध्ये कसली सीमारेषा तर आखलेली नाहीच. त्यामुळे तो इकडून तिकडे गेल्याचे आपल्याला दिसणार तरी कसे? खरे तर त्या दिवशी आपल्याला आकाशात काहीच वेगळे घडतांना दिसत नाही आणि इतर दिवसांपेक्षा वेगळे असे काही त्या दिवशी प्रत्यक्षात घडतही नाही हे सगळे मला चांगले माहीत आहे. संक्रांत नावाची एक विध्वंसक देवी या दिवशी एका दिशेने येते आणि दुस-या दिशेकडे पहात पहात तिसरीकडे चालली जाते असे सांगितले जाते. प्रत्यक्षात तिला कोणीच कधी पाहिलेले नाही कारण ती फक्त एक रंजक कल्पना आहे याबद्दल मला खात्री आहे. तरीही एकाद्यावर कोणते संकट आले किंवा एकाद्याचे नुकसान झाले तर त्याच्यावर 'संक्रांत आली' असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. त्या अर्थाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती.

या वर्षातली मकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी एका पहाटे बाहेरून धडाड् धुम्, फाट् फुट् असे आवाज येऊ लागल्यामुळे मला जाग आली. त्या दिवशी नरकचतुर्दशी किंवा गुढीपाडव्यासारखा पहाटे उठून साजरा करण्याचा कोणताच सण नव्हता, ख्रिसमस, ईद वगैरे नव्हती आणि जैन, बौद्ध, शीख वगैरेंपैकी कोणाचाही सण नव्हता. कोणाची वरात किंवा बारात निघाली असेल म्हणावे तर रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते, भारतपाकिस्तान यांच्यातली क्रिकेट मॅचही कुठे चाललेली नव्हती. मग हे फटाके कोण उडवत असेल? कदाचित शेजारच्या बिल्डिंगमधल्या वात्रट मुलांचे हे काम असावे किंवा दूर कुठे तरी अतिरेक्यांनी केलेले बाँबस्फोट होत असावेत असे काही अंदाज मनात आले.

बाहेरून येत असलेल्या आवाजांपेक्षा घरातल्या पंख्यांमधून येत असलेले घुर्र घुर्ऱ असे आवाज जास्त चिंताजनक वाटल्याने त्यांच्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे होते. आमच्या घरातली वीज गेली होती आणि इन्ह्रर्टरमधून पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्यामुळे पंखे कुरकुरत होते हे लक्षात येतांच आधी पंख्यांची बटने बंद केली. पहाटेच्या वेळी त्यांची फारशी गरजही वाटत नव्हतीच. समोरच्या आणि शेजारच्या बिल्डिंग्जमध्ये उजेड दिसत होता पण आमच्या बिल्डिंगमधल्या जिन्यातले व गेटवरचे दिवे बंद झाले होते. यावरून हा फक्त माझ्या घरातला प्रॉब्लेम नसून आमच्या बिल्डिंगचा आहे एवढे लक्षात आले. कदाचित मुख्य फ्यूज उडला असेल आणि सकाळी कोणीतरी तो लावून देईल असे वाटले.

बाहेर थोडा उजेड झाल्यावर मी नित्याचा मॉर्निंगवॉक घेऊन परत आलो. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे आणि टाटापॉवर कंपनीत काम करणारे सद्गृहस्थ खाली भेटले. "वीज आली का?" असे त्यांना विचारताच "बहुतही व्होल्टेज फ्लक्च्युएशन हो रहा है।" असे पुटपुटत ते त्यांच्या गाडीत बसून चालले गेले. मला काहीच समजले नाही. मी आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला फोन लावला. तोही म्हणाला, "अरे साब, ४०० व्होल्ट्सतक व्होल्टेज जा रहा है। आप अपने कॉस्टली इक्विपमेंट्सको बचाइये। कोई केबल फॉल्ट लगता है।" माझ्याघरात तर अजीबातच वीज नव्हती, पण या केबलफॉल्टचे काही सांगता येत नाही. मागे एकदा एका केबलफॉल्टमुळे चक्क न्यूट्रल वायरमधून फेजमधला करंट येत होता आणि त्या गोंधळात आमच्या वॉशिंगमशीनचे कंट्रोल सर्किट जळून गेले होते, त्याचा मला चांगला फटका बसला होता. ते आठवल्याने मी सावध झालो, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरेंची सगळी स्विचे तर फटाफटा ऑफ केलीच, त्यांचे प्लग्जही सॉकेट्समधून काढून ठेवले.  

आमच्या भागातल्या सबस्टेशनमधून आमच्या बिल्डिंगमध्ये येणारा विजेचा प्रवाह वाहून नेणारी भूमीगत (अंडरग्राउंड) केबल होती. जमीनीखाली ती नेमकी कुठून नेलेली होती, त्यात कोणत्या जागी हा फॉल्ट आला असेल, म्हणजे ती केबल तुटली बिटली असेल ते कसे शोधून काढतात आणि त्याची दुरुस्ती कशी केली जाणार होती याची कणभरही कल्पना आम्हा कोणाला नव्हती. त्या कामाला अनिश्चित काळ लागणार होता एवढे मात्र निश्चितपणे वाटत होते. यामुळे माझ्यासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला.

त्या वेळी अलकाला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले होते आणि त्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण घरी आल्यानंतर तिला प्राणवायूच्या कृत्रिम पुरवठ्याची गरज पडणार होती. त्यासाठी आणलेले यंत्र चालवण्यासाठी विजेची आवश्यकता होती आणि वीज नसेल तर आमची पंचाईत होणार होती. शिवाय वीज नाही म्हणजे पाण्याचे पंप चालणार नाहीत, ओव्हरहेड टँकमध्ये पाणी भरता येणार नाही, त्यात शिल्लक असलेले पाणी संपले की घरात पाण्याचा ठणठणाट होणार, विजेशिवाय अॅक्वागार्ड चालणार नाही, म्हणजे टँकच्या तळातले गाळाने गढूळ झालेले पाणी मिळणार ते आजारी व्यक्तीला कसे द्यायचे आणि मी तरी ते कसे प्यायचे? स्वयंपाक तरी कुठल्या पाण्याने करायचा? अशा वेळी हॉटेलातले जेवण मागवून खाणेही योग्य नव्हते. असा सगळाच घोळ झाला होता. यामुळे त्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळाला तर कोणा नातेवाइकाच्या किंवा मित्राच्या घरी नेऊन ठेवावे का? तसेच ही गोष्ट तिला कशी सांगावी व पटवून द्यावी? याच विचारात मी धडपडत होतो.

पण या वेळी काही तातडीची कामे करणेही आवश्यक होते. आधी स्वयंपाकघरात आणि बाथरूम्समध्ये शक्य तेवढे नळाचे पाणी भरून ठेवले. त्यानंतर इन्व्हर्टरकडे मोर्चा वळवला. महाराष्ट्रात जेंव्हा बारनियमन आणि भारनियमन जोरात चालले होते तेंव्हा घरातली वीज रोजच जायची. यामुळे घरात इन्हर्टर बसवून घेतला होता आणि त्याचा चांगला उपयोग होत होता. पुढे विजेच्या पुरवठ्य़ात सुधारणा होत गेली. तरीही वाशीला अधूनमधून वीज जातच असल्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट अगदीच वाया गेली नाही असे वाटण्याइतपत त्याचा उपयोग होत राहिला. एकदा त्याची बॅटरी आणि एकदा इन्हर्टरही बदलून झाले होते. मात्र गेल्या तीन चार महिन्यात वीजेचा पुरवठा खंडित न झाल्यामुळे कोप-यात धूळ खात पडलेल्या त्या यंत्राकडे आमचे दुर्लक्षच झाले होते. पण या अचानक आलेल्या आपत्तीमुळे मात्र आता त्या यंत्राला महत्वाची भूमिका बजावायची होती आणि त्यासाठी त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक होते.

मी आधी पेट्रोल पंपावर जाऊन डिस्टिल्ड वॉटरचा कॅन आणला, इन्हर्टरच्या वजनदार बॅटरीला कसेबेसे ओढत कोप-यातून बाहेर काढले आणि ते उकळून शुद्ध केलेले पाणी त्यातल्या तहानलेल्या सेल्सना पाजले. त्यांनीही ते गटागटा पीत जवळजवळ अख्खा कॅन संपवून टाकला. आणखी काही काळ लोटला असता तर कदाचित त्यांचे डिहायड्रेशन होऊन त्यांनी मानच टाकली असती. आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आलेल्या संक्रांतीमुळे त्या बॅट-यांना मात्र नवजीवन मिळाले होते.

घरकाम आणि स्वयंपाक करणा-या बायांना मी वीज आणि पाणी जपूनच वापरण्याच्या सूचना दिल्या, पण त्यांनी अनवधानाने काही दिवे आणि पंखे लावले आणि थोडे पाणी वाहून जाऊ दिलेच. त्यामुळे बॅटरीतली थोडी वीज खर्च झाली आणि पाण्याचा साठाही कमी झाला. तोंपर्यंत घरातले सगळे नळ तर कोरडे झालेले होतेच.  माझ्यासमोर असलेला प्रश्न जास्त गंभीर झाला. हा प्रॉब्लेम अलकाला लगेच फोनवर सांगावा की बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला प्रत्यक्ष भेटून सांगावा याचा विचार मी करत असतांना तिचाच फोन आला. मी काही बोलण्याच्या आधीच तिचा हिरमुसलेला स्वर कानावर पडला. हॉस्पिटलमधले डॉक्टर्स त्यांच्या वॉर्डमधल्या रोजच्या राउंडवर येऊन गेले होते, पण तिची केस ज्या मोठ्या डॉक्टरीणबाई पहात होत्या त्या काही कारणाने आल्या नव्हत्या आणि तिला डिस्चार्ज देण्याचा निर्णय त्यांच्या संमतीशिवाय घेतला जाणार नव्हता. यामुळे तिचा तिथला मुक्काम एका दिवसाने वाढला होता.

खरे तर हे ऐकून मला जरा हायसे वाटले होते, पण माझ्या आवाजातूनसुद्धा तिला तसे कळू न देता मी तिची समजूत काढली. "आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याने तुझी तब्येत आणखी सुधारेल, आज ज्युनियर डॉक्टर्सच्या मनात कदाचित काही शंका असल्या तरी उद्या मोठ्या डॉक्टरांनीच तुला तपासून खात्री करून घेतली तर मग घरी आल्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही. एका दृष्टीने ते ही ठीकच आहे. मला आणखी एक दिवस तुझ्यापासून दूर रहावे लागेल, पण त्याला काही इलाज नाही. मी दुपारी तुला भेटायला येईनच, तेंव्हा काय काय आणायचे आहे?" विषय बदलून झाल्यावर कोणाकोणाचे फोन येऊन गेले? ती मंडळी कशी आहेत? काय म्हणताहेत? वगैरेंवर चर्चा करून संभाषण संपवले.

काही वेळाने बाहेरून कोणी तरी मोठ्याने बोलत असल्याचा आवाज ऐकू आला. बाल्कनीत जाऊन पाहिले तर एक माणूस आमच्या बिल्डिंगच्या काम्पाउंडजवळ असलेल्या एका झाडावर चढला होता तर त्याचा साथी फूटपाथवर असलेल्या दिव्याच्या खांबापाशी उभा होता. त्याने दिव्याच्या वायरला जोडलेली एक लहान जाडीची केबल झाडावरल्या माणसाकडे फेकली, त्या माणसाने ती ओढून घेतली आणि तिची गुंडाळी करून आमच्या अंगणात फेकली. त्यानंतर त्या दोघांनी आत येऊन ती केबल आमच्या बिल्डिंगच्या मुख्य कनेक्शनला जोडून दिली आणि विजेचा तात्पुरता पुरवठा सुरू करून दिला.

वीज कंपनीच्या लोकांनी केलेल्या या जुगाडू प्रकारच्या उपाययोजनेचे मला कौतुकही वाटले आणि त्यातला धोकाही जाणवला. पण त्या क्षणी तरी आमचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. आम्ही लगेच पाण्याचे पंपिंग सुरू करून दिले. ओव्हरहेड टँकमधून नळाला पाणी येऊ लागताच आंघोळ केली, कपडे धुवून टाकले, इन्हर्टरची बॅटरीही चार्ज करून घेतली. केबल फॉल्टची पक्क्या स्वरूपाची दुरुस्ती होईपर्यंत थोडा मोकळा श्वास घ्यायची सोय झाली होती.

.  . . . . . . . . . . . . .  . . . . . . (क्रमशः) 

No comments: