Saturday, December 20, 2014

सोनार, शिंपी आणि परीट - भाग २

जनावरांची कातडी माणसांनी पांघरून त्यापासून ऊब आणण्याचे प्रयोग इतिहासपूर्व म्हणजे आदिमानवाच्या काळातच सुरू झाले होते असे म्हणतात. त्या काळातल्या काही लोकांनी त्या कातड्यांच्या तुकड्यांना एकमेकांना जोडून त्यातून वस्त्रेही तयार केली असावील. ते काम करणा-या लोकांना 'शिंपी' म्हणण्यापेक्षा 'चर्मकार' म्हणणे कदाचित जास्त योग्य होईल. प्राचीन काळातल्या भारतातली जी शिल्पे, भित्तीचित्रे वगैरे सापडली आहेत त्यावरून असे दिसते की त्या काळातले भारतीय लोक पितांबर, शेले यासारखी अंगाला गुंडाळण्यासारखी किंवा पांघरण्यासारखी चौकोनी वस्त्रे धारण करत असावीत. त्या वस्त्रांच्या निर्मितीसाठी विणकरांची आवश्यकता असली तरी शिंप्यांची गरज नसणार. काही कथांमध्ये कंचुकीचे उल्लेख येतात, पण ती शिवणकाम करून तयार केली जात असे की तशा आकारात विणली जात असे कोणास ठाऊक. ती शिवली जात असली तरी ते काम बहुधा स्त्रीवर्गच करत असावा असा माझा अंदाज आहे. वेगवेगळ्या आकारांचे कापडाचे तुकडे कापून आणि त्यांना एकमेकांना जोडून त्यांचे निरनिराळ्या आकारांचे कपडे शिवण्याची कल्पना बहुधा परदेशातून येणारे व्यापारी, पर्यटक किंवा आक्रमक यांच्याकडून इतिहासकाळात इकडे आली असेल आणि लोकांना ती आवडल्यामुळे इथे स्थिरावली असणार.

हे अवघड आणि किचकट काम करण्याचे कौशल्य काही लोकांनी आत्मसात केल्यानंतर शिंपी हा त्यांचा एक नवा व्यवसाय निर्माण झाला असावा. त्या काळातल्या सुया कशा प्रकारच्या असतील, कोणते लोहार त्या तयार करत असतील वगैरे विषयांची मला फारशी माहिती नाही. इंग्लंडमधल्या लीड्स या शहरातल्या एका पुराणवस्तूसंग्रहात मला प्राचीन काळातल्या सुया, कात्र्या वगैरे शिवणकामाची अवजारे पहायला मिळाली होती. त्यातल्या सगळ्या पुरातनकालिन सुया दाभणासारख्या दणकट दिसत होत्या. काही सुयांना दोरा ओवण्याचे भोकही नव्हते, तर काही सुयांच्या खालच्या टोकावा दोरा अडकवण्यासाठी हूक होते. इंग्लंडमधल्या अत्यंत शीत वातावरणामुळे तिथल्या वस्त्रोद्योगाचा उगम चामड्यापासून झाला असावा आणि तरट, गोणपाट, लोकर यासारख्या जाड्याभरड्या कपड्यांचे टप्पे पार करून अनेक शतकानंतर ते लोक सुती कापडापर्यंत आले असावेत. यंत्रयुगात सुरू झालेल्या इंग्लंडमधल्या कापडगिरण्यांना होणारा कापसाचा पुरवठा मुख्यतः भारत, इजिप्त किंवा अमेरिकेमधून होत असे. या सगळ्या देशांच्या इतिहासावर कापूस आणि कापडाच्या व्यापाराचा महत्वपूर्ण परिणाम झाला होता असे दिसेल. गिरण्यांमधून मोठ्या प्रमाणावर कापडाची निर्मिती होऊ लागल्याने जगभरातल्या वस्त्रोद्योगाला चालना मिळाली आणि शिंपीकामाच्या व्यवसायातही मोठी वाढ झाली.

कपडे शिवण्याची कला आणि कौशल्य यांचा प्रसार इतिहासकाळात भारतात झाला आणि त्यातून शिंपी हा एक वेगळा वर्ग निर्माण झाला. त्या भूतकाळात सगळी शिलाई हातानेच केली जात असणार. एक एक टाका घालून संपूर्ण पोशाख शिवायला किती वेळ लागत असेल याची कल्पना करता येईल. यामुळे त्या काळातले शिंपी सगळ्या आम जनतेचे सगळे कपडे शिवत असतील हे मला कठीण वाटते. त्यांच्या सेवेचा लाभ बहुधा सरदार, इनामदार, सावकार आदि धनिक वर्गांनाच मिळत असणार आणि त्याचा चांगला मोबदला शिंप्यांना मिळत असावा. या वर्गाच्या उंची वस्त्रांसाठी उत्तम दर्जाचे कापड आणून पुरवण्याचे कामसुद्धा शिंपीच करत असले तर त्या व्यवहारातूनही त्यांना धनलाभ होत असेल. यामुळे आर्थिक दृष्ट्या त्यांची परिस्थिती चांगली असावी.  तेराव्या शतकात होऊन गेलेले संतश्रेष्ठ नामदेव महाराज शिंपी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट असे होते. संत नामदेवांबद्दल ज्या आख्यायिका सांगितल्या जातात त्यावरून असे दिसते की ते तुपाशिवाय भाकरी खात नसत आणि देवाला खिरीचा नैवेद्य दाखवत असत. त्यांच्या घरी घरकामासाठी दास दासी होत्या. यावरून त्यांच्या घरात सुबत्ता नांदत होती असे दिसते. संत सांवता माळ्याच्या अभंगात "कांदा मुळा भाजी" चा उल्लेख येतो, तर  "आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक" असे संत सेना न्हावी म्हणत. पण संत नामदेवांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये शिवणकामातल्या दाखल्यांचा उल्लेख आला असला मला तरी तो माहीत नाही. यामुळे त्यांनी स्वतः इतर लोकांचे कपडे शिवण्याचे काम केले होते की नाही हे सांगता येणार नाही. बहुधा ते पूर्णवेळ विठ्ठलभक्तीमध्ये लीन झाले होते असेच वाटते.

माझ्या लहानपणच्या काळापर्यंत भारतातल्या लहान लहान गांवांमध्येसुद्धा शिवणयंत्रे येऊन पोचली होती. अगदी घरोघरी नसली तरी शिंप्यांच्या दुकानांमध्ये दोन तीन सिंगर सुइंग मशीन्स असायचीच. दोन तीन सहाय्यक कामगार ऑर्गन वाजवण्याच्या स्टाइलमध्ये त्यांवर खडखडाटाची जुगलबंदी खेळत असत. आणखी दोन तीन मुले जमीनीवर बसून इतर कामे करतांना दिसत. कपडे बेतण्याचे सर्वात महत्वाचे काम दुकानाचा प्रमुख टेलर मास्टर स्वतः करीत असे. त्याच्या वहीत लिहिलेल्या आपल्याला अगम्य वाटणा-या आकड्यांच्या आधाराने तो कापडावर काही खुणा करायचा आणि त्यांना जोडून सरळ किंवा वक्ररेषा मारायचा. यासाठी चपट्या आकाराच्या एका विशिष्ट चॉकचा वापर केला जात असे. शिंप्याचे दुकान सोडल्यास मी अशा प्रकारचा तेलकट खडू कुठेही आणि कधीही पाहिला नाही. दुकानातला इतर कोणीतरी माणूस किंवा मुलगा कापडावरल्या त्या रेषांवरून कात्री फिरवून त्या कापडाचे तुकडे पाडत असे. यात कोणी खिसे कापायचे आणि कोणी गळे कापायचे याचासुद्धा एकादा प्रोटोकॉल ठरला असावा. क्रिएटिव्हिटी हा शब्द मी त्या काळात ऐकला नसला तरी मला शिंप्यांच्या कामात ती भरपूर प्रमाणात दिसायची. ग्राहकाने दिलेल्या कपड्यामधून त्याच्या पोशाखाला लागतील तेवढे तुकडे कापून घेतल्यानंतर उरलेले कापड शक्य तेवढे एकसंध निघावे अशा त-हेने ते तुकडे कापले जातच, उरलेल्या तुकड्यांमधून कोणती वेगळी कलाकृती तयार करून विकता येईल याचेही नियोजन केले जात असे.

त्या काळातल्या बहुतेक सगळ्याच शिंपीलोकांचे एक वैशिष्ट्य होते. आताप्रमाणे डिलीव्हरी डेट वगैरे देण्याची पद्धत तर तेंव्हा नव्हतीच, शिवायला टाकलेल्या कापडांची साधी रिसीटसुद्धा मिळत नसे. सगळा व्यवहार विश्वासावरच चालत असे. "हे कपडे कधीपर्यंत शिवून मिळतील?" असे विचारले की ते हमखास सांगायचे, "आत्ताचं हातातलं काम संपलं की तुमचंच घेणार बघ." त्याच्या दुकानात नव्या कापडांचे दहा बारा गठ्ठे दिसत असले तरी प्रत्येक नव्या ग्राहकाला असेच सांगितले जायचे. "म्हणजे कधी?" हा प्रश्न शिताफीने उडवला जाई. "कशाला उगाच टेन्शन घेतोस? तुमची कापडं घेऊन मी कुठे पळून जाणार आहे का?" अशा प्रकारचे उत्तर येई. आठवडाभराने चौकशी करायला गेलो तर आपल्या कापडांचा गठ्ठा अजून तसाच कपाटात पडलेला दिसे. त्यासाठी अनेक कारणे तयार असतच, "कोणता कामगार आजारी पडला", "कोणता गावाला गेला", "मध्येच जोराचा पाऊस आला", असे काहीही. मात्र त्यानंतर लगेच आमचेच काम हातात घेण्याचे आश्वासन मिळत असे. आणखी आठवडाभराने विचारले तर, "तुमचे कपडे ना? तय्यार व्हायला आलेत, आता नुसती काजंबटनं लावायची राहिलीय्त." असे उत्तर. निदान आता गठ्टा तरी जागेवरून हललेला दिसायचा. याचा अर्थ त्याचे तुकडे कापून झाले असावेत. "आता की नै, फक्त इस्त्री मारायची राहिली आहे." अशी प्रगती पुढच्या खेपेला सांगितली जायची. अशा सात आठ चकरा मारून झाल्यानंतर एकदाचे ते कपडे हातात पडत. तोपर्यंत आपला उत्साह इतका मावळलेला असायचा की ते नवे कपडे घालून बघायची इच्छा शिल्लक राहिलेली नसायची. अंगात घालून पाहिल्यावर ते कपडे नको तिथे तंग आणि नको तिथे डगळ वाटले तरी शिंपी ते कधीच कबूल करत नसे. "अरे आत्ता मुंबईपुण्याकडे हीच लेटेस्ट फॅशन चाललीय्. तुम्ही आहात कुठे?" अशी मखलाशी केली जायची. त्यातून काही बदल करायचा आग्रह धरलाच, तर ते आल्टरेशन करून होईपर्यंत तुमची मापेच बदलली असल्याची दाट शक्यता असायची. आम्ही गावातले दोन तीन शिंपी बदलून पाहिले, पण या अनुभवात फारसा फरक पडला नाही.

खरे सांगायचे झाल्यास त्या काळातले लहान गावातले लोक याबद्दल विशेष चोखंदळ नसायचेच. कपडे हे अंगाला झाकून लाज राखण्यासाठी आणि थंडीवा-यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी असतात असे समजले जात असे. तेवढी उद्दिष्टे पुरी झाली तर इतर बाबींकडे जास्त लक्ष द्यायचे कारण नव्हते. माझ्या वडिलांच्या पिढीतले सगळे पुरुष धोतर नेसत असत. त्यामुळे शिंप्याची गरज अर्धी होत असे. कधीकाळी एकादा कोट शिवला तर तो जवळच्या शहरामधून शिवून आणला जात असे. सदरा, बंडी वगैरेंची गरज ऋतूमानानुसार कमी जास्त पडत असे. त्यांच्या शिलाईसाठी शिंप्याकडे जाणे होत असे. आम्ही लहान मुलेच शिंप्यांचे मुख्य ग्राहक असू. आमचे कपडे झिजणे, फाटणे, आखूड होणे वगैरेंचे प्रमाण मोठे असल्याने नवे कपडे शिवणे अपरिहार्य असायचे. ते वाढत्या अंगाच्या हिशोबाने शिवले जात असल्यामुळे नवे असतांना सगळ्याच बाजूंनी चांगले ढगळ असायचे. धुतल्यानंतर ते कपडे कोणत्या बाजूने किती आटत आणि मुलांच्या शरीराची वाढ होतांना ती उंची वाढण्यात किंवा रुंदी वाढण्यात किती प्रमाणात होई यांचे गणित सहसा जुळत नसे. त्यामुळे शरीराला सर्व बाजूने बरोबर फिट बसणारे कपडे क्वचितच नशीबात येत असत आणि हा योग जुळून आला तरी त्याचेही कोणालाही काही कौतुक वाटत नसे.

शालेय जीवन संपवून पुढील शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर मात्र हे सगळे बदलले, इतर मुलांचे झकपक पोशाख पाहून आपण किती अजागळासारखे गबाळग्रंथी रहात होतो याची पदोपदी जाणीव होऊ लागली. आपले कपडे हे फक्त शरीराला झाकण्यासाठी नसून आपल्या व्यक्तीमत्वाला उठाव देण्यासाठी वापरायचे असतात याचा नवा साक्षात्कार झाला. "एक नूर आदमी और दस नूर कपडा"  असे का म्हणतात हे समजले आणि माझे वडील शहरांमधल्या संस्कृतीला "पोशाखी संस्कृती" असे का म्हणत याचा अर्थ तिथे रहायला गेल्यानंतर समजायला लागला. आता मीसुद्धा त्या संस्कृतीचा भाग झाल्यामुळे मला ती स्वीकारणे आवश्यकच होते. माझ्या जीवनातले कपड्यांचे महत्व वाढले तसा माझ्या मनात शिंपीवर्गाविषयीचा आदर वाढत गेला.

त्या काळात मुंबई शहरातल्या शिंप्यांची दुकानेच खूप आकर्षक असायची. फोर्टसारख्या भागात मापाप्रमाणे (टेलरमेड) कपडे शिवून देणारी पॉश दुकाने होती. तिथले इंटिरियर डेकोरेशन, लाइटिंग वगैरे झकास असायचे. गळ्यात बो बांधून त्यावर टेप टांगलेला टेलर मास्टर रुबाबदार वाटायचा. शर्ट किंवा पँटच्या डिझाइन्सचे आल्बम समोर ठेवून त्यातली कोणती स्टाईल पाहिजे असे इंग्रजीत विचारायचा, तुम्हाला कुठली स्टाईल चांगली दिसेल याचा सल्लाही द्यायचा. त्यांचे चार्जेस आपल्या आवाक्याबाहेर असणार आणि आपण आणलेली स्वस्तातली कापडे तो हातात तरी घेईल की नाही याची शंका वाटत असल्यामुळे त्या दुकानांची पायरी चढण्याचे धाडस मला त्या काळात झाले नाही. 'पॉप्यूलर' किंवा 'फेमस' असे नाव धारण करणा-या उपनगरातल्या एकाद्या टेलरकडे जाणे सेफ वाटत असे. या लोकांचे कामसुद्धा व्यवस्थित असायचे. सर्वांगाची मापे घेऊन झाल्यावर ती त्यांच्या वहीतल्या एका नव्या पानावर लिहीत, त्या पानावर माझे नाव, पत्ता वगैरे लिहिले जात असे, आपण दिलेल्या कापडांचे कोपरे कापून ते त्या वहीतल्या पानाला आणि आपल्या रिसीटला स्टेपल केले जात असे. ट्रायलची तारीख आणि डिलिव्हरीची तारीख लिहून ते पावती देत. मुख्य म्हणजे त्या दिवशी आपले कपडे शिवून तयार असत. ट्रायल घेऊन झाल्यानंतर आवश्यक वाटल्यास थोडे फेरफार करून त्यावर आणखी एक पक्की शिलाई मारून एक दोन दिवसांनंतर ते कपडे हातात मिळत. आताचे शिंपी कपड्यांच्या ट्रायलला बोलावत नाहीत. एकदम तयार कपडेच देतात. एवढाच बदल गेल्या चाळीस वर्षांमध्ये झाला आहे.

कृत्रिम धाग्यांपासून तयार केलेल्या कापडांनी वस्त्रव्यवसायावर आक्रमण केल्यानंतर त्यात खूप मोठे बदल होत गेले. सुरुवातीच्या काळात या कापडांची आयात मुख्यतः तस्करीमधूनच होत असावी. ती कापडे मनीश मार्केट किंवा फोर्टमधल्या रस्त्यांवरच मिळत असत किंवा दारावर येणारे फिरस्ते व्यापारी क्वचित आणत असत. कोणत्याही चांगल्या कापडांच्या दुकानात ती अधिकृतपणे मिळत नसत. काही लोक मद्रास (आताचे चेन्नै) किंवा कलकत्ता (कोलकाता) इथल्या अशाच 'ग्रे मार्केट्स'मधून पाच दहा पीसेस घेऊन येत आणि ते मित्रपरिवारामध्येच हातोहात विकले जात. अत्यंत मुलायम, न चुरगळणारी, धुवायला सोपी आणि जबरदस्त टिकाऊ अशी ही सुळसुळित कापडे पाहताच मनात भरत असत. ती कापडे विकायला कदाचित परवानगी नसली तरी त्यांचे कपडे शिवून ते वापरायला कसलीच आडकाठी नव्हती. मुंबईतले सगळेच लोक असे कपडे घालून राजरोसपणे ऐटीत वावरत असत. शिंपी लोक त्या कापडाचे कपडे शिवण्यासाठी वेगळा चार्ज घेत असत. पुढे अशी कापडे भारतात तयार व्हायला लागली. शहरांमधल्या प्रमुख रस्त्यांवर ग्वालियर, (ओन्ली) विमल, रेमंड वगैरे कंपन्यांची मोठमोठी शोरूम्स उघडली गेली. तिथे एकादा शिंपी किंवा त्याचा प्रतिनिधी बसलेला असायचा, तो फक्त मापे घ्यायचा आणि विकत घेतलेल्या कापडांपासून शिवलेले शर्ट, पँट्स वगैरे कपडे काही दिवसांनी त्या दुकानातच मिळत. प्रत्यक्षात शिवणकाम करणारा शिंपी आणि ग्राहक यांच्यामधला संपर्क राहिला नाही.

मी मुंबईत रहायला आलो तेंव्हा तयार कपडे मिळणे सुरू झाले होते, तरीही आपल्या आवडीचे कापड विकत घेऊन आपल्या मापाचे कपडे शिंप्याकडून शिवून घेणेच पसंत केले जात असे. कपडेच नव्हे तर कोणतीही वस्तू,  यंत्रसामुग्रीसुद्धा आपल्याला हवी तशी मुद्दाम तयार करवून घेतली तर तिला 'टेलर मेड' असे म्हंटले जात असे. ही परिस्थिती हळू हळू बदलत गेली. कापडांमध्ये आली तशीच तयार कपड्यांमध्येही खूप विविधता येत गेली, सर्व प्रसारमाध्यमांमध्ये, विशेषतः टेलिव्हिजनवर त्यांचे जबरदस्त मार्केटिंग होऊ लागले. काही प्रसिद्ध जागतिक कंपन्यांचे कपडे घालणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले. याच्या उलट रस्त्यारस्त्यांवर मिळणारे रेडिमेड कपडे खूप स्वस्तात मिळायला लागले. त्यात घासाघीस करून ते विकत घेण्यात बरेच लोकांना मजा वाटू लागली.

ड्रेस डिझाइनिंग या नावाने एक नवे क्षेत्र निर्माण झाले, ते कौशल्य शिकवणा-या मोठमोठ्या संस्था उभ्या राहिल्या आणि समाजाच्या सगळ्या वर्गांमधली मंडळी त्यात सामील झाली. यातले काही लोक तयार कपडे करण्याच्या उद्योगधंद्यात शिरले तर काही लोकांनी धनाढ्य उच्च वर्गासाठी बुटिक्स वगैरे उघडली. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली, पती आणि पत्नी या दोघांनीही नोकरी व्यवसाय करायला सुरू केल्यानंतर ते आणखी वाढले आणि त्यांना मिळणारा रिकामा वेळ व्यस्त प्रमाणात कमी होत गेला. त्यांचा कल तयार कपडे विकत घेण्याकडे झुकत गेला. हे कपडेसुद्धा कोणी तरी शिवत असणारच. पण ते फॅक्टरींमधून मास प्रॉडक्शनने तयार होत असल्यामुळे त्यातली निरनिराळी कामे निरनिराळ्या लोकांकडून होत असतात. ती ठराविक कामे यंत्रवत करणारे 'कामगार' असतात, त्यांना 'शिंपी' म्हणता येणार नाही.

या सगळ्यांचा परिणाम शिंप्यांच्या व्यवसायावर होत गेला. पूर्वी शहरातल्या हमरस्त्यावरच्या मोक्याच्या जागी शिंप्यांची दुकाने दिसत असत. काही शिंपी आपल्या दुकानात निवडक कापडेही विक्रीसाठी ठेवत असत. आजकाल ती दुकाने दिसेनाशी झाली आहेत. तयार कपड्यांच्या किंवा इतर कसल्याशा दुकानाच्या बाहेर एक सुइंग मशीन ठेऊन किरकोळ कामे करणारे काही कारागीर दिसतात, ते बहुधा आल्टरेशन्स करून देतात. पण नवे कपडे बरोबर बेतून ते व्यवस्थित शिवून देण्यासाठी लागणारे कौशल्य आणि अनुभव त्यांच्याकडे असेल असे वाटत नाही. त्यामुळे महागड्या नव्या कापडाची नासाडी होण्याचा धोका कोणी पत्करत नाही. वाशीसारख्या जागीसुद्धा विश्वसनीय शिंप्याचे चांगले दुकान शोधण्यासाठी गल्लीबोळातून फिरावे लागते. शिंपी या व्यावसायिक संकल्पनेचाच हळूहळू -हास होत चालला आहे असे वाटते. कपडे ही मूलभूत गरज असल्यामुळे शिंप्यांची गरज नेहमीच भासत राहील, पण फक्त तेच काम करणारा समाजातला वेगळा वर्ग बहुधा शिल्लक राहणार नाही आणि राहिला तरी त्याचा पूर्वीसारखा दिमाख असणार नाही असे मला तरी वाटते.

.  . . . . . . . . .  . . . . . . . . . .  (क्रमशः)

No comments: