Saturday, June 14, 2014

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग ५)

एकदा अमेरिकेची वारी करून परत आल्यानंतर त्या आजीआजोबांना पुन्हा अमेरिकेला जायचा योग त्यानंतर जुळून आलाच नाही. त्यांच्या नातवाच्या जन्माच्या वेळेस नेमका कडक हिवाळा होता आणि त्यानंतर आलेल्या उन्हाळ्यात भारतातल्या जवळच्या आप्ताच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांना त्यातली महत्वाची आणि जबाबदारीची कामगिरी सोपवली गेली होती. त्यानंतरच्या वर्षी त्यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे परदेशी जाता आले नाही. पुढल्या वर्षी त्यांच्या मुलालाच भारतात यायचे होते, म्हणून ते गेले नाहीत. पण मुलालाही इकडे येणे जमलेच नाही. त्याला कधी शहर तर कधी घर बदलायचे होते, कधी मुलांच्या शाळेच्या अॅड्मिशन घ्यायच्या होत्या, कधी वर्कपरमिटचे काम करून घ्यायचे होते, तर कधी ऑफिसमधून सुटी मिळू शकत नव्हती. अशा निरनिराळ्या कारणाने त्यांना दोन वर्षे येता आले नाही. अखेर सगळे प्रॉब्लेम सुटून त्यांचे येण्याचे नक्की ठरले आणि तिकीटे काढली गेली.

आजीआजोबांनी आपल्या मुलाच्या आणि नातवंडांच्या आगमनाच्या तारखेवर कॅलेंडरमध्ये ठळक अक्षरात खूण करून ठेवली आणि उरलेले दिवस मोजायला सुरुवात केली. आता ते त्यांच्या आगमनाच्या तयारीला लागले. घराची डागडुजी करून भिंतींना नवे रंग लावून घेतले. ते काम करून घेतांना बरीचशी जुनी अडगळ काढून टाकून मुलांच्या सामानासाठी जागा केली. त्यांच्यासाठी एक बेडरूम रिकामी करून ठेवली. तिथल्या कपाटांमधले सामान दुसरीकडे हलवले. त्या बेडरूमला एअर कंडीशनर बसवून घेतला. पहिल्या रेफ्रिजरेटरच्या दुप्पट आकाराचा मोठा रेफ्रिजरेटर घरात आणला, घरातल्या टीव्हीवर जगातले सगळे चॅनेल्स पाहण्याची व्यवस्था केली. काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे वगैरे सुक्या मेव्याची पाकिटे आणून ठेवली. बेसनाचे लाडू, नारळाच्या वड्या, खमंग चकल्या, आळूवड्या वगैरे मुलाच्या आवडीचे पदार्थ तयार करून डब्यात भरून ठेवले. नातवंडांसाठी बाजारात मिळतील तेवढ्या प्रकारची चॉकलेट्स, बिस्किटे, कुकीज वगैरे आणून ठेवली. त्यांच्यासाठी छान छान खेळणी आणि कपडे आणले. त्या काळात आजीआजोबांच्या मनाला दुसरा कुठला विचारच शिवत नव्हता.

नातवंडांच्या आगमनाचा दिवस उजाडण्याच्या आधीपासूनच आजीआजोबांनी त्यांच्या विमानाचे स्टेटस इंटरनेटवर पहायला सुरुवात केली. तिकडून निघतांना मुलाने फोन केला होताच, त्यांचे विमान मुंबईच्या विमानतळावर पोचल्याचे इंटरनेटवर पाहताच आजीआजोबांनी सुस्कारा टाकला. पाठोपाठ त्यांच्या मुलाचा पोचल्याचा फोनही आलाच. आता बाल्कनीत उभे राहून दोघेही टॅक्सीच्या येण्याची वाट पहायला लागले. गेटपाशी एक टॅक्सी आलेली दिसताच त्यातून कोण कोण उतरत आहे हे पाहिले. आजींनी आत जाऊन आरतीचे तबक तयार करून आणले. तोपर्यंत सगळेजण दारापर्यंत येऊन पोचलेच होते. आधी तर नातवंडांनी दुडूदुडू धावत पुढे येऊन दरवाजा ठोठावला, पण तो उघडल्यावर मात्र मागे सरून ते त्यांच्या आईवडिलांच्या मागे दडून उभे राहिले. भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकल्यानंतर आणि औक्षण करून झाल्यावर सर्वांनी घरात प्रवेश केला.

नातवंडे आधी थोडी बिचकत होती, पण थोड्याच वेळात नव्या जागेत रुळली. घरभर हिंडून इकडच्या वस्तू तिकडे करू लागली, त्यांची उलथापालथ करू लागली. शोकेसमधल्या शोभेच्या वस्तू बाहेर काढून त्यांच्याशी खेळू लागली. ते करत असतांना त्यांच्या चेहे-यावर ओसंडून वाहणारा आनंद निव्वळ अपूर्व होता. हर्षोल्लासातून आणि एका प्रकारच्या विजयोन्मादातून त्यांनी काढलेले चित्कार खूप गोड वाटत होते. हेच पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आजीआजोबांनी किती वर्षे अधीरतेने वाट पाहिली होती. त्याचे सार्थक झाले होते. आधी तर आजीआजोबांना त्यांच्या उत्साहाचे आणि अॅक्टिव्हपणाचे अमाप कौतुक वाटले, पण ते पाहून त्या मुलांना अधिकच चेव चढला. त्यांचा धागडधिंगा जरा अतीच होऊ लागल्यावर त्याला आळा घालणे आवश्यक होते. मोठी मुलगी जरासे दटावल्यावर थांबली, पण लहानगा तर काहीही समजून घेण्याच्या वयाचा नव्हताच. त्यामुळे कोणतीही नाजुक किंवा धोकादायक वस्तू त्याच्या हाताला लागू न देणे एवढाच उपाय होता. अशा सगळ्या वस्तू भराभर उचलून उंचावर किंवा कडीकुलुपात बंद करून ठेवाव्या लागल्या. तरीही काही वस्तूंची मोडतोड झालीच. शिवाय उचलून ठेवलेल्या वस्तूच हव्या म्हणून थोडी रडारडही झाली.

मुलांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्यांना टेलिव्हिजन लावून दिला. अर्थातच त्यांच्या आवडीची कार्टून्स दाखवणारी चॅनेल्स पाहण्याचा हट्ट त्यांनी धरला. रिमोट कंट्रोलने ते चॅनेल्स लावणे समजायला त्यांना काहीच वेळ लागला नाही. त्यानंतर दिवसाचा बहुतेक वेळ घरातल्या एकमेव टीव्हीवर पोगो, निक, सीबीबी, डिस्ने ज्युनियर वगैरे किड्स चॅनेल्सच लागलेले असत. कोणीच ते लक्ष देऊन पहात नसले तरी बॅकग्राऊंडवर ते चालत असणे आवश्यक बनले. माई, नाना, आईआजी, भाबो वगैरे आजीआजोबांच्या रोजच्या पाहण्यातली मंडळी आता त्यांना भेटेनाशी झाली. टीव्हीवर ताबा मिळवल्यानंतर मुलांनी घरातल्या टॅब्लेट आणि सेलफोन्सकडे मोर्चा वळवला आणि त्यावर असलेले गेम्स खेळायला लागले. आजकाल सगळ्या गोष्टी इतक्या यूजर फ्रेंडली झाल्या आहेत की अक्षरओळख नसलेली मुलेसुद्धा आयकॉन्सवर आपली चिमुकली बोटे दाबून सटासट खेळ सुरू करून खेळत बसतात किंवा मेमरीत साठवून ठेवलेली चित्रे आणि चलचित्रे पहात बसतात. त्यांचा सगळा वेळ यातच जात असल्यामुळे त्यांचे आजीआजोबांच्या शेजारी बसणे फारसे झालेच नाही.

खास मुलांसाठी तयार केलेल्या पाचक आणि पौष्टिक द्रव्यांच्या पिठांचे खूपसे डबे त्यांच्या आईने अमेरिकेतून येतांना आणले होते. दिवसातल्या ठराविक वेळी त्यातल्या ठराविक पॉवडरचे १-२ चमचे उकळलेल्या पाण्यात किंवा दुधात मिसळून ती त्यांना खायला किंवा प्यायला देत होती. डाळ, तांदूळ वगैरे शिजवून आणि गाजर, टोमॅटो, दुधी वगैरेंना वाफवून ते पदार्थही घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे त्यांना खायला घालत होती. भारतातले अरबट चरबट काही खाऊन त्यांची पोटे बिघडू नयेत किंवा त्यांना कसल्याही संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जात होती. आपल्या नातवंडांसाठी मुगाच्या डाळीची ऊनऊन खिचडी किंवा शेवयाची खीर करून त्यांना आपल्या हाताने भरवावी असे आजीच्या मनात आले तरी ते प्रत्यक्षात आणायला वावच नव्हता. 

अमेरिकेत असतांना दोन्ही मुलांच्या कानावर कधी एकाददुसरा मराठी शब्द पडला असला तर असेल, त्याचा अर्थ थोडासा समजलाही असेल, पण त्यांच्या बोलण्यात तो येत नव्हता. मोठी मुलगी इंग्रजीत काही सोपी वाक्ये बोलायची. पण तिच्या अमेरिकन अॅक्सेंटमुळे तिचे बोलणे समजून घेणे आणि तिच्या भाषेत तिला समजेल असे काही सांगणे आजीआजोबांना अवघड जात होते. लहान मुलाचे इंग्रजीतले बोबडे बोल कळणे तर अशक्यप्रायच होते. त्यामुळे आजीआजोबांना त्यांच्या नातवंडांशी संवाद साधता येत नव्हता. त्यांना मांडीवर बसवून काऊचिऊच्या गोष्टी सांगणे दूरच, सिंड्रेला किंवा स्नोव्हइटची गोष्ट सांगणेसुद्धा अशक्य होते.    

अमेरिकेतून आलेल्या मंडळींचा भारतातला कार्यक्रम चांगलाच धावपळीचा होता. अमेरिकन वकीलातीत जाऊन व्हिसाचे स्टँपिंग करून घेणे अत्यावश्यक होते. त्याची पूर्वतयारी करण्यात आणि वकीलातीच्या चकरा मारण्यात काही दिवस गेले. भारतातले इतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी वगैरेंना भेटण्यात काही दिवस गेले, त्यासाठी दोन तीन वेळा परगावी जाऊन येणेही झाले. सुनेला तिच्या माहेरी काही दिवस रहाण्यासाठी आणि तिच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी केरळ कर्नाटकाची वारी करून झाली. त्या गडबडीतच भारतातली एक दोन पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे वगैरेंना भेटी देऊन झाल्या. हे करता करता अमेरिकेला परतायचा दिवसही उजाडला. यात आजीआजोबांना त्यांच्या नातवंडांसमवेत अगदी मोजके दिवसच घालवायला मिळाले. त्यातला क्षण न् क्षण सार्थकी लावण्याचा यथाशक्ती प्रयत्न त्यांनी केला.

"आता पुढल्या वर्षी तुम्ही दोघे अमेरिकेला या." आणि "आम्ही आमची पुढची ट्रिप नक्की लवकरात लवकर करू." वगैरे मुलाने घरातून निघतांना आपल्या आईवडिलांना सांगितले. नातवंडांना निरोप देतांना आजीआजोबांचे डोळे भरून आले. त्या दोघांना आता पुन्हा याच रूपात त्यांना पहायला मिळणार नव्हते. पुढच्या भेटीपर्यंत ते दोघेही किती तरी बदललेले असणार, याची जाणीव झाल्याने ते त्यांना डोळे भरून पाहून घेत होते, पण अश्रूंमुळे ते अंधुक दिसत होते.  मुले मात्र आता परत जाणार म्हणून खूष होती. आजीआजोबांच्या लहानपणी त्यांच्या आजीआजोबांना सोडून जातांना ते त्यांच्या गळ्य़ात पडून रडायचे याची त्यांना आठवण झाली, पण त्यांच्या नातवंडांनी मात्र  आनंदाने हात हलवून बाय बाय केले. त्यांची ही हंसरी छबीच लक्षात ठेवली गेली हे ही एका परीने चांगलेच झाले. नातवंडांच्या चार दिवसांच्या अत्यल्प सहवासानेसुद्धा आजीआजोबांना एक अपूर्व असा आनंद मिळवून दिलाच, पण त्यांचे येणे आणि जाणे त्यांना एकाद्या लहानशा वावटळीसारखे वाटले. त्याने सुखद गारवा आणला, पण घरट्याच्या काही काड्या किंचित विस्कटल्या. त्यांना पुन्हा जुळवून घ्यायच्या की तशाच राहू द्यायच्या हे त्यांना सुचत नव्हते.

गेल्या शतकात मध्यमवर्गीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. पूर्वीच्या काळातले लोक खेड्यापाड्यांमध्ये एकत्र कुटुंबामध्ये रहात असत. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या एकाच चाकोरीत रहात असल्यामुळे दोन पिढयांमधल्या माणसांच्या आचारविचारात फरक नसायचा. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आजीआजोबांचे स्थान कुटुंबप्रमुखाचे असायचे. नातवंडांशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध येत असल्याने त्यांच्यात अतिशय जिव्हाळ्याचे घट्ट नाते निर्माण होत असे. मधल्या पिढीतले बरेचसे लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईपुण्यासारख्या शहरात येऊन स्थायिक झाले, पण नेहमी आपल्या गावी जाऊन येत असत. त्यांच्या मुलांना अधून मधून त्यांच्या आजीआजोबांचा सहवास मिळत असे. त्या मुलांच्या मनात आजीआजोबांचे एक विशेष स्थान निर्माण होत असे, त्यांचेविषयी ओढ वाटत असे. ती मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्यातली काही आपल्या शहरातच राहिली, पण त्यांच्यात आणि त्यांच्या आईवडिलांच्यात जनरेशन गॅपमुळे थोडा दुरावा निर्माण झाला, त्यातली काही वेगळी रहायला लागली. त्यांच्या मुलांचे आजीआजोबांबरोबरचे संबंधही त्यामुळे कमकुवत होत गेले. अनेक मुले दिल्ली, बंगलोर किंवा लंडन, न्यूयॉर्क, सिडनी या सारख्या दूर दूरच्या ठिकाणी गेली. त्यांच्या मुलांची आजीआजोबांशी फारशी ओळखच होऊ शकली नाही. ती आणखीनच दुरावत गेली. विज्ञान तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आता जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या लोकांशी घरबसल्या संपर्क साधणे शक्य झाले आहे खरे, पण व्यक्तिशः गाठभेट झाली नसेल तर पडद्यावर दिसणारे गोष्टीतले आजीआजोबा आणि पडद्यावरच दिसणारे आपले खरेखुरे आजीआजोबा यात लहान बालकांना कितीसा फरक वाटणार आहे? प्रत्यक्ष भेटण्याला आणि सहवासाला पर्याय नाही हेच खरे. नाती जपून ठेवायची असल्यास त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.


 . . . . .  . . . . . . . . .  . . . . . . . . . . . . .  (समाप्त)


No comments: