Friday, June 13, 2014

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग ४)

नोकरी किंवा व्यवसायानिमित्या परदेशांमध्ये जाऊन राहिलेल्या भारतीयांना 'अनिवासी भारतीय' (एनआरआय) असे म्हणतात. ते लोक कित्येक वर्षे तिकडेच राहिले तरीही 'भारतीय'च समजले जातात. अमेरिकेत रहात असलेल्या गौरवर्णीय, कृष्णवर्णीय आणि आजकाल वाढत चाललेल्या पीतवर्णीय लोकांपेक्षा ते लोकही स्वतःला वेगळे समजतात, इतरांच्यात फारसे मिसळत नाहीत. तिथे रहात असलेल्या भारतीयांना 'देसी' म्हंटले जाते आणि त्यांच्याशी थोडे अधिक सलोख्याचे संबंध ठेवले जातात.

एकाद्या कुटुंबातला मुलगा ज्या वेळी परदेशी जायला निघतो तेंव्हा ते सगळे कुटुंबच भावनाविवश होते. तिकडे गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्या मुलालाही मायभूमीची आणि तिथे रहात असलेल्या आपल्या आईवडिलांची, भावंडांची, मित्रांची आणि इतर आप्तांची सारखी आठवण येत असते. इकडे येऊन सर्वांना भेटायची आणि त्यांच्याशी भरभरून बोलायची तीव्र इच्छा त्याला होत असते. मिळेल ती संधी साधून तो वारंवार इकडे येऊन जातही असतो. कालांतराने हळूहळू त्याचे मन तिकडे रमायला लागते, एकेक दोन दोन वर्षे करत त्याचा तिकडचा मुक्काम लांबत जातो, त्याच्या कामाचा आणि संसाराचा व्याप वाढत जातो, तसतसा तो त्यात अधिकाधिक गुंतत जातो, तिकडचाच होत जातो, मग त्याचे भारतात येणे कमी होत जाते. काही मुलांचे भाऊबहीण, मित्र मैत्रिणी वगैरे आधीच परदेशात गेलेले असतात, पुढल्या काळात आणखी काहीजण परदेशगमन करतात आणि त्यांची संख्या वाढत जाते, त्याबरोबर त्या मुलांना वाटणारे भारतात येण्याचे आकर्षणही कमी होत जाते.

एकाद्या मुलाला काही वर्षांनी तिकडचे नागरिकत्व मिळाले तर तो त्याच्या आईवडिलांनाही कायमचे तिकडे घेऊन जाऊ शकतो. काही आईवडील यासाठी आनंदाने एका पायावर तयार होतात आणि संधी मिळताच इकडचा गाशा गुंडाळून मुलाकडे परदेशात रहायला चालले जातात. आपले उर्वरित आयुष्य पृथ्वीवरील नंदनवनात घालवून एक दिवस तिकडूनच स्वर्गलोकाला प्रयाण करतात. काही मुलांच्या आईवडिलांना त्यांच्या उतारवयात आर्थिक, शारीरिक, मानसिक वगैर सगळ्याच प्रकारच्या आधारांची अत्यंत गरज असते. आपला देश सोडून कायमचे परमुलुखात रहायला जाणे त्यांच्या मनाला पटत नसले तरी निरुपाय म्हणून तेही अनिच्छेने परदेशी जातात.

परदेशात रहायला जाईपर्यंत यातले बहुतेक लोक आजीआजोबा झालेले असतातच. त्यांना आपल्या मुलाच्या संगतीत आणि त्याच्या आधारावर राहण्याइतकेच नातवंडांच्या प्रेमळ सहवासाचे महत्व वाटत असते. पण त्यांची ही अपेक्षा पूर्ण होत असेल का? पाश्चात्य देशांमधल्या अनेक लोकांचे कौटुंबिक जीवन आज मोठ्या प्रमाणात उध्वस्त झालेले आहे. तिकडली कित्येक मुले सज्ञान होईपर्यंत त्यांचे आई आणि वडील एकमेकांपासून फारकत घेऊन वेगळ्याच जोडीदारांमसवेत किंवा एकट्याने निरनिराळ्या ठिकाणी रहात असतात. त्यातली काही मुले त्यांच्या आईसोबत, काही वडिलांबरोबर आणि काही आणखी कोणाच्या आधाराने रहात असतात. काही मुले अनाथ किंवा अनौरस असतात, ती सामाजिक सेवाभावी संस्थांच्या ताब्यात असतात. अशा प्रकारे यातल्या ज्या मुलांचा आपल्या सख्ख्या आईवडिलांशी संपर्क राहिलेला नसेल त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटत असेल? आणि आजीआजोबा म्हणजे आईवडिलांच्या आईवडिलांबद्दल त्यांच्या मनात कितपत आदर किंवा प्रेमभावना वाटत असेल? त्यांना त्यांच्याबद्दल कितीशी माहिती असेल? आणि अशा मुलांच्या सहवासात वाढलेल्या 'देसी' नातवंडांवर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडत असेलच ना? कदाचित असेही असू शकेल की इतर कोणाकडेही नसलेले 'ग्रँपा' आणि 'ग्रॅनी' आपल्याकडे असल्यामुळे आपण कोणी स्पेशल असल्याचा त्या मुलांना अभिमान वाटत असेल.  

मुलांकडे परदेशात कायमचे रहायला गेलेल्या आजीआजोबांची संख्या किंवा टक्केवारी सध्या तरी नगण्य म्हणण्याइतकी अगदी कमी आहे. अमेरिकेतल्या समाजातल्या लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले असले तरी तिथले वृध्द क्वचितच त्यांच्या मुलाबाळांसोबत राहतात. ते स्वतंत्रपणे किंवा ओल्डएजहोम्समध्ये रहात असतात. त्यामुळे तिकडे स्थायिक झालेल्या सगळ्या भारतीयांनाही आपल्या आईवडिलांना आपल्याबरोबर रहायला आणावे असे वाटेलच असे नाही. अनेक लोक तसा प्रयत्न करतही नसतील. त्याचप्रमाणे भारतात संपूर्ण आयुष्य घालवल्यानंतर अखेरीस वेगळ्या देशातल्या वेगळ्या वातावरणात जायलाही बहुतेक लोक तयार होत नाहीत. काही जणांचा एकादा मुलगा किंवा मुलगी भारतातच असतात. त्यांना त्यांचा आधार असतो. काही लोक उतारवयातसुद्धा स्वतंत्रपणे मजेत राहू शकण्याइतके धट्टेकट्टे असतात, काही लोकांनी इतर काही व्यवस्था केलेली असते. काही लोक "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान" किंवा "तुका म्हणे स्वस्थ रहावे, जे जे होईल ते ते पहावे" असे म्हणत काळ कंठत असतात.

चौथ्या आणि अखेरच्या उदाहरणातले आजीआजोबा भारतातच राहतात, पण त्यांची दोन्ही मुले परदेशात गेली आहेत. त्या दोघांचाही प्रेमविवाह झाला आहे. मुलीने बंगाली बाबू मोशाय निवडला आहे, तर मुलाची पत्नी मल्याळीभाषी केरळकन्या आहे. मुलगी आणि जावई दोघेही शास्त्रीय संशोधन करतात. आपापल्या क्षेत्रात जगात इतरत्र कोणकोणते संशोधन चालले आहे याचा अभ्यास करणे, स्वतःच्या संशोधनावर शोधनिबंध लिहिणे, त्यांना शास्त्रविषयक नियतकालिकांमध्ये (सायंटिफिक जर्नल्स) प्रसिद्ध करणे, त्यांचे पेटंट्स मिळवणे, अधिकाधिक सेमिनार्स, कॉन्फरन्सेस वगैरेंमध्ये जाऊन त्यात सहभाग घेणे हेच त्यांचे जीवन आहे. भरपूर नावलौकिक आणि पैसे कमवावेत आणि आपले राहणीमान शक्य तितक्या उच्च दर्जाचे ठेवावे असे त्यांना वाटते. मुलांना जन्म देणे, त्यांचे संगोपन करणे यामुळे त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी 'डिंक (डबल इनकम नो किड्स) कपल' राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आजीआजोबांच्या मुलाच्या वंशवेलीवर दोन फुले उमलली आहेत. अमेरिकेत जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला आपोआप तिथले नागरिकत्व मिळते असा तिकडचा नियम आहे. कदाचित अन्य देशात आणि भारतातसुद्धा असे नियम असले तरी मला त्याची माहिती नाही. थोड्या काळासाठी अमेरिकेत गेलेले लोक सुद्धा आपल्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे म्हणून त्यांनी तिथेच जन्माला यावे असा आग्रह धरतात. आपल्या या गोष्टीतल्या आजीआजोबांच्या पहिल्या नातवंडाच्या जन्माच्या वेळी त्यांना स्वतः तिकडे जाण्याची खूप इच्छा होती. त्यात पहिल्या नातवंडाला जन्मल्याबरोबर पाहणे तर होतेच, अशा नाजुक वेळी आपण आपल्या मुलासोबत असलेच पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटत होते. अमेरिकेच्या व्हिसासाठी दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या मते अत्यंत सबळ असलेले हे कारण त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. पण तो घेणा-या अमेरिकन अधिका-याला मात्र ते पटले नाही. "आमच्या देशातली वैद्यकीय व्यवस्था सर्वोत्कृष्ट आहे, बाळबाळंतिणींची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी ती समर्थ असल्यामुळे असल्या सबबीवर बाहेरून कोणाला तिकडे येण्याची गरज नाही." असा शेरा मारून त्यांचा अर्ज फेटाळला गेला.

त्यांना व्हिसासाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एक वर्षानंतर मिळाली या वेळी मात्र "तुमच्या सुंदर देशातली अद्भूत स्थळे आणि तिथली अद्ययावत शहरे वगैरेंची शोभा पाहण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी आम्हाला तिकडे जायचे आहे." असे सांगितल्यावर त्यांना दहा वर्षांसाठी व्हिसा मिळाला, पण एका भेटीमध्ये फक्त सहा महिनेच राहण्याची परवानगी होती. त्यांनीही तिकडे सहा महिने राहण्याचा बेत आखला. मुलाकडे जाऊन पोचल्यानंतर नातीचे कौतुक, मुलाशी बोलणे आणि तिकडची घरे, घरातल्या विविध सोयी, उद्याने, रस्ते, इमारती, बाजार वगैरे पाहून थक्क होण्यात पहिले दोन आठवडे अगदी स्वर्गसुखात गेले. त्यानंतर नव्याची नवलाई ओसरू लागली आणि महिना दीड महिना संपेपर्यंत थोडा कंटाळा यायला सुरुवात झाली. हवेतला गारवा वाढू लागला आणि घराबाहेर पडणे कठीण होऊ लागले. चोवीस तास घरात बसून राहण्याची स्थानबद्धता जाचक वाटू लागली. आणखी महिनाभर मुलाकडे राहून झाल्यावर मुलीला भेटायला आणि थोडे दिवस तिच्याकडे रहायला गेले. पण ते दोघे तर आपापल्या विश्वात इतके मग्न झालेले असायचे की रोज त्यांची भेट घडणेसुद्धा दुरापास्त होत असे. यामुळे आजीआजोबांना जास्तच एकाकीपणा यायला लागला. वाढत जाणारी कडाक्याची थंडी सहन होत नसल्यामुळे दमाखोकला वगैरेंनी उचल खाल्ली, वारंवार अंग मोडून येऊन ठणकायला लागले. या शारीरिक यातना सहन करणे कठीण होत गेल्यामुळे आजीआजोबांनी आपला दौरा आवरता घेतला आणि तीन महिन्यांनंतरच ते मायदेशी परतले. यानंतर पुन्हा कधी अमेरिकेला जायचे असल्यास उन्हाळ्यातच असे त्यांनी ठरवले.

.  . . . . . .  . . . . . . . . . . . . . .. . . . . . . .  . . . ..  (क्रमशः)

No comments: