Tuesday, June 03, 2014

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग ३)

आजकालच्या अनेक आजीआजोबांची मुले गेली बरीच वर्षे परदेशात रहात आहेत किंवा तिकडेच स्थायिक झाली आहेत. अशा आजीआजोबांची नातवंडे तिकडेच लहानाची मोठी होत असतात. इथे राहणा-या आजीआजोबांना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घरबसल्या इंटरनेटवर पहायला मिळतात, त्यांचया बोबड्या बोलांचे किंवा चिवचिवाटाचे आवाज कानावर पडतात, पण हे म्हणजे ग्लासभर मलईदार दुधाच्या जागी चमचाभर पातळ पुचुक ताक पिण्यासारखे झाले. त्याने तहान भागत तर नाहीच, उलट ती जास्तच वाढते. परदेशात आपल्या मुलांकडे जाऊन त्यांना भेटायचे झाल्यास पासपोर्ट, व्हिसा वगैरे काढून घ्यावे लागतात. बहुतेक लोक एवढे काम उत्साहाने करतात. कधी कधी त्यातच काही अडचणी आल्या तर मग मात्र परदेशी जाणे अशक्य होते.

ही पूर्वतयारी करून ठेवल्यावरसुद्धा विमानाच्या तिकीटांची व्यवस्था करणे हे एक मोठे काम असते. परदेशी जाऊन येण्याच्या तिकीटांच्या किंमती डॉलर, पौंड स्टर्लिंग किंवा युरो या चलनांमध्ये सुद्धा हजारांच्या घरात असतात, रुपयांमध्ये त्या लाखांमध्ये होतात. आजीआजोबांनी त्यांच्या आयुष्यात रुपयांमध्ये कमाई करून त्यातून टाकलेल्या शिल्लकीचा विचार करता तिकिटांच्या किंमती फार जास्त वाटतात. परदेशात राहणा-या मुलांच्या कमाईच्या तुलनेतसुद्धा त्या अगदीच क्षुल्लक नसतात. शिवाय त्यांच्या घरातल्या सर्वांना ऑफीस आणि शाळांमधून एकाच वेळी सुटी मिळणेही कठीण असते. याचे आधीपासून नियोजन करता आले नाही तर आयत्या वेळी काढलेल्या तिकीटांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. यापेक्षा आईवडिलांची विमानाची तिकीटे चार पाच महिने आधी काढून ठेवली तर ती किफायतशीर भावात मिळतात आणि त्यांच्याकडे पाठवून त्यांना तिकडे बोलावून घेणे जास्त सोयिस्कर वाटते.

ज्या आजीआजोबांनी आयुष्यात कधीच परदेशगमन केले नसते त्यांनीही तिकडच्या सुबत्तेबद्दल खूप वर्णने वाचलेली आणि ऐकलेली असतात. तिकडे एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन ते सगळे पाहून येण्याबद्दल त्यांच्या मनात खूप उत्सुकता असते. "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" या गोष्टीमधल्या म्हातारीप्रमाणे ते लोकसुद्धा "लेकाकडे जाईन, छान छान खाईन, लठ्ठ होऊन येईन." असे मोठ्या उत्साहाने स्वतःला आणि परिचितांना सांगत असतात. तिकडे जाऊन पोचल्यानंतर तिथल्या विमानतळापासूनच तिकडची शहरे, रस्ते, त्यावरून धावणारी वाहने, रस्त्याच्या बाजूला दिसणारी सुबक घरे वगैरे पाहून प्रथम दर्शनी ते थक्क होतात. पण तिथे रहायला लागल्यानंतर हळूहळू त्यांचा प्रभाव कमी कमी होत जातो.

पुढे दिलेल्या तिस-या उदाहरणातल्या आजीआजोबांनी असेच अमेरिकेकडे प्रयाण केले आणि ते आपल्या मुलाच्या गावी जाऊन पोचले. त्यांचा मुलगा आणि सून यांनी विमानतळावर त्यांचे खूप प्रेमाने स्वागत करून त्यांना घरी नेले. आपल्या नातवंडांना जवळ घेऊन कुरवाळण्यासाठी, त्याच्या गोब-या गालांचे पापे घेण्यासाठी, त्यांच्या रेशमासारख्या मऊ केसांमधून बोटे फिरवण्यासाठी आजीआजोबा जास्त आसुसलेले होते, पण ती लहान बालके मात्र बिचकल्यामुळे त्यांच्यापासून जरा दूरदूरच रहात होती. त्यांच्या अंगाला हात लावू देत नव्हती. तो सगळा दिवस त्यांच्याशी ओळख करून घेण्यात गेला. खूप प्रयत्नांनंतर आणि वेगवेगळे छान छान खाऊ दिल्यानंतर अखेरीस ती दोघे त्या आजीआजोबांना 'बिग् हग्' द्यायला एकदाची तयार झाली.

दुसरे दिवशी सकाळी त्या आजीआजोबांचा मुलगा आणि सून आपापल्या गाड्यांमध्ये बसून आपापल्या ऑफिसांना चालले गेले. त्यांनी जाता जाता मोठ्या मुलाला त्याच्या शाळेत आणि धाकटीला तिच्या शिशुसंगोपनगृहात नेऊन सोडण्याची व्यवस्था केली. भारतातून आलेल्या आजीआजोबांना तिथली कसलीच माहिती नसल्याने ते यात काहीच करू शकत नव्हते. मुलांसोबत जाऊन त्या जागा एकदा पाहून ठेवायच्या म्हंटले तरी त्यांना घरी परत आणून सोडावे लागले असते, त्यात सकाळच्या गडबडघाईतला अमूल्य वेळ गेला असता. आपल्यापाशी मोटार असल्याशिवाय आणि ती चालवता येत असल्याशिवाय कुठेही जाणे येणे तिकडे शक्य नसते. यामुळे नंतरही मुलांना शाळेत पोचवण्याचे किंवा त्यांना घरी घेऊन येण्याचे काम ते करू शकणार नव्हते. या कारणाने नातवंडांच्या परत येण्याची वाट पहात ते घरी बसले. तिथल्या स्वयंपाकघरातली बरीचशी साधने त्यांच्या ओळखीची नव्हती. ती कशी चालवायची याची पुरेशी माहिती नव्हती. तिकडच्या टीव्ही चॅनेलवरचे कार्यक्रम समजत नसल्यामुळे त्यात मन रमत नव्हते. घराजवळच्या रस्त्यांवर सुसाट वेगाने धावणा-या मोटारीच दिसत होत्या. काही ठिकाणी तर फूटपाथच दिसत नव्हते आणि त्यावर पायी चालणारे लोकच दिसत नव्हते. अशा त्या अनोळखी प्रदेशातल्या घराबाहेर पडण्याचे त्यांचे धाडस झाले नाही. त्यामुळे ते एकमेकांकडे आणि घराच्या भिंती आणि छताकडे पहात बसले.

दुसरा, तिसरा, चौथा वगैरे दिवसही असेच गेले. या काळात हळू हळू नातवंडांशी घसट किंचितशी वाढत गेली, त्याचबरोबर तिकडची जीवन रहाणी समजत गेली. त्या आजीआजोबांचा मुलगा आणि सून रोज सकाळी कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, फ्रूट ज्यूस वगैरेचा नाश्ता करून ऑफिसला जात आणि त्यांचे दुपारचे जेवण तिथेच करीत असत. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली फूड पॅकेट्स बाहेर काढून ओव्हनमध्ये तापवली की त्यातून बरेच वेळा रात्रीचे वेळचे जेवण होत असे. रुचिपालट म्हणून कधी ते लोक घरी येतांना पिझ्झा, बर्गर वगैरे तयार पदार्थ घेऊन येत. आजीआजोबांसाठी ते एकाद्या इंडियन टेकअवे मधून काश्मिरी पुलाव, आलू पराठा, रवा मसाला डोसा वगैरे घेऊन आले. लहान मुलांसाठी पचायला सुलभ आणि पौष्टिक पदार्थांची वेगळी पॅकेट्स असायची. ती गरम पाण्यात किंवा दुधात मिसळली की त्यांचे अन्न तयार होत असे. स्वयंपाकघरात तवा, परात, पोळपाट लाटणे, कढई, पळी वगैरे वस्तू होत्या, पण त्यांचा रोज वापर होत नसे. हौस म्हणून कधी एकादा वेगळा खाद्यपदार्थ करावासा वाटला किंवा एकाद्या नव्या रेसिपीवर प्रयोग करून पहायचा असला तर तेवढ्यासाठी त्या वस्तू बाहेर काढल्या जात असत. भारतातून येतांना आणलेल्या प्रेशर कुकरचा व्हॉल्व्ह उडला होता तो तिथे बदलून मिळत नव्हता आणि प्रेशर पॅनची शिट्टी हरवली होती, ती ही मिळत नव्हती. त्यामुळे या वस्तूंचा उपयोग होत नव्हता.

शनिवार रविवारी घरातले सगळेजण मोटारीतून शहराच्या आजूबाजूच्या भागात फिरून आले, आजीआजोबांना तिथली खास सौंदर्यस्थळे दाखवली गेली, मुलेही औटिंगमुळे खूष झाली. मौजमजा करून घरी परत येतांना त्यांनी  मॉल्समधून आठवडाभराचे सामान आणले. त्यात मुख्यतः.अनेक प्रकारची फूड पॅकेट्स होती. घरातल्या अवाढव्य आकाराच्या रेफ्रिजरेटरमध्ये ती रचून ठेवली गेली. पुढल्या आठवड्यातल्या रोजच्या आहारासाठी त्यांचा उपयोग करायचा होता. साधेच पण ताजे शिजवलेले अन्न रोजच्या जेवणात खायची सवय असलेल्या आजीआजोबांच्या तिकडचे अशा प्रकारचे भोजन पचनी पडले नाही. आता आपणच रोज ताजे अन्न शिजवून सर्वांना खाऊ घालायचे असे त्यांनी ठरवले. पटेल, शहा किंवा मेहबूब अली अशा कुणाकुणाच्या 'देसी' स्टोअर्समधून डाळ, तांदूळ, रवा, बेसन वगैरे पदार्थ आणले. गहू किंवा जोंधळे विकत आणून ते चक्कीमधून दळून आणणे तिकडे कल्पनेच्या पलीकडले होते. जी कोणती तयार पिठे बाजारात मिळाली ती आणून त्यांचेवर प्रयोग करायचे ठरवले. स्वयंपाकघरातली आधुनिक साधने वापरणे आजीआजोबांनी शिकून घेतले आणि ते त्यावर स्वयंपाकाचे प्रयोग करायला लागले.

स्वयंपाकाचा जन्मभराचा अनुभव असल्यामुळे नव्या ठिकाणी मिळतील ती उपकरणे वापरून वरणभात, पोळीभाजी वगैरे जेवण तर ठीकठाक तयार झाले, पण ते करतांना ढीगभर खरकटी भांडी साचली. ती कुणी घासायची? तिकडे अमेरिकेत केरवारा, धुणीभांडी वगैरे घरकामे करायला कामवाली (गंगू)बाई येत नसते. ती सगळी कामे ज्याने त्याने स्वतःच करावी लागतात. त्यासाठी यांत्रिक मदत उपलब्ध असली तरी ती सगळी यंत्रे चालवण्यासाठी माणसांची गरज असतेच. त्यासाठी थोडे श्रम करावे लागतात, बराच वेळ द्यावा लागतो. रिकामटेकड्या आजीआजोबांनी आता ही कामे आपल्याकडे घेतली किंवा त्यांना ती घ्यावी लागली.

ऊन ऊन तूप मेतकूट मऊ भात, साजुक तुपातला बदामाचा शिरा, बेदाणे घातलेले बेसनाचे लाडू वगैरेसारखे खास पदार्थ करून ते आपल्या नातवंडांना आपल्या हातांनी भरवायचे असे आजींचे एक स्वप्न होते. पण त्या मुलांना त्यात फारसा इंटरेस्ट दिसला नाही. त्यांच्या कानावर थोडे मराठी शब्द अधून मधून पडत असल्याने कदाचित त्यांना ते कळत असावेत, पण त्यांना शाळेत आणि समाजात वावरतांना सोपे जावे म्हणून त्यांचे आईवडील त्यांच्याशी शक्य तोंवर इंग्रजीमध्येच बोलत असत. यामुळे नातवंडेही त्याच भाषेत मोडके तोडके बोलायचे प्रयत्न करत. त्यांच्या बोलण्यात फारसे मराठी शब्द कधी येतच नव्हते. नातवंडांच्या इंग्रजी भाषेतल्या बोबड्या बोलांचा अर्थ लावणे आजीआजोबांना जमत नव्हते आणि त्यांचे बोलणे त्या मुलांना कितपत समजत आहे याचा त्यांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे काही दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा त्यांच्यात संवाद असा साधला जातच नव्हता. हावभाव आणि खाणाखुणांमधूनच थोडेसे बोलणे होत होते तेवढेच. शाळेतून घरी आल्यानंतर बहुतेक सगळा वेळ ते त्यांच्या आईवडिलांच्या आसपासच घुटमळत असत किंवा टीव्हीवर कारटून पहात बसत. त्यांच्या इवल्याशा जगात आजीआजोबांना शिरकाव मिळत नव्हता, किंवा तसे त्यांना जाणवत नव्हते.

काही दिवस, आठवडे, महिने गेल्यानंतर त्यांची भारतात परत येण्यासाठी निघायची तारीख जवळ आली. पण त्याआधीच ते तिथल्या राहण्याला कंटाळले होते. दिवसभर घरी बसून राहणे म्हणजे त्यांना स्थानबद्ध झाल्यासारखे वाटायला लागले होते. टेलिफोन, टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरे माध्यमांमधून बाहेरच्या जगाशी थोडासा संपर्क करू शकत होते, पण त्यांना मात्र इतर माणसांना प्रत्य़क्ष भेटणे आणि बोलणे हवे असायचे, ते फारच कमी झाले होते. त्यांची मुले आणि नातवंडे दिवसभरातला बहुतेक वेळ घराबाहेरच असल्यामुळे त्यांचा सहवासही म्हणावा तितका मिळत नव्हता. भारतात असतांना करावे न लागणारे कंटाळवाणे घरकाम तिथे करावे लागत होते. शिवाय त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार होती. तिकडे जातांना त्यांनी आरोग्यविमा उतरवला असला तरी त्या विम्याच्या कलमांनुसार आधीपासून असलेल्या आजारांवर तिकडच्या डॉक्टर्सकडून उपचार होणार नव्हते. त्यावरील सगळी औषधे त्यांनी भारतातून जातांना त्यांच्यासोबत नेली असली तरी काही कारणाने आधीच्या व्याधी बळावल्या तर त्यावर तिथल्या रुग्णालयांमध्ये उपचार करून घेणे परवडण्यासारखे नव्हते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या उतारवयातल्या व्याधी त्यांनाही जडलेल्या होत्या आणि त्यांच्यामुळे इतर कुठली दुखणी कधी उद्भवतील किंवा डॉक्टर तसे म्हणतील ते सांगता येणार नाही. अशा कारणांमुळे ते आपले जीव मुठीत धरून आणि स्वतःला जरा जास्तच जपत एका अनामिक भीतीच्या छायेत जगत होते.  

कांही महिन्यांपूर्वी जेवढ्या प्रचंड उत्साहाने ते परदेशी जायला निघाले होते तो संपून गेला होता. यामुळे आता स्वदेशात परत जाण्याची वाट पहात ते दिवस मोजायला लागले.

.  . . . . . .  . . . . . . . . . . . . . .. . . . . . . .  . . . ..  (क्रमशः)

No comments: