Saturday, May 31, 2014

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग २)

आजच्या काही आजीआजोबांची मुले आणि नातवंडे त्यांच्याबरोबर एकाच घरात राहतात, त्यांच्या घराहून थोड्या अंतरावरील वेगळ्या घरांमध्ये किंवा जवळच्या दुस-या गावात राहणारी त्यांची मुले आणि नातवंडे त्यांना वरचेवर भेटत असतात आणि काहीजण फारच दूरच्या गावी किंवा परदेशात रहात असल्यामुळे त्यांना खूप दिवसांनंतर भेटतात. त्या सर्वांच्या बाबतीतले अनुभव अर्थातच थोडे वेगवेगळे असतात. त्यांचे काही नमूने या भागात पाहू.

पहिले आजी आणि आजोबा त्यांच्या कमावत्या मुलाकडे राहतात. त्यांच्या नातवंडांचे हंसरे चेहरे त्यांना रोज दिवसभर पहायला मिळतात. कदाचित तेवढ्या आनंदासाठीच ते तिथे रहात असावेत असेही काही वेळा वाटते. त्यांचा मुलगा आणि सून दोघेही कामावर जातात आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात (आयटीमध्ये) असल्यामुळे त्यांना घरी परत यायला बराच उशीर होतो आणि मग त्यानंतर झोपायला आणि दुसरे दिवशी सकाळी उठायलाही उशीर होतो. त्यामुळे या आजीआजोबांचया नातवंडांना सकाळी वेळेवर उठवणे, त्यांना न्हाऊ माखू घालून आणि गणवेष चढवून तयार करणे, त्यांना शाळेत नेऊन पोचवणे, शाळा सुटल्यावर घरी परत आणणे, त्यांचा नाश्ता, जेवणखाण वगैरे तयार करून त्यांना खायला घालणे वगैरे सगळी रोजची कामे बहुतेक दिवशी आजी आणि आजोबाच करतात. शिवाय त्यांचा अभ्यास, खेळ, मनोरंजन वगैरेकडेही त्यांनाच पहावे लागते. हे करतांना त्यांच्या मनाला खूप आनंद मिळत असला तरी वयोमानानुसार थकलेले शरीर हवी तेवढी साथ देत नाही. कधी मुलांच्या मागे धावतांना त्यांच्या छातीत धाप लागते तर कधी वाकून एकादी वजनदार वस्तू उचलतांना त्यांच्या कंबरेत उसण भरते. पाठदुखी, सांधेदुखी वगैरे अधून मधून हजेरी लावत असतात. काही वेळा काही गोष्टींचे विस्मरण झाल्याने त्यांच्या लक्षात रहात नाहीत. त्या आयत्या वेळी करण्यात धांदल होते. असे सगळे असले तरी ठरलेली रोजची कामे तर त्यांनाच तसेच रखडत खुरडत आटोपावी लागतातच.

दिवसभरातल्या सान्निध्यामुळे नातवंडांना आजीआजोबांचा लळा लागतो, पण ती आपल्यापासून दूर तर राहणार नाहीत अशी एक सुप्त आशंका कदाचित त्यांच्या आईवडिलांच्या मनात उठत असावी. आपल्या मुलांना आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही याची खंतही त्यांच्या मनात कुठेतरी बोचत असते. त्यामुळे त्यांच्या कामामधून त्यांना जेवढा मोकळा वेळ मिळतो त्यात ते लोक या उणीवेची पुरेपूर भरपाई करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी मॅकडोनाल्ड, पिझ्झाहट, भेळपुरीवाला किंवा पावभाजीवाला अशासारख्या मुलांच्या आवडत्या ठिकाणी त्यांना घेऊन जातात, त्यांना हवे तेवढे आइस्क्रीम खाऊ घालतात, मॉल्समध्ये नेऊन तिथले गेम्स खेळायला देतात, मुलांनी मागितलेल्या आणि न मागितलेल्या वस्तूंचे आणि विविध खमंग खाद्य पदार्थांचे ढीगच्या ढीग घरी आणतात. शिवाय बुद्धीवर्धक, शक्तीवर्धक, उत्साहवर्धक, उंची वाढवणारी वगैरे अनेक प्रकारची टॉनिके आणून ठेवतात आणि मुलांना ती नियमितपणे द्यायच्या सूचना आजीआजोबांना देतात. म्हणजे मुलांनी काय काय खावे हे त्यांचे आईवडील ठरवणार आणि त्यांना ते खायला घालायचे आजीआजोबांनी असे चालते. चटपटीत पदार्थ खाण्याची गोडी लागल्यावर आपल्याला आज आत्ता अमूक तमूकच खायला पहिजे असे मुलांनी हट्ट धरले तर ते पुरवणे आजीआजोबांना बरेच वेळा शक्य नसते किंवा त्यांना ते योग्य वाटत नाही. पण ते नाकारण्याचे परिणाम मात्र शेवटी त्यांनाच भोगावे लागतात.

आईवडिलांच्या मनातली असुरक्षिततेची भावना (इनसिक्यूरिटी) काही वेळा वेगळ्या स्वरूपात व्यक्त होते. घराबाहेर घडलेल्या एकाद्या घटनेमुळे किंवा इतर काही कारणाने वैतागून किंवा कोणावर तरी चिडून ते घरी आलेले असतात आणि त्यांच्या मनातला त्याबद्दलचा राग त्यांच्या एकाद्या मुलाची फारशी मोठी चूक नसतांनासुद्धा त्याच्या अंगावर ओरडण्यात बाहेर पडतो. पण या वेळी आजीआजोबांनी मध्ये पडून त्यांची समजूत घालण्याची चूक करता कामा नये. नाही तर "तुम्ही मुलांच्या समोर मला चुकीचे कसे काय ठरवता? त्यांना माझ्याबद्दल काय वाटेल? यामुळे त्यांच्या मनातून मी उतरणार नाही का?" वगैरे वगैरे मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागतात. याच्या उलट एकाद्या वेळी एकाद्या मुलाच्या हटवादीपणाला कंटाळून आजीआजोबांनी त्याला जरासे दटावले तर त्याचा रिपोर्ट रात्री आईवडिलांकडे जातो आणि "तो तर अजून लहान आहे, मोठ्यांनी त्याला समजून घ्यायला नको का? त्याला हो म्हंटलं असतं तर एवढं मोठं काय बिघडणार होतं? लहान मुलांना उगाच काय रडवायचे?" वगैरे वाक्ये सुनावली जातात. आपल्या नातवंडांवर आपण केंव्हा माया दाखवायची किंवा त्याच्यावर जरासे रागवायचे हे सुद्धा आपल्याला ठरवता येत नसले तर आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे? असा प्रश्न अशा वेळी त्यांच्या मनात येतो.

आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी दुस-या आजीआजोबांनी खूपच आधीपासून सगळी तयारी करून ठेवली होती. ते दोघेही सरकारी नोकरीत होते त्यामुळे दोघांनाही निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळते. जीवनाच्या मूलभूत गरजा पुरवून झाल्यावर थोडी मौजमजा करून आरामात राहण्यासाठी तेवढे उत्पन्न पुरेसे असते. नोकरीवर असतांनाच्या ज्या काळात त्यांच्या हातात जास्तीचे चार पैसे यायचे तेंव्हाही ते चैन करण्यात उधळून त्यांनी स्वतःला नसत्या महागड्या संवयी लावून घेतल्या नव्हत्या. ते पैसे साठवून ठेऊन उतारवयासाठी तरतूद करून ठेवली होती. "एका म्यानात दोन तलवारी रहाणार नाहीत" या चालीवर "एका छपराखाली दोन मिसेस क्षक्ष नकोत" हे ब्रीदवाक्य ते आधीपासून इतरांना सांगत असत आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात ते अंमलात आणले.

उगाच भांड्याला भांडे लागून त्याचा ठणठणाट होऊ नये आणि ती एकमेकींना आपल्याआप लागली की मुद्दाम एकमेकींवर आदळली यावरून अधिक गोंगाट होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. आपल्या मुलाचे लग्न ठरवायच्या आधीच त्याच्यासाठी सुसज्ज असा वेगळा फ्लॅट घेऊन ठेवला आणि लग्नानंतर नवदांपत्याला तिकडे रहायला पाठवून दिले. त्यांच्या कुटुंबात नातवंडांचे आगमन झाल्यानंतरसुद्धा सुरुवातीचे काही महिने ते एकत्र येऊन राहिले आणि स्वतंत्रपणे राहण्याजोगी परिस्थिती येताच मुलाचे कुटुंब आपल्या फ्लॅटवर रहायला चालले गेले. वेळोवेळी पडणारी गरज आणि त्या वेळी सर्वांची सोय यांचा विचार करून कधी आजी किंवा आजोबा किंवा ते दोघेही त्यांच्या मुलांकडे जाऊन राहतात किंवा नातवंडांना त्यांच्या आजीआजोबांच्या घरी आणून ठेऊन त्या बालकांचे आईवडील दुसरीकडे त्यांच्या इच्छित स्थळी जाऊन येतात. काही काळ तर आजोबा रोज सकाळची कामे आटोपल्यानंतर नातवंडांना सांभाळण्यासाठी मुलाकडे जाऊन बसत आणि संध्याकाळी आपल्या फ्लॅटवर परत येत असत. एक प्रकारचे विस्कळित पण एकत्र कुटुंब असे त्यांना म्हणता येईल. यात सर्वांनाच आपापली स्पेस मिळते आणि सगळेच सुखी असावेत असे वर वर पाहता वाटते. पण गरज नेहमीच सांगून पडत नाही आणि त्या वेळी गरज जास्त महत्वाची की सोय असा तिढा पडला तर काय करायचे यासारखे प्रश्न त्यांना पडत असतीलच.

लहान घरात राहणे फारच अडचणीचे होते, तिथे कोणालाच थोडीही प्रायव्हसी मिळत नाही, यामुळे आजीआजोबानी त्यांच्या मुलांच्या आणि नातवंडांच्यासह त्यांच्या एक दोन खोल्यांच्या जुन्या घरात राहणे अशक्यच असते. सर्वांनी मिळून एकत्र राहण्याच्या दृष्टीने मोठे घर घेतले तरी त्यात पहिल्या उदाहरणात दिल्याप्रमाणे काही अडचणी येत असतात. वर दिलेल्या दुस-या उदाहरणातल्या आजीआजोबांनी स्वतःच पुढाकार घेऊन मुलाला वेगळा संसार थाटायला सांगितले असे ते सांगत तरी असतात. पण मुलांना अधिक स्वातंत्र्य हवे असते किंवा त्यांना घरात रोज कुरबुर नको असते म्हणून ते स्वतःहून वेगळे होतात असेच सर्वसाधारणपणे दिसते. आर्थिक दृष्ट्या पाहता त्यांनाच ते शक्य असण्याची जास्त संभावना असते. त्यांच्या पगाराच्या आधारावर त्यांना दीर्घ मुदतीचे गृहनिर्माणकर्ज मिळू शकते. साठी उलटून गेलेल्या आणि नियमित मासिक उत्पन्न नसलेल्या आजोबांना कोणती बँक कर्जपुरवठा करणार आहे? जे आजीआजोबा वेगळ्या घरात पण त्यांच्या मुलांच्या घरापासून जवळच रहात असतात त्यांना नातवंडांशी सतत संपर्क ठेवता येतो, पण ते एकाच शहरात असूनसुद्धा दूरदूरच्या निरनिराळ्या उपनगरांमध्ये रहात असले तर गर्दीने गच्च भरलेल्या लोकल गाडी किंवा सिटीबस यांच्यासारख्या सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करून नातवंडांना भेटायला जाणे आजीआजोबांच्या आवाक्याबाहेर होते. त्यांची मुलेच नातवंडांना घेऊन त्यांच्याकडे आली किंवा त्यांना आपल्या सोबत त्यांच्या घरी घेऊन गेली तरच त्यांचे भेटणे शक्य होते. यामुळे अडचणींमुळे त्यांच्या भेटीगाठी कमी होत जातात आणि त्या प्रमाणात लळा, जिव्हाळाही कमी होतो.

. . .  . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: