Saturday, March 15, 2014

माझे शत्रू - पसारा शब्दाचा जनक (भाग १)

मला जेंव्हा नीट बोलायलासुद्धा येत नव्हते, तेंव्हापासून "छुबंतलोती तल्लानं" वगैरे माझ्याकडून पाठ करून घेतले होते. त्यातल्या "छतलूबुद्दी" या शब्दाचा अर्थ समजायला लागल्यापासून माझ्या मनातला कुणाहीबद्दलचा वैरभाव काढून टाकण्याचा प्रयत्न मी अधून मधून करत असतो. माझ्या पाठीमागेसुद्धा माझ्याबद्दल बरे बोलणारे लोक मी सहसा कुणाला 'वाईट' म्हणत नाही किंवा कुणाचे वाईट चिंतत नाही असे काही वेळा सांगतात म्हणे. हे ऐकून मलाही बरे वाटते. पण मला चांगले माहीत आहे की काही शत्रूंनी माझ्या लहानपणापासून आजतागायत माझा पिच्छा पुरवला आहे. त्यांना कितीही वेळा हाकलले तरी बहिणाबाईंच्या 'वढाय वढाय मना'सारखी ही शत्रूरूपी ढोरे 'फिरी फिरी पिकावर' माघारी येतच असतात.

त्यातल्या काही व्यक्ती तर इतिहासातल्या कोणत्या शतकात होऊन गेल्या तेही मला सांगता येणार नाही, पण त्यांनी करून ठेवलेल्या कृती मला अजून छळत असतात. त्यांनी केलेल्या एकाच पापामुळे त्यांनी माझ्यासारख्या इतक्या लोकांचा तळतळाट घेतला आहे की पुढच्या निदान हजार जन्मात तरी ते डास, ढेकूण किंवा झुरळ होणार आहेत याबद्दल माझी खात्री आहे. आज ते ज्या कोणत्या योनीत आणि जिथे कुठे असतील तिथे त्यांचे तळपट व्हावे अशी इच्छा मनात येते आणि एकादा डास, ढेकूण किंवा झुरळ समोर दिसला की त्याचा पार चेंदामेंदा करावा असे वाटते. "माझ्या आयुष्यात मला कधीही न भेटलेल्या या लोकांनी माझे असे कोणते घोडे मारले आहे?" असा विचार तुमच्या मनात येईल, पण मला विचाराल तर माझे फक्त घोडेच नाही तर हत्ती, उंट, गाय, हरीण, ससा वगैरे जो कोणता प्राणी मला कधी हवाहवासा वाटला त्याची या लोकांमुळे वाट लावली गेली आहे. आता एक उदाहरणच पहा ना!

मी तेंव्हा सात आठ वर्षांचा असेन. त्या काळात आताच्या मुलांसारखा 'मी तो हमाल भारवाही' झालो नव्हतो. माझी स्लेटची पाटी, पेण्सिल, अंकल्पी (अंक लिपी), सर्वसमावेशक असे एक किंवा दोन पाठ्यपुस्तके, कुणी तरी आणून दिलेले एकाददुसरे चित्रांचे पुस्तक, एकादी जुनाट रफ वही, पाच दहा सुटे कोरे किंवा पाटकोरे कागद, शिस्पेन्सिल, रबर, रंगांच्या खडूंची पेटी इतकीच तेंव्हा माझी संपत्ती होती. आमचे प्रशस्त घर माणसांनी भरलेले होते. ऊनपाऊस, थंडीवारा आणि निवांतपणा पाहून मी एकाद्या जागी पुस्तक पहात किंवा चित्र काढत बसलो असेन, त्याच वेळी दारात आलेल्या रम्या किंवा अंत्याची हाक मला ऐकू आली तर लगेच जाऊन पहायला नको का? घरातले कपडे वेगळे आणि बाहेर जाण्यासाठी वेगळा ड्रेस म्हणजे 'आत एक आणि बाहेर एक' असा भेदभाव मी त्या काळात करत नसे. त्यामुळे "मी खेळायला चाललोय्" अशी दारातूनच आरोळी देऊन मी सटकलो तर त्याला काय हरकत होती? घरातल्या इतक्याजणांपैकी कोणी ना कोणी तरी ती नक्कीच ऐकणार याची खात्री असायची. खेळून परत आल्यावर सडकून भूक लागलेली असे, थोडे खाऊन होईपर्यंत घरातले कोणीतरी एकादे लहान सहान काम करायला सांगत असे. आपले अर्धवट सोडलेले पुस्तक पहाणे किंवा चित्र काढणे त्यानंतर पुढे चालवावे म्हंटले तर त्या वस्तू जिथे सोडून मी पळालेलो होतो तिथून त्या अदृष्य झालेल्या असायच्या. घरातल्या कोणत्या तरी ताईमाईने, आईने किंवा काकूने त्या उचलून कुठे तरी ठेवलेल्या असायच्या, पण नेमके काय झाले हे मात्र कोणीही मला सांगत नसे. कदाचित त्यांच्याही ते लक्षात येत किंवा रहात नसेल. जमीनीवर काही पडलेले दिसले की ते उचलून ठेवायचे अशी त्यांच्या हातांना यांत्रिक संवय झाली असावी.

"माझ्या त्या वस्तू कुठे गेल्या?" असे कोणाला विचारायचीही सोय नसे. त्याचे उत्तर कोणाकडे आहे? हेच मुळात माहीत नसल्याने कुणाला म्हणून विचारायचे? हा प्रश्न तर होताच आणि कोणालाही माझा प्रश्न विचारला तरी "तू आपापल्या वस्तू उचलून जागेवर ठेवायला कधी शिकणार आहेस? नुसता पसारा करून ठेवायला तेवढं येतं!" हेच उत्तर मिळण्याची खात्री असायची. त्यानंतर माझ्या मनात पुन्हा कधी पुस्तक पहायचा किंवा चित्र काढायचा विचार आला तर मग मी दोन चार कपाटे आणि कोनाडे धुंडाळून माझी मालमत्ता शोधून काढत असे. त्यात इतर दहा पंधरा वस्तू जमीनीवर येत आणि माझा अर्ध्याहून अधिक मूड गेलेला असे. उरल्यासुरल्या मूडला सांभाळत मी माझ्या कामात तंद्री लावायचा प्रयत्न करतो न करतो तेवढ्यात पुन्हा कोणी ताईमाईअक्का यायच्या आणि कानाला पकडून मला ओढत नेऊन मी नव्याने केलेला 'पसारा' दाखवायच्या, तो उचलून ठेवायला लावायच्या, पाठीत धपाटाही मिळायचा. त्या काळापासून मी 'पसारा' या शब्दाचा भयंकर धसका घेतलेला आहे.

माझा एक मोठा भाऊ कॉलेजशिक्षणासाठी शहरात चालला गेला तेंव्हा रिकाम्या झालेल्या कपाटातला एक खण मी हट्ट करून माझ्या ताब्यात घेतला. माझ्या पुस्तक आणि वह्यांची संख्या तोपावेतो थोडी वाढली होती, शिवाय कंपासपेटी, फुटपट्टी, रंगपेटी, रंगकामाचे ब्रश, दौतटाक, टीपकागद वगैरे काही साधनांची त्यात भर पडली होती. आता माझी हक्काची जागा मिळाल्यामुळे मी काही वस्तूंचा संग्रह करू शकणार होतो. मी तयार केलेल्या कागदाच्या होड्या, विमाने, पक्षी वगैरे कलाकृती आतापावेतो दुसरा दिवस उजाडायच्या आत बंबामध्ये "अग्नये स्वाहा" होत असत, आता मी त्या माझ्या खणात जपून ठेवू लागलो. काडेपेट्यांचे 'छाप', रिकाम्या झालेल्या डब्या, भोवरे, गोट्या, गजगे, चिंचोके, पोस्टाची रिकामी पाकिटे, त्यांच्यावरची तिकीटे, रंगीबरंगी खडे, गारगोट्या, शंखशिंपले, खेडेगावात क्वचितच मिळणारी चमकदार नवी नाणी किंवा अती प्राचीन वाटणारी घासून गुळगुळीत झालेली जुनी नाणी अशा अनेक चित्रविचित्र वस्तू मला आकर्षक वाटायच्या आणि मी त्यांना माझ्या खणात स्थान देत असे. त्यातली कुठलीही गोष्ट चुकून जमीनीवर पडली तर 'पसारा' समजली जाईल आणि कदाचित मला पुन्हा तिचे दर्शन होणार नाही एवढे शहाणपण मी अनुभवावरून शिकलो होतो. त्यामुळे मला हवी असलेली वस्तू काढतांना इतर काही वस्तू बाहेर आल्याच तरीसुद्धा मी त्यांना पुन्हा खणात कोंबून ठेवत असे.

पण एकाद्या दिवशी मी शाळेतून परत येऊन पाहतो तो माझ्या खणाचे व्यवस्थित स्वरूप आणि मोकळेपण पाहून मला रडू आवरत नसे. मी प्रेमाने जमवलेल्या काही गोष्टी तर तिथून नाहीशा झालेल्या असतच, शिवाय "बघ, मी तुझा खण किती छान आवरून ठेवला आहे? तू त्यात नुसता बुजबुजाट मांडला होतास!" असले काही उद्गार ऐकावे लागत असत. पहायला गेल्यास माझ्या खणातला सोकॉल्ड 'पसारा' कुणाला आणि कसला त्रास देत होता? ताई, माई, अक्का, आई, काकू वगैरेंना तोसुद्धा का सहन होत नव्हता? "अचानक कोणीतरी पाहुणा घरी आला आणि त्याने ते कपाट उघडून पाहिले तर त्यातला तुझा खण बघून त्याला काय वाटेल? तो (बहुतांश वेळा ती) त्यावर काय म्हणेल?" असल्या प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर होत असे. कदाचित त्यात त्यांचीही काही चूक नसेल. "ज्या कोणत्या महाभागाने मराठी भाषेत 'पसारा' हा शब्द आणला त्यालाच धरून धोपटायला पाहिजे" असे माझे ठाम मत त्या काळात बनत गेले. आजवर ते बदललेले नाही.

.  . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: