Wednesday, February 05, 2014

पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - भाग ४

पुराणकालातल्या ऋषीमुनींच्या चित्रांमध्ये त्यांच्या हातात एक कमंडलू दाखवतात. केंव्हाही तहान लागताच लगेच पिण्यासाठी त्यात पाणी भरून घेतलेले असेल असे वाटत नाही, कारण अशा पौराणिक चित्रांमध्ये इतर कोणत्याच पात्राच्या हातात पाण्याने भरलेला एकादा तांब्या किंवा लोटा दाखवलेला दिसत नाही. या मुनीवर्यांच्या कमंडलूमधले पाणी सुद्धा सहसा साधेसुधे नसायचे. मंत्रोच्चाराने भारलेल्या त्या पाण्यामध्ये अद्भुत सामर्थ्य दडलेले असे. त्यातले दोन चार थेंब शिंपडताच माणसाचा दगड, भस्म किंवा साप होऊन गेला किंवा याच्या उलट झाले अशा कथा पुराणांमध्ये आहेत. अल्लाउद्दीनच्या दिव्यामधला राक्षस (जिन्न), परीकथांमधल्या प-या आणि चेटकिणीसुद्धा क्षणार्धात होत्याचे नव्हते किंवा नव्हत्याचे होते करून टाकत असत. मी अगदी लहान असतांना मला या सगळ्याच सुरस गोष्टी ख-या वाटायच्या. आपल्यालाही एकादी जादूची अंगठी किंवा छडी मिळाली तर आपण कशी आणि कोणकोणती धमाल आणि गम्माडीगंमत करू हे तेंव्हा स्वप्नात दिसत असे. थोडे मोठे झाल्यानंतर काही गोष्टी कळायला लागल्या, त्यात अरेबियन नाइट्समधल्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथा आणि फेअरीटेल्स वगैरे सगळे काल्पनिक असते, प्रत्यक्षात असल्या जादूच्या कांड्या वगैरे कुठेही मिळत नाहीत हे समजले, पण ऋषीमुनींचे तपोबल आणि मंत्रांमधली शक्ती याविरुद्ध मात्र कोणीही काही बोलायला तयार नव्हते, त्यामुळे मंतरलेले पाणी कदाचित खरे असू शकेल असे आणखी काही काळ वाटायचे. आपणही ते मंत्र शिकून घ्यावेत आणि आपल्याला निष्कारण त्रास देणाच्या मुलांच्या किंवा मास्तरांच्या अंगावर मंतरलेल्या पाण्याचे थेंब उडवून त्यांना बेडूक किंवा पोपट बनवून टाकावे असे दुष्ट विचार त्या काळात मनात यायचे.

पण त्यात काही शंकासुद्धा येत. पुराणकालातल्या ऋषीमुनींच्या मंतरलेल्या पाण्यात जर इतके सामर्थ्य असायचे तर ते स्वतःचे रक्षण का करू शकत नव्हते? अरण्यातल्या त्यांच्या आश्रमांवर असुर, दैत्य, दानव वगैरे दुष्ट लोक वारंवार हल्ले करून मारामारी आणि नासधूस करत असत, त्यांच्या तपश्चर्येत आणि यज्ञकार्यात बाधा आणत असत, यामुळे त्रस्त होऊन ते सगळे एकाद्या देवाची किंवा देवीची आराधना करत. मग ते देव किंवा देवी अवतार धारण करून त्या राक्षसांचा संहार करत अशा स्वरूपाच्या अनेक पौराणिक कथा आहेत. रामायणातसुद्धा राक्षसांच्या त्रासामुळे त्रस्त झालेले मुनीवर्य दशरथ राजाकडे जाऊन आपले गा-हाणे त्याला सांगतात, "ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। यज्ञरक्षणात तोच श्रेष्ठ सर्वथा।।" असे सांगून धनुर्धारी राम आणि लक्ष्मण यांना सोबत घेऊन जातात. ते दोघे धनुष्यबाणांनेच दैत्यांचा संहार करून ऋषीमुनींना भयमुक्त करतात अशी कथा आहे. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य या आचार्यांनीसुद्धा महाभारतातल्या युद्धात परंपरागत शस्त्रास्त्रांच्या सहाय्यानेच लढाई केली. त्यातली विशिष्ट अशी संहारक अस्त्रे, अमोघ शक्ती वगैरेंनाही बाणासारखे धनुष्याच्या दोरीला लावूनच सोडले जायचे, पण त्यावेळी तोंडाने एकादा मंत्र पुटपुटला जायचा असे सिनेमा आणि मालिकांमध्ये दाखवतात. कदाचित हे दिग्दर्शकांच्या कल्पनेमधून येत असेल. कुठल्याही युद्धात मंतरलेल्या पाण्याचा शस्त्रासारखा उपयोग केलेला मात्र मी कधी पाहिला किंवा ऐकला नाही.

पौराणिक कथा, ऋषी, मुनी वगैरेंचा संबंध हिंदू धर्मशास्त्रांशी जोडलेला असल्यामुळे मनात आलेल्या अशा शंका विचारायची परवानगी आमच्या लहानपणी नसायची, त्यातूनही कोणी धीर करून त्या विचारल्याच तर असे उत्तर मिळायचे की मंत्रशक्तीचा असा उपयोग करतांना कठोर तपश्चर्येमधून कमावून ठेवलेल्या पुण्याचा क्षय होतो आणि तो भरून काढण्यासाठी पुन्हा तशीच तपश्चर्या करावी लागते, ती करावी लागू नये म्हणून मंत्रशक्तीचा तसा उपयोग अपवादास्पद परिस्थितींमध्येच केला जात असावा. मला तरी हे कधी समर्थनीय वाटले नाही, पण ते महत्वाचे नाही. मंतरलेले पाणी कसलाही चमत्कार घडवू शकते आणि प्राचीन काळातल्या त्या संबंधातल्या गोष्टी काल्पनिक नसून सत्यकथा आहेत यावर त्या काळातल्या अनेक लोकांचा गाढ विश्वास असायचा. असा विश्वास बाळगणारे आणि त्यावरून वाद घालणारे लोक आजसुद्धा भेटतात. गंमत म्हणजे ते लोक आता साउंड एनर्जी, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, रेझॉनन्स, सिनर्जी असले इंग्रजी शब्द फेकून त्यांचे सांगणे किती शास्त्रीय आहे असे सिद्ध करू पाहतात.

बहुतेक सगळ्या धार्मिक विधींच्या सुरुवातीला पूजेची तयारी करतांना कलश आणि दीप यांची यथासांग पूजा केली जाते. नंतर मुख्य दैवताची पूजा चालली असतांना आयत्या वेळी त्या वस्तू न मिळाल्याने गोंधळ होऊन नये म्हणून कदाचित अशी व्यवस्था करून ठेवली असावी. कलश आणि दिव्याची पूजा करण्यासाठी आधीच त्यांना घासून पुसून चकचकीत केलेले असतेच. त्यांना गंधपुष्प वगैरे वाहून नमस्कार करतात. त्यानंतर मंत्रोच्चाराबरोबर दीपप्रज्वलन केले जाते आणि कलशामध्ये पाणी भरले जाते. त्यावेळचे मंत्र म्हंटल्यावर उत्तरेमधील गंगा, यमुना, सिंधू या नद्यांपासून दक्षिणेतल्या कृष्णाकावेरीपर्यंत भारतातल्या सगळ्या पवित्र नद्यांचे पाणी त्या कलशात आले आहे असे समजले जाऊन त्या पाण्याला एक वेगळे स्टेटस प्राप्त होते. त्यानंतर ते पाणी साधे रहात नाही, ते पिण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी घेतले जात नाही. त्या पवित्र पाण्याने इतर सगळ्या पूजासामुग्रीवर प्रौक्षण करून त्यांनाही पवित्र किंवा शुद्ध करतात तसेच स्वतः आणि तो विधी पहायला बसलेल्या लोकांच्या अंगावर या पवित्र पाण्याचे एक दोन थेंब पडले की सगळ्यांचे शुद्धीकरण होते. पूजाविधी संपल्यानंतरसुद्धा ते मंतरलेले पाणी मोरीत किंवा बेसिनमध्ये ओतले जात नाही. ते एकाद्या झाडाला, शक्य झाल्यास तुळशीला वाहतात.

प्रत्येक पूजाविधी झाल्यानंतर त्याचे थोडे पुण्य इतरांनाही मिळावे यासाठी तीर्थ आणि प्रसाद वाटला जातो. यातला प्रसाद हा चांगला चविष्ट आणि मधुर असा खाद्यपदार्थच असतो. सर्वांच्या आधी तो देवाला अर्पण करण्यासाठी देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. प्रत्यक्षातले देव त्यातला कणभरसुद्धा खात नाहीतच, पण त्याला दिलेला नैवेद्य त्यानेच प्रसाद म्हणून आपल्याला बहाल केला आहे अशी सोयिस्कर समजूत करून घेऊन त्या प्रसादाचे भक्षण केले जाते. पूजाविधीतला हा भाग सर्वांना मनापासून आवडतो. पूजेच्या सुरुवातीला देवाच्या मूर्तीला ताम्हनात ठेवून त्याला पाण्याने न्हाऊ घालतात, दूध, दही, तूप, मध आणि शर्करा यांचे पंचामृत त्या मूर्तीवर वाहून, सुगंधित पाणी ऊष्ण पाणी वगैरेंनी तिला स्नान घालतात, त्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करतात, तिला ताम्हनात ठेवलेले असतांनाच तुळशी, बेलाची पाने, दुर्वा, फुले वगैरेही वाहतात. या सगळ्यांनी युक्त असलेले ताम्हनामधले पाणी पूजा संपल्यानंतर तीर्थ बनते. ते प्राशन करतांना खालील श्लोक म्हंटला जातो.
अकालमृत्यूहरणम् सर्वव्याधीविनाशकम् । ... पादोदकम् तीर्थम् जठरे धारयाम्यहम्।।
ज्या देवतेची पूजा केली असेल तिचे नाव ... या जागी घेतात. शरीरातल्या सर्व व्याधींचा नाश व्हावा आणि अकालमृत्यू टळावा यासाठी त्या देवतेचा पदस्पर्श झालेले हे पाणी मी पोटात घालत आहे असा या श्लोकाचा अर्थ होतो. हा अर्थ समजला असो किंवा नसो, तो पटला असो किंवा नसो, बहुतेक सगळे हिंदू लोक पळीभर तीर्थ पिऊन घेतात. त्यामुळे पुण्य लागेल अशी एक अंधुक कल्पना कदाचित त्यामागे असते. अकालमृत्यू आला होता हेच माहीत नसते, तीर्थप्राशनामुळे तो टळला तरी ते कसे समजणार आणि नसला तर तसे का झाले याचे स्पष्टीकरण द्यायला इतर अनेक कारणे असतातच. अमक्या तमक्या देवाच्या पूजेचे तीर्थ प्यायल्यामुळे असाध्य रोग झालेला एकादा रोगी खडखडीत बरा झाला असे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला दिसत नाही पण तसे सांगणारे भाविक भेटतात. जे विकार आपल्या आपणच किंवा इतर औषधोपचाराने ठीक होण्यासारखे असतात त्यांच्या बाबतीतसुद्धा रुग्णाच्या मनोधैर्याचा अनेक वेळा चांगला उपयोग होतो असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. किंबहुना त्यासाठी आंतरिक शक्तीची आवश्यकता असते. निराशाग्रस्त झालेला एकादा रोगी "हे तीर्थ घेतलेस ना? आता कसली काळजी करू नकोस." एवढ्या बोलण्यानेच बरा होण्याला सुरुवात होते. कशाने का होईना, पण त्याला बरे वाटणे महत्वाचे असते ना!  
 
भारतातल्या एका कौटुंबिक कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांमध्ये एक परदेशातले ख्रिश्चन कुटुंब होते. सुरुवातीला धार्मिक पूजा हा त्या कार्यक्रमाचाच भाग होता. पूजा आरती वगैरे संपल्यावर सर्वांना तीर्थप्रसाद वाटला गेला. त्या परदेशी मंडळींनी प्रसाद तर आवडीने घेऊन खाल्ला, पण तीर्थाकडे पाहून "हे काय आहे?" असे विचारले. ते काय आहे हे सांगितल्यानंतर ते 'पवित्र पाणी' पिण्यायोग्य आहे हे सुद्धा त्यांना पटवून देणे अवघड होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात जातीयतेचे महाभयंकर प्रस्थ असायचे. त्यात खाण्यापिण्यावर खूप कडक बंधने असायची. धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे वगैरे नैसर्गिक पदार्थ कोणाच्या शेतातून आले आहेत याचा विचार कोणी करत नसत, पण त्यांना पाण्यात शिजवून केलेला भात आणि आमटी, भाजी किंवा पाण्यात पीठ भिजवून केलेल्या भाक-या आणि पोळ्या मात्र कोणत्या जातीच्या माणसांच्या घरात केल्या आहेत हे पाहूनच त्या खाण्याबद्दल ठरवले जात असे. गावातल्या कोणत्या पाणवठ्यावर कुणी पाणी भरायचे यावर कडक बंधने असत. परधर्माच्या, परजातीच्या लोकांनी, विशेषतः तथाकथित अस्पृश्यांनी भरलेले पाणी इतर लोक पीत नसत. गोव्यामध्ये तर गावातल्या विहिरीत ख्रिश्चनांनी पाव टाकल्यामुळे ते सगळे पाणी अपवित्र झाले आणि ते पाणी पिऊन सगळे गाव बाटले अशा घटना घडल्या होत्या म्हणतात. निसर्गाने सर्वांसाठी दिलेल्या पाण्यावर माणसांनी स्वामित्व गाजवून त्याच्या वापरावरून कलह माजवला जात होता. आज शहरांमधली या बाबतीतली परिस्थिती बदलली असली तरी देशाच्या काही भागात अजूनही जुन्या चालीरीतींचे अवशेष शिल्लक राहिले आहेत.

मी शाळेत शिकत असतांनाची एक आठवण आहे. आम्ही ज्या मोठ्या गावात रहात होतो तिथून वीस किलोमीटर अंतरावर माझ्या आजोबांनी तयार केलेली शेती आणि बांधलेले घर होते. ते एका वेगळ्या जातीच्या स्थानिक कुटुंबाला भाड्याने दिले होते. वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये एक नदी नावेतून पार करावी लागत असे आणि वाहतुकीची साधने चांगली नव्हती, त्यामुळे तिकडे जाऊन परत यायला दोन दिवस लागत. खेडेगावामध्ये हॉटेल नव्हतेच म्हणून दोन दिवस टिकतील आणि पुरतील असे खाद्यपदार्थ माझ्या आईने बांधून दिले होते. तिथे गेल्यानंतर मी आपला डबा उघडून खाऊ लागलो तेंव्हा आमच्या भाडेकरूने मला समानतेवर लेक्चर दिले आणि त्याच्या बायकोने केलेले गरम जेवण खायला बोलावले. माझ्या मनात भेदभाव नव्हताच, मी आनंदाने त्यांच्या पंगतीला जाऊन बसलो. थोड्या वेळाने आमच्या शेतावर काम करणारा शेतकरी मला भेटायला आला. आमच्या भाडेकरूने आल्या आल्या त्याची जात विचारली आणि त्याला दरवाजाबाहेरच बसायला सांगितले. त्याला खापराच्या मडक्यात पाणी प्यायला दिले, त्याला आपल्या घरातल्या भांड्यालासुद्धा स्पर्श करू दिला नाही. थोड्याच वेळापूर्वी मला दिलेले भाषण तो विसरून गेला होता किंवा कदाचित त्याचे इतर जातभाई काय म्हणतील याची त्याला काळजी वाटत असावी.    

थोडक्यात सांगायचे झाल्यास पाणी म्हणजे पाणी म्हणजे नुसतंच पाणी नसतं, ते तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं. त्यात खारट, गोड, कठीण, जड, हलके, शुद्ध, अशुद्ध वगैरे प्रकार असतातच, पवित्र, अपवित्र वगैरेही असतात. काही शास्त्रीय आधारांवर असतात, काही मानण्या, न मानण्यावर असतात.


.  . . . . . .  . . . . . . . . (समाप्त)

No comments: