Saturday, January 25, 2014

पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी

टेलिव्हिजनवर चाललेला एक 'माहितीपूर्ण' किंवा 'ज्ञानवर्धक' कार्यक्रम पहात असतांना त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तीने सांगितले की "पाणी तापवल्यामुळे पाण्यावर अग्नीचे संस्कार होऊन अग्नीचे काही गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी प्याल्याने ते गुण आपल्या शरीराला मिळतात, त्यापासून पचन सुधारते वगैरे." निदान हे विधान तरी माझ्या पचनी पडले नाही. यावरचे माझे विचार मी 'अग्नी आणि संस्कार' या लेखात व्यक्त केले होते आणि हा लेख ऐसी अक्षरे या संस्थळावर टाकला होता. त्यावर सुजाण वाचकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या, पण त्यातले एक दोन अपवाद सोडता इतर कुणीही 'अग्नी' किंवा 'संस्कार' याबद्दल फारसे लिहिले नव्हते. "पाण्यात काय काय असते किंवा नसते, ते असावे किंवा नसावे" यावरच सगळी चर्चा, वादविवाद, वाग्युद्ध वगैरे झाले होते. नदीच्या, विहिरीतल्या किंवा नळातून येणा-या पाण्यामध्ये इतर जे पदार्थ सापडतात त्यांना पाण्याचा घटक धरून त्यामधून पाण्याचे कांपोजिशन बनते असा विचार कोणी करीत असेल असे मात्र मला कधी वाटले नव्हते. फुफ्फुसामधली हवा, पोटातले अन्न, शरीरातले रोगजंतू हे सगळे माणसाच्या शरीराचे भाग असतात असे मला उद्या कोणी सांगितले तर आता त्याचे आश्चर्य वाटणार नाही. पाणी हा विषयच बहुधा वाद निर्माण करणारा असावा. चाळीतल्या नळापासून तो महाराष्ट्र कर्नाटक, भारत पाकिस्तान यांच्यापर्यंत सगळीकडे पाण्यावरून भांडणे चाललेली असतात. लेख ऐसी अक्षरेमधल्या प्रतिसादांमध्ये पाण्यासंबंधी इतके काही वाचल्यानंतर त्याच विषयावर एक वेगळा लेख लिहून टाकावा असे वाटले.

हैड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायू(ऑक्सीजन)चा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. कित्येक खर्व, निखर्व, परार्ध (या संख्यांचा अर्थ माझ्या आकलनापलीकडचा आहे) वगैरे वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पाठीवर ते पहिल्यांदा घडले असे म्हणतात. त्यानंतर ते घडत गेले आणि त्यामधून पाण्याचे महासागर तयार झाले. त्याच्याहीनंतर जीवसृष्टी निर्माण झाली. त्या अनादी कालापासून ते आजपर्यंत पाण्याच्या रेणूमध्ये हेच दोन अणू असतात आणि टिम्बक्टूला जा नाहीतर होनोलुलूला जाऊन पहा, कुठल्याही ठिकाणचे पाणी अगदी तसेच असते. "पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं" असे खरे तर म्हणता यायला हवे, पण "पिण्डे पिण्डे मतिर्भिन्नाः कुण्डे कुण्डे नवं पय:|" असे आपल्या सुभाषितकारांनी लिहून ठेवले आहे. 'बारा गावचे पाणी प्यायलेला' माणूस बिलंदर असतो असे उगीच म्हणत नसतील. त्यामुळे जागोजागचे पाणी नक्कीच वेगळे असणार. कुठल्याही परगावी गेल्यावर तिथल्या पाण्याचा पहिला घोट घेतांच त्याच्या चवीतला वेगळेपणा आपल्याला चांगला जाणवतो.

खरे तर सगळ्या ठिकाणचे पाणी एकसारखेच असले तरी ते वेगळे वाटते याचे कारण त्याचा सर्वसमावेशक गुण हे आहे. शुद्ध पाणी हे 'कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस' म्हणजे 'बिनरंगाचे, बिनवासाचे आणि बेचव' असते. पण पेलाभर पाण्यात चिमूटभर मीठ घातले तर ते खारट लागते, साखर घातली तर गोड आणि लिंबाचा रस घातला तर ते आंबट लागते. कुठल्याही अत्तराचा एक थेंब त्यात टाकला की त्याचा सुगंध त्या सगळ्या पाण्याला येतो आणि कुठल्याही रंगाने माखलेला ब्रश जरी पाण्यात बुडवून हलवला तर ते सगळे पाणी त्या रंगाचे दिसायला लागते. "पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाओ वैसा" अशी एक हिंदी कहावतसुद्धा आहे. पाण्याच्या या गुणामुळे त्यात जे काही मिसळले जाईल त्याचा गुण त्या पाण्याला लागतो. ठिकठिकाणच्या पाण्यात मिसळलेले हे इतर पदार्थ असंख्य प्रकारचे असल्यामुळे तिथल्या पाण्याचे वेगळेपण जाणवते.

पावसाच्या ढगामध्ये तयार झालेला पाण्याचा थेंब अगदी शुद्ध असतो असे जरी मानले तरी तो जमीनीवर पडायच्या आधी हवेमधून खाली उतरत येतो. त्या हवेत नायट्रोजन, ऑक्सीजन आणि कार्बन डायॉक्साइड हे वायू तर सगळीकडे असतातच, काही ठिकाणी सल्फर डायॉक्साइड, नायट्रिक किंवा नायट्रस ऑक्साईड, अमोनिया, मीथेन वगैरे इतर काही वायूसुद्धा असण्याची शक्यता असते. हवेतून धावत खाली पडणा-या पावसाच्या थेंबामध्ये या वायूंचे काही अणू विरघळतात किंवा त्याच्याशी संयोग पावतात. जमीनीवर पडलेल्या पाण्याचा काही भाग मातीत, वाळूत किंवा खडकांमध्ये असलेल्या भेगांमध्ये जिरून जातो आणि उरलेले पाणी जमीनीवरील खळग्यांमध्ये साठते किंवा उतारावरून वहायला लागते. ते एकाद्या सखल भागात जाऊन साठले तर त्याचे तळे होते आणि पुढे पुढे वहात गेले तर त्याचे अनेक प्रवाह एकमेकांमध्ये मिसळून ओढा, नाला, नदी वगैरे होतात.

अनादि कालात पृथ्वीचा ऊष्ण गोळा थंड होत गेला, त्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे कठीण कवच तयार होत गेले. तिच्या पोटातला थोडा थोडा तप्त रस त्यानंतरसुद्धा ज्वालामुखींमधून बाहेर पडत राहिला आणि त्यामधून त्यात आणखी भर पडत गेली. ऊन, पाऊस, वादळ वारे वगैरेंच्यामुळे पृथ्वीवरील पर्वत, डोंगर आणि जमीनीची झीज होत राहिली. हे सगळे होत असतांना त्यामधून दगड, माती, वाळू वगैरे तयार होत गेले. हे इनऑर्गॅनिक पदार्थ  धातू किंवा अधातूंपासून तयार झालेले असतात. वनस्पतींची पाने, फुले, फळे, फांद्या वगैरे भाग जमीनीवर पडत असतात, झाडांची मुळे तर जमीनीच्या आतच असतात, पशुपक्षी कीटक वगैरेंनी उत्सर्जन केलेली द्रव्ये आणि त्यांचे मृतदेह जमीनीवर पडतात, हे सगळे प्राणीजन्य किंवा वनस्पतीजन्य पदार्थ कुजतात तेंव्हा त्यांचे विघटन होऊन त्यातले काही भाग वायूरूपाने वातावरणात जातात आणि उरलेले अवशेष जमीनीवर शिल्लक राहतात. हे सगळे सेंद्रिय पदार्थ (ऑर्गॅनिक मॅटर) अखेर मातीमध्ये मिसळत असतात. पावसाचे पाणी जमीनीवरून वहात जातांना मातीतले काही पदार्थ त्या पाण्यात सहजपणे मिसळतात. पाणवनस्पती आणि जलचर प्राण्यांच्या बाबतीतही असेच घडत असते. त्यामधून बाहेर पडलेली सेंद्रिय द्रव्ये तर पाण्यातच असतात. नदी वहात वहात पुढे जातांना तिच्या पाण्यातला काही गाळ ती काठांवर टाकतही जात असते आणि काठावरल्या काही पदार्थांना पुढे घेऊन जात असते. दूर पल्ल्याच्या रेल्वेगाडीमध्ये दर स्टेशनवर काही प्रवासी खाली उतरतात आणि काही प्रवासी गाडीत चढतात, त्याचप्रमाणे नदीच्या प्रवाहात मिसळत गेलेल्या इतर पदार्थांमध्येही बदल होत असतात.  

जमीनीमधून आणि जमीनीखालील दगडधोंड्यांमधून झिरपत जाणारे पाणी खाली जात असतांना पाण्याचे काही कण मातीच्या कणांना चिकटून राहतात. त्यामुळे मातीला ओलावा येतो. पाण्याचे उरलेले कण किंवा थेंब दगडमातीखडक वगैरेंमधून वाट काढून खाली खाली जात असतांना कुठेतरी अभेद्य असा खडक लागतो. ते पाणी त्याच्या पलीकडे जाऊ शकत नसल्यामुळे वरच्या बाजूला साठत जाते. जमीनीखाली साठत गेलेल्या पाण्याचे ओघळ एकमेकांमध्ये मिसळतात. त्यांना जिथे जी भेग किंवा पोकळी सापडेल तिला भरत जातात. अशा प्रकारे जमीनीखालच्या पाण्याचा एक साठा तयार होतो. पावसाळ्यात जमीनीवरून खाली उतरत आलेले पाणी त्यात भरत जाते. नद्यानाले, तलाव, कालवे वगैरेंच्या तळाशी असलेल्या जमीनीमधूनसुद्धा थोडे पाणी झिरपत खाली जात असतेच. यामुळे त्या भूगर्भातल्या जलाच्या साठ्याची पातळी वाढत जाते. या पातळीला वॉटर टेबल असे म्हणतात. अर्थातच पावसाळ्यात ही पातळी वर येते. वॉटरटेबलच्या बरेच खालपर्यंत विहीर खणली तर जमीनीखालच्या साठ्यामधले पाणी झ-यांमधून विहिरींमध्ये येऊन पडते. झाडांची मुळे जमीनीमधले पाणी शोषून घेत असतात. विहिरींमधील पाण्याचा उपसा होत असतो यामुळे वॉटरटेबलची पातळी इतर ऋतूंमध्ये खाली जात असते. उन्हाळ्यामध्ये ती पातळी विहिरीच्या तळापेक्षाही खाली गेली तर ती विहीर आटून कोरडी होऊन पडते. जमीनीमधून खाली झिरपत जाणारे पाणी जमीनीतले काही क्षारही शोषून घेत असते, तर त्या पाण्यात मिसळलेले मातीचे काही कण वाटेवरच अडकून राहतात आणि त्यामुळे खोलवरच्या झ-यांमधले पाणी स्वच्छ दिसते. अशा प्रकारे पाण्याच्या या साठ्यामध्येसुद्धा पाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींची ये जा चालत असते. 

नदीच्या पाण्यामध्ये मिसळलेले ओघळ आणि नदीचा प्रवाह ज्या भागामधून येतात तिथल्या दगडमातीतल्या आणि खडकांमधल्या क्षारांचा (मिनरल्स) काही अंश त्या पाण्यात येतो. विहीरीमध्ये येणारे पाणी कित्येक दिवस किंवा महिने जमीनीखाली राहिलेले असल्यामुळे त्या पाण्यात या क्षारांचा अंश अधिक प्रमाणात उतरतो. सेंद्रिय पदार्थांच्या बाबतीत कदाचित याच्या उलट घडत असते. विहिरीच्या पाण्यापेक्षा नदीच्या पाण्यात त्यांचे प्रमाण जास्त दिसते. पण एकाद्या विहिरीला उपसा नसला आणि आजूबाजूचा पालापाचोळा किंवा इतर घाण तिच्या पाण्यात पडून कुजत राहिले तर मात्र त्या पाण्यात त्याचे प्रमाण भयंकर वाढते.  . . . .  . . . . . . .  . . . . . . . .  . (क्रमशः)


No comments: