Sunday, December 29, 2013

या वर्षातल्या नवलकथा - ३ भूमिगत खजिना

उत्तर प्रदेशात एक आटपाट नगर होतं, त्याचं नाव दौंडिया खेडा. तिथे एक राजा होता, त्याचं नाव राव रामबक्षसिंग. त्याच्या राज्यात सुखसमृद्धी नांदत असे. त्याचा मोठा राजवाडा होता, त्यात एक खजिना होता. तो सोन्यानाण्याने खच्चून भरला होता. एकदा काय झालं, १८५७ साल आलं, मेरठ आणि कानपूर वगैरे ठिकाणच्या इंग्रजांच्या छावण्यांमधल्या सैनिकांनी उठाव केला, पहिलं स्वातंत्र्ययुद्ध पुकारलं. त्यांना मनुष्यबळ आणि त्यांच्या खर्चासाठी पैसे, रसद वगैरेची गरज ती. ते गोळा करण्यासाठी ते स्वातंत्र्यसैनिक गावोगांवी फिरू लागले. इंग्रजांच्या दृष्टीने ते शिपायांचं बंड होतं, इंग्रजांनी त्या बंडखोर शिपायांना शोधायचं निमित्य केलं, त्यांच्या फौजा गावोगाव हिंडू लागल्या, अनन्वित अत्याचार आणि लुटालूट करायला लागल्या. इतर चोर, लुटारू आणि दरोडेखोरांचंही फावलं, तेही त्या अंदाधुंदीचा फायदा घ्यायला लागले. बिचारा राजा घाबरला, त्यानं काय केलं, खोल खड्डा खणून आपला खजिना जमीनीखाली लपवून ठेवला. पुढे स्वातंत्र्ययुद्ध संपलं. इंग्रजांच्या विजयी फौजा सूडबुद्धीनं सगळीकडे धूळधाण करत सुटल्या. आटपाट नगराचीही त्यांनी वाट लावली. खुद्द राजालाच पकडून सुळावर चढवून दिलं. राजाचा आत्मा त्या खजिन्यापाशी भरकटत राहिला आहे अशी अफवा पसरली.

इथपर्यंतची कहाणी थोडी विश्वास ठेवण्यालायक वाटते. आमच्या जमखंडीतसुद्धा असेच काही तरी घडले होते असे मी माझ्या लहानपणी ऐकले होते. उत्तर भारतात झालेल्या उठावाच्या बातम्या ऐकून तिथला संस्थानिक संभ्रमात पडला होता. हे युद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी जिंकले असते आणि सगळ्या इंग्रजांचा खातमा केला असता तर त्यांची नजर नक्कीच इंग्रजांना साथ देणा-या संस्थानिकांकडे वळली असती आणि त्यांचा बचाव करायला कोणीच वाली उरला नसता. त्यामुळे तिथला तत्कालिन राजा तळ्यात मळ्यात करत राहिला. पण उत्तरेतल्यासारखे दक्षिणेत काही झालेच नाही. राणी कित्तूर चन्नम्मासारखी एकादी ठिणगी पडली पण त्याचा वणवा व्हायच्या आधीच तिला निष्ठुरपणे विझवून टाकले गेले. उत्तर हिंदुस्थान पुन्हा आपल्या ताब्यात येताच इंग्रजांनी दक्षिणेकडेही लक्ष वळवले. त्यांच्या फौजा आता आपल्यावर चाल करून येणार हे तिथल्या सगळ्या हुषार राजांनी ओळखले. जमखंडीच्या राजाने त्याच्या खजिन्यातल्या काही मौल्यवान वस्तू रातोरात एका जुन्या पडक्या विहिरीत टाकल्या आणि तिला बुजवून वरती शंकराच्या पिंडीची स्थापना केली, तिच्यावर लगेच एक घुमटी उभारली आणि सभामंटप, गाभारा वगैरे बांधायला सुरुवात केली. हे कोणाला कळू नये म्हणून ज्यांनी हे काम केले त्या मजूरांनाही गाडून टाकले म्हणे, चेतसिंग नावाच्या एका उत्तर भारतीयाला पकडून बेबनावाचा सगळा आळ त्याच्यावर टाकला, त्याला सरळ गावाबाहेर नेऊन जाहीरपणे फासावर लटकावले आणि अशा प्रकारे इंग्रजांची मर्जी संपादन केली. अशी सगळी दंतकथा मी लहानपणी ऐकली होती. त्या चेतसिंगाची एक समाधी किंवा थडगेही त्या काळात गावाबाहेर होते आणि उमारामेश्वराचे जरी देवाचे देऊळ असले तरी त्याच्या आजूबाजूला रात्री भुते फिरतात अशी अफवा होती.

उत्तर प्रदेशातली ही कहाणी आता यासाठी आठवली कारण त्याचा पुढला भाग दीडशे वर्षांनंतर या वर्षी घडला. त्याचं काय झालं, शोभन सरकार नावाचा एक साधूपुरुष त्या गावाचा उद्धार करायला अवतरला. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमानकाळाचे त्रिकाळ ज्ञान तर आहेच, मनुष्य, देव आणि पिशाच या तीघांमध्ये तो लीलया वावरतो. हा धर्मात्मा स्वतः नेहमी कुठल्यातरी भलत्याच काळात आणि कुठल्यातरी इतर प्रकारच्या योनींमधल्या (देव, पिशाच, आत्मा वगैरें) लोकात वावरत असतो. तो मधूनच कधीतरी भूलोकात येतो आणि त्याच्या शिष्याला काही खुणा करतो. स्वामी ओमजी नावाचा हा पट्टशिष्य त्यातला अर्थ समजून इतरांना सांगतो. तर काय झालं, देशाच्या वाईट परिस्थितीमुळे त्या साधूचा आत्मा फार कष्टात पडला, त्यानं त्याच्या आध्यात्मिक गुरूचा धावा केला. त्या गुरूंनी त्या दिवंगत राजा राव रामबक्षसिंगाच्या आत्म्याला त्या साधूच्या स्वप्नात पाठवून दिलं. त्या आत्म्यानं सांगितलं, "मी गेली दीडशे वर्षं इथे घुटमळत राहिलो आहे, मला आता मुक्ती पाहिजे. मी अमूक जागी पुरून ठेवलेलं हजार टन सोनं बाहेर काढून दिलं तर या गावाचं, या राज्याचं, या देशाचं भलं होईल. त्याच्या माथ्यावर असलेलं सगळं कर्ज फिटून जाईल, सगळीकडे आबादीआबाद होईल. तर मी शांत होईन, मला मोक्ष मिळेल."

शोभन सरकारनं आपलं स्वप्न स्वामी ओमजीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगितलं. त्यात महंत नावाचा एक केंद्रातला मंत्रीही होता. या मंत्र्याचाही शोभन सरकारच्या खरेपणावर आणि अद्भुत दैवी सामर्थ्यावर पूर्ण विश्वास बसला होता. शिवाय त्यानं म्हणे असंही भविष्य सांगितलं होतं की निवडणुकांनंतर महंतला छत्तिसगडचे मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. त्यात कसले विघ्न येऊ नये म्हणून त्यानं लगेच हालचालींना सुरुवात केली. पुरातत्व खात्याच्या माणसांची मोठी फौज त्या ठिकाणी उत्खनन करायला पाठवून दिली. या गोष्टीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सगळ्या वाहिन्यांचे वार्ताहर आणि फोटोग्राफर त्या ठिकाणी जाऊन पोचले. तिथल्या कामाचे लाइव्ह टेलिकास्ट होऊन जगभर ते दाखवले जाऊ लागले. आर्किऑलॉजी डिपार्टमेंटच्या लोकांना अवघड प्रश्न विचारायला लागले. "तुम्ही स्वप्नांवर विश्वास ठेवता का?", "याला किती खर्च येणार आहे?", "तो कोण करणार आहे?" तेसुद्धा मुरलेले सरकारी अधिकारी होते. त्यांनी नाना त-हेची यंत्रं बरोबर आणली होती. तिच्यावरून त्यांना समजलं म्हणे की जमीनीखाली अलोह (नॉनफेरस) धातूचे साठे दिसत आहेत. आता ते सोनं आहे की पितळ आहे की आणखी काही कोण जाणे. या जागी रामायण महाभारतकाळच्या पुरातन वस्त्यांचे अवशेषही कदाचित सापडतील असे धागे त्यांना मिळालेले आहेत. थोडक्यात म्हणजे "आम्ही काही अंधश्रद्ध नाही आहोत".

साधूबाबांनी आता आणखी काही कहाण्या रचल्या. हे हजार टन सोने म्हणजे मूळचे सोने मुळी नव्हतेच. त्याच्या गुरूंना चावलेल्या डासांनी त्याच्या शरीरातून जे रक्त बाहेर काढले त्यातल्या एकेका थेंबाचे रूपांतर म्हणे सोन्याच्या कणात झाले. आता किती गुरूंना किती डासांनी चावून हजार टन रक्त बाहेर काढले असले प्रश्न विचारणे म्हणजे त्यात आपल्या महान हिंदू धर्माचा अपमान होणार. त्यामुळे ते विचारायचे नसतात. हे सोने जरी सापडले तरी त्यासाठी शोभन सरकारची उपस्थिती हवीच कारण त्याला डावलले तर मग गुरूंची अवकृपा होणार आणि ते सोने पुन्हा मातीत मिसळून जाणार. शिवाय मिळालेल्या सोन्यातला वीस टक्के भाग गावाच्या विकासासाठी त्यालाच द्यायला हवा अशी अटही घातली होती. ती कोणी मान्य केली होती याबद्दल कोणी काही बोलत नव्हते.

हा सगळा तमाशा महिनाभर चालला आणि हळू हळू थंड झाला. या काळात काही मूर्ख लोकांनी तर तिथे आता खूप श्रीमंती येणार म्हणून दिल्ली आणि मुंबईमधल्या नोक-या सोडून गावाकडे धाव घेतली. काही लोकांनी तिथल्या आसपास जमीनी विकत घेतल्या. सगळ्या वाहिन्यांनी आपापला टीआरपी वाढवून घेतला आमि जाहिरातींमधून कमाई करून घेतली.

अशी ही या वर्षातली एक नवलकथा. असे काही होऊ शकेल यावरसुद्धा विश्वास बसत नाही. पण सत्य हे कल्पिताच्या पलीकडे असते असे म्हणतात त्याची प्रचीती आली.

No comments: