Sunday, December 29, 2013

या वर्षातल्या नवलकथा - २ सचिनचा संन्यासतीन चार दशकांपूर्वीचे भारतातले क्रिकेट खूप वेगळे होते. ट्वेंटी ट्वेंटी, फिफ्टी फिफ्टी, ओ़डीआय वगैरेसारखे झटपट प्रकार आलेले नव्हते. पाच पाच दिवस रेंगाळणारे कसोटी सामने बहुधा अनिर्णितच रहायचे आणि जे कोणी महाभाग कंटाळवाणे वाटेल इतक्या चिवटपणे खेळून नाबाद रहात, त्यांना ती मॅच अनिर्णित ठेवण्यात 'यशस्वी' झाल्याचे श्रेय मिळायचे, त्याचे तोंडभर कौतुकसुद्धा होत असे. गोलंदाज हा जीवघेण्या शस्त्रास्त्रांनी हल्ला करणारा कोणी महाभयंकर राक्षस असतो असे भासवले जात असे आणि त्याच्या तडाख्यापासून स्वतःचा फक्त बचाव करून घेण्यात फलंदाज स्वतःला धन्य मानत असत. यष्टीच्या (स्टंप्सच्या) डाव्याउजव्या बाजूने जाणारे चेंडू ओळखून सोडून देण्याला "वेल् लेफ्ट" असे म्हणत आणि यष्टीवर किंवा त्याच्या आसपास येणारा चेंडू बॅटने नुसता अडवला तरी त्याला "वेल प्लेड" म्हणत. त्यात कसले डोंबलाचे 'चांगले खेळणे' असते हे मला समजत नव्हते. फरुख इंजिनियर, पतौडीचे नवाब आणि काही प्रमाणात सुनील गावस्कर वगैरेंनी यात थोडा बदल घडवून आणायला सुरुवात केली असली तरी दिसभराच्या रटाळ खेळात दोन अडीचशे धांवांच्या पलीकडे सहसा मजल मारली जात नसे. अशा त्या काळात शारदाश्रम नावाच्या शाळेतल्या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी नावाच्या दोन मुलांनी एकाच दिवसात धबाधब तीनतीनशे धावा काढून ६६४ धावांचा प्रचंड पहाड रचला ही बातमी वाचून सगळ्यांनी आश्चर्यमिश्रित कौतुकाने तोंडात बोटे घातली होती. मैदानांवरील सचिनच्या अशा प्रकारच्या महापराक्रमांची दखल त्या काळातल्या निवड समित्यांनीसुद्धा लगेच घेतली आणि अवघ्या १५ वर्षाच्या या मुलाची मुंबई संघासाठी आणि १६ वर्षाचा असतांना भारताच्या संघासाठीसुद्धा निवड झाली.

भारताच्या संघात गेल्यानंतरही तो अप्रतिम कामगिरी करत राहिला आणि कायमची जागा पटकावून बसला. फलंदाजीमधले सगळे विक्रम एका पाठोपाट एक करत मोडीत काढून त्याने नवनवे विक्रम प्रस्थापित केले. माझा हा ब्लॉग क्रीडाविश्वापासून नेहमी दूरच राहिला आहे, पण सचिनचे पराक्रम पाहून मलासुध्दा 'विक्रमवीर रेकॉर्डकर' असा लेख लिहिण्याचा मोह झाला. सचिनच्या कामगिरीबद्दल आतापर्यंत अमाप लिहिले गेले आहे आणि मला त्यात आणखी कणभरही भर घालायला जागा उरली आहे असे मला वाटत नाही. खरे तर क्रिकेटमधले मला काहीच कळतही नाही. डॉन ब्रॅडमननंतर जगभरात फक्त सचिन तेंडुलकरच इतका श्रेष्ठ फलंदाज का झाला? इतरांहून वेगळे असे कोणते कौशल्य त्याच्याकडे होते? किंवा इतर कोणीही सचिनसारखे का खेळू शकत नव्हता? गुरुवर्य श्री.आचरेकर आणि वडील बंधू अशा ज्या दोघांनी त्याला घडवले असे सचिन नेहमी मुलाखतींमध्ये सांगत असतो त्यांना स्वतःला तसे चांगले का खेळता आले नाही? सचिन खूप चांगले खेळत होताच, पण आज विराट कोहली आणि शिखर धवन जितके तडाखेबाज खेळतांना दिसतात तसा त्याचा खेळ का होत नव्हता? मनात उठलेल्या अशा प्रकारच्या प्रश्नांना मला स्वतःलाच समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत. 

सचिनकडे जी कोणती जादू होती त्याच्या आधाराने तो वर्षानुवर्षे क्रिकेट खेळत राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने स्वतःच स्थापित केलेले सगळे रेकॉर्ड्स मोडून तो नवनवे विक्रम नोंदवत होताच, ट्वेंटी ट्वेंटी, फिफ्टी फिफ्टी, ओ़डीआय यांच्यासारख्या खेळाच्या झटपट प्रकारांमध्येसुद्धा त्याने प्राविण्य मिळवून त्या प्रकारांमध्येसुद्धा तो विक्रम करू लागला. त्याच्याबरोबर किंवा त्याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये आलेल्या इतर अनेक फलंदाजांना संघातून वगळले गेले किंवा ते स्वतःहून निवृत्त झाले तरी सचिन खेळतच होता आणि चांगले खेळत होता. तो फक्त पंधरासोळा वर्षाचा असतांना त्याची निवड करण्याचे धाडस त्या काळातील निवडसमित्यांच्या सदस्यांनी केले होते, पण तो चाळिशीच्या जवळ पोचला तरी त्याला संघामधून वगळण्याचे धैर्य मात्र कोणापाशी नव्हते. कारण आम जनता त्याचे कौतुक करता करता केंव्हा त्याचा उदोउदो आणि जयजयकार करायला लागली होती ते समजलेच नाही. काही लोकांनी तर त्याची एकाद्या देवासारखी पूजा आणि आरतीसुद्धा करायचे बाकी ठेवले नव्हते. वयाने सर्वात लहान खेळाडू म्हणून त्याने केलेल्या विक्रमाच्या जोडीला वयाने सर्वात मोठा आणि सलग जास्तीत जास्त वर्षे खेळत राहिलेला खेळाडू असे आणखी काही विक्रम करेपर्यंत तो वाट पाहणार आहे का? असे वाटायला लागले होते. "सचिनलाच आणखी किती वर्षे निवडणार आहात?" असा प्रश्न कोणी निवडसमितीला विचारत नसला तरी "तुम्ही कधी निवृत्त होणार आहात? आणखी कोणते रेकॉर्ड्स मोडायचे शिल्लक राहिले आहेत?" असे काही लोक सचिनला विचारायला लागले होते. सचिनचे त्यावर ठराविक उत्तर असायचे, "मी कधीच विक्रम करण्याच्या उद्देशाने खेळलो नाही. मी फक्त मन लावून चांगले खेळायचा प्रयत्न केला आणि करत असतो. त्यातून आपोआप विक्रम होत असतात. मला संघात घ्यायचे की नाही ते सिलेक्टर्स माझा खेळ पाहून ठरवतात. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार?"

गेली तीन चार वर्षे असेच चालले होते. लोक सचिनला कंटाळलेले होते असे नाही, पण त्याच्या स्वतःच्याच पूर्वीच्या खेळाइतकी उंची तो कदाचित गाठू शकत नव्हता आणि स्वतःच्या प्रतिमेच्या तुलनेत कमी पडायला लागला होता. त्यामुळे आता त्याने स्वतःहून सूज्ञपणे बाजूला होऊन नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी द्यावी असे बरेच लोक कुजबुजायला लागले होते. या वर्षाच्या मध्याच्या सुमाराला नक्की काय झाले कोण जाणे, पण सचिनने निवृत्त होण्याचा मनोदय जाहीर केला. त्याला निरोप देण्याचा जंगी समारंभ करण्याचे ठरवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. जंगी जंगी म्हणजे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आखले गेले असेल किंवा करता येऊ शकेल असे मात्र मला वाटले नव्हते. यामुळे माझ्या दृष्टीने ही एक नवलकथाच ठरते.

तोपर्यंत सचिन १९८ कसोटी सामने खेळला होता, त्याचा अखेरचा सामना २००वा असावा, म्हणजे सामन्यांची डबलसेंच्युरी होईल असे ठरले. त्याच्या आईला जास्त कष्ट न घेता हा खेळ पहायला मिळावा तसेच ज्या मुंबईकरांचा तो अत्यंत लाडका होता त्यांनाही त्याला खेळतांना पहायची अखेरची संधी मिळावी म्हणून हा सामना त्याच्या आवडत्या मुंबईतच व्हावा असेही ठरवले गेले. भारतासकट जगातल्या अनेक देशांच्या क्रिकेटच्या संघांच्या दौ-यांची वेळापत्रके खूप आधीपासून ठरलेली असतात. त्यातून थोडीशी सवड काढून वेस्ट इंडीजच्या संघाला फक्त दोन टेस्ट मॅचेस खेळण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. ते सामने गर्दीसाठी प्रसिद्ध असलेले कोलकाता आणि मुंबई इथेच खेळवले गेले. ते दोन देशांच्या संघामधले चुरशीचे  सामने आहेत आणि ते जिंकणे दोन्ही संघांना महत्वाचे वाटते असे त्या दोन्ही सामन्यांमध्ये एका क्षणासाठीदेखील वाटले नाही. तो  करमणुकीचा एकादा मोठा कार्यक्रम, सचिनच्या चाहत्यांचा मेळावा असावा असेच रूप त्यांना आले होते. "सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, सच्चिन्, " असा सारखा घोष चालला होता. मैदानावर इतर कोण काय
करत आहेत याची कोणाला चिंता किंवा महत्वच वाटत नव्हते. सामना संपताच सचिनला अत्यंत भावपूर्ण निरोप देण्याचा समारंभ झाला. इतर कुठल्याच क्षेत्रातल्या कुठल्याच मोठ्या व्यक्तीला जीवंतपणी इतक्या थाटामाटाने निरोप दिला गेला नसेल.

या प्रसंगी जी भाषणबाजी आणि लिखाण झाले ते तर कल्पनेच्या पलीकडे जात होते. सचिन आता कसोटी सामने खेळायचे थांबवणार आहे की सदेह समाधी घ्यायला निघाला आहे असा संभ्रम तिथली रडारड पाहून पडायला लागला होता. "सचिनशिवाय आता भारताचे कसे होणार?" अशी कोणाला काळजी वाटायला लागली होती आणि "सचिन नाही म्हणजे आता क्रिकेटच उरले नाही." असे सूर लावलेले ऐकून त्यांला हसावे की रडावे ते समजेनासे झाले होते. त्या दिवशीचा एकंदर नूर पाहून मनात असा विचार आला की सर्वसंगपरित्याग करून संन्यास घ्यायला निघालेल्या माणसाची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक निघाली तर ते कसे दिसेल!

सचिनने आता कसोटी सामने किंवा अशा मोठ्या स्पर्धांमधून भारताचे प्रतिनिधित्व करायचे थांबवले तरी तो काही नाहीसा होणार नाही किंवा दृष्टीआड जाणार नाही. त्याने जीवनामधून संन्यास घेतलेला नाही. क्रिकेटमध्ये खेळून मिळालेल्या पैशांवर तो जगत होता आणि आता ती मिळकत बंद झाल्यामुळे त्याचे हाल होणार असे नाही. त्याने याआधीच कोट्यावधी किंवा कदाचित अब्जावधी एवढी माया जमवून ठेवलेली आहे. खेळामधून भरपूर पैसे मिळवता येतात हेसुद्धा बहुधा सचिननेच पहिल्यांदा दाखवून दिले आणि ते आकडे गुप्त ठेवले असले तरी त्यातही बहुधा त्यानेच विक्रम केले असणार. सचिनला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी क्वचितच आणखी कोणा खेळाडूला मिळाली असेल. कदाचित सिनेस्टार्सनासुद्धा नसेल. त्याचा पूर्णाकृती पुतळासुद्धा लंडनच्या मादाम तुसाद म्यूजियममध्ये उभा आहे आणि प्रेक्षकांना त्याची आठवण देत असतो. कसोटी सामन्यातला शेवटच्या दिवसाचा खेळ खेळून झाल्यानंतर लगेचच त्याला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कारही जाहीर झाला. मानसन्मान, संपत्ती, प्रसिद्धी वगैरे सगळे काही त्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्राप्त झाले आहे. 

सचिन तेंडुलकरने केलेल्या भाषणांमध्ये आणि वार्ताहरांशी बोलतांना पुन्हा पुन्हा हेच सांगितले की त्याने क्रिकेट या खेळालाही रामराम म्हंटलेले नाही. या ना त्या स्वरूपात तो हा खेळ खेळत राहील आणि तो जनतेसमोर येत राहणारच आहे. आता ते केंव्हा आणि नेमके कशा प्रकारे हे ही लवकरच समजेल.  सचिनने क्रिकेटविश्वाला आणि जनतेने सचिनला अलविदा करणे याचा हा सोहळा मात्र या वर्षातली एक नवलकथा होती.

No comments: