Wednesday, February 06, 2013

लेफ्ट राइट - डावा उजवा (भाग ३)

शिक्षण संपवून नोकरीला लागल्यानंतर अनेक लोकांचा गणित वा विज्ञान या विषयांशी संबंध रहात नाही. ते घरचा जमाखर्च ठेवत नाहीत किंवा कोणता व्यवसाय करत नाहीत. पण ते एकाद्या चांगल्या नोकरीमध्ये असतील तर त्यांना दर महिन्याला एक वेतनपत्रक (पेबिल) मिळते त्यातसुध्दा डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) असतातच. मूळ वेतन (बेसिक पे), महागाई भत्ता, शहर भत्ता, प्रकल्प भत्ता, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, गणवेश भत्ता, प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता, कुटुंब नियोजन भत्ता, जादा कामाचा पगार (ओव्हरटाईम), बोनस, आणखी काही खास वेतन किंवा भत्ते (स्पेशल पे) अशा निरनिराळ्या मथळ्यांखाली त्यांना देण्यात येणारी रकम या पत्रकात डाव्या बाजूला मांडली असते. भविष्यनिर्वाहनिधी (प्रॉव्हिडेंट फंड), आयकर (इन्कम टॅक्स), त्यावर सरचार्ज, क्वार्टरमध्ये रहात असल्यास त्याचे भाडे, वीजबिल, पाणीपट्टी, मेंटेनन्स फी, टेलीफोन बिल, त्यांनी घर, मोटार, फर्नीचर, घरातली मंगलकार्ये वगैरेंसाठी कर्जे घेतली असल्यास त्यांचे हप्ते, विम्याचा हप्ता, ऑफीसातल्या सहकारी संस्था, रिलीफ फंड, म्यूच्युअल बेनेफिट फंड वगैरेंचे हप्ते अशा अनेक कारणांसाठी पगारामधून कापून घ्यायच्या रकमा उजव्या बाजूला दाखवल्या असतात. त्या सगळ्या कपातींची बेरीज करून ते पैसे त्यांना मिळणार असलेल्या डाव्या बाजूच्या एकूण रकमेमधून कमी केल्यानंतर उरलेला पगार त्या नोकराच्या बँकेतील खात्यात जमा होतो. कधी कधी तर तो अर्धामुर्धाच असतो. या सगळ्या बाबींमध्ये नेहमी बदल होत असतात. सलग तीन महिने माझ्या खात्यात पगाराची समान रकम जमा झाली असे कधी झाल्याचे मला तरी आठवत नाही. त्यामुळे आपल्याला नेमका किती पगार मिळतो हे सांगणे कठीण असते. जेवढी रकम मी पत्नीला सांगेन ती सगळी खर्च करण्याच्या योजना तिला सुचत असल्यामुळे मी तिला प्रत्यक्ष बँकेत जमा होणारी रकमच सांगू शकत होतो. कोणाचा पगार विचारणे आजकाल सभ्यपणाचे समजले जात नाही, पण लहान गावामधून जुन्या पिढीतला कोणी आला तर तो हमखास हा प्रश्न विचारीत असे, एवढेच नव्हे तर त्याच्या भाच्याला इतका किंवा जावयाला तितका पगार मिळतो हे देखील सांगत असे. मी त्याला पेबिलमधल्या लेफ्ट हँड साईडचा एकूण पगार सांगितला तर उरलेल्या पैशाचे मी काय करतो अशा संशयाच्या नजरेला तोंड द्यावे लागत असे. माझ्या ऑफीसात काम करणारे मित्र घरी आले तर त्यांच्याबरोबर बोलतांना पे स्केल्स, पे कमिशन वगैरेंची चर्चा झाली तर त्यात येणारे 'बेसिक पे'चे आकडे वेगळेच असत.

माझ्या लहानपणी आमच्या गावाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत चालत जायला पाच मिनिटे लागत असत आणि तिथल्या लोकांकडे भरपूर वेळ असे. गावातल्या गावात कुठेही जायचे म्हणजे पायीच जायचे. गावातले मातीचे रस्ते वाहनांसाठी योग्य नव्हतेच. त्यांच्या कडांना असलेली उघडी गटारे, त्यांच्या काठाला पडलेली घाण आणि त्यामधून वावरणारे घाणेरडे प्राणी यांना टाळण्यासाठी सगळे लोक रस्त्यांच्या मधोमध चालत असत. समोरून येणारे कोणी भेटले तर रस्त्याच्या मधोमध उभे राहून त्यांच्याशी बोलत आणि जरासे बाजूला होऊन एकमेकांना पुढे जाण्यासाठी वाट देत असत. एकादी बैलगाडी किंवा सायकल आली तर ती जाईपर्यंत थोडे बाजूला सरकून उभे रहात असत. क्वचित केंव्हातरी दोन बैलगाड्या अमोरसमोरून आल्या तरी बैलांनासुध्दा थोडी बुध्दी असल्यामुळे ते एकमेकांना टक्कर न देता थांबत असत. शहरात आल्यानंतर तिथले प्रशस्त रस्ते आणि त्यावरून दोन्ही दिशांनी लागलेली वाहनांची रांग पाहून माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नव्हती. माणसांना चालण्यासाठी वेगळे पदपथ (फूटपाथ) असायचे. तरीही काही लोक रस्त्यावरून चालायचे, पण बहुधा डाव्या कडेने.

आजकाल वाशीमध्ये जागोजागी काही फलक लावलेले दिसतात. "उजव्या बाजूने चालण्याचे फायदे - चेनचोरांपासून बचाव आणि अपघातांपासून सुरक्षा" अशा अर्थाचे काही तरी त्यावर लिहिले असते. मी लहान असतांना कर्नाटकामधल्या एका गावातले पोलिस सगळ्या पादचा-यांना "बलगडीयिंद नडियिरी (उजव्या बाजूने चाला)" असे सांगत असतांना आठवले. आपण रस्त्याच्या उजव्या बाजूला असल्यास समोरून डाव्या बाजूने येणारे वाहन आपल्याला दिसते आणि त्याच्या वाहनचालकाचे आपल्याकडे लक्ष नसले किंवा दुचाकीवरील चेनचोराचे लक्ष असले तरी आपण काही हालचाल करून बाजूला होऊ शकतो असा उद्देश त्यामागे असावा.


रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे चालावी यासाठी नियम करून त्यांचे सर्वांनी पालन करणे महत्वाचे आहे. इंग्लंड आणि भारतासारख्या त्यांच्या साम्राज्यातील देशांमध्ये सारी वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवतात आणि युरोप अमेरिकेसह जगाच्या इतर भागांमध्ये वाहनचालकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या उजव्या अंगाने चालवाव्यात असे नियम आहेत. वाहतूक वाढत गेल्यानंतर मोठ्या रस्त्यांमध्ये दुभाजक घालून त्यांचे दोन वेगळे भाग करण्यात आले. आता तर दोन जवळजवळ स्वतंत्र रस्तेच बांधले जातात. इंग्लंड आणि फ्रान्स यांना जोडणारा भुयारी मार्ग झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी येणारी वाहने एकमेकांच्या समोर येऊन धडकतील अशी काळजी काही लोकांना वाटत होती. एक जास्तीचे भुयार करून उजव्या बाजूच्या रस्त्याला डावीकडे आणि डाव्या बाजूच्या रस्त्याला उजवीकडे आणले गेले.

वाहतुकीच्या या नियमांनुसार ड्राइव्हिंग करणे सोयीचे व्हावे म्हणून लेफ्ट हँड ड्राइव्ह आणि राईट हँड ड्राइव्ह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोटारगाड्या बनवल्या जातात. त्या चालवतांना चालकांना त्या गाड्या चालवण्याची सवय होते. दुस-या प्रकारची गाडी चालवतांना त्याचे भान ठेवावे लागते. एकाच रस्त्यावरून परस्परविरुध्द दोन्ही दिशांनी जाणा-या गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत राहिल्या तर त्यांची टक्कर होणार नाही, पण एकाद्या चौकात एका गाडीला समोर जायचे असेल आणि विरुध्द दिशेने येणा-याला उजव्या हाताला वळायचे असेल तर त्याला पहिल्या गाडीला आडवे जाऊन तिचा मार्ग ओलांडून पुढे जावे लागते. यात त्यांनी धडकण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पूर्वीच्या काळी गावांमधल्या मुख्य चौकांमध्ये ट्रॅफिक पोलिस उभे असत, अजूनही काही ठिकाणी असतात. ते आपला उजवा किंवा डावा हात कधी उभा धरून एका बाजूने येणा-या गाड्यांना थांबवून ठेवत आणि आडवा धरून त्या दिशेने जायची परवानगी देत असत. वाहतुकीत वाढ झाल्यानंतर हे काम करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल आले. त्यातल्या हिरव्या सिग्नल्समधून समोर, डाव्या किंवा उजव्या बाजूला जाण्याची अनुमती दिली जाते आणि लाल रंगाच्या दिव्याने त्यांना थांबून रहायची आज्ञा मिळते. सिग्नल्सपाशी गाड्या थांबून राहिल्यामुळे वेळेचा खोळंबा होऊ लागला हे पाहून उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) किंवा भूमीगत रस्ते (सबवे) बांधण्यात आले. तरीसुध्दा मुख्य प्रवाहातून बाहेर पडून त्यांवर जाण्यासाठी रस्त्यातल्या डाव्या किंवा उजव्या लेनमध्ये जावे लागते. यातली गंमत किंवा विसंगती अशी आहे की मुंबईमधल्या रस्त्यावर गाडी चालवतांना उजव्या बाजूला वळायचे असेल तर आधी रस्त्याच्या डाव्या बाजूला राहून पुलावर जाणे टाळायचे आणि अर्धा पूल झाल्यानंतर त्याच्या खालून उजवीकडे जायचे असे करावे लागते. अमेरिकेत याच्या नेमके उलट असते. आपले वाहन रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला न्यायचे असल्यास आपल्या मागे असलेल्या वाहनाच्या चालकाला ते कळणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्या वाहनाच्या मागच्या बाजूला असलेला डावा किंवा उजवा दिवा लावून तसा संदेश देणे आवश्यक असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास रस्त्यावरून वाहन चालवतांना आपल्याला सतत लेफ्टराईट, डावेउजवे यांचेकडे लक्ष द्यावे लागते.

'रस्ता', 'मार्ग', 'दिशा' वगैरे शब्दांच्या अर्थांची व्याप्ती वाढत जाऊन त्याने जीवनाला व्यापून टाकले. कोणत्याही प्रकारचा चांगला उपदेश किंवा सल्ला म्हणजे 'मार्गदर्शन' झाले आणि तो वाईट असल्यास 'वाकडी वाट दाखवणे' झाले. जगभरातली राजेशाही नष्ट किंवा निष्प्रभ होऊन तिचे जागी आलेल्या पर्यायी राजकीय व्यवस्थांमुळे सत्तेसाठी राजकारण सुरू झाले. त्यात विभिन्न प्रकारचे मतप्रवाह आले. औद्योगिक क्रांतीनंतर बदललेल्या सामाजिक स्थितीमध्ये सुस्थितीत असलेले 'कारखान्यांचे मालक' आणि पिळवणूक सहन करणारे 'मजूर' असे वर्ग निर्माण झाले. परंपरागत व्यवस्थेतसुध्दा सरदार, इनामदार, जमीनदार, सावकार वगैरे धनाढ्य वर्ग आणि त्यांचे गुलाम, नोकर, वेठबिगारी सेवक यांच्यामध्ये पराकोटीचे अंतर होतेच. "यातला श्रीमंत वर्ग गरीबांचे शोषण केल्यामुळेच बलवान झाला आहे. समाजातली विषमता हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याचे पारिपत्य करणे अत्यावश्यक आहे" असे समजणारा एक वर्ग आणि "ही विषमता नैसर्गिक असते, मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन आणि प्रयत्न करून स्वतःची अनेक प्रकारे प्रगती करून प्रत्येक माणूस पुढे जात असतो" असे मानणारा दुसरा गट असे दोन परस्परविरोधातले मुख्य गट झाले. यातला पहिला गट भांडवलदारांच्या जिवावरच उठलेला असल्यामुळे दुस-या गटाला पाठिंबा देणे त्यांच्या फायद्याचे होते. फ्रान्समध्ये झालेल्या रक्तरंजित क्रांतीनंतर जी अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली होती त्या काळात तिथल्या लोकप्रतिनिधींच्या सभेत समाजवादी विचार करणारे लोक सभागृहातल्या डाव्या बाजूला बसायचे आणि परंपरागत रीतींचा पाठपुरावा करणारे किंवा "असल्या क्रांतीकारकांपेक्षा राजेशाहीच बरी होती" असे मानणारे सदस्य उजव्या बाजूला बसत असत. त्यामुळे राजकारणामध्ये 'डावी' आणि 'उजवी' विचारसरणी असा शब्दप्रयोग रूढ झाला. मार्क्स आणि एंजल्स यासारख्या विचारवंत लेखकांनी डावे तत्वज्ञान उभे केले. ते मान्य असणारे लोक स्वतःला 'पुरोगामी' म्हणवून घेऊ लागले आणि त्यांच्या मते विरुध्द बाजूचे लोक 'प्रतिगामी' ठरले. 

पुढील कालावधीत या दोन्हींमध्ये मवाळ, मध्यममार्गी, जहाल, अतीजहाल असे अनेक पंथ उदयाला आले. साम्यवादी किंवा कम्यूनिस्टांनी रशियात रक्तरंजित क्रांती घडवून आणली आणि नावापुरती 'दीनदुबळ्यांची हुकुमशाही' आणली. त्यात आधीच्या धनाढ्य लोकांची पुरती वाट लागली पण गोरगरीबांचे जीवन सुखाचे झाले असे म्हणता येणार नाही. 'सर्व मालमत्ता समाजाच्या संयुक्त मालकीची असावी' हे तत्व यशस्वी झाले नाहीच. अखेर तिथली कम्युनिस्ट राजवट बाजूला सारली गेली, सोव्हिएट युनियनची शकले झाली आणि त्यातून निघालेल्या रशियासह सगळ्या देशांमध्ये निराळ्या प्रकारची लोकशाही आली. व्यक्तीगत मालमत्ता कमावणे आणि जमवणे परत सुरू झाले. ऱशियानंतर चीनमध्येही राज्यक्रांती होऊन माओझेदोंग याने साम्यवादी राजवट सुरू केली, ती आजतागायत चालू आहे, पण पुढील काळातल्या नेत्यांनी लोकांचा कल आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये घडत असलेल्या सुधारणांचा विचार करून आपली धोरणे बदलली. तिथेही काही प्रमाणात आणि निराळ्या रूपाने भांडवलशाही परत आली. अमेरिका हे सुरुवातीपासूनच भांडवलदारांचे नंदनवन म्हणून जगासमोर आहे. तिथेही डावी आणि उजवी विचारसरणी असली तरी त्यातला डावा डेमॉक्रॅटिक पक्षसुध्दा व्यक्तीस्वातंत्र्य आणि भांडवलशाहीलाच मानणारा आहे. त्याबरोबर सामाजिक बांधीलकी, समानता वगैरे गोष्टीही तो करतो. उजवा रिपब्लिकन पक्षसुध्दा फार वेगळी भाषा बोलत नाही. "सरकारने फक्त देशाचे संरक्षण, अर्थकारण आणि कायदा व सुव्यवस्था सांभाळावी, समाजाने काय करायचे ते समाज बघून घेईल." अशी अमेरिकन लोकांची सर्वसाधारण विचारसरणी आहे. दोन्ही पक्ष त्याच्या तपशीलात थोडा फरक करतात एवढेच. 'युनायटेड किंग्डम' असे मोठे नाव धारण करणा-या इंग्रजांच्या देशातसुध्दा उजव्या मताचा काँझर्व्हेटिव्ह आणि डाव्या मताचा लेबर असे दोन मुख्य राजकीय पक्ष झाले आणि आलटून पालटून ते सत्तेवर आले. लेबर पक्षाने उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण वगैरे काही समाजवादाचे प्रयोग करून पाहिले, पण ते फसल्यामुळे त्याची डावी विचारसरणी थोडी मागे पडली.

या जागतिक घटनांचे परिणाम भारतातल्या राजकीय परिस्थितीवर होत गेलेच. इथेही डावे आणि उजवे राजकीय पक्ष स्थापन झालेच, शिवाय इथल्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे त्यात जास्त रंग मिसळत गेले. कम्युनिस्ट या मूळच्या मुख्य डाव्या पार्टीमधून मार्क्सिस्ट बाहेर पडले, अतिरेकी डाव्यांची नक्षलवादी चळवळ सुरू होऊन ती फोफावत गेली. साम्यवादाचा सोज्ज्वळ लोकशाहीतला पर्याय म्हणून समाजवाद आला. त्याचे अनेक ब्रँड झाले. 'फ्री एंटरप्राईज'चा पुरस्कार करणारी उजव्या गटाची स्वतंत्र पार्टी निर्माण झाली आणि लयालाही गेली. सर्वसमावेशक काँग्रेस पक्षाने सगळ्याच विचारसरणींचा आधार घेऊन निरनिराळ्या काळात निरनिराळी धोरणे सांगितली. 'भारतीय' आणि 'जनता' या दोघांच्या नावाने उभा केलेला 'भाजप'ही आपला 'अजेंडा' बदलत राहिला. घर्म, भाषा, प्रांत वगैरेंचा स्वाभिमान सांगणारे इतर अनेक पक्ष अस्तित्वात आले, ते ढोबळपणे उजव्या बाजूचे किंवा प्रतिगामी समजले जातात. येनकेन प्रकारे जनतेमध्ये लोकप्रिय होऊन निवडणुकीमध्ये यश मिळवायचे आणि सत्ता काबीज करून ती टिकवून धरायची हा सर्वच राजकीय पक्षांचा म्हणण्यापेक्षा त्यातल्या नेत्यांचा मुख्य उद्देश दिसतो. त्यासाठी डाव्या किंवा उजव्या विचारांचा सोयिस्करपणे आधार घेतला जातो. असेच चित्र सध्या तरी दिसते. त्यांच्यात काय डावे उजवे करावे याच संभ्रमात सामान्य मतदार सापडलेला किंवा हरवलेला दिसतो.

अशा प्रकारे डावे आणि उजवे हा फरक आपल्याला पदोपदी दिसतो. इंग्रजी भाषेतल्या 'लेफ्ट' आणि 'राइट' या शब्दांना दुसरेही अर्थ आहेत. 'राइट' या शब्दाचा अर्थ 'बरोबर' असाही होतो, पण राजकारणातले 'राइट विंगर' नेहमी 'बरोबरच' असतात असे नाही. 'लेफ्ट'चा अर्थ 'गेलेले' असा होतो, पण डावे राजकारणी जायला तयार होणार नाहीत आणि जोपर्यंत समाजात असमानता आहे तोपर्यंत ते जाणार नाहीत. शरीरामधले हात, पाय आणि विज्ञान, गणित, वाणिज्य वगैरे विषयांमधील डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) सारख्याच महत्वाच्या असतात आणि एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे डावे किंवा उजवे असे म्हणण्याऐवजी डावे आणि उजवे असे म्हणायला हवे.

 . . . . ..... . . . . . . . .  .  (समाप्त)
     

No comments: