Thursday, January 31, 2013

लेफ्ट राइट - डावा उजवा (भाग २)

"लेफ्ट राइट", 'डावे', 'उजवे' या गोष्टी फक्त आपले हात, पाय, हृदय, मेंदू वगैरे शरीरामधील भागांपुरत्या मर्यादित नाहीत. जीवनात पदोपदी त्या आपल्यासमोर येत असतात. आपल्या शिक्षणाची सुरुवात अक्षर आणि अंक यांच्या ओळखीने होते. अक्षरे, शब्द, वाक्ये यामधून भाषा शिकल्यानंतर त्या भाषेमधून आपण इतर विषय शिकतो. पण त्यासाठी ती अक्षरे एका ओळीत लिहावी लागतात. कागदावर इतस्ततः पसरलेल्या अक्षरांमधून काही बोध होणार नाही. इंग्लिश, फ्रेंच यासारख्या युरोपियन भाषा 'लेफ्ट टु राईट' लिहितात, तसेच मराठी, कानडी वगैरे भारतीय भाषासुध्दा डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. मध्यपूर्वेमधल्या अरबी, फारशी आणि भारतातल्या काश्मीरी, उर्दू वगैरे भाषा मात्र उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. यावर अनेक विनोदही केले जातात. त्यातला एक असा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शीत पेयांची विक्री वाढवण्यासाठी एका कंपनीने एक आकर्षक चित्रमय जाहिरात तयार केली. भाषेचा प्रश्न न पडता जगभरातील सर्वांना ती समजावी आणि तिने त्यांचे लक्ष वेधून घ्यावे असा हेतू त्या मागे होता. या जाहिरातीत तीन चित्रांचा संच होता. उन्हाने म्लान होऊन अर्धमेला झालेला एक माणूस डाव्या बाजूच्या पहिल्या चित्रात दाखवला होता, दुस-या चित्रात त्या शीतपेयाची बाटली त्याच्या तोंडाला लावली होती आणि तिस-या चित्रात तो माणूस अदम्य उत्साहाने 'याहू' करून उडी मारण्याच्या मूडमध्ये दाखवला होता. ही जाहिरात जगभरातील सर्व प्रदेशांमध्ये दाखवून झाल्यानंतर काही दिवसांनी केलेल्या सर्वेक्षणात असे दिसले की त्या काळात इतर सर्व भागात त्या शीत पेयाचा खप वाढला असला तरी मध्यपूर्वेत मात्र ते पेय प्यायला कोणीच तयार नाही. त्या लोकांनी ती जाहिरात उजवीकडून डावीकडे वाचली असेल तर त्यांना असेच वाटले असणार की एक चांगला हट्टाकट्टा नौजवान हे पेय पिऊन झाल्यावर गलितगात्र होतो. यावर हे पेय टाळण्याखेरीज ते तरी आणखी काय करतील?

अंकांची ओळख करून घेतांना १, २, ३ ..... वगैरे ९ पर्यंत सुटे अंक झाले की १०, ११ वगैरेंमध्ये डावीकडील १ या आकड्याचे मूल्य १० इतके असते आणि उजवीकडल्या आकड्याची किंमत ०, १ वगैरेसारखी कमी असते. १ या आकड्याच्या पुढे एकापुढे एक शून्ये लिहित गेल्यावर १०, १००, १०००, १००००, १००००० वगैरे करता करता डावीकडल्या १ या आकड्याची किंमत दहा दहा पटीने वाढत जाऊन कोटी, अब्ज, परार्ध वगैरे होते, पण उजवीकडल्या ० चे मूल्य मात्र शून्यावरच राहते. अंकांचा अर्थ समजायला लागताच त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे सुरू होतात. २+३ = ५, ३ x ४ = १२ अशासारख्या समीकरणांमधून ते मांडले जातात. बीजगणितांध्ये अंकांऐवजी क्ष, य यासारखी अक्षरे आणि भूमितीमध्ये परीघ, क्षेत्रफळ वगैरेंची सूत्रे (फॉर्स्यूले) समीकरणांमधून असतात. त्रिकोणमिती (ट्रिगनॉमेट्री) आणि कॅल्क्युलसमध्ये ही सूत्रे आणि समीकरणे अधिकाधिक जटिल होत जातात. पदार्थविज्ञानामधले (फिजिक्समधले) नियमही अशा प्रकारच्या निरनिराळ्या सूत्रांमधून मांडले आणि सिध्द केले जातात. या सगळ्या समीकरणांमध्ये डावी (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी (राईट हँड साइड) अशा दोन बाजू असतात आणि दोन्हींचे मूल्य समान असते. या विषयांमधली गणिते सोडवतांना समीकरणे मांडून जितकी माहिती उपलब्ध असते ती त्यांमध्ये मांडली जाते. त्यानंतर त्या समीकरणांची पुनर्रचना करून माहीत नसलेल्या किंवा अज्ञात बाबी (अननोन एंटिटीज) डावीकडे आणि माहीत असलेल्या उजवीकडे आणतात. त्यांची मूल्ये घालून ती समीकरणे सोडवल्यानंतर आपल्याला जे शोधायचे असते ते म्हणजे विचारलेला प्रश्न अखेरीस डाव्या बाजूला येतो आणि त्याचे उत्तर उजव्या बाजूला मिळते. 'डावीकडून उजवीकडे' या भाषेतल्या नियमानुसार आधी प्रश्न आणि नंतर उत्तर हा क्रम बरोबरच आहे.

रसायनशास्त्रात (केमिस्ट्रीमध्ये) सुध्दा रासायनिक क्रियांची समीकरणे असतात, पण त्यांचे स्वरूप थोडे वेगळे असते. दोन रसायनांचा संयोग होऊन त्यातून तिसरे रसायन तयार होत असेल (उदाहरणार्थ C+ O2 = CO2) तर संयोग पावणारी (रिअॅक्टंट) रसायने डाव्या बाजूला आणि त्यातून निर्माण झालेले उत्पादन (प्रॉडक्ट) उजव्या बाजूला लिहिले जाते. एका रसायनाच्या विघटनातून अनेक द्रव्ये बाहेर पडत असतील तर ते मूळ रसायन डाव्या बाजूला आणि त्यातून निघालेली द्रव्ये (Daughter products) उजव्या बाजूला मांडतात. थोडक्यात म्हणजे ही क्रिया होऊन गेलेली असल्यास भूतकाळ डाव्या बाजूला आणि वर्तमानकाळ उजव्या बाजूला आणि होणार  असल्यास वर्तमानकाळ डाव्या बाजूला आणि भविष्यकाळ उजव्या बाजूला दाखवतात. डाव्या आणि उजव्या बाजूच्या रसायनांमधील अणूंची संख्या समान असावी एवढेच यातले 'समीकरण' असते.

विज्ञानाच्या क्षेत्रामधून बाहेर पडून वाणिज्यशाखेकडे पाहिले तर  तिथेसुध्दा "लेफ्ट राइट", 'डावे', 'उजवे' या गोष्टी येतातच. त्यातल्या जमाखर्चाचा उगम अंकगणितामधूनच झाला आहे. माझ्या लहानपणी घरातला साधा जमाखर्च लिहितांना त्या वहीच्या प्रत्येक पानावर उभी रेघ मारून त्याचे डावा व उजवा असे दोन भाग केले जात असत किंवा वहीतल्या डाव्या व उजव्या पानांमध्ये मिळून महिन्याचा जमाखर्च लिहीत असत. तो लिहितांना बाहेरून घरात आलेली सारी जमा रक्कम किंवा 'आवक' डाव्या बाजूच्या पानावर लिहीत आणि खर्च झालेली किंवा 'जावक' रकम उजव्या बाजूच्या पानावर लिहिली जात असे. पण घरात आलेले सगळे धन म्हणजे उत्पन्न नसते, तसेच बाहेर गेलेले सगळे पैसे खर्च झालेले नसतात. उदाहरणार्थ बँकेमधल्या आपल्याच खात्यात पैसे ठेवले किंवा त्यातून पैसे काढून घरी आणले तर ते पहिल्यांदाही आपलेच असतात आणि नंतरही आपलेच असतात, तसेच आपण उसने घेतलेले पैसे आपल्याला परत करायचे असतात आणि कुणा विश्वासू माणसाला उसने दिले असले तर ते परत येणार असतात. चेक पेमेंट्स, क्रेडिट कार्डे, डेबिट कार्डे, ईबँकिंग, हायर परचेस वगैरेंमुळे आता रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत आणि घरखर्चाचा जमाखर्च लिहिणे तर फारच कमी झाले आहे. ते काय असायचे हे पुढच्या पिढ्यांना बहुधा माहीतही असणार नाही.

लहान दुकानाचा हिशोब ठेवतांना सामानाच्या विक्रीमधून आलेले पैसे डाव्या बाजूला आणि खरेदीसाठी केलेला खर्च उजव्या हाताला मांडत असत. पण अशा एका पानावरून त्या दुकानाला कितपत नफा किंवा तोटा होत आहे हे सांगता येणार नाही कारण त्या दिवशी झालेली विक्री आणि खरेदी ही बहुधा निरनिराळ्या मालाची असू शकते. महिन्यातला जमाखर्च पाहिला तरी त्या कालावधीत जेवढे सामान दुकानात आले तेवढेच किंवा ते सगळे त्याच महिन्यात विकले गेले असे सहसा होत नाही. सामान आणि पैसे यांची सतत अदलाबदल चाललेली असते. महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत अखेरच्या दिवशी गल्ल्यात जास्त पैसे असले आणि दुकानातल्या सामानाचा स्टॉकसुध्दा वाढला असला तर ते दुकान फायद्यात चालले आहे आणि दोन्ही गोष्टी कमी झाल्या असल्या तर ते नुकसानीत चालले आहे असे म्हणता येईल  पण त्यातली एक वाढली आणि दुसरी कमी झाली असली तर त्यांची तुलना करून पहावी लागेल. हा गोंधळ टाळण्यासाठी व्यावसायिक जमाखर्च 'डबल एंट्री बुक कीपिंग' या वेगळ्या प्रकारे लिहिला जातो. यात पैशाचा हिशोब ठेवणारे कॅशबुक असते, त्या शिवाय सामानाचा हिशोबही वेगळा ठेवला जातो. खरेदी करतांना किती सामान दुकानात आले ते डाव्या बाजूला मांडतात आणि विकले गेल्यावर त्यातले किती कमी झाले ते उजव्या बाजूला लिहिले जाते. दोन्ही पुस्तकांमधल्या डाव्या बाजूंची एकूण बेरीज केली की त्यातून जमा समजते आणि उजव्या बाजूच्या बेरजेमधून खर्च. तो कमी असला तर अर्थातच नफा झाला आणि जास्त झाला तर तोटा. 

मोठा व्यवसाय किंवा कारखाना उभा करण्यासाठी जमीन, इमारती, यंत्रसामुग्री वगैरेंवर मोठा भांडवली स्वरूपाचा खर्च होतो आणि तो चालवण्यासाठी कच्चा माल, इंधन, वीज, नोकरांचे पगार वगैरेंवर खर्च होत राहतो. भांडवली खर्च (कॅपिटल) भागवण्यासाठी भाग भांडवल, दीर्घ मुदतीची कर्जे वगैरेंमधून पैसे उभे केले जातात तर चालवण्यासाठी (रनिंग एक्स्पेन्स) तात्पुरत्या मार्गांचा अवलंब केला जातो. यामुळे अशा उद्योग व्यवसायांचा 'इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंट' वेगळा असतो आणि 'बॅलन्स शीट' वेगळा काढला जातो. इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंट एक वर्ष किंवा तीन वा सहा महिने अशा विशिष्ट कालावधीसाठी असतो आणि बॅलन्स शीट एका विशिष्ट तारखेला असलेली परिस्थिती दाखवतो. दोन्हींमध्ये डावी बाजू (लेफ्ट हँड साईड) आणि उजवी बाजू (राईट हँड साइड) असतातच. याशिवाय सर्वाच महत्वाची बॉटमलाईन असते. इनकम अँड एक्स्पेंडिचर अकौंटमधली बॉटमलाईन पाहून त्या कालावधीत किती नफा किंवा तोटा झाला हे समजते आणि बॅलन्स शीटमधली बॉटमलाईन पाहून त्या तारखेला त्या कंपनीची एकंदर आर्थिक परिस्थिती कशी आहे ते कळते. कर्जे आणि इतर देणी वगळून जर तिच्याकडे भरपूर स्थावर आणि जंगम मालमत्ता असली तर एकाद्या वर्षी तोटा झाला तरी तिची परिस्थिती मजबूत असते आणि ती तग धरू शकते. याउलट तिची संपत्ती कमी होत होत शून्यावर आली तर तिचे दिवाळे निघते.

.  . . . . . . . .............. . . . . (क्रमशः)
 

No comments: