Thursday, March 15, 2012

शाश्वत ऊर्जा कार्यशाळा - भाग - ३


उद्घाटनाचा सोहळा पार पडल्यानंतर चहापान करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात चार तांत्रिक सत्रे (टेक्निकल सेशन्स) होती. त्यातले पहिले सत्र 'ऊर्जा दृश्य' (एनर्जी सिनेरिओ) या विषयावर होते. यात मुख्यतः विजेच्या उत्पादनाबद्दल बोलले जाईल असे सांगितले गेले होते. खरे तर जलऊर्जा (हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर) हे शाश्वत ऊर्जेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. पावसाचे पाणी धरणात येत राहते आणि त्यामुळे वीज उत्पादनासाठी धरणामधून खाली सोडलेल्या पाण्याची भरपाई होत असते. विजेचे उत्पादन करतांना पाणी नष्ट होत नसल्यामुळे ते पाणी पुढे कृषी आणि इतर उपयुक्त कामांसाठी वापरले जाते. या ऊर्जानिर्मितीत जमीन, पाणी किंवा वातावरणाचे प्रदूषण होत नाही. या प्रकारे विजेचे उत्पादन गेली शंभरावर वर्षे होत आले असल्यामुळे त्यामधील तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री चांगली परिचयाची आहे. पुनर्निर्मितीक्षम स्त्रोतांपासून (रिन्यूएबल एनर्जी सोर्सेसपासून) जगभरात आज जेवढी वीज तयार होत आहे त्यातील जवळपास नव्वद टक्क्यांएवढा सिंहाचा वाटा जलशक्तीचा असल्यामुळे त्याला या सत्रात अग्रस्थान मिळेल असे मला वाटले होते पण या वेळी तिचा समावेशच केला गेला नव्हता असे दिसले. औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रांपासून जगातली तसेच भारतातलीसुध्दा निम्म्याहून अधिक वीज तयार होत असल्यामुळे ही शाश्वत ऊर्जा नसली तरी तिची दखल घेणे आवश्यक होते. या प्रकारच्या ऊर्जेच्या भविष्याबद्दल शंका उत्पन्न झाल्यामुळेच खरे तर ऊर्जेच्या इतर स्त्रोतांकडे लक्ष दिले जाऊ लागले आहे. त्यामुळे पहिला मान औष्णिक ऊर्जेला मिळावा अशी योजना होती. पण यावरील माहिती सादर करण्यासाठी श्री.कुकडे यांना चहापानानंतर लगेच मंचावर परत येणे शक्य झाले नसावे. हा कार्यक्रम आधीच तासभर उशीराने रेंगाळत चाललेला असल्यामुळे वेळ वाचवण्यासाठी सत्राध्यक्षांनी मला भाषणासाठी पाचारण केले आणि पंधरा मिनिटात आपले वक्तव्य संपवण्याची सूचना केली.
"सर्व उपस्थितांना नमस्कार!" एवढ्या तीनच शब्दात मी आपले नमन केवळ थेंबभर तेलात आटोपले आणि पूर्वपीठिका, प्रस्तावना, विषयाची ओळख वगैरेंना फाटा देऊन सरळ अणूगर्भात घुसलो. तिथे ही ऊर्जा कशा प्रकारे वास करत असते आणि तिला बाहेर काढल्यानंतर तिचे रूपांतर विजेत कसे केले जाते. इंधन (फ्यूएल), मंदलक (मॉडरेटर), शोषक (अॅब्सॉर्बर) आणि शीतलक (कूलंट) हे या केंद्रातील प्रक्रियांचे मुख्य घटक कोणते कार्य करतात, त्यांच्या द्वारे ही प्रक्रिया किती उत्तम प्रकारे नियंत्रित केली जाते, त्याशिवाय किती सुरक्षेचे उपाय योजलेले असतात वगैरे सारे समजावून सांगितले आणि या बाबतीतला आतापर्यंतचा जागतिक अनुभव, त्याबाबत केला जात असलेला खोडसाळ अपप्रचार आणि त्या बाबतीतील प्रत्यक्ष सद्यपरिस्थिती, त्यावर घेतले जाणारे आक्षेप आणि त्यांचे निराकरण, भविष्यकाळामधील योजना वगैरेंबद्दल माहिती दिली. सध्या निर्माण केली जात असलेली अणूऊर्जा युरेनियमच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे आणि त्याचे साठे संपण्याची दाट शक्यता असल्यामुळे ही शाश्वत ऊर्जा नाही असे असले तरी फास्ट ब्रीडर रिअॅक्टर्सद्वारे सध्या उपलब्ध असलेल्या युरेनियमचा उपयोग अनेक पटीने वाढवता येणे शक्य आहे आणि फ्यूजन रिअॅक्टर्स बनवणे साध्य झाले तर मग अणू ऊर्जेचे प्रचंड भांडार खुलेल वगैरे सांगितले. या पहिल्याच सत्रामधील हे पहिलेच भाषण असल्यामुळे श्रोत्यांची उपस्थिती चांगली होती आणि त्यांनी गोंधळ न करता ते माझे सांगणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मी दिलेल्या उत्तरांनी त्यांचे समाघान झाले असावे असे मला तरी वाटले.

त्यानंतर श्री.संतोष गोंधळेकर यांनी अपारंपरिक ऊर्जा हा विषय घेतला. त्यांचा मुख्य भर जैवऊर्जेवर (बायोएनर्जीवर) होता. वनस्पती आणि प्राणिमात्रांची शरीरे ज्या असंख्य सूक्ष्म पेशींपासून बनतात त्यांचे रेणू (मॉलेक्यूल्स) मुख्यतः कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांनी भरलेले असतात. या सगळ्याला बायोमास असे म्हंटले जाते. झाडांची मुळे, खोड, फांद्या, पाने. फुले, फळे वगैरे भाग आणि त्यापासून तयार केले जात असलेले कागद व कापड यासारखे कृत्रिम पदार्थ, तसेच प्राणिमात्रांचे मृतदेह, मलमूत्र वगैरे सर्वांचा समावेश या बायोमासमध्ये होतो. हे जैव पदार्थ कुजतात तेंव्हा काही सूक्ष्म जंतू या पदार्थांच्या अवाढव्य रेणूंचे विघटन करून त्यापासून लहान लहान आणि साधे रेणू वेगळे करतात. त्यातून कार्बन व हैड्रोजन यांची मीथेनसारखी वायुरूप संयुगे (काँपौंड्स) निघतात. त्यांना बायोगॅस म्हणतात. या ज्वलनशील वायूला जाळून त्यामधून ऊर्जेची निर्मिती करता येते. हीच जैवऊर्जा झाली. हा बायोगॅस स्वयंपाकघरातला एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) आणि वाहनांमध्ये भरला जाणारा सीएनजी (काँप्रेस्स्ड नॅचरल गॅस) यांच्यासारखाच असतो. गोबर गॅसच्या स्वरूपात ही ऊर्जा खेड्यापाड्यांमधून उपयोगात आणण्याचे प्रयत्न बरेच वर्षांपासून चाललेले आहेत. अधिक मोठ्या प्रमाणात या गॅसचे उत्पादन करून त्यापासून विजेची निर्मिती केली तर त्यांमुळे भारत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल असा विश्वास श्री,गोंधळेकर यांनी व्यक्त केला. अशा प्रयत्नांचे सूतोवाच श्री,प्रभाकर कुकडे यांनी त्यांच्या बीजभाषणात केले होतेच.

शहरामध्ये रोज गोळा होणारा टनावधी कचरा ही नगरवासियांपुढे असलेली एक मोठी समस्या आहे. त्याचे काय करायचे हेच उमजेनासे झाले नसल्यामुळे तो नष्ट करणे हेच महत्वाचे आहे. अशा वाया जाणा-या कच-यापासून बायोगॅसची निर्मिती केली तर त्याचेपासून सुटका होईलच, शिवाय त्यापासून ऊर्जा निर्माण करून तिचा वापर करता येईल. यामुळे शहरांसाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. बायोगॅसच्या निर्मितीपर्यंत होणारा खर्च नगरविकासाखाली केला (म्हणजे गॅस फुकट मिळवला) आणि त्यापासून पुढे वीजनिर्मिती करण्याचा खर्च वीजग्राहकाकडून वसूल केला तर ती वीज माफक दरात प्राप्त करता येईल. या कारणाने शहरांमध्ये अशा प्रकारे ऊर्जेची निर्मिती करणे गरजेचे आहे असे माझेही मत आहे. शहरातला नागरिक टाकाऊ जैव वस्तूंचे काहीही करू शकत नाही किंवा त्या साठवूनही ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांचा योग्य प्रकारे निचरा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येते.

पण खेड्यांमधली परिस्थिती वेगळी आहे. भाजीची साले, फोलपटे, देठ, पालापाचोळा, उरलेले अन्न, गवत वगैरे गोष्टी जनावरांना खाऊ घातल्या जातात, त्यांचे शेण आणि उरलेला चुरा, भूसा वगैरेंचासुध्दा खत म्हणून किंवा ज्वलनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे जैव कच-यापासून मुक्ती मिळवणे हा तिथे इतका मोठा प्रश्न नाही. वीजउत्पादन करण्यासाठी भरपूर बायोमासाचा सतत पुरवठा करावा लागेल आणि तो उत्पन्न करण्यासाठी एलेफंट ग्रास, जट्रोपा यासारखी लवकर वाढणारी खास झाडे मुद्दाम लावून वाढवावी लागतील. अन्नधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस, पालेभाज्या, फळफळावळ यासारख्या पिकांऐवजी शेतात ही झाडे लावली आणि त्यांच्यापासून तेवढेच किंवा जास्त उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा बाळगली तर त्याला लागणारा खर्चसुध्दा विजेच्या उत्पादनखर्चात धरावा लागेल आणि ते केले तर ही वीज केवढ्याला पडेल याबद्दल माझ्या मनात शंका आहेत. काही संभाव्य आकडेवारी मांडून ती वीज स्वस्तातच पडेल असे भाकित श्री.गोंधळेकरांनी केले असले तरी हे प्रत्यक्ष अनुभव घेऊन सिध्द करावे लागेल.

सुरुवातीला ठेवलेले औष्णिक ऊर्जेवरील भाषण श्री.कुकडे यांनी त्यानंतर सादर केले. त्यांचा या क्षेत्रामधील दीर्घ अनुभव आणि ज्ञान यामुळे ते अर्थातच खूप माहितीपूर्ण होते. भारतात कोळशाचे प्रचंड साठे असले तरी त्याचा दर्जा आणि त्याचे उत्पादन पुरेसे नसल्यामुळे आपल्याला तो खूप मोठ्या प्रमाणात आय़ात करावा लागतो. खनिज तेल आणि वायू याबद्दल तर विचारायलाच नको. या बाबतीत आजच आपण तीन चतुर्थांश तेलाची आयात करतो आणि हा आकडा लवकरच नव्वद टक्क्यावर जाईल असे दिसते आहे. मध्यपूर्वेमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढत चालल्या आहेत. आपल्या परकीय चलनाचाच नव्हे तर राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा भाग त्यात खर्च केला जातो. या चित्रात सुधारणा होण्याची शक्यता तर नाहीच, ते दिवसे दिवस बिघडत जाणेच क्रमप्राप्त असल्यामुळे आतापासूनच आपण विजेच्या उत्पादनाच्या पर्यायी मार्गांचा अवलंब (अणुशक्तीसह) अधिकाधिक प्रमाणात करणे गरजेचे आहे हे त्यांनी सप्रमाण सिध्द करून श्रोत्यांच्या मनावर ठसवायचा चांगला प्रयत्न केला. नव्या औष्णिक विद्युतकेंद्रांसाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी मिळवणेसुध्दा आता किती कठीण झाले आहे याची कल्पना त्यांनी दिली. तरीसुध्दा पुढील पन्नास साठ वर्षे तरी आपल्याला त्यावरच अवलंबून राहणे गरजेचे असल्यामुळे त्यातून मार्ग काढावेच लागतील हे त्यांनी स्पष्ट केले.. . . . . . . . . . . . (क्रमशः)

3 comments:

ऊर्जस्वल said...

ह्या लिखाणाचे निमित्ताने, अशाप्रकारच्या कार्यशाळांतील कामाचा खुला अहवाल कदाचित प्रथमच प्रकाशित होत असावा. ही एक चांगली सुरूवात आहे. त्याखातर आपले मनःपूर्वक अभिनंदन.

शाश्वत ह्या शब्दाचा खरा अर्थ अढळ, खात्रीशीर असा होतो.

रिन्यूएबल = पुनर्नविनीक्षम
नॉन-कन्व्हेंशनल = अपारंपारिक
अल्टर्नेटिव्ह = पर्यायी
एनर्जी सिनेरिओ = ऊर्जा-परिप्रेक्ष्य
सस्टेनेबल = संधारणक्षम, संधारणायोग्य
मॉडरेटर = विमंदक (हिंदीत मंदायक शब्द वापरला जातो)

Anand Ghare said...

धन्यवाद.
मी लिहीत असलेले लेख हा अहवाल नाही. हे माझे वैयक्तिक विचार आहेत आणि कदाचित संयोजकांना ते मान्य होणारही नाहीत. कार्यशाळेचा अधिकृत अहवाल आलाच तर तो विज्ञानभारतीच्या संस्थळावर दिसेल. मी या संस्थेचा पदाधिकारी किंवा प्रवक्ता नाही.
आपण दिलेल्या मराठी प्रतिशब्दांबद्दल आभार.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंग्रजी शब्द कसे प्रमाणभूत केले जातात हे मला माहीत नाही, पण जगभरातील सर्व लोक नवे शब्दसुध्दा नेमक्या समान अर्थाने वापरतात. मराठीमध्ये त्याबाबतीत संदिग्धता दिसते. यामुळे मी वाचलेले किंवा ऐकलेले मराठी शब्द देऊन मूळ इंग्रजी शब्द कंसात दिले आहेत.

ऊर्जस्वल said...

अणुऊर्जेचे शास्त्र मराठीत प्रथमतः आणायला हवे आहे*. शास्त्राचा विचार झाला की शब्द आपोआप येत राहतात. त्या शब्दांचे प्रमाणीकरण करण्याकरता मग योग्य ते व्यासपीठ असावे लागते. व्यासपीठात केवळ मराठी भाषेचे तज्ञ असून भागत नाही तर शास्त्राचे वेत्तेही असावेच लागतात. प्रमाणीकरणाची ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणेही गरजेचे असते. म्हणून त्या प्रक्रियेस महाराष्ट्र शासन, मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद अशांसारख्या संस्थांचे अधिष्ठान असावे लागते. अशा संस्थांचा ह्या बाबतीतला उत्साह आणि मराठीतून नवनवे अनुभव शब्दबद्ध करण्याची आंतरिक ओढ असलेले आपल्यासारखे विद्वान ह्यांच्या संगमातून जागतिक मराठी प्रमाणीकरण उदयास येऊन चिरंजीव होईल ह्यात मला संशय वाटत नाही.

आपले लेख ह्यासाठी आदर्शवत ठरत आहेत. माहीत झालेले प्रमाण शब्द कटाक्षाने वापरण्याचे आपले धोरण मी सतत पाहत आहे. त्याखातर आपले हार्दिक अभिनंदन!* उदाहरणार्थ त्वरित कणाचे आदळवण्याने घडवून आणलेल्या विदलनासंबंधित सहा आण्विक प्रक्रिया अस्तित्वात आहेत. आपाती कणाच्या वाढत्या ऊर्जेसोबत होणारे परिणाम, अनुक्रमे खालील प्रक्रियांत परिणत होत जातात.

१. ’परस्परस्वभावांतर’ (transmutation): लक्ष्य अणुगर्भाचा अण्वांक बदलून त्याचे परस्परस्वभावांतरण घडून येते.
२. 'अनावरण' आणि 'उचल' (stripping and pickup): यात आपाती कणातील हिस्सा लक्ष्य अणुकेंद्र खेचून घेते किंवा आपाती कणच लक्ष्यातील कणाची उचल करतो.
३.’विदलन’ (fission): आपाती कणाच्या प्रग्रहणामुळे संयुक्त अणुगर्भ तयार होऊन मग तो जवळपास सारख्या आकाराच्या दोन अणुकेंद्रकांत विभाजित होतो.
४. ’विखंडन’ (spallation): यात लक्ष्य अणुकेंद्रकाचे अनेक लहानमोठे तुकडे होतात.
५. ’विदारण’ (fragmentation): यात लक्ष्य अणुकेंद्रकाचे अनेक छोटे छोटे तुकडे होतात.
६. ’विखुरण’ (scattering): यात आपाती कण लक्ष्यास लवचिक (प्रत्यास्थ) धडक देऊन ऊर्जा-विनिमय करतो, त्यामुळे त्याची दिशा बदलून तो विखुरला जातो.

संपूर्ण विज्ञान व तंत्रज्ञान मराठीत आणावयाचे असेल तर विचारपूर्वक शब्दयोजना करून मुळातील अर्थ नीट व्यक्त करावे लागतात. ज्याला केवळ फिजनचीच चर्चा करायची आहे ते त्याला अणुभंजन, अणुविखंडन इत्यादी सुचेल ते शब्द योजून मोकळे होत असतात. जाणकार व्यक्तींनी अभ्यासाच्या फलस्वरूप सुचवलेले शब्द स्वीकारण्यानेच नवे विज्ञान मराठीपर्यंत पोहोचण्याची शक्यता सशक्त होईल.