Wednesday, July 27, 2011

पंढरपूरचा विठोबा - भाग ४ (अंतिम)

आपापल्या काळात तुफान लोकप्रियता पावलेली आणि मलाही आवडलेली निरनिराळ्या प्रकारची चार गाणी या समारोपाच्या भागात देणार आहे. दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या आणि विठ्ठल शिंदे यांनी पारंपारिक अभंगाच्या धाटणीवर गायिलेल्या पाउले चालती या गाण्यात भक्ताच्या मनःस्थितीचे वर्णन केले आहे. रोजच्या आयुष्यात दारिद्र्याने गांजलेल्या भक्ताची पावले वारीची वेळ आली की आपोआप पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागतात आणि देवदर्शनाचा प्रसाद घेतल्यानंतर त्याला नवचैतन्य प्राप्त होते, त्याचे उद्विग्न मन शांत होते आणि संसार गोड वाटायला लागतो. असे हे सरळ सोपे भक्तीगीत आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडुनिया गाठ ।।
   गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने, पडता रिकामे भाकरीचे ताट ।
   आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते, पाहुनिया सारे फिरविती पाठ ।।
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट ।
मन शांत होता पुन्हा लागे ओढ, तैसा आणि गोड संसाराचा थाट ।।

विठ्ठला तू वेडा कुंभार या गाण्याने ज्या अनेकांना वेड लावले आहे त्यांच्यात माझासुद्धा समावेश होतो. हे गाणे मी पहिल्यांदा ऐकल्यापासून आजतागायत या गाण्याचा नंबर माझ्या टॉप टेनमध्ये लागत आला आहे. सुधीर फडके यांनी लावलेली चाल आणि दिलेल्या स्वराने ते अजरामर झाले आहेच, पण ग दि माडगूळकरांच्या शब्दरचनेला तोड नाही. जसजसे माझे अनुभवविश्व समृद्ध होत गेले तसतसे मला त्यात जास्त सखोल अर्थ सापडत गेले. याचा शब्दशः अर्थ घेतल्यास विठ्ठल नावाच्या अलौकिक कुंभाराला उद्देशून हे गाणे म्हंटले आहे, त्यात आधी त्याची तोंडभर स्तुती करून अखेर त्याच्या वागण्यामधील विसंगतीचा जाब त्याला विचारला आहे असा अर्थ निघतो. पण हे गाणे रूपकात्मक आहे हे उघड आहे. विठ्ठल म्हणजे तो जगाचा नियंता आणि त्याने तयार केलेली मडकी म्हणजे यातले सारे जीव, विशेषतः माणसे असा त्यातला छुपा अर्थ आहे. जगाचा जेवढा अनुभव येत जाईल त्याप्रमाणे त्या माणसांमधली तसेच त्यांच्या नशीबांमधली विविधता याची उदाहरणे मिळत जातात आणि त्या शब्दांमध्ये दडलेल्या अर्थाच्या अधिकाधिक छटा दिसतात. जास्त विचार केल्यानंतर मला वाटले की हा कुंभार कोणत्याही सृजनशील (क्रिएटिव्ह) कलाकाराचे प्रतीक असू शकतो. गदिमांसारखा कवी किंवा एकादा चित्रकार किंवा नटश्रेष्ठ आणि त्यांच्या रचना यांच्या संदर्भात या गाण्यातल्या ओळींचा वेगळा अर्थ काढता येतो. अखेर अंतर्मुख होऊन विचार केला तर विठ्ठल हा आपला अंतरात्मा आहे आणि आपल्याला तो निरनिराळ्या प्रकारे घडवत आला आहे असेही वाटते. गदिमांना हे सर्व अर्थ किंवा एवढेच अर्थ अपेक्षित होते असे माझे म्हणणे नाही. आणखी कोणी यापेक्षा वेगळे इंटरप्रिटेशन करू शकेल. ही या गाण्याची खुबी आहे आणि त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य त्यात दिसते.

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।
माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा ।
आभाळच मग ये आकारा.
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे,
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
न कळे यातुन काय जोडीसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

झेंडा या मागील वर्षी येऊन गेलेल्या सिनेमातले अरविंद जगताप यांनी लिहिलेले शीर्षकगीत चांगले गाजले होते. टीव्हीवरील मराठी सारेगमप या मालिकेमुळे जगापुढे आलेल्या ज्ञानेश्वर मेश्राम या आळंदीच्या भजनगायकाला त्या स्पर्धेचे परीक्षक अवधूत गुप्ते यांनी पार्श्वगायनाची संधी देऊन प्रकाशझोतात आणले. खरे तर हे गाणे म्हणजे आजच्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. इथल्या अनुभवाने गोंधळलेला माणूस अखेर आपले गा-हाणे विठ्ठलापुढे मांडून त्यालाच मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. त्यामुळे विठ्ठला अशी त्याला घातलेली साद एवढाच या गाण्याचा विठ्ठलाशी संबंध आहे.

जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं ... आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचाऱ्या जळति वाती,
वैरी कोण आहे इथे कोण साथी,
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

बुजगावण्या गत व्यर्थ हे जगनं, उभ्या उभ्या संपून जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे येगळ्या जाती,
सत्येचीच भक्ती सत्येचीच प्रिती,
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

देवकीनंदन गोपाळा या संत गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटातले विठ्ठलाच्या पायी थरारली वीट हे गाणे सर्वच दृष्टीने मनाला भिडणारे आहे. गदिमांनी केलेली उत्कट शब्दरचना, राम कदम यांचे संगीत आणि भारतरत्न पं.भीमसेनजींनी त्यावर केलेली सुरांची बरसात यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे. भैरवी रागातील या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली तर त्याचे आर्त स्वर खूप वेळ मनात घुमत राहतात. या गाण्यात विठ्ठलाचे नामस्मरण नाही की त्याची प्रार्थना नाही की त्याला केलेली विनंती किंवा मागणेही नाही. संत गाडगेबाबांच्या महानिर्वाणाने सर्व संत व्याकुळ झाले आणि प्रत्यक्ष विठ्ठलावर त्याचा एवढा आघात झाला की त्याच्या पायाखालील विटेपर्यंत त्याची कंपने गेली अशी कल्पना गदिमांनी या गीतामध्ये मांडली आहे.

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट, राउळीची घाट, निनादली ॥१॥
     ज्ञानोबांचे दारी शहारे पिंपळ, इंद्रायणी-जळ, खळाळले ॥२॥
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात, तुका समाधीत, चाळवला ॥३॥
     सज्जनगडात टिटवी बोलली, समाधी हालली, समर्थांची ॥४॥
एका ब्राम्हणाच्या पैठणपुरीत, भिजे मध्यरात्र, आसवांनी ॥५॥
     अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव, निघाला वैष्णव, वैकुंठासी ॥६॥
संत-माळेतील मणी शेवटला, आज ओघळला, एकएकी ॥७॥


. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)No comments: