Saturday, July 16, 2011

पंढरपूरचा विठोबा - २

पंढरपूरचा विठोबा - २

ज्ञानेश्वर आणि नामदेवांच्या काळापासून ते आजपर्यंत विठ्ठलाचे भक्त त्याचे गुणगान आणि प्रार्थना भजने आणि पदे या काव्यमाध्यमातून करत आले आहेत. अलीकडच्या काळातल्या कवींनी रचलेल्या काही रचना पाहू. माझ्या लहानपणी मी ऐकलेले माणिक वर्मा यांचे हे गाणे किती गोड आहे ? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा रूप पाहता लोचनी यासारख्या संतांच्या अभंगातला भाव यात आहेच. हे सांगणारी स्त्री असल्यामुळे जरा जास्त भावुक होऊन त्याच्या स्मरणाने मोहरून गेली आहे.

विठ्ठला रे, तुझ्या नामी रंगले मी, रंगले मी ।
रूप तुझे साठविते अंतर्यामी ।।
तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ।।
तुझी सावळी ही कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ।।
तुझ्या भजनी रंगता, हृदय काम धाम चिंता ।
रुक्मिणीच्या रे सख्या कांता, मोहरते मी रोमरोमी ।।

कवी सुधांशु यांनी लिहिलेल्या, दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजाने ऩटलेल्या खालील गीताची गोडी अवीट आहे. विठ्ठलाच्या साजि-या गोजि-या रूपाबरोबरच पंढरपूरला जमलेल्या भक्तांच्या मेळाव्याचे वर्णनही या गाण्यात आले आहे. विठोबा हा भक्तांचा जवळचा सखा त्यांच्या सहवासात रंगतो, त्यांच्याबरोबर डोलतो, नाचतो, बागडतो वगैरे त्याची वैशिष्ट्ये यात आली आहेत.
देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा ।।
विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा ।।
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर ।
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा ।।
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ।
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा ।।

कवीवर्य बा.भ.बोरकर यांनी पांडुरंगाचे गुणगान एका वेगळ्या आध्यात्मिक पातळीवर केले आहे. भक्ती, श्रद्धा यांनी ओथंबलेल्या त्यांच्या मनाला विठ्ठल हा एकाच ओळीत चंदनासारखा शीतल आणि इंधनासारखा ऊर्जस्वी व प्रकाशमान भासतो. अखेरच्या ओळीत ते स्वतःचे अस्तित्वच पांडुरंगात विलीन होऊन त्याच्याशी एकरूप झाल्याचे सांगतात.
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता । अंतीचा नियंता पांडुरंग ॥१॥
दयेचा सागर मायेचे आगर । आनंदाचे घर पांडुरंग ॥२॥
भक्तीचा ओलावा दृष्टीचा दृष्टावा । श्रद्धेचा विसावा पांडुरंग ॥३॥
तप्तांचे चंदन दिप्तांचे इंधन । प्रकाश वर्धन पांडुरंग ॥४॥
अंगसंगे त्याच्या झालो मी निःसंग । देहीचा साष्टांग पांडुरंग ॥५॥

दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातले कवयित्री शांताबाई जोशी यांच्या गीतात विठोबाचे गुणगान वेगळ्या त-हेने केले आहे. इतक्या सुरेख आणि सर्वांना प्रिय असणा-या विठ्ठलाची रखुमाई झाल्याबद्दल त्यात तिचे कौतुक केले आहे. सर्वसाधारण मनोवृत्ती असलेल्या बाईला असा क्षणात इकडे क्षणात तिकडे जाणारा नवरा मिळाला तर कदाचित वेगळे काही वाटेल, पण ती रखुमाई आहे आणि भक्तांसाठी इकडे तिकडे जात असला तरी तो विठ्ठल तिच्या बाजूला अठ्ठावीस युगे एका विटेवर उभा आहे.
लाखात लाभले भाग्य तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।।
मेघासम जो हसरा श्यामल, चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
नाम जयाचे मुखात येता, रूप दिसे ठायी ठायी ।।
भक्तांचा जो असे आसरा, ह्या विश्वाचा हरी मोहरा ।
क्षणात इकडे क्षणात तिकडे, हाकेला ग धाव घेई ।।

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: