Thursday, July 14, 2011

पंढरपूरचा विठोबा

माझे आईवडील त्यांच्या पिढीमधील इतर लोकांप्रमाणे, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच भाविक प्रवृत्तीचे होते. माझ्या वडिलांच्या मनात पंढरीच्या विठोबाबद्दल अपार श्रद्धा होती. गळ्यात तुळशीची माळ धारण करून ते अधिकृत वारकरी झाले नव्हते, पण दरवर्षी न चुकता ते पंढरीची वारी करायचे. त्या सुमारास येणारे रेल्वेमधील अमाप गर्दीचे लोंढे आणि पंढरपुरामध्ये राहण्याखाण्याच्या सुव्यवस्थेचा अभाव यामुळे होणारे अतोनात हाल सोसण्याची शारीरिक क्षमता आणि मानसिक बळ त्यांच्यापाशी होते. घरातील इतरांना मात्र ते जमणार नाही या विचाराने ते एकटेच पंढरपूरला जाऊन येत असत. पंढरपूर आणि तिथला विठोबा यांचा उल्लेख नेहमी कानावर पडत राहिल्यामुळे माझ्या मनात त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा तयार झाली होती.

पंढरपूरच्या वारीसंबंधात पूर्वी मी एक लेखमालिका लिहिली होती. निरनिराळ्या संतांनी लिहिलेल्या अभंगवाणीचा त्यात प्रामुख्याने उल्लेख केला होता. पारंपरिक अभंगांच्या सहाय्यानेच मी या अजब सोहळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. आधुनिक काळातील गीतकारांच्या रचनांमधून या विषयावर पहायचे मी यंदा मनात योजले होते, पण एकादशीचा मुहूर्त काही मला साधता आला नाही. नकारापेक्षा उशीर बरा (बेटर लेट दॅन नेव्हर) या उक्तीनुसार आज या विषयावर लिहायला सुरुवात करणार आहे.

संतांच्या जीवनावर काढलेल्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभंगांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न होत असतोच. शिवाय त्यांना आधुनिक काळातील गीतकारांनी केलेल्या गीतांची जोड दिली जाते. चित्रपटातल्या वातावरणाशी जुळेल अशा भाषेचा उपयोग करून लिहिलेली ही गाणी कित्येक वेळा तीन चारशे वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातात. दिवसाची सुरुवात मंगल प्रभातसमयी गायिलेल्या भूपाळीने होत असे. त्या परंपरेला धरून श्रीविठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदीमांनी लिहिलेली ही मधुर भूपाळी पहा.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।
दारी तव नामाचा चालला गजरू।
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू।
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।। आता जाग बा विठ्ठला ।
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।। आता जाग बा विठ्ठला ।

विठ्ठलाला जागे करून झाल्यानंतर त्याची मनोभावे पूजाअर्चा करायची, त्याचे गुण गायचे. हे सगळे करतांना मनात कुठेतरी कसले तरी मागणे खदखदत असतेच. सामान्य लोक लगेच ते मागून मोकळे होतात. संत सज्जन त्यांच्या मनावर ताबा ठेवतात. पण कधी हताशपणा आला तर मात्र निरुपायाने त्यांनाही विठ्ठलाचाच धावा करावा असे वाटते. कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांच्याच लेखणीतून उतरलेला हा धावा. भगवंताने पूर्वी कुणाकुणा भक्ताला कशी मदत केली होती यांची उदाहरणे देऊन आपल्या सहाय्यासाठी धावून येण्याची गळ त्यात त्याला घातली आहे.

धाव-पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी ।
अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी ।।
एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी ।
कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसी घडी ।।
जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी ।
गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिसि उडी ।।

विठ्ठलाचे गुणगान करतांना त्याच्याशी आपले जवळचे नाते जोडण्याचा प्रयत्न पूर्वीच्या संतांनी केला होता. वैकुंठात राहणारा विष्णू किंवा कैलासातल्या शंकरासारखा विठ्ठल दूरस्थ देव नाही. तो आपल्या कुटुंबातलाच आहे. विठोबाच आपले मायबाप, बंधूभगिनी, गुरू वगैरे सर्व काही असल्याचे सांगणारे अनेक प्रसिदध अभंग आहेत. याच आशयावर जगदीश खेबूडकर यांनी असे लिहिले आहे.

विठुमाऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।
काय तुझी माया सांगु शिरीरंगा ।
संसाराचि पंढरी तू, केली पांडुरंगा ।
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा ।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा, विठ्ठला मायबापा ।
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।
लेकरांची सेवा केलीस तू आई ।
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला पांडुरंगा ।
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।

क्षेत्र पंढरपूर आणि तेथील विठ्ठलरखुमाई ही दैवते यांच्याबद्दलचा भक्तीभाव मधुकर जोशी यांच्या या गीतात दिसतोच, शिवाय आपला हा आवडता देव कसा भावाचा भुकेला आहे आणि भक्तांचिया काजासाठी, त्यांच्या प्रेमासाठी धाव घेऊन जातो हेसुध्दा या गीतात सांगितले आहे.पंढरिच्या ह्या देवमंदिरी गजर एक होई ।
जय जय विठ्ठल रखुमाई ।।

क्षेत्र असे हे परमार्थाचे ।
पावन जीवन हो पतितांचे ।
पुंडलीक तो पावन झाला प्रभु-मंगल-पायी ।।१।।

द्वारावतिचे देवकिनंदन ।
गोरोबास्तव भरती रांजण ।
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी ।।२।।

आसक्तीविण येथे भक्ती ।
प्रभू नांदतो त्यांच्या चित्ती ।
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेई ।।३।।


. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: